बॉडीलाईन - २

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
5 Jul 2015 - 7:24 am

बॉडीलाईन - १

एम सी सी चा संघ ऑस्ट्रेलियात दाखल होताच डग्लस जार्डीनच्या स्वभावाची चुणूक पुन्हा ऑस्ट्रेलियन पत्रकारांना अनुभवण्यास मिळाली. टेस्ट मॅचेस सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक संघांविरुद्ध एम सी सी चा संघ काही सामने खेळणार होता. या सामन्यांपूर्वी पत्रकारांना संघातील खेळाडूंची कोणतीही माहिती देण्यास जार्डीनने ठाम नकार दिला! त्याच्या जोडीला नेहमीच्या पत्रकार परिषदांमध्येही अनेकदा ऑस्ट्रेलियन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास त्याने नकार दिला! जार्डीनच्या या वागणुकीमुळे आणि त्याच्या पूर्वेतिहासामुळे पत्रकारांनी पुन्हा त्याच्यावर टीकेची झोड उठवली नसती तरच नवल! वृत्तपत्रांत आलेल्या या उलट-सुलट लेखनानंतर कोणीतरी जार्डीनला म्हणालं,

"Mr. Jardin, If you answer their questions, you can make few friends!"

"I am not traveled 6000 miles to make friends! I am here to win Ashes!" जार्डीनने त्याला सुनावलं!

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी पूर्वीच्या दौर्‍याप्रमाणे पहिल्या मॅचपासूनच जार्डीनची हुर्यो उडवण्यास सुरवात केली होतीच! जार्डीनने पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्येच ९८ आणि १२७ रन्स काढत दौर्‍याची सुरवात तर मोठी जोरदार केली. परंतु फिल्डींग करताना मात्रं फास्ट बॉलर बिल बोसबरोबर त्याचा जोरदार वाद झाला. बोसला हवी असलेली फिल्डींग देण्यास जार्डीनने साफ नकार दिला. त्याला उत्तर म्हणून बोसने काही काळ मुद्दाम वाईट बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला होता! अर्थात नंतर बोसने जार्डीनच्या योजनेप्रमाणे बॉलिंग करण्यास सुरवात केली! जार्डीनने ऑस्ट्रेलियन बॉलर चक फ्लेटवूड-स्मिथच्या बॉलिंगवर हल्ला चढवण्याची हॅमंड आणि सटक्लीफला सूचना केली होती. फ्लेटवूड-स्मिथ धोकादायक बॉलर ठरू शकत असल्याने त्याची टेस्टमध्ये निवड होऊ नये हा जार्डीनचा हेतू होता!

आतापर्यंतच्या चार मॅचेसमध्ये इंग्लिश बॉलर्सनी शॉर्टपीच बॉलिंगचा वापर केला असला तरी लेग थिअरीसाठी आवश्यक असलेली 'लेग ट्रॅप' फिल्डींग मात्रं लावलेली नव्हती.

इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये मात्रं पहिल्याच मॅचपासून चांगलीच बोलाचाली झाली होती. पर्थच्या मैदानावर मॅचच्या दरम्यान व्होसने व्हिक्टर रिचर्डसनला सुनावलं,

We're not a bad side ... and if we don't beat you, we'll knock your bloody blocks off."

१८ नोव्हेंबर १९३२...

'ऑस्ट्रेलियन ११' संघाविरुद्ध एम सी सी ची मेलबर्न इथे मॅच सुरु होणार होती. पहिल्या टेस्टच्या आधीची ही शेवटची प्रॅक्टीस मॅच असल्याने दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वपूर्ण होती. एका अर्थाने टेस्ट मॅचपूर्वीची रिहर्सलच होती जणू! ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बिल वूडफूल टॉससाठी वाट पाहत होता. जार्डीन टॉससाठी येईल अशी वूडफूलची वास्तविक अपेक्षा होती, परंतु टॉससाठी आला तो जार्डीनचा व्हाईस कॅप्टन बॉब वॅट! चकीत झालेल्या वूडफूलने जार्डीनची चौकशी केली तेव्हा वॅट उत्तरला,

"Mr. Jardin will not be playing in this match! I will be leading the side!"

जार्डीनने या महत्वाच्या मॅचमध्ये विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता!

लारवूड, व्होस आणि बिल बोस या तिघांना फास्ट लेग थिअरीचा मुक्त वापर करण्याची बॉब वॅटने सूचना दिली! त्यासाठी आवश्यक असणारी लेग ट्रॅप फिल्डींगही लावण्यात आली! शॉर्टपीच बॉलिंगचा इतका बेफाम मारा होऊनही ही मॅच अखेर ड्रॉ आली असली तरी त्याचा सामना करताना ऑस्ट्रेलियन बॅट्समनची उडालेली धांदल पाहून जार्डीन भलताच खूष झाला होता! वूडफूलने पहिल्या इनिंग्जमध्ये टेनिसमध्ये मारतात तसे स्मॅशचे फटके मारत आणि बॉलच्या मार्गातून बाजूला होत आणि प्रसंगी उडी मारत १८ रन्स काढल्या, परंतु दुसर्‍या इनिंग्जमध्ये तो शून्यावर बाद झाला! ब्रॅडमनही साफ अपयशी ठरला होता आणि पॉन्सफॉर्डही! ब्रॅडमनला दोन्ही इनिंग्जमध्ये लारवूडने बाद केलं होतं! वूडफूल आणि पॉन्सफॉर्ड दोघांनाही व्होसच्या शॉर्ट्पीच चेंडूचा प्रसाद मिळाला होता!

ब्रॅडमन त्यावेळी बिकट परिस्थितीतून जात होता. अ‍ॅशेस मालिकेपूर्वी ब्रॅडमनने उत्तर अमेरीकेचा दौरा केला होता. या दौर्‍याच्या दरम्यान तो आजारी पडला होता. अद्यापही त्यातून तो पूर्णपणे बरा झालेला नव्हता. त्यातच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाशीही त्याचा वाद सुरु होता. ब्रॅडमनने सिडनी सन या वृत्तपत्राशी क्रिकेटविषयक लेखमालिका लिहीण्यासाठी दोन वर्षांचं काँट्रॅक्ट केलं होतं, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याला यासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता! ब्रॅडमनने टेस्ट मॅचेसमधून माघार घेण्याची धमकी देऊनही क्रिकेट बोर्ड बधलं नाही! अखेर सिडनी सन वृत्तपत्राने ब्रॅडमनला करारातून मोकळं केलं! मात्रं मूळचा पत्रकार असलेल्या जॅक फिंगल्टनला क्रिकेटविषयक लिखाण करण्याची मात्रं बोर्डाने अनुमती दिली होती! त्यामुळे तर ब्रॅडमन अधिकच नाराज झाला होता! ब्रॅडमन आणि फिंगल्टन या दोघांचंही एकमेकाविषयीचं मत कलुषित होतं. या प्रकरणामुळे त्यात भरच पडली होती!

ऑस्ट्रेलियन ११ च्या एम सी सी विरुद्धच्या मॅचनंतर ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियन बोर्डाला पत्रं लिहून जार्डीनच्या फास्ट लेग थिअरी विषयी चिंता व्यक्तं केली होती. 'हा प्रकार सुरु राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही!' ब्रॅडमनने आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं!

आपल्या सहकार्‍यांशी बॉडीलाईनबद्दल बोलताना ब्रॅडमन म्हणाला,

"You fellas have no idea what sort of summer this is going to be."

ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर्स आणि पत्रकारांनी जार्डीनच्या फास्ट लेग थिअरी बॉलिंगवर आणि त्याला अनुरूप फिल्डींगवर टीकेची झोड उठवली. ऑस्ट्रेलियात लेग थिअरी पूर्वी वापरण्यात आलेली असली तरी शॉर्टपीच बॉलिंगचा इतका सढळ वापर आणि त्याला अनुरुप फिल्डींग यापूर्वी कधीही वापरण्यात आलेली नव्हती! हा प्रकार खिलाडू वृत्तीला धरुन नाही आणि फास्ट लेग थिअरी बॉलिंग ही अत्यंत धोकादायक आणि जीवघेणी आहे असं सामान्य ऑस्ट्रेलियन प्रेक्षक आणि पत्रकारांचं मत होतं!

जार्डीनला मात्रं आपल्या फास्ट लेग थिअरीच्या यशाबद्दल पक्की खात्री पटली होती! पर्सी फेंडरला ऑस्ट्रेलियातून लिहीलेल्या पत्रात तो म्हणतो,

"ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या टेक्नीकविषयी आपण केलेला अंदाज अचूक ठरला आहे! फास्ट लेग थिअरीचा मुकाबला करण्यात आतापर्यंत ते साफ अपयशी ठरले आहेत! पुढील मॅचेसमध्ये हे असंच सुरू राहिलं तर सगळेच्या सगळे फिल्डर्स लेग साईडला लावण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही! (If this goes on I shall have to move the whole bloody lot to the leg side)!"

एम सी सी चा टूर मॅनेजर आणि भूतपूर्व कॅप्टन पेलहॅम 'प्लम' वॉर्नर यालाही जार्डीनचे हे डावपेच मंजूर नव्हते. अर्थात जार्डीनने वॉर्नरच्या या मताला अजिबात महत्वं दिलं नाही! अर्थात त्या काळात मॅनेजरची भूमिका मर्यादीत स्वरुपाचीच होती आणि जार्डीनला अटकाव करणं वॉर्नर आणि त्याचा सहकारी रिचर्ड पेलरेट यांना शक्यं नव्हतं!

इंग्लंडमध्ये त्या काळी क्रिकेटपटूंची हौशी आणि व्यावसायिक (अमॅच्युअर आणि प्रोफेशनल्स) अशी वर्गवारी होती. हौशी क्रिकेटपटूंच्या उदरनिर्वाहाचं साधन हे वेगळं होतं तर व्यावसायिक क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट हेच चरितार्थाचं साधन होतं. एम सी सी च्या संघातही अनेकांचा जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीला विरोध होता. फास्ट बॉलर गबी अ‍ॅलनने जार्डीनची तक्रार करणारी अनेक पत्रं एम सी सी च्या पदाधिकार्‍यांना लिहीली होती. हौशी क्रिकेटपटूंपैकी अ‍ॅलन, फ्रेडी ब्राऊन, नवाब ऑफ पतोडी सिनियर आणि बॉब वॅट यांचा फास्ट लेग थिअरीला विरोध होता. वॅटने केवळ जार्डीनच्या सूचनेवरुन लारवूड आणि व्होसला बॉडीलाईन बॉलिंग टाकण्यास प्रवृत्त केलं होतं. व्यावसायिक खेळाडूंपैकी वॉली हॅमंड आणि लेस अ‍ॅमेस यांचाही फास्ट लेग थिअरीला विरोध होता. मात्रं संघातील हे विरुद्ध मतप्रवाह षटकर्णी होणार नाहीत याची जार्डीनने आणि इतरांनीही पुरेपूर काळजी घेतली होती!

ब्रॅडमन अपयशी ठरल्याने इंग्लिश गोटात आनंदाचं वातावरण होतं! आतापर्यंतच्या तीन मॅचेसमधल्या सहा इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने १७ च्या अ‍ॅव्हरेजने केवळ १०३ रन्स काढल्या होत्या.

२ डिसेंबर १९३२..

सिडनीच्या मैदानावर पहिल्या टेस्टला सुरवात झाली तेव्हा वातावरण कमालीचं तापलेलं होतं! ब्रॅडमनने प्रकृतीच्या कारणास्तव या टेस्टमधून माघार घेतली होती. अर्थात ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या या बातमीवर विश्वास ठेवण्यास जार्डीनने साफ नकार दिला! आपल्या फास्ट लेग थिअरीच्या डावपेचाचा मुकाबला करण्याची ब्रॅडमनमध्ये हिम्मत नसल्याची त्याची पक्की खात्री झाली होती! आपल्या या डावपेचांमुळे ब्रॅडमनचं नर्व्हस ब्रेकडाऊन झाल्याने त्याने टेस्टमधून माघार घेतल्याचं त्याने बिनदिक्कतपणे जाहीर करुन टाकलं!

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकल्यावर वूडफूलने बॅटींगचा निर्णय घेतला! परंतु हा निर्णय ऑस्ट्रेलियाला महागात पडणार अशी चिन्हं दिसू लागली होती! वूडफूलला सुरवातीलाच व्होसने विकेटकीपर लेस अ‍ॅमेस कडे कॅच देण्यास भाग पाडलं. पॉन्सफॉर्ड आणि जॅक फिंगल्टन यांनी ऑस्ट्रेलियाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु लारवूडने पॉन्सफॉर्ड आणि फिंगल्टनला बाद करुन ऑस्ट्रेलियाची अवस्था ८२/३ अशी केली. फिंगल्टनचा गबी अ‍ॅलनने कॅच घेतल्यावर खेळायला आला मॅकेब. तो जेमतेम सेटल होण्यापूर्वीच अ‍ॅलन किपॅक्सला एल बी डब्ल्यू करुन लारवूडने ऑस्ट्रेलियाची हालत आणखीनच बिकट करुन टाकली. ८७/४!

ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्याच्या हेतूने जार्डीनने लेग ट्रॅप लावून लारवूड आणि व्होस यांना फास्ट लेग थिअरी वापरण्याची सूचना केली. लारवूड आणि व्होस दोघांनीही मॅकेब-रिचर्डसन जोडीवर जोरदार हल्ला चढवला. परंतु..

स्टॅन मॅकेब हे काय प्रकरण आहे याची तोपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती!

लारवूडचा पहिलाच बॉल मॅकेबने अगदी सहजपणे हूक केला होता. लेग साईडला बॅट्समनजवळ असलेले आणि कॅच घेण्यास आतूर झालेले पाच आणि बाऊंड्रीवर असलेले दोन अशा सात फिल्डर्सची यत्किंचीत तमा न बाळगता लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगवर मॅकेबने तितकाच प्रखर प्रतिहल्ला चढवला! लेग स्टंपवरील प्रत्येक शॉर्टपीच बॉल चेहर्‍यासमोरुन पूल किंवा हूक करण्याचा आणि ऑफस्टंपवर आल्यास कट मारण्याचा त्याने सपाटा लावला होता! त्याचा जोडीदार व्हिक्टर रिचर्डसन एका बाजूने ठामपणे लारवूड आणि व्होसचा मुकाबला करत होता, परंतु मॅकेबसारखा प्रतिहल्ला चढवणं मात्रं त्याला जमत नव्हतं!

मॅकेबचे आई-वडील प्रेक्षकांमध्ये हजर होते. बॉल लागून आपण कोसळल्यास धावत मैदानात न येण्याची मॅकेबने त्यांना सूचना दिली होती! पूल किंवा हूक मारताना एकदा जरी बॉल मिस झाल्यास मॅकेबच्या डोक्यावर बसून तो कोसळला असता, परंतु मॅकेबला कशाचीच पर्वा नव्हती! लारवूड आणि व्होसचा प्रत्येक बॉडीलाईन बॉल फटकावणं एवढी एकच गोष्टं त्याच्या डोक्यात घोळत असावी! आपल्या इतर सहकार्‍यांना अनेकदा बॉल लागून झालेल्या वेदनांनंतरही मॅकेबच्या मनाला भितीचा स्पर्शही झालेला नव्हता!

मॅकेबच्या या प्रतिहल्ल्याचा जार्डीनवर अपेक्षीत परिणाम दिसून आला. त्याने बॉडीलाईन बॉलिंग बंद करण्याची लारवूडला सूचना केली आणि त्याच्याजागी गबी अ‍ॅलनला आणलं. अ‍ॅलन लारवूडप्रमाणेच अमॅच्युअर (हौशी) खेळाडू होता. जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीला त्याचा विरोध होता. आपली नाराजी त्याने अनेकदा स्पष्टपणे व्यक्तं केली होती. फास्ट लेग थिअरीचा वापर करण्यास त्याने साफ नकार दिला! निरुपायाने जार्डीनला हॅडली व्हॅरेटी आणि वॉली हॅमंडच्या स्पिनचा आधार घ्यावा लागला! मॅकेब आणि रिचर्डसनच्या १२९ रन्सच्या पार्टनरशीपनंतर अखेर व्होसने रिचर्डसनला हॅमंडकरवी कॅच आऊट केलं. विकेटकीपर बर्ट ओल्डफिल्ड लवकर बाद झाल्यावर मॅकेबने क्लॅरी ग्रिमेटच्या साथीने दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाला २९०/६ अशा सुस्थितीत आणलं होतं. मॅकेब-ग्रिमेट यांची ५७ रन्सची पार्टनरशीप झालेली होती, त्यात ग्रिमेटच्या रन्स होत्या १७!

स्टॅन मॅकेब १२७ रन्स काढून नाबाद होता!

ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून इंग्लिश खेळाडू आणि पत्रकारांनी जार्डीनच्या या नविन डावपेचांचा उल्लेख फास्ट लेग थिअरी असाच करण्याचं धोरण अवलंबलं होतं. बॉडीलाईन हा शब्द वापरात आणला तो ऑस्ट्रेलियन पत्रकार ह्यू बगी याने! बगी सन वृत्तपत्रात काम करत होता आणि जॅक फिंगल्टनचा सहकारी होता! पहिल्या दिवसाचा रिपोर्ट आपल्या संपादकाला तारेने पाठवताना बगीने वर्णन केलं,

....in the line of body

आपला रिपोर्ट तारेने पाठवताना कमी पैशात तार पाठवण्यासाठी बगीने in the line of body याच्याऐवजी शब्द वापरला तो म्हणजे,

Bodyline !!

ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी हा शब्द लगेच उचलून धरला!

दुसर्‍या दिवशी ग्रिमेट, लेस्ली नॅगेल आणि बिल ओ रेली बाद झाले तेव्हा ऑस्ट्रेलिया जेमतेम ३०५ पर्यंत पोहोचली होती. मॅकेबच्या जोडीला आता आला तो शेवटचा बॅट्समन फास्ट बॉलर टिम वॉल! वॉल खेळायला आल्याबरोबर मॅकेबने अधिकच तीव्रतेने लारवूड आणि कंपनीवर हल्ला चढवला! मॅकेब - वॉल यांची शेवटच्या अर्ध्या तासात ५५ रन्सची पार्टनरशीप झाली. त्यात वॉलच्या ४ रन्स होत्या! अखेरीस हॅमंडच्या बॉलिंगवर गबी अ‍ॅलनने वॉलचा कॅच घेतला आणि ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज ३६० वर संपुष्टात आली!

स्टॅन मॅकेब १८७ रन्स काढून नाबाद होता!
अवघ्या चार तासात २३२ बॉल्सचा सामना करत २५ चौकारांच्या सहाय्याने!

मॅकेबच्या या तुफानी खेळीने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं नसतं तरच नवल! विशेषतः ब्रॅडमनच्या अनुपस्थितीत आणि जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीचा समर्थपणे मुकाबला करत मॅकेबने या रन्स झोडपून काढल्यामुळे ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि कॉमेंटेटर्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

अंपायर जॉर्ज हेल म्हणतो,

"मॅकेब आणि रिचर्डसननी इंग्लिश बोलर्सनी चढवलेल्या फास्ट लेग थिअरीच्या हल्ल्याचा अतिशय समर्थपणे मुकाबला केला होता! या इनिंग्जनंतर स्टॅनला एक अत्यंत उत्कृष्ट बॅट्समन म्हणून निर्विवाद पावती मिळाली. लारवूड आणि व्होसच्या बॉडीलाईन चेंडूच्या मार्गातून बाजूला न हटता त्याने ज्या पद्धतीने त्यांना फटकावून काढलं ते केवळ अविश्वसनीय होतं. हूक, पूल आणि मनाला येईल त्याप्रमाणे आणि त्या दिशेने तो बॉल मारत होता! जितक्या वेगाने बॉल टाकला जात होता तितकी त्याला मजा येत असावी असा माझा अंदाज आहे!"

खुद्द लारवूडने मॅकेबची मुक्त कंठाने प्रशंसा केली. द लारवूड स्टोरी या आपल्या आत्मचरित्रात मॅकेबच्या या इनिंग्जचं वर्णन करताना तो म्हणतो,

"सिडनी टेस्टमध्ये मॅकेब आणि रिचर्डसनने फास्ट लेग थिअरी कशी खेळावी याचा वस्तुपाठच घालून दिला होता! विशेषतः ज्या पद्धतीने आणि बेडरपणे मॅकेबने आमच्यावर प्रतिहल्ला चढवला त्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती! मॅकेबची ही इनिंग्ज पूर्णपणे निर्दोष होती. एकदाही, चुकूनही त्याने कॅच दिला नाही! अशी इनिंग्ज खेळणं ब्रॅडमनलाही कधीही जमणार नाही!"

स्वतः मॅकेबची प्रतिक्रीया काय होती?

"पुन्हा कधीही अशी इनिंग्ज मी खेळू शकणार नाही!" ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर मॅकेब आपल्या सहकार्‍यांना म्हणाला, "इतक्या सातत्याने बॉल हूक आणि पूल करत राहणं, आणि ते देखील एकदाही कॅच न देता हे निव्वळ अशक्यं आहे! ती इनिंग्ज हा एक वेडगळपणाचा जुगार होता! केवळ नशिबाचा भाग म्हणून मी यात यशस्वी झालो इतकंच!"

"It was really an impulsive, senseless innings, a gamble that should not have been made but came off against all the odds!"

ऑस्ट्रेलियाच्या ३६० रन्सला उत्तर देताना बर्ट सटक्लीफ आणि बॉब वॅट यांनी इंग्लंडला ११२ रन्सची दमदार सलामी करुन दिली. वॅट बाद झाल्यावर सटक्लीफची जोडी जमली ती हॅमंडशी. सटक्लीफ-हॅमंड यांनी कोणताही धोका न पत्करता १८८ रन्स जोडल्यावर हॅमंड (११२) बाद झाला. सटक्लीफ एका बाजूने अगदी आरामात खेळत होता. हॅमंडनंतर आलेल्या नवाब पतौडीबरोबर सटक्लीफने १२३ रन्स जोडल्यावर टिम वॉलने त्याला एल बी डब्ल्यू केलं. सटक्लीफचं द्विशतक अवघ्या ६ रन्सनी हुकलं. पुढच्याच बॉलवर वॉलने लेलँडला ओल्डफिल्डकडे कॅच देण्यास भाग पाडलं! वॉल हॅटट्रीकवर असताना नेमकं समोर कोण यावं?

डग्लस जार्डीन!

जार्डीनने वॉलची हॅटट्रीक हुकवली परंतु तो २७ पर्यंतच मजल मारू शकला. ओल्डफिल्डने मॅकेबच्या बॉलिंगवर त्याचा कॅच घेतला. पाठोपाठ हॅडली व्हॅरेटीही लवकर बाद झाल्यावर पतौडीने गबी अ‍ॅलनच्या साथीने ऑस्ट्रेलियाला ५०० चा टप्पा ओलांडून दिला. आपल्या पहिल्याच टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमध्ये पतौडीने शतक झ़ळकावलं!

पतौडी बॅटींग करताना त्याची आणि रिचर्डसनची बोलाचाली झाली होती. पतौडीच्या कमालीच्या रटाळ बॅटींगला वैतागलेल्या रिचर्ड्सनने त्याला विचारलं,

"Why are you batting so much paifully slow?"

"I am waiting for the pace of the wicket to change" पतौडी शांतपणे म्हणाला!

"Good God, it's changed three times while you've been in!" रिचर्डसनने सुनावलं!

अर्थात पतौडीवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही! १०२ रन्स करण्यासाठी साडेपाच तासात त्याने ३८० चेंडू खर्ची घातले!

अ‍ॅलन बाद झाल्यावर इंग्लंडची घसरगुंडी उडाली. सर्वात शेवटी १०२ वर पतौडी बाद झाला तेव्हा इंग्लंडने ५२४ पर्यंत मजल मारलेली होती. १६४ रन्सचा त्यांना लीड मिळाला होता!

ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये फिंगल्टन (४०) आणि मॅकेब (३२) यांचा अपवाद वगळता कोणालाच फारसं काही करता आलं नाही. तळाच्या नॅगेल (नाबाद २१) आणि वॉल (२०) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने इनिंग्जने पराभव टाळला इतकंच! लारवूड आणि कंपनीने १६४ रन्समध्येच ऑस्ट्रेलियाचा खात्मा केला!

विजयासाठी आवश्यक असलेली अवघी एक रन सटक्लीफने पहिल्याच बॉलवर काढली!

जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीचा यशस्वी वापर करता येऊ शकतो हे लारवूडने सप्रमाण सिद्ध केलं! दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून त्याने एकूण १० विकेट्स घेतल्या! ६ विकेट्स घेत व्होसने लारवूडला उत्तम साथ दिली होती! इंग्लंडने पहिल्या टेस्टमध्ये १० विकेट्सनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता!

अर्थात कॅप्टन म्हणून जार्डीन यशस्वी ठरला असला तरी आपल्या सहकार्‍यांशी त्याचे जोरदार खटके उडाले होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये गबी अ‍ॅलनचा जार्डीनशी दोनदा जोरदार वाद झाला होता! लेग ट्रॅपमध्ये फिल्डींग करण्यास अ‍ॅलनची तयारी होती, परंतु स्वतः बॉडीलाईन बॉलिंग करण्याची जार्डीनची सूचना मात्रं त्याने धुडकावून लावली! नवाब पतौडीने तर लेग ट्रॅपमध्ये फिल्डींग करण्यासही ठाम नकार दिला!

"महाराजांनी जाणूनबुजून नकार दिलेला दिसतो आहे (I see His Highness is a conscientious objector)!" जार्डीन खोचकपणे उद्गारला!

(Conscientious objector ही संज्ञा मुख्यतः व्यक्तीस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य किंवा धार्मिक श्रद्धांनुसार सैन्यात ऑर्डर पाळण्यास नकार देण्याचा आपल्याला अधिकार आहे असा दावा करणार्‍या व्यक्तीच्या बाबतीत वापरली जाते!)

सिडनीतील दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी जार्डीनच्या फास्ट लेग थिअरीवर सडकून टीका केली होती. जार्डीनने त्याची यत्किंचीतही पर्वा केली नाही. फास्ट लेग थिअरीचे आपले डावपेच यशस्वी होत असलेले दिसत असताना जार्डीन त्याचा त्याग करण्याची सुतराम शक्यता नव्हती! लेग थिअरी बॉलिंगचा सामना करता येणं शक्यं आहे असं जार्डीनचं ठाम मत होतं.

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना आणि पत्रकारांना जार्डीनच्या या डावपेचांचा मुकाबला करण्यासाठी आशेचा एकमेव किरण दिसत होता..

डॉन ब्रॅडमन!

दुसर्‍या टेस्टमध्ये ब्रॅडमनचा समावेश करण्यात यावा म्हणून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी आणि पत्रकारांनीही मागणी केली. ब्रॅडमन हा एकच बॅट्समन आहे जो याचा सामना करु शकतो असं सगळ्यांचं ठाम मत होतं! वास्तविक बॉडीलाईन बॉलिंग झोडपून काढता येऊ शकते हे स्टॅन मॅकेबने सिडनीत सिद्ध करुन दाखवलं होतं, परंतु ब्रॅडमनच्या तुलनेत मॅकेब तेव्हा काहीसा नवखाच असल्याने आणि ब्रॅडमनवर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची अपार श्रद्धा असल्याने मॅकेबच्या इनिंग्जकडे काहीसं दुर्लक्षंच झालं!

ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी वूडफूलनेही बॉडीलाईन बॉलिंगला प्रत्युत्तर द्यावं अशी जोरदार मागणी केली! ऑस्ट्रेलियन संघात क्वीन्सलँडच्या एडी गिल्बर्ट या आदिवासी आणि तुफान वेगाने बॉलिंग करणार्‍या खेळाडूची निवड करण्याची त्यांनी जोरदार मागणी केली. क्वीन्सलँडविरुद्धच्या मॅचमध्ये गिल्बर्टचा सामना करताना जार्डीनने त्याच्या वेगाचा प्रसाद 'चाखला' होता! जार्डीनच्या छातीवर एखाद्या बशीच्या आकाराचा अत्यंत वेदनादायक डाग उमटला होता! आणखीन एक पर्याय म्हणून लॉरी नॅश या अत्यंत आक्रमक स्वभावाच्या बॉलरची निवड करण्याचीही सूचना पुढे आली.

व्हाईस कॅप्टन व्हिक्टर रिचर्डसनसह वूडफूलच्या अनेक सहकार्‍यांचा पत्रकारांच्या या मागणीला पाठिंबा होता. ठोशास ठोसा या न्यायाने ऑस्ट्रेलियानेही बॉडीलाईन बॉलिंग करावी असं रिचर्ड्सनचं स्पष्टं मत होतं.

परंतु बिल वूडफूल कशालाही बधला नाही!

"क्रिकेटला लाजिरवाण्या अशा कोणत्याही डावपेचाचा वापर करण्यास कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मी भरीला पडणार नाही!" वूडफूलने रिचर्डसनला ठणकावलं, "टिम बॉडीलाईन बॉलिंग करु शकतो याची मला कल्पना आहे, परंतु अशा कोणत्याही प्रकारात मी सहभागी होणार नाही! (There is no way I will be influenced to adopt such tactics which bring such discredit to the game. I know Tim could do it but I am not going to participate in actions that can only hurt the game.)"

३० डिसेंबर १९३२..

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड!

बिल वूडफूलने सलग दुसर्‍यांदा टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघात ३ बदल करण्यात आले होते. वूडफूलचा सलामीचा जोडीदार बिल पॉन्सफॉर्डला वगळून त्याच्या जागी लिओ ओब्रायनची वर्णी लावण्यात आली होती. फास्ट बॉलर लेस्ली नॅगेलच्या जागी बर्ट आयर्नमाँगर आला होता. मेलबर्नच्या विकेटवर आयर्नमाँगरची फिरकी यशस्वी ठरेल अशी अपेक्षा होती! सर्वात जास्तं चर्चा होती ती म्हणजे तिसर्‍या बदलाची!

अ‍ॅलन किपॅक्सच्या जागी डॉन ब्रॅडमन परतला होता!

इंग्लंड संघात एकच बदल करण्यात आला होता तो म्हणजे डावखुर्‍या स्पिनर हॅडली व्हॅरेटीच्या जागी फास्ट बॉलर बिल बोसची निवड करण्यात आली होती!

पॉन्सफॉर्डला ड्रॉप करण्यात आल्यामुळे वूडफूलच्या जोडीला जॅक फिंगल्टन सलामीला आला. वूडफूल-फिंगल्टन यांनी २९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर गबी अ‍ॅलनने वूडफूलला बोल्ड करुन ही जोडी फोडली. फिंगल्टन आणि लिओ ओब्रायन हे गबी अ‍ॅलनला तुलनेने आरामात खेळत असल्याचं पाहून जार्डीनने आपलं हुकूमी अस्त्रं बाहेर काढलं..

फास्ट लेग थिअरी! बॉडीलाईन!

आर्थर मेली हा निवृत्त ऑस्ट्रेलियन लेगस्पीनर प्रेक्षकांत हजर होता. जार्डीनने केवळ मानेने खूण करताच इंग्लिश खेळाडू एकेक करुन लेग ट्रॅपमध्ये पोहोचले. मेली म्हणतो,

"Just with a nod of the head Jardine signalled his men, and they came across to the leg side like a swarm of hungry sharks."

जार्डीनने बॉडीलाईन फिल्डींग लावताच प्रेक्षकांनी इंग्लिश खेळाडूंची हुर्यो उडवण्यास सुरवात केली. स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर फिल्डींग करणार्‍या बॉव वॅटकडे पाहून प्रेक्षकांपैकी अनेक जण उद्गारले,

"Wait till our Don comes in"

फिंगल्टन आणि ओब्रायनचा रन काढण्यावरुन गोंधळ उडाल्याने अखेर ओब्रायन रनआऊट झाला! ऑस्ट्रेलिया ६७/२!

ऑस्ट्रेलियन प्रेक्षक आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर येऊन ठेपला होता!
डॉन ब्रॅडमन बॅटींगला आला होता!
ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या अपेक्षांचं मणामणाचं ओझं त्याच्या खांद्यावर होतं!
ब्रॅडमन खेळायला येत असताना प्रेक्षकांनी केलेल्या जल्लोषामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला!

ब्रॅडमन खेळायला आला होता तो मनात काही आडाखे बांधून!

आतापर्यंतचा इतिहास पाहता आपल्याला पडणारा पहिलाच चेंडू हा बंपर असणार याची ब्रॅडमनला पक्की खात्री होती! त्यामुळे ऑफसाईडला जाऊन लेग ट्रॅपवरुन बंपर फाईनलेगच्या दिशेने हूक करण्याचा त्याचा विचार होता!

ब्रॅडमनच्या अपेक्षेप्रमाणेच बिल बोसने पहिला बॉल शॉर्टपीच टाकला, परंतु तो अपेक्षेइतका उसळलाच नाही!
हूक मारण्याच्या पवित्र्यात असलेल्या ब्रॅडमनच्या बॅटची कड घेऊन बॉल गेला तो थेट स्टंपवर!

ब्रॅडमनच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये तो पहिल्या बॉलवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती!

मेलबर्नच्या मैदानात हजर असलेल्या ६३९९३ प्रेक्षकांमध्ये टाचणी पडली तरी आवाज होईल असा सन्नाटा पसरला होता!

काय घडलं आहे हे लक्षात येताच सर्वात पहिली प्रतिक्रीया उमटली ती डग्लस जार्डीनची!

इतर वेळी मैदानावर अतिशय शांतपणे वावरणार्‍या आणि कोणत्याही भावनांचं प्रदर्शन न करणार्‍या जार्डीनने दोन्ही हात वर करुन आनंद व्यक्तं केला आणि 'वॉर डान्स' करण्यास सुरवात केली!

जार्डीनने बिल बोसचं अभिनंदन केल्यावर बोस उद्गारला,

"Well I'll be fooked."

बिल बोसचं अभिनंदन करुन स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरील आपल्या जागी परतल्यावर बॉव वॅटने प्रेक्षकांकडे वळून प्रश्न केला,

"When's your Don coming in?"

वॅटच्या या मार्मिक प्रश्नाला त्यावेळीतरी कोणाकडेही उत्तर नव्हतं!
अद्याप प्रेक्षक ब्रॅडमन बाद झाल्याच्या धक्क्यातून सावरलेलेच नसावेत!

ब्रॅडमन बाद झाल्यावरही जॅक फिंगल्टन जास्तीच एकाग्रपणे खेळू लागला. ब्रॅडमननंतर आलेल्या स्टॅन मॅकेबसह (३२) त्याने ६४ रन्स जोडल्या. ८३ रन्स काढून फिंगल्टन बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया १५६/६ अशा अवस्थेत होती. रिचर्डसन (३४), ओल्डफिल्ड (२७) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने अखेर २२८ पर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियाच्या २२८ रन्सच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंड जेमतेम १६९ पर्यंत मजल मारू शकले! सटक्लीफ (५२), लेलँड (२२) आणि अ‍ॅलन (३०) यांचा अपवाद वगळता कोणालाही बिल ओ रेलीच्या लेगस्पीनला तोंड देता आलं नाही! त्याने ५ तर टिम वॉलने ४ विकेट्स उडवल्या. नॅगेलच्या जागी निवडण्यात आलेल्या बर्ट आयर्नमाँगरला मात्रं एकही विकेट मिळाली नाही! अवघ्या २२८ रन्स करुनही ऑस्ट्रेलियाने ५९ चा लीड घेतला!

दुसर्‍या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरवात अगदीच अडखळत झाली. फिंगल्टन अवघी १ रन काढून बाद झाला. ओब्रायनला लारवूडने ११ रन्सवर बोल्ड केल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था २७/२ अशी झालेली असताना ब्रॅडमन मैदानात उतरला!

जार्डीनने अपेक्षेप्रमाणेच बॉडीलाईन फिल्डींग लावली! परंतु..

ब्रॅडमनने याचा मुकाबला करण्याची मानसिक तयारी केलेली होती!

लेगसाईडला सात फिल्डर्स लावल्यावर ऑफला गेलेल्या प्रत्येक बॉलवर रन्स मिळतील हे चाणाक्ष ब्रॅडमनने अचूक ओळखलं होतं! शॉर्टपीच बॉलवर लेगस्टंपच्या बाहेर जाऊन ऑफला कट करण्याचं धोरण त्याने अवलंबलं! ब्रॅडमनचा हा पवित्रा चांगलाच यशस्वी ठरला! परंतु वूडफूल (२६) आणि रिचर्डसन (३२) यांचा अपवाद वगळता ब्रॅडमनला साथ देण्यास कोणीच उभं राहू शकलं नाही!

ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज १९१ वर संपली, परंतु त्यात ब्रॅडमनच्या १०३ रन्सचा समावेश होता!

बॉडीलाईनचा यशस्वी मुकाबला करत ब्रॅडमनने शतक ठोकलं होतं!

त्याचं शतक पूर्ण झाल्यावर मेलबर्नच्या मैदानात हजर असलेल्या यच्चयावत प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून टाकलं होतं!

विजयासाठी २५१ रन्सचं लक्ष्यं घेऊन खेळणार्‍या इंग्लंडला सटक्लीफ आणि लेलँड यांनी ५३ रन्सची सलामी दिली. लेलँडला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी जार्डीनने त्याला सटक्लीफबरोबर सलामीला पाठवलं होतं! परंतु बिल ओ रेलीने सटक्लीफला (३३) बोल्ड करुन ही जोडी फोडल्यावर इंग्लंडची घसरगुंडी उडाली! हॅमंड (२३), वॅट (२५) आणि अ‍ॅलन (२३) यांच्याव्यतिरिक्त ओ रेली आणि आयर्नमाँगर यांचा मुकाबला करणं कोणालाच जमलं नाही! बिल ओ रेलीने ५ तर आयर्नमाँगरने ४ विकेट्स घेत इंग्लंडला १३९ मध्ये गुंडाळलं!

इंग्लंडचा १११ रन्सनी पराभव करुन ऑस्ट्रेलियाने सिडनीतील पराभवाचं उट्टं फेडलं आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती!

ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्टं म्हणजे डॉन ब्रॅडमनने बॉडीलाईनचा यशस्वी सामना करत शतक झळकावलं होतं!

मॅकेब आणि मुख्य म्हणेज ब्रॅडमनच्या शतकामुळे सुरवातीला वाटलं होतं तशी बॉडीलाईन बॉलिंग फारशी धोकादायक नाही आणि त्याचा यशस्वी मुकाबला करणं शक्यं आहे अशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची आणि पत्रकारांचीही खात्री पटली होती!

परंतु....

क्रमशः

संदर्भ :-

In Quest of the Ashes - Douglas Jardine
The Larwood Story - Harold Larwood, Kevin Perkins
Wisden Cricket Almanacks - 1930
The M. C. C. team in Australia and New Zealand, 1932-33 - Wisden
Cricket Crisis: Bodyline and Other Lines - Jack Fingleton
The Bodyline Hypocrisy: Conversations with Harold Larwood - Michael Arnold
The Bodyline Controversy - Laurence Le Quesne
The Bradman Years - Jack Pollard
On Top Down Under - Ray Robinson
Bodyline Autopsey - David Frith

बॉडीलाईन - ३

कथालेख

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2015 - 7:52 am | कैलासवासी सोन्याबापु

पतौडीने गबी अ‍ॅलनच्या साथीने ऑस्ट्रेलियाला ५०० चा टप्पा ओलांडून दिला. आपल्या पहिल्याच टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमध्ये पतौडीने शतक झ़ळकावलं!

ईथे आपणांस कदाचित इंग्लंड असे म्हणायचे आहे काय?

स्पार्टाकस's picture

5 Jul 2015 - 7:57 am | स्पार्टाकस

इंग्लंडच!
टायपिंग मिस्टेक!

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 8:40 am | श्रीरंग_जोशी

एकदम रंगतदार वर्णन. क्रिकेटमधल्या ऐतिहासिक मालिकेला चांगला न्याय देत आहात.

पुभाप्र.

चिन्मना's picture

5 Jul 2015 - 11:38 am | चिन्मना

असेच म्हणतो. खर्‍या बॉडीलाईन मालिकेप्रमाणेच ही लेख मालिकाही उत्तरोत्तर रंगतीये.

एक एकटा एकटाच's picture

5 Jul 2015 - 9:55 pm | एक एकटा एकटाच

काय जबरदस्त लिहिलय

मॅकेबच्या बेटिंगच्या वेळच्या वर्णानाच्या वेळेस स्वत: लेग साईटला फ़िल्डिंगला उभे आहोत अ वाटत होत.

पुढिल लिखाणास शुभेच्छा......

मस्त! बॉडीलाईन ही मालिकाही पाहिल्याचं आठवतंय..

सौंदाळा's picture

6 Jul 2015 - 10:35 am | सौंदाळा

जबरदस्त मालिका.
पुभाप्र

चिनार's picture

6 Jul 2015 - 11:48 am | चिनार

जबरदस्त !!!
पुभाप्र

जगप्रवासी's picture

6 Jul 2015 - 5:30 pm | जगप्रवासी

एकदम लाजवाब

आदिजोशी's picture

6 Jul 2015 - 6:14 pm | आदिजोशी

वेलकम बॅक स्पार्टा. दणदणीत पुनरागमन. भले शाब्बास :)

पैसा's picture

6 Jul 2015 - 7:41 pm | पैसा

ही टीव्ही मालिका पाहिली आहे. बर्‍याच ठिकाणी याबद्दल वाचलं आहे. पण पुन्हा वाचताना तोच थरार अनुभवायला मिळाला!

ब़जरबट्टू's picture

7 Jul 2015 - 11:11 am | ब़जरबट्टू

एकदम जबरदस्त मालिका.. मस्त आहे, अजून येऊ द्या !!

sam de'silva's picture

7 Jul 2015 - 11:39 am | sam de'silva

mast