बालमानस जपणे.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in विशेष
8 Mar 2015 - 2:06 am
महिला दिन

कितीही सुधारलं तरी आमचं शहर अजून रेल्वेशी ईमान राखून आहे. त्यामुळे ट्रेन आली की रस्त्यांचे पाय अधिक जलद् गतीने वेगवेगळ्या घरांच्या दिशेने जायला लागतात. उशीराची वेळ असली की त्या पायांना पोळीभाजी केंद्राचा एक थांबा मिळतो. अश्याच एक पोळीभाजी केंद्राशी गर्दीतलं एक कुटुंब. नवरा-बायको आणि चार-पाच वर्षांची मुलगी. कुठली भाजी, किती पोळ्या याचा उहापोह करत केंद्रावरच्या काकांना ऑर्डर सांगत होते. ते काकाही एकटेच दोघाचौघांच्या प्रश्नांना उत्तरं देणे, हिशेब करणे, पैसे घेणे ही कामं करतच होते. त्या छोटीचं लक्ष गेलं बरणीतल्या वड्यांकडे.
"मला ते हवयं"-- छोटी.
"हे काय आहे हो?" -- आई दुकानदाराला
"गाजरवड्या आहेत त्या. ---रु. ना एक. दुपारीच केल्यात. "
"मला हव्यात"-- छोटी.
"घेउया ना." आई , बाबांना
"थोड्या घे. ती नंतर खात नाही." बाबा
"एक वडी द्या हो. "
दुकानदार घाईत. आधी आलेल्यांच्या ऑर्डरी घेण्यात वैगेरे. यांचीही पोळीभाजीची ऑर्डर फायनल झालीच नव्हती. थोडा वेळ गेला. मुलीने आईच्या ओढणीचे टोक ओढून डोळ्यांनी परत वड्या दाखवल्या.
"अहो,एक वडी द्या हो." वडील.
दुकानदाराच्या हातात पैसे आणि तोंडाने हिशोब चालू.
"अहो किती वेळ?एक वडी द्या "
"जरा थांबा हं."
" किती वेळ रे? ही बघ माझी ओढणी ओढत बसलीय." आई.
"अहो द्या ना. फुकट का मागतोय आम्ही? लवकर द्या. लहान मूल पण कळत नाही ! " मुलीचे बाबा उखडले.
दुकानदाराने रागरंग बघून बरणी उघडून वड्या काढून दिल्या. छोटीला वड्या मिळाल्या आणि बरोबर ही शिकवण पण की "मी सर्वात महत्वाची. मी पैसे मोजतेय तेव्हा मला अटेन्ड केलं गेलं पाहिजे. (बाकीच्यांनी त्यांचं काय ते बघून घ्यावं)"

दुसरा प्रसंग माझ्याच बाबतीतला. मी ऑफिसला जाताना रोज वाटेत भेटणारी आई मुलाची जोडगोळी. मुलगा पहिलीतला. एकदा ही जोडगोळी एकदा दुकानात भेटली. "हाय, गुडमॉर्निंग. " मी हळूच त्याच्या गालाला हात लावत म्हटलं. "सुटी ना आज?" त्याने चेहरा रडका केला.
"ए, आता रडू नकोस रे. कशाला त्याच्या गालाला हात लावलात? तापामुळे आधीच चिड्चिडा झालाय तो. माझाही हात लावून घेत नाही. " आई.
मी "सॉरी हं मला माहित नव्ह्तं त्याला ताप आहे ते" असं म्हणत बाजूला झाले.
त्या मुलाला शिकवण मिळाली, "मी महत्वाचा. मला होणारा त्रास महत्वाचा, दुसर्‍यांनी दाखवलेली आस्था बिन महत्वाची."

हे असे प्रसंग मला आजूबाजूला दिसतात तेव्हा फार वाईट वाटतं. एकीकडे मुलांना फटाफट मारणारे, त्यांचं भावविश्व अशी काही चीज नसते असं मानणारे आईबाप तर दुसरीकडे " मी राजा. आणि मीच राजा." अशी शिकवण मुलाला नकळतपणे देउन बिघडवणारे हे असे पालक. त्यांच्या लेखी भावना असतात ते मुलांनांच आणि तेही त्यांच्याच आणि त्या जपण्यासाठी कुणालाही काहीही बोललेलं चालतं. पहिल्या प्रकारातल्यांविषयी पुष्कळ लिहीलं जातं. पण दुसर्‍या ?

बालमानसशास्त्र, मुलांची मनं जपणं हे महत्वाचं आहेच पण घराबाहेर ते चार जणांपैकीच एक आहेत ही जाणीव त्यांना करून देणं महत्वाचं नाहीय का? वरील पहील्या उदाहरणात दुकानदार मुलीच्या बाबांपेक्षा वयाने दुप्पट होता. गर्दीमुळॆ त्याचीही धांदल उडाली होती. त्याला अश्या शब्दात बोलून बाबांनी मुलीचं मन जपलं पण "दुसर्‍यांचं मन, त्याचं काम हे सगळं माझ्यापुढे, कवडीमोलाचं आहे कारण मी पैसे मोजतेय " हे तिच्या मनात पेरलं याचं काय? आपण मुलांच्या बेशिस्तीबद्द्ल, आत्मकेन्द्री असण्याबद्द्ल बोलतो पण याची रुजवण आपणच अश्या प्रकारे करत असतो हे किती सुशिक्षित पालक ध्यानात घेतात? माझं मूल लहान आहे त्याला एक्स्ट्रा अटेन्शन द्यावं असं वाटणं चुकीचं नाही, पण तो माझ्या काळजाचा तुकडा आहे म्हणून दुसर्‍यांनीही फक्त त्यालाच महत्व द्यावं ही अपेक्षा अवाजवी असते. "थांब जरा, काका गडबडीत आहेत ना? हे आपल्या आधी आलेले लोक आहेत. त्यांचं घेउन होउ दे." हे तिला कळणार्‍या भाषेत सांगितलं गेलं तर ती शिकवण तिला समाजाचा जबाबदार घटक बनवेल. नाहीतर हीच मुलं मोठी झाल्यावर "काही कुणाची पर्वा नसते या पिढीला." असं आपणच म्हणणार आहोत. मुल्यशिक्षण हा शाळॆत शिकवण्याचा विषय नसून आपल्या वागण्यातूनच मुलं तो शिकत असतात.

आपल मुल जे करतयं त्याला मान द्यावा, कौतुक करावं; पण दुसर्‍याचं मूल एखादी गोष्ट आपल्या मुलापेक्षा चांगली करत असेल तर त्याचं निर्भेळ कौतुक करायची सवय आपल्याला आणि आपल्या मुलाला लावण्यात त्याच्या मनाची काय हानी होते हे मला तरी कळत नाही.

याचा अजून एक अविष्कार मी मुलीच्या शाळेत पाहिला. एक मुलगी. प्रत्येक वर्षी नाटकात आणि मुख्य भुमिकेत असायचीच. तिच्याहून चांगल्या अभिनय, आवाज असणार्‍या असतानाही. कधीतरी तिच्या आईशी बोलताना हे कोडं उलगडलं.
"अगं, तिला नर्सरीत फक्त नाचात घेतलेलं होतं. ती इतकी रडली ना!. मग मी जाऊन शाळेत सांगितलं तर टीचर म्हणाल्या की तिचा आवाज बारीक आहे आणि एकसूरी बोलते. मग मी म्हटलं, "त्याच साठी सांगतेय ना? केव्हा शिकणार ती हे? तुम्ही असं करून तिला complex देताय. उलट तिला एवढी इच्छा आहे तर घ्यायलाच हवं". मग आता तिला घेतातच प्रत्येक नाटकात."! तिच्या बालमानसशास्त्र जपणार्‍या आईनं तिच्या बोलण्यावर मात्र काहीच मेहनत घेतली नव्ह्ती. काही मिळवण्यासाठी आपल्यातल्या न्यूनत्वावर मेहनत घेण्यापेक्षा रडून हवं ते सहज मिळतं ही शिकवण मात्र दिली होती.

हीच उदाहरणं रिऍलिटी शोज मध्ये दिसतात. अधिक विकृत स्वरूपात हीच मनोवृती पोलिसांवर गाडी घालणार्‍या, प्रेयसीवर अ‍ॅसिड फेकणार्‍या आणि वाटेल ते करून पुढे जाणार्‍या मुलांमध्ये दिसते. महत्वाचा/ची फक्त मी, बाकी दुय्यम.

एक चित्रकला स्पर्धा संपल्यावर मुलं हॉलच्या बाहेर आली. त्यातल्या एकीला तिच्या आईनं " कुठलं चित्र काढलं? " असं विचारल्यावर ती उत्साहाने म्हणाली. "अगं आई माझ्या शेजारी बसलेली ना तिने इतकं छान चित्र काढलेलं ना! खुप मस्त होतं. माणसं तर एवढी छान काढलेली!". आपल्या वयाचीच कोणी एवढं छान चित्र काढू शकतं हे कळल्याने तिला प्रचंड आनंद झालेला. हा आनंद कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळवता येत नाही. अश्या वेळी " तू कसं काढलसं? जरा लक्ष देउन काढलसं तर तुलाही तसंच काढता येइल पण तुझं ध्यान आजूबाजूलाच" अशी दुषणं देण्यापेक्षा हा आनंद जपता आला पाहिजे. त्यातूनच मूल आनंदाने स्वत:मध्ये सुधारणा करत जाईल. स्पर्धा, त्यात छोट्या छोट्या स्तरांवर होणार्‍या लबाड्या याचा अनुभव पुढे येतोच. पण पहिला नंबर किंवा होणारं कौतुक हेच महत्वाचं नाही हे शिकल्याने दुसर्‍याचं वरचढ असणंही अशी मुलं सहज स्वीकारतात आणि नंबर मिळाला तरी दुसर्‍याला कमी मानणं बरोबर नसतं हे ही. आजकाल व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेतृत्वगुण शिकणे असं समीकरणच झालंय आणि त्याचा अर्थ म्हणजे येन केन प्रकारेण आपलंच बरोबर हे दाखवणं. प्रामाणिक सहकारी होणं, दुसर्‍यांच्या गुणांबद्द्ल आदर असणं ही तेवढच महत्वाचं असतं.
आपण या जगाचा, समाजाचा एक भाग आहोत. सर्वांना लागू आहेत ते नियम आपल्यालाही लागू आहेत. हे मुलांपर्यंत पोचवणं महत्वाचं आहे, पण हे होताना दिसत नाही. मग हीच मुलं मोठी झाल्यावर ह्या शिकवणीचा प्रयोग पालकांवर करतात. आणि मग पालक, त्यांची संभावना हल्लीची पिढी बिघडलेली, माज असलेली, उद्धट अशी करतात. आपले गुण जरूर वाढवावेत पण दुसर्‍यांच्या गुणांनाही वाव द्यावा, वाहवा द्यावी हे केव्हा शिकवणार मुलांना? ती आपल्या दृष्टीनं कायम लहानच रहाणार आहेत. हल्लीची पिढी एकलकोंडी आहे असं म्हणत आपण याचा दोष फेसबुक,वॉट्सअ‍ॅप वगैरेवर टाकतो पण संवादात फक्त "मी" च असेल तर तो संवाद नसतो याची जाणीव न करून देउन खरी सुरुवात आपणच केलेली असते हे विसरतो.

प्रतिक्रिया

मितान's picture

8 Mar 2015 - 2:28 pm | मितान

लेख आवडला. पटला देखील :)

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 12:01 am | मधुरा देशपांडे

+१

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:54 pm | सविता००१

आवडला.

लेख फार आवडला.
हल्लीची पिढी एकलकोंडी आहे असं म्हणत आपण याचा दोष फेसबुक,वॉट्सअ‍ॅप वगैरेवर टाकतो पण संवादात फक्त "मी" च असेल तर तो संवाद नसतो याची जाणीव न करून देउन खरी सुरुवात आपणच केलेली असते हे विसरतो. +१००. आमच्या वेळी असे पालक होते पण कमी संख्येने. त्यांच्या पाल्यांची आजची अवस्था विशेष चांगली नाही. आता तर असे वागणे सगळीकडे बहुसंख्येने दिसते. काळजी वाटण्यासारखेच आहे हे वर्तमानातलं पालक-बालक विश्व. :(

छान लेख! संवादाच्या अभावाने तुटलेले एक घर पाहाण्यात आहे.त्यामुळे अगदी पटला लेख.

आदूबाळ's picture

9 Mar 2015 - 8:25 pm | आदूबाळ

फार छान लेख! आवडला.

आपणच जगाच्या केंद्रबिंदूवर आहोत, आणि हम जहाँ खडे होते है जग वहींसे शुरू होता है असा बाणा असलेला एक परिवार नात्यात आहे. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येत होती!

मिहिर's picture

9 Mar 2015 - 9:34 pm | मिहिर

लेख आवडला, पटला. छान लिहिलेय.

प्रियाजी's picture

9 Mar 2015 - 9:42 pm | प्रियाजी

लेख खूप्च आवडला अन पटलाही. कालाय तस्मै नम:

प्रियाजी's picture

10 Mar 2015 - 12:28 pm | प्रियाजी

हे वर्तणूकीचे नियम शिकवतानाच एकंदर शिस्त ही लावणे जरूर झाले पाहिजे. ज्यासाठी घरातील सर्वांचा एक विचार हवा.

इशा१२३'s picture

10 Mar 2015 - 8:52 am | इशा१२३

छान जमलाय लेख..

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2015 - 8:57 am | प्रीत-मोहर

मस्त झालाय लेख. एकदम पटल.

स्नेहल महेश's picture

10 Mar 2015 - 11:06 am | स्नेहल महेश

लेख आवडला.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

10 Mar 2015 - 8:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लेख आवडला.पटलाही.ी

जुइ's picture

10 Mar 2015 - 10:07 pm | जुइ

खूप छान विश्लेषण.

रुपी's picture

11 Mar 2015 - 6:13 am | रुपी

लेख छान आहे. आवडला.
मुलांना वाढवताना त्यांना आत्मकेंद्री बनू न देणे फार महत्त्वाचे आहे.

स्पंदना's picture

12 Mar 2015 - 4:57 am | स्पंदना

एक वेगळा आवश्यक पैलू पुढे आणलात अंतरा!!
मनापासून धन्यवाद तुम्हाला या बद्द्ल. संयम आणि शिस्त या गोष्टी अगदी लहाणपणापासून शिकवल्या तर मोठेपणी मुले आपल्याआपणच स्विकारार्ह बनतात. जुळवुन घ्यायला शिकतात.

ऋषिकेश's picture

12 Mar 2015 - 11:39 am | ऋषिकेश

नेमके वर्मावर बोट ठेवणारे म्हणून 'वार्मिक' ;) लेखन आहे.
आभार!

विचार करायला लावणारा लेख!

+1खरेच असेच वाटले ..अगदी छान लेख !!

अंतरा आनंद's picture

12 Mar 2015 - 4:24 pm | अंतरा आनंद

सगळ्यांना धन्यवाद.

कौशी's picture

13 Mar 2015 - 5:28 am | कौशी

विचार करायला लावणारा लेख आवडला.

स्मिता श्रीपाद's picture

13 Mar 2015 - 5:48 pm | स्मिता श्रीपाद

खुप छान लेख....प

सानिकास्वप्निल's picture

13 Mar 2015 - 8:32 pm | सानिकास्वप्निल

लेख छानचं आहे, आवडला.

चैत्रबन's picture

14 Mar 2015 - 3:12 am | चैत्रबन

लेख पटला..

कविता१९७८'s picture

14 Mar 2015 - 11:39 am | कविता१९७८

लेख आवडला, नकळत आपल्या हातुनसुद्धा बर्‍याचदा अशा चुका घडतात.

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2015 - 2:59 am | श्रीरंग_जोशी

समर्पक उदाहरणे देऊन परिणामकारकपणे मुद्दा मांडला आहे.

वयाच्या आठव्या नवव्या वर्षी माझे स्वतःचे वागणे बरेचदा असेच असायचे. त्याबद्दल अजुनही वाईट वाटते.

Jyoti Deshpande's picture

17 Mar 2015 - 1:34 pm | Jyoti Deshpande

KHUP CAHN LEKH....
KUTHETARI ASHA CHUKA AAPANHI KARATO KA, HE SWATAH PRAMANIKAPANE BAGHAYALA LAVNARA LEKH.
THANK U.

छान झालाय लेख. खरच विचार केला पाहिजे पालकांनी.

लेख फार आवडला. इतका छान लेख नजरेतून इतक्या वेळ कसा सुटला कोण जाणे. तुम्ही अगदी नेमकेपणाने जणू आपलया समाजमनाबद्दलच भाष्य केलंय. मी अनेकदा पाहिलंय की भारतीय सिंपथेटिक असतात पण एंपथेटिक फार कमी वेळा असतात. त्याचं कारण असंच दैनंदिन व्यवहारातून जोपासलं जातं.

पिशी अबोली's picture

25 Mar 2015 - 1:40 pm | पिशी अबोली

छान लेख. माझ्या सोबतच्या मैत्रिणी अशा 'मी महत्वाची' विचारांच्या दिसायच्या तेव्हा खूप त्रास व्हायचा. अर्थात, माझे स्वतःचे दोष मला कळत नसतील, पण तरी काही लोकांच्याबाबतीत हे फार प्रकर्षाने जाणवायचं..

मला लहान मुलांशी दंगामस्ती करायला फार आवडतं, पण सलगी करायची फार भीती वाटते. इतकी भीती वाटते, की अगदी छान ओळख झाली, आई-वडील अति काळजी घेणारे नाहीत याची खात्री पटली, की मगच लहान मुलांशी बोलणं जमतं..