अट्टाहास

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
11 May 2015 - 3:54 pm

आना वॉक करून परत आली आणि रोजच्या सवयीने तिने सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. म्हणजे ती अंधाराला घाबरत वगैरे नाही पण असा खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारा काळोख तिच्या अंगावर येतो. मोठ्या हौसेन, एकांतात राहायचं म्हणून ती या घरी राहायला आली. दिवसा उजेडी छानच वाटत ते. छोट्याशा टेकडीवरच टुमदार घर, समोर पसरलेला विशाल समुद्र, त्याच्या काठावर डोलणारी नारळाची झाडं, अगदी चित्रात असतं तसच! पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती या घराच्या. तिच्या या विचाराच हल्ली तिला स्वतःलाच हसू येत. पहिल्याच भेटीत ती कुठल्या मुलाच्यादेखील प्रेमात पडली नाही. पण या घरी आली आणि तिला वाटल, आपलीच वाट पाहत थांबल होतं इतके दिवस. म्हणजे आपण कसे आहोत, आपल्याला काय आवडत, काय आवडत नाही यातलं काहीही त्याला सांगायची गरज नाही, त्याला अगोदरच कळलय सगळं.

गॅलरीत उभी राहून समुद्र बघत असताना तर तिला वाटलच नाही की ती एकटी आहे, आपल्यासारखेच या घराला देखील डोळे आहेत आणि तेसुद्धा या समुद्राला शांतपणे पाहतय असंच वाटल आनाला. मोठ्या उत्साहाने तिने सामान या घरी शिफ्ट केलं. खूप धावपळीत गेला तो दिवस. त्या गडबडीत देखील जेव्हा जेव्हा तीच लक्ष समुद्राकडे जायचं किंवा त्याच्या लाटांचा आवाज कानावर पडायचा, तेव्हा ती दोन मिनिट डोळे मिटून शांतपणे तो आवाज आत झिरपून घ्यायची. पसारा आवरता आवरता रात्र झाली आणि तीच लक्ष खिडकीतून बाहेर गेल तशी ती दोन क्षण स्तब्धच झाली. बाहेर नुसता काळोख होता. त्या क्षणी तिथे बाहेर एक समुद्र आहे, त्याच्या आत त्याची स्वतःची एक जीवसृष्टी आहे, त्याच्या बाहेर एक संपूर्ण विकसित जीवसृष्टी आहे ह्यावर तिला विश्वासच ठेवावा वाटत न्हवता. नाही म्हणायला अधून मधून लाटांचा आवाज तिला खात्री करून देत होता, पण का कुणास ठाऊक दिवसा जो आवाज तिला शांत, आश्वासक वाटत होता आता रात्रीच्या अंधारात मात्र तो उद्दाम वाटत होता. आणि हे घर ज्याला ती पाहता क्षणी भुलली होती ते आता मात्र आपण अनोळखी आहोत आणि फक्त नाइलाज म्हणून एकत्र आहोत अश्या नजरेने आपल्याकडे पाहतय असं वाटल तिला.

पहिले काही दिवस खूप त्रास झाला आनाला या सगळ्या वातावरणाशी जुळवून घ्यायला. पण सरावली हळू हळू. सरावली म्हणजे कशी तर तिने नियमच करून टाकला, संध्याकाळ झाली कि पहिल्यांदा सगळे पडदे लावून घ्यायचे. कधी उशीर झाला घरी यायला आणि ती जाताना पडदे लावायचे विसरली असेल तर ती डोळे मिटून पडदे लावून घ्यायची पण बाहेर पहायची नाही. हे असं का होतं तिलाच कळायचं नाही. ती बाहेर अंधारात फिरू शकते, कितीही उशीर झाला तरी एकटी घरी परत येते पण या घरातून ती अंधाराला नाही बघू शकत.बाहेर तयार झालेली ती विस्तीर्ण पोकळी आपल्याकडे झेपावतेय आणि आपल्याला गिळून टाकते की काय अस व्हायचं तिला.

दिवस छान मजेत घालवलेली आना, संध्याकाळ झाली की उदास होऊन जायची. बरं, ह्या उदास होण्याला काही कारण लागायचं का, तर काहीच नाही! तिन्हीसांजा पसरू लागल्या की ते घर तिच्यामधून अलिप्त व्हायचं, तुझ माझं काही घेण देणं नाही! आणि मग आना बसून राहायची उदास. डोक्यात विचारांचा गुंता सुरु व्हायचा आणि तो सोडवता सोडवता कधी झोप लागायची तिला कळायचं नाही. सकाळ झाली कि सगळं नॉर्मल झालेलं असायचं. तिने बरेच प्रयत्न केले ह्यातून बाहेर यायचा, तिची आवडती गाणी लावून पहिली, ध्यानधारणा करून पहिली, टीवीवर मुद्दाम कॉमेडी शोज लावून पाहू लागली पण कशाचा म्हणता कशाचा उपयोग झाला नाही.

आता तिने प्रयत्न करणंही सोडून दिलय. थोडंस काहीतरी खाऊन ती डोळे मिटून रात्र व्हायची वाट बघत राहते. जे विचार, आठवणी येतील त्यांना ती या म्हणते. कुणालाही जा म्हणत नाही. हे सगळं आपण हट्टाने ओढवून घेतलं का स्वतःवर? थोडे थोडके नाही, चांगली तीन वर्ष वाट पाहिली देवने आपल्या होकाराची. देव तिचा देव…. त्याची आठवण येताच तिने खोल श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले. तो मुळचा भुवनेश्वरचा, देबाशिष. कॉलेजमध्ये असतांना मैत्री झाली आणि कधी प्रेमात पडले दोघही कळलंच नाही. कॉलेज पूर्ण करून दोघांना एकाच कंपनीत नोकरी लागली आणि देवने आता हे नातं आपण पुढच्या लेवलला नेलं पाहिजे हा तगादा आनाच्या मागे लावला. आनाच म्हणनं जे चालू आहे ते चांगल चालू आहे, छान एकत्र काम करतो, एकत्र राहतो, ह्याच लेवलवर राहिलो तरी कुठे बिघडतं? असं लग्नाच्या बेडीत अडकलो म्हणून काय प्रेम वाढतं का? नाही अडकलो म्हणून कमीही नाही होणार? मग का हा अट्टाहास नात्यांच्या बंधनांचा?

ती असं काहीतरी बोलू लागली कि देवला कळायचं नाही ही तीच आना का जी आपल्यावर भरभरून प्रेम करते, आपली प्रत्येक आवड निवड जपते, आपल्या आई वडिलांचा मान ठेवते, पण मग हिला लग्न का नाही करायचं? काय हवय हिला नक्की? पण होईल काहीतरी, वेळ जाईल तसा तिचे विचार बदलतील ह्या आशेवर तो थांबला होता. दोघ नोकरीत सेटल झाले होते. देवच्या घरच्यांनी आता लग्न करा, लग्न करा म्हणून दबाव आणायला सुरुवात केली. देवने आधी दुर्लक्ष केलं, पण आताशा त्यालाही जसं आपण नोकरीत स्थिरावलो तसं प्रेमातही स्थिर व्हाव वाटू लागलं होतं. त्याच प्रेम होतं आनावर आणि त्या प्रेमासाठी तो वाटेल ती तडजोड करायला तयार होता. ह्या गोष्टीवरून आता दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. जो विषय आधी काहीतरी चेष्टा मस्करी होऊन संपून जात असे, तो विषयच निघू नये असं दोघांना वाटत होत. आना तशी शांत होती पण हे एकच लग्न न करण्याच जे खूळ तिने डोक्यात घालून घेतलं होत, त्याने सगळे हैराण झाले होते. तिच्या आईवडीलांनी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला पण आपल्या मुलीला ते चांगलच ओळखत होते. ती अशी सहज सहजी दबावाखाली येणार नाही आणि आली तरी त्यातून चांगल काहीही साध्य होणार नाही हे समजून त्यांनी देवलाच समजावून सांगायचा प्रयत्न केला. देवला कळेना ही अशी कशी माणसं आहेत, मुलगा लग्न कर म्हणून मागे लागलाय आणि मुलगी लग्नाशिवायच एकत्र राहू असा निर्णय घेते आणि तिचे आईवडील चक्क सपोर्ट करतायत.

त्या दिवशी दोघ ऑफिस मधून परत येताना देव जरा शांत शांतच होता. आनाने ओळखलं, आज स्वारी पुन्हा लग्नाचा विषय काढणार. तिने शक्य तेवढा शांत राहायचा प्रयत्न केला. उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली पण देव काही हं, हो ना च्या पुढे जात न्हवता. आनानेही विचार केला, ठीक आहे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा बोलेल. घरी जाऊन तिने मस्त कॉफी केली. देवने त्याच पुस्तक वाचायला घेतलं आणि आनाने तिचं कालचं अपूर्ण राहिलेलं पेंटिंग पूर्ण करायला घेतलं. ती पेंटीग करायला लागली की सगळ विसरून जायची, आपल्या जवळ घरात देवही आहे हेही. देवच मग जेवायची वेळ झाली की उठून काहीतरी बनवायचा आणि तिला जेवायला बोलवायचा. आज ती पेंटींग करत असताना देव किती वेळ मागे उभा होता.

ही अशीच होती ना आधीपासून, स्वतःमध्ये रमलेली. कस काय बर प्रेमात पडलो आपण हिच्या? की म्हणूनच प्रेमात पडलो? ही वेगळी आहे, चार डेट झाल्या नाही की मुली वाट बघत बसतात कधी प्रपोज करणार म्हणून, पण आना वाट बघणं तर सोडाच, तिच्या गावीही नसतं की तुमच्या मनात असं काही चालू असेल. ही अशी जगावेगळी आना, कशी काय प्रेमात पडली आपल्या? की मी लादलं तिच्यावर ते? आणि म्हणूनच आता तिला लग्नाच्या बंधनात नाही अडकायचं? विचार करता करता त्याचे डोळे भरून आले. आपल्या हातांची ओंजळ त्याने चेहऱ्यावर ठेवली आणि तिथेच खुर्चीवर बसला.

आनाची तंद्री मोडली आणि तिने त्याचे हात आपल्या हातात घेतले. त्याच्या चेहर्यावरून हात फिरवला आणि म्हणाली,
"देव, बर वाटत नाहीये का तुला, काय झालंय, तू आज इतका गप्प गप्प का आहेस?"
तिच्या स्पर्शाने देवच होता न्हवता तो संयम कोसळला. "आना तू का माझी परीक्षा बघतियेस? आना प्लीज आपण लग्न करूया, आज आत्ता चल ना कुणी काही म्हणणार नाही, प्लीज आना मला तुझ्या सोबत राहायचंय अगदी शेवटपर्यंत…"
"देव अरे तू आत्ता खूप इमोशनल झालायस, आपण उद्या बोलूयात ना सकाळी. उद्या शनिवार आहे, मस्त बीचवर जाऊ, मग बोलूयात ना"
"नाही आना, मी खूप वाट पाहिलीये तुझी पण आता नाही. तू हा विषय टाळू नको. जे काय निर्णय घ्यायचाय तो आजच घेऊ."
"मी विषय टाळत नाहीये रे, पण आता तू बोलण्याच्या स्थितीत नाहीयेस. तू शांत हो. May be you will feel different in the morning."
"आज नाही आना, आज नाही मी ऐकणार तुझं, अगं मला आता शंका यायला लागलीय की तुझ खरच माझ्यावर प्रेम आहे न?"
"देव, अस नको रे बोलूस, तुझ्यावर प्रेम नसत तर आपण आत्ता इथे एकत्र नसतो. तुला काय वाटलं, लग्नाचा विषय निघाला कि फक्त तुलाच त्रास होतो? मला त्रास होत नाही? अरे मलाही कधी कधी वाटतं हा माझा हट्ट चुकीचा तर नाही? मी उगीच तुला त्रास देतेय की काय असं वाटून किती गिल्टी फील होत मला, तू कल्पना नाही करू शकत."
"मग नको ना आपण असे जगूया, आना तुझ प्रेम आहे माझ्यावर पण एवढ प्रेम नाही की त्यासाठी लग्नाच्या बंधनात अडकशील? अगं तू किती आवडतेस सगळ्यांना घरी तुला माहितीये? मॉम डॅड नी तर तुला आधीच सून म्हणून स्वीकारलं आहे, मग तू का नाही म्हणतीयेस?"
"मला नाहीये इच्छा देव. अरे तास दोन तासांसाठी भेटल्यावर कौतुक करण वेगळ आणि पूर्ण आयुष्य ही अशी कधी अस्तित्वात नसलेली नाती स्वीकारून ती जपण मला नाहि जमणार रे."
"अगं मी सोबत असणार आहे तुझ्या कायम. मी तुला कधी जाणीव सुद्धा होऊ देणार नाही की ही नाती परकी आहेत. आणि तुझ्याबरोबर कुणी परकं कस राहू शकेल आना, तू जसं मला आपलं केलस, तसच त्यांनाही करशील. मी करेन तुला मदत. तू एकटी नाहीयेस आणि कधीच मी तुला एकटं नाही पडू देणार. "
"हे सगळ बोलन खूप सोपं असतं, करणं खूप अवघड. आणि हेच मला नकोय मुळात ही अशी ओढूनताणून नाती एकत्र आणायची गरज काय? आपण एकमेकाबरोबर खुश आहोत, मी त्यांना रिस्पेक्ट करते, अजून काय हवय तुला?"
"हे असं आपलं एकत्र राहाण समाज नाही ना स्वीकारणार पण. उद्या आपल्याला बाळ झाल तर त्याने शाळेत मुलांना काय सांगायचं? हे जग फार वाईट आहे ग, आपले विचार शुद्ध असतील, पण प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्यासारखी माणसं नाही ग भेटत."
"तू आधी नक्की कर देव, तुला माझ्याशी लग्न का करायचय? आई वडिलांसाठी, समाजासाठी की स्वतःसाठी?"
"फक्त प्रेमासाठी, फक्त तुझ्यासाठी"
"मग मी लग्न नाही करू शकत हे तू एक्सेप्ट कर. "

त्या दिवशी दोघं न जेवताच झोपले. सकाळी उठून आनाने नाश्ता तयार केला. देव उठून तयार होऊनच बाहेर आला. आनाने ओट्यावर ठेवलेला कॉफीचा मग हातात घेऊन तो म्हणाला, "I have to go Aana. तुझा निर्णय बदलला तर मला कळवशील." आना शांत उभी होती. त्याने कॉफी संपवली आणि गाडीची चावी घेऊन बाहेर पडला. तो गेल्यावर आना कितीतरी वेळ दाराकडे पाहत बसली, खरंच गेला का तो? नाही नाही असा कसा जाईल, तो परत येईल. पण देव नाही परत आला. अख्खा शनिवार ती घरात बसून राहिली, देव परत येईल म्हणून. शनिवार पाठोपाठ रविवार आला तसाच गेला. सोमवारी आना ऑफिस मध्ये गेली तेव्हा देव भेटला. तुटकच बोलला तो तिच्याशी. भुवनेश्वरच्या ऑफिस मध्ये ट्रान्स्फर मागीतलिये म्हणून सांगितलं त्याने तिला. तिनेही "ok,as you wish" म्हणून विषय संपवला.

ह्या नवीन घरात आल्यापासून आपल्याला देवची सारखी आठवण येतीये तिच्या लक्षात आलं होत. तशी त्याची आठवण यायची तिला अधूनमधून पण ते तेवढ्यापुरतच. हल्ली हल्ली मात्र ती हताश होऊ लागली होती त्याची आठवण आली की. आपलं खरचं प्रेम होतं त्याच्यावर, मग आपण एवढा टोकाचा निर्णय कसा घेतला? पण हा निर्णय आपल्याला तेव्हा टोकाचा नाही ना वाटला, हे इथ ह्या घरात आल्यावरच अशी सारखी बोचणी का लागलीये मनाला? देव अगदी खूप नसला तरी तिच्या संपर्कात होता. सहा महिन्यातून एखाद मेल यायचंच त्याच. कधी त्याच आल नाही म्हणून आपण पाठवलं की एक दोन दिवसात उत्तर येतच होत. लग्न, मग त्याच्या छोटीचा जन्म सगळं महत्वाच कळवतंच होता तो न चुकता. तीही रमत होती त्याच्या छोटीचे कौतुक करण्यात. नावही फार गोड ठेवलं होतं, मीठी. त्याने सांगितलं तेव्हा तिला वाटल होतं, असणारच मीठी, देवची मुलगी आहे ती. तिनेही ह्या नवीन घराचे फोटो पाठवले होते, तेव्हा देवचा रिप्लाय आला होता "लुक्स लाइक यु गॉट यूर ड्रीम होम!" ते वाचून ती हसली होती आणि लगेच त्याला उत्तर पाठवलं होत, "येस, इट इज अ ड्रीम होम!" पुढचं "but not without you" delete करून.

नाही नाही हे चूक आहे, आता तो माझा नाही. असं म्हणून तीने तोंड गार पाण्याने धूऊन आरशात स्वतःला मूर्ख आहेस का असं म्हणून आली होती.

देव भुवनेश्वरला गेल्यानंतर तिला कळलं खूप वेळाने सावरला तो. प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने कधी तरी तिच्याशी बोलाव लागायचं म्हणून त्याने नोकरी बदलली. नवीन कंपनीने सहा महिन्यात अमेरिकेला पाठवलं आणि देव निघून गेला. जणू काही तो अशाच संधीची वाट पाहत होता. नाही म्हणायला त्याने फोन केला होता जायच्या आधी, पण आपण उचलला नाही. नसतं बोलता आल त्याच्याशी. त्याने पुन्हा विचारलं असतं तर तिला अजूनही त्याला होकार देता येणार न्हवता म्हणून.

इतके वर्ष खंबीर राहिलो आपण, मग आता काय झालय? come on!
चुकलच आपल आपण कॉलेजच्या रीयुनियनला जायला नाही हव होतं. घरात आल्यापासून नाही, त्या रीयुनियन पासून खरी सुरुवात झाली ह्या सर्वाची.

काहीतरी बदल म्हणून आना कॉलेजच्या रीयुनियनला गेली आणि तिथे देवचा विषय निघाला. सगळ्यांना माहिती होतच त्यांच ब्रेक अप झालेलं पण तरी सगळे खोदून खोदून विचारत होते. आनाला तर कुठून बुद्धी झाली आणि इकडे आलो असं झालं होतं. ह्या गप्पांना कंटाळून ती निघणारच होती तर दिशाने हाताला धरून बसवून ठेवलं. तुला काय एकटीच आहेस, आमच्यासारखे मुलं नवऱ्यावर सोडून तर नाही ना याव लागल, मग कर की एन्जॉय असं म्हणून. असा राग आला होता आनाला तेव्हा. आता इथून पुढे ह्या असल्या कार्यक्रमाना यायचं नाही असं ठरवून टाकलं तिने मनोमन. बसल्या बसल्या फोनमधून ह्या सगळ्या लोकांचे नंबर delete करू लागली तर दिशा म्हणाली, "काय देवचा मेल येणार आहे वाटतं, सारखी फोन चेक करतेस ते"
"शट अप दिशा, वाट्टेल ते बोलू नकोस. तू हेच बोलणार असशील तर मी निघते. पुन्हा भेटली नाहीस तर बरच होईल"
"बापरे! एवढा राग! अगं गंमत केली ग! मला देवच म्हणाला होता त्याच्या लास्ट इंडिया ट्रीप मध्ये की तुम्ही दोघे अजून एकमेकांना मेल वगैरे करता. "
"हे बघ दिशा, देवला तुला हे सांगावस वाटल असेल पण मला त्यात सांगण्यासारखं, डिस्कस करण्यासारखं काहीच वाटत नाही. आम्ही दोघे चांगले मित्र होतो आणि आजही आहोत. दोन चांगले मित्र एकमेकांना जेवढे आणि जसे इमेल पाठवतात, तेवढेच आम्ही पाठवतो."
"चील यार! देव म्हणालाच होता मला, तुझ्याशी बोलताना जपून म्हणून. तू अजूनही तशीच आहेस."
"हो! आहे मी तशीच, आणि ह्या तशीचला जपण्यासाठीच माझ आणि देवच ब्रेक अप झालय."
"तुला कधीच वाईट वाटत नाही का ग? कॉलेज मध्ये ज्या मुलाच्या मागे मुली वेड्या होत्या, तो तुझ्या प्रेमात वेडा झाला. इतका देखणा मुलगा आणि रोमांटिक टू द कोर! अशा मुलाबरोबर तू राहिलीस तीन वर्ष आणि तो सभ्य सज्जन मुलगा आपण असं राहण्यापेक्षा लग्न करून राहूया म्हणून मागे लागला तर तू नकार दिलास. किती स्ट्रेंज आहेस तू!"
"हे बघ दिशा, मला भूतकाळाविषयी बोलण्यात काहीच रस नाहीये. मी निघते खरच."
"वाव आना, एका अर्थाने बरच झाल तू नकार दिलास ते. कित्ती हट्टी आणि सेल्फ सेण्टर्ड आहेस तू! you know what? कदाचित तू देव बरोबर सुखी झाली असतीस पण देव तुझ्या बरोबर सुखी झाला नसता. "
"तू मला माहित असलेल्या गोष्टी ऐकवणार आहेस का मला?"
"आना देवची बायको पण भेटली होती मला. कसली गोड आहे माहिती. देव आणि जेनी एकदम परफेक्ट आहेत. मला तुझ्याबद्दल विचारत होती ती."
"का, तिला काय करायचं आहे माझ्याविषयी एवढी सहानुभूती दाखवून? आणि मुळात मला नकोचय कुणाचीही सहानुभूती"
"आना अगं कधी तरी तुझा चष्मा काढून जगाकडे बघ. जेनी मला काय म्हणाली माहिती, मी खूप रिस्पेक्ट करते आनाचा. देवने जेव्हा त्यांच्याबद्दल जेनीला सांगितलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं तुझं, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन त्याच्या परिणामांनाही तेवढ्याच खंबीरपणे समोर जाणारी! मला म्हणते आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झालो असतो. "
"ते का?"
"तिने देवशी लग्न न करण्याचा निर्णय निभावला म्हणून आणि मी देवशी लग्न करायचा निर्णय निभावते आहे म्हणून! आना जेनी ग्रेट आहे माहिती! अगं इथं भारतातल्या भारतात लग्न होतात तरी मुलींच्या नाकी नऊ येतात सासरची माणसं समजून घेताना. आणि ही बया अमेरिकेतून येते आणि सगळ्यांना जिंकते अक्षरशः! सोपं नाहीये ते आना. सगळं एन्जॉय करते ती. सणवार, इकडचे कपडे, दागिने, नातीगोती सगळं सगळं जपते अगदी मनापासून! देव खूप आनंदात आहे"

त्याच्या पुढे आपल्याला काही ऐकूच आलं नाही का? डोळ्यातलं पाणी लपवून आपण निघून आलो तिथून, तर घरी हा जीवघेणा अंधार! सोशल प्रेशर म्हणतात ते हेच का? कशाचा राग येतोय आपल्याला? एकाच संस्कृतीत वाढूनही केवळ तडजोड करता येणार नाही म्हणून आयुष्यातलं एकमेव प्रेम नाकारलं आपण! आणि तेच प्रेम कुठल्यातरी भलत्याच संस्कृतीत वाढलेल्या मुलीनं स्वीकारलं, नुसत स्वीकारलं नाही तर ते वाढवलं, जपलं! आपल्याला नसतच जमलं ते. मग आता ते तुझ नाहीये तर वाईट का वाटतंय एवढं? तुला हेच हवं होतं ना, तुझी स्पेस, तुझ अस्तित्व त्याला काहीही तडजोड न करता तुला प्रेम हवं होत! ते देण देवला शक्य न्हवत. इतका साधा सरळ व्यवहार हा, इतका गुंता कधी झाला त्याचा? जेनी म्हणते तसं, हा निर्णय निभवायचाय आता.मागे वळून पाहयच नाहीये. आना आना आहे आणि जेनी जेनी आहे. त्यांची सरमिसळ नाही होऊ शकत. हे सत्य देवला कळलं, म्हणूनच तो आनंदात आहे का? मग जे देवला कळलं, जे जेनीला कळलं ते आपल्याला कळायला एवढा वेळ का लागला?

विचारांच्या तंद्रीमध्ये आना उठली. गॅलरीचा पडदा बाजूला सारून, तिनं दार उघडलं, डोळे न मिटता! गार वार्याने तिच्या अंगावर शहारा उमटला. एक एक पाउल पुढे जाऊन ती गॅलरीच्या कठड्याला टेकून उभी राहिली. समोरचा तो उधाणलेला समुद्र ती तिच्या डोळ्यात साठवत राहते, सगळ्या आसमंताला व्यापून राहिलेल्या त्या काळोखासाहीत! कालपर्यंत उद्दाम वाटणारा तो लाटांचा आवाज आता आश्वासक वाटू लागतो, समोरची ती विस्तीर्ण पोकळी आता आनामध्ये विलीन होते! त्या एका क्षणाला, त्या जाणीवेला आना तिच्या श्वासामध्ये भरून घेत राहते, पुन्हा पुन्हा!

कथा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

11 May 2015 - 4:02 pm | कविता१९७८

मस्त

कपिलमुनी's picture

11 May 2015 - 4:35 pm | कपिलमुनी

आवडलं !

चुकलामाकला's picture

11 May 2015 - 5:18 pm | चुकलामाकला

वाह! सुंदर!

पगला गजोधर's picture

11 May 2015 - 6:09 pm | पगला गजोधर

"गाढवापूड वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा हुता" असं म्हणा हव त…
आना ने नक्की लगिन न करायचा हटहास कामून ठिवला अशील बर ? अस इचारवास वाटतया तुमास्नी.

आपला नम्र
पगला गाढव

रातराणी's picture

12 May 2015 - 12:37 am | रातराणी

आना बाहेरून खूप strong वाटत असली तरी ती गोंधळलेली आहे, सोशल प्रेशरला न जुमानता लग्न करायचं नाही हा निर्णय घेतलेली आना आपण चूक केल की बरोबर हा विचार करते तेव्हा ती खरच तिला काय हवय हे पडताळून पहातीये, लग्न म्हणजे एक नात नाही ते सोबत आणखी नाती, आणखी जबाबदार्या घेऊन येत. इथे कुठल्याही एका systemला चांगल म्हणून तेच केल पाहिजे अस नाही सांगायचंय. तुमच्यासाठी काय work out होणार आहे हे तुम्हाला स्वतःला शोधायचंय आणि त्याच्याशी प्रामाणिक राहायचंय. एवढच आहे कथेत!

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 May 2015 - 6:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

आवडली कथा...
अवांतर---लिव्ह इन खरंच ईतकं कॉमन होत चाललय का?

सूड's picture

11 May 2015 - 6:53 pm | सूड

सुंदर!!

रेवती's picture

11 May 2015 - 7:16 pm | रेवती

कथा आवडली.

अत्रन्गि पाउस's picture

11 May 2015 - 7:21 pm | अत्रन्गि पाउस

जरा बिचकूनच व्हायला झालंय !!

सुबोध खरे's picture

11 May 2015 - 8:14 pm | सुबोध खरे

कथा सुंदर आहे. मुख्य म्हणजे ओढून ताणून लग्न लावणे किंवा लग्नातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असा कोणताही आव आणलेला नाही. त्यामुळे स्वच्छ आणि निरभ्र आभाळासारखे वाटले. ( भावना समजून घ्या. आम्हाला व्यक्त करता येत नाहीत)

रातराणी's picture

12 May 2015 - 12:28 am | रातराणी

आपल्याला खरोखर आयुष्यात काय हवय हे कळलेले लोक फार कमी असतात आणि ते कळेपर्यंत पाय घट्ट रोवून उभी राहणारी तर त्याहूनही कमी! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2015 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

श्रीरंग_जोशी's picture

11 May 2015 - 9:22 pm | श्रीरंग_जोशी

शीर्षकात एक काना अधिक झाल्याने भलताच अर्थ निघतोय.

आणि अट्टा हसला, असे काहीसे मला वाटले.

कथा निवांतपणे वाचीन.

रातराणी's picture

12 May 2015 - 12:24 am | रातराणी

लिंकवरच्या फोटोतला माणूस हसला तर खरच न्यूज होईल :D

उगा काहितरीच's picture

11 May 2015 - 10:41 pm | उगा काहितरीच

आवडली कथा.

nikhil Patil's picture

11 May 2015 - 11:28 pm | nikhil Patil

छान!.आवाडली कथा.

रातराणी's picture

12 May 2015 - 12:14 am | रातराणी

सर्वांचे आभार!

एक एकटा एकटाच's picture

12 May 2015 - 12:45 am | एक एकटा एकटाच

चांगली कथा आहे.

पण नवरा सोडुन बाकीच्या नात्यांचा दुस्वास करणारी नकोच मुळी.
देव वाचला म्हणायचा.

रातराणी's picture

12 May 2015 - 1:11 am | रातराणी

ती दुस्वास करते असं interpret होत असेल तर ते माझ्या लिखाणातल न्यून म्हणायला हवं. आणि देवशीही तिला नवरा हे नात नकोच आहे. :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 May 2015 - 8:03 am | भाग्यश्री कुलकर्णी

चांगली कथा.

पैसा's picture

12 May 2015 - 10:32 am | पैसा

कथा चांगलीय.

स्वच्छंद's picture

12 May 2015 - 10:33 am | स्वच्छंद

मस्त आहे कथा..आनासारखीच एकाकी नि बैचेन..तरीही हूरहूर लावणारी!!

सुरेख कथा.आजवर कशी दिसली नाही?

स्वाती२'s picture

13 May 2015 - 3:53 am | स्वाती२

कथा आवडली.

नाखु's picture

13 May 2015 - 8:52 am | नाखु

कशाचाही प्रचार्+प्रसार न करता जसे आहे तसे मांडणारी म्हणून जास्त आवडली.

यमगर्नीकर साहेबांच्या अमूल्य टिप्पणीच्या प्रतिक्षेत.
अडाणी नाखु

यमगर्नीकर साहेबांच्या अमूल्य टिप्पणीच्या प्रतिक्षेत.

>> हे नाही कळले

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 8:09 am | श्रीरंग_जोशी

कदाचित येथे संदर्भ मिळेल.

कथा म्हणून लेखन आवडले.

यावरून आठवले: १५-१६ वर्षांपूर्वी हा विषय सह्याद्रीवरील एका मालिकेत हाताळला होता. इरावती हर्षे नायिका होती. बहुधा सुलभा देशपांडे यांनी तिच्या आजीची भूमिका केली होती. अशा नात्यात राहू लागल्यावर तिला त्यातला फोलपणा जाणवू लागतो अन तिची आजी तिला त्यातून बाहेर पडण्यास मदत करते.

रातराणी's picture

15 May 2015 - 12:12 am | रातराणी

आरारा! यमगर्नीकर बहुतेक त्यांच्या जेनीच्या शोधात असतील किंवा सापडली असेल म्हणून ते बीजी झाले असतील. तसही मागच्या वेळेला त्यांना कुणी समजून घेतलेलं दिसत नाही :) म्हणून त्यानी कट्टी फु केलेली दिसते आपल्याशी.
ती मालिका पाहायला मिळाली तर आवडेल. सापडेल का कुठे?

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2015 - 1:14 am | श्रीरंग_जोशी

कोल्हापूर कट्टा वृत्तांतमधील ठराव क्रमांक १ वाचावा.

(हे एकदम कौतिकराव ठाले पाटिल छाप उत्तर झाले ;-) )

जुन्या मराठी मालिका जालावर मिळणे कठीण आहे.

रातराणी's picture

15 May 2015 - 1:13 am | रातराणी

अरे बापरे! हे खरच आहेत होय! मला वाटल कुणीतरी मुद्दाम दंगा करतय :) आता त्यांच्या लेखाची वाट पाहते.