"नोकरी" - एक चित्रपट

वटवट's picture
वटवट in जनातलं, मनातलं
7 May 2015 - 12:40 pm

(प्रस्तुत प्रसंग आणि सर्व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो एकमात्र योगायोग समजावा)….

"नोकरी"

रात्रीच्या चांदण्यांचा एक लूक घेतल्यानंतर, सगळ्यात सुरुवातीला कॅमेरा एका झोपडपट्टीवरून फिरतो… फिरत फिरत तो एका अरुंद अश्या बोळातून पुढच्या दिशेने जाऊ लागतो. जाताना आजूबाजूची दृश्ये खूप बोलकी असतात. एक गलितगात्र म्हातारा (वयोवृद्ध नाही…. म्हाताराच) खोकत असतो, दारात येउन. त्याच्या हातात एक तांब्या असतो, पण त्यात पाणी नसतं…( अरेरे…. किती गरिबी)… पुढे एक नागडं पोरगं घसा खरवडून खरवडून मोठ्ठ्याने रडत असतं… आणि आईच्या माराबरोबर त्याच्या रडण्याचे प्रकार आणि आवाजाची लय खालीवर होत असते… (परिस्थितीचा मार दुसरं काय??)… कोणत्यातरी झोपडीतून कुई कुई असा आवाज येत असतो…. (गरिबांनाही वासना असतेच कि….) त्याच झोपडीच्या एका फटीतून दोन कुतूहलमिश्रित डोळे लुकलुकत असतात…. कोठेतरी खाली पाणी सांडलेलं…. अस्वच्छ सगळं…. अतिशय घाणेरडा वास… जवळपास प्रत्येक झोपडीच्या दारात तुटलेली एकतरी चप्पल असतेच… (रस्ता खडतर आहे….)… काही झोपड्यांमध्ये कुट्ट अंधार…. काही झोपड्यांमध्ये रॉकेलचे दिवे… काही झोपड्यांमध्ये सामान जास्त नाही पण टीव्ही आहेच… (विरोधाभासच बरं हा)…. तर अश्या सगळ्या परीस्थितीचे चित्रण करत तो कॅमेरा एका अंधार्या झोपडीसमोर येउन त्या अंधाराचे चित्रण करू लागतो…. मोजून वीस सेकंद….

सकाळ होते… तो कॅमेरा उंबर्यात पडलेली तुटकी चप्पल लाथाडत आत प्रवेश करतो…. (लाथाडणे…. अरेरे किती क्रूर गोष्ट…. )
झोपडी अगदी झोपडीसारखी… गरिबीने ओतप्रोत भरलेली… सगळीकडे जाळी जळमटं… कुठल्यातरी भांड्यामध्ये एका उंदराची कसलीतरी (अस्वस्थंच) हालचाल चालू आहे…. तुटक्या फुटक्या छपरातून काही किरणं आत यायचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत…. (ही प्रतिमा आहे बरं)… एका खुंटीवर एक कोट धूळ खात पडलाय… त्यावरही काही जाळी जळमटं आहेत.. आता कॅमेरा त्या जाळी जळमट्यांमधून नायकावर रोखला जातो…

….

नायक…कृश देहाचा…. दाढीची खुंटे वाढलेली…. एका खाटेवर झोपलाय…. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांमधूनसुद्धा एक प्रकारची निराशा वाह्तीये… (ही पण प्रतिमाच बरं)…. काही सेकंदानंतर त्याला जाग येते… डोळे उघडताच त्याला दिसतं ते अगदी त्याच्या डोळ्यासमोरचं फुटकं छप्पर…. पुन्हा निराशा… (अरेरे)… तो अगदी हळूहळू उठतो… हळूहळूच…. जोरात नाही…. उठून एक अर्धफुटका मग हातात घेतो… त्याच्या अगदी तळाशी जरा मचूळ पाणी असतं… (पुन्हा अरेरे…. ) त्यानेच चूळ भरतो (चूळच …. दात नाही घासत… ते त्याला परवडणारं नसतं…. टोकाची गरिबी दुसरं काय)… आणि चुलीवर चहाचं आधण ठेवतो, पाण्यामध्ये दोन थेंब दुधाचे टाकून…. (ते पीठाचे पाणी वगैरे प्रतिमा जुन्या झाल्या आहेत…. आपण हे दुध बकरीचे म्हणू शकतो…. गाईचे किंवा म्हशीचे नाही)… आणि सगळ्या घरभर त्या चुलीचा धूर पसरतो…. आणि त्याच धुरात नायकाचा चेहरा अस्पष्ट होत जातो….

….

चहा आता झालाय…. नायक तो चहा काळ्याकुट्ट कपड्यातून गाळतो.… कपात ओततो… बशीत नाही… (समाजाची स्थितीचे अत्यंत विदारक चित्रण…. सगळे फायदे वरच्या वर्गालाच मिळतात…. खालच्या नाही… बशी मागास वर्गाची प्रतिनिधी बरं) तो चहा फुर्र्कन पिला जातो…. स्लो मोशन मध्ये… (इथे कॅमेरा फुटक्या कपाकडे आणि फुटक्या बशीकडे आळीपाळीने फिरतोय बरं….) चहा पिउन झाल्यावर नायक सावकाश उठतो… रद्दी झटकतो…. त्यातून धूळ उडते… आता कॅमेरा त्या धुळीतून नायकावर रोखलाय बरं… मग त्या रद्दीतून नायक तीन दिवस आधीचा पेपर काढतो. (इथे सांगायचे असे कि नायक इतका गरीब आहे कि तो दररोज पेपर नाही घेऊ शकत विकत…. म्हणून तीन दिवस आधीचा…)…तो पेपर घेऊन जमिनीवर बसतो… मग तो त्याचा पेन हुडकतो…. दहा मिनिटे हुडकण्यात जातात… (विद्या मिळविणे किती कष्टप्रद असते??) एकदाचा तुटका फुटका पेन मिळतो…. त्याने तो त्या पेपरमधल्या एका जाहीरातीभोवती एक गोल करतो…. (इथे पेन मधली शाई काळी असते… ) …. आणि पुन्हा तुटक्या छपरातून आकाशाकडे अत्यंत निराशेने बघत राहतो…

….

आता एक चौक … खूप गजबजलेला…. मोटारीचे कर्णकर्कश्श आवाज… बस - stop वरची जीवघेणी गर्दी…. सिग्नलला भिकारी येताच बंद होणार्या कार्सच्या काचा… भिकार्यांची केविलवाणी नजर … त्यांची उघडी नागडी पिलावळ…. एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू भेदरून एका कोपर्यात थरथरत बसलंय… अधून मधून येउन कोणीतरी त्याला दगड मारतंय… एका टपरीवर एक लहान मुलगा आपल्या हाताची सर्व बोटं पाण्याच्या ग्लासमध्ये घालून ते पेले त्याच्या कस्टमरला देतो… तो ते पितो… आणि नंतर कळकट बाकड्यावर बसून तळकट पेल्यातला पाणचट चहा प्यायला सुरुवात करतो…. काही जणं पानाच्या टपरीवर बिड्या (होय…. बिड्याच) फुंकत बसलेत…. अधून मधून ते खोकत पण आहेत…. तर ह्या सगळ्याचे चित्रण करत तो कॅमेरा एका बसला लोम्बकळून जाणार्या जनतेवर स्थिरावतो…. ज्यामध्ये लोंबकळत असतो आपला नायक…. तोच धुळकट कोट घालून….

…….

आता एक मोठी शासकीय इमारतीमधल्या एका ऑफिसचे दृश्य….
एक माणूस खुर्चीत बसलेला… जाडजूड… तोंडात पान…. ओठ जरा लाल …. खांद्यावर थोडासा कळकट गंजा आहे…. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वरच्या वर्गातला…. आपल्या नायकाने दिलेला अर्ज वाचत आहे…. नायकाला बसा म्हणायचेही सौजन्य त्याच्यात नाही… आशाळभूत नजरेने नायक त्याच्याकडे पाहतो….
"अच्छा …… नोकरी हवीये…. " उर्मट आवाज
"होय साहेब " लाचार आवाज…
"फाईल बघू?" उर्मट आवाज
"घ्या साहेब".. आवाजात प्रचंड अजीजी…
फ़ाइल पुढे केली जाते.… नाकावरचा चष्मा सावरत, खालचा ओठ थोडास्सा पुढे काढून त्या फाईलमधली कागदपत्रं चाळणं सुरु होते…
काही सेकंदानंतर……
"अरेSSSSSSSS साधी बारावीच पास आहेस आणि क्लार्कसाठी अर्ज??…… नॉन - सेन्स" म्हणून तो मोठ्याने रागावलेल्या स्वरात ओरडून ती फाईल जोरात फेकून देतो…. कचर्याच्या बादलीत… काही पेपर्स बाहेरही पडतात… नायक लगेच ती कागदपत्रं उचलतो… आणि पुन्हा त्याच माणसापुढे येउन उभा राहतो…. मोजून पंचवीस सेकांदानंतर….
"का उभा आहेस? मराठी नाही का कळंत….? बारावी पास आणि वरच्या पोस्टसाठी अर्ज?…. निर्लज्जा…. जा…. नकोस उभारू इथे… कुठून कुठून लोकं येतात… देव जाणे…. जाSSSSS… "
नायकाचा चेहरा अजून पडतो…. जोरात (इथे मात्र चेहरा पडल्याचा आवाज नाही येत…. तो समजून घ्यायचा… टण्ण्ण…)
नायक अजून निराश नजरेने त्या माणसाच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवतो…. आणि अगदी त्याच्या डोक्यावरच्या खिडकीत त्याची नजर जाते… तिथे एक कोळी आपले जाळे विणत असतो…. गोल गोल… आणि एकदम त्या जाळ्यात एक किडा अडकतो…. अडकलेल्या किड्याकडे त्या कोळ्याचे लक्ष जाते… तो त्याच्या जवळ जातो.... त्याला आपल्या जाळ्यात बांधून घेतो…. आणि त्याला खायला सुरुवात करतो….
(किती समर्पक प्रतिमा आहे ना??) त्या किड्याकडे अगदी समदुःखी नजरेने पाहून तो नायक त्या शासकीय कार्यालयातून बाहेर पडतो… आणि बाहेरच्या बाकावर येउन बसतो…. नजर शून्यात… मन खोल विचारात बुडून गेलेलं असतं… त्याच्या मनात विचार येतो… "ज्या देशात बारावी पास व्यक्ती शिक्षण मंत्री होऊ शकते…. त्या देशात मला साधी क्लार्कची नोकरी नाही मिळू शकत??" (अरेरे…. किती शोकांतिका…)। तो एकदा आजूबाजूला पाहतो… शासकीय कार्यालय जसे वातावरण असते तसेच तिथे असते… तो पुन्हा आपल्या विचारात बुडून जातो… समोरच्या खिडकीतून जरा भरत आलेले आभाळ बघत… बराच वेळ निघून जातो…. (अर्थात ह्याचे त्याला भान नसतेच… )
काही काळानंतर एक शिपाई त्याच्या अंगावर खेकसतो….
"अबे…. ही शासकीय कार्यालये… तुझ्या बापाचं घर न्हाय…. चाल बंद करायची येळ झालीय… उठ"
नायक अगदी शांतपणे एकदा त्याच्या फाईलकडे बघतो…. नंतर तेव्हढ्याच शांत नजरेने त्या शिपायाकडे बघतो…. उठतो… बाहेर येतो… त्याच्या लक्षात येतं, संध्याकाळ झालीये…. मनात विचार येतो… "च्यायला… संध्याकाळ झाली, कळलंच नाही'… कोपर्यात तेच लहान कुत्र्याचं पिल्लू शांत झोपलेलं असतं… त्याच्याकडे पाहून नायकाच्या डोळ्यातून दोन थेंब खाली पडतात… तो कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवतो…. घरी येतो…. आणि झोपतो…
कॅमेरा त्याच्या चांद्रमौळी झोपडीतून त्याच्या मिटलेल्या डोळ्याच्या अगदी जवळ जातो…. तिथे अंधाराशिवाय काहीही नसतं… कॅमेरा तिथे मोजून तीस सेकंद थांबतो…. आणि ……… "स मा प्त" ही तीन अक्षरे झळकू लागतात….

रेटिंग:
१/२* (५ * पैकी)

काही दिवसांनी "नौकरी" ह्या चित्रपटाला अखिल भारतीय विचित्रपट महामंडळाचा खूप मनाचा "सुवर्णपुष्प" नावाचा पुरस्कार जाहीर होतो आणि….

रेटिंग:
****

दैनिक काळोख - एक उल्लेखनीय, वेगळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे "अतुलनीय" चित्रपट

दैनिक जागना - सुशिक्षित आणि उच्चभ्रू समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट

दैनिक संघर्ष - क्रांतीची बीजे रोवणारा चित्रपट

दैनिक महाराष्ट्र लाईम्स - समाजमनाचा अतिसूक्ष्म पंचनामा म्हणजे "नोकरी"

दैनिक भोगसत्ता - काळजाला भिडणारा, भेदणारा, छेदणारा आणि कोणीही न चुकवावा असा

दैनिक भिकारी - समाजमनाच्या कक्षा रुंदावणारा आणि एका जुन्याच वास्तवाचे नव्याने भान देणारा अविस्मरणीय अनुभव

समीक्षक १ :

खरं पहायला गेलं तर हा चित्रपट नाहीच…. किंबहुना चित्रपट ह्या संकल्पनेत नं मोडणारी ही कलाकृती आहे… साधारण चित्रपट ह्या संकल्पनेला छेद देऊन त्याच्या मर्यादेची जाणीव करून देणारा प्रयत्न म्हणून ह्याची प्रशंसा आपण केलीच पाहिजे. आणि जर कोणी तसं करत नसेल आणि उगाच ह्या चित्रपटावर बिनकामी टीका करत असेल तर त्याने आपल्या बुद्धीचे वय तपासून घ्यावयास हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

समीक्षक २ :
ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ह्या नायकाच्या डोळ्यात जे काही भाव आहेत जे तसूभरसुद्धा बदलत नाहीत… शेवटपर्यंत. ह्याचा अर्थ काय?? तर त्या समाजाची स्थिती ही सुद्धा कधीच बदलली नाही. आणि ह्या विषयावर आत्तापर्यंत ह्या देशात कधीच चित्रपट केला गेला नाही आणि केला गेला नसेल तर तो अशाप्रकारे नाही.

समीक्षक ३ :
डोळ्यांवर झापडे बांधून बसलेल्या समाजाच्या कानाखाली सणसणीत चपराक देण्याचे काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून केले गेले, ह्यासाठी मी ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अगदी मनापासून अभिनंदन करतो. ज्याप्रकारे ह्या प्रतिमा दाखवल्या गेल्या आहेत त्या तर कौतुकाच्याही पलीकडच्या आहेत. तो खोकणारा म्हातारा काय, ते नागडे मुल काय, तो कुई कुई आवाज काय…. सगळंच विलक्षण…. अन जेंव्हा नायक त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दोन अश्रू गाळतो तेंव्हाचे ते अश्रू ते त्या कुत्र्यासाठी नव्हे तर आपल्या सडलेल्या, भ्रामक समजुतीत बुडलेल्या आणि त्याच्यासारख्या अडलेल्या असंख्य बांधवांसाठी गाळलेले होते…

समीक्षक ४ :
एखाद्या चित्रपटात प्रतिमा वापराव्यात तर कशा ह्याचा वस्तुपाठ म्हणजे "नोकरी"… ह्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही डोळ्यात साठवावी अशीच आहे. निराशेची भावना पराकोटीपर्यंत कशी जाते किंबहुना कशी जाऊ शकते ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ""नोकरी". नायकाच्या डोळ्यातून ओतप्रोत वाहणारी निराशा ही त्या आजच्या समाजाचं द्योतक आहे. कप आणि बशीचे उदाहरण तर सृजनतेचा अतिउत्कृष्ट नमुना म्हणून विचारात घ्यायला हवे. त्यासोबत तीन दिवस आधीचा पेपर, पेन मिळविण्याची धडपड, पेनमधली काळी शाई, तो कोळी, भरत आलेले आभाळ…. सारंच विलक्षण….

हे सगळं वाचत असताना दिग्दर्शक टीव्ही चालू करतो…
"………. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, "नोकरी" ह्या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय बारावी पास विद्यार्थी संघटनेची (अभाबापाविप) स्थापना झालेली असून त्याची सदस्य नोंदणी अतिशय जोरात सुरु असून लवकरच एक दशलक्ष बारावी पास युवक ह्या संघटनेशी जोडले जातील असा अंदाज आहे. येत्या महिन्याच्या १२ ह्या तारखेला दिल्ली येथे मंत्रालयावर "बारावी पास विद्यार्थांना प्रथम दर्जाच्या नोकर्या का मिळू नयेत" म्हणून धडक मोर्चाचेही आयोजन करण्यात आलेले असून अतिशय सुप्रसिद्ध असे समाजसेवक नन्ना आजारे ह्यांनीही ह्या मोर्चाला आपला पाठींबा जाहीर केलेला आहे. त्याचसोबत प्रसिद्ध अश्या गंमतजंमत मैदानावर ह्या मोर्च्याच्या समर्थनार्थ १२ दिवसांचे लाक्षणिक उपोषणही करण्याचाही त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. नन्ना आजारे ह्यांच्या ह्या पावित्र्याने अभाबापाविपच्या सर्वच सदस्यांच्या अंगात बारा हत्तींचं बळ संचारल्याची भावना प्रबळ होत आहे. आपल्या देशात एका चित्रपटावरून प्रेरणा घेऊन अश्या काही चळवळीची मुहुर्तवेढ पहिल्यांदाच रोवली जात आहे… नक्कीच "नोकरी" ह्या चित्रपटाचं नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरात नाही लिहिलं गेलं तरंच नवल आहे…. कॅमेरामन स.दा.नापासे ह्यांच्यासोबत मी काहीही बरळे… ए टी पी माझा…. "

दिग्दर्शकाने टीव्ही बंद केला आणि डोक्याला हात लावत म्हणाला…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"खरंच मला हे असं दाखवायचं होतं???"

कथालेख

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 May 2015 - 1:45 pm | गणेशा

निव्वळ अप्रतिम ...
चित्रपट सर्व चित्र डोळ्यासमोर उभे करतो .. लेखातील शेवट जबरदस्त आजकाल काहीपण अर्थ काढले जाऊ शकतात.

एस's picture

7 May 2015 - 1:58 pm | एस

भापो.

मास्टरमाईन्ड's picture

7 May 2015 - 2:44 pm | मास्टरमाईन्ड

आवडलं

कॅमेरामन स.दा.नापासे ह्यांच्यासोबत मी काहीही बरळे… ए टी पी माझा…. "

पगला गजोधर's picture

7 May 2015 - 2:56 pm | पगला गजोधर

_/\_

कपिलमुनी's picture

7 May 2015 - 4:12 pm | कपिलमुनी

लैच खास !

नाखु's picture

7 May 2015 - 4:49 pm | नाखु

लै वट्ट*२ हाये तुम्चा !!
अजून येऊं द्या.

पारंबीचा झापू

अंतु बर्वा's picture

7 May 2015 - 8:21 pm | अंतु बर्वा

सुं द र!!!!!!

मोहनराव's picture

7 May 2015 - 8:42 pm | मोहनराव

झकास!

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 9:48 am | सतिश गावडे

खरोखरच तुम्ही वर्णन केलेल्या फ्रेम्स नजरेसमोरुन सरकत होत्या.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे... मनापासून आभार....