लॅण्डस्केप पॉइन्ट १ - माथेरान

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
16 Mar 2015 - 3:56 pm

लॅण्डस्केप पॉइन्ट १ - माथेरान

व्हीडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=Sd19dp2MAnQ

From Landscape Point - Matheran

माथेरान म्हटलं कि डोळ्यांसमोर येत ते उंचावर वसलेलं हिरवगार पठार. आठवडाभर मान मोडून काम करायचं आणि शनिवार-रविवार माथेरानला जाऊन कुटुंबासमवेत मौजमजा करायची हि तर कित्येक लोंकाची ठरलेली वहिवाट. पण आम्ही मात्र माथेरानच सौंदर्य वेगळ्याच नजरेने पाहतो. तसे पट्टीचे ट्रेकर्स माथेरानला नेहमीच्या वर्दळ असलेल्या डांबरी रस्त्याने न येता दगडमातीच्या बिकट वाटा निवडतात. माथेरानला येण्यासाठी पनवेलच्या दिशेनेसुद्धा वाटा आहेत. शेजारील पेबच्या किल्ल्यावरूनसुद्धा लोकं येतात. त्यातल्या त्यात वन ट्री पॉइन्ट खालून येणारी वाट ट्रेकर्सच्या जास्त वर्दळीची आहे.

पण आम्ही मात्र माथेरानला जातो ते अंगमोड करायला. प्रस्तरारोहणाच्या दृष्टीने इथे भरपूर वाव आहे, सगळे जण लुईझा सुळका करतात आणि परत फिरतात. गिरीविराजने इथे फक्त लुईझा सुळका न करता प्रस्तरभिंतींचे नवनवीन मार्ग खुले केले आहेत. त्यात एको पॉइन्ट, किंग एडवर्ड पॉइन्ट, शारलोट लेक पॉइन्ट, लॅण्डस्केप पॉइन्ट-१, लॅण्डस्केप पॉइन्ट-२, लुईझा सुळक्याशेजारील प्रस्तरभिंत असे मार्ग आहेत. पर्यटक थेट पॉइन्टच्या माथ्यावर असतात आणि आम्ही मात्र त्याच पॉइन्टच्या पायथ्याकडून वर चढत त्यांना येऊन भेटतो. या मार्गांवर अद्यापही कोणीच चढाई करण्यासाठी धजावलेलं नाही. त्यातही प्रस्तरभिंतीच आव्हान सुळके चढाईपेक्षा थोड वेगळ आणि अवघड असत. फेसबुक आणि मोबाईलच्या या जमान्यात अशी आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्रात एका हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढीच लोक उरलेत.

From Landscape Point - Matheran

०७ मार्च २०१२ च्या मध्यरात्री शेवटच्या गाडीने डोंबिवलीहून नेरळला उतरलो आणि रात्रीच टेक्सीने माथेरानच्या प्रवेशद्वारावर पायउतार झालो. आता इथून सामानासहित ४.५ किलोमीटरची तंगडतोड करून एको पॉइन्ट गाठायचा होता. जानेवारी ते मार्च दरम्यान जवळपास ५ वेळा माथेरानला जाण झाल पण माथेरान काही फिरायला जमल नाही. कारण एकतर सगळीकडे चिडीचूप झाल्यावर मध्यरात्री माथेरानला पोहोचायचो आणि संध्याकाळी अंधार झाल्यावर तिथून निघायचो. आजही असेच मध्यरात्री ३ वाजता जबरदस्त थंडीमध्ये एको पॉइन्टला चहाच्या टपरीवर थंड वाऱ्याशी झुंजत, एकमेकाच्या चादरी, स्लीप्पिंग बेंग्स ओढत, कुडकुडत रात्र काढली.

सकाळी चहापाणी झाल्यावर आता आमचं लक्ष होत लॅण्डस्केप पॉइन्टचा पायथा. कारण आज आम्ही याच लॅण्डस्केप पॉइन्टवर चढाई करणार होतो. एको पॉइन्टला उभे राहिल्यास अगदी समोर प्रबळगड दिसतो आणि त्याच्या बाजुला कलावंतीण. प्रबळगडाच्या डाव्या हाताला दूरवर सुळका सदृश इरशाळगड. उजव्या बाजूस माथेरानचा लुइझा पॉइन्ट. एको पॉइन्टच्या उजव्या हाताला अगदी लागून असलेली जी उघडीनागडी भिंत दिसते तोच लॅण्डस्केप पॉइन्ट, या भिंतीच 'लॅण्डस्केप' हे नामकरण आम्हीच केल आहे. एको पॉइन्टला जाणाऱ्या पायऱ्या संपल्यावर उजव्या हाताला तुटलेल्या रेलिंगच्या मागे एक ओढा दरीमध्ये धडपडत उडी मारतो, हाच मार्ग आहे लॅण्डस्केप पॉइन्टच्या पायथ्याला जाण्यासाठी.

एका बाजूला लॅण्डस्केप पॉइन्टची भिंत आणि दुसऱ्या बाजूला एको पॉइन्टची भिंत यातून हा मार्ग जातो. मध्येच एके ठिकाणी एक मोठा खडक वाटेत पडून वाट थोडी अवघड झाली आहे. स्थानिक विक्रेत्यांनी या खडकाच्या खाली झाडाचा ओंडका उभा केला आहे पण तोही अधांतरी आहे तेंव्हा जपुनच उतरावे लागते. आमच्याकडे सामान असल्यामुळे जास्तच. इथे कोणीही येत नाही त्यामुळे हि काही रहदारीची वाट नाही.

लॅण्डस्केप पॉइन्टच्या पायथ्याला म्हणजे माथ्यावरून जवळपास ३०० फुट खाली, ४-५ फुट रुंद, काही ठिकाणी एक पाऊल राहील एव्हढीच रुंद असलेली लेज संपूर्ण डोंगराला आडवी जाते. इथूनच आम्ही चढाई करणार होतो. या लेजच्या खाली १००० फुट खोल दरी. म्हणजे वावरण्यासाठी हीच काय ती लेज होती. सन १९८८ साली गिरीविराजच्या पहिल्या पिढीतील किरण अडफडकर आणि सुभाष पंडीयन द्वयीने फक्त १० expansion bolt च्या मदतीने ही ३०० फुटी भिंत सर केली होती. योगायोग म्हणजे आज २४ वर्षानंतर हे दोघेही मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.

सकाळी बरोबर दहा वाजता गिरिविराजचा भरवशाचा खेळाडू मनीष पिंपळेने चढाईस हात घातला. सुरुवातीसच एका overhang खडकावर चढाई करताना पायाखालचा दगड सरकला पण मनीषने चपळाई दाखवल्यामुळे पडता पडता बचावला. इथे आमच् काळीज सुद्धा धडधडायला लागल होत कारण आम्ही सुद्धा त्या ५ फुटी लेजवर त्याच्यापासून दहा फुट खाली त्याला झेलण्यासाठी तयार होतो. पण त्याला सावरलेला पाहून जीव भांड्यात पडला. त्याच्याच पुढे त्याने ४० फुट मुक्त चढाई केली. आता पुढे जाण्यासाठी एखादा खिळा ठोकून स्वतःला सुरक्षित करण गरजेच होत, कारण इथे भिंत एकदम सपाट होती आणि कुठेही एखादी कपारसुद्धा दिसत नव्हती, जेणेकरून अ‍ॅन्करिंगसाठी पेग किंवा पिटॉन ठोकता आला असता. त्यातच मनीष आणि बिलेअर सेकंडमॅन राज बाकरे मधील अंतर सुद्धा वाढल होत. मग जास्त वेळ न दवडता मनीषने पहिला खिळा इथेच ठोकला.

अवांतर:
हल्ली खिळे ठोकण्यासाठी पोर्टेबल ड्रिलिंग मशीन वापरण्यात येतात. पण गिरीविराजमध्ये याला संपूर्ण बंदी आहे. पंच आणि हातोड्याच्या सहाय्याने छिद्र करून खिळा ठोकण्यात जी मजा (सजा) आहे ना ती अवर्णनीय. अर्धा-अर्धा तास लोंबकळत खिळा ठोकावा लागतो. हातांची तर अशी अवस्था होते कि वाटत, बस झाल इथून सरळ खालीच उडी मारावी. अक्षरशः xxxxx धूर आला पाहिजे अशीच क्लबची policy आहे.

१.
From Landscape Point - Matheran

२.
From Landscape Point - Matheran

३.
From Landscape Point - Matheran

तर पुढे-
त्याच्या पुढे आणखी ४० फुटांची मुक्त चढाई करून दुसरा खिळा ठोकला आणि त्यातून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतलं. इथे त्याने सेकंडमॅन राजला बोलावून घेतलं. सेकंडमॅन जेव्हढा तुमच्या जवळ असेल तेव्हढा तुम्हालाही जास्त हुरूप येतो आणि अवघड चढाई सुद्धा सोपी होऊन जाते. इथून परत मनीषने मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत आणखी ५० फुटांची उंची गाठत ३रा खिळा ठोकला. आता मनीषाला आणखी एका साथीदाराची गरज भासल्याने थर्डमॅन किशोरला पाठवण्यात आले. दरम्यान मनीष आणि राजने कड्यावर लटकतच पोटपूजा करून घेतली. मनीषला मध्ये-मध्ये जुने बोल्ट सापडत होते, पण त्यांच्यावर विसंबून राहणे धोक्याचे होते त्यामुळे योग्य त्या ठिकाणी नवीन खिळा ठोकत तो एका खुर्चीसारखी रचना असलेल्या आणि एक माणूस बसेल अशा खडकावर पोहोचला.

४.
From Landscape Point - Matheran

५.
From Landscape Point - Matheran

६.
From Landscape Point - Matheran

७.
From Landscape Point - Matheran

आता मनीष कड्यावर लांबलचक कपारीपाशी पोहोचला. सेकंडमॅन राजला आरामखुर्ची रॉकवर बसवून मनीषने कपार चढाईस प्रारंभ केला. त्यावेळेस दुपारचे चार वाजून गेले होते. आता कपारीमध्ये एक पिटॉन ठोकून त्यात दोर पास केला, साथीला एक जुना खिळा होता त्यातूनही दोर पास केला. चढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली होती. थोड-थोड करत मनीष वर जाण्याचा प्रयत्न करू लागला पण पुढ्यात एक overhang खडक होता, त्यामुळे मनीषला खूप प्रयत्न करूनसुद्धा पुढे चढाई करण जमत नव्हत. आधीच सकाळपासून विश्रांती न घेता तो या कड्याला भिडला होता, आता त्यालाही थकवा जाणवायला लागला होता. वारंवार प्रयत्न करूनही चक्रव्हुहात फसल्यागत मनीषची अवस्था झाली होती. इथे शरीर पूर्णपणे बाहेर झोका घेत असल्यामुळे आणि संध्याकाळचे सव्वा पाच होत आल्यामुळे नाईलाजाने त्याने शेवटचा सहावा खिळा ठोकला. हत्ती गेला होता पण शेपूट राहील होत आणि थकव्यामुळे तेच भारी पडत होत.

८.
From Landscape Point - Matheran

९.
From Landscape Point - Matheran

१०.
From Landscape Point - Matheran

११.
From Landscape Point - Matheran

१२
From Landscape Point - Matheran

१३.
From Landscape Point - Matheran

१४.
From Landscape Point - Matheran

१५.
From Landscape Point - Matheran

१६.
From Landscape Point - Matheran

१७.
From Landscape Point - Matheran

१८.
From Landscape Point - Matheran

एको पॉइन्ट कड्यावरून पर्यटक त्याची हि कसरत पाहत होते. कधी नव्हे ते आज प्रेक्षक आम्हाला लाभले होते, नाहीतर डोंगर दऱ्यामध्ये कुठले आलेत प्रेक्षक. त्यांच्या कुतूहलपूर्वक प्रश्नांना उत्तर देताना आमचीही तारांबळ उडत होती.

१९. एको पॉइन्ट कड्यावरून पर्यटक
From Landscape Point - Matheran

नजर समोरच्या लॅण्डस्केप कड्यावर पोहोचताच आपोआपच तोंडातून 'अरे बापरे'! असे उद्गार बाहेर पडत होते. एक >वृद्ध महिला काळजीयुक्त स्वरात म्हणाली सुद्धा 'का रे बाबानो जीव धोक्यात घालता'.
>एकाने तर 'किती पैसे मिळतात' अस विचारल.
>दुसऱ्याने तर त्याच्यावर पण कडी केली, हातोड्याचा आवाज ऐकून तो आपल्या कुटुंबाला म्हणाला, 'ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'. :-)
>काहीना वाटत होत ते कड्यावरच अडकले आहेत.

नव्या खिळ्याची सुरक्षितता लाभताच मनीषने एका दमातच तो overhang पार करून त्याच्यावर जाऊन पोहोचला. आता फक्त २० फुटांचा मातीचा घसारा शिल्लक राहिला होता. आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटत होते. सगळे पर्यटक प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्याच्या मधून दिसणारा सूर्यास्त पाह्ण्याच विसरून इथे हा सर्व थरारक प्रसंग पाहण्यासाठी श्वास रोखून उभे होते. मनीषने आता त्या मातीच्या घसाऱ्यावरून काळजीपूर्वक चढाई करत माथा गाठला आणि एव्हाना थिजलेल्या पर्यटकांच्या जल्लोषाने अवघा एको पॉइन्टचा परिसर दणाणून सोडला. विजयीवीरांच अभिनंदन करण्यासाठी त्यांनी एकच गर्दी केली.

२०.
From Landscape Point - Matheran

२१.
From Landscape Point - Matheran

२२.
From Landscape Point - Matheran

२३.
From Landscape Point - Matheran

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

16 Mar 2015 - 4:12 pm | प्रसाद१९७१

सॉलिड च

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Mar 2015 - 4:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

अजुन एक थरारक वृत्तांत.

ते बघा डोंगरामध्ये मुर्त्या खोद्तायत'.

हे म्हणणारा खरोखर सिरीयस असेल तर अवघड आहे.

पैजारबुवा,

सतीश कुडतरकर's picture

17 Mar 2015 - 11:31 am | सतीश कुडतरकर

पैजारबुवा
अद्यापही काही लोक असे आहेत ज्यांना ट्रेकिंग, क्लाईम्बिंग याबद्दल शून्य माहिती आहे. त्यात, ते ज्या स्थानावरून पाहत आहेत तिथून क्लाईम्बिंग करणारा माणूस त्यांना खूपच लहान दिसतोय.

मी स्वतःच वरून शुटींग करीत असल्याने मी ते स्पष्टपणे ऐकले. तो माणूस अक्षरशः निरागसपणे बोलला ते.

सौंदाळा's picture

16 Mar 2015 - 7:07 pm | सौंदाळा

सहीच
एक विनंती
एक बेसिक लेख लिहाच ज्यात तुमची पुर्वतयारी, प्लॅनिंग (रिस्क, प्रथमोपचार, आर्थिक वगैरे), साहित्यांची नावे जी तुम्ही आधीच्या काही लेखात वापरली होती पण काही जणांना समजली नव्हती, जेवण काय करता ८-१० दिवस, मनोबल कसे टिकवता अशी माहिती वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2015 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

खंग्री मंडळी आहात सगळे !

सतीश कुडतरकर's picture

17 Mar 2015 - 11:26 am | सतीश कुडतरकर

लिहिण्याची सुरुवात केली आहे. पण अद्यापही व्यवस्थित मांडता येत नाही. ८०% लिहून झाला आहे, लवकरच पूर्ण करतो.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2015 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

एक बेसिक लेख लिहाच ज्यात तुमची पुर्वतयारी, प्लॅनिंग (रिस्क, प्रथमोपचार, आर्थिक वगैरे), साहित्यांची नावे जी तुम्ही आधीच्या काही लेखात वापरली होती पण काही जणांना समजली नव्हती, जेवण काय करता ८-१० दिवस, मनोबल कसे टिकवता अशी माहिती वाचायला आवडेल.

>>> अनुमोदन... +++१११

आणि लेखाला नेहमीप्रमाणेच.. __/\__
===================
जित्या जागत्या स्पायडरमॅन्स'चा चहाता:-
अत्रुप्त

काळा पहाड's picture

16 Mar 2015 - 7:15 pm | काळा पहाड

गजब. तो फोटो नंबर ११ भयंकर आहे. बगूनच भ्या वाटतंय.

एक एकटा एकटाच's picture

16 Mar 2015 - 8:24 pm | एक एकटा एकटाच

छान अनुभव
आणी फोटोही मस्त

एस's picture

16 Mar 2015 - 8:29 pm | एस

जबरदस्त.

नुसतं वाचुन आणि फोटो बघुन पायाला मुंग्या आल्या!थरारक असतात तुमचे सर्वच लेख!

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 10:13 pm | पुष्कर विजयकुमा...

अशक्य लोक...
विलक्षण धाडसाचा खेळ आहे
आणि मी स्वताहाला हाइकर म्हनवत होतो!!

आणि मी स्वताहाला हाइकर म्हनवत होतो!!

मीही. पण अशा लोकांना दुरूनच 'हाइ' करणारा म्हणून मी 'हाइकर' आहेदेखील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Mar 2015 - 10:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_

आजानुकर्ण's picture

16 Mar 2015 - 10:29 pm | आजानुकर्ण

चित्रं पाहून निःशब्द झालो.

पॉइंट ब्लँक's picture

17 Mar 2015 - 10:56 am | पॉइंट ब्लँक

जबरदस्त. लगे रहो!

तुषार काळभोर's picture

17 Mar 2015 - 2:21 pm | तुषार काळभोर

परत एकदा लई मज्जा आली (हापिसातल्या गोलगोल फिरणार्‍या खुर्चीत एशीची शंड हवा अंगावर घेत) हे वाचताना.

_/\_ हितनंच नमस्कार आमचा!!

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2015 - 3:54 pm | स्वाती दिनेश

थरारक,रोमांचकारी भटकंती!
काही फोटो बघून जीव दडपला,
स्वाती

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Mar 2015 - 7:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

डौनलोड करुन घेतलय... भटकंती टॅब दिवसातुन २-४ वेळा तरी बघतो...आला लेख की वाच
आणि त्यातुन कुडतरकरांचा असेल तर विषयच संपला...फोटो पाहुनच डोळे निवतात(तेच ते गार गार एशीत बसुन वगैरे...)

मॅक's picture

20 Mar 2015 - 3:14 pm | मॅक

अप्रतिम..... काय धाडस...
मनीष अप्रतिम...

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 6:03 am | श्रीरंग_जोशी

काय तो थरार. जबरी आहे वर्णन अन फोटोज.

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 7:47 am | वेल्लाभट

अशक्य ! केवळ कमाल !

मितान's picture

23 Mar 2015 - 8:16 am | मितान

अचाट !!!!!!

साष्टांग दंडवत !!!!!!!

संजय पाटिल's picture

11 Sep 2015 - 6:41 pm | संजय पाटिल

असेच म्हणतो!!!

सतीश कुडतरकर's picture

23 Mar 2015 - 11:29 am | सतीश कुडतरकर

भरभरून प्रतिसादाबद्दल मिपाकरांचे धन्यवाद!

दुर्गविहारी's picture

11 Sep 2015 - 7:22 pm | दुर्गविहारी

सतिश भाउ नविन लेख केव्हा ?