पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 4:59 pm

संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-


डॉ. आई गणेश तेंडुलकर हे पत्रकार होते. त्यांनी विद्यार्थीदशेत जर्मनीत सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. पुढे जर्मन वृत्तपत्रांत ते भारतासंबंधी लिखाण करत असत. त्यांच्या नावातील ’आई’ शब्द माता अशा अर्थाने आलेला नाही. तर ’लॅटीन’ भाषेत ’आई’ शब्दाचा अर्थ ’शहाणपणाचा पक्षी’ असा होतो. म्हणून त्यांनी वृत्तपत्रांतील लिखाणाकरता घेतलेले ते टोपणनाव होते. १९३० मध्ये ते ’बेर्लिनर तागेब्लाट’ ह्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले होते. १९३६ साली चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून ते बेर्लिन तंत्रशिक्षण महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर दुसर्‍या  महायुद्धाला तोंड फुटल्यावर १९३८ च्या सुमारास ते भारतात परतले. मात्र जर्मनीतील त्यांच्या दीर्घ वास्तव्यावरून त्यांना राष्ट्रविरोधी ठरवून तत्कालीन ब्रिटिश सरकारने तुरूंगात टाकले. ते सुमारे पाच वर्षे राजकीय कैदी राहिले.

जर्मनीत जाण्यापूवी एक वर्ष, ते साबरमती आश्रमात राहिलेले होते. त्या काळात ते वल्लभभाई पटेल ह्यांचे सचिवही होते. ब्रिटिश सरकारने त्यांना तुरूंगातून मुक्त केल्यावरही ते सेवाग्राम आश्रमात सर्वोदयी कार्यकर्ते म्हणून राहिले होते. तिथेच महात्मा गांधींनी स्वतः त्यांचे लग्न आश्रमातील इंदुमती गुणाजी हिचेशी लावून दिले होते. ह्या लग्नाकरता गांधीजींनी योजिलेला लग्नविधी, साहचर्याची शपथ, स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी संततीनियमनाची साधने न वापरता अपत्य होऊ न देण्याची शपथ, ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ, ह्या सर्वच गोष्टी तत्कालीन वृत्तपत्रांतून खूप गाजल्या. ह्या काळात ते डॉ.ए.जी.तेंडूलकर ह्या नावाने ओळखले जात असत.

उत्तरायुष्यात त्यांनी बागलकोट (हल्लीच्या कर्नाटकातील विजापूर जिल्हा) जवळ, ’बागलकोट उद्योगा’ची स्थापना केली. सिमेंटचा कारखाना काढला. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी सर्वांच्याच प्रशंसेचा विषय राहिला.

त्यांचे वैवाहिक जीवनही सुरस आणि अनेकविध घडामोडींनी परिपूर्ण राहिले. ते ’टोपीवाला शिष्यवृत्ती’ घेऊन जर्मनीत गेले खरे. मात्र तिथे त्यांना हव्या त्या विषयात प्रवेश मिळणे अत्यंत कठीण होते. कुणीतरी त्यांना पॅरीसला जाण्याचा सल्ला दिला. तिथे ते चार वर्षे राहिले. विद्यार्थी दशेत असतांना त्यांचे साशा पासिनी ह्या इटालियन मुलीवर प्रेम जडले. तिला अलेक्झांड्राही म्हणत असत. तिच्याशी त्यांनी लग्नही केले होते. साशाची मुलगी वेरोनिके आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ग्रेगरी पेक ह्यांनी विवाह केलेला होता.

१९२२ मध्ये ते पुन्हा जर्मनीत गेले. तिथे त्यांचे वडिल बंधू शिक्षण घेत होते. त्यांचे मते तेंडुलकरांनी पदव्यूत्तर शिक्षण जर्मनीत घ्यावे, कारण तिथे चांगल्या संधी उपलब्ध होत्या. जर्मनीत ते दिवसा ग्योटिंगन विद्यापीठात शिकत होते आणि रात्री एका कारखान्यात काम करायचे. त्यांच्या शुबरिंग नावाच्या प्राध्यापकांनी त्यांना खूप मदत केली. त्यांनी १९३० पर्यंत, सतत सात वर्षे अभ्यास करून उपयोजित गणितात पी.एच.डी. पूर्ण केली. शुबरिंग यांची मुलगीही तेंडुलकरांच्याच वर्गात शिकत होती. तिथे त्या मुलीवरही त्यांचे प्रेम जडले आणि लग्नही झाले होते.

पुढे १९३६ च्या सुमारास, विख्यात जर्मन पटकथालेखिका थेआ फॉन हार्बो हिचेशीही त्यांचे संबंध जुळले होते. जर्मनीत हिटलरचा उदय झाल्यानंतर जर्मनांना परकीयांशी लग्न करण्यास अनुमती नसल्याने, ते लग्न न करताच एकत्र राहत असत. हे नाते उभयतांनी अखेरपर्यंत अत्यंत प्रेमपूर्वक सांभाळले होते. पुढे भारतात परतल्यावर तेंडुलकरांचे चौथे लग्न, इंदुमती गुणाजी हिचेशी देशसेवेखातर झाल्यानंतर, त्यांनी इंदुमतीस नवजात मुलासह एकटीच जर्मनीत थेआच्या भेटीकरता पाठवले होते. त्या दोघींचेही परस्परांशी व्यवस्थित मैत्र जुळले. ह्यावरून त्यांच्या ह्या नात्याची कल्पना करता येईल. मात्र प्रस्थापित सर्वच निकषांवर त्यांचे वैवाहिक जीवन अलौकिक राहिले.

जगावेगळी बुद्धिमत्ता, थोरामोठ्यांशी असलेले प्रत्यक्ष संबंध, समोरच्यावर आपल्या व्यक्तीमत्त्वाने, व्यासंगाने, अनुभवाने आणि बोलणे व तर्कसंगतीने अमिट छाप पाडण्याचे त्यांचे कसब; ह्यामुळे तेंडुलकरांचे व्यक्तिमत्व विविधरंगी झालेले आहे. म्हणूनच त्यांचे हे चरित्र वाचनीय आहे. त्यांची मुलगी लक्ष्मी हिने, प्राप्त कागदपत्रांच्या आधारे, कुठलाही अभिनिवेष न बाळगता ते लिहिलेही सुरस आहे. ओळख झाली असे वाटत असतांनाच, त्यांच्या जीवनाचे कितीतरी महत्त्वाचे पैलू अप्रकाशितच राहिले आहेत की काय असे वाटत राहते. मात्र उतारवयात झालेल्या, त्यांच्या मुलीसही त्यांचे चरित्र उभे करण्यात निर्माण झालेल्या अडचणी समजता येण्यासारख्या आहेत. तरीही ह्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या तितक्याच कर्तृत्ववान जर्मन आणि भारतीय पत्नींची जीवनी; ह्या निमित्ताने वाचकांस उपलब्ध झालेली आहे. मला हे सुरस चरित्र खूप आवडले आहे. हाती घेतल्यावर संपेपर्यंत सोडवत नाही, अशी पुस्तके हल्ली क्वचितच वाचायला मिळतात. तसेच हे पुस्तक आहे. तुम्हालाही अवश्य आवडेल असा विश्वास वाटतो!
.

समाजविचारआस्वादमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

थोडक्यात पण रसाळ आस्वाद. आवडला. पुस्तक रोचक दिसते आहे. ही कथाच विलक्षण आहे. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2015 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी

रोचक आहे व्यक्तिमत्व. या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

गणेश तेंडुलकरांचा जन्म कुठला अन बालपण कुठे गेले?

त्यांचा जन्म बेळगावनजीक बेळगुंडी येथे झाला होता

अत्रन्गि पाउस's picture

9 May 2015 - 9:24 pm | अत्रन्गि पाउस

महानायक ह्या कादंबरीत उल्लेख असलेले तेंडूलकर ( त्यांच्या पत्नीने सुभाष बाबूंना जर्मनीत बरीच मदत केली होती )
ते हेच का हो ?

नरेंद्र गोळे's picture

10 May 2015 - 8:05 am | नरेंद्र गोळे

मात्र त्या पुस्तकावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे, याहून अधिक भाष्य करणे शक्य होणार नाही.

अगदीच वेगळ्या पुस्तकाची ओळख आवडली.

स्वॅप्स, श्रीरंग_जोशी, अत्रन्गि पाउस आणि रेवती सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

चुकलामाकला's picture

10 May 2015 - 6:46 pm | चुकलामाकला

सुंदर परिचय!
पुस्तक नक्की वाचेन.

जुइ's picture

10 May 2015 - 7:55 pm | जुइ

अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्द्ल आभार.