बैलगाड्यावरून सुपर संगणक, एअर पोर्ट ते tifr मधे.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in तंत्रजगत
2 Sep 2015 - 10:47 am

“ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे”.

व्हॅक्युम ट्युब्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फर्स्ट जनरेशन संगणक म्हणतात.उदा.tifrac संगणक. 1942-54
ट्रान्झीस्टर्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे सेकंड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cdc-3600 संगणक.1952-64
इंटीग्रेटेड सर्किट्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे थर्ड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cyber 175 संगणक 1964-72
व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स (vlsi) वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फोर्थ जनरेशन संगणक म्हणतात. उदा.p.c संगणक 1972-90
आणि
अल्ट्रा लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स (ulsi) वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फिफ्त जनरेशन संगणक म्हणतात.उदा.डेस्क टॉप,लॅप टॉप 1990 पासून पुढे

Cdc -3600-160A हा थर्ड जनरेशन संगणक १९६४ साली tifr ने घेतला.१० मे १९६४ साली चार्टर्ड विमानाने मुंबई विमान तळावर हा संगणक उतरवला.नंतर अक्षरश: बैलगाड्यांवर ह्या संगणकाची युनीट्स चढवून एअर पोर्ट ते नेव्हीनगर कुलाब्यापर्यंत ,एक प्रकारची मिरवणूक काढून, हा संगणक आणण्यात आला.त्यावेळच्या मुंबईच्या सर्व वर्तमान पत्रात मिरवणूकीचे फोटो छापून जाहिरात झाली होती.असं करण्याचा मुख्य उद्देश हाच होता की,ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे.

Tifrचा A विंग. कार पार्कींगच्यावर मधल्या मजल्यावर cdc-3600 होता.

.

Tifr च्या A विंगच्या दुसर्‍या मजल्यावर हा संगणक स्थापित करायचा होता.त्यासाठी दोन महिने अगोदर site planning चालले होते.cdcने संगणकाच्या layout चा नकाशा पाठवला होता. आणि त्यात एसी,पॉवर, आणि इतर आवश्यक बाबींचा उल्लेख केला होता.tifr च्या सेन्ट्रल वर्कशॉपला ह्या व्यवस्थेची जबाबदारी दिली होती. संगणक येण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची जबाबदारी वर्कशॉपला दिली होती.ती त्यांनी तत्परतेने पूर्ण केली.cdc ची मान्यताही मिळाली.नंतर cdc ने संगणक भारतात आणण्य़ाची तयारी केली.१० मे १९६४साली तो मुंबई एअर पोर्टवर उतरवला.

फॉल्स फ्लोअरींग,खास एअर कंडशनींग आणि सिग्नल आणि पॉवर केबल laying ह्या सर्व गोष्टीचं काम मोठ्या जिकीरीचं होतं.हे सर्व काम प्रथमच भारतात होत होतं. संगणकाचा मुख्य हॉल 100 फुट by 400 फुट ह्या आकाराचा होता. मुळ फ्लोअरींगवर 9 इंच उंचीचे पेडस्टल्स चार चार फुटावर मजबूत बसवून त्याचे त्या प्रमाणात columns आणि rows बनवून त्यावर 4 by 4 फुटाच्या स्टीलच्या 1/8 इंच जाडीच्या टाईल्स बनवून त्यावर लायनोलियम चिटकवून तयार झालेल्या टाइल्सची मांडणी केली होती.

मुळ फ्लोअरींग आणि फॉल्स फ्लोअरींग मधल्या जागेतून सिग्नल केबल्स आणि पॉवर केबल्स जाणार होत्या.त्याच गॅप मधून २० डीग्री सेंटीग्रेडची थंड हवेची जोरदार झोत फेकली जाणार होती.फॉल्स फ्लोअर वर मांडणी केलेल्या संगणकाच्या प्रत्येक युनीटच्या खालून ही थंड हवा खेचली जाणार होती.cdcने दिलेल्या माहिती प्रमाणे प्रत्येक युनीटच्या खाली त्या त्या टाईलवर युनीटमधे हवा जाण्यासाठी खाचा केल्या होत्या. प्रत्येक युनीटच्या ट्रान्झीस्टर्स आणि इतर गरम होणार्‍या घटकाना थंड करून वरून येणारी गरम हवा फॉल्स सिलिंगमधे ओढली जाऊन परतवली जात होती.थंड हवेची सोय करणार्‍या युनीटला weather-maker म्हणायचे.tifrच्या बिल्डींगच्या सेंट्रल एअर कंडीशनींग प्लान्ट कडून थंड पाण्याचा पाच इंचाचा पाईप संगणकाच्या जवळच्या खास योजना केलेल्या जागेत जिथे weather- maker बसवला होता तिथे आणला गेला होता.ह्या पाईपातलं थंड पाणी, कमी व्यासाच्या तांब्याच्या नळकांड्याच्या चाळणीवर, फिरवलं गेलं होतं.आणि weather-maker चा blower त्यावरून हवेची झोत फेकत होता.हिच हवा संगणकासाठी फॉल्स फ्लोअरींग मधे फेकली जात होती.सेन्ट्रल एअर कंडीशनच्या प्लॅन्टच्या इंजीनीयर्सकडे हे काम सोपवलं होतं.त्यांनीही तत्परतेने आपलं काम पूर्ण केलं होतं.

संगणकाला लागणार्‍या एकूण पॉवरसाठी एक खास transformer बसवला होता.फक्त संगणकाचंच पॉवर लोड त्या transformer वर होतं.टाटा इलेक्ट्रीक कंपनीला स्वतंत्र केबल ह्या लोडसाठी टाकायला सांगीतली होती.अशा तर्‍हेने सर्व site planning चं काम पूर्ण झाल्यावर आणि cdc च्या लोकांनी ते काम योग्य आहे असं सांगीतल्याचं कळल्यावर cdc-3600 -160-A संगणक भारतात आणण्याची सुचना cdcला देण्यात आली.
नंतर हा संगणक tifr च्या बिल्डींगमधे दुसर्‍या मजल्यावर नेला गेला.

ह्या फोटो मधे CDC-3600 दिसत आहेconsole, tape units ,memory Cabinet and processor cabinet,card reader दिसत आहे.
,

ह्या संगणकाची रचना अशाप्रकारे होती----
दोन मेमरी कॅबिनेट्स,एक मेन प्रोसेसर कॅबिनेट,एक पॉवर सप्लाय कंट्रोल कॅबिनेट,एक input/output चॅनल कंट्रोल कॅबिनेट,एक टेप्स कंट्रोल कॅबिनेट,एक auto punch card कंट्रोल कॅबिनेट, एक टेप कंट्रोलर कॅबिनेट आणि १० टेप युनिट्स.
ही सर्व कॅबिनेट्स, १० टेप युनिट्स वगळून, इंग्रजी एल आकड्याच्या आकारात मांडली होती. एलच्या मधल्या भागात कंसोल मांडला होता.आणि कंसोलच्या पलीकडे १० टेप युनिट्स एका रांगेत मांडली होती.अशा रचनेचा उद्देश एव्हडाच होता की सिग्नल केबल्स कमीत कमी लांबीच्या असाव्यात त्यामुळे सिग्नल loss कमीत कमी होत होता.
एल आकाराच्या ह्या रचनेच्या मागच्या अंगाला 160-A हा सेटलाईट संगणक होता.आणि त्याच्या जवळच एक कार्ड रिडर, आणि त्याचा कंट्रोलर होता तसंच ह्या संगणकासमोर ,टेप कंट्रोलर आणि दोन टेप युनिट्स होती..ह्या सेटलाईट संगणाचं काम म्हणजे पंच कार्डावर पंच केलेला प्रोग्राम कार्ड रिडरकडून वाचून घेऊन टेप युनिट्स मधल्या टेप्सवर लिहिला जावा. आणि ही प्रोग्राम लिहिलेली टेप, १० टेप युनिट्सपैकी एकावर माऊंट करून तो वाचून मेन संगणक,3600 वर input करून नंतर process केला जावा.prosess करून आलेले result,१० टेप युनिट्सपैकी एका कोणत्याही माऊंट केलेल्या टेपवर लिहिला जावा.आणि हा टेपवर लिहिलेला result प्रिन्टरवरच्या कागदावर हार्ड कॉपीसाठी छापला जावा. अशी सगळी प्रक्रिया होती.

tifr च्या बिल्डीगमधे हा संगणक इंन्स्टॉल केल्यानंतर जवळ जवळ १२५-१५० कंपन्या त्यानंतरच्या पाच वर्षात हा संगणक वापरत होत्या. भारतात संगणकाचा वापर ह्ळुह्ळू वाढत गेला.त्यात कमरशीयल बॅन्कस,ऑईल कंपन्या,मॅन्युफॅक्चरींग कंपन्या,अंतर्भूत होत्या.
मुख्यतः हा संगणक शास्त्रीय कामासाठीच बनवलेला गेला होता.ह्या संगणाकाचा उपयोग tifr चे शास्त्रज्ञ आपल्या संशोधनासाठी करू लागले होते.त्याच बरोबर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सुद्धा शिकून घेऊन tifr च्या शास्त्रज्ञानी जवळ जवळ पावणे तीन लाख डॉलर्सचा दरवर्षाचा मेंटेनंन्सचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न केला.cdc कंपनीने आम्हा सर्वाना, ह्या दोन शाखेत, भारतात आपल्या कंपनीचे ट्रेनर्स पाठवून ट्रेनींग दिलं.आम्ही ह्या संगणकाच्या, दोन्ही शाखेत, देखभाल करण्यात पुर्णपणे तज्ञ झालो.

मेन संगणकाच्या हॉलमधे ठेवलेला हा संगणक पहाण्यासाठी येणार्‍या व्हिझीटर्ससाठी व्हिझीटर्स गॅलरी,मेन हॉलच्या एका अंगाला तयार केली होती.काचेचं पार्टीशन लावलं होतं.एका वेळी २०,२५ लोकांचा ग्रुप संगणकाची माहिती करून घेऊ शकत होता.कुतूहल म्हणून बरेच व्हिझीटर्स येऊन जात होते.

cdc-3600 संगणकाच्या प्रत्येक युनिटबद्द्ल थोडक्यात माहिती आणि त्या युनिटचा ह्या संगणाकाच्या वापरात कसा उपयोग होत होता आणि ही सर्व युनिट्स वापरून, शेवटी संगणक कसा चालतो,कसा उपयोगात आणता येत होता हे पुढल्या येतील त्या भागात पाहूया.तूर्तास एव्हडं पूरे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 11:13 am | कैलासवासी सोन्याबापु

वाह!! काय शैली आहे जबरदस्त!!

रुस्तम's picture

2 Sep 2015 - 11:14 am | रुस्तम

सुंदर माहिती … धन्यवाद ….

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 11:25 am | द-बाहुबली

सुपर माहिती. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर रोचक आणि माहितीपूर्ण लेखमाला !

फारच माहितीपूर्ण आणि रंजक मालिका.

पुभाप्र.

कपिलमुनी's picture

2 Sep 2015 - 1:53 pm | कपिलमुनी

+१

बहुगुणी's picture

2 Sep 2015 - 4:50 pm | बहुगुणी

हाही भाग आवडला. पुढील भागाची प्रतीक्षा. (तुमच्या कामाविषयी लिहिण्याची विनंती मनावर घेतल्याबद्दल आभार.)

जे.पी.मॉर्गन's picture

2 Sep 2015 - 5:31 pm | जे.पी.मॉर्गन

आपल्या शास्त्रज्ञांनी काय काय पाहिलं असेल आणि कुठल्या लिमिटेशन्स मध्ये कशी कामं केली असतील... थोडा अंदाज येऊ शकतो.

वाचतोय.

जे.पी.

प्राची अश्विनी's picture

2 Sep 2015 - 6:27 pm | प्राची अश्विनी

+१११

उगा काहितरीच's picture

2 Sep 2015 - 5:38 pm | उगा काहितरीच

लेख आवडला..
-EDVAC, ENIAC हे first year ला अभ्यास क्रमात असलेला.

अभिजीत अवलिया's picture

2 Sep 2015 - 6:44 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला

जयंत कुलकर्णी's picture

2 Sep 2015 - 9:23 pm | जयंत कुलकर्णी

श्री. सामंत, आपण या क्षेत्रात त्याकाळी होतात म्हणून मला एक शंका आहे. त्याचे उत्तर आपण मोकळेपणाने द्याल अशी आशा आहे. अर्थात आपल्याला त्याचे उत्तर माहीत असेल तर.
१ पुण्यात सी डॅकमधे जो सुपर कॉम्प्युटर तयार केला गेला तो यशस्वी होता का ? त्याचे बेंचमार्कींग केले गेले होते का ? त्यातून काय कोअर कॉम्पिटन्स तयार झाला....या सर्वांची उत्तरे उत्साहवर्धक असतील तर मग तेथे कॉम्प्युटरवर भारतीय लिपी तयार करण्याचे काम का सुरु झाले ?

याचे उत्तर मिळाल्यावर मला अजून काही शंका आहेत त्या विचारेन..

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Sep 2015 - 8:27 am | श्रीकृष्ण सामंत

जयंतजी,
खरोखरच मला पुण्याच्या ह्या सुपर संगणकाबद्दल माहिती नाही.

रमेश आठवले's picture

3 Sep 2015 - 5:10 am | रमेश आठवले

Tifr मध्ये कॉम्प्युटर च्या आगमन सोहळ्याच्या वेळी मी तेथे काम करत होतो आणि नंतर माझ्या संशोधनात मला ह्या कॉम्प्युटर चा उपयोग करता आला होता.
साधारण त्याच सुमारास रस्त्यावरून मिरवणुकीने Tifr मध्ये आणलेली दुसरी मोठी गोष्ट म्हणजे एक प्रचंड वडाचे झाड. मुंबईत पेडर रोड वर असलेलेली केनीलवर्थ नावाची जुनी इमारत अणु उर्जा विभागाने विकत घेतली व ती पाडून तेथे विभागात काम करणार्यासाठी अपार्टमेंटस बांधली. या जुन्या इमारतीच्या आवारात एक मोठे वडाचे होते. होमी भाभा यांनी त्याचे प्रत्यारोपण Tifr च्या प्रवेश दाराजवळ असलेल्या हिरवळीत करविले. ते झाड मुळासकट उपटून ट्रक वर चढविले गेले आणि मंद गतीने काही तासांच्या प्रवासा नंतर Tifr मध्ये आणण्यात आले. हे झाड आजही हिरवळीत उभे आहे. ५५ वर्ष पूर्वी असे प्रत्यारोपण हे एक नवलाईची बाब होती.
मी Tifr मध्ये काम सुरु केले त्या वेळी मुख्य इमारतीचे बांधकाम चालू होते आणि आमच्या काही प्रयोग शाळा या सध्या समुद्रा जवळ असलेल्या विस्तीर्ण हिरवळीच्या जागी तेथे असलेल्या नौ दलाच्या जुन्या Barracks मध्ये होत्या. त्यात ठेवलेल्या उपकरणांना छताखाली रहाणार्या पक्षांच्या 'प्रसादा' पासून वाचवण्या साठी आम्हाला प्लास्टिकचे दुसरे छत लावावे लागत असे आणि ते काही महिन्यांनी बदलावे लागत असे.

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Sep 2015 - 8:28 am | श्रीकृष्ण सामंत

रमेशजी,
आपण पण tifr मधे काम करत होता हे वाचून आनंद झाला.
मलासुद्धा त्या वडाच्या झाडाबद्दल माहित होतं.ते वडाचं झाड tifr मधे आणून पुन्हा रोवणं हे डॉ.भाभासारख्या व्यक्तिलाच जमलं.असं मला वाटतं.जुन्या Barracs मधे मीसुद्धा कधी कधी येऊन गेलो होतो.आपल्याला पाहिलं असेल पण आपली ओळख नसावी. आपण माझी आठवण ताजी केलीत त्याबद्दल धन्यवाद. मी त्यावेळेला,म्हणजे आताची बिल्डींग तयार होत असताना,old yacht club Gate of India, ज्या ठिकाणी tifrची स्थापना झाली होती तिथे काम करायचो.

ऋतुराज चित्रे's picture

3 Sep 2015 - 11:26 am | ऋतुराज चित्रे

फारच माहितीपूर्ण लेख.

त्यावेळच्या मुंबईच्या सर्व वर्तमान पत्रात मिरवणूकीचे फोटो छापून जाहिरात झाली होती
छान कल्पना.

@ रमेश आठवले
हे झाड आजही हिरवळीत उभे आहे. ५५ वर्ष पूर्वी असे प्रत्यारोपण हे एक नवलाईची बाब होती.

अगदी भावुक होउन गेलो हे वाचुन. 'स्वाथी मुथ्यम' चित्रपटातील अंगणातील तुळशी वृंदावनाचा शेवटचा सीन डोळ्यासमोर आला.

छान माहिती.आणि या प्रसंगाचे साक्षी देखील एक मिपाकर आहेत याचा आनंद वाटला.

शेखरमोघे's picture

4 Sep 2015 - 7:51 am | शेखरमोघे

त्या काळात "कॉम्प्युटर आणि बैलगाडी" यान्चे भारतात तरी वेगळेच नाते असावे.वाचलेल्या माहितीवरून आठवते: आय आय टी कानपूरमध्ये देखील साधारण त्याच सुमारास आणवलेला कॉम्प्युटर, विमानाने कानपूरच्या (लष्करी) विमानतळावर पोचल्यावर तिथपासून पुढच्या रस्त्याची अवस्था लक्षात घेऊन कमीत कमी हादरे बसावेत या उद्देशाने हवा भरलेल्या रबरी धावा असलेली बैलगाडी शोधून आणून त्यातून नियोजित जागी पोचवण्यात आला होता.

साधा मुलगा's picture

6 Sep 2015 - 2:18 pm | साधा मुलगा

माहितीपूर्ण आणि सुंदर लेख, पुढील भागाच्या प्रतीक्षेत! डॉ.होमी भाभा यांच्या कार्याबद्दलही लिहावे अथवा वेगळा लेख लिहावा हि विनंती.

नया है वह's picture

8 Sep 2015 - 7:25 pm | नया है वह

छान माहितीपूर्ण लेख

चिगो's picture

9 Sep 2015 - 1:23 pm | चिगो

जबरदस्त.. अत्यंत Amusing लेख. आजच्या काळात जेव्हा हातातला मोबाइलच संगणक झालाय, तेव्हा ह्या लेखात सांगितलेल्या आठवणी अत्यंत रंगतदार वाटतात. त्याचवेळी त्या काळातले संशोधनकार्य किती जिकरीचे आणि मेहणतीचे होते, तेपण कळतंय.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

अवांतरः वयाच्या ८२व्या वर्षी मलापण सामंत काकांइतकंच तरुण आणि तजेलदार असू दे, हिच ईश्वराचरणी प्रार्थना..

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Sep 2015 - 11:16 am | श्रीकृष्ण सामंत

चिगोजी,
तथास्तु

यशोधरा's picture

11 Sep 2015 - 4:40 am | यशोधरा

सामंतकाका, वाचतसय :)

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 9:20 am | मुक्त विहारि

पुभाप्र.