होयहोय- नाहीनाही

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 6:31 pm

सकाळचे चार वाजले होते. घरातील सर्वच माणसे गाढ झोपी गेली होती. आज कोर्टाच्या कांहीतरी कामासाठी, शामरावला लवकर शहरात पोहचायचे होते.एवढ्या सकाळी एसटी पण असणार नाही,बघू काय वाहन मिळते का! शामरावने आपले सर्व विधी, आधीच आटोपले होते. बरोबर चंची,आडकित्ता,सुपारी सर्व कांही त्यांने आपल्या बरोबर घेतले होते. कंबरेला नेसायचे धोतर त्याने उगीच उशीर नको ,म्हणून हातातच घेतले होते. मळकट पांढरा शर्ट,त्या खाली लंगोटी ,डोक्याला मुडांस असा एकदंरीत त्याचा पेहराव होता. सोप्यात येऊन त्यांने एक मिणमिणता दिवा लावला. आपला मालक एवढ्या पहाटे कुठे निघाला आहे, या आश्चर्या ने त्याच्या दोन्ही म्हशी वळुन वळुन शामरावकडे डोळे वटारून पहात होत्या. त्यांच्या गळ्यातील घंटा व त्यांच्या शरीराची होणाऱ्या हालचाली मुळे शांततेचा भंग होत होता.शामरावने लगेचच म्हशीनी विस्कटलेला पाला हाताने गोळा केला व दोन गवताच्या पेंड्या जनावराच्या समोर टाकल्या. लगबगीने तो घराच्या बाहेर पडला. तो घरापासून दहा पावले चालत जातो न जातो, तोच त्याच्यावर एकदम कुत्री भुंकू लागली. उगीचच दगड मारल्याचा अविर्भाव करत तो ओरडला ''आरे बेन्यानों,मानसं ओळखिना कि काय तुमास्नी ? कदाचित ही चूक लक्षात आल्या प्रमाणे, कुत्री जवळून भुंकण्याच्या ऐवजी लांब जाऊन भुंकू लागली. कसाबसा शामराव मुख्य रस्त्या पर्यंत येऊन पोहोचला .

त्या काळ्या कुट्ट अंधारात, तो कांही वहान मिळते का ,याची वाट पहात तो एका दगडावर बसला. रातकिड्यांची किर किर... अखंड चालूच होती,दगडांचा गार पणा त्याला आता चांगलाच जाणवू लागला. बर्‍याच प्रतिक्षे नंतर त्याला दूरवरून येणारा एक दिवा दिसला आणि त्याची आशा पल्लवीत झाली. समोरून एक रिक्षा येत होती. येणार्‍या रिक्षेला पाहून त्याने ''अहो रिक्षावाले थांबा थांबा'' म्हणत त्याने रिक्षावाल्याचा रस्ता रोकोच केला.सुरवातीला न थांबेल ,असे वाटणारा रिक्षावाला पंचवीस पावले दूर जाऊन थोड्या अंतरावर थांबला .शामराव रिक्षेच्या जवळ गेला. कान टोपी घातलेला जाड्या रिक्षेवाला ,आत बसला होता. अंधारात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

''अवं रिक्षावाले,अमानि जरा वाइच शहरात सोडा की ,लई मेहरबानगी होईल बगा ,तुमचा काय भाडा असेल ते घ्या''असे म्हणत शामरावने त्या रिक्षावाल्याला विनवणी केली.
''हे बघा आत बसलेला आमचा पावना, लई सिरीयस आहे,त्याला अॅडमीट कराया मी शिटीतल्या दवाखान्यात चाललोय,त्यातनं आनी तुमी येनार असाल , तर चला. भाडा पाच रुपये पडेल,आधी सांगतो,नाहीतर नंतर कीचकीच नको,''—रिक्षावाला
''आव दादा आमाला काय, बुड टेकाया इतभर जागा मिळाली तर लई झाल '' शामराव
असुदे !आसुदे ! जरा सरकुन बसा म्हणत त्याने खाण्णकरून रिक्षेचे हँडल ओढले. शामराव पण बिगीबिगीने लगेच रिक्षेत बसला.चला एक तर काम मनासारखं झालं असा त्याचा अविर्भाव होता।

सोलापूरी करड्या रंगाची, फुले असणारी मळकट चादर, गुंडाळलेला पावणा शामरावच्या शेजारीच टेकुन बसला होता, जोरात येणार्‍या वार्‍या मुळे त्यांने पांघरलेल्या चादरीचे कोपरे जोरात उडून, त्याचा फडफड अवाज येत होता. रिक्षाने आता चांगलाच वेग पकडला होता.बाहेरून येणारी गार हवा व रस्त्यात येणार्‍या खड्ड्यांच्या मुळे ,प्रवास खूप खडतर वाटत होता.जशी रिक्षा पुढे जाऊ लागली, तसे रिक्षेच्या मशिनचे कंपन वाढत होते ,त्यात इंजिनचे चित्र विचित्र अवाज.मध्येच खड्डा आला ,की पावण्याची मान एखाद्या स्प्रिंगच्या बाहुली प्रमाणे कधी" होय होय" तर कधी "नाय नाय" म्हणत होती.अचानक एक मोठा खड्डा आला, तसा पावणा धक्याने शामरावाच्या गळ्यातच पडला. अगदी शामरावाला त्याने जोरात मिठ्ठीच मारली .शामरावांचे डोक्याला बांधलेले मुडांसे सुटून हातात आले.शामरावानी स्व:ताला कसे बसे सावरले व पावण्याला ढकलत मुळ जागेवर बसवले. आता आजारी माणुस आहे, म्हटंल्या वर अस कांही तरी हुनारच कि ?अशी मनाची समजुत घालत शामराव थोडे स्थिरावले.परत थोडे अंतर गेल्यावर , परत हाच प्रकार.!!!असे दोन तीन वेळेस झाले ."आयला पावन्याला काय मिठ्ठी मारायची बिमारी झाली आहे कि काय ? असा विचार शामरावाच्या डोक्यात येऊ लागला.आता ह्या खेपेस, शेजारी बसलेल्या पावण्याचे डोके रिक्षेच्या एका बाजूच्या कोपर्‍यात होते तर त्याचा बुड शामरावच्या बाजूला कलला होता. थोडे अंतर गेल्यावर रिक्षाच्या हादर्‍याने पावण्याचा बुड शामराव कडे हळुहळु सरकू लागला.
''आवं पावनं जरा सरकूनश्यान बसा की," म्हणत शामराव ही अंग चोरत दुसर्‍या बाजुला सरकू लागले.पावंन लई शिरीयस दिसताय ,काय बोलतबी नाही ''म्हणत शेवटी शामरावने आपल्या उजव्या बाजूचा पाय डाव्या पायावर ठेवला व पावण्याला आणखीन जागा करून दिली.येवढी जागा करून देखील पावणा शामरावचे बाजूने आणखीन घसरू लागला.
''आवं पावणं जरा नीट बसा की राव.ऑ ऽ ऽ आमची बी गाडी आता एका टायरवर आलीया नव्ह!!! असे म्हणत शामरावला काय करावे सुचेना.थोडे पुढे गेल्यावर पावण्याचा आणखीन तोल गेला व त्याचे डोके रिक्षेच्या मधील जागे कडे सरकत धप्पकन खाली पडले.या खेपेस त्याचे पाय शामरावांच्या गळ्यात हाते.शामरावचा आता मात्र संयम सुटला. त्याने पावण्याचे पाय जोरात झटकले, तसे पावण्याचे पाय रिक्षाच्या बाहेर व तोंड रिक्षेच्या दुसर्‍या बाजूने बाहेर लोंबकळू लागले व त्याच्या डोक्याचे" होय होय ऽ ऽनाही नाही ऽ ऽ" मात्र जोरातच चालु होते.

आता मात्र शामराव च्या काळजाचा ठोका चुकला.रिक्षा शहराच्या जवळ येऊन पोहचली होती. कांही तरी काळंबेंर आहे हे लक्षात येताच शामराव रडक्या आवाजात जोरात ओरडू लागला '' ओऽ ऽ रिक्षावाले थांबा थांबा, मी खाली उतरनार ऽ ऽ म्हणत त्याने, रिक्षावाल्यच्या गळपट्टीला हात घातला. एवढा प्रकार होउन देखील रिक्षेवाला मात्र निर्विकार पणे रिक्षा चालवीत होता. शामरावाच्या गोंधळामुळे त्याने रिक्षा थांबवली .शामराव ची चांगलीच बंभेरी उडाली होती.तो टुणकरून रिक्षेतून बाहेर पडला व रिक्षेवाल्यास म्हणाला ''आवं रिक्षेवाले हे काय गौडबंगाल आहे, तुमचा पावणा बघा, कसा ! आडवा तिडवा पडलाय ते!!. काय खंर आहे ते सांगा नाही तर मी बोंबा बोंब करीन आणि लोकास्नी गोळा करीन "

त्या वर रिक्षेवाला चांगलाच चपापला व तो एखद्या पोपटा सारखा बोलू लागला'' आवं मामा तुम्हांला काय सांगू , हे माग ठेवलय,ते माझ्या धाकल्या भावाच प्रेत हाय,दारूच्या येसना पाई दारू पिऊन पिऊन रात्री मेल, माझी कारभारीण म्हणाली, "आता भावाच्या खुनाचा आरोप तुमच्या डोई वर येनार,पोलीस तुमासनी पकडूनशान नेणार आनि मंरस्तवंर लई मारनार, त्या पेक्षा हेन्ना सरकारी दवाखान्यात दाखल करा, आनि मयताचा पास काढूनशान आणा" ,म्हणून एवढ्या रात्री त्येला घेऊन चाललो होतो,तंवंर तुम्ही भेटला. मला बी मयताची लई भिती वाटत होती. तेला धरून बसायला मला बी कोणीतरी माणूस पाहिजे होता आणि कुणाला संशय येऊ नये ,म्हणुन तुमास्नी रिक्षेत घेतलं.

हे ऐकल्यावर शामराव चा चेहरा एकदम काळा ठिक्कर पडला. त्याला काय करावे हेच सुचेना . त्याच्या जिवाची एकदम घालमेल झाली व त्याने काढतापाय घेतला. मयताला शिवलोय म्हटल्यावर आंघोळी बिगर कोर्टात कसा जानार,त्यात त्याला पावण्याचा" होय होय" ऽ ऽ "नाही नाही" ऽ ऽ म्हणणारा चेहरा आठवू लागला......
संजय वाशीकर

कथालेख

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

1 Jul 2015 - 6:35 pm | सौंदाळा

जबराट आहे हा किस्सापण
मस्तच लिहिता तुम्ही.

एस's picture

1 Jul 2015 - 6:41 pm | एस

=))

NiluMP's picture

1 Jul 2015 - 10:22 pm | NiluMP

मस्त.

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 12:16 am | उगा काहितरीच

उगाच वाचलं रात्री .

शि बि आय's picture

2 Jul 2015 - 12:09 pm | शि बि आय

भन्नाट!! होयहोय-नाहिनाहि

आनंदराव's picture

2 Jul 2015 - 5:54 pm | आनंदराव

मस्त

सूड's picture

2 Jul 2015 - 6:01 pm | सूड

=))