विस्मरणातील पांडुरंग

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
22 Jun 2015 - 11:59 am

काही माणसं निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा काही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार असतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले.

आम्ही सुट्टीत नृसिंहवाडीला गेलो, की पांडु हा आमच्या कुतुहलाचा विषय असायचा. काळा कळकट रंग, गांधीजीच्या सारखे कृश शरीर, पांढरी वाढलेले दाढी, लोकलज्जेसाठी नेसलेला पंचा, मानेच्या हेलकाव्याने हलणारी त्याची पांढरी शेंडी. कधी हसला, तर दिसणारे पिवळे दात, चेहरा कायम भांबावलेला, घाबरलेला. हातात मात्र नदीतून पाणी भरण्यासाठी कायम घागर. वास्तविक पाहता दत्त दर्शनासाठी दूरवरून भाविक लोक येत असत, देवधर्मासाठी, प्रसादासाठी हजारो रुपये खर्च करीत आसत, मात्र पाणी भरण्याच्या निमित्ताने हजारो वेळेस दत्त महाराजांच्या समोरून येऊन देखील, पांडु मात्र देवाला कधीच नमस्कार करीत नसे. देवावर त्याचा इतका का राग होता कुणास ठाऊक? कदाचित त्याला पाणी भरण्याचे टारगेट दिलेले असायचे. ते न भरल्यास त्याला मामाच्या शिव्यांचा महाप्रसाद मिळात असे. दिवसातून शंभर शंभर घागरी पाणी पांडू नदीतून भरून आणत असे. एखादा माणूस पाण्याने हात पाय धुवू लागल्यास, हा आपला जीव कासावीस करुन घेत असे. पाण्याचा रंग काय आहे हे त्या पांडुरंगास चांगले माहीत होते.

पांडुरंग वेडा मुळीच नव्ह्ता. त्याला पंधरा वीस वर्षा पूर्वीच्या गोष्टी विचारल्या, तरी तो त्या अगदी बरोबर सांगत असे. पांडु अतिशय प्रामाणिक होता, त्याला मामाने "पांडु मी जरा बाहेर जाऊन येतो, घराकडे लक्ष ठेव," असे सांगितले तर तो घराच्या दारातून माणूसच काय, पण एखाद्या मुंगीला सुध्दा आत सोडणार नाही. खाण्या पिण्याची कधी सुध्दा तक्रार करणार नाही. अन्नदाता मालक जे देईल,ते त्याला मान्य असे. एकेक वेळी त्याच्या बोलण्याच्या टिपण्या इतक्या मार्मिक असत की समोरचा देखील थक्क होत असे. मला एकदा लवकर परगावी जायचे होते, तेव्हा मी त्याला म्हणालो, "पांडु मला लवकर बाहेर जायचे आहे, सूर्य उगवण्याच्या आधी मला उठव." त्यावर तो म्हणाला, "सूर्य उगवला तर ना! सूर्य उगवलाच नाही तर मी तूला कसा उठवणार." असे काही ऎकल्यावर याला वेडा तरी कसे म्हणायचे असे वाटे.

अशी अनेक माणसे आपल्या समाजात सर्वत्र आढळतील. ज्यांच्याकडे आत्मविश्वास हा प्रकारच नाही. ज्यांना त्यांनी लहानपणापासून आपली माणसे मानली, त्यांनाच यांनी मरे पर्यंत कवटाळले. त्यांच्याच धाकात ही मंडळी जन्मभर राहिली. काम चुकारपणा केला तर घरातील वरिष्ठ मंडळी त्याला रागवत. त्यांच्या समोर तो चिडीचूप असे, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत तो फारच खुश असे. इतर कामाच्या बायका, मुलांच्या वर रागवून आपला रुबाब दाखवी. मात्र याचा परिणाम त्यांच्यावर काहीच होत नसे, उलट याला ती हसून दाद देत असत. "काम केले नाहीस तर तुला घरा बाहेर काढीन," असे जरी कोणी म्हटले, तरी पांडु जोरजोरात रडत असे. मग रात्री जेवणास ही नकार देई. घरातील बायका त्याची समजूत काढून त्याला जेवणास भाग पाडत. घरातील वृध्द व मोठया स्त्रियांची सहानुभुती पांडूला फार होती. घरात काही गोडधॊड केले की त्या पांडुला आवर्जवून देत असत. लहान मुलांच्यावर त्याचा फार जीव होता. मलाही त्याने अंगाखांद्यावर खेळवले होते. आम्ही लहान मुलेदेखील त्याच्या खूप खोड्या काढीत होतो. कधी त्याच्या शेंडीला दोरी बांध, तर कधी त्याच्या पंचाला कागदाची झुरमूळी लाव. पण आम्हा मुलांच्या वर तो कधी चिडत नसे. घरी बाळंतपणासाठी आलेल्या मुलींची लहान मुले, रात्र रात्र भर रडत, त्यावेळी पांडु मात्र त्यांना रात्रभर घेउन बसत असे. त्यांना उगी उगी करत रात्रभर जागत असे. पांडुरंग आहे, म्हटल्यावर त्या लहान मुलांच्या आया रात्रभर ढाराढूर झोपून टाकत. सकाळ झाली की "हा घे तुझा ढेकूण,रात्र भर मला चावला बघ" असे म्हणून बाळाला पांडु त्याच्या आईच्या स्वाधीन करीत असे. अशा कामाच्या वेळी मात्र पांडु सर्वांना हवा हवासा वाटे. असा घरकामाचा गडी ज्यांचे कडे असेल, तो घरमालक किती भाग्यवान असेल नाही !
पुर्वी कुरूंदवाडच्या चित्रपटगृहात चित्रपट पहाण्यासाठी महिलांसाठी बैठक व्यवस्था स्वतंत्र असायची. आमची आई, मावशी, मामेबहिणी चित्रपट पाहायला जात होत्या, मात्र पुरुष माणूस कोणी तरी बरोबर पाहिजे म्हणून पांडोबाना बरोबर घेत असत. अशा वेळी चित्रपट पहाण्यासाठी मात्र पांडुरंग महिलांच्यातच बसायचे. त्यामुळे डोअरकिपरची चांगलीच पंचाईत होत असे. तो वारंवार तिथे येऊन पांडुच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकून पहात असे. महीलांसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर बसण्याचा दावा करणारा त्या काळातील पांडुरंग हा महाराष्ट्रातील पहिला क्रांतिकारी असावा, थोडक्यात पुरुष असण्याचा हाच काय तो, त्याच्या अयुष्यात झालेला त्याचा एकमेव फायदा!

आजोळच्या बनात खेळता खेळता आम्ही लहान असणारी मुले कधी मोठी झालो हे मात्र कळले नाही. प्रत्येक जण आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागला. मात्र या कालचक्राच्या फेरीत पांडु मात्र कुठे विस्मरणात गेला हे मात्र कळलेच नाही. मध्यंतरी नृसिंहवाडीला महाभंयकर पूर आला. हजारो लोक बेघर झाले. पूर ओसरला तशा रोगराइ व साथी सुरु झाल्या. याच वेळी पांडुरंगाला कडकडून ताप भरला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. अशा माणसाच्या जाण्याने फार कुणाला वाईट वाटत नाही की त्याच्या साठी रडणारेही कोणी नव्हते. ज्यांच्या अयुष्यात भावनीक विश्व नाही ती व्यक्ती म्हणजे जीवन जगणारा अव्यक्त मानवी सांगाडाच, परमेश्वराने दिलेले की लादलेले जीवन,कोणास ठाउक? ज्या ज्या वेळी मी वाडीला जातो, दत्तदर्शन घेतो व जुन्या घरी येतो, त्या वेळी मात्र उगीचच वाटते की कोणीतरी आपल्याला हाक मारतोय "काय सरजू ! कधी आलास"? व मग मात्र मन भूतकाळात जाते व पांडुच्या आठणीने डोळ्यांच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग एका गाण्याची ओळ आठवते "संत वाहाते कृष्णामाई, तीरा वरल्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही"

---संजय वाशीकर.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

सुंदर रेखाटलेय व्यक्तिचित्र. तुमची लिहिण्याची शैली छान आहे. लेखाची सुरूवात आणि शेवट एकमेकांशी सुसंगत आहेत. आणि केवळ लेखनाचे तंत्रच चांगले आहे असे नाही, तर त्यातील गाभाही पुरेपूर उतरला आहे. तुमची पांडुरंगाबद्दलची कळकळ जाणवली, पोहोचली.

मागेही कुणीतरी अशीच आठवणीतली माणसे या नावाने लेखमाला लिहिली होती, काही भागांनंतर परत पुढचे भाग आले नाहीत. असो.

तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा.

छान लिहीलंय व्यक्तीचित्र.डोळ्यासमोर उभा राहिला पांडु.पुलेशु.

उगा काहितरीच's picture

22 Jun 2015 - 1:19 pm | उगा काहितरीच

वा छान लेख!

बबिता बा's picture

22 Jun 2015 - 1:24 pm | बबिता बा

कुरुंदवाडला जाता का तुम्ही ?

विनोद१८'s picture

22 Jun 2015 - 3:08 pm | विनोद१८

चांगलाच परिणाम साधलाय.

कंजूस's picture

22 Jun 2015 - 3:23 pm | कंजूस

लक्षात राहिला पांडुरंग.

पद्मावति's picture

22 Jun 2015 - 7:30 pm | पद्मावति

तुमचा पांडुरंग तुमच्या लिखाणामधुन उठून थेट आमच्यासमोर उभा राहयलाय. फार आवडलं.

नाव आडनाव's picture

22 Jun 2015 - 8:09 pm | नाव आडनाव

चांगलं लिहिता. आवडलं :)

आदूबाळ's picture

22 Jun 2015 - 8:46 pm | आदूबाळ

छान लिहिलंय.

कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र ...

हा धागा निसटला का? पांडुरंगाचं पूर्वायुष्य समजेल असं वाटलं होतं.

अस्वस्थामा's picture

22 Jun 2015 - 8:58 pm | अस्वस्थामा

हेच म्हणायचं होतं. नक्की पाणक्या कसा झाला ते नै पोचलं. पण बाकी मस्तच. :)

Sanjay Uwach's picture

24 Jun 2015 - 7:20 am | Sanjay Uwach

कांही जुन्या जाणकार मंडळींच्या मते पांडुरंग व त्याची आई महाराष्ट्राच्या सिमा भागातून आले होते.पाडुरंगाचे वडील पांडुरंगाच्या लहानपणीच वारले.पांडु व त्याची आई गरिब व भोळसट स्वभावाचे असल्या मुळे
त्यांच्या घरातील इतर लोकांनी त्यांची सर्व संपती फसवुन हड्प केली.त्यांना खूप मानसिक व शारिरीक त्रास दिला.या सर्व गोष्टिंना कटांळून त्यांनि आपले घर सोडले.पांडुच्या आईच्या माहेरचे लोक देखिल गरीब व असक्षम आसल्याने ,त्यांनी यांना कोणताही आधार दिला नसावा.ते मोल मजुरी करून पोट भरत होते.माझ्या मामाचा हाँटेलीगचा व्यवसाय असल्याने ते तिथे काम करण्या साठी आले होते. पांडु हाँटेल साठी पाणी भरत आसे व त्याची आई इतर काम करत होती.कांही दिवसात पांडुच्या आईचा मृत्यू झाला व कालातंराने मामाने आपला व्यवसाय ही बंद केला होता.त्यामुळे पांडुरंग मामाच्या घरातील एक सदस्य म्हणुन राहिला.मामाच्या पश्र्चात देखिल इतर मामानी त्याचा सांभळ केला.व्यवस्थित माहिती नसल्या मुळे हा धागा टाळला
विषयाच्या लिखणा बद्द्ल म्हणाल तर हा शब्दांचा खेळ आसे मी म्हणेन पण ज्या व्यक्ती विषई लिहला आहे आशा ,भोळसट लोकांच्या बद्दल फार कमी लिहले जाते.त्यांच्या बद्दल आपण जी कृतज्ञता व्यक्त केली आहे त्या बद्दल मी तुमचे आभार मानतो व त्या पांडुरंगास मनापासून नमस्कार करतो.-संजय वाशीकर.

खूप सुंदर लिहिलंय. लिहीत रहा!

द-बाहुबली's picture

23 Jun 2015 - 12:53 am | द-बाहुबली

छान लिहलय तरी का म्हणावं ? जर सत्य आहे तर ?

श्रीरंग_जोशी's picture

23 Jun 2015 - 1:53 am | श्रीरंग_जोशी

व्यक्तिचित्रण आवडलं. मी पाहिलेले असे काही घरगडी डोळ्यासमोर तरळून गेले...

सस्नेह's picture

23 Jun 2015 - 6:27 am | सस्नेह

सहज वर्णनातून उमटलेले स्वाभाविक व्यक्तिचित्र !

जुइ's picture

23 Jun 2015 - 7:43 am | जुइ

पांडूचे व्यक्तिचित्रण आवडले.

यशोधरा's picture

24 Jun 2015 - 7:59 am | यशोधरा

ह्द्य व्यक्तिचित्रण.

नाखु's picture

24 Jun 2015 - 8:21 am | नाखु

लिहिलेले अस्सल भावस्पर्षी लिखाण.

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥

शि बि आय's picture

24 Jun 2015 - 4:04 pm | शि बि आय

खूप छान … पांडू सारख्या स्वभावाने गरीब असलेल्या काही व्यक्ती चटकन डोळ्यासमोर आल्या. अश्या व्यक्ती फार कमी वेळा व्यक्त होतात.

शि बि आय's picture

24 Jun 2015 - 4:04 pm | शि बि आय

खूप छान … पांडू सारख्या स्वभावाने गरीब असलेल्या काही व्यक्ती चटकन डोळ्यासमोर आल्या. अश्या व्यक्ती फार कमी वेळा व्यक्त होतात.

शि बि आय's picture

24 Jun 2015 - 4:04 pm | शि बि आय

खूप छान … पांडू सारख्या स्वभावाने गरीब असलेल्या काही व्यक्ती चटकन डोळ्यासमोर आल्या. अश्या व्यक्ती फार कमी वेळा व्यक्त होतात.

बबन ताम्बे's picture

24 Jun 2015 - 5:14 pm | बबन ताम्बे

डोळ्यासमोर व्यक्ती उभी राहीली. छान लिहीलेय.

बॅटमॅन's picture

24 Jun 2015 - 5:43 pm | बॅटमॅन

.......

मुक्त विहारि's picture

24 Jun 2015 - 6:43 pm | मुक्त विहारि

आवडले...

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2015 - 12:53 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुरेख व्यक्तिचित्र ! मी जेंव्हा जेंव्हा अशी माणसे पाहिन तेंव्हा या पांडुरंगाची जरूर आठवण येईल !
लेखन आवडले हेवेसांनल !
लिहित रहा !

पैसा's picture

26 Jun 2015 - 12:05 pm | पैसा

खूप सुरेख लिहिलंय! पांडूसाठी खूप वाईट वाटलं. त्याला कोणत्याच नैसर्गिक भावभावना नसतील का?

मृत्युन्जय's picture

26 Jun 2015 - 12:11 pm | मृत्युन्जय

ब्याट्याचीच प्रतिक्रिया परत टंकली आहे असे समजा. अजुन काय लिहु?

पथिक's picture

26 Jun 2015 - 2:07 pm | पथिक

फारच छान लिहिलंय!

तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते बघून टागोरांची हि कविता आठवली:

A smile of mirth spread over the morning sky when you dressed my heart in rags and sent her forth into the road to beg.

She went from door to door, and many a time when her bowl was nearly full she was robbed.

At the end of the weary day she came to your palace gate holding up her pitiful bowl, and you came and took her hand and seated her beside you on your throne.