तुम्हाला आवडलेले शिक्षक

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jul 2015 - 8:47 am
गाभा: 

नमस्कार, मिपावरील माझ्या मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी धाग्यास मिळालेल्या प्रतिसादांसाठी आभार.

या नव्या धागालेखाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील आवडलेल्या (आणि कदाचित न आवडलेल्या) शिक्षकांबद्दल आठवणीतील काही प्रसंग अथवा माहिती आणि ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले भाग्य प्राप्त झाले त्यांनी अशा शिक्षकांबद्दलही आठवणी आणि माहिती लिहावी.

किंवा उल्लेखनीय व्यक्तींना लाभलेले उल्लेखनीय शिक्षक असाही विषय चालू शकेल.

इतरांनी लिहिलेल्या आठवणी आणि माहितीस इतर कुणास दुजोरा अथवा संदर्भ देणे शक्य असल्यास तो आवर्जून द्यावा, कारण (केवळ) ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियात शक्य झाल्यास वापरण्याचाही मनोदय आहेच. ( मराठी विकिपीडियात उल्लेखनीय शिक्षकांबद्दल माहितीत किमान काहीतरी भर पडावी या साठी सर्वांना प्रतिसाद देण्याचे आवाहन आहे)

आपल्याकडे ज्ञानकोशास उल्लेखनीय अथवा आदर्श शिक्षकांची छायाचित्रे उपलब्ध असून (शक्यतोवर संबंधीत शिक्षकाची लेखी परवानगी मिळवणे शक्य असल्यास त्या सहीत) https://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard या विकिपीडिया बंधू प्रकल्पातून चढवल्यास विकिपीडियात वापरता येतील.

*ह्या धाग्यावरील आपले पुरस्कार प्राप्त शिक्षक आदर्श शिक्षक अथवा मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या संदर्भाने येणारे प्रतिसाद विकिप्रकल्पातूनही वापरले जाऊ शकतात म्हणून नित्या प्रमाणे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

*अनुषंगिका शिवाय इतर विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया

मंडळी, उद्या शिक्षक दिन आहे. या धाग्याच्या जोडीला शाळा नावाचाही एक धागाही आला आहे त्या निमीत्ताने हा धागा वर काढतो आहे.

मिपाकर मित्रांनो, हा धागा लेख काढून मध्ये एक वर्ष गेले आहे. तेव्हा या वर्षीही थोड्या प्रतिसादांच्या अपेक्षेने हि धागा चर्चा पुन्हा एकदा वर काढतो आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझे सगळ्यात आवडते शिक्षक माझे बाबा, तसे पाहता त्यांच्यावर एक लेख लिहिता येईल वेगळा पण इथे काही काही निवडक आठवणी सांगव्या वाटल्या म्हणुन हा लेखन प्रपंच.
आमचे वडील ज्या हाईस्कूल अन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन निवृत्त झाले तेव्हाचा एक किस्सा, कोणीतरी मोठे पाहुणे येणार होते त्यांच्यासमोर चमकोगिरी करायला शाळेच्या मैनेजमेंट ने पुर्ण मंच व्यापुन टाकले अन बाबांना स्वतः हेडमास्टर असुन बसायला ही जागा नव्हती तेव्हा बाबा शांतपणे स्वागत द्वारी पाहुण्यांचे स्वागत करायला उभे राहिले जाऊन, तो कार्यक्रम पहायला गेलेला मी आधीच 'तीन दिवसा पासुन काय एकच शर्ट घालताय' म्हणुन त्यांच्यावर भड़कलो होतो त्यात हे स्टेज पुराण झाले तेव्हा मी स्वागत द्वारा जवळ असलेल्या बाबांजवळ गेलो अन माझी धुसफुस व्यक्त केली ती अशी

'काय बाबा तुम्ही फारच साधे बुआ असेकसे कुठला कोण शाळा व्यवस्थापन चा माणुस येऊन साक्षात मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसतो अन हा शर्ट बदला आता'

'शांत हो, अन गंमत बघ!' बाबा

कार्यक्रमाला थोडा वेळ होता व खुपसे विद्यार्थी अजुन येत होते बाबा सगळीकडे नजर ठेऊन उभे मी त्यांच्या शेजारी उभा इतक्यात एक पाचवी चा असावा असा एक पिटुकला धीट पोरगा आला मी बाबांच्या शेजारी उभा राहून पाहत होतो, तो हळूच आला अन लहान पोरे ज्या टिपिकल पद्धतीने वडीलधाऱ्या लोकांचा शर्ट ओढ़तात तसा ओढला अन दाद देता झाला

'सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला

खजील झालेल्या माझ्याकडे पाहत बाबा दिलखुलास हसले अन म्हणाले 'मास्टराची संपत्ती फ़क्त त्याचे विद्यार्थी असतात मला ह्या एका क्षणात तसल्या हजार मंचाचा मान ते आदर्श शिक्षक सगळे मिळाले रे सुकी कागदं अन कोटावर बिल्ले काय करायचेत? माझ्याकडे साक्षात् ईश्वर येतो अश्या रुपात स्तुती करायला'

मी पुढे काही ऐकू ही शकलो नाही अन बघुही शकलो नाही

माझे आवडते शिक्षक म्हणुन माझे बाबा

दमामि's picture

4 Sep 2015 - 6:52 pm | दमामि

वा!

असंका's picture

5 Sep 2015 - 10:14 am | असंका

नशिबवान आहात!!
सुरेख अनुभव....

धन्यवाद!

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:48 am | माहितगार

सर परवा किनै तुम्हाला मी टीवी मधे पाहिले (लोकल केबल टीवी बातम्या) अन तुम्ही किनै तुमच्या मिश्या अन ह्या निळ्या शर्ट मधे खुप मस्त दिसत होते सर एकदम स्मार्ट' अन तुरुतुरु निघुन गेला

मस्तच !

सिरुसेरि's picture

4 Sep 2015 - 6:42 pm | सिरुसेरि

छान प्रतिसाद !

बबन ताम्बे's picture

4 Sep 2015 - 6:50 pm | बबन ताम्बे

आमच्या काळी प्राथमिक शिक्षक हे बहुतांशी मारकुटेच होते.
एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही. :-)

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:46 am | माहितगार

छडी लागे छम छम ... मला वाटते बिएड डिएड या शिक्षक कौशल्य विकास प्रक्रीयेमुळे आताच्या काळात धप्पाकुटीचे प्रमाण बरेच कमी झाले असावे. तरीही यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख वाचकाभिमुख अभिवृत्ती चे कौशल्य विकसीत करण्यासाठी केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे सर्वांसाठीच अधिक प्रयत्नांची गरज असावी.

नाव आडनाव's picture

5 Sep 2015 - 11:13 pm | नाव आडनाव

एक तर गणित जमायचे नाही, आणि पाठीत रट्टे पडल्यानंतर तर अजीबात समजायचे नाही.

:)

माझ्या सासर्‍यांचं नाव पण बबन आहे आणि ते गणित विषया बद्दल असंच सांगतात :) ते म्हणतात "जो पर्यंत गणितात आकडे होते तोपर्यंत सगळं कळायचं. जसं - राम कडे ३ मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, तर किती राहिल्या? पण जेंव्हा पासून व्हेरिएबल (?) आले, तेंव्हा पासून सारं समजायचं बंदच झालं. जसं - राम कडे क्ष मोसंब्या होत्या, त्यातल्या दोन श्यामला दिल्या, राम कडे १ राहिली तर त्याच्या कडे आधी किती होत्या. मला क्ष मोसंब्या, य आंबे आणि ज्ञ अमूक-तमूक हे काहीच कळत नसायचं आणि रोज मार खायचो. नंतर इतिहास आवडायला लागला आणि इतिहासाचा प्राध्यापक झालो :)"

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 11:41 am | बबन ताम्बे

तुमच्या साबुंशी सहमत आहे :-)
माझा इंग्रजी एम.ए. झालेला मित्रही म्हणतो, काय ते (च्यायला) (अ+ब)^२ चे सुत्र पाठ नाही म्हणून मार खाल्ला होता. आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 1:02 pm | माहितगार

मला वाटत सध्याच्या पिढीला सोप्या गणिताचा वेगळा पर्याय आता उपलब्ध करून दिला गेला आहे. "आयुष्यात नंतर एकदाही त्याचा उपयोग झाला नाही." हे आपण सहज बोलून जातो, भावना समजून घेतानाच माझा उद्देश शब्द छल करण्याचा नाही पण यात काही तार्कीक उणीव राहून जाते असे वाटते आहे. उपयोगाचा प्रयत्न केल्या नंतर प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणणे वेगळे. (ह.घ्या.) सांगण्याचा उद्देश हा अनुभव कोणत्याही विषयाबाबत व्यक्ती परत्वे बदलता असू शकतो एवढेच.

असे म्हणायचे होते.
बाकी गणितामुळे (जरी भावी आयुष्यात त्यातले बरेचसे वापरले नाही तरी) तर्कबुद्धी, विश्लेषण क्षमता वाढते याबद्द्ल दुमत नाही.

शालेय जीवनात जरी गणितावरून शिक्षकांचा मार खावा लागला, तरी पुढे गणित हा माझा आवडता विषय होता हे जाताजाता नमूद करावेसे वाटते. :-)

माहितगार's picture

7 Sep 2015 - 2:47 pm | माहितगार

फिजीकल मार एक गोष्ट झाली, समजवता देऊन येऊ न शकणारे शिक्षक भेटणे ही सुद्धा शिक्षाच खरी तेच चांगल समजावून देता येणारे शिक्स्।अक अथवा प्रोत्साहन देणारे शिक्षक भेटले की तोच विषय पाहता पाहता आवडीचा होऊन जातो

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 2:56 pm | बबन ताम्बे

.

जानु's picture

4 Sep 2015 - 9:14 pm | जानु

आम्हाला ईयत्ता पाचवी नंतर ईंग्रजी विषयासाठी शिसोदे सर होते. सकाळी ६ वाजता क्लास असायचा. सर कधी ६ नंतर आलेले मला आठवले नाही. आम्ही सकाळी उठायला कंटाळा करायचो. सर मुलांना कधी उशीरा आला म्हणुन रागावले नाही. आणि शिकवायला एकदम मस्त. आजही पॅसिव्ह व्हॉईस, अ‍ॅक्टीव व्हॉईस ईंग्रजी व्याकरण त्यांच्या मुळेच. उदाहरणे जेव्हा लिहुन द्यायचे तेव्हा मोठा फळा भरुन जायचा. एवढी उदाहरणे असायची की ते लिहुन आणि वाचुनच काम व्हायचे.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:34 am | माहितगार

ज्ञान, कौशल्य, आणि जिव्हाळा यांचा संगम मग रागवायलाही लागत नसावे !

वाक्यात कपल आले की ... त्याला जोडून म्हणायचे ... गेले फडात.

शंकर अँड गौरी ...... गेले फडात

( फड ... उसाचा फड )

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:32 am | माहितगार

बरयं ! कुठली तालीम ही :) (ह.घ्या.)

मांत्रिक's picture

5 Sep 2015 - 11:37 am | मांत्रिक

दादा डूरडूरकर यांचा अजून एक फालतू जोक!

चित्रगुप्त's picture

5 Sep 2015 - 6:39 am | चित्रगुप्त

१९६९ ते १९७५ हा काळ मी इंदुरच्या आर्टस्कूल मधे चित्रकला शिकलो. त्या काळात मला जे शिक्षक लाभले, त्यापैकी कै. चंद्रेश सक्सेना यांचा माझ्या जीवनावर फार मोठा परिणाम घडून आला. त्यांचेविषयी आणि एकंदरित त्या काळाविषयी आठवणी हा माझ्यासाठी अमूल्य खजिनाच आहे:

१९६८ मध्ये सतरा वर्षांचा असताना एकदा स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेलो, बरोबर चांदोबातून बघून काढलेली, आणि तेंव्हाच्या साधना, मुमताज वगैरे नट्यांची चित्रे होती. प्रिन्सिपल किरकिरे होते, ते म्हणाले की तुमचा हात चांगला आहे, पण आता ही अशी बघून चित्रे काढायची नाहीत, अमुक इतकी फी भरून प्रवेश मिळेल. उद्यापासून या. मग काय, आनंदाला उधाण आले. लगेच जाणे सुरु केले.

आर्टस्कूलचा हा काळ अविस्मरणीय आनंदाचा होता. पैसा जेमतेमच असायचा, पण भरपूर उत्साह, शक्ती होती, आणि आपण आयुष्यात नक्की काहीतरी थोर करणार आहोत, ही काहीशी भाबडी आशा, किंबहुना खात्रीच. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत, ही आशा माणसाला गुंतवून ठेवत असते.
आर्ट स्कूल च्या पहिल्या वर्षी बहुतकरून स्टिललाईफ रंगवायची असत. शिवाय व्हीनस वगैरे पुतळे होते, त्यावरून मनुष्याकृती बनवणे शिकायचे, हुबेहूब रेखाटन करून कागदी स्टंप ने शेडींग करायचे. एक चित्र करायला संपूर्ण एक आठवडा असे.

शिक्षक दिवसातून एखादा चक्कर मारून आमचे काम बघून जात. कधी थोडेसे तोंडी मार्गदर्शन करीत, किंवा आमच्या चित्रांवर करेक्शन देत. त्यावेळी त्यांच्या जराश्या कामातून चित्रात घडून येणारे बदल आश्चर्यकारक वाटत. उदाहरणार्थ स्टिल लाईफ करताना आम्ही चिनीमातीची भांडी, कापड, वगैरे जसेच्या तसे रंगवण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो, परंतु दुबे सरांनी जेंव्हा भांड्यांच्या खालच्या बाजूच्या फटीतून दिसणारा मागचा प्रकाश ब्रशच्या एकदोन फटकारयातून दाखवला, तेंव्हा चित्र एकदम जिवंत झाले.

सक्सेना सर
दुसऱ्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'कान्पोझीशान' साठी प्रो. चंद्रेश सक्सेना यांच्या आठवडाभराच्या वर्गाला जायचे होते. त्यांच्याविषयी असलेला आदरयुक्त दबदबा ऐकून होतो. इतर वर्गांप्रमाणे त्यांच्या वर्गात अजागळपणे पसरलेले लाकडी 'डाँकी' नव्हते. खाली मोठी सतरंजी व त्यावर सुमारे एक फूट उंचीचे प्रशस्त टेबल होते. भिंतींवर बेंद्रे, डीजे जोशी यांची चित्रे व्यवस्थित टांगलेली, लाकडी कपाटात निवडक पुस्तके, सगळीकडे कमालीची स्वच्छता.
सक्सेना सर मुंबईला जे जे मध्ये, नंतर शांतीनिकेतन ला नंदलाल बसूंकडे शिकून आलेले होते. सर अतिशय व्यवस्थित व शिस्तप्रिय. चित्रकारांची राहणी, त्यांचे रंगसामान वगैरे अगदी टीपटाप असले पाहिजे, ब्रशचे पितळी फेरूल नेहमी चकाकत असले पाहिजे, ब्रश चकचकीत पितळी नळकान्ड्यात ठेवायचे, रोज सर्व ब्रश साबणाने धुवून मगच घरी जायचे, पॅलेट वर ठराविक क्रमाने रंग काढायचे, एप्रन घालून काम करायचे, वगैरे आदर्श स्वतःच्या उदाहरणातून आमच्या समोर मांडायचे.

तर त्या पहिल्या दिवशी त्यांनी जे भाषण दिले, त्याने माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली. उदाहरणार्थ, 'स्त्रियांकडे बघू नये' अशी साधुसंतांची शिकवण ऐकत आलेलो होतो, तर सरांनी सांगितले, की घरी काय बसता, घाटावर जा, तिथे आंघोळ करत असलेल्यांची स्त्रियांची स्केचेस करा, वगैरे... किंवा चित्रकलेचे शिक्षण तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून घेऊ नका, तर या अभ्यासातून लाभणार्या सौदर्यदृष्टीचा उपयोग आयुष्यात प्रत्येक क्षणी करा. तुमचा भवताल, वस्तू, तुमचे अवघे जीवन सुंदर करा.... चित्रकाराने कसे राहावे, काय करावे, चित्रकलेचे महत्व, असे सर्व काही त्या भाषणात होते. आम्ही सर्व विद्यार्ही अगदी भारून गेलो. माझी मरगळ, निरुत्साह, संकोच, सर्व काही जणु जळून गेले, आणि उत्साहाने, चैतन्याने मी कामाला लागलो. आज पंचेचाळीस वर्षानंतर सुध्धा मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो...

पुढे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आर्ट स्कूलला गेलो होतो, पाहतो तर काय, सर शाळेच्या एकूण एक फर्निचरला स्वतः हाताने पॉलिश करत बसले होते. म्हणाले, आता शाळा सुरु झाल्यावर मुले येतील, तेंव्हा त्यांना सर्व काही व्यवस्थित, नीटनेटके दिसायला हवे ... आर्टस्कूल संपूर्णपणे सरकारी होते, त्यामुळे अश्या कामासाठी पैसा मंजूर करवणे वगैरे फार त्रासाचे असे, त्यामुळे सर हे सर्व स्वखर्चाने, स्वतःच्या मेहनतीने करत होते... मी खूपच भारावून गेलो... आम्हाला स्टिललाईफ मध्ये फळांची चित्रे काढण्यासाठी ते स्वखर्चाने अगदी रसरशीत महागडी फळे आणत... नोकरी म्हणून नव्हे, तर एक पवित्र कार्य म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना ते घडवत होते...

आर्ट स्कूलचा काळ भराभर उलटत होता. पोर्टेट, निसर्गचित्रण, पर्स्पेक्टिव्ह, शरीरशास्त्र, काम्पोझीशन, मूर्तीकला, ग्राफिक प्रिंट, असे विषय होते. सर्व विषयात मला निसर्गचित्रण सर्वात प्रिय. त्यासाठी पहाटे पासून पेस्टल, तैलरंग, जलरंग वगैरेचे सामान, ईझल वगैरे घेऊन दूर दूर सायकलने जायचे, एखादा स्पॉट आवडला कि तिथे बसून चित्रे रंगवायची. सक्सेना सर म्हणायचे कि एकाच साच्यात अडकू नका, वेगवेगळी माध्यमे वापरून काम करा. मग जलरंग, तैलरंग, याबरोबरच आम्ही लाकूड घासण्याच्या रेजमाल वर ओईल पेस्टल ने चित्रे काढणे वगैरे प्रयोग करायचो.

आर्टस्कूलची वेळ संपल्यावर आम्ही तीन-चार विद्यार्थी सक्सेना सरांबरोबरच बाहेर पडायचो. आपापली सायकल हातात धरून पायीच आमची मिरवणूक निघे. सर आम्हाला इंदुरातल्या जुन्या गल्ल्यांमधून फिरवायचे, आणि चित्रकलेच्या दृष्टीकोणातून समोर दिसणार्‍या विविध दृष्यांमधले सौंदर्य उलगडून दाखवायचे. ते सर्व बघून-ऐकून आम्ही कमालीचे भारून जात असू.

वर्षातून दोन-तीनदा शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन व्हायचे. ते दोन तीन दिवस आम्हाला खूपच शिकायला मिळायचे. रात्री दीड-दोन पर्यंत काम करून आम्ही प्रदर्शन लावायचो. त्यावेळी त्या सर्व चित्रांवर सर विवेचन करायचे, शिवाय चित्रांचे माउंटिंग, फ्रेमिंग कसे करायचे, योग्य तितकी जागा मधे सोडून चित्रे कशी प्रदर्शित करायची, अश्या गोष्टीही शिकायला मिळत. या सर्व गोष्टींचा मला पुढील जीवनात खूपच उपयोग झाला.

खरेतर त्याकाळी आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीला किरकिरे सरांनी तैलरंगाचे सर्व सामान, हॉग हेयर ब्रश वगैरे आणायला सांगितले. (हॉग म्हणजे काय, हे घरी जाऊन शब्दकोशात बघितले, तर 'अंड बडवलेला डुक्कर' असा अर्थ दिलेला होता) हे ब्रश, रंग महाग होते, मोठी पंचाईत झाली. मग स्वस्ताचे पावडर कलर, बेल तेल आणून खलबत्त्यात घोटून तैलरंग बनवले, आणि गायीच्या शेपटीचे केस कापून ब्रश बनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी हे सामान वापरून पोर्ट्रेट करू लागलो, ते बघून किरकिरे सरांनी विचारले कि घरून पैसे मिळत नाहीत का वगैरे....त्याकाळी निदान इंदुरात तरी चित्रे विकली जाणे वगैरे ऐकीवातही नव्हते. यातून पैसा मिळू शकतो वा मिळावा, हे काही मनात नसायचे. आम्ही आपले झपाटल्यासारखे चित्र रंगवत असायचो.

सक्सेनासरांखेरीज माझे त्या काळातील मार्गदर्शक म्हणजे इंदुरातील त्याकाळचे प्रसिद्ध चित्रकार विष्णु चिंचाळकर. ऊर्फ 'गुरुजी'. ते अतिशय उत्कृष्ट चित्रकार तर होतेच, पण विशेष म्हणजे त्यांचेकडे सर्वाना मुक्तद्वार असायचे. कुणीही केंव्हाही गेले, तरी ते आपुलकीने बोलत, तासन तास गप्पा करत. त्याकाळी ते प्रत्यक्ष पेंटिंगपेक्षा, निसर्गात सापडणार्‍या वा मानव निर्मित लहान-सहान वस्तूंतील सौदर्य उकलून दाखवणार्‍या अतिशय सुंदर रचना करत. त्याना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांची ती निर्मिती बघून आणि त्यावर चालणारे त्यांचे भाष्य ऐकून अगदी भारून जात असे, आणि जगाकडे बघण्याचा एक अगदी नवीन, आनंददायक असा दृष्टीकोन घेऊन परत जात असे. गुरुजींच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप त्यांच्या त्या लहान-लहान रचनांमधून दिसून येत असली, तरी मला आपले वाटत रहायचे, की त्यांनी मोठमोठी तैलचित्रे रंगवावीत... गुरुजी एवढे मोठे, प्रसिध्द चित्रकार, पण त्यांची राहणी अगदी साधी, वागणूक विनम्र आणि प्रेमळ.
...ते दिवस आणि माझे ते शिक्षक मला अजूनही अगदी रोज आठवतात...
सक्सेना सरांचे एक चित्रः
.

प्रचेतस's picture

5 Sep 2015 - 6:46 am | प्रचेतस

हा प्रतिसाद स्वतंत्र धाग्याच्या रुपात यायला हवा होता.

अर्थातच. हा स्वतंत्र धागाच व्हायला पाहिजे. असे दुर्मिळ शिक्षण अन असे दुर्मिळ गुरुवर्य. अप्रतिम असे वर्णन अन त्याला प्रत्येक बारकाव्याच्या स्मरणशक्तीचे वरदान. आज शिक्षक दिनानिमित्त साष्टांग दंडवत घ्या गुरुवर.

प्यारे१'s picture

5 Sep 2015 - 2:41 pm | प्यारे१

+अर्थातच अनुमोदन.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:28 am | माहितगार

चित्रगुप्त तुमची आठवण आवडली. या दुव्यावरील बातमीतील आणि तुमचे शिक्षक चंद्रेश सक्सेना एकच का वेगवेगळे. (दोन्ही एकच असतील तर आणखी थोडी सामुग्री जोडून मराठी आणि हिंदी विकिपीडियावर त्यांच्या बद्दल छोटासा लेखही होऊ शकेल.) प्रचेतस म्हणतात तसे वेगळ्या धागा लेखाच्या स्वरुपात तुम्हाला अजूनही जरासे विस्तारण्याचा मौका मिळेल.

पु.ले.शु.

चित्रगुप्तांच्या आठवणी आवडल्या.चिंचाळकर गुरुजींबद्दल पुलंनी कुठे तरी कुमारांसोबतच्या मैफिलीबद्दल लिहिताना लिहिलंय बहुधा.त्यांच्यावरच कोणत्यातरी दिवाळी अंकात लेखही वाचला होता.

नाखु's picture

5 Sep 2015 - 12:15 pm | नाखु

शाळेत फक्त शिक्षक न राहता पालकच झालेले सगळे शिक्षक्गण हे वंदनीय आणि खरंच अनुपम होते.
त्यात आमच्या ८ वी तील वर्गशिक्षीका लिमये बाई आणि ९ वी तील न म जोशी हे खास.

मिमये बाई गणीताबरोबरच संस्कृतही शिकवत असत. अगदी तन्मयतेने.शाळा निम्न मध्यमवर्गीय पालक असलेल्या बालकांची तरी शाळेचे कल्पक शि़क्षक आणि दूरदर्शी तडफदार आणि ध्येयवादी मुख्याध्यापक आदरणीय भिलवडकर सर यांनी वेग-वेगळे उप्क्रम राबविले. पुण्यात बंद इमारतीतला (शाळेतला) पहिला जलतरण तलाव आमच्याच शाळेतला.

शाळेच्या गल्लीला ज्यांचे नाव दिले आहे ते ल.ग.देशपांडे यांनी पदरमोड करून स्व्खरचाने स्लाईड प्रोजेक्टर शाळेत आणला होता (सन १९८०) त्या वर त्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या स्लाईड्स दाखवून सटीप माहीती देत असत (आता जरी हे काल्बाह्य वाटतं असल तरी त्या काळी बरेच खर्चीक आणि दुरापास्तच होते) त्या व्यासंगापोटी देशपांडे सरांनी सह्याद्रीच्या काना कोपर्यात फेर्‍या केल्या आणि मुलांसाठी, शाळेसाठी हा माहीती खजीना मिळविला.

भिलवडकर सर शाळेला इतके समर्पीत होते की संपूर्ण सेवा कालावधीमध्ये फक्त २-३ वेळाच रजा घेतली होती (स्वतःचे लग्नसमयी आणि त्यांचे वडीलांचा देहांत झाला त्या दिवशी) त्यांच्या निधनानंतर सकाळ मध्ये दखल या सदरात त्रिदलचे डॉ.सतीश देसाई (पूण्यभूषण पुरस्कार फेम आणि आम्च्या शालेचे माजी विद्यार्थी) यांनी गौरवले़ख ही लिहिला होता.

मागी काही वर्षात प्रापंचीक धबडग्यात पूर्ण विस्म्रुतीत गेलेल्या आठवणी तुकड्या तुकड्यात(विस्कळीत) आठवल्या त्या इथे टंकल्या.

मला आणि आणि माझ्या सारख्या शेकडो विद्यार्थ्यांना स्वावलंबन सचोटीचे ज्ञान देणार्या गुरुवर्यांचे आभार आणि त्यांना अभिवादन.

गोपाळ हायस्कूल सदाशीव पेठ
माजी विद्यार्थी नाखु

माहितगार's picture

5 Sep 2015 - 12:56 pm | माहितगार

भिलवडकर सर .....डॉ.सतीश देसाई .... यांनी गौरवले़ख ही लिहिला होता...

लेख साधारणतः कोणत्या वर्षी आला असेल ? गोपाळ हायस्कूल बद्दलही आंजावर पुरेशी माहिती दिसत नाही. काही दुवे उपलब्ध असल्यास द्यावेत.

नाखु's picture

5 Sep 2015 - 2:32 pm | नाखु

दरम्यान.

शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे.

या लेखाचे कात्रण मला माझ्या शालेय मित्राने दाखवले होते साधारण १२-१५ वर्षांपूर्वी दाखवीले होते.

त्याला संपर्क करून बघतो.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 2:41 pm | माहितगार

शाळा संचालकांच्या अंतर्गत दुफळी-बेदीलीने रयास गेली आत अगदी नाम मात्र चालू आहे.

बाहेरून रेस्टॉरंटच नाव तेच असांव, पण म्यानेजमेंट बदललं की पदार्थ आणि सेवेतही अंतर येते, माझ रेस्टॉरंट उदाहरण अगदीच मॅच होत नाही पण बर्‍याच संस्थांच होत असं उलट एखादी संस्था माणसे बदलून टिकुन कशी राहते हा अजूनही उत्तर न सापडलेला संशोधनाचा विषय असावा.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 12:42 pm | माहितगार

@ चित्रगुप्त चिंचाळकर गुरुजींबद्दल त्यांच्या मुलाने लिहिलेल्या आठवणी आंजावर दिसत आहेत. बाकीपण आठव्णी दिसत आहेत. विकिपीडियावर लेख येण्यासाठी ज्ञानकोशीय उल्लेखनीयताही दिसते. पण त्यादृष्टीने माहितीची जरा कमी अद्याप भासते.

पूर्णनाव जन्म मृत्यू इत्यादींच्या नोंदी शोधताना अधिकाधीक ज्ञानकोशीय माहिती गोळा होते. विष्णु चिंचाळकर यांचे पूर्ण नाव मिळाल्यास विकिपीडियाच्या दृष्टीने बरे पडेल.

तुर्तास स्‍कूल ऑफ फाईन आर्टस, इंदूर या नावाने मराठी विकिपीडियावर एकोळी लेख चालू केला आहे. त्या लेखाच्या विस्तारात आपला सहभाग लाभावा ही विनंती.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 1:01 pm | माहितगार

चिंचाळकर नावावरून आठवले जनार्दन हरी चिंचाळकर, नावाचे कुणी मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते गृहस्थ याम्च्या बद्दलही मराठी विकिपीडियास माहिती हवी आहे.

दिव्यश्री's picture

5 Sep 2015 - 1:08 pm | दिव्यश्री

नाशिबाणे आजपर्यंत सगळे उत्तमोत्तम शिक्षक लाभले . त्यासगळ्यातुण अमके आवडले असे निवडणे मला तरी शक्य णाही .
अगदी आईबाबांपासून ते प्यांटवाल-सासुसासार्यांपर्यंत सगळेच आधी एक उत्तम माणूस मग शिक्षक असे लाभले. मला आयुष्यभर विद्यार्थिनी बनूण रहायला आवडेल . आजपर्यंत जे कोणी भेटले अगदी मिपाकरसुद्धा प्रत्येकाकडून काहीतरी चांगले शिकता आले. सगळ्याना धन्यवाद .

समस्त मिपाकराना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा .

मित्रहो's picture

5 Sep 2015 - 7:44 pm | मित्रहो

आता शाळेतल्या शिक्षकांविषयी फार आठवत नाही. अमरावतीला अभियांत्रिकी कॉलेजमधे असताना डॉ. बी. एन. जाजू किंवा जाजूसर म्हणजे त्या काळी सर्व विद्यार्थांसाठी आदर्श शिक्षक आणि आमच्यासारख्यांसाठी आजही आदर्श. विद्यार्थांमधे प्रचंड लोकप्रिय व्यक्तीमत्व. आम्ही कॉलेजात असताना सर अभिमानाने सांगत की आता मी दुसरी पिढी शिकवतोय. आमच्याच वर्गातील एका मुलाचे वडील आधी सरांचे विद्यार्थी होते. मी कॉलेज संपल्यावर चिपळूणला इंटरव्यूला गेलो होतो. इंटरव्यू घेणाऱ्याने विचारले तुझा आवडता विषय कोणता मी सांगितले आय. सी. इंजिन. त्या व्यक्तीने लगेच माझे कॉलेज बघितले आणि म्हटले 'तुम्ही जाजू सरांचे विद्यार्थी. नशीबवान मंडळी. तुम्हाला या विषयावर काही विचारायलाच नको.' सरांची काही वाक्ये अजूनही आठवतात. 'जे पुस्तकात दिले तेच मी शिकविले तर माझा उपयोग काय? तुम्हाला समोरच्या कॉलेजात झूलॉजी शिकायला पाठविले तरी तुम्ही त्यात पण फर्स्ट क्लासमधे पास व्हाल.' 'माझ्या वर्गात जर कुणाला झोप आली तर हा त्या विद्यार्थ्याचा नाही माझा दोष आहे.' 'आयुष्यात अनुभव घ्याा पैसा, प्रगती सगळे आपसुकच येइल.'
काही शिक्षक तुमची भेट न होताही शिकवून जातात. कॉलेजला द्वितीय की तृतीय वर्षाला असताना कुणाचे तरी लेक्चर होते. आमच्या डोक्यात इंजिनियरींग कॉलेजची हवा गेली होती. जगात साऱे मूर्ख आणि आपण फार हुषार असेच वाटत होते. टाइमपास करायचा म्हणून मी तिथे गेलो. अपेक्षा होती नेहमीसारखे पोडीयम असेल, माइक असतील, त्या काळच्या काळ्या स्लाइड आणि ते प्रोजेक्टर वगेरे असेल. तो व्यक्ती तिथे उभे राहून बोलत असेल आपण मागे बसून टाइमपास करु. तेंव्हा मागल्या बेंचावर जाउन बसलो. समोर कुणीच नव्हते, ना स्लाइड होत्या, ना कोणी व्यक्ती तिथे होता. आवाज येत होता म्हणून आवाजाच्या दिशेने बघितले तर तो व्यक्ती आमच्या बाजूला मागे उभा होता. दोन तास सतत विद्यार्थामधे फिरुन तो व्यक्ती आम्हाला सुपर कॉंपुटर विषयी सांगत होता. सहज टाइमपास करायला गेलेला मी त्या दोन तासात भारावून गेलो. कदाचित कॉंपुटरची आवड तेंव्हा निर्माण झाली असेल. अर्थातच त्या व्यक्तीचे नांव होते डॉ. विजय भाटकर. मला प्रत्यक्षात कधी डॉ. भाटकरांसोबत काम करायची संधी आली नाही. माझ्या कंपनीत आम्ही कॉलेज फ्रेशर मुलगा माझ्या टिममधे घेतला होता. त्याला काय काम द्यावे हा विचार करीत होतो. एकच काम होते पण ते काम कठीण होते आणि हा फ्रेशर. माझ्या मॅनेजरने सांगितले 'दे दो उसको. उसे बताना नही कि काम कठीण है. भाटकर साहाब कहते थे काम को काम रखो उसे आसान, मुश्किल ये तुम्हारा लेबल मत लगाओ. जो भा है उसे सिखने दो.' ती दोन वर्षे भाटकर साहाब कहते थे हे बऱ्याचदा ऐकले. अप्रत्यक्षरीत्या या साऱ्याचा कुठेतरी आमच्यावरही परिणाम झाला.
शेवटी शिक्षकांच्या बाबतीत आमचे एक सर म्हणायचे तेच खरे. "I don't teach you, I try to give you sense of world so that you keep learning throughout your life."

असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शिक्षण देउन मला शिकवनाऱ्या साऱ्या शिक्षकांना सादर प्रणाम.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2015 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

गवर्नमेंट इंजीनियरिंग,अमरावती???

एक दुरुस्ती सुचवतो राग मानु नका ते "भाटकर" नाही "भटकर" आहेत.

मित्रहो's picture

5 Sep 2015 - 8:49 pm | मित्रहो

दुरुस्तीबद्दल धन्यवाद
हो शासकीय अभियांत्रिकी अमरावती

आदूबाळ's picture

5 Sep 2015 - 8:34 pm | आदूबाळ

नाडगौडा सर

कॉमर्सला आलेल्या पोराचं अकाऊंट्स कच्चं असेल तर अगदीच छीथू व्हायची पाळी. वर्गातले जवळजवळ सगळे मोठमोठ्या कारखाना-टाईप क्लासेसना जात असत. आम्हां चार मित्रांना मात्र कोणत्या पुण्यक्षणी नाडगौडा सरांकडे क्लास लावायची बुद्धी झाली कोणास ठाऊक! नाडगौडा सर आमच्याच कॉलेजचे उपमुख्याध्यापक. पैसे मिळवण्याचा हेतू क्लास घेण्यात नसावा, कारण इतर कारखाना-क्लासेसच्या तुलनेत निम्मीच फी होती.

"शिकवण्याची कला" अशी काही गोष्ट असेल तर ती विषयप्रवेशाच्या - बेसिक्स शिकवण्याच्या - काळात सर्वात जास्त प्रमाणात लागत असावी. अकरावीच्या पोरांना डबल एंट्री सिस्टिम आणि जर्नल एंट्र्या वगैरे शिकवणं सीए फायनलला डिफर्ड टॅक्स आणि डेरिव्हेटिव्हज वगैरे शिकवण्यापेक्षा नक्कीच अवघड असावं. ज्ञान अंगी बाणतं, इंटर्नलाईज होतं, आणि आधी शिकलेल्या गोष्टींचा पायर्‍यांसारखा वापर करून पुढचं शिक्षण सोपं पडतं. पण मुळात या पायर्‍या बांधणारे थोरच.

कोणतीही घाई न करता, पर्फॉर्मन्स प्रेशर न टाकता सर धीमे धीमे शिकवत. "थ्री गोल्डन रूल्स" शिकवल्यावर ते म्हणाले, "हे तीन नियम एकदा तुम्हाला समजले की जगातलं कोणतंही अकाऊंटिंग अवघड नाही" - आणि ते खरंच आहे. "व्यवहार ऐकला की डोक्यात जर्नल एंट्री तयार झाली पाहिजे" हे अजूनही डोक्यात वाजतं, आणि प्रथम जर्नल एंट्री डोळ्यांसमोर येते. याचा पुढे खूप फायदा झाला.

बारावीत एकप्रकारची मिडियॉक्रिटी आली होती. आपल्याला काही जमणार नाही, जेमतेम पास होणार, मोठी स्वप्नं कशाला बघायची, वगैरे त्या दिवसांतले विचार. त्याला तडा द्यायचं काम प्रथम सरांनी केलं. "ज्याला फक्त बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार येतो त्यालाही अडुसष्ट मार्क मिळू शकतात. तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत." असं ते सांगत. (क्लासमध्ये पुण्यातल्या एका प्रसिद्ध परिवारातला एक मध्यमवयीन माणूस येत असे. काही केल्या तो अकाऊंट्समध्ये पास होत नव्हता म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आमच्याबरोबर तोही - बरोब्बर अडुसष्ट मार्क मिळवून - पास झाला. त्याने लाडवाएवढे पेढे वाटले होते!)

बारावीच्या रिझल्टच्या दिवशी या मिडियॉक्रिटी मनोवृत्तीचे बळी आम्ही दोन मित्र स्टेप-इनमध्ये बसलो होतो, आणि शंभर मार्क मिळाल्याची बातमी घेऊन सर इथेतिथे फोन करत आम्हाला शोधत होते...

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2015 - 10:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळासाहेब,

अहो हेच खरे शिक्षक! आम्ही तर साइंस घेऊन फसलेले जीव सालां साहित्य किंवा कायदा अन इतिहास वगैरे आवडतो हे कळायला ५ वर्षे लावुन बीएससी व्हावे लागले आम्हाला!!

बाकी स्टेपइन बद्दल काय बोलावे!! सिविल सर्विसेज चा एटेम्पट फेल गेला की आम्ही तिथे पड़ीक राहत असू! तुम्ही म्हणता तसलेच विचार! "सालां झक मारली अन हे बेभरवश्याचे स्पर्धापरीक्षा वाले अवलक्षण आठवले" वगैरे बोलत टेबलभर बियर च्या बाटल्या जमस्तोवर बसायचे! (तरी बरे स्वकष्टार्जित खरी कमाई अन खाऊ च्या पैश्यातुन दारु भागत असे त्या काळी)

सर्वच प्रतिसाद एकसे एक आहेत!

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2015 - 12:11 pm | बोका-ए-आझम

शाळा-कॉलेजच्या शिक्षकांविषयी फारशी आपुलकी, का कुणास ठाऊक पण वाटली नाही. पण पोस्ट ग्रॅज्युएशन करताना असे जबरदस्त शिक्षक लाभले की सगळी कसर भरून निघाली. पोलिटिकल कम्युनिकेशन हा एक विषय होता. त्याचं सिलॅबस वाचून तो जरा बोअर वाटत होता पण शांतिश्री पंडित मॅडमनी तो इतका इंटरेस्टिंग करुन शिकवला की त्यांच्या शेवटच्या लेक्चरला आम्ही त्यांना तुम्ही पोर्शन का संपवला असं भरल्या डोळ्यांनी विचारलं होतं. एमबीए करत असताना डाॅ.वेणुगोपाल यांनी जसं Sales and Distribution Management शिकवलं, त्याच्या १% जरी मी शिकवू शकलो तरी खूप झालं. आणि सर्वात शेवटी मला १० वीला क्लासमध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या लवलेकर मॅडम. अत्यंत कडक शिस्तीच्या पण तितकीच छान विनोदबुध्दी असलेल्या मॅडमनी इंग्लिशबद्दलचा न्यूनगंड मनातून कायमचा काढून टाकला. हे तिघंही शिक्षक माझ्या मते शिक्षणकलेच्या क्षेत्रातले असामान्य कलावंत होते. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता पाळण्याऐवजी मी त्यांच्या ऋणात राहणंच पसंत करीन.