मानसिक होरपळ -रुग्णाच्या नातेवाईकांची...

सविता००१'s picture
सविता००१ in जनातलं, मनातलं
17 Jun 2015 - 2:44 pm

गेला महिनाभर मी एका वेगळ्या ताणामध्ये वावरतेय. त्यासाठी ठरवलं की आता इथेच या विषयाला तोड फोडूया आणि पाहू की रुग्णाची जवळची नातेवाईक म्हणून मी माझ्यात अजून काय सुधारणा करायला हव्यात? माझ्या हातून काही चुकतंय का? म्हणून हा प्रपंच.

त्याचं झालं असं : माझ्या बाबांना प्रोस्टेट कँसर झाल्याचं कळलं ही अचानकच म्हणजे अगदी आत्ता १ मे २०१५ च्या सुमारास आणि सगळ्या तपासण्यांमधून ऑपरेशन होईतो २ जून उजाडला. या काळात त्यांच्याच आग्रहामुळे मी कुणालाच- म्हणजे नातेवाईकांना हे कळू दिलं नाही. त्यांची चिडचिड नको म्हणून. त्यांच्याच कलाकलाने सगळं घेत होते/घेते आहे. पण या आजाराचं जेव्हा मला कळलं तेव्हा मी खरं सांगते, गेलेच हादरून. बाबांनाही डॉक्टरांनी पूर्ण कल्पना दिली आणि ते त्यांनी अत्यंत शांतपणे ऐकूनही घेतलं. पण हा आजार स्वीकारणं, तेही मनापासून इतकं सहज शक्य नाही याची पूर्ण कल्पना आहे मला. पण आता..

१. ते कधी नव्हे इतके चिडचिडे झालेत. त्यांना मला त्रास होतोय म्हणून, त्यांना स्वत:ला त्रास होतोय म्हणून, लोक येताहेत म्हणून असं होणं हे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाहीये. पण सध्या आम्हा दोघांचं बोलणं म्हणजे त्यांनी आक्रस्ताळेपणाने बोलणं आणि मी ते निमूट ऐकून घेउन एकटी असताना रडरड करणे एवढंच आहे की काय असं वाटतंय. त्यांना आम्ही दोघेच असताना मी सांगायचा खूप प्रयत्न केला, की बाबा, तुम्ही इतके छान आहात आणि आता असे का वागताय? तुम्हाला नेमकं काय होतंय? तुम्ही मला सांगा ना. आपण दोघं मिळून सगळं हँडल करू. लहानपणापासून मी तुम्हाला अगदी माय डॅडी स्ट्राँगेस्ट अशीच समजतेय आणि तुम्ही तसेच आहात. मला तसेच हवे आहात. मी आहे तुमच्याबरोबर. सतत. तर प्रतिक्रिया एवढीच-काही झालं नाहीये मला. तुला हवं तर तू जा तुझ्या घरी. अरे???????????? हा अर्थ निघतोय का माझ्या बोलण्यातून इथे?

२. घरी येणारे आगाउ पाहुणे- यात नातेवाईक- बाबांचे मित्र, माझे मित्र मैत्रिणी सगळे आले.
फार कमी लोक्स समजूतदार निघालेत. बाकीचे सगळे फुल्ल निगेटिव्हिटी घेउन येणारे/ तो अमक्याचा फलाणा असा गेला आणि त्या तमकीला असा त्रास झाला सॉर्ट ऑफ.हे लोक डोक्यात जाताहेत आणि हे बंद करू कसं ते कळत नाही. ही माणसं वाईट्ट आहेत असं नाही मला म्हणायचं पण असल्या गोष्टी बाबांच्या समोर त्यांनी बोलू नये असं जर मला वाटलं तर ते चूक आहे का? तसं एकदोघांना सांगायचा प्रयत्न केला तर त्या लोकांना राग आला. आता हे कसं काय जमवू मी? मी बाबांसमोर जर सगळं बळ एकवटून पॉझिटीव्ह रहाते आहे/निदान तसा प्रयत्न करतेय तर त्या हेतूलाच हरताळ फासला जातोय असं मला वाटतंय.

३. मलाच किती जण असा लूक देताहेत की कसं बापडी सहन करतेय हे सगळं?आडून आडून विचारतात की काय म्हणतात डॉ.? किती असेल आयुष्य? बघ बाई तू किती करायचं ते. तुलाही तुझं आयुष्य आहे. कसं गं बाई तुझ्या नशिबाला आलं. काही जण तर सरळ विचारतात देखील. अरे का या पंचायती? मला माझे बाबा हवेत. मला माहीत आहे ते व्हीलन नाहीयेत. मला पण येतोय राग त्यांचा. पण मला त्यांची मानसिक अवस्था कळतेय. पण या लोकांकडे जातेय का मी मदत मागायला? तेवढी जवळीक असेल आमच्यात तर विचारा ना. काहीही चाललेलं असतं. अक्षरश: संताप होतोय माझा. हॉस्पिटल मधे माझ्या बाबांचाच एक लांबचा भाउ आलेला. तिथे मला विचारतोय - बाबांनी विल केलंय का गं? केलं असेल तर बरच आहे. आता तुम्हाला वाटेल माझी काळजी की काय या काकाला. तर तसलं काही नाही. तू सगळं मॅनेज केलं आहेस दादाचं. तर तुझ्या हिश्शातले लाखभर मला देउ शकशील तर बरं होईल असं म्हणाला. आता विल च विचारावं पण जागा आणि वेळ चुकली असं नाही वाटत?????? मुद्दा चूक आहे असं म्हणतच नाहीये मी.

४. अनेक सल्ले. हे कर आणि ते कर. या डॉ.कडे जा आणि ही पॅथी घे - अमका अमका चक्क ३ महिन्यात बरा झाला वगैरे. आता याबाबत मी सरळ सांगतेय की मी डॉ. च्या व्यवस्थित संपर्कात आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मी सगळं करतेय. मग मी आता आगाउ ठरतेय. आवडत नाही लोकांना असं. आता मी एकटीच कुठे कुठे धावू? मुळात आमचे डॉ. चांगले आहेत, अनुभवी आहेत. मी त्यांनाच जाऊन म्हणाले की जी काय स्पष्ट कल्पना द्यायची आहे ती मला द्या. शिवाय मी एकटी आहे. त्यामुळे कुणीही काही सांगावं आणि त्यामागे फ़िरावं यापेक्षा मी नेमकं काय केलं पाहिजे ते तुम्ही मला सांगा, मी ते करेन आणि करते पण आहे. पण नाहीच हे पटत लोकांना. अपमान वाटतो त्यांना.

५. सगळ्यात धम्माल आमचा हीरोच. बाबा. त्यांना मी प्रत्येक आल्यागेल्याची खाण्यापिण्यापासून सरबराई केलीच्च पाहीजे असं वाटतंय आणि हे मला सगळ्यात अवघड जातय. फक्त किचन जॉब. आणि हाईट म्हणजे लोक मला फर्माईश करताहेत की अगं आज इकडे यायचं ना तर ठरवूनच आलो, आज हिच्या हातची मूग भजी खाउ???????? ही अशी मोठी माणसं?? मी खाणावळ उघडल्यासारखी किचन मुक्कामी असते हल्ली. आणि मला ते अजिबात आवडत नाहीये. पार कंबरडं मोडतय माझं. आणि आमचे बाप्पू म्हणतात, माझ्यासाठी येताहेत ते. तुला केलंच पाहीजे. त्यांचा लोकसंग्रह अफ़ाट आहे आणि मी कुणाची मदत घेणार नाही असला खाक्या पहिल्यापासून आहे. सुदैवाने त्यांना कधी तशी ती घ्यावी लागलीही नाही. त्यामुळेच कुणाला नाही सांगायचं. आपण दोघे बघून घेऊ हेच होतं.

६. आता याला कॉन्ट्रॅडिक्शन - जर कुणी म्हणालं की सविता आहे म्हणून किती बरंय तुम्हाला. ती किती व्यवस्थित करतेय सगळं.. तर बाबांचा रिप्लाय - हो. ती सध्या आलीये ना इथे? म्हणून. तिचे सासरे आजारी म्हणून आमचे जावई तिकडे आहेत, मग मी म्हणालो, तू ये तोवर इकडे.तिला हवं तेव्हा ती जाउ शकते सहज. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. आता हे काय नवीन?? यांना चहा पण येत नाही करता. ऑपरेशन झालंय. आजार हा असला. पुढची ट्रीट्मेंट अजून ठरायचीये. मग मुलगी माझ्याकरता आली आहे हे मानसिक दृष्ट्या का नाही स्वीकारत? कोणता कमीपणा आहे यात? मला खरच कळेनासं झालंय.

७ दुसरीकडे मला माझं आणि नवर्‍याचं काही काम असलं की मुंबई गाठायला लागतेय. मग एक दिवसभर तडतड. तेव्हा माझा काका थांबतो त्यांच्याजवळ. पहाटे ५ वाजता एकटीने रिक्षाने नको जायला म्हणून काकाला जबरदस्तीने माझ्याबरोबर पाठवलं परवा स्टेशनवर. तो पण म्हणाला की मी येतो. दादा काळजी करेल. पण स्टेशनवर आल्यावर मी त्याला म्हणाले नको उगीच प्लॅटफॉर्म तिकिट काढूस. मी जाते. घरी गेल्यावर त्याच्यावर इतकं रेशन घेतलं बाबांनी की कशावरून ती नीट गेली? काका हादरला त्या दिवशी. म्हणाला मी दादाला एवढा निगेटीव्ह कधी पाहिला नाही. आज का असा वागला?

८. त्यांना फक्त घरातलंच अन्न दे, विकतचं आणि प्रोसेस्ड फूड अजिबात नको असं सांगितलंय डॉ. नी. त्यामुळे मी घरीच वेगवेगळं करतेय. तर हे येणारे पाहुणे आपल्या अकला चालवतायत. हे घेतलं तरी चालेल आणि ते घेतलं तरी काही होत नाही. आणि याबाबत मी बोलायचा प्रयत्न जरी करायचा म्हटलं तर माझ्याच बाबांना माझा चक्क राग येतोय. मग मी गप्प. माझ्याकडे असतात एरवी बाबा. त्यामुळे पुण्यातलं घर एरवी बंद असतं. तर जरूरीपुरतं सामान आणलंय मी इथे. आणि लागेल तसं आणतेय. तर हे हॉल मधून फर्माईश करतात, तो अमुक ढमुक आलाय, तर आता सगळ्यांकरताच कर पोहे/उपमा/जे काही असेल ते. त्यांना म्हणाले बाहेरून काय सांगता? कधीकधी यांनी बाहेरून सांगितलं आणि नसलं तर कसं दिसेल ते? पण पटायचं नाव नको.

९. इतका चिकटपणा दाखवून लोक तासंतास बसतात की त्यांना हे पण भान नसतं की आपण एका पेशंट ला पहायला आलोय. फारसा वाईटपणा न घेता सांगू तरी कसं ? इथे फक्त नातेवाईक च नाहीत तर सोसयटीतले कुणीही आहेत. बरं माझ्यापेक्षा सगळेच मोठे आणि सगळ्यातलं सगळं कळणारे. कहर वागताहेत. परवा आमच्या सोसायटीतलंच एक कपल आलं बाबांना भेटायला. गप्पाटप्पा झाल्यावर त्या दोघांनी बाबांना अगदी खाली वाकून नमस्कार केला. मला जरा विचित्र वाटलं. तर त्या काकू आत येउन मला म्हणाल्या, काये ना सविता , तू करतेच आहेस सगळं. होतीलही ते बरे. पण नाही झाले तर? म्हणून आधीच नमस्कार केला. हे असलं वागू शकतात लोक? माझी जाम रडारड होतेय मग. पण बाबांसमोर नाही. नाहीच. अंथरुणात घुसून. असल्या लोकांना हाकलून पण देता येत नाहीये मला.

आता तुमच्यापैकी कुणी या किंवा अशा प्रसंगांना जर तोंड दिलं असेल तर कसे गेलात सामोरे सांगाल का? की जेणेकरून माझे अतिप्रेमळ बाबा परत तसे होतील/ व्हायला मदत होईल आणि मला थोडतरी पॉझिटिव्ह रहाता येइल?

कष्ट करायला काहीच हरकत नाही. पण सतत कारण नसतानाचे टोमणे, नकारात्मक भावना सहन होत नाहीये मला. मी न जाणो काही बोलून गेले आणि ते दुखावले तर? या भावनेने गप्प रहातेय खूप. पण आता मीच फुटेन की काय असं वाटतंय.

मला सतत अस वाटतं की माझ्या बाबांसाठी मी सदासर्वकाळ असलंच पाहिजे आणि तशी मी आहेपण. पण इतर लल्लू पंजू लोकांसाठी का?

मला यातून जे म्हणायचं ते फक्त इतकंच आहे की रुग्णाला त्याचा आजार असतो. त्रास असतो. त्याचा त्या माणसाला ताण येणारच आहे.
पण त्याच्याबरोबर जो माणूस त्याची काळजी घ्यायला असतो तो तर त्यापेक्षाही जास्त होरपळतो. मला माहीत नाही इथे किती जणांना हे म्हणणं पटेल. पण मला खरच असं वाट्तं. फक्त या काळजीवाहू माणसालाही जरा विश्रांतीची गरज असू शकते, त्याच्यापाशी आपल्याला पॉझिटिव्ह काही बोलता येणार नसेल तर निदान नकारार्थी तरी बोलू नये इतकंपण या माणसांना का कळत नाही?

सगळ्यात महत्त्वाचं हे की असा काही सुतकी चेहरा करून येतात ना भेटायला की मला खरच भीती वाटते. कितीतरी माणसं ७० व्या वयात घरात पडतात. पार बेड रिडन होतात. तेव्हा आपण असे चेहरे करतो का त्यांना भेटताना? मग हा आजार ऐकल्यावर असे का येतात हे? आणि मी हे टाळू कसं? डोक्यात जाणारी बाब म्हणजे आता संपलं बहुतेक सगळं असे मला मिळणारे लुक्स. आय हेट धिस!

बाबा तर माझे मलाच ओळखू येत नाहीयेत. इतका स्ट्राँग, पहाडासारखा माणूस एका महिन्यात पार अंतर्बाह्य बदलूनच गेलाय. मी समजू शकतेय पण समजावता येत नाहीये त्यांना. कारण त्यांनीच स्वतःला पार बंद केलंय एका कोषात. कधी उगीच आरडाओरड न करणारे माझे बाबा सध्या फक्त आणि फक्त तेच करताहेत.आणि मी दर दिवशी वेगळ्या अर्थाने कोसळतेय.

होरपळ असेल तर ती माझी पण आहे. शारिरिक पण आणि मानसिक पण.अगदी माझ्या बाबांएवढीच.

मी काय करू किंवा माझं काही चुकतंय का हे सगळंच सांगा. सगळे प्रयत्न नक्की करेन.

यात माझं कौतुक नकोय मला. मी जे करतेय त्यात माझाच स्वार्थ आहे. माझेच बाबा मला हवेत. पण त्यांनी कदाचित मनातून हा आजार स्वीकारला नसावा असं लक्षात घेउनही जड जातय मला. हेल्प मी आउट प्लीज.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

अमृत's picture

17 Jun 2015 - 3:24 pm | अमृत

माझ्या बाबांनापन prostate cancer झाला होता २००८ साली. मी नेट वर खूप माहीती काढली होती त्याटूनच काही.
१. हा रोग एकावयानंतर पुरुशांमधे खूपच सामान्य आहे
२. शसत्रक्रिएनंतर योग्य उपचार केल्यास पूर्णत: सामान्य आयुष्य जगता येते
३. कित्तेकदा हा detect होत पण नाही
४. लोकांचे फुकटचे सल्ले मनावर घेउ नका
५. नवीन कूणी आगाऊ सल्ले देत असतील तर फाटयवर मारा.
६. औषधी घेण्यात हयगय करू नका व सगळ्या टेस्ट PSA वगैरे वेळेत करा.
७. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
बाकी व्यनी किंवा खवतून बोलुयात.
तुमच्या वडिलांना उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना.

तुमचे सगळे म्हणणे पटले.

आजारपण, आणि त्यातही उतारवयात आणि गंभीर, आलेला मनुष्य बराचसा भावनाप्रधान होतो.

अशावेळी,

तुका म्हणे उगी रहावे आणि जे जे भोग समोर येतील ते भोगावे.

मागच्या जन्मीचे भोग, असे म्हणावे आणि गप्प बसावे.

सविता००१'s picture

17 Jun 2015 - 3:35 pm | सविता००१

गप्पच आहे हो मी आणि त्याचाच त्रास लिहिलाय मी वर.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 3:40 pm | मुक्त विहारि

तुम्हाला व्यनि केला आहे.

नकोशी माणसं घरी येणं बंद करा - पदरी वाईटपणा येईल - तो परवडेल तुम्हाला सध्याची तुमची परवड पाहता.
बाबांची सध्याची मनःस्थिती ही त्यांना वाटणारी भीती आहे - जी स्वाभाविक आहे. ती पेलणं हाच एक पर्याय आहे सध्या तरी.
दिवसातला काही वेळ स्वतःसाठी नक्की दया.
बाबांना संगीत आवडतं का? त्याचाही योग्य उपयोग करता येईल.

प्रसाद१९७१'s picture

17 Jun 2015 - 3:43 pm | प्रसाद१९७१

सविता - तुला खरड पाठवली आहे, ती बघ.

नाखु's picture

17 Jun 2015 - 4:07 pm | नाखु

अगदी या सांत्वन प्रकाराच्या बर्‍याच अप्रिय आणि कान्-कोंड्या अनुभवासाठी "स्वखी" गेल्या बरोबर अगदी तिसर्‍या दिवशी ऑफीसला गेलो होते २-३ दिवसांसाठी.
आला गेल्याला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावे असे घरच्यांचा (अगदी माझ्या आईचाही) आग्रह आणि आटोपशीर बोलणे नाही.
काही लोकांनी आश्चर्यही व्य्कत केले की असा कसा हा बेफिकीर म्हणून्.पण मी दुर्ल़क्ष केले.
आपण मनात अपराधीपणा न ठेवता खंबीर रहा आणि स्वतःला आनंदी ठेवा. बाबा आत्ताच चिडचिड करीत असतील तर लहान मुलासारखे सम्जून घ्या पण गोडी-गुलाबीने तुम्हाला होणारा मानसीक त्रास आणि त्यांची वाटणारी काळजी त्यांचे पर्यंत नक्की पोहोचवा.
देव तुम्हाला शक्ती+धैर्य देवो

नाखुस

स्पंदना's picture

17 Jun 2015 - 5:51 pm | स्पंदना

वा! वा! वा!!
काय रे माणस!
तिकडे सुरंगीताईचा धागा अन इकडे तुझा, अगदी हातावर हात मारावा असा जनमानसांचा अनुभव.
काय आहे ना सविता तु काहीही केलस तरी तू वाईटच!! मग त्यांना विरोध करुन वाईट हो ना? तुझ्या फायदयाच आहे तसे वागुन वाईट हो! बसू देत ओरडत. तुझी इन्वॉल्वमेंट कोणात? बाबांमध्ये. त्यांच्याकडे लक्ष दे. आणि हो हे सगळ तू एकटी करते आहेस, एकटीवर जबाबदारी आहे, तर कोणताही निर्णय घेण्याचा सर्वाधिकार तुझ्याकडे ठेव. अन त्या नमस्कार बिमस्कार वाल्यांना मस्त आशिर्वाद देउन टाक. मुर्ख कुठचे.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 5:58 pm | मुक्त विहारि

नात्या-नात्यातले संबंध जर इतके सरळ आणि साधे असते, तर अजून काय हवे?

बर्‍याचशा घरांत, कर्ता पुरुष बोलेल ते ब्रह्मवाक्य (भले चूकीचे असले तरी) आणि घरची बाई सत्य बोलली तरी, उलट-उत्तर.

त्यांचे घर पण जर अशाच प्रकारे असेल तर आणि घरच्या कर्त्या पुरुषाचा जर अशावेळी पाठिंबा नसेल तर, आगीतून फुफाट्यातच पडणे होईल.

नातेवाईक डब्बल ढोलकी असतात.

सविता तिच्या बाबांची तिच्या एकटीच्या बळावर उपचार आणि देखभाल करते आहे. नातेवाईक वील केलं असेल तर एक दोन लाख मला दे मागताहेत. मित्र म्हणवणारे शेजारेए नंतर मिळणार नाही म्हणुन नमस्कार करताहेत. काय आणि किती सोसायच? जिव्हाळ्याच माणुस आजारी आहे ते बघायच का हा असला स्वार्थाचा भांगडा हँडल करायचा? आपंण आजारी माणुस बघायला जातोय की पाहूणचार घ्यायला? हे जर लोकांना कळत नसेल तर आपणच किती समजूतदार पणा दाखवायचा? काय मदत करणार आहेत ही लोकं? जे मदत करणारे आहेत ते गुपचुप करतील, अन त्यांची जाण पण ठेवायची आपण. पण असले फडतूस कोण सांभाळणार? गेले उडत.

रेवती's picture

17 Jun 2015 - 6:36 pm | रेवती

शांत, गदाधारी भीम शांत!

त्या नेहमीच शांत रहायच्या.

खरेतर, त्यांनी काहीतरी बोलावे असे मला आणि माझ्या बायकोलाही वाटायचे.अद्यापही कधी-कधी असे प्रसंग येतात.पण त्या एकदम वैराग्य-मुर्ती.

सविता ताईंची ही तळमळ, मी माझ्या आईला पण सांगीतली.आईचे वडील कॅन्सर पेशंट असतांना, आमच्याकडेच होते.तिची पण घुसमट होत होतीच.

दोघींनी शांतपणे रोग्याची सेवा केली आणि आलेला प्रत्येक दिवस हसतमुखाने तर रात्र अंथरूणात तळमळत घालवली.

आई आणि सासूच्या म्हणण्यानुसार,

ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.

आज प्रथमच, तुमच्या बरोबर वाद-विवाद करत आहे.तो वाद संवादाकडेच जाइल ह्याची मला खात्री आहे.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 9:59 pm | मुक्त विहारि

माझ्या प्रतिसादापेक्षा, डॉ.खर्‍यांचा प्रतिसाद योग्य असल्याने, आमच्याकडून पांढरे निशाण.

आय अ‍ॅम सॉरी.

मुवि? आपल्यात सॉरी कधीपासून आले?
एकमेकाची मते ऐकण्याने संवाद वाढतो, वाद नाही.
राग तुमच्यावर कशाला? त्या ना ते वाईकांवर आहे.

रेवती's picture

17 Jun 2015 - 6:26 pm | रेवती

तू आणि बाबा असे दोघेही दिवसाची सुरुवात ध्यानाचे करता येते का ते बघावे असे वाटते. सकाळी शांत आवाजातील भजने लावण्याने काहीजणांना बरे वाटते. नातेवाईकांनी त्यांच्या सोयिने नव्हे तर तुमच्या सोयिने भेटायला यावे असे सांग. उदा. काका, आज नको, उद्या अमूक वेळा आलात तर बरे होईल, काय, वेळ नाही म्हणता मग पुढील अठवड्यात बघू वगैरे. हे जे आहे, ते फार अवघड आहे याची कल्पना आहे. आल्यागेल्यांना विकतचे खाणे दे, तेवढेच एक काम कमी!

प्यारे१'s picture

17 Jun 2015 - 6:52 pm | प्यारे१

सगळ्यात आधी patient ची मानसिकता बनवावी.
पुरुषांना आपल्या भावना चांगलया प्रकारे व्यक्त करता येणं सामान्यत: अवघड असतं नि त्यामुळं ते जास्त चिड़चिड़ करत असतात. आपल्याला मोठा आजार झाला आहे हे समजून घाबरणं हे स्वाभाविक असतं पण त्यांना हळूच समजावून सांगयला हवं की चाळीशीतले पन्नाशीतले लोक काहीही न होता अचानक फटकन जातात.
जन्माला आलेला माणूस जाणार असतो हे स्वीकारायला हवं. आणि ते जास्त करुन स्वत: समजावून घेऊन स्वीकारणं अधिक चांगलं. घाबरुन चिडचिड करुन आपला त्रागा जास्त वाढतो.
बाकी वडलांशी एकदा शांतपणं आणि मुख्यत्वे ठामपणं बोलावं. या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत नि या नाहीत याची कल्पना द्यावी. उदाहरणार्थ नातेवाईकांना राग आला तरी आत्ता येऊ नका असं सांगणार आहे इत्यादि. प्रसंगी आपला आवाज वाढवावा लागतो त्याला इलाज नाही.
डॉक्टर खरेंसारखे मिपाकर आपल्याला वेगवेगळ्या उपचार पद्धतीनबद्दल माहिती निश्चित देतील.
स्वत: panic न होणं हे रुग्ण आणि रुग्नाबरोबरच्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. खेळाचा वाईटात वाईट निकाल एकच असू शकतो पण म्हणून खेळ सोड़ता येत नाही. सोडू नये.

माझेच बाबा मला हवेत.

ह्यात सगळं आलं, हे वाक्य लक्षात ठेवलंत की जे काही समोर येईल ते व्यवस्थित पार पाडू शकाल.

सुबोध खरे's picture

17 Jun 2015 - 9:35 pm | सुबोध खरे

सविता ताई
एक गोष्ट म्हणजे प्रोस्टेटचा कर्करोग झाला म्हणजे सर्व संपले असे नाही. चौथ्या स्टेजचा रोगही व्यवस्थीत बरा होऊ शकतो किंवा रुग्ण बरेच दिवस जगतो. हा कर्करोग काही तेवढा भयंकर नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही लढाई हि जोवर तुम्ही लढणे थांबवत नाही तोवर तुम्ही लढाई हरला असे म्हणता येत नाही. तेंव्हा कंबर कसा पदर बांधा आणी लढायला तयार व्हा.
राहिली गोष्ट नातेवाईकांची-- तुमच्या डॉक्टरांशी बोला. त्यांना हि कल्पना द्या. त्यानि सांगीतले कि नातेवाईक आणी मित्रांना भेटायला बंदी आहे कि आपसूक लोकांना आळा बसू शकेल.मी माझ्या रुग्णांना स्वच्छ शब्दात सांगतो कि एक महिना डॉक्टरानी भेटायला मनाई केलेली आहे असे सर्व नातेवाईक आणि मित्रांना सांगा. कुणी विचारले तर माझे नाव खुशाल सांगा. नातेवाईक/ अप्तांमुळे जर जंतुसंसर्ग झाला तर त्याचे धुणे तुम्हालाच धुवायला लागेल हेही लक्षात ठेवा. तुमच्या वडिलांची शल्य क्रिया झाली आहे तेंव्हा त्यांना भेटायला येणारे लोक जितके कमी येतील तितके त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने चांगले आहे. आपल्याकडे आपण जाऊन आलो नाही तर कसे दिसेल यासाठी भेट देणारे लोक असंख्य असत्तात. असे लोक आले नाही तर उत्तम.
राहिली गोष्ट आपले नातेवाईक जे आपल्याकडे पैसे मागतात त्यांना आपण वसकन अंगावर ओरडून बोला कि वेळ काय आणी तुम्ही स्वतःचा स्वार्थ शोधता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आज जरी नातेसंबंध ताणले गेले तरी उद्या तुम्ही माझि मनस्थिती वाईट होती म्हणून मी तसे बोलले असे सांगून माफी पण मागू शकता. अन्यथा अशा माणसाशी संबंध तुटले तरी चालतील.
पाहुण्यांसाठी- शांत पणे चिवडा लाडू सारखे पदार्थ बाहेरून आणून ठेवा आणी कोकम सरबत किंवा तत्सम भरून ठेवा. आलेल्या माणसाची सरबराई करायचे हे दिवस नाहीत. जेवढी तुमची प्रकृती संभाळाल तेवढी तुमच्या वडिलांची काळजी घेणे तुम्हाला सोपे जाईल.
लोक हलकटपणे किंवा स्वार्थीपणे वागतात त्याला जशास तसे वागणे आवश्यक आहे. आपल्या काकांना तुम्ही मला व्याज किती टक्के देणार ते विचारा. ते आपल्याला काय म्हणतील याची चिंता करू नका कारण तुम्ही त्यांना पैसे दिले नाहीत तर ते तुमच्या बाबतीत वाटेल ते बोलायला कमी करणार नाहीत हे १०० % सत्य आहे.
आपल्या बाबांच्या अशा मनोवृत्ती बाबत सविस्तर विश्लेषण नंतर लिहितो( वेळेअभावी) क्षमस्व.
जमल्यास आपल्या वडिलांचे रिपोर्ट व्यनी तून कळवलेत तर त्याबाबत जास्त माहिती देणे शक्य होईल.दूरध्वनी ९८१९१७००४९
सल्ला फुकट मिळेल.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 9:58 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

@स्पदंना ताई,

माझ्या प्रतिसादापेक्षा, डॉ.खर्‍यांचा प्रतिसाद योग्य असल्याने, आमच्याकडून पांढरे निशाण.

प्रचेतस's picture

17 Jun 2015 - 10:16 pm | प्रचेतस

प्रतिसाद खूप सकारात्मक.
अतिशय आवडला.

सविता००१'s picture

18 Jun 2015 - 10:18 am | सविता००१

नक्की पाठवते. आपल्य सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. फक्त २-३ दोन तीन दिवस द्या मला प्लीज

स्रुजा's picture

17 Jun 2015 - 10:09 pm | स्रुजा

सवि , मला मेडिकली काही कळत नाही. तू पण डॉक्टरांचा सल्ला घेतेच आहे. इथलेही जाणकार मदत करतील च. पण एक सांगते, आता पुट युवर फूट डाऊन. माझ्या मावस आजे साबा आणि त्यांचे मिस्टर अगदी २-३ महिन्यांच्या अंतराने आजारी पडले. आजे साबांना कॅन्सर आणि साबु ना हार्ट प्रॉब्लेम. खुप मोठं कुटुंब असल्याने येणार्‍यांचा राबता पण तसाच. पण त्यांच्या दोघी मुलींनी गोड शब्दात नंतर येऊ नका म्हणुन सांगितलं आणि तेच योग्य पण आहे. आजे साबांच्या बहिणी, दिर आणि नणंदा म्हणजे त्यांच्या पिढीतले प्रत्येक कुटुंबा तले एक एक प्रतिनिधी येऊन गेले कारण त्यांचा जीव या सगळ्या पाहुण्यात होता त्यामुळे त्यांना बरं वाटायचं. आणि आलेले हे लोकं पण घरच्यासारखे मदत करायचे. पुढे ते दोघं बरे झाल्यावर सग ळ्यांना एक जेवण दिलं छान आणि काय गैरसमज होते ते मिटवले पण ती वेळ निभावुन नेली. तू पण पाहुणे निवड आणि त्यांना येऊ दे. बाकी लागेल तशी छोटी मोठी मदत सोसायटीच्या लोकांकडुन पण घे. म्हणजे मी बाहेर जाऊन येते आहे, किंवा बाबांना थोडी कंपनी हवी आहे, थोडं फिरायला न्याल का असं. लोकांना, बाबांच्या पेन्शनर मित्रांना अशी मदत करण्यात आनंद वाटेल. तुला ही थोडी मोकळीक मिळेल. आणि बाबा म्हणाले जरी की ही कधी पण जाईल परत तरी आलेल्याला माहिती आहे की ते तुझ्याच कडे असतात, तू तुझं सगळं सोडून इथे आली आहेस सो मनावर घेऊ नकोस. आपण लहान मुलांच्या भल्यासाठी थोडं त्यांच्या मनाविरुद्धत, थोडं त्यांच्या कलाने घेऊन करतो ना? तसंच हे पण कर आणि काहीही मनाला लावुन घेऊ नकोस. ही डझ नॉट मीन एनी ऑफ धिस हे लक्षात ठेव. मुख्य म्हणजे तू तुझी नीट काळजी घे, तुला मानसिक बळ टिकवुन ठेवायला शारिरीक बळाची पण गरज आहे, त्यामुळे योग्य खाणं पिणं आणि झोप हे बाबांबरोबर तुझं पण सांभाळ. बाकी तू खमकी आहेस, निभावुन नेशील च.

मुक्त विहारि's picture

17 Jun 2015 - 10:17 pm | मुक्त विहारि

+ १

Maharani's picture

18 Jun 2015 - 11:26 am | Maharani

मस्त प्रतिसाद...

द-बाहुबली's picture

17 Jun 2015 - 11:51 pm | द-बाहुबली

तुमच्या बाबांच्या मनाचा तोल थोडा गेलाय हे दिसतंच आहे. हे असलं दुखणं आपल्याच नशीबी का हा प्रश्न त्यांना आतुन इतका खातो आहे की... त्यांना काहीही सुचत नाही, अन कसे व्यक्त व्हावे कळत नाही.

आपल्या बाबांची ही चिडचीड अवस्था केमो व रेडीएशन सुरु होइल तेंव्हा अजुन बरीच वाढेल त्याला तोंड द्यायला खंबीर रहा. ही सुरुवात आहे, इथेच डगमगुन चालणार नाही.

चिडचीड वाइटच पण तरीही त्यांचे व्यक्त होणे सुरुच राहीले पाहीजे हे जास्त आवश्यक. भावार्थ दिपीका ग्रंथ त्यांच्या जवळ बसुन रोज थोडावेळ वाचत रहा. मनावरचा ताण नक्किच कमी होतो. रोग्याच्याही अन आपल्याही. यातुन त्यांना चिडचिड करायला बळ मिळते पण त्याचा फोलपणाही जाणवु लागतो.

बाकी पाहुणे ही फार मनावर घ्यायची गोष्ट नाही त्यामुळे फार विचार करु नका. अन हो कोणी खाद्यपदार्थाची एखादी फर्माइश सोडलीच तर ती आनंदाने पुर्ण करा. या आनंदात सर्वांना सहभागी होउद्या. रोग होणे दुखद आहे पण त्या सोबत जगणे दुखद करणे टाळता आले तर उत्तमच नाही का ? व्हाय सो सॅड ?

वर अनेकांनी अनेक सल्ले दिले आहेतच. त्यात डॉ. खरे ह्यांनी दिलेला सल्ला (व्याजाचा मुद्दा सोडल्यास) तंतोतंत पटण्यासारखाच आहे. मी ही तुमची ही करूण कहाणी वाचताना असाच विचार करीत होतो. सरळ, 'डॉक्टरांनी सध्या भेटायला मना केले आहे तेंव्हा आत्ता येण्याची घाई करू नये' असे स्पष्ट शब्दात कळवावे.
पाया पडणार्‍य दांपत्याइतकं मूर्ख कोणी नसेल ह्या जगात. पण ते आहेत मूर्ख अशा चेहर्‍याने त्यांच्याकडे (उलट) स्मितहास्य करून पाहावे आणि बोळवण करावी. तुम्हाला कदाचित लगेच तोडवणार नाही पण मी तुमच्या जागी असतो तर त्या बाईंच्या वाक्याशी १०० टक्के सहमती दाखवून, 'तुमचे यजमान कधी आजारी पडले तर मीही अगदी आवर्जून येईन पाया पडायला' असे कळकळीने त्यांना त्यांच्या तोंडावर तिथेच सांगितले असते. 'कधी आजारी पडले तर कळवायला अनमान करू नका.' हे वरून ऐकवायचं.
काकांनी विल आणि लाखभर रुपयाची गोष्ट केल्यावर मी तर, 'का? वाट बघताय का भावाच्या जाण्याची?' असा खडा सवाल केला असता. नाते तुटले तरी बेहत्तर. असो.
तुमच्या वडीलांची अवस्था एखाद्या लहान हट्टी मुलासारखी झाली आहे. त्यांना त्या कौशल्यानेच हाताळावे लागेल. त्यांचे प्रत्येक बोलणे मनावर घेऊ नका. प्रसंगी त्यांनाही दोन खडे बोल, पण प्रेमाने, सुनवा.
पाहुण्यांची सरबराई चहा - चिवड्यावर करावी. त्या मुगाच्या भजीवाल्यांना सुनवायचं बाबांची तब्येत सुधारली या. (ही वेळ तुमचे डोहाळे पुरवायची नाही, हे मनांत)
शरीर हे यंत्र आहे आणि कधी न कधी ते बंद पडणारंच हे स्विकारून 'आपल्या' माणसाची सर्वतोपरी सेवा करावी. लोकं काही बोलले तरी आपले प्रयत्न प्रामाणिक आणि परिपूर्ण आहेत हा विश्वास मनी बाळगावा. स्वतःचा सकारत्मक दृष्टीकोन स्वतःच स्वतःला सावरायला फार उपयोगी पडेल. लोकांच्या बोलण्याकडे चक्क दूर्लक्ष करावं आणि प्रसंगी त्यांना सुनवावं.

तुमच्या वडीलांच्या प्रकृतीला नक्कीच आराम पडेल.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jun 2015 - 6:48 am | श्रीरंग_जोशी

सर्वप्रथम तुमच्या आव्हानात्मक परिस्थितीबाबत मिपावर मनमोकळेपणाने लिहिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
वरच्या बहुतांश प्रतिक्रियांमधून उपयुक्त उपाय सुचवण्यात आले आहेत.

तुम्ही जे करत आहात त्याबाबत पुढचे संपूर्ण आयुष्य समाधान वाटत राहील. कृपया धीर सोडू नका.
पूर्वी कधीतरी वाचलेले एक वाक्य या ठिकाणी लिहितो.

Tough Times Never Last but Tough People Do!

तुमच्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडो ही सदीच्छा!!

पैसा's picture

18 Jun 2015 - 10:19 am | पैसा

तुला आणि तुझ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा! वर सगळ्यांनी जवळपास एकसारखे सल्ले दिले आहेत. त्यावर विचार कर. धीर सोडू नको. हेही दिवस जातील.

यावर उपाय एक च नातेवाईक यांना सौम्यपणे परिस्थितीची कल्पना द्या आणि आघावू सल्ले मानू नका . तुमचे वडील जर त्यांच्या मित्राचे किवा कोणा एका नातेवाईकाचे ऐकून घेत असतील तर त्या व्यक्तीला सगळे सांगून तुमच्या वडिलांना थोडे समजवायला सांगा.

आणि तुम्हीही जास्त ताण न घेता सध्या काय गरजेचे आहे हे जाणून त्यानुसार वागा .तुमच्या वर येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा परिणाम तुमच्या वडिलांच्या स्वास्थ्यावर आणि सेवेवर होऊ देवू नका .

तुमच्या बाबांच्या प्रक्रुतीला आराम पडेल.
ह्या सर्व अग्निदिव्यातुन सहिसलामत बाहेर पडाल तुम्ही सगळे.
डोन्ट वरी.

वर डॉ, खरे आणि पेठकर काकांनी चांगले सल्ले दिलेत.
इथे मनातली तगमग व्यक्त केलीत हे हे बर केलत. प्रेशर खाली येउ नका.

सुबोध खरे's picture

18 Jun 2015 - 1:37 pm | सुबोध खरे

सविता ताई
आपल्या वडिलांची मानसिक परिस्थिती जाणून घ्या मग आपल्याला लक्षात येऊ शकेल कि ते असे का वागत आहेत.
कोणतीही आयुष्य पणाला लावणारी घटना आयुष्यात घडली कि माणूस वेगवेगळ्या मनस्थितीतून जातो यात पहिल्यांदा धक्का बसणे (shock) यानंतर भीती( FEAR), संताप ( ANGER) असहाय्यता( HELPLESS) वस्तुस्थिती नाकारणे(DENIAL) आणी शेवटी स्वीकार( RESIGNATION /Acceptance") अशा विविध मानसिक स्थिती यात दिसून येतात. आतील एकावेळेस एक किंवा अनेक स्थितीत तो माणूस आपल्याला दिसतो आणी म्हणूनच तो माणूस विचित्र तरहेने वागताना दिसतो.
आपले वडील यापैकी कोणत्या एका किंवा एकापेक्षा अनेक मनस्थितीत आहेत हे आपण जाणून घ्या. आपल्याला दोन आघाड्यांवर लढायचे आहे. एक म्हणजे आपल्या वडिलांची विचित्र मनस्थिती आणी दुसरे म्हणजे नातेवाईकांचा आचरटपणा.
यात या क्षणी आपल्याला वडिलांची मनस्थिती सांभाळणे जास्त गरजेचे आहे नातेवाईकांचा आचरटपणा नव्हे.
वडील संतापाच्या भावनेत तुम्हाला "आय कॅन मॅनेज ऑन माय ओन"हे म्हणताहेत याचे कारण संताप हे आहे. हा रोग मलाच झाला आहे आणी तो मलाच भोगायचा आहे. यात दुसरे कुणी सहभागी होत नाही/ होऊ शकत नाही. मीच का? याचा हा संताप आहे. चिडचिडे होणे आक्रस्ताळेपणाने बोलणं हा याचाच परिपाक आहे.
"काही झालं नाहीये मला. तुला हवं तर तू जा तुझ्या घरी" हे बोलणे वस्तुस्थिती नाकारणे(DENIAL) याचा भाग आहे
येणाऱ्या जाणार्या माणसाची खातिरदारी करणे आणी ती केलीच पाहिजे हि मनस्थिती असहाय्यता आणी स्वीकार याचा परिणाम आहे. "आपले किती दिवस राहिले इथे" मग आहेत त्या दिवसात लोकांची सरबराई केली पाहिजे त्यांना नाराज कशाला करायचे या असहाय्यतेतून आलेली आहे.मागच्या पिढीतील बहुसंख्य पुरुषांना स्त्रियांच्या कष्टाची किंमत नाही आणी ते स्त्रियांना गृहीत धरतात(TAKEN FOR GRANTED) हि वस्तुस्थिती आहे आपले वडील त्या पिढीचे एक प्रतिनिधी आहेत. आणी त्यांच्या या स्वभावामुळे आपल्याला "गृहीत धरले" जाते याचे दुःख आपल्याला आहे. त्यांनी थोडासा तुमचा विचार केला पाहिजे हि वस्तुस्थिती आहे तशीच त्यांची मनस्थिती नाजूक आहे हेही आपल्याला गृहीत धरणे आवश्यक आहे. शिवाय साठी सत्तरीच्या माणसाची विचारसरणी बदलणे हि अशक्य गोष्ट आहे. तुमच्या बाबांनी जर तुम्हाला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवून जर नुसते असे म्हटले कि "बाळ तुला माझ्या पायी फार कष्ट आणी दगदग होते आहे" तरी दुप्पट काम करण्याचे तुम्हाला बळ येईल.( तसे ते म्हणतही असतील). परंतु या क्षणाला अशी माणसे विचित्र मनस्थितीत असल्याने स्वतः च्या पलीकडे विचार करू शकत नाहीत/ करत नाहीत. मग यात आपल्या जवळच्या माणसाना त्रास होतो आहे हे त्यांच्या ध्यानात येत नाही.
आपल्याला एक दोषीपणाची भावना आहे( GUILT) कि माझ्या बाबांना एवढा मोठा आजार झाला आहे आणी मी फक्त स्वतःचा/ किंवा मला होणार्या त्रासाचा विचार करते आहे. सर्वप्रथम हि भावना काढून टाका. कारण ज्या वेळेपर्यंत तुमचे वडील पहिल्या सर्व भावनातून पुढे जाऊन वस्तुस्थिती चा स्वीकार करतील त्या वेळेपर्यंत तुम्हाला खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीचा आणी मनस्थितीचा विचार करणे आवश्यकच आहे. तेंव्हा असे (स्वार्थी वाटणारे) विचार मनात येतात याची दोषी भावना मनातून काढून टाका. जर तुमच्या वडिलांना असा आजार नसता आणी तुमचे आप्त स्वकीय असा गोंधळ घालत असतील तर तुम्ही काय केले असते त्याप्रमाणे वागा. काही गोष्टीना काळ हेच औषध असते. तुमचा वडील काही काळाने निवळतील. तोवर धीर धरणे आवश्यक आहे.
बाकी नातेवाईकांच्या आचरटपणावर बर्‍याच लोकांनी उपयुक्त आणी विधायक अशा बर्‍याच सूचना केल्या आहेतच.

प्यारे१'s picture

18 Jun 2015 - 2:08 pm | प्यारे१

सुंदर प्रतिसाद.
बाकी एका टेनिस खेळाडूचा (नाव विसरलो) मोठा आजार झाल्यानंतरचा लेख whatsapp FB वर फिरत असतो. त्यातला why me या प्रश्ना ऐवजी try me हा दृष्टीकोन बरंच काम सोपं करतो.
सध्या या गोंधळातून आमचं कुटुंब देखील जात आहे.
समस्यांच रूप वेगळां भासलं तरी समस्या असतातच.
प्रयत्न करत राहणं हेच त्यावर उत्तर आहे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jun 2015 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर

समस्येचे उत्तम आकलन आणि समर्पक सल्ला.

मार्मिक गोडसे's picture

18 Jun 2015 - 2:03 pm | मार्मिक गोडसे

आमच्या शेजारच्या सोसायटितील एका तरुणाला ब्लड कॅन्सर होता.हॉस्पिटलमधून आणल्या दिवशी लोकांची त्याला भेटायला गर्दी झाली. घरात त्याची देखभाल करायला फक्त त्याची पत्नी होती. थोड्याच वेळात एकाएकी गर्दी कमी झाली. खरे कारण नंतर कळाले. डॉक्टरांनी ***ला बोलण्यास मनाई केली आहे असे लिहिलेला बोर्ड हॉलमधील टेबलावर ठेवला होता व बाजुला एक कापडी मास्क होता. रुग्ण बेडरुममध्ये होता. एकावेळी एकचजण त्याला भेटू शकत होता अन तेही टेबलावरचा कापडी मास्क लावूनच. त्या कॉमन मास्कच्या धाकाने कोणी रुग्णास भेटायला धजावत नव्हते. अर्थात त्या रुग्णाची पत्नी एका हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन असल्यामूळे अशा रुग्णाची काळजी कशी घ्यायची हे तिला ठाउक होते.
बाकी नातेवाईकांशी कसे सबंध ठेवायचे किंवा त्यांच्याशी आर्थीक व्यवहार कसे करायचे हे ज्याने त्याने आतापर्यंतच्या आपल्या अनुभवाने ठरवावे. शेवटी नातेवाईकच कामाला येतात.
आपल्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडो ही सदीच्छा.

उमा @ मिपा's picture

18 Jun 2015 - 2:45 pm | उमा @ मिपा

जाणकार, अनुभवी मिपाकरांनी दिलेल्या बहुमुल्य प्रतिसादांमध्ये तुला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी आहेत आणि तू त्या नक्की अमलात आणशील याची खात्री आहे मला.
याबाबत आपण दोघी प्रत्यक्ष फोनवर आणि कस्सकायवर बोललोय, तरीही आवर्जून आणि मनापासून सांगते, तुला कधीही मन मोकळं करायचं असेल, मन फ्रेश व्हावं म्हणून, अगदी उगाचच्या म्हणूनही गप्पा करायच्या असतील... बिनधास्त फोन कर, मेसेज कर. आता यावेळी कसा फोन करू, सकाळ आहे, कामं करत असेल, संध्याकाळ आहे, कुठे बाहेर असेल असा अजिबात विचार करू नकोस, you know what you mean to me. मित्र मैत्रिणींसोबत अगदी दहा पंधरा मिनिटं चकटफू गप्पा केल्याने खूप फ्रेश वाटतं.
बाकी लोक्स जे वागताहेत त्या मानवी प्रवृत्ती आहेत, सध्याच्या तुझ्या priorities मध्ये लोकांचं बोलणं, वागणं मनावर घेणं ही गोष्ट बसतच नाही. तू अशा गोष्टी कर ज्याने तुझं शरीर आणि मन निरोगी राहील, तशी राहिलीस तर बाबांची काळजी उत्तम पद्धतीने घेशील (आताही तू ती घेत आहेसच).
हेही दिवस जातील, सगळं सुरळीत होईल.

आत्ताच्या परिस्थितीमध्ये घरात ज्या गोष्टीने सकारात्मक उर्जा निर्माण होईल असे काही करा. जसे कि
१) आवडीचे संगीत ऐकणे
२) आवडीचे सिनेमे बघणे (यु टयूब वर जुने नवे सिनेमा आहेत)
३) शक्य असल्यास आणि मुख्य म्हणजे आवड असल्यास एखादा कमी उपद्रवी प्राणी घरात आणा. अगदी ४ दिवस पाहुणा म्हणून आणून बघा. मासे, कासव किंवा येउन जाऊन असणारे मनीमाऊ सुधा चालेल. अशा वेळी मेडिसिन बरोबर पेट थेरपीचा देखील वापर करू शकता जेणेकरून
मनावरचा तणाव कमी होईल. (मी स्वतः ह्याचा अनुभव घेतला आहे त्यामुळे आमच्या घरात आमच्या बरोबर सतत ४ पायाचा मेम्बर असतोच. सध्या २ कासवं आणि १ माऊ आहे)

बाकी नकारात्मक लोक आणि त्याचे येणे तुम्हालाच थोपवले पाहिजे. आत्ताचा क्षण तुमच्या कसोटीचा आहे. अतिशय ठाम पणे तुम्ही उभ्या राहा. आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तुमच्या बाबांना तुम्ही स्पेशल ट्रीटमेंट देत आहात असे अजिबात भासवू नका. जेवढा सहज तुमचा वावर तुमच्या सासरी असतो तसाच इथे राहू द्या. आणि जसे मनातले आत्ता शेअर केले तसेच शेअर करत राहा त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. बाकी डॉ. सुबोध आणि इतर सगळ्यांनी योग्य मार्गदर्शन केलेच आहे.

अजया's picture

18 Jun 2015 - 5:14 pm | अजया

सविता,या सगळ्यात तू नैराश्याकडे जाऊ नको.काहीतरी ब्रेक घेत जा.बाकी सर्व अनाहितात लिहिलंय परत लिहित नाही.एवढंच सांगते,आम्ही सगळ्याजणी आहोतच तुझ्यासोबत.

लव उ's picture

18 Jun 2015 - 5:27 pm | लव उ

तुमच्या सारखी मुलगी तुमच्या बाबांची आई बनुन काळजी करतेय म्हणजे बाबा लवकरच नुसते बरे नाहीत तर पुर्वीसारखे होतील...afterall Dad is Strongest

सविता००१'s picture

22 Jun 2015 - 10:44 am | सविता००१

सगळ्याच प्रतिसादकांचे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jun 2015 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रतिसाद द्यायला जरासा उशीरच झाला त्या बद्दल क्षमस्व.
मिपावरच काही दिवसांपूर्वी पारुबाईंनी "हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी" या पुस्तकाचे परिक्षण लिहीले होते.
जमले तर हे पुस्तक विकत घेउन तुमच्या बाबांना वाचायला द्या.

तुमचे बाबा लवकरच खडखडीत बरे व्हावे आणि ते संपूर्ण बरे होईपर्यंत तुमचे मनोबल टिकून रहावे ही सदिच्छा.

पैजारबुवा,

अवघड प्रसंगी नातेवाइकांना पण या धाग्याचा आधार....काय करावे आणि काय करु नये हे समजण्यासाठी. ...

डाॅ. खरे साहेब आणि धागाकर्त्यांना धन्यवाद

सविता००१'s picture

9 Oct 2015 - 4:33 pm | सविता००१

धन्यवाद हो. त्यासाठीच खरं तर हे लिहिलं. कारण तेव्हा नातेवाईकांनाही तेवढीच मानसिक आधाराची गरज असते.
मला तर व्यक्तिशः डॉ.खरेंनी किती समजावून सांगितलंय. तेव्हा कुठे मी जरा खंबीर झाले.

त्यामुळे त्यांचे तर कितीही आभार मानले तरी कमीच आहेत ते.

निश्चितच अवघड प्रसंग. बाबांचं समुपदेशन केलाय का? आज काल सगळ्या रुग्णालयात अशा प्रसंगी रुग्ण आणि नातेवाईक दोघांच्याही समुपदेशनाची सोय असते. एकूण परिस्थिती पाहून तुमचे बाबा आजपर्यंत तब्येतीने चांगले ठणठ्नीत असावेत आणि त्यांना दवाखाने , उपचार त्यातून रुग्णाला येणारी हतबलता याची माहिती/ सवय नसावी. स्वतःला इतका गंभीर आजार झालाय हे स्वीकारणे आणि त्यावर उपचार घेणे सोपे नाही. अजूनही हा आजार म्हणजे २-४ वर्षात किंवा आधीच निश्चित मरण हीच लोकांची धारणा आहे. तुम्ही खंबीर राहा आणि आगत स्वागत वगैरे बंद करा. बाबांना समजावून सांगा किवा डॉक्तारांकरवी सांगायला लावा. तुमच्या वडिलांचा रोग हा प्राथमिक अवस्थेत सापडला अशी आशा करतो. माझ्या पाहण्यात एका तरुण माणसाला प्रोस्टेट कॅन्सर झाला होता वीत गोष्ट म्हणजे बिचार्याचे नुकतेच लग्न झाले होते. म्हणजे सर्जरी पण करणे शक्य नव्हते. त्यामुळे नुसत्याच केमो थेरपी वर रोग बरा करण्याचा प्रयत्न होत होता. बाबांची परिस्थिती तशी नाही. जर तोंडचा कर्करोग असेल तर अजून वाईट. जीभ, जबड्याचा भाग काढून टाकावा लागतो. लोकांना खाता, बोलता येत नाही. उपचारासाठी अगदी लहान मुलेपण दिसतील. त्यांची आणि त्यांच्या आईवडिलांच्या परिस्थितीची कल्पनाच करवत नाही. आयुष्यात कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही हेच खरे. तुमचे बाबा हिंडू फिरू शकत असतील, खाऊ पिऊ बोलू शकत असतील. आयुष्यातल्या महत्वाच्या जबाबदार्या पुर्ण झाल्यात, आर्थिक बाजूकडून काही अडचण नाही हि किती मोठी गोष्ट आहे! त्यांना झोप लागते का? मला कॅन्सर झाला आहे हा मनावरचा सततचा मोठा ताण दूर करून त्यांच्या मनाने उभारी घेणे,सकारात्मक दृष्टीने परिस्थितीकडे पाहून ती स्वीकारणे आणि मी यातून बाहेर पडून पुन्हा एक चांगले आयुष्य जगेन हा दृढ विश्वास बाळगणे फार महत्वाचे. करणे महत्वाचे. याला थोडा वेळ लागेल. पण ते होईल. तोवर तुमची कसोटी आहे. कारण त्यांच्या इतकेच तुम्हालाही सकारात्मक आणि खंबीर राहायला हवे आणि त्यांना धीर द्यायला हवा. नातेवाईक, शेजारी बघायला येणार असतील तर त्यांना नकारात्मक न बोलण्याची सूचना द्यावी. खरेतर अशा प्रसंगी त्यांनी तुमच्या गरजेनुसार मदतीला येणे अपेक्षित होते. त्रास न देणे हीच मोठी मदत होईल असे वाटते कधी कधी. पण फर्माईश वगैरे करणाऱ्या लोकांविषयी ऐकून आश्चर्य वाटले. आधीच कोणीतरी सुचवल्याप्रमाणे अशा लोकांना टाळणेच बरे. बाबाना कशाची आवड आहे ते करण्यास उद्युक्त करावे. अशा प्रसंगानंतर लोकांची आयुष्ये चांगल्या अर्थाने सुधा बदलतात. त्यांना युवराज सिंगचे "टेस्ट ऑफ माय लाइफ़" किंवा लान्स आर्म्स्ट्रोङ्ग (Armstrong ) चे "एवरी सेकंद कौण्ट्स" सारखी पुस्तके वाचायला द्या. आहेत का? पुढची ट्रिट्मेण्ट डॉक्टर सांगतीलच.पण ती फक्त जुजबी असो. त्याला सामोरे जाण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला सर्वांना देवो आणि तुमचे यातून लवकरात लवकर बरे होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना.

सविता००१'s picture

10 Oct 2015 - 11:09 am | सविता००१

धन्यवाद हो. इतक्या सविस्तर प्रतिसादाबद्दल. हा धागा लिहिला त्याला ३ महिने होउन गेले. आणि त्या काळात माझ्याबरोबर मिपाकर आणि अर्थातच सार्‍या अनाहिता सर्वार्थाने उभ्या होत्या.त्यामुळे खरचच मनापासून मिपाचे आभार.

तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. माझ्या वडिलांना किरकोळ सर्दी-ताप वगळता कधीच काही झालं नाही. अगदी नियमित व्यायाम वगैरे करणार्‍यातले आहेत ते. त्यामुळे तब्येत ठणठणीतच. अगदीच अचानक हे कळले त्यामुळे मी गडबडून गेले आणि ते पण.

पण आता ते अगदी छान आहेत. थोडेफार फिरतात. मस्त मित्रमंडळींच्यात, गप्पांमध्ये रंगतात. अगदी पूर्वीसारखे नाहीत तरी बर्‍याच प्रमाणात चांगले आहेत. मुळात म्हणजे आता त्यांनी हा आजार स्वीकारलाय. त्यामुळेच.

हो. बरीच पुस्तके वाचली त्यांनी. अजूनही वाचताहेत. त्यातूनही खूप गोष्टी आम्ही सारेच शिकलो. त्याशिवाय शास्त्रीय संगीताची आवड असल्याने एका मित्राने सांगितले म्हणून दरबारी, बिहाग आणि भैरवी असे राग मुद्दाम घरी लावतो. त्याचा प्रचंड फायदा झालेला कळतोय. चिडचिड अत्यंत कमी झालीये. भैरवी ऐकून मस्त शांत झोपतात. अर्थात कधीकधीचा अपवाद आहे. पण केमो, रेडिएशन असं काही नाही, म्हणून खूष आहेत.

आणि तेव्हा सगळीकडूनच घेरले गेले होते अडचणींनी. त्यामुळे नवरा त्याच्या माहेरी अन मी माझ्या माहेरी असे पेशंट सांभाळत होतो. आता तो पण आला. त्यामुळे मी पण एकटी नाही. हे वाटणं सुद्धा फार भारी आहे.

एकूणात काय तर घडी बसू पहातेय पहिल्यासारखी.

परत एकदा माझे हसरे बाबा तसे होताहेत हळूहळू. :)

मस्त मस्त वाटतंय म्हणून.

जय मिपा आणि अनाहिता :)

ब़जरबट्टू's picture

10 Oct 2015 - 11:56 am | ब़जरबट्टू

वाचुन आनंद झाला.. :)

एस's picture

10 Oct 2015 - 12:10 pm | एस

ग्रेट जॉब!

नाव आडनाव's picture

10 Oct 2015 - 2:46 pm | नाव आडनाव

+१

सविता ताई, मी तुमच्यापेक्षा वयाने कदाचित लहान असेन खूप, पण असा अनुभव मला पण आहे. मुळातच स्त्रिया भावनांचं व्यवस्थापन जास्त चांगलं करू शकतात अशा बाबतीत. कळतंय मला कि तुम्हाला बाबांची खूप काळजी वाटते पण तरी सुद्धा जर तुम्हाला त्यांच्या वागण्याचा त्रास होत असेल तर त्यांना तसं स्पष्ट पण हळुवार शब्दांमध्ये सांगा. आणि पाहुण्यांसाठी एक ठराविक मेनू रेडीमेड आणून ठेवा बाजारातून.
आम्ही आमच्याकडे एक वही केली होती त्यामध्ये काय झालं, कसं झालं या आणि अश्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवली होति. पाहुणे आल्याबरोबर त्यांना हे सगळं वाचायला द्यायचो. त्या वहीमध्ये रुग्णाला काय विचारू नये किंवा काय बोलू नये याचे पण काही संकेत स्पष्ट शब्दांमध्ये लिहिले होते. जसं - 'आपल्याला इतरांच्या बाबतीत आलेले वाईट अनुभव शेअर करू नये. त्यामुळे रुग्णाला त्रास होतो.' हे जरा जास्तंच straight forward असलं तरी त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि त्रास पण कमी होतो. पाहुण्यांचं सगळं वाचून झालं कि मग रुग्णाला घेऊन यायचो.
सारखं सारखं तेच तेच बोलून सुद्धा सगळ्यांना त्रास होतो आणि चिडचिड जास्त होते. उगाच आपण अनेकदा राई चा पर्वत करायच्या मूड मध्ये जातो. पाहुण्यांनी जर काही खाऊ आणला असेल तर आम्ही तो खाऊ लगेच त्यांनाच द्यायचो आणि संपवून टाकायचो. त्यांचं पण समाधान कि खाऊ खाल्ला……

तुमच्या बाबांना लौकर छान वाटू देत ! :)

प्यारे१'s picture

10 Oct 2015 - 2:01 pm | प्यारे१

हे छान आहे.

समोरचा माणूस(माणूस मध्ये सगळे लिंग, पंथ, धर्म, जाती आणखी यच्चयावत कॅटॅगरीतले इसम गृहीत) समजून घेणारा असला की सगळं जमतं नाहीतर सगळं मुसळ केरात.

नूतन सावंत's picture

10 Oct 2015 - 10:26 pm | नूतन सावंत

सविता,तुही खूप धीराने घेतलंस त्यावेळी.तोच काळ महत्वाचा असतो.तेव्हा स्वत;;ला तुटू न देता रुग्णाला सांभाळणे कठीण असते.ते तू केलास.शाब्बास तुझी.