लिव बामणां लिव

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Jul 2015 - 8:37 am

माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो.

ह्या देवगड आंब्यांची खासियत आहे.मध्यम आकाराच्या ह्या आंब्याला तो चांगला पिकला आणि खाण्यालायक झाला हे त्याच्या सालीला सुरकत्या आल्या की समजावं.वास तर भरपूर येतो.हा आंबा छोट्या चाकूने कापायला मजा येते.सालीच्या आतमधे सगळाच गर असतो.आतला बाठा एकदम लहान असतो.एक शीर कापून गर तोंडात टाकल्यावर त्याची चव एव्हडी मधूर असते की,ठेवणीतला मध चमच्याने बाटलीतून काढून जीभेवर सोडल्यास जशी मधूर चव येते तशी येते असं म्हटल्यावर अतिशयोक्ती होणार नाही.

माझ्या भावाने ह्या मोसमात मला पाठवलेली आंब्याची पेटी संपली.म्हणून अपनाबाजारमधे जाऊन,पाऊस पडायला सुरवात होण्याआधी,एक पेटी खरेदी करावी म्हणून संध्याकाळी मी तिकडे गेलो होतो.आश्चर्य म्हणजे,मला तिकडे ज्युइली फर्नांडीस भेटली.ती पण आंबे खरेदीला आली होती.
मी तिला म्हणालो,
“ह्या पावसाळ्यात मी कोकणात जाणार आहे.मला कोकणातला पाऊस खूपच आवडतो.”
“मी पण जाणार आहे पंधरा दिवसासाठी.गेल्या आठवड्यात माझ्या बाबांचा मला फोन आला होता.माझी आज्जी आता खूपच थकली आहे.फार दिवस ती काढणार नाही.तेव्हा इकडे येऊन तिला तू भेटून जा.तुझी आठवण ती काढीत असते.”
मला ज्युइली म्हणाली.
“मग एकदिवस आपण तिकडे भेटू.पास्कललाही भेटून बरीच वर्ष झाली आहेत.आता तुझ्या आजीलाही भेटून जाईन.”
पास्कल ज्युइलीचे वडील. असं मी बोलून तिचा निरोप घेतला.

मी कोकणात गेलो तेव्हा खूप पाऊस पडत होता.एक दिवस जेव्हा पावसाने उसंत घेतली तेव्हा पास्कला फोन करून मी त्याला त्यादिवशी भेटायला येतो असं सांगीतलं.
“जेवायलाच ये”
असं फोनवर त्यांने मला सांगीतलं.कुणी आग्रह करून मला जेवायला बोलवलं तर मला त्याला नाराज करता येत नाही.मी बरं म्हणालो.
मी गेलो तेव्हा माझं स्वागत ज्युइलीने केलं.मुंबईत जीनवर स्लिव्हलेस टॉप घालणार्‍या ज्युइलीला,सोनचाफ्याच्या पिवळ्या रंगासारखी साडी आणि वर तसाच लांब बाह्याचा मॅचिंग ब्लाऊझ अशा पेहरावात पाहिली.
“ज्युइली तू ह्या पेहरावात किती सूंदर दिसतेस.तुला पंधरा वर्षाचा मुलगा आहे असं वाटत नाही”
असं मी तिला म्हणालो.
“थॅन्क्स”
लगेचच ती म्हणाली.
मी घरात आल्यावर एका सोफ्यावर बसलो.तसाच काही वेळात पास्कल आला आणि त्यांने मला घट्ट मिठी दिली.हे पाहून ज्युइलीचे डोळे पाणावले होते.
“प्रेमाला उपमा नाही
ते देवा घरचे देणे”
असं म्हणत तिने आपले डोळे पदराने पुसले.
पास्कल बरोबर गप्पा झाल्यावर मी ज्युइलीच्या आजीची चौकशी केली.
“तुमच्याशी तिला बोलायचं आहे.आता तिला डोळा लागला आहे.ती उठल्यावर तिला आणते.”
ज्युइली मला म्हणाली.

हळद आणि तीरफळं घालून सुकं बांगड्याचं तिखलं,तळलेले बांगडे आणि तळलेली सुरमईची कापं,फणसाच्या घोट्या घालून केलेली डाळीची आमटी,कोकमाचं सार आणि उकड्या तांदळाचा भात.असा जेवणाचा थाट होता.ज्युइलीने आणि तिच्या आईने जेवण केलं होतं.अलीकडे आहार मोजकाच खाण्यार्‍या मला हा थाट पाहून ताव मारण्यापलीकडे कारणच नव्हतं.
जेवण झाल्यावर पोरसातल्या पानवेलीवरून ताजं पान आणून,लवंग,वेलदोडा,सुपारी,चूना आणि काथ घालून मुखशुद्धीला पानाचा विडा दिला.

काही वेळाने आजीला जाग आली असं पाहून ज्युइलीच्या मुलाने तिला उचलून आणून समोर सोफ्यावर बसवलं.शाळेत असताना शाळा सुटल्यावर पास्कलच्या घरी मी खेळायला जायचो.त्या तिच्या तरूण वयात तिला पाहिलीली माझ्या मनातली छबी आणि आताचं तिचं उतारवय पाहून माझं मन गहिवरलं.माझ्याशी ती हसली.मला तिने ओळखलं देखील.डोळे आणि कान चांगले काम करत असावेत असं मला वाटलं.पण तिच्या बोलण्यात एक प्रकारचा मंदपणा आला होता.पण उच्चार चांगले यायचे.
मला म्हणाली,
“कायरे बाबणां कसो आसस?”
माझं नाव उच्चारायला तिला तिच्या तरूण वयातही कठीण जायचं म्हणून त्यावेळपासून ती मला “बामणां”असंच म्हणायची.
मला म्हणाली,
“आता तू काय करतंस?”
“खातंय,पितंय,झोपतंय आणि थोडासां लिणां वाचणां करतंय.ह्या वयात आणि काय करतलंय?”
मी तिला उत्तर दिलं.
लिहिण्या,वाचण्याची तिला पूर्वी पासून आवड नसली तरी इतरानी शिकावं,वाचावं लिहावं मोठं व्हावं हे तिला नेहमीच वाटायचं.
“आमचां ज्युइली बघ.आता खूप शिकून मोठा झालां.मी तेका तेच्या लहानपणी मासे मारूक नेयचंय.तेचो आजो तेका शिक आणि मोठा हो म्हणून सांगायचो.आजाच्या तेना ऐकल्यान.नायतर हंय कोळीण म्हणून मासे मारूक रव्हला असतां.”
मला आजी म्हणाली.
“असां कसां म्हणतंस,पास्कलच्या आई! तुझांय तेना ऐकलां.मास्यांच्याच जीवनावर तां शोध लावता मां?”मी आजीला म्हणालो.
“होय रे बाबा! ह्यांपण खरां आसां” ती मला म्हणाली.
थोडावेळ बसून झाल्यावर आजी थकलेली मला दिसली.तिच्या नातवाने परत तिला तिच्या बिछान्यावर उचलून नेली.त्यापूर्वी उठताना ती मला म्हणाली,
“लिव बामणां लिव,तू लिवत र्‍हंव.”

ह्या दोन ओळी मला जणू कवितेतल्या ओळी कश्या वाटल्या.पास्कल आणि ज्युइलीचा मी निरोप घेतला.रुचकर जेवणासाठी ज्युइलीच्या आईचे आणि ज्युइलीचे मी आभार मानले.
ज्युइली मला म्हणाली,
“आपण मुंबईत भेटूच”
“बरं” असं म्हणून मी निघालो.
घरी जाताना वाटेवर आजीचे ते उद्गार एक सारखे माझ्या मनात घोळत होते.घरी येऊन फ्रेश होऊन झाल्यावर दिवा काढून मी बिछान्यावर अंग टेकलं.मन झोपायला देईना.तेव्हड्यात पावसाची एक मोठी सर आली.परत उठलो दिवा लावला,आणि मालवणीत कविता सुचत गेली.

लिव बामणां लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्‍हंव

कधी आठवणी लिव
कधी अनुभव लिव
कधी अनुवाद लिव
कधी भाषांतर लिव
कधी रुपांतर लिव
कधी अवांतर लिव
पण लिवत र्‍हंव

संदर्भ देवचो की नाय
ह्यां तुझां तूच ठरंव
तूका रुचांत तसां लिव
पण लिवत र्‍हंव

लिव बामणां लिव
तुका होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

कविता लिहून झाल्यावर हायसं वाटलं.दिवा काढून बिछान्यावर पडलो न पडलो तोच पुन्हा एक पावसाची जोरदार आडवी तिडवी सर आली.कोकणातल्या पावसाची हिच तर मजा आहे.खिडकीतून बारीक बारीक पाण्याचे शिंतोडे येत होते.जाड सोलापूरी चादर अंगावर ओढून घेतली.
कोकणातलं हे असं पावसातलं गार हवामान,कोकणातली सुपिक माती आणि हिरवळ आसमंत ह्याचा विचार येऊन कॅलिफोरनीयाची आठवण आली.
कोकणाचा कॅलिफोरनीया करण्याचे काही लोकांचे मनसुभे कशामुळे होतात ते आतां माझ्या लक्षात आलं.
सर निघून गेली होती.आकाश निरभ्र झालं होतं.कारण ती पौर्णिमेची रात्र असावी.मी चादर पुन्हा अंगावर ओढून घेतली.खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र मला खूप सुंदर दिसत होता.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

14 Jul 2015 - 8:46 am | उगा काहितरीच

मस्त ...एक शंका असं म्हणतात की फणसाची भाजी खाल्यानंतर पान खाऊ नये , कुणाला याबाबतीत काही माहिती आहे का ?

स्वीत स्वाति's picture

14 Jul 2015 - 10:16 am | स्वीत स्वाति

मी पण एका पुस्तकात वाचले आहे कि फणस खाल्यावर पान(नागीलीचे) खाल्ले तर विष तयार होते म्हणून .

द-बाहुबली's picture

14 Jul 2015 - 4:01 pm | द-बाहुबली

हे मलाही सांगायचे पण मला वाटाय्चे ते मला घाबरवायसाठ्ठी होते.. तसहि फणस खाउन पान खाणार्‍यात मि कधीच न्हवतो त्यामुळे ही विषपरीक्षा दिली नसली तरी माझ्या मित्राची आज्जि एकदा म्हणाली होती आमच्या सदाने (त्यांचे सुपुत्र) एकदा गरे खाउन पान खाल्ल होतं तेंव्हा त्याच्या पोटात पाणी झालं होतं....

यशोधरा's picture

14 Jul 2015 - 8:51 am | यशोधरा

मस्त! आवडलं एकदम!

कंजूस's picture

14 Jul 2015 - 8:54 am | कंजूस

लिव रे लिव!

अनुप ढेरे's picture

14 Jul 2015 - 10:05 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय. आवडलं!

कवितानागेश's picture

14 Jul 2015 - 11:20 am | कवितानागेश

छान लिवलय!

नन्दादीप's picture

14 Jul 2015 - 11:42 am | नन्दादीप

आमच्या देवगडच्या हापूसचे कोडकौतूक केल्याबद्दल कचकून आभार......

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Jul 2015 - 12:32 am | श्रीकृष्ण सामंत

कोकणात एक म्हण आहे.
"आंब्यात आंबो हापूसचो
आणि
हापूसच्या आंब्यात देवगडचो"

एस's picture

14 Jul 2015 - 2:38 pm | एस

मस्त.

अवांतरः हा मिपावरचा बत्तीस हजारावा धागा आहे. :-)

तुडतुडी's picture

14 Jul 2015 - 3:03 pm | तुडतुडी

फणसाची भाजी खाल्यानंतर पान खाऊ नये>>>
आतड्याला पीळ पडतो त्याने .(मोठ्या कि छोट्या ते माहित नाही )

नाव आडनाव's picture

14 Jul 2015 - 3:57 pm | नाव आडनाव

मोठ्या कि छोट्या ते माहित नाही
मधल्या आतड्याला पीळ पडतो :)

छोटा मेंदू - मोठा मेंदू - मधला मेंदू ( हे काय आणी कुठे असतं संदिप भाऊंना विचारा )
तसंच, छोटं आतडं - मोठं आतडं - मधलं आतडं ( हे पण त्यांना माहित असण्याची शक्यता आहे :) )

चिगो's picture

14 Jul 2015 - 3:46 pm | चिगो

छान.. अनुभवकथन आवडले..

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2015 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा

कविता लिहून झाल्यावर हायसं वाटलं.दिवा काढून बिछान्यावर पडलो न पडलो तोच पुन्हा एक पावसाची जोरदार आडवी तिडवी सर आली.कोकणातल्या पावसाची हिच तर मजा आहे.खिडकीतून बारीक बारीक पाण्याचे शिंतोडे येत होते.जाड सोलापूरी चादर अंगावर ओढून घेतली.
कोकणातलं हे असं पावसातलं गार हवामान,कोकणातली सुपिक माती आणि हिरवळ आसमंत ह्याचा विचार येऊन कॅलिफोरनीयाची आठवण आली.
कोकणाचा कॅलिफोरनीया करण्याचे काही लोकांचे मनसुभे कशामुळे होतात ते आतां माझ्या लक्षात आलं.
सर निघून गेली होती.आकाश निरभ्र झालं होतं.कारण ती पौर्णिमेची रात्र असावी.मी चादर पुन्हा अंगावर ओढून घेतली.खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र मला खूप सुंदर दिसत होता.

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!!!

बहुगुणी's picture

14 Jul 2015 - 6:38 pm | बहुगुणी

लिव, बामणा, लिवत र्‍हा!

द-बाहुबली's picture

14 Jul 2015 - 6:44 pm | द-बाहुबली

कविता लिहून झाल्यावर हायसं वाटलं.दिवा काढून बिछान्यावर पडलो न पडलो तोच पुन्हा एक पावसाची जोरदार आडवी तिडवी सर आली.कोकणातल्या पावसाची हिच तर मजा आहे.खिडकीतून बारीक बारीक पाण्याचे शिंतोडे येत होते.जाड सोलापूरी चादर अंगावर ओढून घेतली.
कोकणातलं हे असं पावसातलं गार हवामान,कोकणातली सुपिक माती आणि हिरवळ आसमंत ह्याचा विचार येऊन कॅलिफोरनीयाची आठवण आली.
कोकणाचा कॅलिफोरनीया करण्याचे काही लोकांचे मनसुभे कशामुळे होतात ते आतां माझ्या लक्षात आलं.
सर निघून गेली होती.आकाश निरभ्र झालं होतं.कारण ती पौर्णिमेची रात्र असावी.मी चादर पुन्हा अंगावर ओढून घेतली.खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र मला खूप सुंदर दिसत होता.

अक्षरशः एक शहारा अनुभवला...!

विवेकपटाईत's picture

14 Jul 2015 - 7:52 pm | विवेकपटाईत

वाचताना मजा आली. अतिशय सुंदर मनात भिडणारे वर्णन

शैलेन्द्र's picture

14 Jul 2015 - 10:33 pm | शैलेन्द्र

तात्यांची आठवण आली

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहजसुंदर लेखन... मनाला भिडले !

जुइ's picture

14 Jul 2015 - 11:39 pm | जुइ

छान लिहिले आहे आवडले!

एक एकटा एकटाच's picture

14 Jul 2015 - 11:51 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

मितान's picture

15 Jul 2015 - 9:03 am | मितान

व्वा! छानंच!!!

खटासि खट's picture

15 Jul 2015 - 9:14 am | खटासि खट

अरे चा ! मस्तच आहे की..

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2015 - 11:54 am | कैलासवासी सोन्याबापु

वाह!!!! क्षणात एखाद्या कोकणी क्रिस्चियन घरचा पाहुणचार फील झाला!!! अप्रतिम अनुभवसिद्ध लेखन

सौंदाळा's picture

15 Jul 2015 - 4:33 pm | सौंदाळा

सामंतकाका
मस्त लेख.
तुमचे कोकणातले अजुन अनुभव येऊ द्या.

शि बि आय's picture

16 Jul 2015 - 11:50 am | शि बि आय

मायेने जीवाला आणि जिभेलाही तृप्त करणारा असा कोकणी पाहुणचार मिळणे म्हणजे पर्वणीच हो !! मस्तच आवडले. पावसाळ्यात एकदा आईच्या मावशीच्या सासरी खेडला जाण्याचा योग आला होता. अहाहा !!
आठवून सुद्धा फ्रेश वाटते.

बादवे … कोकणाचा कलीफोर्निया करण्यापेक्षा त्याची जगाच्या नकाशावर स्वंतंत्र अशी कोकण म्हणून ओळख निर्माण खाली तर अधिक बरे… आपले बावनकशी सोने असताना का उगाच तुलना करावी

मैत्र's picture

31 Jul 2015 - 11:00 am | मैत्र

खूप छान सामंत काका !

सामंतजी खूप सुंदर लिहिलंयत. नजरचुकीने हा धागा वाचायचा राहून गेला होता. आत्ताच श्री मैत्रेय यांनी वर आणला म्हणून मला वाचायला मिळाला. थोडंसं विस्तारपूर्वक जर कोकणातील कथा लिहिल्यात तर खूप आवडेल वाचायला. कथा वाचताना काही वेळ मी त्या वातावरणात जणू हरवूनच गेलो होतो.
तूका रुचांत तसां लिव : मला वाटतं इथं तुका रुचतां तसां लिव असं पाहिजे होतं.
असो, खूप खूप सुंदर!!! धन्यवाद!!!

प्यारे१'s picture

1 Aug 2015 - 1:19 am | प्यारे१

मस्त मोकळं मनोगत

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2015 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर लेख.

जे मनाला भिडलं ते मोजक्याच शब्दात, पाल्हाळ न लावता, अकारण अवास्तव कोकणवर्णन टाळून फार परिणामकारक लिखाण केले आहे. आवडलं.