आंघोळ

मितान's picture
मितान in विशेष
8 Mar 2015 - 2:02 am
महिला दिन

आज सकाळी सकाळी व्हाट्सॅप वर एक विनोद वाचला. म्हणे, आरशासमोर एक ग्लास पाणी घेऊन उभे रहा, बचकन पाणी आरशावर फेका. म्हणा," झाली बाबा आंघोळ एकदाची !" काय झकास कल्पना ! मला फार आवडला हा विनोद. मी पण पुढे ढकलला. ( आपण कशाला सोडायचं!)

मग आंघोळीला गेले. कढत कढत पाणी. वाफा येणारं. बाथरूम भरून गेली वाफांनी. आरशावर वाफ जमा झाली. दोन बादल्या अशा कढत पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. मग गरम चहा करून प्यायले. आणि पांघरुण घेऊन गुडुप ! एकदम लहान बाळ झाल्यासारखं वाटलं. शांत, निवांत, निर्मळ !

लोकांना आंघोळीचा एवढा कंटाळा का असतो काय माहीत. सत्ते पे सत्ता मधल्यासारखी 'उसे तो पानी के नाम से भी घिन आती है' अशी अनेकांची परिस्थिती असते. मला आवडते आंघोळ.

लहानपणी शाळा सकाळी ७ ची असायची. हिवाळ्याच्या दिवसात उठणं जिवावर यायचं. पण मातेला पुरेशी दया न आल्यानं कडमडत उठावंच लागायचं. एकदा उठून दूध पिऊन आंघोळ केली की मग मात्र आळस गायब व्हायचा. शाळा जवळच असल्याने आम्ही चालतच जायचो. स्वच्छ गणवेष घातलेले, डोक्याला चपचपीत तेल लावलेले, दप्तर पाठीला अडकवून हाताची घडी घालून तळवे का़खेत घालून चाललेले थवेच्या थवे शाळेच्या रस्त्यावर पसरायचे. कुंदाच्या फुलांचे दिवस असतिल तर दोन वेण्यांवर कुंदाचे लख्ख गजरे, त्यात दोनचार अबोलीची फुले ओवून, अगदीच अजून हौशी माता असेल तर कुंद अबोलीच्या गजर्यात मरव्याची चारदोन पाने पण असायची ! हा असा सुंदर गजरा आंघोळ केल्याशिवाय केसात माळायची आपली लायकीच नाही असं वाटायचं ! सकाळच्या त्या धुकट, गारठ जड हवेत हा कुंदाचा नि मरव्याचा सुगंधही रेंगाळत रहायचा.

मुलांची गोष्ट अजून वेगळी. मला वाटतं ते आंघोळीच्या बाबतीत जास्त आळशी असावेत. आंघोळीसाठी कदाचित आधीच पडलेली एखादी चापट किंवा चिमटा चेहर्यावर वागवत ते ही जथ्थ्याने रस्त्यावर असायचे. त्यांच्या गणवेषात खाकी हाफ पँट असल्याने केसांना जेवढे खोबरेल चोपडले असेल तेवढेच हातापायांनाही चोपडलेले असायचे. जो तेल लावणार नाही त्याचे पाय पांढरेफटक मातीच्या रंगाचे दिसायचे. मग चुकून त्यावर पाणी सांडलं तर ते कसं घाण वासाचं दिसायचं ! म्हणूनच कदाचित हे होऊ नये म्हणून ते अंगालाही पचपच तेल लावत असावेत.

सकाळच्या कोवळ्या उन्हात प्रार्थनेला उभं राहिल्यावर सगळी काळी डोकी आणि उघडे हातपाय तेलामुळे चमचमताना दिसायचे. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे दिवाळीत उरलेल्या अभ्यंग तेलाचा सदूपयोगही आम्ही सगळेच करायचो. सकाळी पहिल्या तासाला वर्गात फुलांच्या बरोबरीने माका,चमेली,बदामाचं तेल आणि हो नवं आलेलं चिकट नसलेलं केयो कार्पिन अशा तेलांचे वासही मिसळून दरवळायचे.

तर आंघोळ ! सुटीत गावकडे गेलो तर तिथला स्नानसोहळा अजून वेगळा असायचा. सक्काळी सक्काळी मांजरांच्या अंगावर उड्या मारण्याने जाग यायची. मग उठून बाहेर जायचं. आजी शेणाचा सडा घालत असायची. आई, काकू चूल पेटवण्याच्या तयारीत. आजोबा उगाचच लवकर आवरा ची गडबड करत असायचे. गोठ्यातून गायी सुटलेल्या असायच्या. काका पूजेला बसलेले असायचे. आम्ही पोरंसोरं मात्र काय करावं ते न कळून अर्धवट झोपेत नुसते बसून रहायचो. मग कोणीतरी म्हटल्यावर वतलासमोर दात घासत पुन्हा बसून रहायचं. वतलात तुरांट्या घालत जाळ मोठा करायचा. मस्त शेकत बसायचं. तिथेच बसून मग दूध प्यायचं. मग आंघोळ. तुरांट्याच्या आणि गोवर्‍यांच्या धुराचा वास लागलेलं ते खमंग आणि कढत पाणी घंघाळात हसत असायचं. त्या पाण्याने केलेली आंघोळ ही माझी जग्गात सर्वात आवडणारी आंघोळ !

कधीमधी आई नाहीतर आज्जीला आम्हाला न्हाऊ घालण्याची हुक्की यायची. मग काय.. हे असं जवळजवळ उकळतं असणारं पाणी, उकळलेल्या शिकेकाईचं नाकातोंडात जाणारं पाणी, डोळ्यांची होणारी आग, केसातून आपणच मुरवलेलं वाटीभर तेल काढण्यासाठी केसन केस धुवून खसाखसा फिरणारे काचेच्या बांगड्यांचे हात, मानेवरची मळाची पुटं ( असं त्यांचं म्हणनं!) काढणारी वज्री नाहीतर अंग घासायचा दगड आणि या सर्वांवर कळस चढवणारा आमचा आकांत !!!!! आहाहाहा.... केवळ अवर्णनीय !!! या अशा स्नानानंतर चुलीवरची कढत भाकरी हाणायची नि आता काय खेळावं हा विचार करत पेंगायचं ! दुसरा काही पर्यायच नाही !

दिवाळीच्या दिवशी आजी घरीच उटणं वाटायची. तीळ, हळद, चंदन आणि सायीचं दही. सुगंधी तेलाने माखलं की आजीच हातापांयांना हे उटणं चोळायची. मग अंगावरून ज्या काळ्या लेवाळ्या निघायच्या त्यांना आजी मळ म्हणायची. तो मळ बघता पार्वतीने मळापासून गणपती केला यावर आमचा फार म्हणजे फारच विश्वास बसायचा !
आपल्या अंगावरून एवढा मळ निघतोय याची एकाच वेळी मज्जा नि धास्ती वाटून त्या दिवशी मोती साबण जरा जास्तच वापरला जायचा.

पुढे आंघोळीपेक्षा वेगळे विषय चिंतनासाठी डोक्यात येत गेल्याने इथपासून ते मोठे होईपर्यंतच्या आंघोळींविषयी
काही चिंतन नाही. :)

युरोपात राहताना पहिल्यांदाच बाथटब या प्रकरणाशी ओळख झाली. लहानपणापासून अंगावरचा मळ वगेरे संस्कार झाल्याने पहिल्यांदा या टबात पाणी साठवायचं नि त्यात बसून किंवा लोळून आंघोळ करायची ही कल्पनाच गचाळ वाटली. मग तिथल्या पहिल्या थंडीच्या कडाक्यानं गरम पाण्यात भिजत पडून राहाणं कसं सुखाचं ते शिकवलं. तरी तो प्रकार आंघोळ म्हणून फारसा आवडला नाहीच. बाथटब मध्ये बसून पुस्तकं वाचणं, लॅपटॉपवर सिनेमे बघणं या गोष्टी मी कधी करेन असं वाटत नाही. पण अनेकांना हे आवडतं म्हणे.

माझ्या मते प्रत्येक ऋतूतल्या आंघोळीची कळा वेगळी असते. उन्हाळ्यात सकाळचा गारवा अनुभवत उन्हं वर आल्यावर उठावं, निवांत आवरून मग थंडगार न्हाणीघरात गार शॉवरखाली एक मिनि समाधी लावावी ! नाहीतर आमच्या गावच्या नदीच्या खळखळ पाण्यात वाळूत बगळ्याशी शर्यत करत लोळत ध्यान लावावं, नाहीतर आडाचं पाणी शेंदून शेवाळाचा गोडुस वास असलेल्या त्या पाण्यात चुबुकचुबुक करत खेळत बसावं, नाहीतर विहिरीतल्या गार अंधार्‍या पाण्यात डुबकी मारावी, नाहीतर पोहोण्याच्या तलावातल्या निळ्याशार तलम पाण्याशी खेळावं, नाहीतर उन्हं कडक होण्या आधी 'अजून एकदाच'! असं किमान २५ वेळा म्हणत समुद्राच्या लाटांना भिडून यावं, नाहीतर उन्हात बादली ठेवून त्या ऊनवासाच्या कोंमट पाण्यात मैसूर संदल किंवा संतूरचा वास मिसळावा.... रात्री झोपण्यापूर्वी गार पाण्याने आंघोळ करायची, फसाफसा घामोळ्यांचे पावडर लावायचे आणि गच्चीत मच्छरदाणीत गप्पा हाणीत चांदणं पांघरुन झोपायचे... ही उन्हाळ्यातली आंघोळ. हिवाळ्यातल्या आंघोळीसारखेच या आंघोळीलाही मोगरा, वाळा, कडुनिंब आणि हो.. आंब्यांच्या रसाचेही वास आहेत.

पावसाळ्यातली आंघोळ मात्र वरच्या दोन्हीपुढे फारच बाळबोध. त्या मानाने कमी नखर्याची. अवघी सृष्टी न्हात असताना आपल्या क्षुद्र आंघोळीकडे लक्षही जाऊ नये असा पाऊस ! पहिल्या पावसात होणारी आंघोळ ही खरं मनाची आंघोळ असते. शरीरापेक्षा मनच हा अनुभव घेत असतं. मुसळधार पावसात रेनकोट छात्रीशिवाय भिजायचं आणि मग कोरडं झाल्यावरही अंगाला येणारा पावसाचा वास आणि कुठल्याच शांपूने होऊ शकणार नाहीत असे मऊ झालेले केस... ही पावसाळ्यातली आंघोळ!

आंघोळीला आंघोळ म्हटलं की कसं आई, आजी, काकू, मावशी, मैत्रिणीला बोलावल्यासारखं वाटतं. 'स्नान' म्हटल्यावर उगाच वेदशास्त्रसंपन्न धीरगंभीर शास्त्री येतायत असं वाटतं. कावळ्याची आंघोळ म्हटलं की आंघोळ न करताच अत्तराचा फाया नि गंधाचा टिळा लावलेला बेरकीपणा दिसतो. चिमणीची आंघोळ म्हणताच फुटलेल्या पाईपमुळे तयार झालेल्या कारंज्यात दप्तर भिजू न देण्याचा लटकेपणा करणारी पिटुकली दिसतात.

आम्ही शिबिरांवर जायचो तेव्हा आंघोळ हा तिथे अनावश्यक वाटणारा पण अत्यावश्यक असणारा वैताग असायचा. अशा वेळी एकमेकींना ' हाडं खंगाळून झाली का' असं विचारायचो. ते विचारताना समोर कोणत्याही हाडाचा मागमूस दिसणार नाही अशी मैत्रिण फिदीफिदी हसायची ते फार मस्त वाटायचं.

गंगेत अत्यंत श्रद्धेनं डुबकी मारणारे लोक, तोंडात पाण्याचा थेंब घेण्यासाठीही आंघोळीची अट असणारे लोक, दोन पायांवर तेलाने माखून ऊन ऊन पाण्याने आंघोळ घालत असतानाच पेंगणारी बाळं, तोंडाचं बोळकं आणि कमानीसारखी कंबर असतानाही लुगड्याचा पिळा खांद्यावर टाकून येणारी एखादी पणजी, शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करून गंधपावडर करणारी चिमुकली, स्वतःचा भांग पाडणारा आरशात भुवया ताणून बघणारा ऐटबाज चिमुकला, आंघोळीनंतर केस झटकणारी षोडशा, घाईघाईने आंघोळ उरकून केसांना तसाच पंचा बांधून कपाळावर टिकली टेकवून कामाला लागणारी गृहिणी.... ही आणि अशी अनेक चित्रे माझ्यासाठी नेहमीच प्रसन्न करणारी आहेत.

तर असं हे आंघोळपुराण. शेवटी माझं आंघोळीच्या बाबतीतलं एक स्वप्नं आहे ते सांगते ;)

माझे काही मित्रमैत्रिणी मला प्रेमाने 'म्हशे' म्हणतात त्याला माझा अजिबात आक्षेप नसतो. कारण मला नं एकदा खरंच म्हशीसारखी आंघोळ करायची आहे... उन्हाळा असावा.... स्वच्छ मातीचं, स्वच्छ पाणी घातलेलं डबकं असावं... त्याची लांबीरुंदीखोली अर्थातच माझा चेहरा बुडणार नाही एवढी असावी... आणि मग मी त्या चिखलात पसरावं.... आहाहा... आमेन !!!!!

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2015 - 1:51 pm | पिलीयन रायडर

Shikekaini khasa khasa cholun ghatleli anghol... Ditto!!!!

Mastch jamlay g lekh!!!!

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:17 pm | सविता००१

आहे हा लेख.
सगळं सगळं लहानपण एका झटक्यात गेलं डोळ्यासमोरून अल्लाद तरळलं.
किती सुरेख...

नावडत्या गोष्टीविषयी आवडलेला लेख!
वाचताना मज्जा आली.
मी शक्य होईल तितकी पोस्टपोन करून का होईना पण सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी आंघोळ मस्ट या कॅटेगरीत.
काही लोक आंघोळीची गोळी घेऊन कसे काय दिवसेंदिवस रहातात कुणास ठाऊक?
:)

सु रे ख! क्लास लिहिलं आहेस.मीही तुझ्याच कॅटेगरीतली असल्याने एंजॉय केला लेख!

पियुशा's picture

8 Mar 2015 - 10:18 pm | पियुशा

व्वा , लहान पण ड़ॉल्यासमोर तरळुन गेले सुट्टी च्या दिवशी हौदाचा स्विमिंग पुल करून त्यात आम्ही भावंडानी घातलेला हैदोस आठवला गेले ते रम्य मनसोक्त डूबायचे दिवस रहिल्या त्या आठवनी मी

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2015 - 10:30 pm | प्रीत-मोहर

बरच्या लेखातल्या प्रत्येक वाक्यासाठी 'मम' . (अगदी म्हशे साठी सुद्धा!! )

पिशी अबोली's picture

9 Mar 2015 - 11:42 am | पिशी अबोली

मीपण 'मम'

इशा१२३'s picture

9 Mar 2015 - 8:11 am | इशा१२३

छान वर्णन.आंघोळ हा उरकुन टाकायचे काम माझ्यासाठी.आंघोळ आवडते ती फक्त दिवाळित.मस्त सुगंधीत आंघोळ.
लहानपणीची मामाकडे गेल्यावरची आंघोळ अशीच आठवणीत.जुना वाड्यातला चौक त्यात कोपर्‍यातली अंधारी,गुढ मोरी,मोठा पितळी हंडा तिथे जायलाच भिती वाटायची.लखलखीत घासलेला बंब आणि त्यातल उकळत पाणी मात्र खूप आवडायच.आणि तो शिकेकाईने डोक न मान चोळण हा छळ.शांपु नावाचा प्रकार असतो याचा आईने बर्‍याच वर्ष पत्ता लागु दिला न्हवता.
या लेखामुळे बर्याच आठवणी ताज्या झाल्या.मस्त प्रसन्न वाटल.आंघोळ झाल्यासारख.

अय्या!! खरच अंघोळ झाल्यासारख वाटल ना!
चला मग आज अंघोळ झाली अस मानुया तर. ;)

मितान काय वर्णावा सोहळा अंघोळीचा!! मस्तच जमलाय!

खूप आठवणी जाग्या झाल्यात या लेखाच्या निमित्ताने !!लहानपणी आजीच्या हातची रविवारची शिकेकाई वाली अंघोळ आठवली .अगदी खसाखसा केस धुतलेले ,तांब्याच्या घंघाळात असलेले पाणी सगळेकाही आठवले !! लेख नेहमीप्रमाणेच मस्त झालाय ..

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 5:23 pm | मधुरा देशपांडे

क्लासिक लेख. कधी आंघोळीचा कंटाळा आला, की हा लेख वाचावा आणि मग या आठ्वणीत गुंग होत आंघोळ करावी. तेवढाच रिफ्रेशिंग अनुभव.

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2015 - 9:02 pm | निवेदिता-ताई

लेख मस्त ग...
बालपणात गेलेले मन ..अजुन तिथेच रेंगाळतेय.

जुइ's picture

10 Mar 2015 - 8:00 am | जुइ

वेगवेगळ्या ऋतूंतील अंघोळींचे वर्णन एकदम झकास जमले आहे!!

प्रियाजी's picture

10 Mar 2015 - 12:36 pm | प्रियाजी

आंघोळ पुराण वाचून खरोखर सुगंधी उट्ण्याने, सचैल स्नानाचा आनंद मिळाला.

खटासि खट's picture

10 Mar 2015 - 1:05 pm | खटासि खट

छान आहे लेख.
( पहिला पॅरा फारच भावला. तो गंभीरपणे घेण्यात येत आहे)

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 3:33 pm | स्वाती दिनेश

एकदम 'सुस्नात' लेख!खूप आवडला.
स्वाती

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:17 pm | सस्नेह

'अंघोळ' यासारख्या विषयावर इतकं छान काही लिहिता येतं हे तुझा लेख वाचून स्ट्राईक झालं मितान.

पलाश's picture

10 Mar 2015 - 7:40 pm | पलाश

सुंदर लेख!!!
इतक्या ओळखीच्या विषयात एवढे बारकावे असू शकतात हे आज कळले!! :)

रुपी's picture

11 Mar 2015 - 6:20 am | रुपी

मलाही आंघोळ आवडते. लवकर उठल्यावर आळस घालवायला दुसरा उपाय नाही!

तुमची लेखनशैली फार छान आहे!

स्रुजा's picture

11 Mar 2015 - 7:09 am | स्रुजा

हाहा, मस्त लिहिलयेस. ए, मला आवडतो बाई टब बाथ. तुझं टब बाथ बद्दलचं मत वाचून मला फ्रेंड्सचा चँडलरच्या बाथ चा एपिसोड आठवला :D

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 10:28 pm | सानिकास्वप्निल

वाह! काय मस्तं लिहिले आहेस सॉलिड एकदम !
आंघोळपुराण अर्थातच आवडले आहे :)
स्रुजासारखेच म्हणते मला ही टब बाथ आवडतो अगदी एसेन्सशीयल ऑईल वगैरे घालून म्हशीसारखे डुंबायला किती मज्जा येते ;) हाय हाय हाय !

उमा @ मिपा's picture

11 Mar 2015 - 2:47 pm | उमा @ मिपा

अप्रतिम लिहिलंयस! पुन्हा पुन्हा वाचावं आणि रंगून जावं असं लिखाण. तनमन प्रफुल्लित करणाऱ्या आंघोळीसारखाच हा लेख.

कौशी's picture

12 Mar 2015 - 5:37 am | कौशी

लहानपणी च्या सर्व आठवणी जाग्या झाल्यात या लेखामुळे .

झकास..मज्जा आली वाचताना

गिरकी's picture

12 Mar 2015 - 3:53 pm | गिरकी

फार छान लेख गं मितान तै :) सगळ्या प्रकारच्या अंघोळी करून आणल्यास बघ.

अंघोळ आवडते पण आणि नै पण …. उगाच कुणी अंघोळ करून घे लवकर म्हणून मागं लागलं तर नुस्ती चिड चिड …. माझ्यासाठी, असं शरीराने अंघोळ अंघोळ म्हणून ओरडायला पायजे आणि मग त्यानंतर तासभर वाट्टेल तेवढं पाणी वापरून पाण्यात खेळून मग केलेली अंघोळ म्हणजे शुचिर्भूत होणं !!

मस्त जमून आलंय आंघोळ पुराण मितान !

अंघोळीचा लेख आवडला. लहान बाळांना पायांवर घेऊन घातलेली आंघोळ आणि नंतरची गुडुप झोप आवडते. नंतर ती आवड कुठे जाते कोणास ठाऊक? मला अंघोळीनंतर सुट्टीच्या दिवशी लगेच झोपायला आवडते. अगदी जेवायच्यावेळेसच उठवले तरी अजिबात तक्रार नसते. ;)

समिधा's picture

14 Mar 2015 - 12:09 am | समिधा

सुरेख लिहील आहेस गं एकदम. कित्त्ती कित्ती आठवणी जाग्या झाल्या. आजीच्या हातची शिककाईची अंघोळ वाचल्यावर तर तिच्या आठवणीने डोळ्यात पाणीच आले.

कौशिकी०२५'s picture

15 Mar 2015 - 1:51 pm | कौशिकी०२५

आंघोळीविषयी कुणी इतकं छान लिहू शकतं! मस्तच लिहिलंय..

हाहाहा... आंघोळ. माझी नावडती. पण दिवाळित उटणे लावुन आंघोळ करायला खुप आवाडायचे. ते सुगंधी उटणे, मोती साबण... बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. :)

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:09 pm | कविता१९७८

आंघोळ माझी नावडती पण तुझा लेख आवडला

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2015 - 10:51 am | नगरीनिरंजन

थंडीच्या दिवसांत गरमागरम आंघोळ करुन गुडुप झोपण्याची मजाच न्यारी! लेख आवडला!

पैसा's picture

24 Mar 2015 - 10:37 am | पैसा

बाथटब आवडेल का शंकाच आहे, कारण .... बरीच सांगता येतील. स्विमिंग पूलमधे कोणी घाण करत असतील का काय म्हणून न उतरणारे आमच्यासारखे लोक म्हणजे... असो. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे म्हणजे ब्येश्ट! लहान असताना आमच्याकडे हमाम आणि काकांकडे दगडी लाईफबॉय साबण असायचा. तो कधीतरी कपड्यांना लावायला पण चालायचा. आंघोळ केल्यावर त्यांचा पण वास येत रहायचा. तेव्हा शांपू वगैरे नव्हते. माझी एक काकू सर्फने डोक्यावरून आंघोळ करायची. गंमत म्हणजे तिचे केस अजून माझ्यापेक्षा चांगले आहेत.

आता तो दगडी लाईफबॉय पण मिळत नाही आणि तशी आंघोळ परत कधी केली असं आठवत नाही!

श्रीरंग_जोशी's picture

27 Mar 2015 - 4:52 am | श्रीरंग_जोशी

हा लेख वाचून खूप छान वाटत आहे. एकदम ताजेतवाने झाल्यासारखं वाटत आहे.
आंघोळ करणे हे मनाला हलके अन प्रसन्न करणारे कार्य आहे.

विकांतालाही मला सकाळी लौकर आंघोळ कराविशी वाटते. आमच्या घरातल्या बाथटबचे अजुनही उद्घाटन झालेले नाही. इथे पाणी मुबलक असले तरी पाणी वाया न घालवण्याचे संस्कार आड येतात.

यावरून आठवले - बहुधा लोकसत्तेच्या हास्यरंगमध्ये एक विनोदी लेख वाचला होता. त्यात एक विचार मांडला होता. अरब लोक एवढे चिडखोर, संतापी का बनले? कारण पिढ्यानपिढ्या पाण्याच्या कमतरतेमुळे निवांतपणे आंघोळ करण्याची संधीच मिळत नसे. याउलट भारतातील नद्यांना बारमाही असणार्‍या पाण्यामुळे भारतातले लोक शांत प्रवृत्तीचे व सुस्वभावी बनले :-) .

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Apr 2015 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते

खंगाळगाथा आवाल्डी! पाण्यात तासनतास डुंबणे ही सुखाची एक परमावधी आहे!

सर्वप्रथम हा अंक पुन्हा उपलब्ध करून दिल्याबद्दल नीलकांत व प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार. या अंकात एकसे एक लेखांचा खजिनाच आहे. त्यातलाच हा एक.

मितानताई, फार छान आणि सहजसुंदर लिहिलंय. अंघोळ आणि पाण्यात डुंबणं हा माझ्याही आवडीचा विषय. समुद्रकिनार्‍यावर पाण्यात मांडी घालून बसणं आणि लाटा अंगावर घेत डोळे किलकिले करून ध्यान लावणं हा म्हणजे स्वर्गसुखाचा अनुभव असतो. वा, मस्त आठवणी!

विशाखा राऊत's picture

15 Sep 2015 - 1:47 pm | विशाखा राऊत

किती मस्त आंघोळ...

पदम's picture

15 Sep 2015 - 2:32 pm | पदम

आंघोळ ह्या विषयावर एवढ चांगल लिहता येउ शकत! एक्दम सुरेख लिखाण.

पद्मावति's picture

15 Sep 2015 - 6:26 pm | पद्मावति

काय सुंदर लिहिलय. वरच्या बर्याच प्रतिसादांप्रमाणे मलाही हेच म्हणायचंय की आंघोळ या साध्या रोजच्या विषयावर इतकं सुरेख लेखन वाचायला मिळालं. मस्तं मनापासून लिहिलंय. वाचूनच फ्रेश वाटतंय.
मला रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी वर्काउट केल्यानंतरची आंघोळ प्रचंड आवडते. रात्रीच्या आंघोळीं ने गप्प-गुडूप झोप लागते आणि सकाळी व्यायामानंतरच्या आंघोळीनंतर एकदम पीसासारखं हलकंफुलक वाटतं.

जेपी's picture

15 Sep 2015 - 6:40 pm | जेपी

मस्त लेख.
लहानपणी वत्तला समोर बसुन त्यात तुराट्या,सुर्यफुलाची काड सारणे आठवले.
-

अवांतर- यावरुन "तोंड बघ स्वत:च वत्तलासारख दिसतय"
हे वाक्य लहानपणी बरेचदा वापरल जायच.

मी-सौरभ's picture

15 Sep 2015 - 6:49 pm | मी-सौरभ

ईथे पाणीकपात चालू आहे आणि तुम्ही असले लेख वर काढताय??
शिव!! शिव!! शिव!!

पूर्वाविवेक's picture

15 Sep 2015 - 7:23 pm | पूर्वाविवेक

आहा मस्तच. वाचताना स्वताच अंघोळ करतेय असा फील आला.