गोव्याची साद - भाग ४ आणि अंतिम.

किणकिनाट's picture
किणकिनाट in भटकंती
3 Sep 2015 - 5:38 pm

गोव्याची साद - भाग १

गोव्याची साद - भाग २

गोव्याची साद - भाग ३

________________________________________________________________________________________
तर आवडत्या समुद्रकिनार्यावरील ३ दिवसांचा आनंददायी मुक्काम संपवून परत उत्तर गोव्याच्या किनार्यांकडे प्रयाण करते झालो. बरेच दिवसात "अँटीक मार्डोळ" रेस्टॉरंटला भेट दिली नव्हती. हे रेस्टॉरंट वेर्णा इंडस्ट्रीयल एरियामधे एन. एच. १७ वरच डी. लिंक फॅक्टरीच्या जवळजवळ समोर आहे. मार्डोळ रेसिडेंसी हॉटेलचे रेस्टॉरंट. हे अगदी वाटेवरच होते. (मडगांव-पणजी रस्ता) त्यामुळे थोडे लवकर पोचूनही जेवायला इथेच थांबलो. इथे सर्व सी फूड मधे स्पेशालिटि आहे. स्पेशल फिश थाळी इथे केळीच्या पानावर वाढून येते. यात माशांचे ६ पदार्थ असतात. इथे चित्रात पहा.

Antique Mardol

मनसोक्त आकंठ जेवूनच पुढे निघालो. पण एक जाणवले. अँटीक मार्डोळचा पूर्वीचा सर्व थाट उतरला आहे. नेहमी असणारी गर्दी अजिबातच नव्हती. बाजूलाच यांचे एक मत्स्यालय होते, ते पण बंद झाले आहे. जेवण पण पूर्वीच्या मानाने सो सो च. वर्षानुवर्षे तीच चव, थाटमाट आणि गर्दी आणि मागणी टिकवणे रेस्टॉरंट व्यवसायाचे चॅलेंज आहे. माझ्यामते गोव्यात हे चॅलेंज सौझा लोबो (कळंगुट), रिटस क्लासिक, आनंदभुवन व रेगोज (पणजी), फिशरमन्स व्हार्फ (मोबोर), स्टारलाईट (आर्पोरा), आनंद बार अँड रेस्टॉरंट (अंजुना-शिवोलि रस्ता) अशा मोजक्याच लोकांना पेलवले आहे. फ्लॉरेंटाईन सदासाठी फ्लॉप आणि ब्रिटोज कभी हां कभी ना ही दोन फेल गेलेली ठळक उदाहरणे. आमच्या अत्यंत आवडत्या आणि दर्जा आणि मागणी टिकवूनही अनाकलनीयरित्या कालानुसार कायमचे बंद झालेल्या कळंगुटच्या स्पॅरोज नेस्ट आणि मिराबाईज गोवन व्हिलेजची आजही होणारी आठवण ईथेच नोंदवून ठेवतो. ईतर अनेक रेस्टॉरंट विषयीची आमची मते आणि माहिती इथे द्यायचे लक्षात आहे. ती नंतर देईनच. ह्या ट्रीपमधे एका संध्याकाळी स्टारलाईट (आर्पोरा) मधे ताव मारलेल्या प्रॉन्स सिझलर्सचे प्रकाशचित्र

Starlite
प्रॉन्स सिझलर्स (विदाउट एनी टिक्की)

भरल्या पोटाने आणि पेंगत्या डोळ्यांनी आसागांवला पोचलो आणि रॉयल आसागांव क्लबला चेक-ईन केले.

रस्त्यामधे

On the way

On the way 2

Church photo

Church 2

Church 3

या रिसॉर्टची काही प्रकाशचित्रे खाली देतो.

रॉयल आसागांव क्लब फोटोज ****************

Royal club 1

Royal club 2

Royal club 3

Royal club 4

थोडावेळ आराम करून बाहेर पडलो. अनायसे बुधवार होता. (१ एप्रीलसुद्धा होता) खूप काळाने फ्ली मार्केटला भेट द्यायचा योग होता. तर लगेच तिकडेच गेलो. खाली दर बुधवारी अंजुना (हणजूण) किनार्यालगत चालणार्या, जगप्रसिद्ध फ्ली मार्केटची प्रकाशचित्रे

Flea 1

Flea 2

Flea 3

Flea 4

Flea 5

Flea 6

Flea 7

Flea 8

Flea 9

फ्ली मार्केट जरा गुगलून पहा ( Flea Market ) , जालावर विस्त्रुत कौतुक आहे.

अत्यंत गर्दीच्या जवळच दैनंदीन स्थानीक जीवन - हणजूण गांव

Anjuna

फ्लिया मार्केटमधे मनसोक्त हिंडून संध्याकाळी नेहमीप्रमाणे पावले वळली उत्तर गोव्यातल्या आवडत्या किनार्याकडेच. लिटल वॅगॅतॉर किंवा ओझरान किनारा. मागच्या एका भागात म्हटल्याप्रमाणे हा किनारा मेन वॅगॅतॉर किनार्याच्या थोडासा डावीकडे लपलेला आहे. प्रकाशचित्रे दाखवून दिशा आणि माहिती द्यायचा प्रयत्न करतो.

वॅगॅतॉर बीच म्हटल्यावर आपण ज्या ठिकाणि येतो ते हे.

Ozraan 1

(बहुधा सिंघम चित्रपटातील.सर्व पोलिस अधिकारी डि.जी.पी. सहित सिंघमला साथ देण्याची शपथ घेतात ते सिमेंटचे बेंचेस आणि नारळाची झाडे असलेले ठिकाण) तेथून डावीकडचा उतार उतरू लागयचा.

Ozraan 2
खालून वर सिंघम स्पॉटचा घेतलेला फोटो

एकदम एक वेगळाच किनारा आपल्यासमोर अवतरतो.
हाच आपला लिटील वॅगॅतॉर अथवा ओझरान बीच

Ozraan 7

Ozraan 3

Ozraan 4

Ozraan 5

Ozraan 13

थलासा समोरचा पार्किंग लॉट

Thalaasaa 1

थलासा , किनार्यावरून वरचा फोटो

Thalasa 2

बाजूचे रिसॉर्ट

Resort

समुद्रस्नान डुंबुन परत आस्सागांव. रात्रिचे जेवण खरेतर आनंद रेस्टॉरंटमधे करायचे होते. तिथे गर्दीपण नव्हती. पण गाडी उभी करून फक्त दरवाजे उघडले, बाहेर पण आलो नाही आणि आसमंतात भरून राहिलेला विविध माशांच्या तळण्याचा वास असा नाकात घुसला की बास. आमच्या तोंडाला पाणी सुटले , पण तरिही जरा तीव्र स्वरुपातच होता तो. मीच परत गाडीचे दरवाजे लाउन घेतले आणि सौ. ला सांगितले आपण दुसरीकडे जाऊ, आजचा वास तर तुला सहनच होणार नाही (मागच्या वेळेस जरासाच सुगंध होता पण खुल्या अंगणात टेबल न मिळाल्याने आत बसावे लागले आणि तसा सर्वांनाच त्रास झाला होता आणि हे पुढचे ४ दिवस ऐकावे लागले होते - हे मुख्य कारण. ) आनंद रेस्टॉरंटने त्यांच्या किचनमधे तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे असे वाटते. असो.

जगप्रसिद्ध आनंद बार अँड रेस्टॉरंट

Aanand bar

मग मोर्चा वळवला थोडा लांबवर, आर्पोरा- स्टारलाईटमधे.

दुसर्या दिवशी परत भटकंती, स्टारलाईट फिश थाळी (जी फक्त दिवसाच सर्व करतात), थोडा आराम, रिसॉर्ट्चा स्विमिंग पूल वगैरे कौतुके करून संध्याकाळी लिटील वॅगॅतॉर बीचवर. आजच्या संध्याकाळी मात्र आम्ही एका चित्तथरारक प्रसंगाचे प्रथम साक्षीदार होण्यासाठी तेथे गेलो होतो. झाले असे –

आज एकटे चिरंजीव समुद्रात गेले. आम्ही दोघे किनार्यावरील खडकांवर बैठक जमवली आणि वातावरण एंजॉय करत गप्पा मारत बसलो. हा बीच आधी म्हटल्याप्रमाणे खडकाळ (रॉकी) आहे. थोडासा खालील चित्रात चित्रित झाला आहे.

Ozraan 8

Ozraan 9

गोव्यातील सर्व समुद्रकिनार्यांवर सुर्योदय ते सुर्यास्त जीवरक्षक (लाईफ गार्ड्स) तैनात केलेले आहेत. आम्हाला यांची कायम मजा वाटत आली आहे. मजेची नोकरी आहे आम्ही म्हणतो. पाहिजे त्या ठिकाणी बैठक जमवायची. गप्पा मारायच्या. किनार्या किनार्यावर जीप्स, कुठे बाईक्स , क्वचित कुठे वॉटर स्कूटर चालवायला मिळते. अधुन मधून खूप आत पोहोत जाणार्यांना शिट्या मारुन आत बोलवायचे आणि सुर्यास्त झाल्या झाल्या जीपमधे सर्व फ्लॅग्स, ट्युब्स, ईतर साहित्य गोळा करत आवरते घेता घेता पोहणार्यांना दम देत शिट्या मारून बाहेर पडायला सांगायचे. काम का काम, आराम का आराम आणि रोजच समुद्रकिनार्यावर. मज्जानु लाईफ.

अजून एक अवांतर ..... पॅरासेलिंग जेव्हा गोव्यात नविन नविन चालू झाले, बहुदा १९९५ चा सुमार असेल , तेव्हा सुर्यास्त झाल्यावर नो सेलिंग. लगेच बंद. कडक नियम. आजपर्यंत तो पाळला जातो. तर सुर्यास्तानंतर लगेच एक तरुणी पॅरासेलिंग करत जात असे आणि तिला खेचणार्या मोटरबोटीचे इंजिन बंद पडत असे. ती हळू हळू पाण्याकडे कलायला लागल्यावर हा गोंगाट होत असे किनार्यावर. मग त्या पॅरासेलिंग कंपणीचा एक माणूस आणि त्याच्या बरोबरीने एक दोन जीवरक्षक आपापल्या स्कूटरी, बोटरी जे काय असेल त्याने सुसांट जाउन त्या तरुणीची सुटका करत असत. ह्या लाईव अॅडचा ईफेक्ट / इंपॅक्ट जबरदस्त होत असे. पहिल्यांदा आम्ही पाहिले तेव्हा बराच वेळ त्यातच गुंतुन पडलो होतो. पण मग काय झालं, आज कळंगुटला तोच सीन, उद्या कोलव्याला तेच, आणि सुर्यास्तानंतर लगेच. हो ना, कारण शेवटचा एक पॅसेंजरही का सोडायचा? नियमानुसार बंद झाल्यावर पुढची प्रॅक्टीस ट्रीप आमच्याच कंपणीच्या स्टॉफची. फुकटमधे जबरदस्त व्यवसायाचे लाईव प्रमोशन.

आता अति अवांतर ....... ह्यातील मजा कळल्यानंतर सर्कसमधे एक टोपीवाला माणूस आयत्या वेळेस एका टीनपाट पत्र्याच्या खुर्चीवर येऊन बसणार, हत्ती फुटबॉल खेळताना त्याच्या दिशेने मारल्यावर तो धाडकन पडणार, सर्व तंबू खो खो हसणार आणि अत्यंत वैतागलेला आणि खजील झालेला तो तंबूबाहेर जाणार. उद्या सर्व शाळकरी मुलांच्या गप्पांमधे एकदातरी साग्रसंगीत या प्रसंगाचे वर्णन. व्यवसायाचे लाईव प्रमोशन आणि इफेक्टीव अॅडव्हर्टाइजिंग. हे आठवले आणि स्वतःचेच हसू आले होते.

पण आजचा आमचा प्रसंग असा कुक्ड अप नव्हता. आमच्याच खूप मागे झाडाच्या सावलीत जीवरक्षकांची टीम बैठक जमवून बसली होती. एक फिरंगी काका-काकू, साधारण ७० च्या आसपास आमच्या जवळच्या खडकांवर आपले टी-शर्ट आणि चश्मे ठेऊन गेले, हे जाड भिंगाचे सोडा वॉटर ग्लासचे चश्मे. (नंतर आपोआपच कळले की ते फ्रेंच आहेत आणि काका ६७ तर काकू ६५ आहेत) जाताना आमच्याकडे पाहून हसून हातानेच खूण करून गेले की आमच्या वस्तुंकडे लक्ष ठेवा. आम्ही पण हसून हातानेच खूण करून होकार दिला आणि ते समुद्राकडे निघाले.

काकू आधीच पुढे निघाल्या होत्या आणि त्यांची चालपण काकांपेक्षा वेगात असल्याने काका अर्ध्या वाटेत पोचेपर्यंत त्या आपल्या समुद्रात शिरल्या पण. पुढे पुढे, पण किती ? आमच्या चिरंजीवांना, ह्या बीचवर तरी जेवढ्या पुढपर्यंत जाऊन देऊ, त्याच्यापुढे गेल्यावर मागून आरडाओरडा चालू करू, त्या लाईनच्या पुढेही जवळ जवळ १० ते १५ फूट पुढे गेल्या की त्या बघता बघता. आणि हा किनारा चांगलाच खडकाळ आहे. (A Rocky beach). फोटोंमधे पहिलेय आपण. दोन खडकरांगांमधे एक मोठा मोकळा पट्टा आहे तेवढाच. आणि गोव्यामधे (किंबहुना पश्चिम किनारपट्टीवर सर्वच किनार्यांवर) पोहताना आपण न कळत दक्षिणेकडे सरकत जातो. ( one tends to drift to south while swimming). अगदी लहानपणापासून एकटा समुद्रात पोहायला गेला असेल तर २-५ मिनिटांनी मागे वळून किनार्यावर बसलेल्या आमच्याकडे पहायची सवय चिरंजीवांना लाउन ठेवलेली आहे. दर १० एक मिनिटांनी तो आमच्यापासून खूपच डावीकडे सरकलेला असतो त्याला हातवारे करून उजवीकडे सरकायला सांगणे हे आमचे काम.

तर काका जॉईन करताना उत्साहात काकू अजून ४ फूट पुढे सरकल्या आणि काका त्यांच्याजवळ गेले. तेथे उंच झोडपणार्या लाटा येत होत्या पण दोघेही अगदी लहान मुलांसारखे मजा करत लाटांवरून उड्या मारणे वगैरे प्रकार करत पोहोत होते. आणि अत्यंत धोकादायकरित्या डावीकडे सरकत अगदी खडकरांगांसमोर आले होते. आमच्या समोरच त्यांचे जाड भिंगाचे सोडा वॉटर ग्लासचे चश्मे पडून हसत होते. आम्ही एकमेकांना म्हणालो, त्यांना खडक वगैरे काही दिसतच नसेल नाही? आणि वयोमानानुसार यांचा दम सुटला / तुटला तर न जाणो काय होईल? आणि एवढ्यात पाहिले, बैठक जमवून बसलेली जीवरक्षकांची टीमही पुर्ण लक्ष ठेउन होती, एकदम तत्पर होती. आता त्यांच्यातले दोघे आमच्या पुढे वाळूमधे होते आणि काका-काकूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी आरडा ओरडा करत होते. खूप मागे (आणि अर्थातच उजवीकडे) असणार्या आमच्या चिरंजीवांनाही तो ओरडा ऐकू नाही जात आहे तर त्यांना कुठे ऐकू जाईल? आणि दोघेही जवळ जवळ एकदमच दमली, त्यांचा दम सुटला आणि त्या खवळत्या लाटांमधे अक्षरशः दोघे लाकडी ओंडक्यांसारखे भिरकावले जायला लागले. टिमच्या मेंबर्सनी सर्व जीवरक्षक साहित्य फटाफट पास ऑन केले, त्या टीमची गती आणि हालचाली नेत्रदीपक होत्या. आम्ही तर काळाबरोबर थिजलोच होतो. आ वासून पापण्याही न मिटता दर्शकमात्र झालो होतो. टीमचे दोन मेंबर्स खडकरांगेच्या सर्वात पुढच्या सुरक्षित खडकावर, आणि सतत हात उजवीकडे हलवत त्यांना उजवीकडे सरकण्याचा इशारा करत होते. त्यांच्या चश्मे नसल्याने त्यांना कितपत दिसत असेल देव जाणो. कशा कोण जाणे पण काकू लाटांबरोबर हेलकावतच उजवीकडे सरकल्या आणि अक्षरशः ओंडक्यासारख्याच झपाट्याने मागे आल्या. जीवरक्षकाने अगदी वाकून लांब दोरी बांधलेली ट्यूब जीव खाऊन लांब फेकली आणि ती पकडायला सांगू लागला. तीही कशीबशी काकूंच्या हाताला लागली आणि का़कूंचा ताबा पंचमहाभूतातील एका खवळलेल्या भुताकडून मानवाकडे आला. पहाता पहाता काकू खडकरांगांजवळ आणि जीवरक्षकाने उडी मारली पाण्यात. काकूंना तो सुरक्षितरित्या खडकांवरच पण हुश्श्य पाण्याबाहेर घेऊन आला. काका मात्र इतके सुदैवी नव्हते. काका सरळपणे खडकरांगांमधेच शिरले. दुसर्या जीवरक्षकाने तशाही पाण्यात उडी मारली आणि काकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. काका खडकरांगांमधे होलपटले जातानाच कधीतरी शुद्ध हरपते झाले बहुतेक आणि त्या बहाद्दराने त्यांना ओढून वर काढले. काकू आता सुरझित आहेत हे पक्के करून पहिला बहाद्दरही त्याच्या मदतीला आला. ह्या क्षणाला गोठलेला किनारा सजीव झाला आणि सर्व किनारा खडकरांगांकडे धावायला लागला. आमचीपण मंत्रमुग्ध , गोठलेली अवस्था ओसरली आणि सर्व उद्गारवाचके मुखातून बाहेर पडू लागली. ह्या संपुर्ण प्रसंगाची लांबी १०-१२ मिनिटे तरी असेल पण आजही पहाताना मला तो निमिषार्धात चित्रित झालेला वाटतो.
बाकीची सर्व टीम सर्वच आवश्यक साहित्य - फर्स्ट एड बॉक्स, ऑक्सीजन सिलेंडर सहित सर्व गोष्टी घेऊन घटनास्थळावर हजर. आमच्या लक्षात यायला थोडा उशीरच लागला पण आल्याबरोबर लगेच जीव खाऊन धावत आम्हीपण पोचलो तिथे अजून एक आवश्यक वस्तू घेऊन - त्यांचे जाड भिंगाचे सोडा वॉटर ग्लासचे चश्मे. आपला चश्मा लावल्यावर सर्व स्वच्छ दिसू लागताच काकूंचा चेहर जरा उजळला आणि बेशुद्ध काकांना पाहून परत काळवंडला. ५-७ मिनिटांत काकांना जाणीवा परत येऊ लागल्या पण एकदम नॉर्मलला यायला चांगली १५-२० मिनिटे लागली. आता कुठे चिरंजीवांचे लक्ष त्यांच्या पोहोण्यापासून विचलित होऊन ईकडे गेले आणि ते पण हजर झाले. संपुर्ण किनारा (शॅक्समधेच बसून रहिलेली एक २५-३० माणसे सोडलि तर,) त्या खडकांवर हजर होता. ( होयहो, अगदी सुर्यास्ताच्या गर्दीच्यावेळी सुद्धा ऑफ सिझन / मिड सिझनला या किनार्यावर ६०-७० पेक्षा जास्त माणूस नसतो) तर काका-काकू फ्रेंच भाषिक निघाले. सौ. आणि चिरंजीव दोघेही उत्तमरित्या फ्रेंचमधे संभाषण करू शकतात. त्यामुळे पहिल्या क्षणापासुन प्रसंगाचे प्रथम दर्शक तर होतोच पण आता प्रथम साक्षीदारही झालो.

टीमने त्यांना विचारले, तुम्हाला हॉस्पीटलमधे सोडू का? तर चक्क नाही सांगीतले त्यांनी. काका असंख्य ठिकाणी ठेचकाळले होते. गुढगे, पाठ, छाती, कपाळ, पायाची बोटे सर्व ठेचकाळलेली, काही ठिकाणचा रक्तस्त्राव अजून थांबला पण नाहिये आणि काकू सांगतात आम्हाला डेटॉल आणि कापूस द्या फक्त. आणि गंमत म्हणजे टीमच्या साहित्यामधे कापूस आहे पण डेटॉल इल्ले . पण तेही त्यांनी तातडीने आणवले. त्यांना सॅवेलॉन मिळाले आणि हा डेटॉलचाच भाऊ आहे असे सांगणे का पटवणे सौ. ला जरा जिकीरीचेच गेल्यासारखे वाटले मला पण एकदाचे पटले. का़कू काकांची सेवा करत्या झाल्या. आणि हां , त्याआधी आमच्या मागच्या टपरीतील राजस्थानी विक्रेती त्यांचे कमरेला बांधायचे पाऊच जे त्यांनी तिच्याकडे ठेवायला दिले होते, ते त्यांना देऊन गेली. त्यामधे त्यांचे पासपोर्ट्स, पैसे, मोबाईल्स होते. काकूंनी दहा वेळा तिला धन्यवाद दिले, काही पैसेही बक्षिस म्हणून देऊ केले जे अर्थात तिने घेतले नाही. मग काकूंनी जाता जाता तिला प्रेमभरे मिठी मारून गालाची पप्पी घेऊनच पाठवणी केली. जीवरक्षकांची टिम आपल्या तंबूत परत आणि दोन भिजलेले बहाद्दर मागच्या शॅकमधे आंघोळ करते झाले. काका-काकूंनी तर चश्मे लावल्यानंतर आपले जीव वाचवणारे बहाद्दर पाहिलेच नाही बहुतेक, ते भेटले आणि बोलले बाकिच्यांबरोबर. सर्व लोक ईकडे तिकडे पांगले. चिरंजीव म्हणाले, जवळ जवळ सुर्यास्त झालाच. बाहेरच पडायला लागेल, ५ मिनिटे डुंबुन घेतो. ही त्याची नेहमिची डिमांड. लास्ट ५ मिनिट्स. असो.

Swimming

काकांच्या आजूबाजूला जमलेल्या गर्दीचा एकच फोटो घेतला

Gardi

मी आणि सौ. म्हणालो आपण तरी बोलू त्या दोघांबरोबर. त्यांचे शाब्दीक का होईना कौतुक करू. तर हे दोघे एकदम काहिही न झाल्यासारखे, न घडल्यासारखे. आजच्या संध्याकाळचे हिरोज, पण आताच किनार्याला पाय लावलाय, मागचे काही आपल्या गावचेच नाही असे वागतायत, बोलतायत. शॅकचा मालक सांगू लागतो. ह्या चेतनला हे नेहमीचेच झालेय. जवळ जवळ ५० जणांचे जीव ह्याने वाचवले असतील अजूनपर्यंत. ५० अतिशयोक्ती समजा. पण ३० तरी, १५-२० तरी जणांना ह्याने वाचवले असेल तर हा हिरोच हो, अगदी जीवरक्षक म्हणुन जॉब करत असूनसुद्धा. पुढच्याच क्षणी मालकाने विरोधाभास जाणवून देऊन मोठा मोठा धक्का दिला. तो म्हणतो असे असून सुद्धा चेतन कयमचा सरकारी नोकरीमधे नाही. कंत्राटावरच कंत्राटदाराकडे नोकरी करतोय, आम्हा दोघांनाही एक्दम कसेनुसे वाटले, एकदम गलबलूनच आले. मालक सांगतोच आहे. तुम्ही किंवा कोणीतरि आमच्या सरकारला लिहा ह्यांचेबद्दल. काय काम करताहेत ते. कसेनुसे त्याला हो म्हणून आणि परत एकदा दोन वाघांशी हात मिळवून परत निघालो. हेच ते दोन शेरदिल नौजवान हिम्मतवाले बहाद्दर मर्द गडी, चेतन बांदेकर आणि नितेश. यांना कौतुकाचे शब्द ऐकणे पण इतके जिवावर येत होते, की नितेशने त्याचे पुर्ण नांव पण सांगीतले नाही.

Chetan and Nitesh 1

Chetan and Nitesh 2

तर आजचा दिवस असा सनसनाटी रितीने संपला. किनारा परत नॉर्मलला आला.

Ozraan 10

Ozraan 11

Ozraan 12

रात्री जेवण, झोप रॉयल असागांव क्लब. आणि ट्रीप पाहता पाहता आवरती झाली. हा भागही खूप लांबला, मी पण आता आवरते घेतो.

दुसर्या दिवशी (३ एप्रिल) सकाळी परतीच्या रस्त्याला लागलो. वाटेत म्हापसा म्युनिसिपल मार्केटमधे नेहमीच्या गोव्यातून येताना आणायच्या वस्तूंची खरेदी १५ मिनिटांत उरकू म्हणुन शिरलो आणि १-१.५ तास घालवून बाहेर पडलो. हे मार्केट आहेच असे. सोडतच नाही लवकर. ११ वा. म्हापशाबाहेर पडलो आणि बांदा-अंबोली-आजरा हाच परतीचा मार्ग गेऊन कोल्हापूरला पोचलो. वाटेत विलवडे गांवाजवळची केळी आणि बहुतेक रबराची लागवड.

Banaana

दुपारचे जेवण थोडे उशिरानेच (थँक्स टू म्हापसा म्युनिसिपल मार्केट) कोल्हापूरला घेतले. भुका ईतक्या लागल्या होत्या की फोटो-बिटो काही घेतले नाही. उदरभरण होता होता मात्र आठवण झाल्यावर नंतर नव्याने मागवलेल्या तांबडा-पांढर्याचा फटू घेतला.

Kolhapur

दु. ३.१५ ला निघून न थांबता पुणे, पुढेही न थांबता एक्सप्रेस वे च्या फूड मॉलला १५ मिनिटे थांबून बरोबर ८.३० वाजता कळंबोली एक्झिटला बाहेर पडलो. संपूर्ण ट्रीप आनंदात आणि मजा, मस्ती मधे पार पडली. घरी पोचलो आणि परत कितव्यांदा तरी जाणवले, कितिही फिरलो, भटकलो, आयते जेवलो, मजा केली तरी आपले घर आणि आपले गांव हेच खरे सर्वात सुशेगात रहायचे ठिकाण होय.

आपल्या गांवातील शिवालय आणि जवळच्या तलावात डोलणारी कमळे.

Shivalaya

मि.पा. संस्थळ, मालक, संपादक, वाचक आणि प्रतिसादक सर्वाना अनेक धन्यवाद. परत भेटू पुढच्या भटकंती नंतर.

प्रतिक्रिया

सत्याचे प्रयोग's picture

3 Sep 2015 - 7:29 pm | सत्याचे प्रयोग

गोवा फिरायला जाताना तुमचे हे लेख मार्गदर्शक म्हणून मी बंदरेषेत ठेवले आहेत.
कधी बरं संधी मिळेल.

सुंदर!! प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असं वाटलं..

कंजूस's picture

3 Sep 2015 - 8:05 pm | कंजूस

>>घरी पोचलो आणि परत कितव्यांदा तरी जाणवले, कितिही फिरलो, भटकलो, आयते जेवलो, मजा केली तरी आपले घर आणि आपले गांव हेच खरे सर्वात सुशेगात रहायचे ठिकाण होय.>>

गोव्यातलं काही कामाचं नसलंतरी तुमचं प्रवासवर्णन पुन्हा पुन्हा वाचतो.

खेडूत's picture

3 Sep 2015 - 8:21 pm | खेडूत

सविस्तर आणि मनोरंन्जक. सन्दर्भासाठी उपयोगी.
समुद्र आणि 'मुम्बय' ची पाटी आवडली.

पद्मावति's picture

3 Sep 2015 - 9:03 pm | पद्मावति

खूप सुंदर भटकंती. फोटोपण मस्तं.

Jack_Bauer's picture

3 Sep 2015 - 9:24 pm | Jack_Bauer

Lifeguard चा प्रसंग एकदम मस्त !

प्रचेतस's picture

3 Sep 2015 - 9:28 pm | प्रचेतस

फोटो आणि वर्णन जबराटच.

श्रीरंग_जोशी's picture

4 Sep 2015 - 3:21 am | श्रीरंग_जोशी

ही संपूर्ण लेखमालिका आवडली.

या भागातला लाइफगार्ड्सने प्राण वाचवलेला प्रसंग तर श्वास रोखून वाचला.

आवडली लेखमाला.विशेषतः या भागातला थरार.

किणकिनाट's picture

4 Sep 2015 - 12:07 pm | किणकिनाट

सत्याचे प्रयोग, सूड, श्री. कंजूस, खेडूत, पद्मावति, Jack_Bauer, वल्लीशेठ, रंगाशेठ, अजयाताई, चांगल्या प्रतिक्रीयांसाठी अनेक धन्यवाद.
@खेडूत - गोव्यातील पाट्या मजेदार असतात. याच पाटीवर ओल्ड गोवा पहा कसे लिहिले आहे. पुराने गोवा - पोरणें गोंय. तसेच पैसाताईंनी कुठेतरी उल्लेखल्याप्रमाणे गोवन 'दिवचल' हे इंग्लिश-पोर्तुगीजमधे होते "बिचोली". किती वेगळे दोन शब्द.
आभार.

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 12:29 pm | खटपट्या

खूप छान फोटो आणि वर्णन. "मुंबय" वाचून मजा आली.

इस्पिक राजा's picture

4 Sep 2015 - 12:29 pm | इस्पिक राजा

मस्त झाले आहे वर्णन.

आधीचे लेखही वाचले होते,
फ्रेंच जोडप्याचा अनुभव खिळवून ठेवणारा.

रुस्तम's picture

4 Sep 2015 - 3:09 pm | रुस्तम

प्रवासवर्णन व प्रकाशचित्रे आवडली...

हे पनवेलच तळ का?

किणकिनाट's picture

4 Sep 2015 - 3:27 pm | किणकिनाट

बुल्स आय निलापी. पनवेलचेच. बल्लाळेश्वर मंदीराजवळचा वडाळे तलाव . तुम्ही कसे बरे ओळखता ?

रुस्तम's picture

4 Sep 2015 - 5:26 pm | रुस्तम

मी पण पनवेलचाच... :)

किणकिनाट's picture

4 Sep 2015 - 5:52 pm | किणकिनाट

अरे वा | व्य. नि. करतो.

मनिमौ's picture

4 Sep 2015 - 8:02 pm | मनिमौ

सर्व लेख वाचले. पुन्हा गोव्याला जाताना तुमची लेखमालिका वाचुन ट्रिप प्लॅन करणार

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Sep 2015 - 1:38 am | निनाद मुक्काम प...

बापरे गोव्याचे कोणारे आमच्या मयोका सारखे नाहीत
भलतेच अवखळ व खतरनाक आहेत
डिसेंबर मध्ये येत्या गोव्या भेटीत पाण्यात जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे अशी मनाशी खुणगाठ मारली
मज्जा आली प्रवास वर्णन वाचून
गोव्या बद्दल मार्गदर्शन व सल्ले दिल्याबद्दल किणकिनाट, ह्यांचे विशेष आभार

किणकिनाट's picture

5 Sep 2015 - 11:24 am | किणकिनाट

तुम्ही दक्षीण गोव्यात जाणार आहात निनाद. पाळोळे, पाटणे, अगोंडा या किनार्यांवर खडक नावालाही नाहीत. आणि मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे पाळोळे किनार्यावर कितीही आतपर्यंत चालत जाता येते, लाटांचा त्रास अजिबात होत नाही.
हा लिटील वॅगॅतॉर किनारा मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडा अवखळ व खतरनाक आहे. पण अगदी अख्खा दिवस सुशेगात घालवता येतो याच्यावर, जमले तर जरूर जा. सर्व बीच शॅक्सवर फारच गर्दी नसेल तर एक ऑर्डर देऊन कितीही वेळ बसलात तरी वेटर्स तुमच्या आजूबा़जूला घुटमळणार नाहीत. त्यातील "फीश टेल" नावाची शॅक तर सर्वात उत्तम आहे. सर्व मेन्यूचा दर्जा अतिउत्तम, कॉकटेल्स झकास आणि किंमत वाजवी. तसेच ह्या शॅकवर बसलात तर त्यांचेकडील सर्फींग बोर्ड्स, लहान मुलांची पाण्यातील खेळणी (ट्यूब्स, रिंग्स, बदके वगैरे) ते काँप्लीमेंटरी वापरायला देतात. बाजूच्या टपरी वा ईतर शॅक्सवाल्यांना त्याचे ताशी १००/२०० रू. भाडे (गर्दी पाहून) घेतानाही पाहिले आहे.

नया है वह's picture

9 Sep 2015 - 5:21 pm | नया है वह

प्रवासवर्णन व प्रचि आवडली