कोलंबीची नारळाच्या रसातील कढी

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
12 Jul 2015 - 11:01 am

कोलंबी पुराणाचा दुसरा अध्याय. पहिला कोलंबीची मॉली.ही कढी कधीही करा. फन्ना उडणारच.माझ्याकडे अतिथींचे प्रमाण जरा जास्तच आहे. आम्ही दोघे असल्याने आता स्वयंपाक अजून दोन पाहुणे आले तरी सरतील असा नसतो त्यामुळे चटकन् होणाऱ्या पदार्थांना विशेष पसंती असते माझी. या काधीबद्दल बोलायचं तर विशेष फर्माईश असते आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची. अतिशय कमी साहित्यात होणारी कढीची ही कृती. सगळं घरातच असल्याने फक्त कोलंबी आणली की झालं. कधी कधी तीही फ्रीजरमध्ये असतेच. तर कधी पाहुणे येतानाच तीही घेऊन येतात.तर आता जमवा साहित्य.

१.१५ ते २० कोलंबी.

.

२. दीड चहाचा चमचा आले+लसूण पेस्ट.(हे वाटण माझ्याकडे तयार असते.जितके आले त्याच्या निम्मे लसूण घ्यायचा आणि मिक्सरमधून काढायचे.)

३. १ मध्यम कांदा बारीक चिरून.

४. एका नारळाचे दूध किंवा १ पॅकेट तयार नारळाचे दूध.(मी डाबर होममेड वापरले आहे.)

५. दीड चमचा संडे स्पेशल मसाला.(मी बेडेकरचा वापरला आहे.) त्याऐवजी दीड चहाचा चमचा मिरचीपूड+एक चहाचा चमचा धणेपूड+अर्धा चहाचा गरम मसाला पूड वापरू शकता.

६. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.

७. २ ते ३ पळ्या तेल.

८. चवीनुसार मीठ.

१०. २ ते ३ लसूणपाकळ्या.

कृती:-
१.नारळ खवून दूध काढून घ्या,१ वाटी आणि ३ वाट्या पातळ.तयार वापरले तर अर्धी वाटी घट्ट बाजूला काढून बाकीच्यात तीन वाट्या पाणी घालून पातळ करा.

२. गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल घालून लसूण ठेचून घालवा.त्यात कोलंबी टाकून मिनिटभर परतून काढून घ्यावी.

३. त्याच तेलात चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा.थोडा लालसर करावा.

४. त्यात हळद पूड ,संडे मसाला टाकून परतावे.

५. पातळ दूध घालून दोन उकळ्या घ्याव्या..

६. त्यात परतलेली कोलंबी घालावी.त्यामुळे ती लवकर शिजतेच.पण वातडही होत नाही.

७. आता घट्ट दूध घालून मीठ घालून एक उकळी घ्यावी. परत परत गरम करू नये.केल्यास उकळी फुटू न देता करावी नाहीतर नारळाचे दूध फाटून चोथा पाणी होईल.

.

गरम भात आणि कोलंबीची कढी म्हणजे क्या कहने. सोबतीला पाहुण्यांच्या पोटातली भूक पुरेशी असते.
खूप घाईत असताना केल्यामुळे प्रत्येक पायरीचे फोटो नाहीत.

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

12 Jul 2015 - 11:47 am | संजय पाटिल

आयला आज रवीवार आणी त्यात कोळंबीची कढी वाचुन आणी बघुन पोटात बॉयलर पेटला राव

सुहास झेले's picture

12 Jul 2015 - 12:02 pm | सुहास झेले

वाह... एकदम संडे स्पेशल :)

किल्लेदार's picture

14 Jul 2015 - 4:05 am | किल्लेदार

घट्ट दूध आणि पातळ दूध याचा उलगडा होत नाहीये….

किल्लेदार's picture

14 Jul 2015 - 4:07 am | किल्लेदार

ओह्ह आत्ता वाचलं…… करून बघतो

स्रुजा's picture

14 Jul 2015 - 6:43 am | स्रुजा

सुरंगी ताई काय अगं अफाट पाककृती तुझ्या संग्रही आहेत ! तुझ्या सगळ्या मसाल्यांना आणि करीज ना न्याय देणार्‍या भाज्या पण सांगत जा ना जमेल तिथे प्लीज. म्हणजे आम्ही मुळ पाककृती तशीच ठेवुन त्यात भाज्या घालुन आस्वाद घेउ शकु.

कविता१९७८'s picture

14 Jul 2015 - 7:16 am | कविता१९७८

मस्तच

उमा @ मिपा's picture

14 Jul 2015 - 2:10 pm | उमा @ मिपा

लाजवाब!

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:40 pm | दिपक.कुवेत

सिंपली...

सानिकास्वप्निल's picture

14 Jul 2015 - 9:04 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाककृती ताई, कोळंबीचे सगळे प्रकार आवडतातच, कोळंबी जीवकीप्राण आहे :)
आमच्याकडे कालवणात खवलेला ओला नारळ, लसुण, हळद, चिंचेचे बुटुक, कोथींबीरीचे वाटण लावतात व फोडणीत कांदा परतला जातो. बदल म्हणून कालवणात नारळाचे दूध ही कधी वापरले जाते, तसलाच प्रकार वाटत आहे ही कढी.

त्रिवेणी's picture

14 Jul 2015 - 9:20 pm | त्रिवेणी

दु दु तायडे.
आता पुण्यात येताना घेवून ये.

पद्मावति's picture

15 Jul 2015 - 6:49 pm | पद्मावति

मस्तं रेसेपी. खूप आवडली. मुख्य म्हणजे खूप काही साहित्य लागत नाही. झटपट होईल.

पद्मावति's picture

28 Jul 2015 - 6:40 pm | पद्मावति

ही कोलम्बीची नारळा च्या रसतलि कढी मी काल करून बघितली. अक्षरश: १० ते १५ मिनिटात झाली, अगदी झटपट. ही आमच्या घरात अगदी हिट झाली. मुलांनी आणि त्यांच्या बाबांनी मिटक्या मारत सगळी कढी सफाचट केली. या मस्तं आणि सोप्या रेसिपी बदद्ल खूप खूप आभार.
हा फीडबॅक खरंतर याच पाककृतीच्या खाली द्यायला पाहिजे होता पण तो मी घाईघाईने तुझ्या दुसर्या रेसिपी वरील प्रतिसादामधे दिला.

मनीषा's picture

28 Jul 2015 - 10:00 pm | मनीषा

छान आहे पाककृती .

झंप्या सावंत's picture

29 Jul 2015 - 3:28 pm | झंप्या सावंत

ताई दंडवत आपणास ........... जमल्यास पाठून द्यावी

चैत्रबन's picture

15 Aug 2015 - 3:02 pm | चैत्रबन

खूप छान झालेली कढी...

पदम's picture

2 Sep 2015 - 12:07 pm | पदम

Mi nakki karen lekala khup aavadate