अस्तित्व - ( कथा )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
30 Aug 2015 - 1:28 am

अमोल नुकताच प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाऊ लागला होता. नवीन शाळा, नवे वातावरण, नवे विषय व या विषयांचा वाढलेला आवाका अशा बदलांना सामोरे गेल्यामुळे अमोलची अभ्यासात बरीच तारांबळ उडत होती. काही महिन्यांतच त्याच्या शिक्षकांच्या दृष्टीने त्याची 'फार हुशार / अभ्यासूही नाही व फार दंगेखोरही नाही' अशा मध्यम विद्यार्थ्यांमध्ये गणना होऊ लागली. अमोलनेही स्वतःची तीच समजूत करून घेतली व तो आला दिवस ढकलू लागला.

एकदा त्यांच्या गणिताच्या शिक्षकांनी सर्वांना २० गणिते सोडवायचा गृहपाठ दिला. घरी आल्यावर अमोलने त्यांतली १५ गणिते सोडविली. पुढची ५ गणिते जरा अवघड होती. ती त्याला लगेचच सुटेनात. तेव्हा 'पुढची ५ गणिते नंतर सोडवू" असा विचार करुन तो खेळायला पळाला. नंतर तो ती उरलेली ५ गणिते विसरूनच गेला.

पुढे ७ दिवसांनी जेव्हा सरांनी सर्व विद्यार्थ्यांची गणिते तपासायला सुरुवात केली, तेव्हा अमोलला राहिलेल्या गणितांची आठवण झाली व तो घाबरला. वर्गातल्या हुशार, अभ्यासू मुलांनी सर्व गणिते सोडविली होती व इतर मुलांनी काही गणिते स्वकष्टाने व उरलेली गणिते ज्ञानाची व विचारांची देवाणघेवाण करून सोडविली होती. त्यामुळे अमोल आज अगदी एकटा पडला व सरांच्या तावडीतही एकटाच सापडला. त्याची वही तपासल्यावर सर त्याला खूप रागावले. इतर एक-दोन विषयांच्या तासांनाही अमोलने हा असाच प्रकार केल्याचे सरांच्या कानावर आले होते .त्यामुळे त्यांनी मुद्दामहून अमोलला या वेळी थोडी कडक शिक्षा करायचे ठरविले. सर अमोलला कडक सुरांत म्हणाले, "अमोल, तू ही राहिलेली गणिते पूर्ण केल्याशिवाय गणिताच्या तासाला बसायचे नाही. ऊठ आणि वर्गाबाहेर जा." सरांचा कडक स्वभाव व त्यांनी हीच शिक्षा पूर्वी इतरही काही विद्यार्थ्यांना केल्याचे अमोलला माहीत होते. त्यामुळे तो असाहायपणे ऊठला व कसेबसे आपले रडू लपवत वर्गाबाहेर गेला .
गणिताचा तास संपल्यावर मधली सुट्टी होती. तेव्हा हा तास संपेपर्यंत बाहेर उभे राहण्यापेक्षा शाळेतील गच्चीजवळील रिकाम्या खोलीत जाउन थांबावे, असा अमोलने विचार केला. त्या खोलीत थांबले तर आपल्याला कोण बघणार नाही
असे त्याला वाटले. तो जिना चढून त्या रिकाम्या खोलीकडे जाऊ लागला .गच्चीजवळील रिकामी खोली ही शाळेतील जुने, मोडकळीला आलेले बाक, खुर्च्या, टेबले तात्पुरती ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही खोली प्रशस्त होती व तिला मोठी खिडकी असल्याने तिथे छान मोकळी हवा, सूर्यप्रकाश असे. बरेचदा मधल्या सुट्टीत अमोल व त्याचे मित्र या खोलीत खेळत असत.

अमोल त्या खोलीत आला व एका बाकावर बसला. आपले डोके त्याने बाकावर पुढे टेकविले. आता तो मधली सुट्टी होण्याची वाट पाहत होता. काही वेळातच मोकळ्या हवेमुळे त्याचा डोळा लागला.

"काय रे बाळ, इथे काय करतो आहेस?" अचानक त्याला कुणाचातरी प्रेमळ प्रश्न ऐकू आला. या प्रश्नाने तो एकदम दचकून जागा झाला. एक प्रौढ व्यक्ती त्याच्यासमोरील खुर्चीवर बसून आपल्या चश्म्यातून त्याच्याकडे बघत होती. अमोलला त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते, पण आठवत नव्हते. त्याच्या वर्गावर असणार्‍या शिक्षकांपैकी ते नव्हते. तेव्हा ते नववीला, दहावीला शिकवणारे कोणीतरी वरिष्ठ शिक्षक असणार, असा अमोलचा समज झाला. त्याने नाइलाजाने त्या सरांना आज गणिताच्या वर्गात झालेली आपली चूक व शिक्षा ही घटना सांगितली.

"अरे, तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत खूप जागरूक राहिले पाहिजे." ते ज्येष्ठ शिक्षक त्याच्याशी थोड्या समजुतीच्या , आपुलकीच्या स्वरांत सौम्यपणे बोलू लागले. त्यामुळे अमोलला जरा धीर आला. ते सर त्याला समजावून सांगत होते, "अरे, कितीतरी मुलांना गरिबीमुळे शाळेत जाता येत नाही, इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. त्या मानाने तुम्ही मुले किती भाग्यवान आहात. तुमचे आई-वडील, पालक तुमच्या शिक्षणासाठी धडपडतात, कष्ट उपसतात. मग, तुझ्या शिक्षेबद्दल जर तुझ्या आई-वडिलांना कळले, तर त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार कर. तुला जर काही गणिते अवघड जात असतील, तर तू तुझ्या गणिताच्या सरांना आधीच भेटायला हवे होतेस. त्यांनी नक्कीच तुला मार्गदर्शन केले असते. काय, बरोबर ना?"

"हो सर" अमोल खाली मान घालून बोलला. सर पुढे बोलू लागले. "अरे, अडचणी सर्वांनाच असतात. पण त्यातूनच प्रयत्नांनी मार्ग काढायचा असतो. २० वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि माझ्या काही ध्येयवेड्या मित्रांनी ही शाळा प्रथम सुरू केली, तेव्हा आम्हालाही असंख्य अडचणी आल्या. शाळेची जागा, स्टाफ, अनेक खर्चांची तरतूद करणे, सरकार दरबारी सतत जाऊन परवानगी घेणे अशा अनेक जबाबदार्‍या सांभाळाव्या लागल्या. त्या वेळी लावलेल्या बीजाचे आज जेव्हा मोठया वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले पाहतो, तेव्हा या सर्व श्रमांचे सार्थक झाले असेच वाटते.

या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज तंत्रज्ञान, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत चमकताना दिसतात, तेव्हा खूप समाधान वाटते. विद्यार्थ्यांना त्यांचे या जगातील अस्तित्व घडवण्यात शाळेचा मोलाचा वाटा असतो."

"सर, माझी खरेच चूक झाली. मी यापुढे खूप काळजी घेईन व नीट अभ्यास करीन." अमोलने वचन दिले.

तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली. अमोल उठून त्या खोलीतल्या खिडकीपाशी गेला व त्याने आपल्या वर्गाकडे पाहिले. त्याचे मित्र वर्गातून बाहेर येत होते. काहींनी त्याला हातही केला.

"सर, मधली सुट्टी झाली. आता मी वर्गात जातो" असे सांगत अमोलने मागे पाहिले, पण त्या खुर्चीवर कोणीच नव्हते. ती खुर्ची रिकामीच होती. त्या पुर्ण खोलीत अमोल एकटाच होता.

अमोलला एकदम काहीच सुचेना. पण तोपर्यंत त्याच्या मित्रांच्या हाका त्याला ऐकू येऊ लागल्या. त्यामुळे झाल्या घटनेचा जास्त विचार न करता तो आपल्या मित्रांना भेटायला जिन्याकडे पळाला.

---------------------------समाप्त-------------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

30 Aug 2015 - 8:37 am | एस

छान बोधप्रद कथा!