"क्षणोक्षणी तापणारी समई….संजूमावशी"

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
27 Jun 2015 - 11:38 am

"चेतन…. ए चेतन…" आईनं हाक दिली.
मी माझे जवळपास कपडे आवरले होते. एल.एल एम, ला पुण्यात अ‍ॅडमिशन घेतली होती. त्यासाठीच्या सामानाची आवराआवर चालू होती. तीन-चार हाका देऊनही मी अगदी अपेक्षितपणे उत्तर दिले नव्हते. आणि ह्याचीही सवय असल्याने अगदी शांतपणे तिनं पुन्हा हाक मारली.
"आलो गं" मी.
आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत आई माझं सगळं व्यवस्थित आवरून ठेवत होती. माझी बॅग भरत असताना ती म्हणाली.
"हे बघ… हे आहेत भूकलाडू… नाश्त्याच्या वेळी खात जा. उजव्या कप्प्यात ठेवतीये. खव्याच्या पोळ्या पण देतीये, आठवडाभर चांगल्या राहतात. खूप भूक लागली असेल आणि जवळपास काही नसेल तेंव्हा खात जा…. चारीमुरीला तुला आवडतो तो ……. अरे… चेतSSSSन … आणि तो मोबाईल ठेव जरा बाजूला … मी काय म्हणतीये???"
"अगं हो…. माझं लक्ष आहे तुझ्याकडे…. बोल" मी मोबाईल चार्जिंगला लावत म्हणालो.
"चारीमुरीला तुला आवडतो तो पोह्याचा चिवडा हा इथे ठेवलाय … पेपर मध्ये गुंडाळून…. आणि ह्या इथे… ह्या कोपर्यात चॉकलेट ठेवलंय…. अधूनमधून खात जा… आणि थोडं थोडं खात जा… नाहीतर पोट बिघडेल…."
"व्वा…. म्हातारे…. व्वा… पण ह्या पिशवीत काय दिलंय?? आणि ही पिशवी पण नवी दिसतीये…" मी एक रंगीबेरंगी पिशवी बाहेर काढत तिला विचारलं…
"अरे हो… ते तुला सांगायचंच रहिलं… त्या पिशवीत तुला आज रात्रीसाठी पोळीभाजी दिलीये… हॉटेल मध्ये नकोस खाऊ…"
"बंर…. पण ही पिशवी??" पिशवी जरा विचित्रच शिवल्यासारखी वाटत होती. आणि आई असं शिवणं शक्य नाही.
"छानै ना??"
"हो … पण … ना…. "
"अरे… ती पिशवी संजूच्या आनंदानं केलीये…." आई माझं वाक्य तोडत म्हणाली… आणि मी लगेचंच म्हणालो…
"व्वा …. आई फारच सुंदर शिवलीये गं…. "
"हम्म …. अशात तो शाळेमध्ये शिवणकामाच्या नादाला लागलाय…." आई ती पिशवी आत ठेवत म्हणाली.
"चांगलंय… तेव्हढंच संजूमावशीला आराम… "
"आराम??? आणि तिला?? ह्ह…" असं म्हणून आई उठली.

लहानपणापासून आपल्या सर्वांच्या मनावर ठसवलेली एक गोष्ट म्हणजे… आत्तापर्यंत सगळ्यात दानशूर हा कर्ण होता. त्याला जर कोणी काही मागितलं तर त्यानं काही कोणाला कधीच 'नाही' म्हटलं नाही. हाच त्याचा स्वभाव नंतर त्याच्या जीवावर उठला. आपलं आयुष्य हेही एका अत्यंत विचित्र दानशुरतेचं प्रतिक आहे असं मला बर्याचदा वाटतं. म्हणजे बघा ना… तुम्हाला जे काही मागायचंय ते तुम्ही मागा, पण काय आणि कसं द्यायचं हे आयुष्यं स्वतःच ठरवतं. आणि त्याने दिलेलं दान स्विकारण्यावाचून आपल्याकडे कोणताच पर्याय नसतो मग भलेही ते दान आपल्याच जीवावर उठो…. असंच आयुष्यानं दिलेलं अत्यंत विचित्र दान संजूमावशी अगदी मनापासून सांभाळतिये.…. आनंदाच्या रुपानं….

संजूमावशी म्हणजे माझ्या आईची बालमैत्रीण. मी खूप लहान असताना आईसोबत संजूमावशीकडे गेलो होतो. साधारणपणे दुसरी-तिसरीत असताना. तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा आनंदाला भेटलो. स्वतःच्याच नादात दिसला तो. वाटेल तेंव्हा हसेल… मोठ्याने ओरडेल.… उगंच "याSSSSयी …. याSSSSयी " चा गजर चालू ठेवेल…. हातातलं खेळणं मोडून फेकेल किंवा फेकून मोडेल… आणि मोडलेलं खेळणं घेऊन वर कोणाला तरी दाखवत बसेल.… तोंडामधून मुखरस अखंड पाझरत असलेला. त्याची त्याला जाणीव नसायची… संजूमावशीला लक्षात आलं कि ती लगेच पुसायची. तो तिला मारायचा. ती त्याला जवळ घ्यायची. तो तिला चावायचा… ती काहीच बोलायची नाही…. आईनं मला आधी सांगितलं होतं कि तो आजारी असतो पण हा असला काही आजार असतो हे मला तेंव्हा कोठे माहित होतं?… तो खूपच अस्वस्थ दिसत होता.
"काय गं?? का अस्वस्थ दिसतोय आनंद आज?" आईनं विचारलं.
"आता काय सांगू गं तुला?? एक तर …. बर्याचदा…" नंतर संजूमावशीला काही बोलवलंच नाही… आईच्या मांडीत डोकं ठेवून ती बराच वेळ पडून राहिली…
"अशात जर काही त्याच्या मनाविरुद्ध घडलं ना… तापंच चढतो गं… आणि अजून..... सगळंच नाही…. गं…. समजत…. त्याला काय हवंय ते…" तिनं परत डोळ्याला पदर लावला.

'आनंद' तिचा हा पहिला मुलगा… जेंव्हा ह्याचा जन्म झाला तेंव्हा अगदी राजबिंडं आणि गोंडस रूप होतं. कोणीही बघितलं कि लगेच उचलून पापे घ्यावेत इतकं गोड…. पण एका तापाचं काय निमित्त झालं…तो डोक्यात काय गेला…… डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला आणि आयुष्यभराचं अतीमतीमंदत्व त्याला चिटकून बसलं …… आणि संजूमावशीचं आयुष्य त्याला….

आनंदा वयानं, शरीरानं, वाढतोय. पण त्याच्या जाणीवा अजून वर्ष दीड वर्षाच्या मुलासारख्याच आहेत. त्या समृद्ध कधीच होणार नाहीयेत. त्याला कधीच कळत नाही, आपण काय करतोय?, कसं करतोय?, कसं करायला हवं? कसं वागायला हवं? मी आईसोबत जेंव्हा संजूमावशीकडे गेलो होतो तेंव्हा बाथरूम मधून दाराला हात लावून मी बाहेर येत असताना त्यानं जोरात दार लावलं आणि माझ्या डाव्या हाताचं मधलं बोट त्यात अडकलं. मी कळवळून ओरडू लागलो. तोही कावराबावरा झाला पण ते दार उघडायचं त्याच्या काही लक्षात आलं नाही. ते दार उघडलं गेलं अर्थातच आई आणि मावशी पळत आल्यानंतर. माझं काळं-निळं झालेलं बोट पाहून मावशीला खूप मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.… पण कोणाला बोलणार? आणि काय बोलणार?…. पण मला खूप राग आला होता त्याचा… आणि सगळ्यात म्हणजे साधं सॉरी पण नाही… मी शेवटपर्यंत बोलायचंच नाही असं ठरवलं होतं पण नंतर मावशीनं मला रंगीबेरंगी पेन्सिलचा बॉक्स दिल्यावर मी त्यासोबत खेळू लागलो.…

आनंदाचं असं झाल्यापासून संजूमावशीचं जग चार भिंतीत सीमित झालं. जवळपास तिनं बाहेर जाणं तसं बंदच केलं.

फार हौशीनं त्यांचं नाव आनंद ठेवलं गेलं. पण त्याच्यामुळे कधीच आनंद मिळाला नाही. उलट आयुष्यभर भळभळत राहणारी जखम मात्र बनून राहिला. पण संजूमावशी त्याला कधीच लोढणं म्हणून वागवत नाही. अश्वत्थाम्याचा हा भळभळता वारसा सांभाळत असताना ती कधीही आनंदाला दूर लोटत नाही. स्वाभाविकच ह्या सगळ्यात तिला स्वतःच्या आशा, आकांक्षा ह्या सार्यांना क्षणोक्षणी तिलांजली द्यावी लागतेच आणि ही वस्तुस्थितिसुद्धा संजूमावशी आनंदाने स्वीकारते. आजही तिचा दिवस आनंदासोबतच सुरु होतो आणि संपतोही त्याला झोपवल्यानंतरच.

आनंदाचे बाबा शिफ्टमध्ये काम करतात. जेंव्हा जेंव्हा त्यांची नाईट शिफ्ट असते तेंव्हा मात्र संजूमावशीचं काम फारच अवघड होतं. रात्र ही आजारी माणसासाठी बर्याचदा वैर्याचीच का असते? मला खरंच नाही कळत. जर कोणी आजारी असेल त्याला जास्त त्रास रात्रीच होतो. वैयक्तिक अजूनही मला आजारी असताना रात्रीची प्रचंड भीती वाटते. आनंदातर रात्री खूपच हिंस्त्र होतो. एक तर ह्या अश्या रुग्णांमध्ये शक्ती खूप असते जी कि एका धडधाकट माणसालाही भारी पडते. संजूमावशी कशी त्याला सांभाळते आणि तीही एकट्याने? मला नेहमी प्रश्न पडतो.

संजूमावशी फारशी कुठल्या कार्यक्रमात हजेरीही लावत नाही. मुळात तिलाच रस नसतो कारण तिच्याबाबतीत "रोजचेच मढे त्याला कोण रडे" ही म्हण लागू होत नाही. तिच्यासाठी 'वेदनेची सवय होणे' ही अवस्थाच नाही. खरंतर अशा वेदनेची सवय होणे आणि काही काळानंतर काहीच नं वाटणे ही वस्तुस्थिती असूच शकत नाही. ती जेंव्हा जेंव्हा आईला भेटते, तेंव्हा तेंव्हा दोघींच्या पदराची कड ओली होतेच होते. फारच जवळचं जर कार्य असेल तर आनंदाच्या बाबांना रजा काढावी लागते. मग ते आनंदाला सांभाळायला घरी थांबतात. तेंव्हाच ती जाते.

तोच प्रवास करणं सुसह्य असतं जिथं जाण्याचं ठिकाण निश्चित असतं. त्याच वेदनेची कल्पना करता येते जिला एक्सपायरी डेट असते. पण जर एखाद्या वेदनेला अशी डेटच नसेल तर??? मग अश्या वेळेस काळ नावाचं औषधसुद्धा हतबल ठरतं. काळ जसाजसा बदलत जातो तसतसं ह्या गोष्टीचं गांभीर्य अधिकच गडद होत जातं. तसं पहायला गेलं तर अश्या वेदनेत औषधच जास्त धोकादायक ठरतं. बदलता काळ ह्या अश्या जखमेची परिमाणं नक्कीच बदलू शकतो किंबहुना बदलतोच. वाढत्या वयात जाणीवा जरी नाही समृद्ध झाल्या तरी निसर्ग थोडंच ऐकणारे?? आता आनंदानं तिशी पार केली असेल. आणि आता त्याचं वागणं कसं झालं असेल?… कशी कल्पना करू?? करतंच नाही.

मला आधी प्रश्न पडायचा, कधी संजूमावशीला असं वाटत असेल का? की कशाला हे पोरगं जन्माला आलं? आल्या आल्याच का नाही मेलं? ही कसली ब्याद आयुष्याभरासाठी आपल्याला चिटकलीये? कधी सुटणारे? वगैरे वगैरे…. कारण जर कुठलं दुखणं थोड्याकाळासाठी असेल तर सहन करता येतं झेलता येतं. पण हे असलं नं बरं होणारं दुखणं?? पोटचा मुलगा जरी असला तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण नंतर लक्षात आलं कि जर संजूमावशीला तसं वाटलं असतं तर तिनं त्याला स्वतः कशाला सांभाळलं असतं? बर्याच संस्था आहेतच कि अश्यांना सांभाळायला. पण तिनं कोण्या संस्थेच्या दारात जाण्यापेक्षा स्वतःच एक संस्था व्हायचं ठरवलं…… तिच्या आनंदासाठी… आज ती आनंदाला अधूनमधून मतीमंद मुलांसाठी चालवल्या जाणार्या कार्यशाळेत घेऊन जाते. तिथे त्याला त्याच्यासारखी असंख्य मुलं दिसतात. तो तिथे काही काळ रमतोही आणि संजूमावशीलाही जरा बरं वाटतं कारण तिच्यासमोर आनंदापेक्षाही अवघड अवस्थेतली मुलं असतात. समदु:खी माणसांची मैत्री फार लवकर होते. तिथे आनंदा आता पिशव्या, खडू, पतंग, कागदाची पाकीटं अश्या गोष्टी करायला शिकतोय. मग अश्या वस्तूंच्या विक्रीची सोय मावशी बघते. त्यातून आलेले पैसे ती आनंदासाठी काढलेल्या बॅंकेच्या अकाउंटमध्ये टाकते.

खरंतर संजूमावशीच्या पदरात जे काही दान पडलं तश्या कित्येक अभागी आया आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा मुलांना कधी चालत, कधी व्हीलचेअरवरून तर प्रसंगी कडेवरून सुद्धा त्यांचे आईबाबा घेऊन जाताना दिसतात. ह्या मुलांच्या डोळ्यात जेव्हढे कुतुहुलाचे भाव असतात तेव्हढेच अगतिकतेचे भाव त्यांच्या आई- बाबांच्या डोळ्यात दिसतात. आणि बर्याचदा समाज त्यांची खिल्ली उडवताना दिसतो. खरंतर समाज हा राजहंसासारखा असायला हवा ना?. असं म्हणतात कि राजहंसासमोर जर आपण दुध ठेवलं तर तो फक्त दूधंच पितो आणि त्यातलं पाणी तसंच त्या भांड्यात ठेवतो. आता हे कितपत खरं ते मला माहित नाही पण समाजानं असं वागायला काय हरकत आहे? चांगलंच स्वीकारायला काय हरकत आहे? निदान अशा मुलांच्या बाबतीत तरी… ज्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. समाज त्यांच्याबाबतीत कावळ्यासारखा वागताना बर्याचदा दिसतो. कावळ्याला जखम विद्रूप करायची सवय असते. ही अशी मतीमंद मुलं ही सुद्धा आपल्या समाजातली एक मोठी जखमच आहे जिची बरी व्हायची शक्यता खूप कमी किंवा बर्याचदा नसतेच. मग अश्या मुलांना उगाच दगडं मारणं, चिडवणं, ती चिडली कि हसणं, त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघणं… असं केलं जातंच. मग ती मुलं जास्त अस्वस्थ होतात… जास्त हिंस्त्र होतात. अश्यांना आवरणं खूप अवघड होऊन बसतं. आणि ह्या सगळ्यात जेव्हढा त्रास त्यांना होतो त्यापेक्षा जास्त त्रास मला वाटतं त्यांच्या आईबाबांना होतो. आपल्या समोर आपल्याच काळजाच्या तुकड्याची अशी थट्टा उडवलेली पाहताना, जिथे त्यांची काहीच चूक नाहीये, त्यांच्या आईबाबांना काय आणि कशा यातना होत असतील?? वपु म्हणतात तसं, ज्योतीपेक्षा समईच जास्त तापत असेल. असं तापणं आणि तापवणं नकोच म्हणून संजूमावशी शक्यतो त्याला घेऊन बाहेर जाणं टाळते.

तिला दुसरा मुलगा झाला. गोविंदा…. तोही दिसायला खूप गोड. पण सुदैवाने त्याच्या बाबतीत दुर्दैव आड आलं नाही. गोविंदा जन्मतःच कुशाग्र बुद्धीचा उपजला. आज तो सी. ए. झालाय. जी काही उणीव आनंदामध्ये देवांनं दिली होती ती सगळी गोविंदामध्ये भरून निघाली खरी पण एकाच घरात ही अशी दोन टोकं संभाळणं म्हणजे …. खूपच अवघड. आनंदा म्हणजे तिची दुखरी नस आणि गोविंदा म्हणजे उजवी बाजू. साधारणपणे जे काही दुखरं असतं तेच जास्त हळवं असतं. स्वाभाविकच जास्त लक्ष त्याच्याकडेच जाणार त्यामुळे उजव्या बाजूला कदाचित डावललं जाण्याची भावना स्पर्शून जाऊ शकते. पण ते तिने गोविंदाला कधीच जाणवू दिलं नाही. मुळात ह्या गोविंदावर लहानपणी असे संस्कार झाले कि आजही त्याला स्वतःलाही काही घ्यायचं असेल तर त्यात आनंदाचा शेअर ठेवला ठेवतोच. अशात गोविंदाच्या लग्नाचं बघताहेत तेंव्हा आपण होऊन, जी मुलगी माझ्यासोबत आनंदालाही स्वीकारणार असेल तिच्याशीच मी लग्न करेन, असा पवित्रा गोविंदानं घेतलाय. अर्थात ह्या सार्याचं श्रेय जेव्हढं संजूमावशीला जातं, तेव्हढंच किंबहुना काकणभर जास्तच गोविंदाला द्यायला हवं. निदान देवानं दुसर्या वेळेला तरी चूक केली नाही म्हणून तेव्हढ्याच प्रेमाने संजूमावशी गोविंदाला जवळ घेते.

आई सांगते, संजूमावशीचं गणित खूप चांगलं होतं. आईला काही अडचण असेल तर ती संजूमावशीला विचारायची. भूमितीतली अवघड अवघड प्रमेयं ती चुटकीसरशी सोडवायची. वहीच्या कागदावरची गणितं अगदी सहज सोडवणार्या संजूमावशीच्या आयुष्याच्या कागदावर नियतीनं असं काही गणित सोडवायला दिलं, कि आयुष्याची पन्नाशी पार झाली असूनही तिला ते अजून सोडवता आलेलं नाही. आणि तिलाही ह्याची पूर्ण कल्पना आहे कि हे गणित नं सुटणारं आहे… निदान तिच्या शेवटच्या श्वासापर्यंततरी… तरीही रोज सकाळी ती ते गणित मांडीवर घेऊन बसते. त्याला थोपटते. त्याला भरवते. पुन्हा सगळ्या पायऱ्या मांडून बसते. कुठली ना कुठली पायरी चुकलेली असतेच. त्याची तिला पुन्हा जाणीव होते. तिच्या मांडीवरचं गणित तिची मांडी सोडून खाली उतरलेलं असतं. स्वतःच्याच नादात हरवलेलं असतं. पुन्हा सगळ्या खेळण्यांचं मोडणं सुरु होतं (कदाचित त्याचंही अंतर्मन कोठेतरी देवाला असं म्हणत असेल…. की तुही माझ्या आयुष्याचं खेळणं असंच मोडलंस ना रे…) संजूमावशी अगदी शांत उठते. देवघरासमोर जाऊन "त्या" देवासमोर हात जोडते. त्याला अगदी मनापासून कळवळून जगण्यासाठी बळ मागते. डोळे भरून आलेले असतातच. तेव्हढ्यात… "ये…. याSSSSSयीSSSSS" म्हणून आनंदा ओरडू लागतो. ती … "हां … आले रे" म्हणून मागे वळते तेंव्हा……
.
.
.
.
तिच्या डोळ्यातल्या अश्रुंचा पुरावासुद्धा मागे नं ठेवता तिच्या ओठावर स्मित फुललेलं असतं.

(ता. क.: प्रस्तुत व्यक्तिचित्रणातली फक्त नावेच काल्पनिक आहेत.)

- चेतन दीक्षित

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 11:50 am | मुक्त विहारि

माझ्या एका मैत्रिणीच्या घरी अशीच परिस्थिती आहे.

व्यक्तिचित्रण वाचता-वाचता अक्षरे धूसर झाली.

अश्वत्थाम्याची जखम!

यावरून स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मिपावर लिहिलेली लेखमाला आठवली.

उगा काहितरीच's picture

27 Jun 2015 - 12:03 pm | उगा काहितरीच

(ता. क.: प्रस्तुत व्यक्तिचित्रणातली फक्त नावेच काल्पनिक आहेत.)

:-( :'(

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2015 - 12:16 pm | स्वाती दिनेश

वाचून स्तब्ध झाले. स्वमग्नता एकलकोंडेकर यांची लेखमाला आठवली.
स्वाती

सुबोध खरे's picture

29 Jun 2015 - 1:19 pm | सुबोध खरे

असेच म्हणतो
परंतु दुर्दैवाने त्या आईवडिलांना या जळण्यातून मरेपर्यंत सुटका नसते. तुमचा जीव तीळ तीळ तुटतो. पण काहीही करता येत नाही.
सुंदर लेखन

स्वीत स्वाति's picture

27 Jun 2015 - 12:49 pm | स्वीत स्वाति

कशा परीशितीमधून जात असतील अशा अपत्याचे पालक ..
देव अश्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना जास्त मानसिक बळ देवो.
आणि समाजाला थोडी तरी सद्बुद्धि देवो .

आमच्या घराच्या मागेही एक मुलगा असाच आहे .
त्याचे आई वडील रोज सकाळी त्याला चक्कर मारायला नेतात .
सुरुवातीला त्या मुलाला चलने जमत नव्हते तर उचलून नंतर तो मुलगा खुरडत खुरडत चालायला लागला, आणि आता उठून चालावा यासाठी त्याचे आई वडील रोज एका काठीने त्याला मारायचे , ते दृश्य पाहून खूप वाईट वाटायचे पण आता तो मुलगा बर्यापैकी चालायला लागला आहे आणि जेव्हा कधी तो माझ्या समोरून जात असतो तेव्हा मी त्याला हसून छान असे खुणावते तेव्हा तो मुलगा खूप आनंदित होतो.

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 1:17 pm | संदीप डांगे

अशक्य आहे हे जगणे... :-(

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 1:19 pm | संदीप डांगे

एक सुचवू का..? शिर्षकातला 'तापणारी' हा शब्द खटकतो आहे. त्याऐवजी दुसरा काही समर्पक शब्द देता येईल तर बघा.

साधारणपणे... आजारी व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीची सेवा करणार्या व्यक्तीचा त्रास हा जास्त असतो… वपुंचे एक सुंदर वाक्य आहे.. "ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते" म्हणून हे असे शीर्षक…


खरंतर समाज हा राजहंसासारखा असायला हवा ना?.

खुप आवडलं आणि पटलं हे वाक्य.

नाखु's picture

27 Jun 2015 - 2:17 pm | नाखु

सुंदर व्य्क्ती-चित्र आपली लेखन हातोटी विलक्षण प्रवाही आहे.

संवेदनायुक्त नाखु

पद्मावति's picture

27 Jun 2015 - 3:50 pm | पद्मावति

त्या आईची असह्य वेदना आमच्यापर्यंत तितक्याच तीव्रतेने पोहोचवली तुम्ही.
हा लेख वाचून खरंतर काय लिहावे हेच सुचत नाहीये पण तुमच्या लेखनशैलीला दाद दिल्याशिवाय राहावतही नाही. खरोखर अप्रतिम.

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 5:53 pm | नूतन सावंत

+११११.

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2015 - 7:39 pm | टवाळ कार्टा

:(

प्रियाजी's picture

27 Jun 2015 - 8:36 pm | प्रियाजी

लेखनशैली खूप छान. कथेचे शिर्षक अगदी योग्य. हकिगत अगदी मनाला भिडली. सन्जुमावशीच्या स्वभावाला अनुसरून्च देवाने हे बाळ त्यांच्या पदरात टाकले आहे.त्याचे बाबा आणि सन्जुमावशी दोघांना भरपूर शक्ती लाभो. सहनशीलता तर त्यांच्याकदे आहेच.

शि बि आय's picture

29 Jun 2015 - 1:07 pm | शि बि आय

अगदी खर आहे.
आयुष्यभर सोसावी लागणारी हि भळभळणारी जखम आहे ही.
ज्योतीला तेवत ठेवण्यासाठी समईला तपावेच लागते.

शेवटचा परिच्छेद जास्त आवडला.

माझ्या मावशीच्या मुलाचीच स्टोरी वाचत आहे असं वाटलं.. अगदी मावशीच्या मनातले सगळे भाव हुबेहूब मांडले आहेत तुम्ही..धन्यवाद.

तुडतुडी's picture

29 Jun 2015 - 3:21 pm | तुडतुडी

:-( दुसरं भावंड जर गोविंदा सारखं नसेल तर आपल्यामागे ह्या मुलाचं काय होणार ह्या चिंतेने आई वडिलांचा जीव किती पोखरत असेल

खरंय…. तशा दृष्टीकोनातून माझी मावशी नशीबवानंच

उदय के'सागर's picture

29 Jun 2015 - 4:08 pm | उदय के'सागर

अश्या पालकांना 'हॅट्स ऑफ'... आपल्या नॉर्मल मुलाने जरा त्रास दिला, हट्ट केला आपल्याला हवं ते आणि मनासारखं काही करू दिलं नाही की केवढा संताप्/रागराग करतो आपण. नकळतपणे का होईना पण काय ही 'बंधनं' असा विचार येतो. पण मग अश्या मुलांबद्दल आणि विशेषतः त्यांच्या पालकांच्या चिकाटी बद्दल पाहिलं/ऐकलं की स्वतःचीच लाज वाटते, मेल्याहून मेल्या सारखं होतं.
आमच्या घराजवळ ही एक असंच उदाहरण होतं. त्यांची मुलगी अशीच एक विशेष मुलगी होती आणि दोन मुलगे होते, ते सामान्य. त्यातला मोठा मुलगा माझ्या वर्गातला. कॉलेजला असताना तो कधीच कोणाला घरी बोलवत नसे म्हणजे ज्यांना त्याच्या घरी असं काही आहे माहितीये त्यांना तर नाहीच. राग यायचा त्याचा, वाटायचं एवढी काय लाज वाटते आपली बहीण गती-मंद आहे तर, शेवटी सख्खी बहीण आहे. माझ्या घरी असं असतं तर तितक्याच कौतूकाने मित्रांना बोलावलं असतं आणि बहिणीबद्दल जगजाहीर प्रेम दाखवलं असतं. पण हे वरवरचे विचार माझे, ज्याला हे रोजचंच आहे त्याच्या बद्दल काय कल्पना करावी... जे त्या घरातले हे रोजच अनुभवतात (खरंतर भोगतात म्हणायला हवं) त्यांना खरंच सलाम!

प्रेम जगजाहीर असावं लागत का?
उमलत्या वयात मुलांना कदाचित असेल ही या बहिणीबद्दल किंचीत शरम, पण जे मजरेआड आहे ते तुम्हाला माहित नसेल. घरातले सगळेच खुप करतात अश्या लोकांसाठी, त्याहुनही पलिकडे.....निसर्ग अश्या मुलांना शारीरिक भावना द्यायला विअसरत नाही, अन मग खुप गुंता असतो अश्या फॅमीलीत.

उदय के'सागर's picture

30 Jun 2015 - 2:30 pm | उदय के'सागर

हो अगदी सहमत, तेच म्हणायचं आहे मला माझ्या प्रतिसादात. माझे विचार वरवरचे आहे तो काय भोगत असेल काय काय करत असेल तिच्यासाठी हे मला थोडीच ठाऊक पण हे सारं नंतर समजलं, ह्या लेखाने त्याचा पुनःप्रत्यय आला इतकच. शिवाय माझे तेव्हाचे विचार हे आम्ही कॉलेजला असतांनाचे होते, थोडक्यात फार मॅच्यूअरड नव्हतो तेव्हा.

वटवट's picture

30 Jun 2015 - 10:59 am | वटवट

अगदी पूर्णपणे सहमत

पैसा's picture

29 Jun 2015 - 4:15 pm | पैसा

छान लिहिलंय. आवडलं तरी कसं म्हणू?

संदीप डांगे's picture

30 Jun 2015 - 1:43 am | संदीप डांगे

ज्याला त्याला त्याच्या त्याच्या सहनशिलतेच्या प्रमाणात दु:ख प्राप्त होतं का?

स्पंदना's picture

30 Jun 2015 - 6:41 am | स्पंदना

खूप व्यवस्थीत लिहीलं आहे तुम्ही वट्वट.

माझ्या आत्याचा मुलगा. जन्मल्याबरोबर (प्रसवात) जोरात जमिनीवर आदळला आणि त्याला फिट आली. ते अर्भक पुरं वेडवा़अड झालं. तेथुन पुढे भारतातल पहिल ओपन हार्ट सर्जरी करावी लागली त्याच्यावर, त्यावेळी रक्तस्त्राव हळू करण्यासाठी त्याला बर्फाच्या लादीवर ठेवल होतं. मग रक्ताभिसरण सुरळीत करायला गरम कपड्याने शेकल होतं. त्या भाजल्याच्या खुणा शेवटपर्यंत त्याच्या अंगावर होत्या. मी पाहिला तेंव्हा (माझ्या आईंपेक्षा वयाने १० वर्ष मोठा) स्वतःशी झगडत झगडत व्हेट झाला होता.
त्यानंतर त्याला कोकणात सरकारी नोकरी होती, पण त्याच्या दिसण्याने त्याला अतिशय वाईट वागणुक मिळत असे. एकदा त्याच्या रुममेट ने त्याला बाथरुम मध्ये कोंडून घातल आणि ३ दिवस गावाला निघून गेला. तेथुन पुढे सगळी वाताहातच.
शेवटी आता याच करअयच कोण असा प्रश्न आला कारण आत्या ब्रेन्हॅमरेज ने आजारेए झाली. त्या नंतर दोन व्र्षांनी एकदा सकाळी उठल्याबरोबर म्हणाला आता नविन बाळ आहे घरात जुन्या बाळाची काय गरज. (त्याच्या लहाण भावाला मुलगी झाली होती. अन ती ३ वर्शाची होती साधारण) संध्याकाळी ४ ला शांत्पणे गेला.
काय आयुश्य ते. किती परवड. मुंबईत त्यांच्या घरी कोणी यायच नाही, ते कुणाकडे जायचे नाहीत. फक्त नातेवाईक. मुलगा म्हणुन शरीराच्या मागण्या.....घरात्ल बिनसलेल वातावरण. खुप काही.
फार सोसावं लागत आईला अन वडिलांना. मग बाकिचे कुटुंबीय सुद्धा होरपळतातच...हो तापलेया समई सारखेच!

एस's picture

30 Jun 2015 - 7:26 am | एस

अवघ्या जगण्यालाच दु:खाचा विळखा पडलेली ही माणसं. असं काही वाचलं की काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाही.

रातराणी's picture

30 Jun 2015 - 8:16 am | रातराणी

खरच काय लिहू कळत नाहीये प्रतिक्रियेत. :(

कससंच झालं हे वाचून…. श्या…

कससंच झालं हे वाचून…. श्या…

वटवट's picture

30 Jun 2015 - 11:02 am | वटवट

सर्व सहृदय प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार…