काठी

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 2:11 pm

त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही. बांड्या-पंचायती करू नको म्हणते मी जास्ती काही विचारलं तर.

मग हातपाय धुतले आणि देवासमोर बसलो, म्हटलं सगळं. ताई आली, म्हणाली की आई मी जाऊ का बंगाल्यांची देवी पहायला? आई म्हणे जा बरोबर कोणी असेल तर. मग मीच का बरं मागे राहू? मी म्हटलं मला पण जायचं आहे ताईबरोबर. आई पोळ्या लाटता-लाटता थांबुन म्हणाली की हात धरून जा तिचा आणि डावीकडुन चाला. तसाच उठलो आणि ताईचा हात धरुन पुढे पळत बाहेर पडलो. कॉन्ग्रेसनगर पार्कामधले दिवे सुरू होते आणि समोर ओट्यावर आण्णा बसले होते कोट-टोपी घालुन. त्यांना सांगितलं तर म्हणाले थांबा, एकटे कुठे चालले तुम्ही दोघं? मी येतो. आता आण्णा आले की हळुहळू चालावं लागेल आणि मग उशीर होईल चौकात पोचेपर्यंत. म्हणुन मी पुढे पळालो, ताई येईल नं आण्णांचा हात धरून!

ठाकुरांच्या घरापुढे वैद्यांचं घर. नंतर देसाई आणि त्यांची बाग. म्हणजे मोकळी जागा आणि त्यातलं गवत, दोन मोठे आंब्याचे झाडं त्यात एक खोबरी आंबा. दुसरा नीलम त्याच्यावर डिंक आणि मोठे मुंगळे असतात आणि मी मुजोरी केली की आजी मला त्याच्यावर नेऊन बसवेन म्हणते. मग ताई रडते आणि नको ना गं आजी त्याला बसवू तिथे असं म्हणते. ती चांगली आहे खूप पण मला तिचा राग आला की मी तिला खालती पाडुन तिला गुद्दे मारतो, की मग आई मला थोबाडीत देते. पण ताई मला मारत नाही. बाग संपली की मग पुढे अंधारच आहे, पण वळुन गेलं की पुढे अजनीचा चौक आणि पंडालचे लाईट असतील. धावत-धावत गेलो आणि धावत-धावत आलो की झालं, घाबरायचं काय कारण? पण मागे वळुन पाहिलं तर ताई धावत येत होती; धापा टाकत, काठी टेकत-टेकत आण्णा मागे पडले होते. म्हणुन थांबलो.

ताई आली आणि म्हणाली की तू हात धरून चल नाहीतर आईला सांगेल मी! मला राग येईल नाहीतर काय? म्हणुन तिला दाटून म्हणालो की ताई, मी लक्षात ठेवीन बघ. पण तिनं हात घट्ट धरला आणि चालायला लागली. चुपचाप निघालो तिच्यासोबत. बागेतल्या आंब्याची सावली रस्त्यावर अर्धवट पसरलेली आणि मुन्सिपाल्टीचा एक दिवा पुकपुक पुकपुक. मग सावली कधी छोटी, कधी मोठी. तेवढ्यात ताई थांबली. म्हणाली तुला ती काठी दिसते का रे? मी बघितलं, खरंच रस्त्यावर एखादी काठी पडली आहे का काय? तर हो! पण ती सरकते का रे पुढे पुढे? हो गं, ती खरंच सरकते ना पुढे, काय असेल बॉ? चकचकीत काठी पुढेपुढे सरकते कशी ते बघत थांबलो दबकुन. आण्णांच्या काठीचा आवाज यायचा थांबला आणि जवळ येऊन ते म्हणाले, थांबला का रे, घाबरला का? मी त्यांना पुढे बोट करून दाखवलं. आण्णांनी बघीतलं अन् म्हणाले दोन आहेत ते, देसायांच्या जागेचे जुने मालक! अजुन जात नाहित आणि हक्क सोडत नाहित. मी भेदरून आण्णांकडे पाहिलं तर म्हणाले, घाबरू नकोस काही होत नाही रे. पण असा एकटा घाईत गेला असतास आणि पाय पडला असता म्हणजे मग?

मग ती काठी सरकत सरकत रस्त्यावरून दिसेनाशी झाली. मी एक हात आण्णांचा आणि एक हात ताईचा धरून वाट पार केली. बंगाल्यांची देवी बघितली, रोषणाई बघितली, मडक्यातलं गोऽड दही खाल्लं. पण ती चकचक करणारी, सरकणारी काठी सारखी डोळ्यांसमोर येत होती सगळा वेळ. परतताना इकडेतिकडे बघत बघत मी आणि ताई हात घट्ट पकडुन आण्णांच्या शेजारीशेजारी चालत यायला लागलो. तेव्हा आण्णा म्हणाले, तुझे बाबा लहान होते तेव्हा मी चिखलदर्याला असेन.. अवेळी तार आली आणि शिपाई नसला हाताशी की मी त्याला पाठवत असे. हातात कंदिल, घुंगरू लावलेला भाला घेऊन तो असाच उड्या मारत जंगलातुन पळत जायचा आणि तार पोचवुन परत यायचा. त्यालाही दिसलं असेल नाही का रे असं काही कधी? पण तेव्हा सगळंच वेगळं होतं.. मग ते बोलायचे थांबले ते घर येईस्तोवर.

आईला सांगितलं सगळं तर ती म्हणे ये रे बाबु जवळ, ताई तू पण ये गं. मी म्हणालो की चंदनशेष महाराजांचा नागमंत्र येतो गं मला, मग मला काही कसं झालं असतं? आई म्हणाली की हो रे बाबा! पण उगाच परीक्षा पाहु नये. आणि नाव घेऊ नको मुद्दाम रात्रीच्या वेळी!

काऽहीच कळत नाही मला, पण ती काठी बघताना अंगावर काटा आला होता हे मात्र खरं.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

16 Mar 2015 - 2:13 pm | प्रसाद१९७१

ह्म.......

एस's picture

16 Mar 2015 - 2:55 pm | एस

छान लिहिलंय. आवडलं.

रुपी's picture

18 Mar 2015 - 12:32 am | रुपी

छान

छान! बऱ्याच दिवसांनी आलात. अडगळीतल्या आठवणींचा पसारा परत मांडा की.

शिवोऽहम्'s picture

18 Mar 2015 - 9:22 pm | शिवोऽहम्

धन्यवाद! बरेच दिवस वाचनमात्र होतो आणि इतर बर्‍याच गोष्टीत गुंतलो असल्यामुळे लिहायला सवड मिळाली नाही. अर्धवट राहिलेल्या गोष्टींबद्दल माफी असावी.
एक-दोनदा काहीतरी लिहावेसे वाटले, पण मांडी ठोकून् बसण्याएवढी फुरसत नव्हती. बराचसा कंटाळाही कारणीभूत आहेच म्हणा. तर ते असो. आता वेळ् आहे हाताशी तर एखाददोन गोष्टी खरडाव्या का?

पॉइंट ब्लँक's picture

18 Mar 2015 - 11:51 pm | पॉइंट ब्लँक

छान लिहिलय.

पैसा's picture

19 Mar 2015 - 9:45 am | पैसा

मस्त लिहिलंय!