श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
8 Jul 2015 - 12:11 am

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड मला माझी आई कै. मंगला ओक बेहेरे वृद्धाश्रमांत राहात असताना सहज हाती लागले. सन 2012 मधे हे सर्व लेखन टाईप करून ठेवले होते परंतु काही शब्द व पाने टायपिंग करायची राहिल्याने ते अप्रकाशित होते. आज ते कागद सहजी हाती आले व उरलेले लेखन टाईप करून तयार झाले. आणखी एक कारण असे की 2 दिवसांपुर्वी मी, मुलगा चिन्मयशी बोलताना सहज म्हणालो होतो की गिरनार पर्वताच्या यात्रेचे जे वर्णन चितळे बाबांनी केले होते तसेच वर्णन श्री निरंजन रघुनाथांच्या चरित्रात मी अर्धवट टाईप करून ठेवलेले आहे. पण आता ते वडिलांच्या हस्ताक्षरातील कागद मिळत नाहीत म्हणून पुर्ण करायचे राहिले आहे. वगैरे... ते नेमके आज सहज अन्य काही दस्तावेज पडताळताना दिसले. हे उर्वरित लेखन त्याला जोडून हे वाचकांना सादर.
सन १८१२ च्या सुमाराला गिरनारवर घडलेल्या कथनाचे वडिलांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिखित कागद हाती येऊन टाईप करायला २०० वर्षे पूर्ण झाली. तर वडिलांनी हे लिखाण सन 1955च्या सुमारास केलेल्याला २०१५ सालात 60 वर्षे पुर्ण होत आहेत.

जन्म – कळंब, परळी वैजनाथजवळ, मराठवाडा
शके 1704, कार्तिक शु.8 (इ.स.1782) ते भाद्रपद शु.11(इ.स.1855)
पूर्वाश्रमीचे नाव - अवधूत
घरच्या गरीबीमुळे मूळ गावाहून तरूणपणी पुण्यास नष्टे नांवाच्या हुंडेकऱ्याकडे नोकरी – कारकून. सेवाधर्माचा कटू अनुभव आणि स्वार्थपरायण कुटुंबीयांमुळे वैराग्य उत्पन्न झाले. इ.स. 1811 चा हा काळ होता. पेशवाईची आखेर आली होती. (1818 पासून इंग्रजी राजवट) पुण्यास बेलबागेमध्ये त्यावेळी ठाकूरदास नांवाचे प्रख्यात हरीदास करीत असत. त्यांचे कीर्तन ऐकून अत्यंत वैराग्य उत्पन्न झाले आणि त्यांनी पुणे सोडले व भ्रमणास सुरूवात केली. आळंदी – देहू येथे इंद्रायणीचे पाणी हातांत घेऊन "आजपासून एक वर्ष सात दिवसांत सगुण साक्षात्कार झाला नाहीतर प्राणत्याग करीन." अशी तुकोबांची साक्ष ठेऊन घोर प्रतिक्षा केली. तेथून घोडेगांव, जुन्नर, कोतूळ अशी गावे घेत ते नगर जिल्ह्यातील अकोले येथे आले. तेथे कांही दिवस राहून नाशकास गेले. तेथे त्यांची रघुनाथ नावाच्या सत्पुरूषाची गांठ पडली व त्यांना इ. स. 1811 साली गुरूंनी अपरोक्ष साक्षात्कार करून दिला. तेथे त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांना जरी निर्गुण आत्मसाक्षात्कार झाला तरी सगुण दर्शनाची प्रतिज्ञा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी गुरूंचा आज्ञा घेऊन गिरनार येथे दत्त भेटीसाठी जाण्याचे ठरविले. कोकण – गुजराथ – सुरत असा पायी प्रवास करीत ते गिरनार पर्वतापर्यंत आले. परंतु प्रतिज्ञापूर्ती दिवसास अवकाश असल्याने त्यांनी तीर्थयात्रा करून नंतर गिरनार प्रदक्षिणा सुरू केल्या. शेवटच्या तीन रात्री दत्तात्रयांनी ब्राम्हण रूपाने येऊन पहिले दिवशी स्वप्नात वस्त्रे दिली. सकाळी खरोखरीच त्यांना वस्त्रे मिळाली. तिसरे दिवशी खडावा प्रत्यक्षात मिळाल्या परंतु साक्षात दर्शन नाही म्हणून रात्रंदिवस त्यांनी आकांत मांडला. तीन दिवस झाल्यावर चवथे दिवशी श्री गुरूंचे नांव घेऊन एका शीळेवर डोके आपटून प्राण देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे केले असता डोके फुटून गेले. त्याबरोबर आपल्या तोंडात कोणीतरी कमडंलूतले पाणी घालीत आहे असा भास झाला ते सावधान होऊन पहातात तो प्रत्यक्षात श्री दत्तात्रय सगुणरूपाने उभे आहेत असे दिसले. श्रीं नी त्यांच्य डोक्यावरून हात फिरवला. मस्तकावर झालेली मोठी जखम आपोआप भरून गेली. श्री रघुनाथ गुरूंनी दिलेल्या अनुग्रहाचे मनन करण्यास सांगून श्रींनी निरोप दिला.
या सगुण दर्शनाची चालती बोलती खूण म्हणून केशापासून भिवयापर्यंत एक वण अखेरपर्यंत मस्तकावर राहिला होता. गिरनारहून निरंजन स्वामी गुरू दर्शनास परत नाशकास आले. तेथे काही दिवस गुरू सेवा करून आपल्या कळंब या मूळ गांवी गेले. तेथे कांही वर्षे राहून गुरूबंधू श्रीमंत वासुदेव पंडीत भाऊ महाराज यांचेकडे कोल्हापुरास सहकुटुंब राहिले. तेथून श्री गंगाधरराव पटवर्धन यांचे बोलावण्यावरून इ. स. 1845 सुमारास मिरजेस राहण्यास आले. मिरज सरकारांनी त्यांचेकडून अनुग्रह घेतला. पण मठ जमीन वगैरे कांही करून घेतले नाही. त्यांची विरक्त वृत्ती पाहून सरकारांनी त्यांचे चिरंजीव योगिराज यांना मठ व इनाम जमिनीची सनद करून दिली. 1855 साली संन्यास ग्रहण केला व त्याच साली भाद्रपद शु.11 स त्यांनी मिरजेस कृष्णा प्रवहात जलसमाधी घेतली.

निरंजन रघुनाथ यांचे ग्रंथ -
ज्ञानेश्वरीवर टीका
अमृतानुभव टीका साक्षात्कार व आत्मप्रचिती हो दोन प्रकरणे आत्मबोध
शांकर भाष्यावर टीका मांडुक्य उप. टीका.

-------
निरंजन रघुनाथ यांच्या आत्मप्रचीती काव्यातील मधील काही ओव्या –मधून केले गेलेले वर्णन
ठाकूरदास -
अनेक प्रकारचें मतांतर। सांगूनि भेदितसें अंतर।।16।।
म्हणे तुम्हीच रे ईश्वर। नरदेही अवतरला।।
तुम्हीं तीन्ही अवस्था जाणतां। जाग्रति सुषुप्तिव् व्यथा।।
या तिहींचा जो पहाता। तेचिं तुमचे स्वरूप।।17।
ऐंसे ऐकून कीर्तन। माझें दचकले अंतःकरण।।
नेत्री पातले जीवन। कंठ दाटूनि तो आला।।26।।
पाठीं उभे राहिले ते काटे। शरीर कांपे थरथराटे।।
बोलूं जातो कंठ दाटे। शब्द ओठीं न निघती।।27।।
वांटे आतांचि येईल मरण। म्यां कांही न केले साधन।।
व्यर्थ गमाविले जिणे। विषयभदें करूनि।।28।।
तैसा मी भयभीत झालो। ठाकोरदासा जवळीं गेलो।।
हात जोडोनि विनम्र झालो। स्तुती वदलों विशेष।।33।।
धन्य धन्य तुमचे कीर्तन। ऐकोनि झाले समाधान।।
आतां उव्दिग्न झाले मन। सर्व त्यागुनी जातसे।।34।।
साधू वदला प्रसन्न वदन। तूं होशील रे नारायण।
मला तोच शकुन मानून। तेथोनिया निघालो।।36।।

सकाळी पुण्याच्या बाहेर पडून चिंचवडाकडे निघालो. मार्गांत एक जटामंडीत तपस्वी दिसला त्याला जवळचा तांब्या दान केला. चिंचवडास एक बैरागी दिसला त्यास उपरणें देऊन टाकले. देहूस तुकाराम – पांडुरंगाचे दर्शन घेतले.
अस्तू तया स्थळी जाऊन। उदासीन झाले मन।
वाटे मी नरतनूस येऊन। कांहीं सार्थक न केले।।47।।
ऐसा होऊन उदासीन। वस्त्रे वाटिली साधू लागून।
एक घोळ पांघरून। रात्रौ जागर पै केला।।48।।
क्षणक्षणा अश्रू येतीं नयनी। बहुसंताप उठे मनी।
वाटे म्यां जन्मास येऊनि। कांहींच केले नाहीं मी।।49।।
ऐसा आहोरात्र खेद करितां। भानू उदय झाला अवचिता।
मग स्नानासि घाटावरूता। इंद्रायणीच्या पातलों।।50।।
पूर्वदिशा आवलोकून। केले तुकारामाचे स्तवन।
समर्था। तूं धन्यधन्य। मजवर कृपा करा का।।51।।
ऐसे करितां स्तवन। तों दृष्टी पडली कौपीन।
दुसरे कटिसूता लागून। देखतां झालों ते ठाया।।52।।
तोचे प्रसाद वस्त्र घेऊन। तेथे कौपीन केली धारण।
सर्वांशी भस्म लाऊन। केले ध्यान दत्ताचें।।53।।
मग कर संपुटी जळ घेऊन। सोडले संकल्पा लागून।
जीवभाव मनःप्राण। गुरू अर्पण केलासे।।54।।
हृदयीं ठेवला नेत्र करून। आजपासून व्दादश महिने।
उपरी सात दिवस जाण। देह धारण करणें हा।।55।।
मजला दत्तात्रय दर्शन। झालिया ठेवीन हा प्राण।
नाहींतरी देह अर्पण। केला असें गुरूपायीं ।।56।।
ऐसा करूनि निश्चय अंतरी। साक्षी तुकोबा बाहेरी।
वाचे करूनि दीर्घस्वरें। तेथें वदतो जाहलों ।।57।।

अखंड वाचेसी नामस्मरण। दत्त अवधूत हेचिं भजन।
त्रैलोक्यी जयाचे गमन। जग उध्दारा अवतरले ।।61।।
करूनि त्यांचे नामस्मरण। पाऊल ठेवा भूमीलागून।
ऐसें अखंड लागले ध्यान। वेधलें मन निजरूपीं ।।62।।

अशा तऱ्हेनें हिडंत असतां मार्गातील लोक हासावयाचे – वेडा रे वेडा म्हणायचे – पश्चातापाने दग्ध झाल्याने क्षुधेचे भानच राहिलें नाहीं. तहान लागल्यास पोटभर पाणी प्यायचे! अशा तऱ्हेंने तीन दिवस चाललों कोणतेच भान नव्हते. चौथे दिवशी सकाळी घोडेगांव लागले. तेथेंही वेडा आला रे असेंच लोक म्हणू लागले. या गांवात भिकोबा बाबा नांवाचा संत होता. त्याचेजवळ तीन दिवस राहिलों. गांवात भिक्षा मागितली. अंगावरील वस्त्र फाटून चिंध्या झाल्या होत्या. तेथून ब्राम्हणवाडा या गांवी गेलो. तेथें एका कानफाट्या बैराग्याजवळ राहिलो. त्यानें सांगितले कीं तुझा निश्चय पक्का असेल तर गिरनार पर्वतावर दत्तात्रय तुला दर्शन देतील. तेथें अनेक योगी अनुष्ठान करीत असतात. हे ऐकून गिरनार पर्वतावर जाण्याचे ठरविले. तेथून जुळारास गेलो. लोकांनी अनेक तऱ्हेने टवाळी केली. पण त्याच गांवी कुशाबा नांवाचा संत भेटला.

श्री निरंजन रघुनाथ चरित्र - भाग 2

धर्मविचार

प्रतिक्रिया

मस्त . गिरनार पर्वताची यात्रा . माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे . निरंजन रघुनाथ यांचे ग्रंथ कोठे वाचायला मिळतील ? विकत मिळतात का ?

माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड मला माझी आई कै. मंगला ओक बेहेरे वृद्धाश्रमांत राहात असताना सहज हाती लागले.

वुध्दाश्रमात ?

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 7:01 pm | कपिलमुनी

उगीच वैयक्तीक कशाला होत आहात ?
त्यांचा खासगी प्रश्न आहे

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 7:02 pm | कपिलमुनी

उगीच वैयक्तीक कशाला होत आहात ?
त्यांचा खासगी प्रश्न आहे

बॅटमॅन's picture

8 Jul 2015 - 7:07 pm | बॅटमॅन

मिरजेत राहिलेल्या संतांबद्दलचा लेख वाचून बरे वाटले. घरी काही पुस्तके आहेत, त्यात आय गेस त्यांच्याशी संबंधितही काही पुस्तके असावीत. घरी गेलो की पाहतो.

माहितगार's picture

8 Jul 2015 - 7:25 pm | माहितगार

वरील लेखातील नेमका कोणता भाग तुम्ही अथवा तुमच्या वडीलांनी लिहिला आहे आणि निरंजन रघुनाथ यांचे लेखन नेमके कोणत्या ओळीपासून चालू होते ?

शशिकांत ओक's picture

9 Jul 2015 - 12:03 am | शशिकांत ओक

आत्मानुभूतीतील आहे, असे त्यात म्हटले आहे. गद्य लेखन वडिलांनी संकलित केले होते की अन्य कोणी याची मला कल्पना नाही. कदाचित आईला ही नसावी. कारण ऑटोरायटिंग मधून माझ्या वडिलांशी झालेला संपर्क सादर करताना कै दादांच्या हस्तलिखिताचा नमुना शोधता शोधता हे लेखन माझ्या हाती आले. ते पाहून आईने ते ती प्रथम पहात होती असे ती म्हणाल्याचे आठवते. असो.

चित्रगुप्त's picture

12 Nov 2016 - 6:52 am | चित्रगुप्त

ऑटोरायटिंग मधून माझ्या वडिलांशी झालेला संपर्क सादर करताना कै दादांच्या हस्तलिखिताचा नमुना शोधता शोधता

???????? हे काय आहे ? यावर मिपावर लिहीले आहे का? वाचायला आवडेल.

उगा काहितरीच's picture

8 Jul 2015 - 10:47 pm | उगा काहितरीच

बोल्ड का लिहीले ?

शशिकांत ओक's picture

9 Jul 2015 - 12:10 am | शशिकांत ओक

काहीतरीच काय¿
कदाचित वाचकांच्या मनावर ठसावे असा उद्देश असेल.

शशिकांत ओक's picture

12 Nov 2016 - 11:33 am | शशिकांत ओक

नमस्कार, चित्रगुप्त...
भरीला कसे घालावे ते आपल्याकडून शिकावे...!
इच्छुकांनी माझ्या At A Glance Shashikant Oak. shashioak.weebly.com मध्ये ऑटो रायटिंग ब्लॉगवर अधिक माहिती घ्यावी ही विनंती.