आयटीने काय(काय) दिले

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
14 Jul 2015 - 7:55 pm

“तुम्हा आयटीवाल्यांनी महागाई वाढवून ठेवली आहे” आयटीवाले लोक शनिवारी रिकामेच असतात असा पक्का समज करुन आमच्या सोसायटीतले काका मला फाइलवर घेत होते. आयटीवाल्यांनी महागाई वाढवली हे माझ्यासाठी नवीनच होते. मी आपला समजत होतो की तो राजन ते Repo rate, CRR या न समजनाऱ्या इंग्रजी शब्दांत जो काही खेळ करतो त्यानेच महागाई वाढते किंवा कमी होते.
“तसे नाही हो काका महागाई मागणी पुरवठ्याने वाढते. आयटी तर आताच आली महागाई तर केंव्हापासून वाढतच आहे.”
“तुम्ही नका कबूल करु पण महागाई वाढली ती तुम्हा आयटीच्या लोकांमुळेच. तुम्ही आयटीवाले दोघेही नोकरी करनारे. बक्कळ पैसा कमावनारे.” एक दिवस रीक्षावाला लेन मधे रीक्षा चालवायला शिकेन पण आयटीवाले बक्कळ कमावतात हा गैरसमज या देशातून कधी दूर होणर नाही. “तुम्हाला घरातल्या साऱ्या कामाला बाई लागते. आता ती तिसऱ्य़ा मजल्यावरच्या देशपांडेंची सून, काडी आहे नुसती. लॅपटॉपची बॅग खांद्यावर लटकवली की एका बाजूला झुकलेल्या तराजूसारखी दिसते. अशी बाई कसे कढई आणि पातेले उचलनार तिला तर पोरग उचलायलाही बाई ठेवावी लागते. अशाने मोलकरणींचे भाव वाढनार नाही तर काय? त्याचा आम्हा रिटायर्ड माणसांना केवढा त्रास होतो याचा कधी विचार केलाय.” कामवाल्या बाईला जास्त पैसे मागायला काय कारण लागते? १९४७ साली सुद्धा साहेब गेला हे कारण सांगून जास्त पैसे मागितले असतील. माझे तरी असे ठाम मत आहे की आयटी आणी बँक या दोनच क्षेत्रात वरच्या पदावर स्त्रीया दिसतात. आयटीने स्त्रीयांना करीअर करण्याची समान संधी दिली. आता अशा करीअर करनाऱ्या स्त्रीयांमुळे मोलकरणीचे भाव वाढतात आणि त्याचा त्रास रिटायर्ड माणसांना होतो हे जरा अजबच होते. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.
“सर्वच आयटीवाल्यांकडे डबल कमाई असतेच असे काही नाही काका”
“त्या सिंगल कमाईवाल्यांचे तर सांगूच नको. त्यांच्या बायका घरात बसून नुसत्या सुटतात म्हणून मग जिमला जातात, एरोबिक्स करतात. असा प्रपंच सांभाळताना वेळ मिळत नाही म्हणून मग प्रत्येक कामासाठी बाई ठेवतात.” मी विषय कुठेही नेला तरी काकांची गाडी मात्र मोलकरणीपाशीच थांबली होती. आपले आपले दुखणे. “आमची बाई नेहमी सांगते तुम्हा लोकांकडे भांडे कमी असतात. उदाहरण देउन देउन सांगते. कसे कमी असनार नाही. रोज ऑफीसात हादडता आणि शनिवार रविवारी हॉटेलात मग भांडे होतील तरी कसे?” सकाळी सकाळी काकांना काकूंनी भांडे घासायला लावले अशी टाट शंका मला त्याक्षणी आली.
“आता काका आठवडाभर बौद्धीक श्रम करुन थकल्यावर, थोडासा विरंगुळा म्हणून शनिवार रविवारी बाहेर खाल्ले तर काय बिघडले?”
“काय मोठा ताजमहाल बांधता हो तुम्ही? काय बनवता काय? सतत हातात लॅपटॉप घेउन बसले असता बनवता काय असे? समोरचा दुकानदार तरी पंक्चर बनवतो तुम्ही काय बनवता?” ३५ लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार पुरवनाऱ्या १४० बिलियन डॉलर्सच्या इंडस्ट्रीची तुलना हा माणूस घरात दोन भांडे घासावे लागले तर चौकातल्या पंक्चरवाल्याशी करीत होता. माझे मीठ डिवचल्या गेले होते खाल्ल्या मिठाला जागायची वेळ आली होती. मी चिडनूच म्हणालो
“बनवता काय म्हणजे सॉफ्टवेअर बनवतो आम्ही.”
“सॉफ्टवेअर त्याचा काय उपयोग?”
“उपयोग. अहो तुमच्या पेन्शनपासून ते हॉस्पीटलच्या बीला पर्यंत सगळीकडे सॉफ्टवेअर कामात येते.”
“ती कामे आम्ही आधी पण करीत होतो.”
“अहो आधी साधे रेल्वेचे टीकीट काढायला एक तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागत होते. आता तेच काम घरबसल्या होते. आज सॉफ्टवेअर मुळे तुमचे आमचे जगणे सुलभ झाले.”
“एकंदरीत काय तुमच्यासारख्या आळसी माणसांनी इतर लोकांनाही आळसी बनविले. असा आळस करुन शरीर सुटल्यावर मग जाता धावायला कुठे कुठे.”
आता ही गाडी कुठे जाणार मला कल्पना होती. बंद पडलेल्या घड्याळीच्या काट्यासारखी ह्या माणसाची गाडी एकाच ठिकाणी अडकत होती. काकांनी आयटीतल्या सर्व लोकांना आळसी म्हणणे मात्र मला चांगलेच झोंबले होते. य़ांना काय वाटत ऑफीसमधे एसी असला, काचा असल्या म्हणजे तिथे लोक फक्त झोपा काढायलाच जातात का.
“अहो काका आयटीचे जग बाहेरुन दिसते तसे नसते हो. प्रोजेक्टची डेडलाइन मीट करता करता पार वाट लागते हो आमची.”
“काही सांगू नको तुमच्या कष्टाचे पुराण? काल दुपारी तो समोरच्या बिल्डींगमधला बंगाली दिसला होता. त्याला विचारले आज सुटी का तर म्हणाला नाही मी घरुन काम करतोय. अस घरुन कधी काम होत? फुकटच्या बाता मारायच्या. आमचा मोठा भाऊ फॅक्टरीत काम करायचा पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी लेट मार्क लागायचा. संपूर्ण सर्व्हीसमधे त्याचा एकच लेटमार्क होता. केवढा अभिमान त्याला त्याचा. तुम्ही लोक कधीही येता कधीही जाता, ते कमी म्हणून घरी बसून काम करता.”
“काका आयटी कंपनीमधे माणूस महत्वाचा म्हणूनच तिथे त्या फॅक्टरीसारखे संपाची बोलणी करनारे पर्सनल डिपार्टमेंट नसते तर माणूस घडवणारे एचआरचे डिपार्टमेंट असते. माणूस हीच कंपनीची संपत्ती, ऍसेट. ती संपत्ती जपण्यासाठी कंपन्या हे असे सारे प्रयत्न करतात.”
“अच्छा म्हणजे जमेल तेंव्हा ती संपत्ती विकायला किंवा भाड्याने द्यायला बरी. आपल्या घरासारखी.”
“ते खरे पण हे बघा काय आहे ऑफीसची जागा, एसी, ईलेक्ट्रीकचे बील या सर्वांवर खर्च येतोच ना त्यापेक्षा लोकांनी घरुनच काम केले तर काय वाइट?”
“मी म्हणतो काय गरज आहे एसीची. मुळात खिडक्या नसनारे ऑफीस बांधतातच कशाला? आधी खिडक्या नसलेली बिल्डींग बांधायची मग हवा येत नाही म्हणून एसी लावायचा. अशी उलटी दुनिया आहे तुमची. आधी ऑनलाइन टिकीट काढायला सांगता, मग ते इंटरनेटचे पॅक घ्यायला लावता. अहो त्यापेक्षा रांगेत उभे राहून टिकीट काढले तर तेवढाच एक तास रिटायर्ड माणसाला विरंगुळा.”
खरे म्हणजे सर्व्हर रुम सोडली तर ऑफीसात एसीची काही गरज नाही पण आता सवय जडली हो त्याला काय करनार. हे सारे त्या काकांना समजावून सांगायचे म्हणजे कोळशाला सोन्याचा लेप लावायचा धंदा करण्यासारखे होते. तो कोळसा काही पिवळा होनार नाही पण सोने तर वाया जाईलच आणि हातसुद्धा काळे होतील. अशा संवादाची मला सवयच झाली. हे असेल संवाद ऐकले की असे वाटते देशातल्या साऱ्या समस्येला मंत्रीमंडळापेक्षा आयटीवालेच जास्त जबाबदार आहेत. अशा लोकांच्या नादी न लागण्याचा सुविद्य विचार करुन मी काढता पाय घेतला.
दुसरे दिवशी ऑफिसला येताना ऑफीसची लिफ्ट दहाव्या मजल्यावर थांबली. पाच सात तरुण मुल मुली घोळक्याने लिफ्टमधे शिरली आणि लगेच अकराव्या मजल्यावर सारे उतरले. मला काका आठवले, मी सुटकेचा निश्वास टाकला, बर झाले आता काका नव्हते इथे नाहीतर आणखी एक शनिवार वाया गेला असता.

मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

विनोदजीवनमानराहणीप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

14 Jul 2015 - 9:35 pm | उगा काहितरीच

अगोदर मिळू देत नोकरी , मग सांगतो त्या काकाला ! ;-) :'(

काकांचा रिटायरमेन्ट नंतर वेळ जात नव्हता.
म्हणुन झाड पकडलं असेल.
:)

अनुप ढेरे's picture

15 Jul 2015 - 11:58 am | अनुप ढेरे

हा हा मस्त! आवडलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2015 - 12:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

बरेच दिवसांनी आपल्या कामावर प्रेम असलेला आईटी वाला पाहण्यात आलाय असे नोंदवतो!! मी भेटलेल्या १० पैकी ७ लोक "काय कसं काय चालले आहे?" ह्या प्रश्नाला "काय नाय आमचे काय चालणार सुरु आहे मजुरी" असे म्हणतात!! काकांची गाडी मोलकरणी वर अडकलेली मजेशीर वाटली पण खरे पाहता मी स्वतः एक अनुभव घेतलाय तो म्हणजे गळ्यात आरएफआयडी लटकलेले पाहता भाजीवाला पावशेर भाजी चा रेट किमान ५ रुपयांनी वाढवतो!! पुण्यात असताना हे मी माझ्या रूममेट सोबत होताना पाहिले आहे

मित्रहो's picture

15 Jul 2015 - 5:05 pm | मित्रहो

कामावर प्रेम वगेरे फार मोठ्या गोष्टी आहेत. आम्ही दिलेय ते काम आनंदाने करतो. रडनारे आयटीतच नाही इतरत्रही असतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jul 2015 - 11:39 am | कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे तुमचे, रडणारे प्रत्येक क्षेत्रात सापड़तातच फ़क्त इथे चर्चा आईटी बद्दल सुरु होती अन मला वैयक्तिक अनुभवांत असे आईटी कर्मी भरपूर मिळाले म्हणुन ते मेंशन केले बाकी काही नाही

राग नसावा

गळ्यात आरएफआयडी लटकलेले पाहता भाजीवाला पावशेर भाजी चा रेट किमान ५ रुपयांनी वाढवतो>>>
नुसता भाजीवालाच नाही . सगळेच . सुधा मूर्तींनी असा १ किस्सा त्यांच्या एका पुस्तकात सांगितलाय . सुधा बाईंचा साधा सुधा अवतार बघून अम्बेवाल्याने नेहमीचा भाव सांगितला . त्यांच्या शेजारीच इन्फोसिस मधल्या गळ्यात RFID कार्ड घातलेल्याला मात्र तेच आंबे त्याने दीड पट भावाने विकले .
म्हणून मी काही विकत घ्यायचं असेल तर हमखास कार्ड गळ्यातून काढते.

खटपट्या's picture

15 Jul 2015 - 1:19 pm | खटपट्या

तेवढं आळसी चं आळशी करा.
बाकी लेख जबरा आहे

सुनील's picture

15 Jul 2015 - 1:34 pm | सुनील

जे कुळकायद्याने गमावले ते सिलिकॉन वॅलीने कमावले, असे रामदासकाका म्हणून गेलेतच की!

नाखु's picture

15 Jul 2015 - 1:54 pm | नाखु

आवडला नी मी फक्त ऐटीतला आहे (आयटीतला नाही)

नसूनही मुलखाचा आळशी
नाखु

स्पा's picture

15 Jul 2015 - 2:39 pm | स्पा

हुच्च धागा, चालुदे

सिरुसेरि's picture

15 Jul 2015 - 3:29 pm | सिरुसेरि

छान विषय . तसेच बरेचदा या काका लोकांची मुले - नातवंडे ही आयटी मध्येच असतात . काका ते अभिमानाने सांगत असतात .

आमच्या समोरच्या काकांना मी इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन भरलं हे सांगितल्यानंतर, "आमच्या वेळी असं नव्हतं" टाईप भाव त्यांच्या चेहर्‍यावर दाटले होते. अगदी दोन महिन्यांपूर्वी ते भरलेला सिलिंडर मागायला येत असत, मी ताकास तूर लागून देत नाही म्हणताना मागल्या आठवड्यात रिकामा सिलिंडर असेल तर सांग म्हणाले होते. आता एक सिलिंडर संपायच्या मार्गावर आहे आणि दुसरा रिकामा!! फटकळपणाचं अस्त्र काढावं लागणार असं दिसतंय. ;)

विजुभाऊ's picture

15 Jul 2015 - 4:02 pm | विजुभाऊ

एक मुद्दा रहातोय भौ.
त्या काकाना साम्गा की आयटी मुळे मुली एकदम टिप्टॉप रहायला लागल्या म्हणून.

पूर्वीचे वेण्या , अंबाडे, नौवारी आणि कासोट्यात गुंडाळलेल्या गासड्या आता अस्तंगत झाल्यात.
आसपास हिरवळ आणि फुलपाखरे किती दिसतात ते त्या काकानाच विचारा.
फुलपाखरे , सर्रळ्ळ केसांच्या भावल्या सर्वत्र चटपटीत पणे वावरतात.

आदूबाळ's picture

15 Jul 2015 - 5:44 pm | आदूबाळ

कासोट्यात गुंडाळलेल्या गासड्या

फॉर व्हॉट पर्पज?

नौवारीतल्या काकवांना गासड्या म्हणाले असावेत. ;)

ओह अच्छा. मला वाटलं कासोट्यात गासड्यांचं पॅडिंग काही विशिष्ट हेतूने करतात, आणि तो हेतू काय असावा ते कळलं नाही...

संचित's picture

15 Jul 2015 - 5:44 pm | संचित

फुलपाखरे , सर्रळ्ळ केसांच्या भावल्या सर्वत्र चटपटीत पणे वावरतात.

काका म्हणे: तेवढाच काय तो विरंगुळा.

सुबोध खरे's picture

16 Jul 2015 - 11:55 am | सुबोध खरे

"हिरवळ आणि फुलपाखरे" त्यांच्या वेळेस नव्हती म्हणून काकांचा राग असेल कदाचित.
तसे पाहायला आय टी मध्येही "हिरवळ आणि फुलपाखरे" शेकडा १०-१५ पेक्षा जास्त नसतातच. असतात त्या गाद्या आणि वळकट्याच आणि जी असतात ती अगोदरच एंगेज्ड असतात. असे बर्याच लोकांकडून ऐकले आहे.
ख खो दे जा

खटपट्या's picture

16 Jul 2015 - 4:04 pm | खटपट्या

दुर्दैवाने खरे हाये. :(