तो, ती आणि एक सामान्य घटना

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:02 pm

आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात.

साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो.
स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट.
वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ.

बंगलोरमधे अॅदीगॅसच्या कुठल्याही जॉइंटमधे जितकी गर्दी असते तितकीच गर्दी इथेही होती. बऱ्याच कार पार्क होत्या. आम्हीही जेवायला तिथेच थांबायचे ठरविले. कार पार्क केली. आत गेलो. आतपण गर्दी होती, बराच गोंधळ होता. आम्हाला बसायला अगदी कोपऱ्यात जागा मिळाली. आमच्या बाजूच्या टेबलवर एक स्त्री आणि पुरुष बसले होते. स्त्री साधारण पस्तीशीतली वाटत होती. ती जांभळ्या रंगाची उची रेशमी साडी नेसली होती. खूप गोरी आणि सुंदर नसली तरीही गहू वर्ण आणि आकर्षक होती. तिच्यासोबतचा व्यक्ती पूर्ण गोरा. पंचेचाळीस ते पन्नासचा वाटत होता. डोळ्याला चष्मा होता. अंगावर पांढरा शुभ्र कुर्ता आणि पांढरी शुभ्र लुंगी होती. त्या दोघांना बघताच माझी पहीली प्रतिक्रिया दोघांच्या वयात जरा जास्तच फरक वाटतोय. आपले मनातल्या मनातच.

त्यांचे बोलणे कानडीत चालले होते आणि आमचे कानडी ज्ञान ‘स्वल्प, जास्ती आणि माडी’ याच्या पुढे जाणारे नव्हते त्यामुळे ते काय बोलतात याकडे आमचे लक्ष नव्हते. मी मेनूकार्ड बघून ऑर्डर करण्यात तर बायको लहान मुलाला झोपवण्यात गुंतली होती. आमच्या आधी बाजूच्या टेबलवर दोसा वगेरे आला. दोसा खात तो व्यक्ती तिला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता आणि ती शांतपणे दोसा खात होती. फारच झाले तर त्रासिक चेहऱ्याने खिडकीतून बाहेर बघत होती. त्याची बडबड चालूच होती. मग आमची ऑर्डर आली, ओनियन उतप्पा, प्लेन दोसा आम्हीही आता खाण्यात गुंतलो होतो. बाजूच्या टेबलवरचा दोसा आता संपला होता. त्या माणसाची बडबड तशीच अव्याहत सुरु होती. ती तशीच दुर्लक्ष करीत ते ऐकत होती. तिकडे कॉफी आली. आता ती थोडी बोलायला लागली होती. तिच्या बोलण्यात अधूनमधून इंग्रजी शब्द येत होते, पण तरीही ते काय बोलतात काही अर्थ लागत नव्हता. तर त्याचे तसेच कानडीत पुराण सुरु होते. तो तिला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे मत तिला काही पटत नव्हते. ते कानडी संभाषण आम्हाला कळण्याची तिळमात्रही शक्यता नव्हती. त्या टेबलचे बील आले. तिने त्यात पैसे ठेवले. त्याची बडबड चालूच होती आणि आम्ही आमच्या जेवणात रमलो होतो. अचानक तिचा स्पष्ट आवाज ऐकू आला.

“Listen I am telling you last” आवाज वाढला नसला त्यात प्रचंड आत्मविश्वास होता त्या आवाजाला एक धार होती, एक जरब होती. तिच्या नजरेत धाक होता. नजर समोरील व्यक्तीवर रोखलेली होती. आता त्या व्यक्तीमधे तिच्याशी हुज्जत घालायची, किंवा तिला मधेच थांबविण्याची हिम्मत नव्हती. इंग्रजीत सुरवात करुन ती परत कानडीत आली. काहीही कळत नसले आणि दुसऱ्याचे संभाषण ऐकणे चुकीचे आहे हे माहीत असले तरीही आता मात्र ती काय बोलते हे ऐकावे आणि समजून घ्यावे असे वाटत होते. काही समजत नव्हते. मी बायकोकडे बघितले ती सुद्धा तेच करीत होती जे मी करीत होतो. चार पाच वाक्यानंतर ती परत इंग्रजीवर आली.
“With all this today I am having business of twenty five crores. I do not want to lose the peace of my mind for additional five crore. I will do business with what I believe in.”

आता त्याची बोलती पूर्ण बंद. वेटर बीलाचे पैसे घेउन गेला. त्याने सोप उचलली तोंडात टाकली चालायला लागला तीही उठली. माझ्याएवढाच धक्का बायकोलाही बसला होता. तिलाही तेवढेच आश्चर्य वाटत होते. त्यांच्यातले नाते काय होते माहीत नाही. ती यशस्वी उद्योजिका होती की नव्हती माहीती नाही. ती पुढे जाउन यशस्वी होइल की नाही माहीती नाही. त्यांच्यातले संभाषण कशाविषयी होती तेही माहीती नाही. तरीही तिचा आत्मविश्वास, ती करारी नजर आणि धारदार आवाज स्मरणात राहीला. एका स्त्रीने एका पुरुषाला कसे निरुत्तर केले हा आनंद असला तरीही त्याहीपेक्षा एक फार मोठी गोष्ट ती शिकवून गेली. आयुष्यात व्यवसाय असो की नोकरी स्वतःची तत्वे आणि त्यावरचा विश्वास (Conviction) फार महत्वाचा आहे. ते नसेल तर मग लाळघोटेपणा हा होणारच. जर का ते असेल तर मग तुम्ही स्त्री का पुरुष याने काही म्हणजे अगदी काहीच फरक पडत नाही.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

जीवनमानप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

24 Mar 2015 - 11:12 pm | शैलेन्द्र

छान .. आवडले..

रुपी's picture

24 Mar 2015 - 11:52 pm | रुपी

शेवटची तीन वाक्ये फारच पटली.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2015 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

शेवटची तीन वाक्ये फारच पटली.

अशा कणखर स्त्रिया पाहिल्या की बरं वाटतं!

मधुरा देशपांडे's picture

25 Mar 2015 - 2:42 am | मधुरा देशपांडे

आवडले.

विंजिनेर's picture

25 Mar 2015 - 2:54 am | विंजिनेर

स्वत:च्या टेबलावरचा डोसा खायचा सोडून शेजारच्या टेबलावरच्या जांभळ्या साडीवर लक्ष देता म्हणजे पक्के मुंबईकर दिसता आहात *wink*

चुकलामाकला's picture

25 Mar 2015 - 7:29 am | चुकलामाकला

वा! आवड्ले!

तुषार काळभोर's picture

25 Mar 2015 - 8:58 am | तुषार काळभोर

ते अडिगा'ज असावं. (असा आपला माझा अंदाज)
बाकी तुम्हाला आलेला अनुभव भारी!!

मित्रहो's picture

25 Mar 2015 - 9:22 am | मित्रहो

बरेच उच्चार ऐकले. अडिगाज, आदीगास, अदिगॅस
नक्की आणि बरोबर उच्चार कुठला नक्की माहीती नाही.

बॅटमॅन's picture

25 Mar 2015 - 2:32 pm | बॅटमॅन

अदिगॅस =)) =)) =)) कमीतकमी नंतरगॅस तरी म्हणायचंत की. =)) असो.

ते अडिगा'ज़ असं आहे. अडिगा हे एक कन्नड आडनाव आहे, उदा. अरविंद अडिगा हे सुप्रसिद्ध लेखक.

मित्रहो's picture

25 Mar 2015 - 3:00 pm | मित्रहो

फार जुने कनफ्युझन दूर झाले.

छोटासाच प्रसंग तुम्ही छान लिहिला आहे.आवडला.शेवटच्या तीन ओळी अनुभवल्याने जास्तच आवडल्या!

सस्नेह's picture

25 Mar 2015 - 10:27 am | सस्नेह

प्रसंगाभोवती केलेली विचारांची गुंफण जमलीय.

स्नेहल महेश's picture

25 Mar 2015 - 10:39 am | स्नेहल महेश

छोटासा प्रसंग आवडला

अरुण मनोहर's picture

25 Mar 2015 - 11:16 am | अरुण मनोहर

अॅदीगॅसचे जॉइंट ला जातांना भरपूर ओवा खाऊन जावा.

पदम's picture

25 Mar 2015 - 11:21 am | पदम

+१ मस्तच

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2015 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

*good*

अशी माणसं विरळ असतात. पण ती भेटली किंवा त्यांची अशी गोष्ट ऐकली की दिवस मस्त जातो ! त्यातच हे एका स्त्रीने केले हे तर अगदीच विरळ... आता अख्खा आठवडा छान जाईल ! *good*

सिरुसेरि's picture

25 Mar 2015 - 2:01 pm | सिरुसेरि

छान आठवण .. तसेच त्या स्त्रीनेही अशा अवेळी रात्री नउच्या पुढे, बाहेर ठिकाणी बिसिनेस डिस्कशनसाठी जायला नको होते असे वाटते .

मित्रहो's picture

25 Mar 2015 - 3:10 pm | मित्रहो

त्यांच्यात नाते काय होते कल्पना नाही. अडीगा'ज म्हणजे काही कॅफे कॉफी डे नाही की तिथे कुणी ठरवून बिझनेस डिस्कशनला येइल? गर्दीचे आणि गोंधळाचे ठिकाण. दोन घास खाता खाता विषय काढला असावा असा माझा अंदाज.

वगिश's picture

25 Mar 2015 - 3:39 pm | वगिश

का?

पिशी अबोली's picture

25 Mar 2015 - 2:42 pm | पिशी अबोली

छोटासा प्रसंग छान रंगवलाय तुम्ही.
बाकी तिच्या जागी अन्य स्त्री/पुरुष कुणीही असतं तरी छानच वाटलं असतं. तुमच्या शेवटच्या ३ ओळी खूप आवडल्या. असं conviction असणारे लोक पहायला फार कमी मिळतात. म्हणून तसं कुणीही असलं तरी आदर वाटतोच..

सुनील's picture

25 Mar 2015 - 3:26 pm | सुनील

किस्सा रोचक!

असे दिसतेय की तो काही एक बिझनेस प्रपोजल तिच्या गळी मारायचा प्रयत्न करतोय आणि तिला ते नकोय.

असो.

पण शेवटी ती इंग्रजीवर उतरली म्हणून तुम्हाला (आणि आम्हालाही) हा किस्सा समजला. तेव्हा, माणसे आपली भाषा सोडून सायबाच्या भाषेवर केव्हा उतरतात, याबाबत माझे निष्कर्ष -

१) जेव्हा काही निर्वाणीचे सांगायचे असते तेव्हा (उदा. ही बाई)
२) जेव्हा माणसे फार भावनाविवश होतात तेव्हा (उदा. पुलंचा नारायण)
३) काही माणसे एक पेग प्याल्यावर तर काही एक डोसा खाल्यावर!! ;)

तिमा's picture

25 Mar 2015 - 3:44 pm | तिमा

मनाची शांती घालवणारा तो पाच कोटींचा बिझिनेस काय असेल ?

मार्मिक गोडसे's picture

26 Mar 2015 - 10:47 am | मार्मिक गोडसे

https://www.youtube.com/watch?v=rLw2nS1SCtI

पुरुषाला समजणार्‍या सर्व भाषांचा (देहबोली ते बोलीभाषा व्हाया इंग्रजी) परिणामकारक वापर.