ह्युमन रिसोर्स - एक प्रजात

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
15 Apr 2015 - 5:44 pm

चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की,
"कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव स्वत: मध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो"

नाही नाही... या सिद्धांतावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही म्हणा, या डार्विनभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षचं झाले. त्यापैकीच एक प्रजात म्हणजे ह्युमन रिसोर्स किंवा एच आर !डार्विनभाऊंच्या आदरार्थ या प्रजातीची ओळख त्यांच्याच शैलीत करून देतो.

" एच आर ही प्रजात अंगी कुठलेही गुण न बाळगता इतरांशी स्पर्धा करून टिकून राहू शकते. एवढेच नव्हे तर, स्पर्धा न करता सुद्धा ही प्रजात इतरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते "

एच आर ही प्रजात अल्पसंख्यान्कामध्ये येत असली तरी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. या प्रजातीचा उदय कॉर्पोरेट संस्कृतीत झाला. फार पुरावे उपलब्ध नसले तरी ढोबळमानाने भांडवलशाही आणि समाजवाद यांच्या संघर्षात या प्रजातीची पाळेमुळे असावी. कामगार आणि नोकरदारांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना योग्य तो मोबदला आणि हक्क देण्यात यावे या हेतूने ह्युमन रिसोर्स ही संस्था स्थापन झाली असावी. आणि इथेच थोडा घोळ झाला . कामाचे मूल्यमापन करणे वगैरे ठीक आहे पण ते कोणी करावे याविषयी काहीच नियम ठरवण्यात आले नाही. बरं या मूल्यमापन करणाऱ्यांनी स्वत: कोणती कामगिरी पार पाडावी याविषयी सुद्धा मौन बाळगले आहे. प्रजातीची उत्क्रांती होता होता त्यांनी स्वत: काही जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. म्हणजे एखाद्या कामगाराच्या कौशल्याप्रमाणे त्याला काम देणे, नवनवीन कामगारांना नोकरी देणे वगैरे वगैरे. या जबाबदाऱ्या घेताना आपली प्रजात ही सर्वगुणसंपन्न आहे असा समज करून घेतलेला आहे. खरं म्हणजे या प्रजातीच्या उत्क्रांतीची आणखी एक थेयरी प्रचलित आहे. काहींच्या मते इसापनीतीतील ,"दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ" या गोष्टीतला बंदर हा या प्रजातीचा आद्यपुरुष आहे. या बाबतीत डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेता येऊ शकतो. डार्विनच्या मते, बंदरामध्ये बदल घडून मानव उत्क्रांत झाला. पण एच आर च्या बाबतीत बंदरामध्ये खरंच काही बदल घडले की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्या गोष्टीतला बंदर जसा काहीही न करता मेवा खाऊन जातो तसंच आजच्या काळातही घडताना दिसतं. स्वत: मेवा नाही खाल्ला तरी चालेल पण इतर कोणाला तो मिळणार नाही याची खातरजमा ते नक्की करतात.

आजकाल या प्रजातीमध्ये महिलावर्गाचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक यांच्यातही ५०% आरक्षण लागू झालं असावं.या प्रजातीत स्त्री- पुरुष असा भेदभाव केला जात नाही. आणि कित्येक कामात महिला पुरुषांपेक्षा वरचढ असल्याच यांनी आधीच मान्य केलं आहे. तसंही "मला पहा अन फुलं वाहा" या तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते असलेल्या या प्रजातीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पुढे आणणं क्रमप्राप्त होतं. कारण यांच्यातल्या पुरुषांकडे पाहून इतर प्रजाती दगड फेकून मारण्याची शक्यताचं जास्त आहे. पण एका बाबतीत ही प्रजात अत्यंत समंजस आहे.काहीही झालं तरी एच आर मंडळी हिंसक प्रत्युत्तर देत नाही. अर्थात अगदीच एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करतात असं नाही. त्यांची प्रत्युत्तर देण्याची पद्धत वेगळीच आहे. सश्याला गाजर दाखवून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ते शिकार करतात. आणि तरीसुद्धा ससा वाचला तर ते दुसऱ्या जंगलातून उच्च जातीचे ससे आयात करतात. कालांतराने आपला ससा स्वत:च जंगल सोडून जातो. हा प्रकार बघून इतर ससे थोडासा उठाव वगैरे करतात. पण त्यांनाही याच मार्गांनी शांत बसवल्या जाते.

का कोण जाणे पण सामान्य मानवजात आणि एच आर यांच्यात फार सलोख्याचे संबंध नाहीत. दोघांनाही एकमेकांविषयी फार तक्रारी आहेत.
मानवजात म्हणते,"आम्ही लाख नालायक असू पण हे ठरवणारे एच आर कोण ? त्यांची पात्रता काय?”
तर यावर एच आरवाले म्हणतात,"आम्ही कोण म्हणुनी काय पुसिता? आम्ही मॅनेजमेण्टचे लाडके!”
मानवजात: "ह्यांच्या शब्दावर कधीच विश्वास ठेऊ नये"
एच आर: "एक बार हमने कमिट्मेण्ट कर दी, तो हम सौ बार उससे मुकर सकते हैं!"
मानवजात: "हे स्वत: तर काहीच करत नाहीत. रिकामचोट आहेत!”
एच आर: "अपने काम से काम ना रखना यही हमारा काम हैं!”

आता एच आरच्या कामाचा विषय निघालाच आहे तर ते सुद्धा आपण विस्ताराने समजावून घेऊ. पण त्याआधी यशस्वी एच आर होण्यासाठी आवश्यक असलेले गुण लक्षात घेऊया. मुळात अयशस्वी एच आर ही एक कविकल्पना आहे. अजूनतरी अयशस्वी किंवा निराश झालेला एच आर माझ्या पाहण्यात आला नाही. कारण एच आरच्या प्रत्येक खेळाचा नियम "चित भी मेरी पट भी मेरी" इथूनच सुरु होतो. असं असूनही जर चुकून समोरचा जिंकलाच तर "I will come back to you on this " असं एखादं शस्त्र वापरण्यात येते. एच आरचं संभाषण कौशल्य चांगलं असलंच पाहिजे असं आवश्यक नाही. फक्त काही परवलीचे वाक्य आलटून पालटून योग्य ठिकाणी वापरणं त्यांना जमलं पाहिजे. उदा. एखाद्या कामगाराने तक्रार वगैरे नोंदवली असेल तर लगेच," This is as per company policy " असं उत्तर येतं. किंवा एखाद्याने काही मागणी केली असल्यास लगेच," We are working on it " असं उत्तर येतं. एखाद्याला समजवायचे असल्यास," See, company has big plans. Look at the bigger picture” ही भाषा आणि एखाद्याला समज द्यायची असल्यास," See, you should learn to manage your priorities at work…and even in life!" ही भाषा!

एच आर लोकांना त्यांच्या कामाचाच एक भाग म्हणून कामगारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागते. अश्या उपक्रमांना त्यांच्या भाषेत Employee engagement activities असं म्हणतात. ह्याचाच पर्यायी अर्थ "रिकाम्या हाताला कामं" असाही होऊ शकतो. कंपनीतल्या विविध कर्मचार्यांमध्ये आणि विभागांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहावे यासाठी एच आरला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांचे "ते" विशेष प्रयत्न अत्यंत गुप्ततेने सुरु असल्यामुळे त्याचे तपशील आणि सक्सेस रेट कधीही दृश्य स्वरूपात बाहेर येत नाहीत. नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेताना एच आरला अत्यंत Diplomatic approach ठेवावा लागतो. गेंड्याची कातडी आणि कोल्हयाची बुद्धी असल्याशिवाय हे शक्य होत नाही.कर्मचारी आणि मॅनेजमेण्ट यांचातील दुवा म्हणून सुद्धा एच आरला काम करावं लागतं. बरेचसे एच आर या बाबतीत चाणक्याला आपले आद्यगुरु मानत असले तरी त्यांचे वर्तन नारदमुनीन्पेक्षा वेगळे नसते.

ही प्रजात मॅनेजमेण्टची कितीही आवडती असली तरी काही आघाड्यांवर मात्र अजून म्हणावं तसं यश मिळवू शकली नाही. वर्षानुवर्षापासून ही प्रजात जनमानसामध्ये आदराचे स्थान मिळवायचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या पदरी उपेक्षाच येत आहे. शेवटी यांचातल्या काही तज्ञांनी एकत्र येउन यावर उपाय शोधण्याचे ठरवले. या मंथनातून कितीतरी प्रभावी उपाय सुचवले गेले. पण वर्षानुवर्षे फक्त उपाय सुचवण्याचाच अनुभव असलेल्या या प्रजातीसमोर, "उपाय अमलात आणायचा कसा ?" हा प्रश्न उभा राहिला आहे. अर्थात या प्रश्नावर ते लवकरच उपाय शोधतील याबद्दल शंका नाहीच !!
-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

15 Apr 2015 - 10:31 pm | वाटाड्या...

काहीही म्हणा...एच आर हे कंपनीच्या फायद्याचा विचार करण्यासाठीच निर्माण करण्यात आलेले असते. ते कधीही कंपनीच्या विरोधात कितीही बरोबर असेल तरीही कंपनीच्या कर्मचार्‍यांना सपोर्ट करु शकत नाहीत.

- वाट्या...

सतिश गावडे's picture

15 Apr 2015 - 10:44 pm | सतिश गावडे

ते एचार आणि अ‍ॅडमिन वाले एकच का हो? आणि रिक्रुटमेंटवाले हे एचारमध्ये येतात की त्यांची स्वतंत्र जहागिरी असते?

अभय's picture

16 Apr 2015 - 5:41 am | अभय

Real Name : Human Remains

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 8:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भिकार प्रजात असा एक माफक बदल आपल्या शिर्षकात सुचवु इच्छितो.

विअर्ड विक्स's picture

16 Apr 2015 - 10:12 am | विअर्ड विक्स

लेख आवडला. आयुष्यातील अनेक अनुभव डोळ्यासमोर तरळले. या प्रजातीतील कोणी मिपावर नाही का ? आणि असतील तर त्यांची लेखावरील प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. नाहीतर उत्तर मिळायचे we are working on it …. :)

मदनबाण's picture

16 Apr 2015 - 10:21 am | मदनबाण

बरेचसे एच आर या बाबतीत चाणक्याला आपले आद्यगुरु मानत असले तरी त्यांचे वर्तन नारदमुनीन्पेक्षा वेगळे नसते.
नारायण ! नारायण ! हा तर नारदमुनींचा कमालीचा अपमान आहे.
त्यांचे वर्तन भुक्कडपणा करण्यापेक्षा पेक्षा वेगळे नसते. असा बदल सुचवु इच्छितो ! ;)
आमची एक फ्लोअर एचएआर आहे, तिला मेल पाठवल्यास त्या मेल ला रिप्लाय न करण्यासाठी ती सर्व आयटी हमालांमधे "प्रसिद्ध" आहे.ती एक नंबरची उद्धाम आहे, आणि कंपनीत फक्त दिवस भरण्यासाठीच येते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai

नाखु's picture

16 Apr 2015 - 5:06 pm | नाखु

आणि कंपनीत फक्त दिवस भरण्यासाठीच येते.

आणि कंपनीत फक्त इतरांचे दिवस भरण्यासाठीच (शंभरी भरली तुझी या न्यायाने) येते. असे असावे.

कारण पूर्वकंपनीत असाच एक मॅनेजरची मर्जीबहाद्दर होतीच.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2015 - 10:30 am | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

btw पेरोल (सॅलरी प्रोसेसिंग), रिक्रुटमेंट, अटेंडन्स, लीमेंट, ट्रेनिंग्,लर्निंग & डेव्हलपमेंट,
अप्रेजल मॅनेजमेंट, इन्क्रीमेंट, अ‍ॅट्रिशन हे सगळ्ळं HR च्या अखत्यारीत येतं.

असो. दुरून डोंगर साजरे!!!

चिनार's picture

16 Apr 2015 - 11:50 am | चिनार

अस्मी भाऊ / ताई,

लेखाचा उद्देश केवळ आलेले अनुभव मजेशीररित्या मांडण्याचा आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातचं हे अस्मादिकांच्या ध्यानात आहे.

पॉइंट ब्लँक's picture

16 Apr 2015 - 4:54 pm | पॉइंट ब्लँक

+१
बाकी लेख मजेशीर आहे!

कलंत्री's picture

16 Apr 2015 - 11:36 am | कलंत्री

लेख जबरा झालेला आहे.

मागच्या वर्षी या प्रजातीने एगदी गंभीर चेहर्‍याने सांगितले की यावर्षी आम्ही फार किचकट आणि अवघड असा निर्णय घेत आहोत, कालांतराने समजले की पगार वाढ करणार नाही असा तो निर्णय होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 11:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुन कोणी "कंपणीच्या पॉलिसीत बसत णाही" कसं लिहिलं नाही?

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2015 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ये असं असतय व्हय त्ये HR!
ह्ये HR मंजि हमाल आणि ठेकेदाराच्या मधलं ठेकेदाराच्या बाजुचं डिपार्मेंट म्हनाव काय मंग?

एचआर यामध्ये रिसोर्स या शब्द असल्याने शेवटी ते लोक "ह्युमन" ला एक "रिसोर्स" समजणार त्यात काय वाईट वाटायचे कारण नाही .(रिसोर्स - अशी गोष्ट कि ज्यामधून फायदा कमावता येतो )
एचआर शी संबंधित जे काही निर्णय असतात ते फक्त मोजकेच लोक घेतात आणि बाकीची एचआर फक्त इमेल पाठवणे , डॉक्युमेंट्स बनवणे , स्पर्धा / सण साजरे करणे यास्वरुपाचेच काम करतात. पण काही एचआर लोक उगाच काड्या करण्यामध्ये धन्यता मानतात त्यांचा लई राग येतो . एचआर हा महत्वाचा भाग असला तरी तो नाकापेक्षा जड झाला कि त्रास होतोच.
तसेही एचआर चा संबंध फक्त एखादी कंपनी जोइन करणे आणि सोडणे यावेळीच मोठ्या प्रमाणावर येतो . बाकी सर्व वेळी ( पगार वाढ , सुट्ट्या , कामाचे तास , कामावर घालायचे कपडे आणि इतर सर्व ) जे बाकीच्या लोकांचे होईल तेच आपले होईल असे असते.

पहिला राजा's picture

16 Apr 2015 - 3:31 pm | पहिला राजा

HR stands for High Risk
माझी बायको professionally HR च आहे , सो वरील long form १००००००% सत्य आहे , हे मी स्वानुभावरून सांगतोय, विश्वास ठेवा

बाकी लेख जबरा !!!!

असा काही नाहीये चिनार भाऊ आम्ही एच आर वाले करतो कधीतरी काम :) मला तर गमतीत नारायण च बोलतात ऑफिस मध्ये.....

काहीही म्हणा...एच आर हे कंपनीच्या फायद्याचा विचार करण्यासाठीच निर्माण करण्यात आलेले असते. ते कधीही कंपनीच्या विरोधात कितीही बरोबर असेल तरीही कंपनीच्या कर्मचार्‍यांना सपोर्ट करु शकत नाहीत.

या वाक्याशी सहमत, कारण काही गोष्टी पटत असून पण आम्हाला करता येत नाहीत कारण कंपनीच्या फायद्याचा विचार करावा लागतो.

वाईट तेव्हा वाटते जेव्हा एखाद्याला कामावरून कमी करायला लागत, तो निर्णय असतो कंपनीचा पण शिव्या मात्र आम्ही खातो.

योगागोयाने माझ आडनाव कातकर (इंग्रजी मध्ये काटकर बोलतात) तर कंपनीतले सर्व जन हेच बोलतात कि योग्य माणूस बसवला आहे जो नेहमी कट करत असतो. पण आमच्या कंपनी मध्ये आमच्या एच आर च सर्व इम्प्लोयीज बरोबर छान रिलेशन आहे. आणि हो सर्वच एच आर वाले खडूस नसतात.

ह्युमन रिसोर्स वाला
जगप्रवासी

चिनार's picture

16 Apr 2015 - 5:38 pm | चिनार

लेख स्पोर्टिंगली घेतल्याबद्दल धन्यवाद !

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Apr 2015 - 4:45 pm | माम्लेदारचा पन्खा

अप्रेझल जवळ आल्याने माझे वाग्बाण राखून ठेवत आहे !! नंतर गरज लागलीच तर इथेच येऊन ओकीन :-))

सतीश कुडतरकर's picture

16 Apr 2015 - 5:27 pm | सतीश कुडतरकर

जबरी लेख!

आधीच्या कंपनीत एक 'पोळ' नावाचा HR होता. कामगारांसाठी काहीतरी चांगली कल्पना घेऊन management कडे गेला आणि स्वतःची नोकरी घालवून बसला. चांगलाच 'पोळ'ला बिचारा.

पोळ साहेबांचं नाव काय होतं? माझा एक वर्गमित्र आहे पोळ जो एच आर मध्ये गेला होता..??

मोहनराव's picture

16 Apr 2015 - 7:25 pm | मोहनराव

त्यानिमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या अगोदरच्या कंपनीत HR हि जात महाखडुस होती.
दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर कंपनी बदलावी अश्या विचारात होतो. त्यावेळी काहीना काही कारणाने या जातीबरोबर खटके उडायचे. (लंच, सुट्ट्या, काही नियम यावरून)
एकदा HR असाच म्हणाला की लोक जॉईन होतात त्यावेळी मांजर असतात आणि २-३ वर्ष अनुभव झाला कि शिंगे फुटतात. माझा मनेजर तिथेच होता. त्याने ऐकले.
नंतर एकदा रिव्यू मिटींगला HR विषयी काही तक्रारी आहेत का असा विचारले गेले तेव्हा त्याला मी त्या गोष्टीवरून चांगलाच फैलावर घेतला आणि हेड कडे तक्रार केली. मग बरोबर वठणीवर येवून त्याने माफी मागितली. बाकी बराच काही आहे पण जाऊदे यार!

कलंत्री's picture

17 Apr 2015 - 12:43 pm | कलंत्री

एच आर वाल्यांना स्वताचे प्रक्षिशण व्यवसाय करण्यासाठी ( ट्रेनिंग) इत्यादी मध्ये बर्‍याच संधी मिळतात. चांगले नेटवर्क ( संबंध) निर्माण केल्यास स्वताचे ट्रेनिंग दुकान टाकता येते अथवा निवृत्तीनंतर महिन्यात ७ / ८ दिवस कामकरुन अर्थार्जनाचीही संधी मिळते.

सस्नेह's picture

17 Apr 2015 - 1:03 pm | सस्नेह

एक नंबरची मुजोर आणि हरामी जमात ! जोडे हाणायच्या लायकीची.

सुबोध खरे's picture

17 Apr 2015 - 3:03 pm | सुबोध खरे

दुसरी बाजू --
ता क-- मी एच आर वाला नाही किंवा त्याच्याशी दुरान्वये हि संबंध नाही.
एच आर वाल्यांची अवस्था पाळीव कुत्र्यासारखी असते. हळू भुंकला तर मालक शिव्या घालतो जोरात भुंकला तर समोरचा शिव्या घालतो. आणि समोरचा मालकाचा मित्र निघाला तर परत खापर कुत्र्यावरच फुटते. सगळ्यांच्या शिव्या खात बिचारे नोकरी करत असतात.
असो काही स्वानुभव-- १) मुंबईतील एका कोर्पोरेट रुग्णालयात रात्री २ वाजता प्रयोगशाळेतील एक कर्मचारी रिपोर्ट टंकत असताना भ्रमणध्वनीवर गाणी ऐकत होता. त्यावेळेस व्हाईस चेअरमन राउंडला आला आणि त्याने हे पाहिले आणि तुम्ही लोक कामावर संगीत लावून बसत आणि कामात लक्ष नाही इ इ झाडा झाडी केली. दुसर्या दिवशी सकाळी एच आर व्यवस्थापकाला त्याने फतवा दिला कि आठच्या आठ लेब तंत्रज्ञाना कामावरून काढून टाका. त्या व्यवस्थापकाला आठ लोकांना काय कारणाने आणि का काढून टाकायचे ते कळेचना. यावर त्याला सांगितले गेले कि आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर तुला पण नारळ मिळेल. आता सर्व लोकांना काढून टाकले म्हटल्यावर रुग्णांचे रक्त लघवी हे सर्व बाहेर पाठवून तपासणी करून घ्यावी लागली. एक आठवड्याचे बिल २ महिन्याच्या बिला इतके आले. मग त्या आठही जणांना परत बोलवा आणि त्यांच्याकडून माफीनामा लिहून परत नोकरीवर घ्या. एच आर व्यवस्थापकाने तीन महिन्यात नोकरी सोडली.
२) दुसर्या कोर्पोरेट रुग्णालयात एच आर व्यवस्थापकाने मला( मी HOD होतो) कर्मचारी वर्गाला पगार वाढ द्यायची आहे तर लोकांना त्यांच्या कामगीरीप्रमाणे २५ टक्के लोकांना १०% ५० टक्के लोकांना २० % आणि उरलेल्या २५ % लोकांना ३० टक्के वाढ देता येईल. कोणालाही ३०% च्या वर वाढ देता येणार नाही हे निक्षून सांगितले. हाच संवाद मी माझ्या हाताखालील लोकांना सांगितला.
जेंव्हा प्रत्यक्ष पगारवाढ मिळाली तेंव्हा मेडिकल डायरेक्टरच्या चमच्यांना ६० टक्के पर्यंत पगार वाढ दिली गेली. एच आर ला विचारले तेंव्हा त्याने मला माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे हे सांगितले. तो खरे बोलतो आहे हे मला माहित होते.मेडिकल डायरेक्टर ५ पैश्याच्या लायकीचा माणूस नाही हे मला माहित होते. माझ्या कर्मचार्यांनी मला विचारले कि सर असे कसे झाले. मी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. आम्ही मेडिकल डायरेक्टरला पगारवाढीची विनंती करू इच्छितो. मी त्यांना पूर्ण परवानगी आहे असे सांगितले. एकाने तर मला विचारले कि सर मी मेडिकल डायरेक्टरच्या विभागात जाऊ इच्छितो. माझी त्यालाहि पूर्ण परवानगी होती. अर्थात त्याचा उपयोग झाला नाही हा भाग अलाहिदा. पण केवळ माझ्या विभागात पारदर्शी पणा असल्याने कर्मचार्यांना पण कळले कि हि एच आर ची चूक नाही तर मेडिकल डायरेक्टरचा चावटपणा आहे.
३) याच रुग्णालयात एक मल्याळी सिस्टर फोनवर रुग्णाशी मल्याळीत बोलली म्हणून सी इ ओ ने तिला तडकाफडकी त्याच दिवशी कामावरून काढून टाकले. हे काम एच आर मानेजरला बोलावून करवण्यात आले आणि ते सर्व कायद्यात बसवायची जबाबदारी पण त्याच्या गळ्यात आली. हा लष्करातून निवृत्त झालेला अधिकारी होता आणि याने तीन महिन्यात नोकरी सोडून उत्तराखंड मध्ये निवृत्त जीवन घालवणे पसंत केले.
४) माझ्या वडिलांनी जमनाला बजाज मधून बिझिनेस म्यानेज्मेंट केली होती काही काळासाठी त्यांना पर्सोनेल मैनेजर म्हणून नेमले होते तेंव्हा ची गोष्ट.
कंपनीच्या मालकाचे आणि एका कामगाराचे भांडण झाले. मालकाने याला कामावरून काढून टाका असा आदेश दिला. तेंव्हा हायर आणि फायर अशी परिस्थिती नव्हती. वडिलांनी त्या मालकाला सांगितले कि सर, हा माणूस औद्योगिक न्यायालयातून नोकरीवर परत घ्या असा आदेश घेऊन येईल. त्यावर ते म्हणाले आपण उच्च न्यायालयात जाऊ. वडील म्हणाले असे काढून टाकले तर उच्च न्यायालयात पण आपल्याला हार घ्यायला लागेल. त्यावर ते मालक म्हणाले मिस्टर खरे, पैशाचा प्रश्न नाही, मला कंपनीत त्याचा चेहरा बघायचा नाहीये. सर्वोच्च न्यायालयात जा, फली नरिमनला हायर करा. Money is not a problem, I dont want to see his face. मग काय करणार. वडिलांनी त्या कामगाराला विश्वासात घेऊन सांगितले कि तू सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्याची तयारी असेल तर बघ. घरदार विकून उगाच रस्त्यावर येशील. त्यापेक्षा मी तुला मला जमेल तितकी जास्तीत जास्त भरपाई देण्याचा प्रयत्न करतो ती घेऊन दुसरीकडे नोकरी बघ. तो बिचारा नोकरी सोडून गेला आणि सुदैवाने काही महिन्यात त्याला टाटा ओईल मिल्स मध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली. तो वडिलांना केंव्हाही भेटले कि धन्यवाद देत असे.
आपण एखाद्या गोष्टीच्या कडे एकाच दृष्टीकोनातून पाहतो. दुसरी बाजू सुद्धा समोर यावी हि इच्छा.

नेत्रेश's picture

20 Apr 2015 - 3:13 am | नेत्रेश

सुदैवाने मला अत्तापर्तंत खुप चांगले HR भेटले आहेत. नशीबाने वाईट HR फक्त ऐकुन माहीत आहेत.

तसेच आपल्या वडीलांनी त्या कामगाराची केस ज्या संवेदनशीलपणे हाताळली ते कौतुकास्पदच आहे.

चिनार's picture

20 Apr 2015 - 10:30 am | चिनार

खरे साहेब,

आपला प्रतिसाद आवडला. प्रत्येक नाण्याला दुसरे बाजू असतेच. मुळात आपल्या कामाशी आणि तत्वांशी एकनिष्ठ असलेला माणूस कोणत्याही क्षेत्रात चांगलाच काम करणार. आपण दिलेले सगळे उदाहरण त्याच पठडीतले आहेत. माझ्याही पाहण्यात असे HR आले आहेत. एका निर्दोष कर्मचाऱ्याला sexual harrasment च्या केस मध्ये कामावरून काढून टाकावे लागल्यामुळे एका HR ने त्याच दिवशी संध्याकाळी राजीनामा दिलेला मी ऐकलेला आहे.
पण गेल्या काही वर्षात HR ची जी लाट MBA तयार करणाऱ्या कारखान्यांतून बाहेर पडते आहे ती माझ्या लेखाशी मिळतीजुळती नक्कीच आहेत. HR चा अर्थ "खावो, पिवो, ऐश करो" असा ही लोकं घेतात. आयटी क्षेत्र किंवा अगदी आमच्या मेकानीकल क्षेत्रात काम करत असलेले HR "मला पहा अन फुल वहा" याच पठडीत येतात. यांचे बोलाविते धनी वेगळे असतात हे मान्य. पण हे स्वत: कंपनीचे मालक असल्यासारखे वागतात.

सुबोध खरे's picture

20 Apr 2015 - 12:04 pm | सुबोध खरे

चिनार साहेब
बर्याच वेळेस एच आर वाल्यांना असे वागावे लागते. राजाच्या कुत्र्याला सुद्धा राजेशाही वागावे लागते. मला एवढेच म्हणायचे आहे कि एखादा माणूस स्वतःला शहाणा समजत असेल तर तो चपराशी म्हणून पण आगाऊपणा करेलच. परंतु त्याची गरज फार लोकांना पडत नाही त्यामुळे फार लोकांचे अडत नाही .
एवढेच आहे कि आगाऊ माणूस एच आर मध्ये गेला तर फारच शेफारून जातो आणी त्याच्या हातात उपद्रवशक्ती( NUISANCE VALUE) जास्त असल्यामुळे तो जास्त लोकांना त्रास देऊ शकतो. याला ते दुर्दैवाने POWER म्हणतात
म्हणतातना POWER CORRUPTS. किंवा अत्त्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा
दुर्दैवाने लोक अधिकार (POWER) आणी उपद्रवशक्ती( NUISANCE VALUE) यात गल्लत करतात.
अधिकार(POWER) म्हणजे लोकांचे भले करण्याची शक्ती
आणी उपद्रवशक्ती( NUISANCE VALUE) म्हणजे लोकांना त्रास देण्याची क्षमता.

नेत्रेश's picture

20 Apr 2015 - 3:13 am | नेत्रेश

.

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2015 - 6:04 am | श्रीरंग_जोशी

लेखनशैली रंजक असली तरी आशयाशी असहमत.

मनुष्यबळ विकास विभागात काम करणार्‍यांपासून मलाही बरे - वाईट अनुभव आहेत. प्रत्यक्ष आर्थिक नुकसानही झाले आहे. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच असतो अन त्यालाही कंपनीच्या दीर्घकालिन हिताकरिता कठोर निर्णय घ्यावे लागतात हे लक्षात घेतल्यावर फारशा तक्रारी कराव्याशा वाटत नाही.

शेवटी 'कंपनी एक हस्ती होती हैं, जो सिर्फ अपना फायदा देखती हैं' हे मंगल पांडे चित्रपटातील वाक्य महत्वाचे असते.

कर्मचार्‍यांनाही त्यांचे हित जोपासण्याची संधी या खुल्या व्यवस्थेत बहुतांश वेळी उपलब्ध असते. सतत तक्रार करत राहण्याने सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते.

डॉ. खरे यांचा प्रतिसाद आवडला.

मुक्त विहारि's picture

20 Apr 2015 - 7:14 am | मुक्त विहारि

मस्त...

उडादामाजी काळे-गोरे हे असायचेच.....

प्रस्तुत लेख आजच्या लोकप्रभा साप्ताहिकात प्रकाशित झाला आहे. खालील दुवा पाहावा
http://epaper.lokprabha.com/608427/Lokprabha/16-10-2015#dual/54/2

असंका's picture

9 Oct 2015 - 4:23 pm | असंका

अरे वा!!
अभिनंदन....

जगप्रवासी's picture

9 Oct 2015 - 5:18 pm | जगप्रवासी

अभिनंदन....

ह्युमन रिसोर्स वाला
जगप्रवासी

dadadarekar's picture

10 Oct 2015 - 6:21 pm | dadadarekar

आजवर्चांगलेच एच अर मिळाले.