शरण तुला भगवंता...

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
28 Aug 2015 - 2:24 pm

शहराच्या जरासं बाहेर असलेलं विठ्ठल मंदिर. थोड्याशा उंच टेकाडावर असलेलं. मोजून पंचाहत्तर पाय-या चढून भक्ताचा आत प्रवेश होणार. मंदिर मूळचं दगडी. ब्रिटिश काळात कुणा हौशी भक्तानं बांधलेलं. पण आता त्याला ब-यापैकी रंगरंगोटी, कुंपण, छोटीशी बाग वगैरे करण्यात आली होती. परिसर जरा ब-यापैकी दिसायला लागल्यावर या देवळाकडे संध्याकाळची भक्तगणांची, हौशी कुटुंबांची वर्दळ वाढू लागली. त्याचबरोबर पाय-यांवर भिक्षा मागण्यासाठी काही म्हातारे, अनाथ-अपंग, बेघर लोक हे देखील बसू लागले. यापैकीच एक भागीबाई.

भागीबाईचं मूळ नाव भागीरथी. वय असावं ऐंशी. भागी मूळची इथली नव्हे. कधीतरी स्वतःच्या घरात राहणारी विधवा बाई होती ती. तरण्याताठ्या पोरानं कर्जबाजारीपणाला घाबरून आत्महत्या केली. खचलेली सून व दोन सशासारखी गोजिरी नातवंडं तिनं सुनेच्या माहेराला धाडून दिली. सुनेचा आमच्याबरोबरच रहा, हा आग्रह तिनं कणखरपणे मोडून काढला. सगळं जिकडचं तिकडं झाल्यावर म्हातारीनं एके दिवशी कुणालाही न कळता आपल्या घराला कुलुप लावलं आणि एका शेवटच्या प्रवासाला निघाली.

******

या ठिकाणी रुळायला भागीला पहिल्यांदा त्रास झाला. पाय-यांवर अगोदरपासूनच बसत असलेल्या भिक्षेक-यांना नवीन वाटेकरी नको होते. पण भागी जेव्हा तिच्या आर्ततेने भरलेल्या आवाजात ‘शरण तुला भगवंता’ गाणे आळवू लागली, तेव्हां सर्वांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अनेक वर्षे कोंडलेल्या व्यथा वेदना अश्रूंचे रूप घेऊन घळाघळा गालावरून ओघळू लागल्या. त्यानंतर तिला पुन्हा कुणी तुसडेपणाने वागवलं नाही. भागी त्यांच्यातीलच एक होऊन गेली.

इथे भागीचा दिनक्रम ठरूनच गेलेला होता. सकाळी दहा वाजल्यापासून पायरीवर बसून रहायचं. भकास मुद्रेनं. कधीतरी अंगात जीव असेल तेव्हाच भागी अगदी आर्ततेने ‘शरण तुला भगवंता’ आळवीत असे. येणा-या जाणा-या लोकांपैकी काहीजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसे, रुपये टाकत असत. काहीकाही तिरस्काराच्या नजरा किंवा बोलणीही अधूनमधून वाट्याला येत असत. भागी त्यावर गप्प बसत असे.

कधीकधी अगदी गम्मत होत असे. एखादा गोरागोमटा बाप्या त्याच्या गब्बू गब्बू लेकराला घेऊन येत असे. पोरगं अतिशय अवखळ. बापाच्या नाकी नऊ आणणारं. मग बाप त्याला भीति दाखवायला म्हणत असे, बघ हं? असा दंगा केलास तर त्या म्हातारीकडे देऊन टाकीन तुला. मग भीतिने गांगरलेलं ते पोरगं गाल फुगल्याने आणि डोळे मोठे झाल्याने अजूनच गब्बू गब्बू दिसत असे. भागीला अशा वेळेस आपल्याही नातवंडांची आठवण येत असे. पण ती आठवण प्रयत्नपूर्वक पुसायला ती आता शिकली होती.

कालचक्र असंच निर्दयपणे चालत राहिलं. त्याला कुणाच्या सुखदुःखांची फिकीर नव्हती. दुःखी जीवांसाठी लवकर धावावं आणि सुखी जीवांसाठी हळूहळू, हा भेदभाव त्याच्याकडे नव्हता. असो, त्या वर्षीची देवप्रबोधिनी एकादशी होती आज. देवळात भरपूर गर्दी होणार होती. सर्व भिक्षेकरी मंडळी मोठ्या अपेक्षेने बसलेली होती. एखादी नवीन शाल किंवा पांघरूण घेण्यापुरते पैसे मिळाले तर फारच उत्तम. येत्या हिवाळ्यात सोय तरी होईल.

पण भागीचं काही सकाळपासून चित्त था-यावर नव्हतं. काहीतरी वेगळंच वाटत होतं आज तिला. त्यात जोडीला वर मळभही दाटून आलेलं. दुपारनंतर भुरभुर पाऊस पडायला सुरुवात झाली. एक प्लॅस्टीकचा तुकडा डोक्यावर घेऊन भागी तशीच गपचिप बसून राहिली. हे काय होतंय काही कळत नव्हतं. समोर पैसे पडलेत की नाहीत याचं देखील भान नव्हतं तिला. कुण्या आनंदी माणसाने पाय-यांवर बसलेल्या सर्व भिक्षेक-यांना लाडू वाटलेले होते. भागीच्या समोर ठेवलेला लाडू एका भटक्या गायीनं खाल्ला, तरी भागीला त्याचं काहीच वाटलं नाही.

पाऊस थोडासा वाढला, तशी पाय-यांवरची वर्दळ आडोशाला पळाली. गजबजलेल्या पाय-यांवर एकदम सामसूम झाली. अचानक भागीला कुणीतरी तिच्या दिशेनं येताना दिसलं. कोण असेल हा? या क्षणाला तरी मला काहीच नकोय. आणि हा का येतोय माझ्याकडे?

तोः भागीरथी! ऊठ, मी तुला घेऊन जायला आलोय.

आश्चर्याने भागी तिच्या दुबळ्या थरथर कापणा-या पायांवर उठली. डोळ्यांवर हाताचा आडोसा करून किलकिल्या नजरेने त्याच्या चेहेर्‍याकडे बघू लागली. सावळा रंग. कपाळाला उभा गंध. डोक्यावर साधी पगडी. प्रेमाने, करुणेने भरलेले डोळे.

तोः आता परत यायचं नाही बरं का इथे. या सगळ्या दुःखांचा वेदनेचा शेवट झालाय. मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता.

भागीला काय बोलावं, काय करावं काही सुचतच नव्हतं. त्याने पुढे केलेल्या उबदार, मऊशार हातात तिने आपला दुबळा, अस्थिपंजर हात दिला………

भागीची निष्प्राण कुडी पाय-यांवर कोसळली. मागे एकच कल्ला झाला, “आरं, म्हातारी गेली वाटतं.”

कथा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

28 Aug 2015 - 2:31 pm | प्यारे१

पांडुरंग हरि...!
मस्त लिहीलंस.

कथा छान आहे. थोडी चटका लावून जाणारी.

राजाभाउ's picture

28 Aug 2015 - 2:37 pm | राजाभाउ

मस्त आहे

राही's picture

28 Aug 2015 - 2:42 pm | राही

आवडलं.

पद्मावति's picture

28 Aug 2015 - 2:48 pm | पद्मावति

तोः आता परत यायचं नाही बरं का इथे. या सगळ्या दुःखांचा वेदनेचा शेवट झालाय. मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता.

..फार छान लिहिलय.

विशाल कुलकर्णी's picture

28 Aug 2015 - 3:02 pm | विशाल कुलकर्णी

सायुज्यता.... _/\_
आवडली कथा ..

शेवट वाचतांना अंगावर काटा आला..

काही लेखन वाचतांना लिहीणारयाचा हेवा वाटतो, त्यापैकी हे एक,
अतिशय सुंदर, सलाम त्या लेखणीला !!

प्रचेतस's picture

28 Aug 2015 - 3:09 pm | प्रचेतस

आवडली कथा.

जेपी's picture

28 Aug 2015 - 3:11 pm | जेपी

...

बॅटमॅन's picture

28 Aug 2015 - 3:29 pm | बॅटमॅन

....

नाव आडनाव's picture

28 Aug 2015 - 5:38 pm | नाव आडनाव

कथा आवडली.

अत्रन्गि पाउस's picture

28 Aug 2015 - 5:55 pm | अत्रन्गि पाउस

........

विवेकपटाईत's picture

28 Aug 2015 - 7:38 pm | विवेकपटाईत

काळजाला भिडले शब्द.....

अस्वस्थामा's picture

28 Aug 2015 - 7:44 pm | अस्वस्थामा

लिहिलंय अगदी जबरदस्त, पार काळजाला भिडणारं असं.

एक एकटा एकटाच's picture

28 Aug 2015 - 8:45 pm | एक एकटा एकटाच

छान लिहिलय

रातराणी's picture

29 Aug 2015 - 3:10 am | रातराणी

:(
खूप कमी शब्दात आशय भिडतोय काळजाला. लिहीत राहा!

नाखु's picture

12 Sep 2015 - 10:32 am | नाखु

आटोपशीर आणि प्रत्यवाही परीणाम!

मागे कुठल्या धाग्यावर एक सुंदर ओळी दिल्या होत्या सुरेश भटांच्या !!! अगदी तस्से.

भावुक्+भावीक नाखुस

जे.पी.मॉर्गन's picture

29 Aug 2015 - 11:00 am | जे.पी.मॉर्गन

आवडली कथा.

जे.पी.

याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा...प्रत्यक्ष भगवंत भेटले, अजून काय हवं!

सुरेख..धन्यवाद!

सुबोध खरे's picture

29 Aug 2015 - 7:45 pm | सुबोध खरे

पार काळजाला भिडणारंलिहिलंय

द-बाहुबली's picture

29 Aug 2015 - 7:57 pm | द-बाहुबली

देह प्रारब्धावर सोडुन द्यावा द्यावा द्यावा म्हणतात ते हेच काय ?

कवितानागेश's picture

29 Aug 2015 - 9:54 pm | कवितानागेश

शेवटच्या ओळी धूसर झाल्या.......

पैसा's picture

29 Aug 2015 - 10:16 pm | पैसा

पूर्वी अशी एक परिकथा वाचली होती. हॅन्स अँडरसनची. एक गरीब मुलगी काड्यापेटीच्या काड्या पेटवून ख्रिसमसची स्वप्ने बघत असते आणि ती स्वप्ने बघता बघताच मरून जाते त्या कथेची आठवण झाली.
https://en.wikipedia.org/wiki/The_Little_Match_Girl

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 1:39 pm | मांत्रिक

सर्व वाचक व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

बाबा योगिराज's picture

30 Aug 2015 - 2:14 pm | बाबा योगिराज

मस्त लिहिता हो मांत्रिक भाउ.......

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Aug 2015 - 2:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

"आता परत यायचं नाही बरं का इथे."
"मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता."

किती छान,......... नुसत्या कल्पनेने सुध्दा अंगावर रोमांच उभे राहिले.

नशिबवान आहे भागीरथी.

पैजारबुवा,

स्पंदना's picture

31 Aug 2015 - 5:17 am | स्पंदना

राजे !!

मस्त मस्त!!
शेवट तर अतिशय भावुक!!

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 12:46 pm | तुडतुडी

सुंदर. किती छान

हेमंत लाटकर's picture

1 Sep 2015 - 11:48 am | हेमंत लाटकर

मांत्रिक, हद्यस्पर्शी कथा

सत्य धर्म's picture

12 Sep 2015 - 10:00 am | सत्य धर्म

मस्तच आहे

सत्य धर्म's picture

15 Sep 2015 - 2:08 pm | सत्य धर्म

मांत्रिक महाराज नाव वाचून भीती वाटते हो...........पण लिहिता खुपच सुंदर.
कथा आवडली .