रडू

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
18 May 2015 - 11:21 pm

शनिवार

भारतातील आपल्या क्षेत्रात एक मोठे ब्रॅंडनेम असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या लंचरूममध्ये हा जेवायला बसलाय. टेबलवर समोरच्या खुर्चीत त्या कंपनीचा एक उच्चपदस्थ बसलाय. गप्पा चालू आहेत. उशिर झालाय. दोघेच उरलेत. त्याची सुबत्ता याच्या सुबत्तेपेक्षा कमीत कमी दसपट तरी असेल. जास्तच पण कमी नाही. माणुस तसा भला. पण सतत काळजीच्या छटा घेऊन वावरत असतो. ओळख होऊन दहा एक दिवस झालेत. त्यामुळे आता हळू हळू गाडी व्यक्तिगत आयुष्य, आवडीनिवडी वगैरेंवर येत आहे. गप्पा चालू आहेतच. गाडी डाएट, फ़िटनेस, हार्ट वगैरे रूळांवर धावतीये आता. एकंदरीतच धावपळीचं आयुष्य, करिअरचे ताणतणाव, आधुनिक आयुष्यातले ताणतणाव असं संभाषण चालू आहे. एकाएकी त्याला काय झालं काय माहित...

"सरजी, आज मेरे पास सब कुछ है. बिवीबच्चों के लिये बहुत कुछ बनाके रखा है. लेकिन पता नही, बहुत चिंतित रहता हूं. किस बात की चिंता है ये भी समझ मे नही आता. असल मे ना, मै रोना चाहता हूं. बहुत रोना चाहता हूं. कभी लभी लगता है की किसी के कांधे पर सर रख कर जी भर रो लूं! पर किस के कांधे पर सर रखूं? कोई नही है ऐसा!"

तो एवढं बोलून गप्प बसला. प्लेटमधलं अन्न शांतपणे खात राहिला.

हा मात्र अवाक झाला.

काय बोलावं, कसा प्रतिसाद द्यावा हे कळेना याला म्हणून मग हा ही शांतपणे समोरचं अन्न पोटात ढकलत राहिला. तो क्षण इतका भारलेला होता की आपण काही अजून बोललो तर हा आपल्याच खांद्यावर डोकं ठेवून रडेल की काय असं याला वाटून गेलं. हा अजूनच आक्रसला.

***

रविवार

याला दिवसभर काहीच काम नव्हतं. सोबतीच्या सहकार्‍यांसोबत भटकायचा बेत ठरला मग याचा. जवळच एक तिर्थक्षेत्र आहे. सगळ्यांचा आग्रह म्हणून हा ही गेला. देवळं, तलाव, गर्दी, ऊन, धूळमाती सोडून माणसं बघत बसला.

या गावातली सरोवरं पुण्यदायक म्हणून प्रसिद्ध. सुंदर घाट बांधलेले. पाणीसुद्धा त्या मानाने बरंच बरं होतं. सगळीकडे भाविकांची गर्दी. एका सरोवराच्या काठावर प्रचंड गर्दी. तिथे पूर्वजांच्या नावाने विधी वगैरे होतात. त्याच बाजूला बायकांचे काही वेगवेगळे घोळके मोठमोठ्याने रडत होते. अगदी हमसून हमसून रडत होत्या. नंतर कळलं की काही श्राध्द वगैरे चालू होतं. आणि बहुधा आपल्या मृत आप्तांच्या नावाने तिथे रडायची पद्धत आहे म्हणे. हा लक्ष देऊन बघत होता. बायका खरंच रडत होत्या. खोटं नव्हतं वाटत काही.

बघत असताना एकदम विचार आला याच्या मनात... ’खरंच फक्त मेलेल्या माणसाकरता रडताहेत, का अजून काही असेल? बायकांच्या वाट्याला येणारी घुसमट तर नसेल अशी बाहेर पडत? हा मोकळं व्हायचा तर मार्ग नव्हे? मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’

हा परत अवाक!

***

सोमवार

रोजच्या जॉगिंगच्या वेळी कानात गाणी ऐकणे चालू असते याचे. आज कानात शेवंतीचे बन होते. त्यात एका गाण्यात ओळ आली ...

लेकीचा गं जलम,
घातला कुण्या येड्याने,
माझे सखे मैनाबाई,
बैल राबती भाड्याने!

क्षणभर चमकला खरा, पण मग हा शांतपणे चालत राहिला.

मुक्तकसमाजप्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

19 May 2015 - 12:18 am | एस

खास बिका-टच.
बर्‍याच दिवसांनी. आवडले हेवेसांनल.

आनन्दिता's picture

19 May 2015 - 1:27 am | आनन्दिता

बिकाशेट लिहत जा की राव असं नेहमी.. !!

लेख खुप आवडला.

बायकांच्या वाट्याला येणारी घुसमट तर नसेल अशी बाहेर पडत? हा मोकळं व्हायचा तर मार्ग नव्हे? मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’

__/\__

बहुगुणी's picture

19 May 2015 - 2:01 am | बहुगुणी

बिकाशेट लिहत जा की राव असं नेहमी.. !!
+१

चुकलामाकला's picture

19 May 2015 - 8:03 am | चुकलामाकला

अतिशय आवडला!

फार आवडला लेख.थोडक्यात सगळं सांगुन जाणारा.

खेडूत's picture

19 May 2015 - 8:38 am | खेडूत

आवडला लेख...

नाखु's picture

19 May 2015 - 8:39 am | नाखु

खास बिका ष्टाइल.

"अच्च्छे दिन आ रहे है"
मिपा वाचकांसाठी

किसन शिंदे's picture

19 May 2015 - 8:43 am | किसन शिंदे

लेख आवडला बिपिनदा. हे पूर्ण गाणे मिळेल काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 8:55 am | बिपिन कार्यकर्ते

शेवंतीचे बन नावाचा कार्यक्रम होत असे पूर्वी. त्यात आहे. एम्पी३ कशी देतायेईल ते बघतो.

पैसा's picture

19 May 2015 - 8:46 am | पैसा

_/\_

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 8:54 am | बिपिन कार्यकर्ते

सर्वांना धन्यवाद! लिहायचं असतंच. जमेल तेव्हा लिहित जाईन.

सस्नेह's picture

19 May 2015 - 9:18 am | सस्नेह

धन्यवादाची इतकी गडबड ? आम्हाला पहिले दाद तर देऊ द्या !

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 3:51 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

सस्नेह's picture

19 May 2015 - 9:20 am | सस्नेह

सहज जाता जाता काळजाची तार छेडलीत बाॅ !

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 May 2015 - 9:53 am | ज्ञानोबाचे पैजार

खरच बायकांना मिळालेले हे एक वरदानच आहे. बर्‍याच वेळेला रडावेसे वाटते पण रडता येत नाही.

पैजारबुवा,

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 10:39 am | बिपिन कार्यकर्ते

मी रडतो!

वाह

क्या बात हे बिका सेठ

आदूबाळ's picture

19 May 2015 - 10:02 am | आदूबाळ

जबरी!

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2015 - 10:40 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू आदू. जबरीच!

पर्नल नेने मराठे's picture

19 May 2015 - 10:14 am | पर्नल नेने मराठे

बिप्स मस्तच

समिर२०'s picture

19 May 2015 - 10:25 am | समिर२०

बिपिनदा
तुझ्या वाढदिवसाची भेट आवडली

राही's picture

19 May 2015 - 10:27 am | राही

अरे! किती दिवसांनी?
देर है लेकिन अंधेर नहीं किंवा देर आये, दुरुस्त आये असं काहीतरी सुचत होतं.
पण नको. लेख छान आहे त्यावर कुठलेच शेरे, विनोदी का होईनात, नकोत.

समिर२०'s picture

19 May 2015 - 10:27 am | समिर२०

बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 10:45 am | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद मालक! :)

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 10:41 am | कविता१९७८

लेख आवडला

अनुप ढेरे's picture

19 May 2015 - 10:46 am | अनुप ढेरे

आवडलं!

माम्लेदारचा पन्खा's picture

19 May 2015 - 1:05 pm | माम्लेदारचा पन्खा

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 May 2015 - 1:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नि:शब्द

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 May 2015 - 1:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नि:शब्द

गणेशा's picture

19 May 2015 - 1:45 pm | गणेशा

एकदम छान..

तिमा's picture

19 May 2015 - 2:24 pm | तिमा

आवडला लेख . रडण्याने मन हलकं होतं. हंसण्याच्या क्लबपेक्षा एकांतात मनसोक्त रडावे. फायदा होतो.

सूड's picture

19 May 2015 - 3:35 pm | सूड

मस्त!!

वरती पैजारबुवांच्या प्रतिसादाशी सहमत!!

स्पंदना's picture

19 May 2015 - 3:41 pm | स्पंदना

अं हं बिक्स्!
एकेका ओळीला एकेक सलाम!
असेच लिहिते रहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

स्पंदना's picture

19 May 2015 - 3:44 pm | स्पंदना

आणि हो तीर्थ क्षेत्री माणस पाहन आपल् तुपल सेम सेम.

नीलमोहर's picture

19 May 2015 - 4:20 pm | नीलमोहर

"ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!"
छानच..

मोहनराव's picture

19 May 2015 - 5:00 pm | मोहनराव

मस्तच... खुप आवडलं

सविता००१'s picture

19 May 2015 - 5:13 pm | सविता००१

खूप आवडलं.

प्रकाश घाटपांडे's picture

19 May 2015 - 7:43 pm | प्रकाश घाटपांडे

आमचा बिट्टू भुभु माझ्या मांडीवर गेला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले व शांतपणे गेला.स्पर्श लाकडा सारखा झाला काही क्षणात. मला हुंदका आवरला नाही. खर तर खूप रडायच होत.पण व्यक्तिमत्व आड आल. कंठात दाटलेपण होत.त्याची कळही जाणवली. आजही एकटा असलो की हुंदकतो.

पैसा's picture

19 May 2015 - 7:50 pm | पैसा

काका... मी पण... :( गेलेल्यांची आठवण पण काढायला नको वाटते. काही करा... ती येतेच.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 May 2015 - 9:22 pm | बिपिन कार्यकर्ते

:( _/\_

प्रदीप's picture

25 May 2015 - 12:34 pm | प्रदीप

काय लिहीणार ह्यावर?

अजून एक पाश आपल्याभोवती नको, म्हणूनच खूप आवड असूनही कटाक्षाने कुत्रा पाळणे टाळत आलेलो आहे.

अत्रन्गि पाउस's picture

14 Jul 2016 - 8:42 am | अत्रन्गि पाउस

हेच म्हणजे हेच म्हणतो ....

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 May 2015 - 11:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बिकाशेट..._/\_

चित्रगुप्त's picture

20 May 2015 - 12:31 am | चित्रगुप्त

बहुत दिवसांनी वाचायला मिळालं मालक तुमचं काही. 'ह्या' चं निस्पृह अलिप्तपण भावलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2015 - 3:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक तुमचं काही. 'ह्या' चं निस्पृह अलिप्तपण भावलं.

-दिलीप बिरुटे
(अलिप्त)

श्रीरंग_जोशी's picture

20 May 2015 - 10:12 am | श्रीरंग_जोशी

लेखन भावलं विशेषकरून दुसरा प्रसंग.

परवाच एक सत्यघटनेवरचा चित्रपट पाहिला - The Prize Winner of Defiance, Ohio.

या चित्रपटामध्ये अमेरिकेतील निम्न मध्यमवर्गातील एका जोडप्याची कहाणी आहे ज्यांना १० मुलं असतात. बायको गृहिणी असते अन नवरा फार पगार नसणारी नोकरी करत असतो. ते घर व्यवस्थितपणे चालत असतं केवळ त्या घरातल्या स्त्रीच्या कल्पकता, सहनशीलता या गुणांमुळे.

त्यात तो नवरा, अधून मधून तापट पणे वागणार, घरात तोडफोड करणार. संपूर्ण चित्रपटात त्या कुटूंबातली आई अभावानेच रडताना दाखवली आहे. त्या चित्रपटातील प्रसंग पाहताना प्रत्यक्षात माझे मन लहानपणापासून पाहत आलेल्या असंख्य उदाहरणांमध्ये घुटमळत होते. कधी जवळच्या नातेवाईकांमध्ये, कधी शेजारी राहणार्‍यांंमध्ये, कधी घरी कामाला येणार्‍या मोलकरणींमध्ये तापट नवरा अन सहनशील बायको. अक्षरशः मुलांच्या १० वीच्या फॉर्मसाठी राखून ठेवलेले पैसे ही बाप मंडळी दारूमध्ये उडवणार.

प्रत्येक रडू समोरच्यांना दिसेलच असं नाही :-( .

तुषार काळभोर's picture

20 May 2015 - 1:48 pm | तुषार काळभोर

मिपावरची जुनी माणसं आजकाल फारशी लिहितच नाहीत. प्रतिसादात कधीतरी येतात, लेख तर दुर्मिळच!!

सर्व जुन्या-जाणत्यांना विनंती: प्लीज, लिहिते व्हा!!

शिव कन्या's picture

20 May 2015 - 5:35 pm | शिव कन्या

बिका ..... 'मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’ हे खरेच आहे. प्रत्येक प्रसंगाला सेप्रेट रडत बसण्या इतका वेळ आणि स्पेस नसते. छान लिहिलेय.

gogglya's picture

20 May 2015 - 11:32 pm | gogglya

आणी रडणे या विरुद्ध गोष्टी आहेत अशी आपली शिकवण असते सहसा त्यामुळे रडु आले तरी आवेग आवरता येणे असेच शिकवले जाते. [ पु ल - रावसाहेब ] मी पण intoxicate एखादे सुन्दर गाणे मनपासुन रडुन घेतो...

मधुरा देशपांडे's picture

21 May 2015 - 2:31 am | मधुरा देशपांडे

लेख अत्यंत आवडला.

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 3:51 pm | प्रसाद गोडबोले

अहाहा !!

कित्ति सुंदर लिहिले आहे बिकाशेट !!

असेच लिहित रहा !!

पुभाप्र

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 6:48 pm | सानिकास्वप्निल

तुम्ही हल्ली का नाही ओ लिहीत?
किती छान लिहिले आहे, लेख खूप आवडला बिका.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 May 2015 - 10:26 am | बिपिन कार्यकर्ते

वेळ मिळत गेला तर लिहीनच! :) धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 May 2015 - 10:28 am | बिपिन कार्यकर्ते

सर्वांना धन्यवाद!

प्रीत-मोहर's picture

22 May 2015 - 4:40 pm | प्रीत-मोहर

आवडल. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 1:04 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

प्रदीप's picture

25 May 2015 - 12:42 pm | प्रदीप

मोजक्याच शब्दात लिहीलेला. आवडला आहे.

रडण्याच्या अनेक तर्‍हा, अनेक घुसमटलेली कारणे.

कधी उगाच कातरवेळेची हुरहूर म्हणूनही रडू येते ('ये नीर कहाँसे बरसे, ये बदरी कहॉंसे आयी है?').

चिनी माणसे आत्यंतिक रागानेही रडतांना पाहिलीत. आपल्याप्रमाणे आपल्या भावनांना सहजमुक्त खुला वाव देणे त्यांच्यात नाही. तेव्हा एरवीच घुसमट खूप. त्यातून कुणी आपला अपमान केला, टाकून काही बोलले, अथवा काही आगळिक केली, आणि त्याबद्दल आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत, अशा अगतिकतेच्या क्षणी ही माणसे मूकपणे रडतात. डोळ्यातून अश्रू येतात, हुंदका येत नाही, आवाज नाही. सर्व शांत, पण एका घुसमटीने धुमसणारे!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2015 - 1:35 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद प्रदीपदा!

रडण्याच्या अनेक तर्‍हा, अनेक घुसमटलेली कारणे.

कधी उगाच कातरवेळेची हुरहूर म्हणूनही रडू येते ('ये नीर कहाँसे बरसे, ये बदरी कहॉंसे आयी है?').

+१

चिनी माणसे आत्यंतिक रागानेही रडतांना पाहिलीत. आपल्याप्रमाणे आपल्या भावनांना सहजमुक्त खुला वाव देणे त्यांच्यात नाही. तेव्हा एरवीच घुसमट खूप. त्यातून कुणी आपला अपमान केला, टाकून काही बोलले, अथवा काही आगळिक केली, आणि त्याबद्दल आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत, अशा अगतिकतेच्या क्षणी ही माणसे मूकपणे रडतात. डोळ्यातून अश्रू येतात, हुंदका येत नाही, आवाज नाही. सर्व शांत, पण एका घुसमटीने धुमसणारे!

_/\_

काय प्रतिसाद लिहावा हे आजवर उमगलेले नाही..

बिपिन कार्यकर्ते's picture

29 May 2015 - 11:12 pm | बिपिन कार्यकर्ते

ताई!!! _/\_

पॉइंट ब्लँक's picture

27 May 2015 - 9:59 am | पॉइंट ब्लँक

वाचून "फाईट क्लब"ची आठवण झाली. मस्त!

नूतन सावंत's picture

29 May 2015 - 8:08 pm | नूतन सावंत

लेख आवडला.कृपया ते गाणे इथेही टंका.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 May 2015 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रयत्न करतो.

अभिजीत अवलिया's picture

14 Jul 2016 - 1:29 am | अभिजीत अवलिया

बिकाशेठ लिहिते व्हा परत.

सखी's picture

14 Jul 2016 - 1:53 am | सखी

सुरेख लिहलयं बिका!
अभिजीत अवलिया - लेख वर काढल्याबद्दल अनेक आभार.

इशा१२३'s picture

14 Jul 2016 - 8:59 am | इशा१२३

सुरेख लेख!

पद्मावति's picture

14 Jul 2016 - 9:26 am | पद्मावति

सुरेख!!

शित्रेउमेश's picture

14 Jul 2016 - 10:54 am | शित्रेउमेश

थोडक्यात सगळं सांगुन जाणारा लेख.
+११११