रॅंपेज

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
8 Jun 2015 - 12:13 pm

"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम."

निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते.

"बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना."

"अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात."

"कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही.. कुठल्यातरी बाजारगप्पा ऐकून माझं डोकं नको खाऊ. चल निघ आता. कामं आहेत खूप."

निरकर हिरमोड होऊन निघाला. निरकर एसटीचा ड्राइवर होता. गेले बरेच दिवस त्याला दूरच्या रुटवर नेमलेला होता. आणि अशीच बरेच दिवस त्याची लांब लांब पल्ल्याच्या मार्गावरच नेमणूक होत होती.
म्हणून तो कंटाळलेला होता. अशा सततच्या प्रवासाने त्याला पाठदुखी सुरू झाली होती. महिन्यातला अर्ध्याहून अधिक वेळ त्याचा मुक्काम बाहेरगावी एसटीच्या गलिच्छ स्थानकांमधे असे.

आता मुलं मोठी झाली होती. बापाला ऐकेनाशी झाली होती. आणि ती मोठी कधी झाली ह्याचाही त्याला पत्ता लागला नव्हता. बायको सोशिक आणि शांत होती. पण इतक्या वर्षाच्या धकाधकीच्या संसारात बहुतांश वेळ नवरा दूरच असल्यामुळे ती आता अलिप्त झाली होती.

निरकरला आता थोडा आराम हवा होता. जवळचा कुठला तरी रूट. जेणेकरून त्याला रोज घरी तरी येता येईल. थोडावेळ घरी घालवता येईल. आता मुलीचं लग्न ठरलंय. त्याची कामं उरकता येतील. पण हे काही केल्या जुळून येत नव्हतं. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याच्या रूटची बदली सारखी अडत होती.

लग्नाची कामे तशीच पुढे सरकत होती. मुलाकडच्या लोकांनी थेट हुंडा मागितला नव्हता. पण लग्न कसे झाले पाहिजे, मानपान कसे झाले पाहिजेत हे मात्र बजावून सांगितले होते.

अशी थकवणारी नोकरी सांभाळून हि कामे करताना निरकरचा जीव जिकिरीस आला होता. लग्नात बरीच उसनवारसुद्धा करावी लागली होती. कसंबसं लग्न पार पडलं. पाहुणे गेले. सुटीचे मोजकेच दिवस राहिले होते.
निरकर दुपारचा घरी आराम करत होता. समोर धाकटा मुलगा रवि कम्प्युटरवर गेम खेळत बसला होता. कार बंदुका मारामाऱ्या असा त्याचा टाईमपास चालू होता.

त्याचे बारावीला दोन पेपर राहिले होते. आता पुढच्या खेपेस ते द्यायचे होते म्हणून तो निवांत बसला होता. निरकर विचार करत होता आपलं आयुष्य हे असं चाललय. पोरांना शिकवून काही अपेक्षा ठेवावी म्हटली तर आपले चिरंजीव हे असे. खूप हट्ट करून त्याने हा कम्प्युटर घ्यायला लावला होता. वापरलेलाच घेतला असला तरी निरकरला तो जडच गेला होता. आणि गेम खेळण्यापलीकडे त्याचा काही वापर दिसत नव्हता. विचार करता करता त्याला संताप आला. काही तरी बोलायला म्हणून त्याने हाक मारली.

"ए रव्या"

मुलगा उत्तर देणार तेवढ्यात फोन वाजला. रवीने उठून फोन घेतला. निरकर फोन संपेपर्यंत म्हणून गप बसला. आणि परत विचार करायला लागला. अभ्यासात गती नव्हती पोराला पण तसा वाईट नव्हता. घरात असला कि हसवायचा सगळ्यांना. ताईच्या लग्नात खूप मेहनत केली होती त्याने. निरकरच्या गैरहजेरीत कितीतरी कामे मार्गी लावली होती. वय फार नसलं तरी समज होती. आता ताई गेल्यापासून जरा शांत शांतच होता. आत्ता नको बोलायला. निरकरचा राग निवळत होता. पण अभ्यासाचं काय? जाऊ देत. १२वि होऊ देत. आणखी शिकतो म्हटला तर बघू. नाहीतर देऊ कुठेतरी चिटकवून नोकरीला. असं रडतपडत आपण तरी किती शिकवणार? डोक्यातले विचार शांत होताना निरकरचं मुलाच्या बोलण्याकडे लक्ष गेलं.

"अरे काही नाही यार. बोर होत होतं. गेम टाकलाय नवा. व्हाईस सिटी. भारीये एकदम. मिशनचं टेन्शन नाय. टॉमी नावाचा हिरो आहे. फॉरेनचा भाई असतो. तो व्हाईस सिटीत येतो आणि छोट्यामोठ्या सुपाऱ्या घेतो. अमक्याची गाडी फोड. बँक लुट असले भारी मिशन असतात. आणि टाईमपास करायला तर एकदम बेष्ट. शहरात फिरायचं मस्त. गाड्या फिरवायच्या वाटेल त्या. आणि लोकांना उगाच मारायचं. आणि आपलं डोकं सटकलेलं असेल ना तर रॅंपेज घ्यायचं. एका मिनिटात ३० लोकांना मारायचं. पोलिस मिलिटरी सगळ्यांना मारायचं. कत्तल नुसती. सगळा राग निघून जातो त्या लोकांवर."

निरकर ऐकत होता. फोन संपल्यावर रवीने स्वतःच विचारलं.

"काय म्हणत होते पप्पा?"

"अरे एवढा कम्प्युटर घेतला घरात. जर बापाला पण शिकव कि."

"मागे दाखवलं होतं ना. गाणे कसे लावायचे. पिक्चर कसा बघायचा ते."

"ते झालं रे. आता हा गेम कसा खेळायचा शिकव कि."

आज दिवसाढवळ्या पिउन आले कि काय अशा नजरेने रवीने पप्पांकडे पाहिलं. पण त्यांचं डोकं सटकायला मिनिटभर लागणार नाही हे लक्षात आलं आणि तो मुकाट्याने त्याच्या पप्पांना गेम शिकवायला लागला.

निरकर सगळं शिकत होता. गेम कसा लावायचा. रस्त्यावर कोणाची पण गाडी कशी हिसकावून घ्यायची. गेममधल्या शहरात बंदूक कुठून घ्यायची. मिशन कुठून सुरु होतं. निरकर हळूहळू खेळायला लागला आणि त्याला नवाच चाळा लागला.

त्याला त्या गेममध्ये रॅंपेज विशेष आवडलं होतं. कुठलंही एक हत्यार घ्यायचं, आणि लोकांना मारत सुटायचं. कधीतर नुसती हाणामारी करायची. तर कधी एखादी गाडी घेऊन रस्त्यात सगळ्यांना चिरडून टाकायचं.

हे कदमसाहेब, हा तो हरामखोर कंडक्टर, हि जावयाची खडूस आत्या, हा घरमालक असा सगळ्या जगावरचा राग निरकर त्या गेममध्ये काढायला लागला.

निरकरची बदली झाली. आधीपेक्षा अंतर कमी होतं खरं. पण रस्ता अतिशय खराब. त्याची पाठदुखी काही कमी होईना. पण आता घरी काही वेळ तरी मिळत होता. पण लवकरच तो दूर होता तोच बरा होता असं घरच्यांना वाटायला लागलं .

त्याचं पिणं वाढलं होतं. आणि गेम खेळणंसुद्धा. कार्ट्याने बापाला काय नवीन खूळ लावून दिलं म्हणून निरकरची बायको वैतागायची आणि रविवर भडकायची. नवरातर तिच्याकडे काही लक्ष देत नव्हता. कधी नव्हे ते जास्त वेळासाठी घरी येऊ लागलेला नवरा असा विचित्र नादी लागलेला पाहून तिचा हिरमोड झाला. काही भानगड वगैरे करत नाही एवढंच नशीब समजून ती गप्प राहायची.

रविपण हैराण झाला होता. आता माझ्यापेक्षा जास्त माझे पप्पाच गेम खेळतात असं तो मित्रांना सांगायचा. त्याच्या मम्मीसारखंच कुठून बुद्धी झाली आणि पप्पांना गेम शिकवला असं त्याला वाटत होतं.

आता निरकर कोपऱ्यावरच्या प्लेस्टेशनमध्ये बॉक्सिंगवाला गेमपण खेळायला लागला. देशी दारूचा अड्डा आणि ते प्लेस्टेशन अशा दोन्ही ठिकाणी त्याची उधारी झाली.

तो पूर्ण जीव लावून बॉक्सिंग खेळायचा. जोरजोराने शिव्या देत गेममधल्या स्पर्धकाला ठोसे मारायचा. हे कोण कुठले काका येउन खेळत बसतात यामुळे तिथली लहान पोरं वैतागली होती. त्यांचं येणं कमी झालं तेव्हा त्याला प्लेस्टेशनचा दरवाजा बंद झाला.

शेवटी रवीने त्याला तसाच एक गेम घरीच कम्प्युटरवर टाकून दिला. निरकर खुश झाला. पोरगा काहीतरी कामाला आला.

हे गेम शिकल्यापासून त्यांचं बोलणंच जवळपास बंद झालं होतं. आधी निरकर दूर असल्यामुळे आणि त्याच्या तापट स्वभावामुळे मुलं त्याला घाबरून दूर पळायची. पण तो आधी त्यांच्यावर ओरडायचा तरी. आता ताईपण लग्न करून गेली. आणि निरकरचा सगळा राग, सगळी निराशा गेममधेच निघायला लागली. ते रागवण्यापुरतं बोलणंपण बंद झालं.

रवीचा निकाल लागला. एक पेपर निघाला पण एक पुन्हा राहिला. निरकर काहीच बोलला नाही. त्या दिवशी मात्र त्याने गेम खेळून रॅंपेजमध्ये शेकडो रस्त्यावरचे लोक, पोलिस, मिलिटरीवाले मारून टाकले.

आता पोरांना धाक होता तो पण नाही. करंट्याने आणखी एक वर्ष वाया घातले आणि बाप असा कम्प्युटरला चिकटलेला हे बघून मात्र बायको प्रचंड संतापली आणि तिचं निरकरशी जोरदार भांडण झालं.

काही दिवस कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. तशातच निरकरने ड्युटीवर असताना एका गावाकडे टपरीवर बस चढवली. गाववाल्यांनी जमून त्याला मारहाण केली. पुण्यातल्या एका दवाखान्यात त्याला दाखल केलं. एसटीने त्याला सस्पेंड करून टाकलं. चौकशीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकावली.

एखाद दोन छोट्यामोठ्या घटना वगळता निरकरच्या कारकिर्दीत हा पहिलाच अपघात होता. पण हल्ली त्याचं पिणं वाढलंय हे सगळ्यांनाच माहित होतं. त्याने पिउन गाडी चालवली असावी असा संशय होता. आणि त्याचं वागणं पण अशात खूप बदललं होतं. अगदी घुम्यासारखा राहत होता तो. डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असा सगळ्यांचा समज झाला होता.

पैशाची अडचण होतच होती. बायकोने हि संधी साधून कम्प्युटर विकून टाकला. रवीनेसुद्धा थोडासाही विरोध केला नाही. उलट स्वतःच गिऱ्हाईक शोधून आणला. आता तर पप्पा सस्पेंड झालेत. घरी आले कि कम्प्युटर सोडणार नाहीत हि भीती त्यालासुद्धा होती.

कम्प्युटर विकल्याचं निरकरला कळलं आणि नवरा बायकोमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. पण आता काही इलाज नव्हता. घरी येउन निरकर त्रस्त झाला.

कोणीतरी घरी येउन निरकरला सुचवलं कि कदमसाहेबांना जरा बाहेर जेवायला ने. चिकन खाऊ घाल. थोडी दारू पाज. आणि विनंती कर पुन्हा कामावर घ्या म्हणून.

निरकरला खर्च नको वाटत होता. पण बायकोच्या आग्रहामुळे त्याने कदमसाहेबांना बोलावलं आणि जवळच्या बारमध्ये घेऊन गेला. ती जागा पाहूनच साहेबांनी नाक मुरडलं. पण निरकरच्या विनंतीमुळे आत येउन तरी बसले. त्या बारमध्ये निरकरची आधीचीच उधारी होती. आता तो सस्पेंड झालाय हे त्या मालकालासुद्धा कळलं होतं. आधीची उधारी तर जाऊच दे हा आजचं बिलसुद्धा उधारी करून बुडवणार असं समजून मालकाने हुज्जत घालायला सुरु केली. आधीची उधारी दे आणि मगच आज ऑर्डर घेईन असं तो म्हणायला लागला. यावरून निरकरची आणि त्याची हमरातुमरी झाली. या तमाशामुळे कदम साहेब भडकले आणि काही न खातापिताच निघून गेले.

दुसऱ्या दिवशी निरकर कदमांची माफी मागायला गेला. त्यांनी त्याचा अपमान करून हाकलून लावलं. कालचा तमाशा ते विसरायला तयार नव्हते. चार चौघांसमोर त्यांनी निरकरचा मोठा अपमान केला.

निरकर बाहेर पडला. आणि कोपऱ्यात जाऊन बसला. त्या अपमानामुळे त्याला प्रचंड राग आला होता. पण त्याला काही बोलता आलं नव्हतं. नोकरीचा प्रश्न होता. पण तरी असा अपमान करावा? हा आत्ताचा अपघात सोडला तर त्याच्या कारकिर्दीत ठपका लावावा असं काहीच नव्हतं. देतील त्या रुटवर मुकाट्याने त्याने गाडी चालवली होती. घराबाहेर राहून घर चालवलं होतं. आणि हे सगळं करून मिळालं काय? मुलगी लग्न करून गेली. मुलगा बिनकामाचा. बायकोने बोलणं टाकलं होतं. आणि एक छोटा अपघात झाला. त्या हरामखोर गाववाल्यांनी इतका मारला. ते कमी कि काय म्हणून या लोकांनी सस्पेंड केलं. कधी कोणाला मखलाशी करायला गेलो नाही. पण कधी नाही ते काल त्या भडव्या कदमला दारू पाजायला गेलो तर बारवाल्याने काशी केली. त्याचं भांडण तर माझ्याशी होतं. त्यात या कदमला भडकायला काय झालं? त्याचा राग धरून या माजोरड्याने आक्ख्या डीपार्टमेंटसमोर इज्जत काढली होती.

निरकर संतापाने लालेलाल झाला होता. त्याचा श्वास एकदम जोरजोराने सुरु झाला होता. समोर एक बस थांबली. ड्रायव्हर खाली उतरून ऑफिसमध्ये एन्ट्री करायला गेला. निरकर अचानक उठला आणि समोरच्या बसमध्ये चढला. ड्रायव्हरने बहुतेक पटकन जाऊन यायचं म्हणून बस सुरूच ठेवली होती.

इतकी वर्षे गांड घासली इथे. एक छोटा अपघात झाला म्हणून सस्पेंड करतात साले. चार चौघात लाज काढतात. थांबा दाखवतो आज ह्यांना. निरकर बेभान झाला होता. त्याने जोरात गाडी वळवली. काही लोक गाडीत चढायला येतच होते ते घाबरून बाजूला झाले आणि थोडक्यात बचावले. निरकरने गेटजवळ एका बसला कट मारून बस स्थानकातून बाहेर काढली. आणि राँग साईडमध्ये घुसवली.

भरपूर प्रवासी बस पकडायला घाईघाईत रस्ता पार करून चालले होते. रिक्षावाले कोपऱ्यावर थांबले होते. गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. सिग्नलसाठी हळूहळू थांबत होत्या. कोणालाहि एसटीची एक बस इतक्या वेगात या बाजूने येईल अशी अपेक्षा नव्हती.

निरकर सगळ्यांना चिरडत उडवत निघाला. बस पकडायची का हरामखोरांनो पकडून दाखवा हि बस. रोजची किटकिट किटकिट साली. इथे थांबवा. तिथे थांबवा. धक्के बसतायत हळू चालवा. पकडा बस भडव्यांनो.

आता लोकांनी आरडाओरडा सुरु केला होता. सगळे लोक त्याला हातवारे करून थांबायला सांगत होते. पण त्याला आता कशाचंच भान नव्हतं. एक ट्राफिक पोलिस दांडा घेऊन हिम्मतीने अडवा आला त्याला चिरडून निरकरने बस तशीच पुढे नेली.

मेन रोडवर गाडी आली आणि गाड्यांना ठोकर देत निघाली. कार जीप कितीही चांगल्या असल्या तरी बससमोर त्यांचा काय टिकाव लागणार?

लोक नुसते ओरडत होते. थांबवा. वाचवा. रोको. गाड्यांच्या धडकीमुळे आणि राँग साईडमध्ये घुसल्यामुळे निरकरची बस थोडी मंदावत होती. तेवढ्यात एक धडक बसलेल्या कारचा ड्रायव्हर ओरडला "अबे पागल हो गया क्या भोसडीके?" आणि निरकर पुन्हा पेटला.

i1

पूर्ण जोर लावून त्याने पुन्हा बस पुढे नेली. जवळच्या पोलिस चौकीतले पोलिस रस्त्यावर आले होते. त्यांनी गाड्या मध्ये घातल्या. गाडीवर गोळ्या झाडल्या पण काही उपयोग झाला नाही. एका पोलिस वॅनने बसला जोरात धडक दिली. आणि गाडी थोडी जागीच थांबली. त्याचा फायदा घेऊन एक मुलगा जीवावर उदार होऊन बसमध्ये घुसला.

निरकरशी त्याची झटापट झाली. मारामारीत शेवटी निरकर त्याच्यापुढे कमजोर ठरला. आणि शेवटी ते काही मिनिटांचेच भयंकर मृत्युचे तांडव थांबले.

निरकरला मारत त्या मुलाने बाहेर काढले. निरकरने बसच्या मागे पाहिले. किती गाड्या उडवल्या. किती माणसे चिरडली काही हिशोब नव्हता. समोरचे दृश्य अगदी व्हाईस सिटी गेममधल्यासारखे दिसत होते. पोलिसांनी निरकरला मारत मारत आत घेतले.

दिवसभर टीव्हीवर तीच न्यूज झळकत होती. निरकरच्या घरी हे कळलं तेव्हा ते अगदी हवालदिल झाले. रवि पोलिस चौकीत पप्पांना भेटायला गेला तेव्हा ते एवढंच म्हणाले.

"रव्या, लय भारी रॅंपेज केलं आज. बस घेऊन धिंगाणा घातला फुल रस्त्यावर."

मांडणीकथासमाजजीवनमानरेखाटनप्रकटनप्रतिसादबातमी

प्रतिक्रिया

मिपा करांनी कल्ला करण्या आधीच सांगतो, कि हि कथा पुण्यात घडलेल्या खऱ्या घटनेचे काल्पनिक स्वरूप आहे.

बॅटमॅन's picture

8 Jun 2015 - 12:21 pm | बॅटमॅन

कथा मस्त जमली आहे.

(संस्कृतिरक्षक नेमक्या एखाद्या शब्दावरही आक्षेप घेतीलच, पण ते चालायचेच. प्रत्येकाचा गुणधर्म.)

स्पंदना's picture

8 Jun 2015 - 12:43 pm | स्पंदना

हो आठवते आहे बातमी.
त्यावर रचलेली तुमची कथा बरीच वास्तववादी.
अस ऐकलय एका ड्रायव्हरकडुन की कोणताच एस्टी ड्रायव्हर पाच वर्षाच्यावर पेन्शन खात नाही. त्यांच्या या सर्विसचा त्यांच्या प्रकृय्तीवर झालेला तो परिणाम म्हणे.

आकाश खोत's picture

8 Jun 2015 - 1:44 pm | आकाश खोत

असेल खरंच. बस वाले, रिक्षा वाले, ट्रक वाले यांचा व्यवसाय खडतरच आहे. दिवस अथवा रात्रभर बसुन गाडी चालवण्यामुळे पाठदुखी तर हमखास होतेच, पण मानसिक ताण सुद्धा बराच असतो.

नीलमोहर's picture

8 Jun 2015 - 2:25 pm | नीलमोहर

एखाद्या दुर्घटनेची दुसरी बाजू अशीही असू शकते

छान लिहिलंय. त्या अंगावर शहारे आणणार्‍या घटनेची पुनःश्च आठवण झाली आणि मनात तितकाच तिटकारा, संताप दाटून आला.

मृत्युन्जय's picture

8 Jun 2015 - 3:05 pm | मृत्युन्जय

कल्पनाविस्तार उत्तम आहे. आणि तरीही मानेचे (निरकरचे म्हणा) वागणे खटकते.

आकाश खोत's picture

8 Jun 2015 - 3:48 pm | आकाश खोत

ती बातमी वाचली कि मला या गेमचीच आठवण झाली. आणि एखादा माणुस खऱ्या आयुष्यात असा कसा वागू शकतो असा प्रश्न पडला... माथेफिरू हाच योग्य शब्द आहे.
या दोन गोष्टी जोडल्यामुळे हि कथा सुचली एवढंच. एक काल्पनिक पार्श्वभूमी. पण समर्थन मुळीच नाही.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 3:10 pm | जयंत कुलकर्णी

चांगलीच लिहिली आहे. मी जमली आहे असे कधीही म्हणत नाही. जमली म्हटलीकी त्याला अपघाताने जमली आहे असा वास येतो....लिहिलीच आहे चांगली.....

छानच लिहिली आहे. लिहीत रहा!

मुक्त विहारि's picture

8 Jun 2015 - 4:42 pm | मुक्त विहारि

पुकप्र. (पुढील कथेच्या प्रतिक्षेत)

आकाश खोत's picture

10 Jun 2015 - 1:23 pm | आकाश खोत

पुढील कथा टाकेनच मिपावर.
या मागील कथा वाचल्या नसल्यास वाचाव्यात :)

दाग अच्छे है
ती आणि तो : भाग १
ती आणि तो : भाग २
ती आणि तो : भाग ३
ती आणि तो : भाग ४
ती आणि तो : भाग ५

उगा काहितरीच's picture

8 Jun 2015 - 6:18 pm | उगा काहितरीच

लहानपणी खूप खेळलो vice city. बाकी कथा (?) उत्तम हेवेसांनलगे .

एक एकटा एकटाच's picture

8 Jun 2015 - 9:07 pm | एक एकटा एकटाच

कल्पना विलास चांगलाय.
पुढिल लिखानास शुभेच्छा.

धर्मराजमुटके's picture

9 Jun 2015 - 8:38 am | धर्मराजमुटके

कल्पना विलास हा शब्द जोडून न लिहिल्यामुळे तो 'कल्पना, विलास चांगलाय'. असा वाचला. :)
बाकी कथा आवडलीच.

द-बाहुबली's picture

9 Jun 2015 - 8:26 am | द-बाहुबली

No killer.

पुणेकर भामटा's picture

9 Jun 2015 - 9:00 am | पुणेकर भामटा

चान्गलि लिहिलि आहे कथा...

मानेचे समर्थन करायचा उद्देश नाही हे मान्य आहे. पण कदम निरकरांचा अपमान करुन त्याला हाकलुन देतो त्यावेळेला एका क्षणापुरते का होईना त्याचं रँपेज साहजिक व न्याय्य वाटतं. हे अर्थातच लेखकाचं यश.
छान ओघवती कथा!!! पुलेशु.

तुषार काळभोर's picture

9 Jun 2015 - 11:41 am | तुषार काळभोर

रोज कंपनीच्या बसने येतो-जातो. प्रत्येक वेळी कोणी मोटरसायकल/कार मध्ये घातली, की बसच्या ड्रायवरचा तणाव दिसतो. दुसर्‍याच्या चुकीने अपघात होऊ नये याची जबाबदारी तो स्वतः घेतो. सर्वच 'चालकाची नोकरी' करणार्‍यांना हा तणाव असेल. रोज ५०-१०० किमी बस चालवायची. गच्च ट्रॅफिक जाम असणार्‍या वाघोलीतून, राँगसाईडने गाड्या येणार्‍या मगरपट्टा-हडपसर मधून, परत फातिमानगर-कोंढवा-गंगाधाम-स्वारगेट-सिंहगड रस्ताच्या सिग्नल्स्मधून. मला रोज आमच्या ड्रायवरच्या स्थितप्रज्ञतेचं कौतुक वाटतं.

रोज रिक्षा चालवणार्‍या एका काकांचं शांत राहणं अन् पाठदुखीनं त्रस्त होणं पाहिलंय.

मला वाटतं असे 'रँपेज' टाळण्यासाठी किंवा अशा चालकांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी कुटुंबाने त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे. आता ही नोकरी/व्यवसाय निवडलाय म्हटल्यावर कुरकुर/तक्रार न करता आहे ती परिस्थिती सुसह्य करणं हे तर करायला हवं.

अवांतरः गलथानपणा/गहाळपणा/निष्काळजीपणा/दुर्दैव अशा कोणत्याही कारणाने अपघात झाला, तर आधी वाद घालणे, भांडण करणे, दमात घेणे, धमकी देणे, मारहाण करणे, जमाव गोळा करणे असे काही न करता,
१) आधी गाडी बाजूला घेणे
२) खूप नुकसान असेल तर पोलिसांना कळवणे
३) शारिरीक दुखापत असेल तर पोलिसांना कळवणे व जखमींना रुग्णालयात हलवणे
४) गाड्यांचं नुकसान पोलिस-तक्रार व वाहन विमा या प्रक्रियेतून भरपाई करणे
या गोष्टी करणे आपल्याकडे "कुणालाच" का जमत नाही? किंवा या गोष्टी न होण्याची कारणे काय असतील?

आकाश खोत's picture

9 Jun 2015 - 12:41 pm | आकाश खोत

होय. त्यांचा व्यवसाय खरंच तणावाचा आहे. कधी मी ट्राफिक मधून गाडी चालवत असेन तर बिनडोक लोकांचे रस्त्यावरचे प्रकार बघुन माझं डोकं फिरतं. रोजच ते चालवणारे कसे करत असतील काय माहित.

पण आपला व्यवसाय कोणताही असो, आपली मनःशांती आपल्या हातात आहे. मी एकाच लांब टप्प्याच्या मार्गावर जाणारे दोन बेस्टचे कंडक्टर पाहिले. एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे. एक चिडचिडा आणि एक प्रसन्न. त्यांच्याबद्दल या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

चटोरी वैशू's picture

9 Jun 2015 - 1:31 pm | चटोरी वैशू

आकाश ...छान लिहिले आहेस... एकदम पद्धतशीरपणे बदल दाखवले आहेस ...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 5:53 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चांगली लिहीली आहे ही पण कथा..

ज्या मुलाने बसमध्ये घुसून "संतोष माने" उर्फ या कथेतील निरकर ला बाहेर काढले तो माझ्या कंपनी मधला मित्र आहे "आशिष खोत ".

वाह. हा बारकावा नव्याने समजला. तुमच्या मित्राला सलाम. आणि तो माझा आडनाव बंधू निघाला हि गमतीची आणि योगायोगाची गोष्ट. :D

सानिकास्वप्निल's picture

10 Jun 2015 - 5:02 pm | सानिकास्वप्निल

कथा चांगली लिहिली आहे.

आकाश खोत's picture

10 Jun 2015 - 6:45 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

चिगो's picture

11 Jun 2015 - 10:11 pm | चिगो

कथा जमलीय. चांगला कल्पनाविस्तार..

आकाश खोत's picture

12 Jun 2015 - 12:16 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

काल सकाळी पुण्यामधे वडगांव पुलाजवळ झालेल्या अपघाताची बातमी वाचल्यावर हीच कथा समोर उभी राहिली..अर्थात त्या ड्रायव्हरची नेमकी काय अवस्था होती माहित नाही पण भयंकरच झाला कालचा अपघात :(

आकाश खोत's picture

14 Jun 2015 - 12:26 pm | आकाश खोत

त्या चालकाचा तर ताबा सुटला होता ना म्हणे चालत्या गाडीवरचा... अपघात तो ही भयानक होता..

पण या बसवाल्याचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. परिणीती एकच असली तरी कारणे वेगळी

सतोंष महाजन's picture

12 Jun 2015 - 6:42 pm | सतोंष महाजन

चागंली लिहतोस आकाश.कथा छान जमवलिस.

आकाश खोत's picture

14 Jun 2015 - 12:29 pm | आकाश खोत

धन्यवाद :)