बॉडीलाईन - १

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
4 Jul 2015 - 10:00 am

१९७२ मधली एक संध्याकाळ...

सिडनीच्या एका उपनगरातील रस्त्यावरुन एक म्हातारा नेहमीप्रमाणे रमतगमत फेरी मारण्यास निघाला होता. रस्त्याने जाणारे अनेक लोक त्या म्हातार्‍याकडे पाहून आदराने अभिवादन करत होते. तो म्हाताराही सर्वांच्या अभिवादनाचा हसतमुखाने स्वीकार करत होता. अर्थात हे रोजच होत असल्याने त्यालाही आता त्याची सवयच झालेली होती. ऑस्ट्रेलियन नागरीकांचा मानबिंदूच होता तो!

आपल्या नेहमीच्या रस्त्याने तो जात असतानाच त्याच्याच वयाचा एक दुसरा म्हातारा अनपेक्षितपणे त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला! क्षणभरच दोघांची नजरानजर झाली आणि...

"तू?"

दोघांच्याही तोंडातून एकदमच आश्चर्योद्गार बाहेर पडला!

आपला एकेकाळच्या हाडवैरी आणि कट्टर प्रतिस्पर्ध्याची अशा रितीने गाठ पडेल याची बहुतेक दोघांनाही अपेक्षा नसावी. मनाच्या एका कोपर्‍यात काहीशा विस्मृतीत गेलेल्या आठवणी तत्क्षणी उसळी मारुन वर आल्या! दोघांच्याही नजरेसमोर सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ क्षणार्धात फिरुन गेला असावा! एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी लढवलेले डावपेच, ते प्रत्यक्षात उतरवताना झालेलं द्वंद्वं आणि त्याचे परिणाम...

ते दोघं होते तरी कोण?

एक होता आजही जगातील सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणून ओळखला जाणार डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन!
आणि
दुसरा होता त्याकाळचा आणि कदाचित सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलर हॅरॉल्ड लारवूड!

आणि क्रिकेट इतिहासात कुप्रसिद्ध झालेली ती १९३२-३३ सालची अजरामर मालिका म्हणजेच - बॉडीलाईन!

***********************************************************************************************

१९२१ साली वॉर्विक आर्मस्ट्राँगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीविरुद्धच्या एका मॅचमध्ये युनिव्हर्सिटीचा एक बॅट्समन बॅटींग करत होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्यावर अनाठायी टीका केल्याची आणि आताच्या भाषेत बोलायचं तर आपल्याला स्लेजिंग केल्याची त्याने आर्मस्ट्राँगकडे तक्रारही केली! आर्मस्ट्राँगने त्याच्याकडे अर्थातच दुर्लक्षंच केलं! मॅच संपली तेव्हा तो ९६ रन्स काढून नाबाद राहीला! मॅच ड्रॉ होत असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मुद्दामच आपल्याला शतक पूर्ण करुन दिलं नाही आणि हे खिलाडूवृत्तीला धरुन नाही अशी त्याने आर्मस्ट्राँग आणि त्याच्या सहकार्‍यांवर टीकेची झोड उठवली, मात्रं स्वतः अतिशय धीमेपणाने बॅटींग केली ही गोष्ट तो सोईस्करपणे विसरुन गेला होता!

हा बॅट्समन म्हणजेच इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट कॅप्टनपैकी एक मानला गेलेला आणि बॉडीलाईनच्या कुप्रसिद्ध नाट्याचा दिग्दर्शक! बॉडीलाईनची ही सुपिक कल्पना सर्वप्रथम त्याच्याच डोक्यातून बाहेर आली आणि लारवूडमार्फत त्याने ती अत्यंत निष्ठूरपणे राबवली!

डग्लस जार्डीन!

ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्द्ल या घटनेपासूनच त्याच्या मनात अढी निर्माण झाली ती कायमची!

जार्डीनच्या मनातील ऑस्ट्रेलियनांबद्दलची द्वेषभावना वाढीस लागली ती एम सी सी च्या १९२८-२९ सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात. फॉर्ममध्ये असलेल्या जार्डीनने या दौर्‍याची सुरवात मोठ्या रुबाबात केली होती. पहिल्या तीनही सामन्यांमध्ये त्याने सलग तीन शतकं ठोकली होती. अर्थात ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी जार्डीनला आपल्या टीकेचा प्रसाद दिला होताच! विशेषतः दुसर्‍या मॅचमध्ये तर कमालीच्या रटाळ बॅटींगमुळे प्रेक्षकांनी जार्डीनला लक्ष्यं केलं! तिसर्‍या मॅचमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली! सामान्य ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांमध्ये जार्डीनबद्दल कमालीच्या तिरस्काराची भावना मूळ धरु लागली होती!

अर्थात याला स्वतः जार्डीनच जबाबदार होता!

दक्षिण ऑस्ट्रेलियात आल्याबरोबर सर्वप्रथम दक्षिण ऑस्ट्रेलियन संघातील फक्तं केंब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत गेलेल्या खेळाडूंनाच त्याने आपल्याबरोबर लंचचं आमंत्रण दिलं! इतर खेळाडू त्याच्या खिजगणतीतही नव्हते! भरीला जार्डीन ऑक्सफर्ड आणि केंब्रिज इथल्या यशस्वी खेळाडूंनाच दिली जाणारी हर्क्युलिन कॅप दौर्‍याच्या सुरवातीपासूनच वापरत होता! वास्तविक बॅटींग करताना ही कॅप कॅप्टन असलेला पर्सी चॅपमनही वापरत होता, पण जार्डीनने फिल्डींग करतानाही ही कॅप वापरल्याबरोबर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी तीव्र आक्षेप घेतला! प्रेक्षकांशी आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंशीही जार्डीनची वागणूक ही सतत आपलं इंग्लिश श्रेष्ठत्वं ठसवणारी होती! तो कायम कुर्यातच वावरत असे!

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना अर्थातच हे सहन होणं शक्यं नव्हतं! जार्डीनच्या प्रत्येक कृतीची त्यांनी हुर्यो उडवण्यास सुरवात केली! विशेषता: बाऊंड्रीपाशी फिल्डींग करतानातर प्रेक्षकांनी त्याच्यावर मुक्तहस्ताने शिव्यांचा भडीमार केला! उत्तरादाखल जार्डीन प्रेक्षकांकडे पाहून जोरदार थुंकला!

तिसर्‍या मॅचमध्ये तो बॅटींगला जात असताना एका प्रेक्षकाने प्रश्न केला,

"तुझी बॅट उचलणारा बटलर कुठे आहे (Where is the buttler to carry the bat for you?) "

जार्डीनच्या मनात ऑस्ट्रेलियनांबद्दलची तिरस्काराची भावना पुन्हा उफाळून आलीच होती! प्रेक्षकांनी त्याची चेष्टा उडवल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू हंटर हेनरीने सहानुभूती व्यक्त केल्यावर जार्डीन उद्गारला,

"सारे ऑस्ट्रेलियन्स हे निव्वळ अडाणी आणि बेशिस्त लोक आहेत (All Australians are uneducated, and an unruly mob)!"

"बहुतेक ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना तू आवडत नाहीस असं दिसत आहे (Australian crowds don't seem to like you)!"
जार्डीनचा संघ सहकारी असलेला पॅट्सी हेन्ड्रेन त्याला म्हणाला.

"It's fucking mutual!" जार्डीन उत्तरला!

एम सी सी च्या याच दौर्‍यात डॉन ब्रॅडमनने टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं! अर्थात पहिल्या टेस्टमध्ये साफ अपयशी ठरल्यावर दुसर्‍या टेस्टमध्ये ब्रॅडमनला वगळण्यात आलं होतं! (विश्वास बसत नसला तरी ही वस्तुस्थिती आहे)! अर्थात पुढच्याच टेस्टमध्ये ब्रॅडमनने पहिलं शतक ठोकून आपलं आगमन जाहीर केलं होतं. परंतु अद्याप ब्रॅडमन हा 'ब्रॅडमन' म्हणून प्रसिद्धीस आला नव्हता!

ब्रॅडमन ही काय चीज आहे हे १९३० सालच्या इंग्लंड दौर्‍याने अवघ्या जगाला दाखवून दिलं!

वूस्टरशायरविरुद्धच्या पहिल्या मॅचपासूनच (२३६ रन्स) ब्रॅडमनने इंग्लिश बॉलर्सची जी काही अभूतपूर्व धुलाई करण्यास सुरवात केली ती निव्वळ अवर्णनीय होती! मे महिना पूर्ण होण्यापूर्वीच त्याने १००० फर्स्ट क्लास रन्स पूर्ण केल्या होत्या! अशी कामगिरी करणारा तोपर्यंतच्या इतिहासातला तो केवळ पाचवा आणि पहिलाच बिगर इंग्लिश खेळाडू होता!

नॉटिंगहॅमच्या पहिल्या टेस्ट्च्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने १३१ रन्स फटकावल्या, परंतु तो ऑस्ट्रेलियाचा पराभव मात्रं टाळू शकला नाही. लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये ब्रॅडमनने २५४ रन्सची बेजोड खेळी केली. इंग्लंडच्या ४२५ रन्सच्या उत्तरादाखल ब्रॅडमनच्या २५४ आणि बिल वूडफूलच्या १५५ च्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७२९ रन्सचा डोंगर उभा केला! अर्थातच ऑस्ट्रेलियाने ही टेस्ट जिंकून मालिकेत बरोबरी साधली! हीच आपली सर्वोत्कृष्ट इनिंग्ज असल्याचं ब्रॅडमनने नंतर नमूद केलं आहे!

लीड्सच्या तिसर्‍या टेस्टमध्ये तर ब्रॅडमनने अँडी सॅनधामचा ३२५ रन्सचा विश्वविक्रम मोडीत काढत ३३४ रन्स फटकावल्या! टेस्टच्या पहिल्याच दिवशी लंचपूर्वी शतक काढण्याच्या व्हिक्टर ट्रंपर आणि चार्ल्स मॅकार्टनीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केलीच पण एका दिवसात ३०७ रन्स काढण्याचा अद्वितीय पराक्रमही त्याने केला! (ब्रॅडमनचा हा विक्रम अद्यापही कोणी मोडू शकलेला नाही! त्याच्या जवळपास फिरकू शकला तो श्रीलंकेविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पहिल्या दिवशी नाबाद २८४ रन्स फटकावणारा वीरेंद्र सेहवागच)!

मँचेस्टरच्या चौथ्या टेस्टमध्ये ब्रॅडमन साफ अपयशी ठरला, परंतु ओव्हलच्या पाचव्या टेस्टमध्ये मात्रं त्याने पुन्हा २३२ रन्स फटकावत इंग्लिश बॉलर्सची धुलाई केली! अखेरीस विकेटकीपर जॉर्ज डकवर्थने त्याचा कॅच घेतला तो लारवूडच्या बॉलिंगवर! लारवूडने पहिल्यांदाच ब्रॅडमनची विकेट घेतली होती!

५ टेस्टच्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमनने १३९ च्या अ‍ॅव्हरेजने ९७४ रन्स काढल्या होत्या! त्यात दोन द्विशतकं आणि एका त्रिशतकाचा समावेश होता!

आजतागायत ब्रॅडमनचा हा विक्रम अबाधित आहे!

इंग्लिश दौर्‍यावर एकूण १० शतकांसह ९९ च्या अ‍ॅव्हरेजने ब्रॅडमनने २९६० रन्स फटकावल्या! डिप्रेशनचे चटके सोसत असलेल्या ऑस्ट्रेलियन जनतेच्या नजरेत श्रेष्ठ समजल्या जाणार्‍या इंग्रजांना त्यांच्याच देशात जाऊन झोडपणारा ब्रॅडमन हा राष्ट्रीय वीर पुरुष ठरला यात नवल काय?

अ‍ॅशेस दौर्‍यावरुन परतल्यावर १९३१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रीकेच्या संघांविरुद्धही ब्रॅडमनची बॅट तितक्याच ताकदीने चालली होती! या दोन्ही मालिका संपल्या तेव्हा ब्रॅडमनचं अ‍ॅव्हरेज १०० च्या वर होतं!

इतर कोणत्याही खेळाडूच्या किमान दुप्पट!

या पार्श्वभूमीवर १९३२-३३ च्या एम सी सी च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍याची आखणी सुरु झाली!

***********************************************************************************************

बॉडीलाईनची बीजं रोवली गेली ती मात्रं १९३० च्या अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हलच्या शेवटच्या टेस्टमध्ये!

पावसामुळे काहीशा ओलसर झालेल्या पिचवर लारवूडच्या शॉर्टपीच बॉलिंगचा सामना करताना ब्रॅडमन आणि आर्ची जॅक्सन दोघांच्याही बॅटला लागून अनेकदा चेंडू हवेत उडाला होता, परंतु एकाही इंग्लिश क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यात बॉल आला नव्हता. मात्रं अशा चेंडूचा सामना करताना ब्रॅडमन सहजपणे खेळू शकत नाही हे अनेक इंग्लिश खेळाडूंच्या आणि पत्रकारांच्या ध्यानात आलं होतं! अर्थात ब्रॅडमनने २३२ धावा फटकावल्याने वृत्तपत्रांनी याकडे फारसं लक्षं दिलं नाही परंतु काही चाणाक्षं इंग्लिश खेळाडूंच्या मनात मात्रं याच्या स्मृती ताज्या होत्या!

१९३० च्या संपूर्ण मालिकेत डग्लस जार्डीन व्यावसायिक कारणामुळे खेळू शकला नव्हता! जार्डीन हा तेव्हा अ‍ॅमॅच्युअर (हौशी) खेळाडू होता. क्रिकेट हे त्याच्या चरितार्थाचं साधन नव्हतं. थोडक्यात तो व्यावसायिक (प्रोफेशनल) खेळाडू नव्हता. १९३० मध्ये तो फारसा फॉर्मातही नव्हताच. १९३१ मध्ये मात्रं त्याने टेस्टमध्ये पुनरागमन केलं आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एम सी सी चं यशस्वी नेतृत्वंही केलं होतं. तीन टेस्टची ही मालिका जार्डीनने १-० अशी जिंकली होती.

एम सी सी च्या १९३२-३३ च्या दौर्‍यासाठी कॅप्टन म्हणून जार्डीनची नेमणूक करण्यात आली!

जार्डीन आणि एम सी सी पुढचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे ब्रॅडमनचा मुकाबला कसा करायचा?

१९३० च्या मालिकेत आणि त्यानंतर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रीकेविरुद्ध ज्या पद्धतीने ब्रॅडमन खेळला होता ते पाहता अवघ्या चोवीस वर्षांचा ब्रॅडमन निवृत्त होईपर्यंत अ‍ॅशेस जिंकण्याची इंग्लंडला कोणतीही संधी नाही अशी अनेकांची धारणा झाली होती! अर्थात ब्रॅडमन निवृत्त होण्यास अद्याप किमान १० वर्षांचा तरी काळ लागणार होता, त्यामुळे त्यापूर्वी अ‍ॅशेस मालिकेत विजय मिळवायचा असेल तर ब्रॅडमनला बाद करण्यासाठी काहीतरी जालिम उपाययोजना करणं अत्यावश्यंक आहे असं इंग्लंडमध्ये अनेकांचं मत होतं!

१९३० च्या अ‍ॅशेस मालिकेत लेगस्पीनर वॉल्टर रॉबिन्स आणि इयन पीबल्स यांनी ब्रॅडमनला अनेकदा सतावलं होतं. त्यामुळे एम सी सी च्या चमूत दोन लेगस्पीनर्सचा समावेश करण्यात आला होता. अर्थात ओव्हल टेस्टच्या स्मृती अद्यापही अनेकांच्या मनात ताज्या होत्याच! जार्डीनने या टेस्टचं चित्रीकरण पाहताच तो उस्फूर्तपणे ओरडलाच,

"आय हॅव गॉट इट! ही एज यलो!"

१९३२-३३ च्या एम सी सी च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी कॅप्टन म्हणून जार्डीनची निवड होताच हालचालींनी आणखीन वेग घेतला. १९३२ मध्ये पर्सी फेंडरला ऑस्ट्रेलियातून आलेली अनेक पत्रं त्याने जार्डीनला दाखवली. अतिशय वेगातल्या शॉर्टपीच बॉलिंगचा मुकाबला करताना ऑस्ट्रेलियन बॅट्समनची धांदल उडत असल्याचं त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं!

या पत्रात एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा ठळकपणे उल्लेख करण्यात आलेला होता.

क्वीन्सलँडचा रहिवासी असलेल्या आदिवासी जमातीतील एडी गिल्बर्ट या फास्ट बॉलरने ब्रॅडमनला अवघ्या चार चेंडूत शून्यावर बाद केलं होतं! हे चारही चेंडू शॉर्टपीच होते आणि इतक्या प्रचंड वेगात आलेले होते की ब्रॅडमनला त्याचा अंदाजच आला नव्हता! त्यापैकी पहिल्याच चेंडूवर ब्रॅडमनच्या हातातली बॅट उडाली होती!

दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या मालिकेतही सँडी बेलच्या शॉर्टपीच बॉलिंगला तोंड देताना ब्रॅडमनला बरेच प्रयास पडले होते. अर्थात ब्रॅडमनने त्या इनिंग्जमध्ये तब्बल २९९ रन्स काढल्याने फारसं कोणाचं लक्षं गेलं नसलं तरी जॅक फिंगल्टनच्या मते दुसरा दक्षिण आफ्रीकन फास्ट बॉलर हर्बी टेलरनी इंग्लिश खेळाडूंशी बोलताना याचा उल्लेख केला होता!

पर्सी फेंडरच्या मते लेग स्टंपवर टाकलेल्या जलदगती शॉर्टपीच चेंडूचा मुकाबला करताना ब्रॅडमन गडबडून जात होता! असे चेंडू त्याला आरामात खेळून काढता येत नव्हते! फेंडरचं हे मत जार्डीनला पूर्ण मान्यं होतं. त्याच्या मते शॉर्टपीच चेंडूंचा मुकाबला करताना ब्रॅडमन आपल्या क्रीजमध्ये ताठ उभा राहू शकत नव्हता कारण अशी बॉलिंग खेळण्यासाठी लागणारी हिम्मत आणि जिगर त्याच्यापाशी नव्हती!

लंडनच्या पिकॅडली हॉटेलमध्ये एक मिटींग भरली होती. एकूण चार माणसं या मिटींगला हजर होती. या चौघांच्या बोलण्याचा विषय एकच होता...

फास्ट लेग थिअरी!

बॉडीलाईन ही संज्ञा नंतर अस्तित्वात आली. त्यापूर्वी त्याला फास्ट लेग थिअरी असा शब्द वापरला जात असे. बॅट्समनच्या मागे लेग साईडला अनेक क्षेत्ररक्षकांचं कडं उभारुन लेग स्टंपच्या लाईनवर शॉर्टपीच बॉलिंग टाकायची अशी ही मूळ संकल्पना होती. शॉर्टपीच बॉलवर केवळ बचावात्मक पद्धतीनेच खेळणं शक्यं होतं. त्यावर रन्स मिळण्याची शक्यता जवळपास नव्हतीच! उलट लेग साईडला कॅच उडण्याची शक्यताच जास्तं! त्याखेरीच हूक आणि पूल शॉट हवेत मारले गेल्यास बाऊंड्रीवर दोन क्षेत्ररक्षकांची नेमणूक केली जात होती!

अर्थात लेग थिअरीचा वापर पूर्वीही करण्यात आलेला असला तरी तो मुख्यतः स्पिनर्सनी केलेला होता. बॅट्समनचा पेशन्स संपून एखादा चुकीचा शॉट मारुन त्याला बाद करणं हे मुख्य धोरण होतं! वूस्टरशायरचा स्पिनर फ्रेड रुट यात उस्ताद होता! ऑस्ट्रेलियन कॅप्टन वॉर्विक आर्मस्ट्राँगनेही हे टेक्नीक वापरलेलं होतं! अर्थात फास्ट बॉलर्सनी हे तंत्र सर्रास वापरात आणलेलं नसलं तरी हे अगदीच निषिद्ध नव्हतं! १९२५ मध्ये ऑस्ट्रेलियात शेफील्ड शिल्ड मॅचमध्ये न्यू साऊथ वेल्सचा फास्ट बॉलर जॅक स्कॉटने लेग थिअरीचा वापर केला होता. परंतु त्याचा कॅप्टन हर्बी कॉलिन्सला ते पसंत पडलं नव्हतं! स्कॉटला लेग थिअरी वापरण्यास त्याने सक्त मनाई केली होती! स्कॉट दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या संघात आल्यावर मात्रं व्हिक्टर रिचर्डसनने त्याला फास्ट लेग थिअरी वापरण्याची मुभा दिली होती! एम सी सी च्या संघाविरुद्ध १९२८-२९ च्या मालिकेतही त्याने याचा प्रयोग केला होताच! १९२७ मध्ये नोबी क्लार्कने जार्डीनच्या नेतृत्वात खेळताना फास्ट लेग थिअरी वापरुन पाहिली होती! लारवूडनेही १९२८-२९ च्या मालिकेत साधारण असाच प्रयोग केला होता, परंतु त्यावेळी त्याचा हा प्रयोग अगदीच मर्यादित स्वरुपाचा होता! चार वर्षांनंतरची आक्रमकता आणि संहारकपणा त्यात नावालाही नव्हता! १९२९-३० च्या मालिकेत वेस्ट इंडीजचा फास्ट बॉलर लिअरी कॉन्स्टंटाईननेही याचा प्रयोग केला होता असं बॉब वॅटने नमूद केलं होतं!

(शेन वॉर्न, अ‍ॅशली जाईल्स या स्पिनर्सनीही सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्याविरुद्ध हे लेग स्टंपवर बॉलिंग करण्याचं तंत्र वापरलं होतं. अर्थात त्याचा कसा फज्जा उडाला हे सर्वज्ञात आहेच)!

पिकॅडली हॉटेलमधल्या मिटींगमध्ये फास्ट लेग थिअरीच्या वापरावर आणि परिणामांवरच चर्चा सुरु होती! तिथे हजर असलेले चौघंजण म्हणजे इतर कोणी नसून डग्लस जार्डीन, नॉटिंगहॅमशायरचा कॅप्टन आर्थर कार आणि दोघं फास्ट बॉलर्स हॅरॉल्ड लारवूड आणि बिल व्होस हेच होते!

"तुम्ही दोघं फास्ट लेग थिअरी वापरु शकता काय?" जार्डीनने लारवूड-व्होस जोडगोळीला प्रश्न केला.

"येस मि. जार्डीन!"

"ती कितपत परिणामकारक ठरेल असं तुम्हाला वाटतं?"

"निश्चितच परिणामकारक ठरेल मि. जार्डीन! दोन वर्षांपूर्वीच्या ओव्हल टेस्टमध्ये ब्रॅडमन नक्कीच अन्कम्फर्टेबल होता!" डोनाल्ड कार उत्तरला!

लारवूड आणि व्होस यांनी इंग्लिश मोसमात फास्ट लेग थिअरीचा प्रयोग करुन बघण्याचं मान्यं केलं! जार्डीनने नंतर फ्रँक फोस्टरचीही भेट घेतली. १९११-१२ च्या एम सी सी च्या दौर्‍यावर फोस्टरने ऑस्ट्रेलियात फास्ट लेग थिअरीचा प्रयोग केला होता. १९०३-०४ मध्ये असाच प्रयोग करणार्‍या जॉर्ज हर्स्टचीही जार्डीनने भेट घेतली. फोस्टर आणि हर्स्ट यांच्याबरोबरच्या भेटीत ऑस्ट्रेलियात फास्ट लेग थिअरीचा वापर करताना फिल्डर्स नेमक्या कोणत्या पोझिशनमध्ये ठेवावे याची जार्डीनने तपशीलवार चर्चा केली होती!

लारवूड आणि व्होस या जोडीने इंग्लिश मोसमाच्या उरलेल्या सामन्यांत फास्ट लेग थिअरीचा यशस्वी प्रयोग केला. प्रत्येक सामन्यागणिक जखमी बॅट्समनची संख्या वाढत होती! केन फार्म्सनेही असाच प्रयोग केला. अर्थात ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर त्याची निवड झाली नाही हा भाग वेगळा! बिल बोसनेही फास्ट लेग थिअरीचा जॅक हॉब्सविरुद्ध यशस्वी वापर केला होता!

एस एस ऑरोन्टेस या प्रवासी बोटीवरुन एम सी सी चा इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाच्या मार्गाला लागला. जार्डीनच्या संघात लारवूड, व्होस, बिल बोस, गबी अ‍ॅलन, मॉरीस टेट हे पाच फास्ट बॉलर्स होते! त्यांच्या जोडीला फ्रेडी ब्राऊन, हॅडली व्हेरेटी, टॉमी मिचेल हे स्पिनर्स होतेच शिवाय वॉली हॅमंडही होता! स्वतः जार्डीन, बॉब वॅट, मॉरीस लेलॅन्ड, नवाब ऑफ पतोडी (सिनीयर), हर्बर्ट सटक्लीफ, एडी पायन्टर हे बॅट्समन आणि जॉर्ज डकवर्थ, लेस अ‍ॅमेस हे दोघं विकेटकीपर्स होते!

ऑस्ट्रेलियाच्या वाटेवर असताना जार्डीनने आपल्या सहकार्‍यांमध्ये ब्रॅडमन आणि एकूणच ऑस्ट्रेलियन संघाबद्दल आणि सामान्य प्रेक्षकांबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा मनापासून प्रयत्न केला! ऑस्ट्रेलियनांना हरवण्यासाठी त्यांचा तिरस्कार वाटणं आवश्यंक आहे असं त्याचं स्पष्टं मत होतं! ब्रॅडमनचा उल्लेख तर तो कायम 'दॅट लिटील बास्टर्ड' असाच करत असे! आपल्या सहकार्‍यांनीही ब्रॅडमनचा तसाच उल्लेख करावा अशी त्याची सक्तं ताकीद होती!

(दुसर्‍या महायुद्धात चर्चीलने याच पद्धतीने जाहीर भाषणांत हिटलरचा उल्लेख 'अ‍ॅडॉल्फ शिकेलग्रूबर? दॅट बोहेमियन कॉर्पोरल?' असाच केला होता)!

एम सी सी चा संघ अखेर एकदाचा ऑस्ट्रेलियात पोहोचला!

बॉडीलाईनच्या नाट्याला आता खरी सुरवात होणार होती!

क्रमशः
(संदर्भ:प्रताधिकार मुक्त जालावरचे याविषयावरचे साहित्य)
पुढील भागांतील लेखनाचे संदर्भ :-
In Quest of the Ashes - Douglas Jardine
The Larwood Story - Harold Larwood, Kevin Perkins
Wisden Cricket Almanacks - 1930
The M. C. C. team in Australia and New Zealand, 1932-33 - Wisden
Cricket Crisis: Bodyline and Other Lines - Jack Fingleton
The Bodyline Hypocrisy: Conversations with Harold Larwood - Michael Arnold
The Bodyline Controversy - Laurence Le Quesne
The Bradman Years - Jack Pollard
On Top Down Under - Ray Robinson
Bodyline Autopsey - David Frith

बॉडीलाईन - २

कथालेख

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

4 Jul 2015 - 11:31 am | मृत्युन्जय

परत लिहिता झालास हे बरे केलेस. पुभाप्र.

वेलकम बॅक,स्पार्टाकस!पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

4 Jul 2015 - 11:46 am | बोका-ए-आझम

परत लिहायला सुरूवात केली हे फार चांगलं केलंत स्पार्टेशअण्णा! लेख छानच. पुभाप्र!

मी-सौरभ's picture

4 Jul 2015 - 12:34 pm | मी-सौरभ

पु भा प्र

नन्दादीप's picture

4 Jul 2015 - 12:43 pm | नन्दादीप

पु.भा.प्र.

एक एकटा एकटाच's picture

4 Jul 2015 - 1:18 pm | एक एकटा एकटाच

मस्त वाटल वाचून.

पुढचा भाग लवकर टाका.
ड्रिंक्स ब्रेक जास्त मोठा घेउ नका.

परत लिहायला सुरूवात केली हे फार चांगलं केलंत स्पार्टेशअण्णा! लेख छानच. पुभाप्र!

स्पार्टाकस यांचे लेख म्हणजे एकदम मज्जा

लव उ's picture

4 Jul 2015 - 3:07 pm | लव उ

मस्त लिहिलय.

उमेश येवले's picture

4 Jul 2015 - 3:51 pm | उमेश येवले

वेलकम बॅक,स्पार्टाकस! परत लिहायला सुरूवात केली चांगलं केलं

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jul 2015 - 10:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वेलकम बॅक स्पार्टाकस. लेखनासाठी शुभेच्छा!

रवीराज's picture

5 Jul 2015 - 12:07 am | रवीराज

आधी तुमचे अभिनंदन! असेच लिहित रहा.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 6:20 am | श्रीरंग_जोशी

आवडत्या विषयावरील लेखमालिकेची सुरुवात रोचक वाटली.

पुभाप्र.

चिन्मना's picture

5 Jul 2015 - 10:52 am | चिन्मना

मस्त सुरुवात. बॉडीलाईनवर पूर्वी एक सुंदर मालिका दूरदर्शन वर येऊन गेली होती, त्याची आठवण झाली.

स्पार्टाकस's picture

5 Jul 2015 - 11:16 am | स्पार्टाकस

१९८४ साली ऑस्ट्रेलियन टी व्ही ने बॉडीलाईन या मिनीसिरीजची निर्मिती केली होती. ह्युगो व्हिवींग (जार्डीन), गॅरी स्वीट (ब्रॅडमन) आणि जिम होल्ट (लारवूड) हे कलाकार त्यात होते. मी शाळेत असताना ही सिरीज पाहिलेली आठवते. अर्थात या सिरीजमध्ये काही गोष्टींचं विपर्यास्तं चित्रीकरण करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियात सेटल झालेल्या लारवूडने त्यावर बरीच टीका केली होती. या सिरीजनंतर लारवूडला धमकीची अनेक पत्रंही आली होती!

अधिक माहिती - https://en.wikipedia.org/wiki/Bodyline_%28miniseries%29

चिन्मना's picture

5 Jul 2015 - 12:21 pm | चिन्मना

बरोबर, मी सुद्धा शाळेत असतानाच पाहिली होती. माझ्या वयाच्या बर्‍याच लोकांना बॉडीलाईन सिरीज म्हणल्यावर तीच मालिका आठवेल. काय विपर्यस्त चित्रीकरण केले होते ते ही या लेख मालिकेतून सांगितलेत तर आवडेल.

अविनाश पांढरकर's picture

6 Jul 2015 - 4:09 pm | अविनाश पांढरकर

पिकॅडली हॉटेलमधल्या मिटींगमध्ये फास्ट लेग थिअरीच्या वापरावर आणि परिणामांवरच चर्चा सुरु होती! तिथे हजर असलेले चौघंजण म्हणजे इतर कोणी नसून डग्लस जार्डीन, नॉटिंगहॅमशायरचा कॅप्टन आर्थर कार आणि दोघं फास्ट बॉलर्स हॅरॉल्ड लारवूड आणि बिल व्होस हेच होते!

"निश्चितच परिणामकारक ठरेल मि. जार्डीन! दोन वर्षांपूर्वीच्या ओव्हल टेस्टमध्ये ब्रॅडमन नक्कीच अन्कम्फर्टेबल होता!" डोनाल्डआर्थर कार उत्तरला!

डोनाल्ड च्या ऐवजी आर्थर हवंय का माझीच काहीतरी चूक आहे वाचण्यात?

अविनाश पांढरकर's picture

6 Jul 2015 - 4:12 pm | अविनाश पांढरकर

डोनाल्डच्या ऐवजी आर्थर हवंय का किवां माझीच काहीतरी चूक होतेय वाचण्यात?

स्पार्टाकस's picture

6 Jul 2015 - 4:19 pm | स्पार्टाकस

नॉटिंगहॅमचा कॅप्टन आर्थर कारच अभिप्रेत आहे इथे.

डोनाल्ड कार डर्बीशायर आणि इंग्लंडचा कॅप्टन असला तरी त्याचा आणि आर्थर कारचा काहीही संबंध नाही.

सुयोग पुणे's picture

18 Feb 2016 - 5:03 am | सुयोग पुणे

अतिशय अप्रतिम .. रसाळ आणि ओघवती भाषा..