सेनापती - (कथा)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
31 Aug 2015 - 12:02 am

संध्याकाळचे साडेपाच वाजले होते . श्री. रायचंद घाईघाईने मीटींगरुममधुन बाहेर पडले आणी आपल्या केबिनकडे जाउ लागले . दिवसभरातील उरलेली कामे संपवून सहा वाजेपर्यंत घरी निघायचे असा त्यांचा बेत होता . रायचंद हे शहरातील एका नावाजलेल्या जुनीअर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिनीस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते . काही वर्षांपासुन कॉलेजमधील नवीन अ‍ॅडमिशनसची धुराही तेच सांभाळत होते. कॉलेजच्या संचालकांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्यामुळे , कॉलेजचे प्राचार्यसुद्धा त्यांच्याशी दबकुन , नरमाईने वागत असत . त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नसत .
रायचंद हे आपल्या केबिनमध्ये येउन खुर्चीवर बसले .समोरील टेबलावरील कागदपत्रां वरुन ते एक नजर फिरवत होते .
"नमस्कार साहेब . मी आत येउ शकतो का ?" त्यांना शांत सुरात खर्जात विचारलेला प्रश्न ऐकु आला . त्यांनी समोर पाहिले. एक वृद्ध गृहस्थ दारापाशी उभे होते . पांढरा शुभ्र कुर्ता , धोती , खांदयावर उपरणे असा त्यांचा पेहराव होता. केस पांढरे ,मागे वळवलेले , चेहरयावर वाढत्या वयाच्या सुरकुत्या असल्या तरी शरीर ताठ होते . नजर धारदार आणी तब्येत वयाच्या मानाने एकदम व्यवस्थित राखलेली होती .
"बोला आजोबा , काय काम होतं ?" रायचंदनी विचारले .
"काल तुम्हाला अ‍ॅडमिशनसाठी भेटायला गोपाळ आणी त्याचे वडील आले होते . मी त्यांच्याच शेजारी राहतो ." वृद्ध गृहस्थाने आपली ओळख करुन दिली .त्याची धारदार नजर रायचंद यांच्यावर रोखलेली होती .
" हो . गोपाळचे वडील का ? आत्ता आठवले . ते त्यांचा मुलगा , गोपाळच्या अ‍ॅडमिशनसाठी आले होते . त्यांच्या मुलाला मार्कसही तसे बरे आहेत . आम्ही त्याला आमच्या रेग्युलर सीटस मधुन अ‍ॅडमिशन देउ शकतो . पण , कॉलेजसाठी विकासनिधी देण्याची त्यांची तयारी नव्हती . त्यामुळे ते निघुन गेले " रायचंदनी सांगितले .
तो वृद्ध गृहस्थ त्यांना परत शांतपणे पण धारदार आवाजात म्हणाला "साहेब , त्या मुलाचे वडील एका कारखान्यात साधे कामगार आहेत . त्यांची घरची परिस्थिती खुप गरिब आहे . तुम्ही मागितलेले दोन लाख रुपये त्यांना कसे परवडणार ? साहेब , तो मुलगा खुप हुशार , मेहनती आहे . घरच्या गरिबीतही त्याने खुप कष्टाने अभ्यास करुन चांगले गुण मिळवले आहेत . तुम्ही जर त्याला अ‍ॅडमिशन दिली तर भविष्यात तो तुमच्या कॉलेजचेच नाव पुढे आणेल . पोराला या कॉलेजात शिकायची खुप इच्छा आहे . त्याच्या अनेक मित्रांनीही याच कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली आहे . काल घरी आल्यापासुन पोरानं एकच धोशा लावला आहे . काहि खात नाहि कि पीत नाही . आई वडील बिचारे पोराची हि दशा पाहुन खुप घाबरुन गेले आहेत . राहवलं नाही म्हणुन तुम्हाला भेटायला आलो साहेब . तुमच्या डोनेशनच्या हट्टा साठी त्या पोराच्या आयुष्याची माती करु नका "
"पण म्हातारबाबा , आम्ही जर अशाच फुकटात अ‍ॅडमिशन वाटु लागलो तर कॉलेजचा विकास कसा होणार ? खर्च कसा भागणार ? एका आठवड्यात जर आम्हाला दोन लाख मिळाले तर आम्ही त्या मुलाला नक्की अ‍ॅडमिशन देउ. आतापर्यंत सगळ्यांनीच आम्हाला किमान पाच लाख रुपये विकासनिधी विनातक्रार दिला आहे . आमचा मॅनेजमेंट सीटसचा रेट तर यापेक्षा जास्त आहे . त्या मुलाच्या गरिबीमुळेच आम्ही दोन लाखावर तयार झालो . अहो , शेवटी आमचीही काही सामाजिक बांधिलकी आहे . काय समजलात." रायचंद निर्विकारपणे म्हणाले .
"तुमचा विकासनिधी शेवटी कोणाच्या खिशात जातो हे सर्वांना चांगले माहिती आहे .सरस्वतीच्या पवित्र मंदिरात तुम्ही हा जो शिक्षणाचा बाजार मांडला आहे , त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे . तुम्ही देशाचे नुकसान करत आहात " वृद्ध गृहस्थाने त्यांना त्याच कठोर आवाजात सुनावले . आता मात्र रायचंदचा संयम सुटला . ते भडकुन म्हणाले
" ए म्हातारया , तोंड सांभाळुन बोल .परत जर माझ्यावर आरोप केलास तर मार खाशील " .
तो वृद्ध गृहस्थ तरिही त्यांना त्याच शांत , धारदार आवाजात म्हणाला " मला मारल्याने तुमची पापे झाकली जाणार नाहीत. जनतेला तुमचे गुन्हे माहित आहेत . तुम्हाला शिक्षा हि होणारच ."
रायचंद रागाने ओरडले " ए थेरडया , निघ आता नाहितर धक्के मारुन हाकलुन देइन."
"धक्के इथे मारणार का बाहेर मारणार ?" परत वृद्धाचा तोच शांत , धारदार , खर्जातला आवाज .
"काय ? आ.." रायचंद पुढे काहि बोलणार तोच त्या वृद्धाच्या हाताची पोलाडी पकड त्यांच्या तोंडावर बसली . रायचंदना काहिच बोलता येइना .त्यांचा श्वास घुसमटला . पुढच्याच क्षणी वृद्धाच्या दुसरया हाताच्या दोन बोटांनी रायचंदच्या गळ्यातील नसांवर वार केला. हा वार वर्मी लागल्याने रायचंदचे मानेखालचे सर्व शरीर बधीर झाले , लुळे पडले . एका क्षणात वृद्धाचा हात त्याच्या कुर्त्याच्या आत असलेल्या कंबरपट्ट्यामधील सुरयाकडे गेला . तो सुरा काढुन
वृद्धाने रायचंद यांच्या शरीरात सपासप वार केले . रायचंदचा निष्प्राण देह खुर्चीवर कोसळला . वृद्धाने सुरयाला लागलेले रक्ताचे डाग रायचंद यांच्या कपडयांना पुसले . तो सुरा परत आपल्या कंबरपट्ट्यामध्ये ठेवुन दिला .
तो वृद्ध गृहस्थ आल्या मार्गाने निघुन गेला . निघुन जाताना त्याच्या मनात एकच विचार घोळत होता .
"चलो सेनापती . पुर्वी जुलुमी परकियांविरुद्ध लढलास . आता अन्यायी स्वकियांविरुद्ध लढण्याची वेळ आली ."
---------- समाप्त ----- ( काल्पनीक )---------------
कथेबद्दल -- एकेकाळी दिग्दर्शक शंकर आणि अभिनेता कमलहसन या जोडीचा "हिन्दुस्तानी" हा चित्रपट खुप गाजला होता. या चित्रपटातील अन्यायी परकिय ब्रिटिश सरकार व भ्रष्ट स्वदेशी बाबु यांच्याविरुद्ध लढणारी सेनापती हि व्यक्तीरेखाही खुप गाजली होती . या सेनापतीचा आझाद हिंद सेनेमधील सहभाग , सेनापतीला अवगत असलेला "वर्मकला" हा भारतीय द्वंद्व युद्धप्रकार हि वैशिष्टेही लोकप्रिय झाली . या कथेमधुन सेनापतीला अभिवादन करण्याचा हेतु आहे . सर्व भारतीय जनतेने जर एकत्रितपणे भ्रष्टाचाराला निर्धाराने विरोध केला तर , अहिंसक मार्गाने भ्रष्टाचार नामशेष करता येणे शक्या आहे.

कथालेख

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

31 Aug 2015 - 12:26 am | एक एकटा एकटाच

चांगला प्रयत्न आहे.

उगा काहितरीच's picture

31 Aug 2015 - 1:32 am | उगा काहितरीच

+१

जव्हेरगंज's picture

31 Aug 2015 - 1:47 am | जव्हेरगंज

छान

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 6:37 am | dadadarekar

छान.

सध्या सेनापती कुठे आहेत ?

( मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार होत नाहीत म्हणे. आता हे महोदय रिटायर झाले असतील नै ? )

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 6:38 am | चांदणे संदीप

चांगली आहे कथा, तुम्ही लिहिताही चांगले! मग एवढ्यात का संपविली?
अजून पुढचे भाग वाचायला मजा आली असती.

"हिन्दुस्तानी"चा पंखा!
Sandy

छान आहे कथा. मनातला असंतोषच त्या सेनापतीला 'हिंदुस्तानी'मध्ये पाहताना उफाळून येत असे.

असंका's picture

31 Aug 2015 - 8:35 am | असंका

https://en.m.wikipedia.org/wiki/Vigilante

गोष्ट मजेशीर आहे....
धन्यवाद!

पद्मावति's picture

31 Aug 2015 - 1:27 pm | पद्मावति

छान कथा आहे. आवडली.

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 5:38 pm | द-बाहुबली

हम्म.. लाल सलाम ?

इरसाल's picture

1 Sep 2015 - 12:52 pm | इरसाल

अस वाटलं की सेनापती, हितेश्ची गच्ची आवळुन सुर्‍याने त्याची लुंगी मधोमध फाडुन त्याचा लेहंगा करतात की काय ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2015 - 8:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

जबरदस्त आवडली !!!!

हिंदुस्तानी चा प्रचंड मोठा फॅन आहे मी

सगळ्यात शेवटी जेव्हा सेनापती सिंगापुर च्या एका टेलीफोन बूथ मधुन पोलीस कमिश्नर ला फोन करतो अन "जब जब जहाँ जहाँ जुल्म होगा हिंदुस्तानी वहां जरूर पहुंचेगा" का काही तरी असेच म्हणतो तेव्हा सरसरून काटा येतो अंगावर आजही