लाल कौलांचं गाव!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
15 Mar 2015 - 4:59 pm

अशाच एका मोठ्या विकांताला बॅगपॅक भरुन गाडीत टाकले आणि लाँग ड्राइव्हवर जायचा विचार केला. रस्ता नेईल तिथे जायचे अशा विचाराने ए ३ ह्या ऑटोबानला (फ्रीवे) ला लागलो आणि एकदम लक्षात आलं आपल्याला रोथेनबुर्गला जाता येईल की.. आता तुम्ही म्हणाल हे कोणत गाव? तर फ्रांकफुर्ट पासून साधारण १८० किमीवर ताउबर नदीवर वसलेलं हे गाव म्हणजेच रोमँटिक रोडवरचा एक थांबा रोथेनबुर्ग! जेव्हा फ्रांकफुर्ट आणि बर्लिन जर्मनीच्या नकाशावरचे ठिपके होते तेव्हा रोथेनबुर्ग मात्र नावारुपाला आलेलं एक स्वतंत्र संस्थान होतं आणि आजही मध्ययुगातला इतिहास जपून ठेवलेलं टूरिस्टांसाठी पर्वणीच असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे. तेव्हा आम्ही तिथेच आपला तंबू टाकायचं ठरवलं.

.

एका थांब्यावर गाडी थांबवून जालावर पुढच्या रस्त्याचा शोध घेतला तर तिथे अनेक रोथेनबुर्गे दिसली की .. हे म्हणजे अगदी आपल्याकडे असलेल्या दोन दोन गोरेगाव,तळेगाव सारखेच झाले ना! त्यामुळे ताउबर नदीवरच्या रोथेनबुर्गचा आणि तिथल्या हॉटेलांचाही पत्ता जीपीसला विचारला आणि एका ठिकाणी फोन केला. एबरलाइन बाईंनी अगदी अगत्याने जणू काही आपले पाहुणेच आहेत अशा थाटात कसं या ते सांगितलं आणि साधारण तासाभरात तिथे पोहोचलो. रुमची चावी घेऊन बॅगा आत टाकायच्या आणि फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडायचे असं ठरवत असतानाच बाईंनी गावचा नकाशा पुढे केला आणि कसं जायचं तेही समजावून सांगितले.

.

गावाची खंदकयुक्त भिंतीची वेस अनेक शतकांचा इतिहास पोटात घेऊन अजूनही राखणीला उभी आहे. त्या वेशीतून आत शिरलं की बांधीव,दगडी रस्त्यावरून सरळ चालत जायचं की मार्क्ट्प्लाट्झ म्हणजेच बाजाराचा चौक लागतो. ही गावातली "हॅपनिंग प्लेस"!

.
इथे असलेला टाउनहॉलचा टॉवर म्हणजेच राटहाउसटुर्मवर जाऊन सगळ्या गावाचे विहंगम चित्र मनात आणि कॅमेर्‍यात साठवता येतं.

बाजारच्या रस्त्याने थोडं पुढे गेलं की ख्रिसमस म्युझिअम आहे. ख्रिसमसच्या दिवसात तर ते खूपच नटलेले सजलेले असतेच पण इतर दिवसातही ख्रिसमससाठीच्या सजावटीच्या वस्तू अगदी पुरातन काळातली सजावट कशी होती हे दाखवणारी चित्रं, मॉडेलं, त्यावेळची अ‍ॅड्व्हेंट कॅलेंडरं, ख्रिसमस कार्डे, ख्रिसमस ट्रींचे स्टँड एवढेच नव्हे तर पहिल्या महायुध्दात सीमेवरच्या शिपायांना पाठवण्यासाठी केलेले मिनी ख्रिसमस्ट्री स्टँड्स आणि ज्या पेट्यातून ती पाठवली त्या लहान संदूकाही फार कलात्मकतेने रचून ठेवल्या आहेत.

.

.

.

ख्रिसमस म्युझिअम उजवीकडे ठेवून मोठ्या रस्त्याने सरळ पुढे गेलं की सेंट याकोब किर्श म्हणजे याकोब चर्च लागते. हे प्राचीन चर्च म्हणजे जर्मन लाकडी कोरीव कामाचा उत्तम नमुना आहे. बायबल मधील अनेक प्रसंग लाकडाच्या कोरीव करामतीने जिवंत केले आहेत.

.

थोडं पुढे गेलं की मध्ययुगीन क्राईम म्युझिअम लागते.ह्या चार मजली संग्रहालयात शिक्षेची आणि छळाची वेगवेगळी क्रूर साधने पाहताना उदासून जायला होतं. त्या काळात चर्चमध्ये प्रवचनात झोपला,पाव बनवताना त्याचा आकार लहान ठेवला अशा 'गुन्ह्यांना'ही ज्या भयंकर शिक्षा होत्या ते पाहताना अंगावर काटा येतो.

.

. .

ह्यानंतर मात्र एका मोठ्या ब्रेकची मनाला आणि शरीराला गरज भासतेच. तेथेच समोर असलेल्या पुरातन कालीन 'रोटर हान' नावाच्या उपाहारगृहात खास बायरिश केझं स्पेट्झलं (एक प्रकारच्या न्यूडल्स्+चीज+ आणि बिर्याणीवर असतो ना तसा तळलेला कांदा),माउल्ट ताशं (पालक व चीजचे पुरण भरलेला एक प्रकारचा पास्ता) आणि बिअरमासचा आस्वाद घेणं अगदी आवश्यक वाटू लागते.आणि त्यानंतर डेझर्ट म्हणून श्ने बाल (एक प्रकारची पेस्ट्री)!

क्राइम म्युझिअमला उतारा म्हणून खेळणी आणि बाहुल्या कसं वाटतं? १५ व्या शतकातल्या टॉय आणि डॉल म्युझिअम मध्ये ७८०० ऐतिहासिक,पुरातन खेळणी आणि बाहुल्या आहेत. जर्मन आणि फ्रेंच कलाकारांची ही पुरातन कारागिरी पाहताना आपणही वय विसरुन लहानपणात रमतो.

. .

. .

चांदण्या रात्री आकाश अंगावर पांघरून घेत मार्क्ट्प्लाट्झ पासून नाइट वॉचमन ची टूर सुरू होते. कंदील आणि काठी हातात घेतलेला, त्या काळातले कपडे घातलेला हा रात्रीचा शिपाईगडी काठी आपटत आणि कंदिलाने रस्ता दाखवत आपल्याला बोट धरुन त्या काळात कधी नेतो समजतच नाही.
.
रोथेनबुर्ग ओब डेअर ताउबर म्हणजे जर्मन मध्ये ताउबर नदीवरचं लाल (कौलांच) किल्लेवजा गाव! कोंबुर्ग रोथेनबुर्गच्या सरदाराने इस. ९५० मध्ये ताउबर नदीवर लहानसे धरण बांधवले. सन १०७० मध्ये हा 'किल्लेवजा गाव' उंच डोंगराच्या कुशीत पायाशी ताउबर नदीला ठेवून वसला. स्टॉ़यफर कॅसल बांधताना हे गाव सापडले. कॅसलच्या मध्यवर्ती भागी बाजारची जागा आहे, थोडं पुढे गेलं की आहे सेंट याकोब चर्च! पुढे १३ व्या शतकात भिंत आणि मनोरे बांधले गेले आजही रॉडर कमानी आपल्या खांद्यांवर त्यातील श्वेतमिनार (वाइसरटुर्म) आणि मार्कुसटुर्म म्हणजे मार्कुसमिनार यांना घेऊन उभ्या आहेत.

.

.

त्या जुन्या काळात रइस ज्यू मंडळींचा प्रभाव येथे होता तर नंतर प्रोटेस्टंटांचा पगडा होता. पण १३५६ मध्ये झालेल्या भूकंपात हा स्टॉयफर कॅसल उध्वस्थ झाला. पुढे १७व्या शतकात झालेल्या तीस वर्षांच्या युध्दात प्रोटेस्टंट गावकर्‍यांनी निकराने लढा दिला पण ४०,००० च्या वर फौज घेऊन आलेल्या कॅथोलिक काउंट ऑफ टिलीने त्यांचा सहजी पाडाव केला आणि गाव धुवून नेले. कंगाल झालेले रोथेनबुर्ग पुढे म्हणजे इ.सन १८०० च्या सुमारास बाव्हेरियाला जोडले गेले आणि कार्ल स्पिट्झवेग सारख्या कलाकारांनी रोथेनबुर्गला नवसंजीवनी दिली. रात्रीचा फौजदार आपल्या रसाळ वाणीतून तो प्राचीन काळ उभा करत असताना परत बाजारापाशी येऊन टूर संपते, आपल्याला त्या काळातच सोडून ..

.

.

वेशीच्या भिंतीवर चढून चालताना कालाचा पापुद्रा अलगद उलगडतो. भिंतीतल्या टेहेळणीच्या झरोक्यांतून पाहताना वाटतं , आत्ता खाड खाड बूट वाजवत जर्मन ट्रूप येईल, समोरच्या दगडी रस्त्यावरुन बग्ग्या जातील, घोड्यांच्या टापा ऐकू येतील. त्या भिंतीवरुन फेरफटका मारताना जगभरातील अनेक देशातून केलेल्या भिंतीच्या डागडुजीसाठीच्या मदतीची नोंद कोरलेली आढळली आणि मोठं नवल वाटलं.

.

तेथून मग रोथेनबुर्गच्या टॉपलर कॅसल मध्ये गेलं की ह्यामागचं रहस्य समजतं. तेथे १९४५ सालातले रोथेनबुर्गवर बाँबहल्ला झाल्याचे चित्र आहे. ३१ मार्च १९४५ ला १६ विमानातून येथे बाँबहल्ला झाला.३०६ घरं उजाडली, ६ सार्वजनिक इमारती, ९ पाण्याच्या टाक्या आणि ६०० मी. भिंत एवढं सगळं उद्ध्वस्थ झालं. ३७ जण मरण पावले. अमेरिकेच्या असि. सेक्रेटरीला हे समजले. त्याला रोथेनबुर्गचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य माहित होते. त्याने बाँबहल्ला न करण्याचे आदेश दिले आणि चढाई करुन ते काबीज केले. महायुध्दानंतर लवकरात लवकर डागडुजी केली गेली आणि त्यासाठी जगभरातून देणग्या स्वीकारण्यात आल्या. त्या भिंतीवरची नावे हाच इतिहास मूकपणे बाळगून आहेत.
काळाचा एक मोठा पट आपल्या समोर उलगडलेला असतो पण लाल कौलांचं हे गाव मात्र आपल्याच नादात, आपल्या काळात रमलेलं असतं!

ह्या लाल कौलांमध्ये आम्ही अडकून पडलो आणि परत परत तिथे जात राहिलो. उन्हाळ्यातलं 'कूल',कडाक्याच्या थंडीत धुक्याच्या नाहीतर हिमाच्या दुलईत गुरफटलेलं किवा फॉलमधलं रंगीत.. रोथेनबुर्गची सगळीच रुपं भावतात. परत एखादा मोठा विकांत आला किवा अगदी दोन दिवसांसाठी कुठे जावसं वाटलं की गाडी आपेआप त्या लाल कौलांच्या गावाच्या रस्त्याला लागते.

(काही चित्रे जालावरून साभार)

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2015 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी आहे लाल कौलांच्या घरांची नगरी !

लेखन आणि फोटो दोन्हीही मस्त ! वर्णन करता करता सहज इतिहास उलगडून दाखविणारे लेखन विषेश आवडले !!

सुरेख लेखन आणि मस्त फोटु... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mujhe Neend Na Aaye... { Dil }

पॉइंट ब्लँक's picture

15 Mar 2015 - 5:44 pm | पॉइंट ब्लँक

छान प्रवास वर्णन लिहिले आहे. फोटो आवडले.

विशाखा पाटील's picture

15 Mar 2015 - 6:32 pm | विशाखा पाटील

आवडलं. फोटोही मस्त.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2015 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! :)

सुरेख वर्णन व फोटू. पहिला फोटू खूप आवडला.

फार छान लिहिलं आहेस गं.आत्ता उठुन बघायला जावं वाटण्यासारखं!!

पहिले दोन फोटो अत्तिशय आवडले!

सस्नेह's picture

16 Mar 2015 - 5:24 pm | सस्नेह

सेम सेम हिअर !
लेख आणि फोटो खूपच गोड.

ज्योति अळवणी's picture

15 Mar 2015 - 9:56 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम वर्णन. खूप छान लिहिल आहात. खरच हे लाल कौलांच् गाव बघावस वाटल. आता किमान कोकणातल्या आमच्या गावी लवकरात लवकर जाऊन येईन म्हणते.

जुइ's picture

15 Mar 2015 - 11:03 pm | जुइ

ख्रिसमस म्युझिअम खासच!!!

सर्वसाक्षी's picture

15 Mar 2015 - 11:13 pm | सर्वसाक्षी

स्वाती,

झकास वर्णन आणि फोटो. एक सुरेख सफर घडली.

खटपट्या's picture

15 Mar 2015 - 11:16 pm | खटपट्या

खूप छान,
स्वप्नातलं गाव...

स्नेहानिकेत's picture

15 Mar 2015 - 11:57 pm | स्नेहानिकेत

अतिशय सुरेख वर्णन आणि फोटो तर एकदम झकास!!!! आवडलं... खूप छान लिहिले आहे.

मधुरा देशपांडे's picture

16 Mar 2015 - 1:52 am | मधुरा देशपांडे

स्वातीताई, या रोथेनबुर्गवरील लेखासाठी अनेक धन्यवाद. अगदी गेल्याच नाताळच्या सुट्ट्यांमध्ये जवळपासची भटकंतीची ठिकाणे शोधताना रोथेनबुर्ग दिसले होते. पण ते फक्त वाचनखुणेतच राहिले, प्रत्यक्ष तिथे जाणे काही झाले नाही. विकि किंवा इतरत्र एवढी माहिती देखील मिळाली नाही. आता तु सविस्तर माहिती दिल्याने लवकरच भेट देण्यात येईल.
मस्त लिहिले आहेस.

श्रीरंग_जोशी's picture

16 Mar 2015 - 3:38 am | श्रीरंग_जोशी

सुंदर फोटोज अन वर्णन. आजकाल मिपावरच्या युरोपवरील प्रत्येक लेखातून दरवेळी नवे काहीतरी कळत आहे.

स्पंदना's picture

16 Mar 2015 - 5:46 am | स्पंदना

काय वर्णन आहे!! इतिहास जर कुणी असा शिकवला असता तर आज आम्ही कुणी वेगळेच झालो असतो ;)

मस्त गाव, अन सुरेख वर्णन स्वाती ताई.

ब़जरबट्टू's picture

16 Mar 2015 - 9:11 am | ब़जरबट्टू

सुंदर फोटोज अन वर्णन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2015 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाल कौलाच्या पहिल्याच फोटोने आम्ही रोथेनबुर्गला पोहोचलो आणि मग लहान मुलासारख आम्ही आपलं बोट धरुन मस्त फिरुन आलो. बाकी, वर्णन, फोटो यांना पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. केवळ सुंदर.

आता फ्रँकफुटात कधी उतरलोच तर रोथेनबुर्गला जाणं नव्हे तर एखाद घर घेणं आलं. :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

16 Mar 2015 - 9:41 am | यशोधरा

वा, वा, स्तुत्य विचार. कोणे मिपाकर गेल्यास त्यांची सोय तरी होईल रहायची =))

स्वाती दिनेश's picture

18 Mar 2015 - 12:14 pm | स्वाती दिनेश

फ्रा फु मध्ये स्वागत आहे, :)
स्वाती

नंदन's picture

16 Mar 2015 - 1:22 pm | नंदन

वर्णन आणि फोटो, दोन्ही छान. आंतरजालावर 'कौलांची' दहशत बसली असताना, असला सुरेख लेख वाचायला मिळणं - हा एक सुखद धक्काच! :)

सांगलीचा भडंग's picture

16 Mar 2015 - 2:31 pm | सांगलीचा भडंग

मस्त वर्णन पहिला आणि शेवटचा फोटो तर मस्त एकदम

सूड's picture

16 Mar 2015 - 3:02 pm | सूड

मस्तच!!

रुपी's picture

17 Mar 2015 - 2:09 am | रुपी

फोटो तर सुंदर आहेतच.. पण लेखन काय छान आहे! अगदी ओघवती शैली.. लेख फार आवडला.

प्रचेतस's picture

17 Mar 2015 - 9:25 am | प्रचेतस

खूप सुंदर.

मस्तच गं स्वाती ताई. जायला हवे एकदा इथे.

स्वाती दिनेश's picture

18 Mar 2015 - 12:15 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्वाती

पैसा's picture

18 Mar 2015 - 12:35 pm | पैसा

या गावाच्या प्रेमात पडावं असंच दिसतंय हे गाव! वर्णन आणि फोटो केवळ अप्रतिम!

आदिजोशी's picture

18 Mar 2015 - 2:59 pm | आदिजोशी

१ नंबर. फोटो आणि प्रवासवर्णन एकदम मस्त जमलं आहे. धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2015 - 1:15 pm | सानिकास्वप्निल

मस्त वर्णन अाणि फोटोज.
किती छान लिहिले अाहेस गं.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2015 - 4:45 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन आणि छायाचित्र.

पुढे कधी पुन्हा जर्मनी भेट जमलीच तर जर्मनवासी मिपाकरांना (निनाद, दिव्यश्री, मधुरा देशपांडे, स्वाती दिनेश) एका कट्ट्याला एकत्र आणून जर्मनी पर्यटनाविषयी सल्ला मसलत, नियोजन करून जर्मन देश पिंजून काढावा असे खूप वाटते.
पाहूया कसे काय जमते ते.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 5:31 pm | कविता१९७८

छान वर्णन

विनोद१८'s picture

22 Mar 2015 - 11:14 pm | विनोद१८

..धन्यवाद स्वाती दिनेश तुमच्याबरोबर 'लाल कौलांच्या गावाची' सफर घडवून आणल्याबद्दल..!!!

चित्रे व वर्णन दोन्ही छान जमलेय.

किती सुंदर फोटो ! त्याहून सुरेख लेखन !
स्वातीताई, खूप आवडले गं !

मस्त लिहिलंय हे....खरच एक तिथे एक फेरफटका मारावसा वाटतोय! :-)