असा सांगतात पत्ता...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
31 Aug 2015 - 5:09 pm

गोष्ट तशी जुनी. मुंबईत चर्चगेट भागातल्या प्रतिष्ठा भवन या इमारतीमध्ये माझं काही काम होतं. पत्ते, रस्ते लक्षात ठेवणं, हा माझा प्रांत नव्हे. म्हणजे लग्नापूर्वी नवं घर घेतल्यानंतर आणि लग्नानंतर सुरूवातीच्या काळात त्या घरी जातानाही मी दोन-तीन वेळा रस्ता चुकून भलतीकडे पोहोचल्याचं आठवतंय.
तर... मला प्रतिष्ठा भवनात काही काम होतं. चर्चगेट भागातल्या कार्यालयात होते मी. तिथले आमचे वरीष्ठ नुकतेच नागपूरहून बदली होऊन आले होते. त्यांनी तिथवर पोहोचायचे दोन-तीन मार्ग मला उत्साहाने सांगितले. पत्ते समजून घेताना माझा घोळ होतो, असं त्यांना सांगितलं आणि मला समजेल अशा सोप्या प्रकारे पत्ता सांगा, अशी विनंती केली.
त्यावर ते हसत म्हणाले, रस्ते नाही ना लक्षात राहत तुझ्या. बरं. पण तरी सुद्धा मी सांगतो, तशी जाशील तर चटकन पोहोचशील. एकदम सोपं आहे बघ. तुला आपलं वानखेडे स्टेडियम माहिती आहे ना... त्याच्या समोरची इमारत...
अरे वा. मस्त. हे नक्की लक्षात राहील... खुश होत मी म्हणाले.
मग नवऱ्याला फोन केला. ऐन वेळी तिथे जाणं ठरलं, त्यामुळे घरी पोहोचायला उशीर होईल, हे नवऱ्याच्या कानावर घातलं. सुदैवाने काही कामानिमित्त नवरा त्याच भागात होता.
मी पोहोचतो पाच मिनिटात, आपण सोबत जाऊ.. असं म्हणून नवऱ्याने फोन ठेवला.
हे एक बरं झालं. मला रस्ता आणि पत्ता दोन्ही शोधायचा त्रास नाही. माझे बाबा आणि नवरा या दोघांनाही पत्ते अचूक शोधता येतात. दोघांचीही मला न आवडणारी एक समान सवय म्हणजे कोणत्याही ठिकाणी पोहोचायचे एकापेक्षा जास्त रस्ते दाखवायचे. एकाच ठिकाणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रस्त्याने घेऊन जायचं. वर आणखी, लक्षात आला का रस्ता, हे विचारायचं...
विषयांतर झालं थोडं... असो...
तर ठरल्याप्रमाणे नवरा आला. आपल्याला वानखेडे समोरच्या इमारतीत जायचंय... बाईकवर बसता-बसता नवऱ्याला सांगितलं. बरं, म्हणून नवऱ्याने बाईक सुरू केली. गप्पा मारत आम्ही वानखेडे स्टेडियमजवळ पोहोचलो. अरेच्चा.. सरांनी वर्णन केल्याप्रमाणे एकही इमारत इथे दिसेना. आता काय करावं. मग नवऱ्याने इमारतीचं नाव विचारलं. झालं... मला फक्त प्रतिष्ठा इतकंच आठवत होतं. पुढचं काही आठवेना. प्रतिष्ठा असं काही नाव आहे. नावात प्रतिष्ठा आहे इतकं नक्की.. चाचरत उत्तर दिलं मी.
बरं. आता प्रतिष्ठा नावाने शोधाशोध सुरू झाली. पण तरीही ती इमारत सापडेना. दिसणाऱ्या सगळ्या पानवाल्यांना विचारून झालं... कोणालाच सांगता येईना.
मग कंटाळून त्या सरांना फोन केला.
सर, त्या इमारतीचं नाव प्रतिष्ठाच आहे ना.
हो. पोहोचलीस का तू...
अहो सर, तुम्ही वानखेडेच्या समोर म्हणालात ना... इथे तुम्ही सांगितल्यासारखी एकही इमारत दिसत नाही...
काय सांगतेस... अगं, आयकर भवनच्या थोडं पुढे गेलं की दिसेल तुला ती इमारत. खूप जुनी आहे ती. कोणीही सांगेल...
बरं. मग मी आता आयकर भवन विचारते सर... इतकं म्हणून फोन ठेवला.
आमचा संवाद ऐकणारा नवरा माझ्याकडे इतकं विचित्रपणे का बघतोय, हे कळेना. मी काही म्हणायच्या आधी नवऱ्यानेच विचारलं, आयकर भवनच्या पुढे का... बस...
हो, म्हणत मी बसले आणि पुन्हा प्रवास सुरू. अरे आपण वानखेडे पासून इतके दूर का जातोय...
तुला पोहोचायचंय ना वेळेत. मग थोडा वेळ शांत राहा बघू.. नवऱ्याने दटावलं.
थोड्याच वेळात एका इमारतीसमोर येऊन थांबलो आम्ही.
हेच प्रतिष्ठा भवन. मी थांबतो इथे. तू जाऊन ये. मग बोलू आपण...
बरं, म्हणत मी इमारतीत शिरले. काम झालं. बाहेर आले. मग नवऱ्याने समोर बोट दाखवत सांगितलं, ते बघ वानखेडे स्टेडियम... काय पत्ता सांगितला तुला सरांनी...
सर मला म्हणाले वानखेडे स्टेडियम समोरची इमारत...
बरोबर... समोरचीच इमारत... आणि हे प्रतिष्ठा भवन... पण दोन्हीच्या मध्ये रेल्वेचे रूळ आहेत, हे माहिती नाही का त्यांना...
क्षणार्धात सगळा घोळ लक्षात आला माझ्या... मग दोघं मस्त हसत सुटलो...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

31 Aug 2015 - 5:13 pm | एक एकटा एकटाच

हा हा हा

जबरदस्त

बाबा योगिराज's picture

31 Aug 2015 - 5:18 pm | बाबा योगिराज

खीक....

जे.पी.मॉर्गन's picture

31 Aug 2015 - 5:38 pm | जे.पी.मॉर्गन

माधुरीताई, तरी फक्त रुळांच्या पलिकडे का होईना वानखेडे स्टेडियम होतं तरी. इथे दिल्लीत तर अगाध पत्ता सांगतात. माझ्या "ऑफिसके सामने" इंदिरापुरम मध्ये राहायला चांगल्या सोसायटी आहेत सांगितलं गेलं. इथे आल्यावर कळलं की ते "सामने" हायवेच्या पलिकडे एकूण ३.५ कि.मी. अंतरावर आहे ! ह्या लोकांचा अंतराच्या कॅल्क्यूलेशनचा मेज्जर घोळ आहे!

जे.पी.

मी-सौरभ's picture

31 Aug 2015 - 5:46 pm | मी-सौरभ

गूगल मॅप्स हे पण एक अवघड प्रकरण आहे. आपण एक टर्न मिस केला की नविन रस्ता दाखवतो. जो चांगला ४-५ किमी अंतर वाढवतो. :(

वेल्लाभट's picture

3 Sep 2015 - 5:52 pm | वेल्लाभट

माझा नोकिया मॅप्स चा अनुभव बहुतांशी चांगला असला तरी एकदा अपरात्री विमानतळावरून येताना भलत्या एरियात नेऊन सोडलेलंन... जिथे डेड एन्ड होता आणि फारच शेडी लोकं आजूबाजूला होती.
बेक्कार अनुभव.

मांत्रिक's picture

3 Sep 2015 - 5:55 pm | मांत्रिक

बापरे, एखाद्या हॉलीवूड भयपटाची सुरुवात वाटते ही. कुणीही हादरेल अशा वेळीस.

नमकिन's picture

31 Aug 2015 - 5:59 pm | नमकिन

आहे गोलाकार तर प्रत्येक/कुठुनही सगळ्या इमारती समोरंच पडतील.
सांगणारे समोरचा सरळ रस्ता घ्या असं सांगतात पण सगळे रस्ते आपलं तोंड ज्या दिशेला असेल तिथुन समोर व सरळंच असतात. गंमत असते पत्ता सगळी शोध कार्य करताना.

एस's picture

31 Aug 2015 - 6:05 pm | एस

:-)

अमृत's picture

31 Aug 2015 - 6:12 pm | अमृत

नागपूरात पत्ता विचारा एकदा. सगळ्या जागा पडायला लागतात इथे.
उदा. भाऊ मोरभवन कुठे आहे?
उत्तर - व्हेरायटीसे सीधे जाव लेफ्ट्पे झांसीरानी पुतला गिरेगा बस वही पे है सामने.

हैदराबाद
अन्ना जुबली चेकपोस्ट कैसे जाना?
यहासे सीधेच जाव एकही रस्ता है.

बराचवेळ आठवत नव्हतं पण आत्ता आठवलं. हैदराबादच्या कामवालीने एकदा सांगितले होते की "अम्मा, मेरी बेटी आज १२ पुरे हो के १३ मे गिरी" ती गेल्यावर दिवसभर हसू येत होते.

प्रसंगाचे वर्णन आवडले. मला वाटले फक्त पुण्यातच पत्ते सांगण्याचा प्रश्न आहे की काय! पण तसं दिसत नाही. बाकी ठिकाणीही वेगळ्याप्रकारे असे करतात. ;) मलाही पत्ते लक्षात राहण्यास अवघड वाटते. अमूक तमूक ठिकाणी माझी मी चालत जाईन पण पुण्यात रिक्षावाल्याने पत्ता विचारला की घोडे अडते. माझ्या मैत्रिणी खुषाल एकमेकींना मार्ग क्र. सांगतात, एक्झिट क्र. सांगतात ते मला काहीकेल्या लक्षात रहात नाही. मग चला, घेऊन जाते, पण पत्ता विचारू नका अशी अवस्था असते त्यामुळे लेखन जास्त जवळचे वाटले. ;)

जव्हेरगंज's picture

31 Aug 2015 - 7:47 pm | जव्हेरगंज

रूळं ओलाडून का नाही गेलात मग...!
तेवढचे पेट्रोल वाचले असते.
कि चालायचं अंतरही जास्त होतं?.

माधुरी विनायक's picture

1 Sep 2015 - 11:30 am | माधुरी विनायक

चालायला आवडतं मला पण वानखेडे स्टेडियम पश्चिमेला आणि प्रतिष्ठा भवन पूर्वेला आहे. दोन्ही वास्तू समोरासमोर असल्या तरी निव्वळ रूळ ओलांडून पलीकडे जाणे शक्य नाही. मुंबईत येणं झालं तर या भागाला नक्की भेट द्या...

बाइकवर असल्याकारणाने जमले नसणार. आणि असेही फाटक्,पूल असल्याशिवाय रूळ ओलांडू नये.

राही's picture

31 Aug 2015 - 8:50 pm | राही

ज्यांनी पत्ता सांगितला ते मूळचे मुंबईकर नक्कीच नसणार. मुंबईच्या रिक्शावाल्याला जरी विचारलं तरी तो प्रामाणिकपणे हातवारेवगैरे करून दुसरा लेफ्ट, बादमें चौथी गली असा डीटेलमध्ये रस्ता सांगणार. गुजराती दुकानदार तर अगदी सौजन्यपूर्वक आजूबाजूच्या खाणाखुणांसकट 'विगतवार', अगदी दुकानातून बाहेर येऊनसुद्धा दिशा दाखवणार. नव्याने वस्ती झालेल्या ठिकाणी मात्र गडबड होते. एक तर बाहेरून आलेल्या लोकांना बायकांशी मोकळेपणाने तरीही आदरपूर्वक बोलायची सवय नसते. बायकांशी भर रस्त्यावर बोलत उभे राहायचे या विचाराने त्यांची गाळण उडते. त्यामुळे एकतर डोळे चुकवून भराभर निघूनच जातात किंवा आपला गोंधळ आणि काँप्लेक्स लपवण्यासाठी मुद्दाम बेफिकिरी आणि उद्धट लुक पांघरतात किंवा त्यांना स्थानिक पत्तासुद्धा माहीतच नसतो, तो माहीत करून घेण्याची गरज त्यांना वाटत नाही. स्थानिक प्रश्नांमध्ये ते अजिबात पडत नाहीत.

माधुरी विनायक's picture

1 Sep 2015 - 11:37 am | माधुरी विनायक

मी म्हटलं तसं ते सर नागपूरचे. बदली होऊन मुंबईत आले होते. पत्ता सांगण्याच्या बाबतीत आणि रहदारीचे नियम पाळण्याच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत मुंबईकर खूपच सौजन्य दाखवतात हा माझा वैयक्तिक अनुभव..
बाहेरून आलेल्या लोकांचा उल्लेख केलात तुम्ही की बायकांबरोबर किंवा त्यांच्याबद्दल बोलताना त्या लोकांचा गोंधळ होतो, त्यावरून आठवलं. मी आणि माझी मैत्रिण बसमधून प्रवास करत होतो. तहान लागली म्हणून पाण्याची बाटली बाहेर काढून मी पाणी पिऊ लागले. ती बाटली नेमकी appy ची होती. मी पाणी पित असताना माझ्याकडे अचंब्याने बघत, चेहऱ्यावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारचा दिसणाऱ्या एकाने सोबतच्या माणसाला विचारलं होतं, इ का पी रही ...

सत्याचे प्रयोग's picture

31 Aug 2015 - 8:54 pm | सत्याचे प्रयोग

बर्‍याच वर्षांपूर्वी पुण्यात आलो होतो मुलाखती साठी जायचं होतो गोकुळनगरला पत्ता गोकुळनगर सांगूनही पायपीट करून गोखलेनगरला पोचवलं होतं. शेवटी रिक्षा केला आणि गोकुळनगरी पोहचलो.

पुणेकरांना पत्ता विचारला:अमक्या पेठेत भारत लॅान्ड्री आहे त्याला विचारा .आमचे कपडे त्यालाच देतो.पानपट्टीच्या दुकानाएवढे ते खोपट अख्ख्या पुण्यात सर्वांना माहित असते हा विश्वास.

प्यारे१'s picture

31 Aug 2015 - 9:18 pm | प्यारे१

यावरुन आठवलं. मुंबईला सी एस टी वरुन पॅसेन्जरनं पुण्याला यायला निघालो होतो. एकजण मराठी भेटला. बोलता बोलता त्याला विचारलं कुठे राहतोस? म्हणे 'सोन्यामारुती चौका'त. संपलं.

ताजमहाल, लाल किल्ला, गेट वे ऑफ इन्डिया या भारतातल्या सुप्रसिद्ध जागांनंतर सोन्यामारुती चौक ही प्रसिद्ध जागा असावी.

कानडाऊ योगेशु's picture

2 Sep 2015 - 10:08 pm | कानडाऊ योगेशु

तसे नसेल हो प्यारे साहेब. तुम्ही पुण्याला जाणार्या पॅसेंजरमध्ये बसला होता ना म्हणुन त्याला वाटले असावे कि तुम्हीही पुण्यालाच उतरणार असणार. नाहीतर पुण्याला जाणार्या गाडीत बसल्यावर तुम्ही कुठे जाणार? असा प्रश्न विचारला असा एक किस्सा झाला असता.

कपिलमुनी's picture

3 Sep 2015 - 6:47 pm | कपिलमुनी

अस्सोनसुद्धा तो तुमच्याशी बोलला ,
तुमच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले ..
याचे आभार्स मानायचे सोडून तुम्ही भलत्या शंका उपस्थित करता.
आता जगप्रशिद्द सोन्या मारुती चौक तुम्हाला ठाउक नाही यात याची काय चूक

पद्मावति's picture

1 Sep 2015 - 1:56 am | पद्मावति

मस्तं, छान लिहिलय.

मी आणि कोणताही पत्ता यांच फार पूर्वीच नात आहे.
मी कायम त्या पत्त्याच्या विरुद्ध दिशेला पोहोचते.
तरी बरं नाही तर सिंगापूरात पत्ता विचारा..अगदी बिल्डींगच्या खाली उभारुन ती व्यक्ती "डोन्न नो ला" एव्हढ एकच वाक्य तुसडेपणाने बोलेल, तर मेलबर्न मध्ये पत्ता विचाराल तर अर्ध्या तासाची हमी, इतकी माहीती तो माणूस देइल. एकदा लॉग्गर्स एरियात (जंगल तोड, भयाण वळणांचे अतिशय दुर्लभ रस्ते) चुकलो होतो तर जी पहिली कार मी थांबवली तो बिचारा माझ्या मागून मी तो सारा चुकीचा रस्ता पुन्हा पार करुन बरोबर रस्त्याला लागेतोवर कार घेउन आला. मी ती वळण पार करुन कार साईड ला घेतल्यावर हात हलवुन बाय करुन गेला तो माणूस.

नाखु's picture

1 Sep 2015 - 8:33 am | नाखु

सांगणे ही जशी कला आहे तशी पत्ता ऐकणे/सम्जून घेणे ही सुद्धा कलाच आहे. पत्ता ऐकणारा अति-उत्साही असेल तर समजलं असं म्हणून समोरच्याचा पत्ता काटतो आणो नंतर स्वतःच तुटलेल्या पतंगासारखा भरकटत राहतो.


पत्त्यामध्ये देवळाची खूण असेल तर ती त्या देवैषीश्ठयासहीत असावी उदा भांग्यामारुती, भिकारदास मारुती, असली अतरंगी नावे माहीत अस्लेली माणसं देवाने पाठवली आहेत भुतलावर, यावर विश्वास ठेवावा.

किमान दोन-चार ठळक खुणा ज्या तिथून हलण्याची शक्यता कमी आहे अश्याच उदा.शाळा,देऊळ्,पोष्ट हाफीस (आजकाल हे कुणाला माहीत नसतं फारसं) किंवा बँक !!!

तपशीलवार पत्ता सांगण्याची (जमल्यास अप्रमाणीत नकाशासहीत) सांगण्याची वाईट्ट खोड असलेला खोंड नाखु

रातराणी's picture

1 Sep 2015 - 12:57 pm | रातराणी

:)

मित्रहो's picture

1 Sep 2015 - 1:28 pm | मित्रहो

मी स्वतः कुणाला पत्ता सांगताना फार सावध असतो कारण पत्ता सांगताना माझा डावा आणि उजवा यात नेहमी गोंधळ असतो. बऱ्याचदा डावीकडे हात दाखवून उजवीकडे वळ असे रिक्षा किंवा टॅक्सीवाल्याला सांगत असतो.
मला मुंबईत पत्ता शोधायचा त्रास झाला नाही. हैद्राबादमधे पत्ता एकच असतो सिधा जाना इधरची है. हा सिधा जाना म्हणत असताना हात कुठल्या दिशेला असतो ते बघणे महत्वाचे असते. काही वर्षापूर्वी पुण्यात काम होते. तेंव्हा पुण्याची फारसी कल्पना नव्हती. पुण्यात चाललो म्हणून कुणीतरी पार्सल दिले. ज्याच्याकडे जायचे त्यांचा पत्ता दिला पण देताना चूक केली तिथे एरवंडण एवजी येरवडा असे लिहीले. मी रिक्षा घेउन येड्यासारखा येरवड्यात फिरत होतो पण पत्ता काही सापडला नाही. काही महीन्यांनी उलगडा झाला. पुण्यात पत्ते शोधण्याचा आलेला वैताग म्हणजे घर नं १४ भांडारकर रोड पुणे. अख्खा भांडारकर रोड फिरा मग कुठेतरी घर सापडनार.

पिशी अबोली's picture

1 Sep 2015 - 3:28 pm | पिशी अबोली

भारी किस्सा.
हिंदी प्रभाव असणार्‍या भागातल्यांचं 'समोर' आणि तसा नसलेल्यांचं 'समोर' यात पर्सेप्शनचा भलताच फरक आहे बुवा.. हे असले गोंधळ माझ्या वैदर्भीय मित्रांनी पत्ता सांगितलेला असताना जाम होत असतात. :)

palambar's picture

2 Sep 2015 - 5:32 pm | palambar

जे बरिच वर्ष पुन्यात आहेत आणि पेठा माहित आहेत त्याना सोन्या मारूति चोक नक्किच् माहित आस्तो.

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 10:26 pm | प्यारे१

चोक झालो.

@ योगेश कॅनडा वाले,
निघालो होतो पुण्याला बरोबर आहे की पण समोरच्या माणसाला किती गृहीत धरावं? पुण्याला निघाला म्हणजे पुण्याची माहिती आहे काय? मला मुंबईची जेवढी माहिती आहे तेवढी पुण्याची नाही. मी मुंबईत सोन्यामारुति कुठे आला याचा विचार करत बसलो. शेपटीही सापडेना मुंबईत सोन्यामारुतीची. मग पुन्हा विचारलं. तेव्हा तो स्वप्निल जोशी चेहरा करून म्हाइत नाही???? वगैरे आश्चर्य व्यक्त करून तुच्छतेनं पुणे असं सांगितलं गेलं.
15 वर्षांपूर्वीचा किस्सा उगाच का लक्षात राहतो???

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2015 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते

पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर"जोशी कुठं राहतात 'हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावरउभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील.. "अरे,त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे."हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एकपायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल.त्याच्या जरा पुढं गेला कीपाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथंबायका हायेतच; त्या त्यांच्याच!' 'एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला "ए बारक्या,जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं"आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर"पावनं,गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार."पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजेखांब, चावीम्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच.त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द,वाक्प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं........

व्हॉट्स ऍप वरून साभार.

पुण्यात कसब्यात किंवा हडपसर गाडी तळ भागात पत्ता विचारून आनि शोधून दाखवणाराला इनाम डिक्लेअर केलेले आहे असे ऐकुन आहात म्हणे.......

पैसा's picture

3 Sep 2015 - 6:53 pm | पैसा

भारी प्रकार आहे!