लखलख चंदेरी

आनन्दिता's picture
आनन्दिता in विशेष
8 Mar 2015 - 2:03 am
महिला दिन

माझ्या आठवणीतल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या हे मी आणि माझी छोटी भावंड यांचं मिळून एक गुळपीठ आहे. आम्ही तिघी बहिणी. मोठी बहिण माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी, छोटी बहिण अंकिता माझ्याहून दोन वर्षांनी लहान. दीदीच्या आणि आमच्या वयात बरंच अंतर, त्यामुळे आम्ही खेळत्या वयाचे होई पर्यंत तिचं अभ्यासाचं वय सुरु झालं होतं. तिचं विश्व आमच्या पेक्षा वेगळं होतं. ती आमच्यात खेळायला वगैरे कधी नसे. शिवाय तिला खेळण्यापेक्षा स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात पहिले येणे, निबंध, भाषण स्पर्धात दणकुन यश मिळवणे, मोत्यासारखं सुंदर अक्षर काढणं अशा अघोरी गोष्टी करायला आवडे. याच्या अगदी उलट मी आणि अंकिता.!! आमच्या कंपूतले अजून दोन मेंबर म्हणजे माझी चुलत भावंडं वसुधा आणि विनेश!! वसु आणि अंकिता अगदी एका वयाच्या, विनेश घरातलं शेंडेफळ!! आम्ही एकमेकांचे चुलत + मावस भावंड असल्याने आमच्यात एक आजोळ, एक गाव, एकाच मामेमंडळी असे अनेक समान धागे होते. आमच्या दिसण्या वागण्यात ही बरंच साम्य.

उन्हाळ्याची सुट्टी ला मावशी या दोघांना घेऊन आमच्याकडे यायची. ही वसु म्हणजे अगदी एक कटकट प्रकार होता. प्रचंड म्याळ, रडूबाई !! उठल्या उठल्या कारण नसताना भोकाड पसरून बराच वेळ रडणे आणि मगच दिवसाची सुरुवात करणे हा तिने स्वत:ला लावलेला नियम ! या व अशा अनेक सदगुणांमुळे ती नेहमीच आमच्या हिटलिस्ट वर असे. तिला बोलताना आम्ही फार कमी वेळा ऐकलं होतं. म्हणजे तिला बोलता यायचं पण शब्द पुरवून पुरवून वापरायला ती तेव्हापासूनच शिकली होती. ती फक्त तिच्या आईच्या कानातच बोलायची. सतत मावशीचा पदर धरून फिरायची. पण तिचं आमच्याकडे बारीक लक्ष असायच. आम्ही कुठे बाहेर पडायला लागलो कि लगेच रडून मागे लागायची. आम्हाला तिला कधीच सोबत न्यायला आवडायचं नाही. कारणं अनेक, एक म्हणजे धावणं सोडा पण धड पटापट चालायची पण नाही, तिथे येऊन पण खेळायची तर नाहीच, वरुन तिला वाटलं कि भोकाड पसरून घरी जाण्यासाठी रडायची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे बाहेरचे सगळेच उद्योग काही घरी सांगण्यासारखे नसत ! इतरवेळी हिच्या तोंडातून शब्द बाहेर येणार नाही पण अशावेळी आईबाबांसमोर पोपटासारखी बोलायची. आमच्यात नेहमी कोल्डवॉर चालू असायचं. ती एकटी कधी तावडीत सापडतेय याची आम्ही वाटच पाहत असायचो.

तिला एक छंद होता, अंगणातल्या जास्वंदाची फुल पडतील तशी गोळा करायची आणि आईला नेऊन द्यायची, तेवढाच वेळ ती आईपासून लांब यायची. मग आम्ही काय करायचो, मुद्दाम फुल तोडून खाली टाकायचो आणि भिंतीशी दबा धरून बसायचो,ती फुल न्यायला आली की धरून धपकावायचो ! खरतर तिला मारायची पण गरज पडायची नाही, नुसतं अंगावर धावून गेलं तरी ती अर्धा तास रडण्याची निश्चिंती असायची. :)

आई आणि मावशी आमच्या या त्रासाला वैतागलेल्या असायच्या. एकदा आम्ही उन्हाचं बाहेर खेळू नये म्हणून आम्हाला आमच्या मित्रपरिवारासह घरातच कोंडून दोघी बाहेर कुठेतरी गेल्या होत्या. वसु बाई दुपारची झोप घेत होत्या, आईने आम्हाला तिला व्यवस्थित सांभाळायची तंबी दिली होती. त्या गेल्यावर आम्ही घरातल्या घरातच पकडापकडी खेळायला लागलो. खेळता खेळता मी कपाटावर चढले, आणि दाण्णकन उडी मारली ही उडी वसु पासून चांगले दिड दोन फुट लांब पडली होती. पण त्या आवाजाने ती दचकुन उठली. तसं बघायला गेलं तर तिला रडायचं काही कारण नव्हतं पण नाही, हिने जो खच्चून भोंगा पसरला की बस्स !! आता जर आई परतली तर काही खरं नाही या विचाराने माझी बोबडी वळली. तिला हरप्रकारे समजावून झालं, सगळ्यांनी नाचून दाखवलं, गाऊन दाखवलं, पण उपयोग नाही, फ्रिजमधलं आईसक्रीम काढून दिल्यावर तिने ते मटकावले आणि परत नव्या दमाने रडायला सुरुवात केली. आई मावशी परत आल्यावर माझी चांगलीच कंबख्ती भरली.

इतकं सगळं असूनही सुट्टी संपवून ते सगळे परत जाताना आम्हाला रडू यायचं, जाताना वसू सुद्धा जवळ येऊन आमची पापी घेत असे. ते गेल्यावर करमायचं नाही, वाटायचं उगीच भांडलो. पुढे जरा मोठी झाल्यावर वसु पण बरीच माणसात आली. ती साधारण दुसरी तिसरीत असताना तिची परिक्षा संपल्या संपल्या एकटीच आमच्या कडे हजर व्हायची, मावशी विनेश बरोबर मागाहून येत असे. तोपर्यंत वसु, महिनाभर निवांत आमच्या सोबत रहायची, आमच्यातलं वैर एव्हाना संपलं होतं. आणि झकास मैत्रीही जमली होती. ती आई-वडिलां शिवाय कशी छान राहते याचं बरंच कोडकौतुक व्हायचं. त्याबाबतीत मात्र आम्ही याबाबतीत फार मागे. तिच्यासारखं आपलंही कौतुक व्हावं आणि दूर गेल्यावर आपली किंमत कळून आई-बाबांना त्यांच्या चुका समजाव्यात, :) म्हणून आम्ही पण एकदोनदा मोठ्या मावशीकडे ,आत्याकडे एकटे रहायला गेलो, आणि दुसर्‍याच दिवशी घरची आठवण काढून भोकाड पसरल्यामुळे लगोलग घरी आणून सोडण्यात आले.

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर उंच उंच झुलणारा झोपाळा दिसतो. सुट्टीचं आणि झोपाळ्याचं नातंच तितकं घट्ट आहे. परिक्षा संपताच माळ्यावरून ज्या काही वस्तू खाली येत त्यात एक मजबूत दोरखंड पण असायचा. शेवटचा पेपर कसाबसा लिहून आम्ही जवळपास धापा टाकतच घरी पोहचायचो. आमची लगबग पाहून आई हसायची.बाबा आमचं 'सुट्टीचं खोकं ' खाली काढत, आणि आमच्या आनंदाला उधाण यायचं. त्यात असायचं कॅरम बोर्ड, त्याच्या सुंदर सुंदर सोंगट्या, बुद्धिबळाचा पट, त्याची चतुरंगी सेना,पत्त्याचे सेट्स, सापशिडी, गोष्टींची पुस्तकं, चित्रकलेची पुस्तकं, रंग, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे झोपाळ्याचा दोर!!! आमच्या घराला खूप मोठा सोपा होता, त्याच्या तुळईला झोपाळा बांधला जायचा. त्यावर उशी टाकुन झोक्याचा खेळ सुरु व्हायचा. एकानं बसायचं, दुसर्‍याने झोका द्यायचा आणि तिसरीने मोजायचे. झोके घेऊन घेऊन गरगरायला लागे पर्यंत हे असं चालणार.शेवटी आई दामटवून झोपाळा बंद करायला लावायची.

दिवसभर अख्ख्या गावभर उंडारत फिरायचो, आमच्यात राहून राहून वसू पण आमच्या सारखीच झाली होती, आता ती चुगल्या पण करत नसे. गावाभरातल्या सर्व आंब्यांचे पाड ढापणे, आंब्याचे मालक आले की धूम पळणे, मिळालेल्या पाडांच्या अढी घालणे, बाकीच्या दोस्तांच्या अढी त्यांच्या नकळत हडप करणे, आणि आपल्या अढ्या प्राणापलीकडे जपणे हे आमचं आवडतं काम. तसं बघायला गेलं आमचं घर हे गावातलं एक पांढरपेशी आणि आदरणीय घर, त्यामुळे आंबे ढापताना जरी मालकांना सापडलो तरी ते बिचारे बाबांना सांगायला येत नसत. तरी एकदा बाबांना हे सगळं कळालच. भरपूर मार मिळाला. नंतर बाबा खास कोकणात जाऊन आमच्या साठी आंबे आणत. पण "स्वकष्टाच्या" आंब्यांइतकी चव त्याला यायची नाही. आम्ही एकदा बाबांना हे ही समजवायचा पण प्रयत्न केला की, तशा अढ्या घालून आम्ही त्यांचे आंब्यासाठीचे पैसेच वाचवत होतो. नंतर काय झाले ते आता सांगत बसत नाही.

बाबांचे पैसे वाचावे हे आमच्या नेहमी डोक्यात असे. त्यासाठी एकदा आम्ही तिघींनी एकमेकींचे केस घरच्या घरी कापले होते. पण आई तिथे आली आणि का माहिती का आम्हाला पाहून जोरात किंचाळली. आणि एवढं करून ही त्यांनी न्हाव्याला बोलावून आमचे केस परत कापले, अन यावेळी जरा जास्तच बारीक!!

आम्ही एक चिठ्ठ्यांचा एक खेळ पण खेळत असु. त्याचे नियम आता निटसे आठवत नाहीत पण त्यात राजा, राणी, गुलाम, चोर असं लिहिलेल्या चिठ्ठ्या असत. घड्या घालून त्या चिठ्ठ्या टाकल्या की प्रत्येकाने पटकन एकेक चिठ्ठी उचलायची. राजाला १०० गुण, राणीला ७०, गुलामाला ५० आणि चोराला शुन्य असे गुण मिळत. कोणीतरी एकजण त्या मिळालेल्या गुणांचा तक्ता मांडे, खेळाच्या शेवटी प्रत्येकाला मिळालेल्या गुणांची बेरीज होऊन ज्याला सर्वात जास्त गुण तो राजा ते सगळ्यात कमी गुण वाला चोर व्हायचा. पुढे-पुढे आम्ही या खेळाचं मराठी चित्रपट सृष्टी वर्जन तयार केलं, म्हणजे त्या ट्रेडिशनल राजा राणी आणि कंपनी ला डच्चू देवून त्याऐवजी तात्याविंचु, रेडेआण्णा, अंबु, आवडा, कवट्या महाकाळ, इन्स्पेक्टर महेश जाधव वगैरे मंडळींना पाचारण केलं होतं, त्यामुळे व्हायचं असं की हव्या तितक्या लोकांना खेळता यायचं, आणि प्रत्येक वेळेला चिठ्ठया पडल्यावर गडबडा लोळेपर्यंत हसता यायचं. ज्याला जी चिठठी सर्वात जास्त वेळा आली त्याला तो किताब मिळायचा. मात्र जो कोणी रेडेआण्णा किंवा 'अंबू' व्हायचा त्याची भयंकर चेष्टा व्हायची. एकदा याच खेळात माझ्या छोटया भावाला इतक्यांदा 'अंबू' ची चिठठी आली की त्याने शेवटी चिडून भोंगाच पसरला. आणि आमची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली. आता तो एअरफोर्स मध्ये आहे पण अजूनही 'अंबू' चा पिक्चर लागला कि आम्ही हळूच त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसतो.

संध्याकाळची जेवणं झाली रे झाली की आम्ही चटया घेऊन अंगणात धावायचो. उकाड्याची काहिली घरात खूप जाणवायची, अंगणात त्यामानाने खूप बरं वाटायचं. आमचं ते गाव म्हणजे दोन मंदिरांना सरळ रेषेत जोडणारा एक रुंद रस्ता व त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा… कुठही गल्ली नाही कि बोळ नाही, तिथल्या माणसासारखंच ' साधं आणि सरळ ' !!! तो रस्ताच हेच प्रत्येक घराचं अंगणसुद्धा, त्यामुळे हा रस्ता अतिशय स्वच्छ आणि फुलाझाडांनी सजलेला होता.

आमच्या अंगणात मोगऱ्याचा एक अगदी फोफावलेला वेल होता. त्याला व्यवस्थित बांधुन माडीच्या सज्जावर चढवण्यात आलं होतं, उन्हाळ्यात तो मोगरा शेकडो फुलांनी लगडून जायचा. आम्ही चटया टाकून चांदण्यांकडे बघत बसायचो. कधी गाण्यांच्या भेंड्या, खेळल्या जायच्या,पत्त्यांचा डाव पडायचा. बर्‍याचदा मोठी माणसंसुद्धा बाबांशी गप्पा मारायला जमायची. मग धम्माल गप्पांचा फड रंगायचा, कॉंग्रेस विरुद्ध भाजपा अशा तुंबळ चर्चा झडायच्या, त्यातलं आम्हाला काही म्हणता काही कळायचं नाही पण ऐकायला फार भारी वाटायचं. अशी हालचाल जवळजवळ प्रत्येक अंगणात असे. कामंधामं आवरून घरातल्या बायका सुद्धा आपल्या अंगणात वाऱ्याला बसायच्या, त्यांच्या गप्पा पण ऐकण्यासारख्या असायच्या. आम्ही अगदी कान टवकारून त्यांचं हळू आवाजातलं बोलणं ऐकायचो. त्यामुळे गावातल्या ज्या गोष्टी आईलाही माहित नाहीत त्या माहितीचा साठा आमच्याकडे असायचा.नको ती माहिती नको तिथे आणि नको त्या माणसांसमोर दिल्यामुळे आम्ही बऱ्याचदा धम्मकलाडू सुद्धा पचवलेत ही गोष्ट वेगळी!!

गप्पा आणि माणसांचा पूर ओसरल्यावर आम्ही त्या चटयांवरच कलंडायचो. शेजारचा मोगरा सुगंधाची बरसात करतअसायचा. आकाशातले अगणित तारे आणि वेला वरची असंख्य पांढरीशुभ्र फुलं यात खूप खूप साम्य वाटायचं.या चांदण्या रात्रींनी आमचं आयुष्य किती समृद्ध केलंय हे आता समजतंय. बाबांनी आमच्या केसांत हात फिरवत चांदण्यांच्या किती तरी गोष्टी सांगितल्या असतील. हा ध्रुवतारा, हे सप्तर्षी, हे मृग नक्षत्र, आकाशगंगा !!. त्या गोष्टी ऐकत ऐकतच डोळे मिटले जायचे, पण मग स्वप्नं सुद्धा चांदण्यांचीच पडत. कधी त्या माझ्या भोवती फेर धरत, कधी आम्ही ढगांसोबत लपाछपी खेळत असु. कधी त्या चांदण्या तळहातावरसुद्धा विसावत. आई बाबा शिवचरित्र, रामायण, महाभारताची पुस्तकं तिथेच वाचुन दाखवत, मग चांदण्यांच्या खेळात कर्ण, अर्जुन, भीम सुद्धा !
रोजच्या रोज त्या ताऱ्यांकडे बघतच आमचा दिवस संपायचा. आम्ही तर आकाशातल्या चांदण्या ही आपआपसात वाटून घेतल्या होत्या. ही माझी ही तुझी म्हणून. !!!

शेजारी सुगंधाचा वर्षाव करणारा मोगरा, आणि सौंदर्याचं, अथांगाचं प्रतिक असणारी ती लखलखती दुनिया…. असे श्रीमंत क्षण आम्ही कितीतरी वेळा अनुभवलेत. चांदण्या रोज वेगवेगळ्या दिसतात यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे. त्यांनी बदलेल्या जागा, चंद्राच्या कला, त्याच्यावरचे ससुले, त्यांच्या सावल्या, असंख्य उल्कापात.. काय काय पाहिलंय आम्ही. 'चांदोबा गुरुजींची शाळा' खरच आकाशात कुठेतरी भरत असणार याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे चांदोबा ला 'मामा' पेक्षा आमच्या गुरुजींच्या सारखी ,पांढरी शुभ्र गांधी टोपी घातलेलंच डोळ्यापुढं यायचं. दिवसभर कानात वारं भरल्यासारखे हुंदडून दमलेली आम्ही भावंडं एकमेकांच्या अंगावर मायेचे हात टाकून झोपी जायचो, अंगावर चमचमत्या चांदण्याचं पांघरूण घेऊन!!! आई-बाबा उशिरा कधीतरी उचलुन घरात नेत असतील ते समजायचं ही नाही.

आता मुद्दाम वेळ काढून चांदण्याकडे पहिल्याला कित्तेक वर्षे झालीत. आजकाल त्या चांदण्याही तेव्हा सारख्या आकाशात सुस्पष्ट, ठसठशीत दिसतही नाहीत. पण त्यांच्याशी जडलेलं नातं मात्र तस्सच आहे. त्यांच्याकडे पाहताना तेव्हा श्वासात मुरलेला मोगऱ्याचा वास आजही आजूबाजूला पसरल्या सारखा भास होतो. इतक्या गर्दीतूनही मला प्रत्येकाच्या चांदण्या आजही ओळखू येतात.त्या होत्या तशाच आहेत अजून !! प्रत्यक्षात चंद्रताऱ्यांवर हक्क सांगण्याची तेव्हाची जिद्द आठवून हळुच हसू येत. आजही बालपण म्हटलं की मला चमचम करणारी देखणी ताऱ्यांची दुनियाच दिसते. जोपर्यंत ते तारे त्या आकाशात आहेत तोवर आपल्या बालपणाची सय कोणीही हिरावू शकणार नाही ही भावना खूप सुखद आहे.

.
(चित्र आंतरजालावरून साभार)

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 4:01 pm | सविता००१

अप्रतिम लिहिलं आहेस. सगळे खेळ आताही जसेच्यातसे आठवून दिलेस. काय छान लिहिलं आहेस तू... मला वाटतं इथल्या प्रत्येकानेच हे उद्योग लहानपणी केलेलेह असतील. पण इतकं ओघवतं आणि सुरेख लिहिलंयस की बस्स.
ते एकमेकींचे केस कापून धम्मकलाडू पचवलेली,
सविता

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 5:00 pm | आयुर्हित

छान, लेख आवडला.
त्याला कारण आहे खूप सहज सुंदर ओघवती शैली!

काय सुंदर लिहिलयेस. तुझ्या गावातली साधी आणि सरळ नसलेली एक व्यक्ती मला माहिती आहे बरं का :P

आणि तू म्हणतीयेस ते अगदी खरं आहे. अशा भावंडांबरोबर हसत खेळत, कुठलेही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस न करता सुद्धा सम्रुद्ध आणि मानसिकरित्या सुरक्षित बालपण मी पण अनुभवलंय. आणि फक्त यासाठीच मला भारतात परत जायचंच आहे. छान आठवणी जाग्या झाल्या तुझ्यामुळे आज.

नावाप्रमणेच झगमगत्या दिवसातला सुरेख लडिवाळ लेख.बोट धरुन लहानपणातल्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात घेऊन गेलीस अगदी.सुंदर लेख आणि चित्रही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम ओघवत्या भाषेने एकदम आजोळात नेले !

हे असं बालपण असेल तर त्यातुन बाहेर पडणारं प्रौढ व्यक्तीमत्वसुद्धा तसच झळझळीत असणार गो अनंदिता,
अशीच रहा सोन्या!!

फार सुंदर आठवणी ताज्या झाल्या तुझ्या लेखामुळे.छान ओघवते वर्णन.आजोळी आणि काकुकडे गेल्यावर गच्चीत चांदण्यामोजत रात्र रात्र खळ्लेले पत्ते,भरपुर चुलत्,आते,मावस भावंडांबरोबर केलेली सुट्टीतली मज्जा सगळ आठवल.

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 4:11 pm | स्नेहल महेश

बालपणीच्या सगळ्या आठवणी अगदी ताज्या झाल्या तुझ्या लेखामुळे …………खरच खूप छान होते ते दिवस …… परत कधीही न येणारे ………………सुट्टीतली सगळी मज्जा आंबे , काजू सगळ आठवल.

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 5:33 pm | मधुरा देशपांडे

वरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर ओघवते लिखाण.

मितान's picture

10 Mar 2015 - 10:31 am | मितान

खूप नॉस्टॅल्जिक वाटतंय !!!

अंगणात निंबोणीच्या झाडाखाली सतरंजीवर पडून चांदण्यांचं गारूड अनेक वर्षं अनुभवलं आहे.
दिल ढूंढता है फिर वही...फुरसत के रात दिन.... :)

पिशी अबोली's picture

10 Mar 2015 - 11:12 am | पिशी अबोली

आनंदिता... यू रॉक...
हा लेख पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचणार आहे. :)

पियुशा's picture

10 Mar 2015 - 2:33 pm | पियुशा

तिचं विश्व आमच्या पेक्षा वेगळं होतं. ती आमच्यात खेळायला वगैरे कधी नसे. शिवाय तिला खेळण्यापेक्षा स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात पहिले येणे, निबंध, भाषण स्पर्धात दणकुन यश मिळवणे, मोत्यासारखं सुंदर अक्षर काढणं अशा अघोरी गोष्टी करायला आवडे
वाक्या वाक्याशी सहमत न टाळ्या :)

स्वाती दिनेश's picture

10 Mar 2015 - 3:35 pm | स्वाती दिनेश

वाचताना एकदम लहान झाले, टाइममशिनने अनेक वर्ष मागे गेले.
स्वाती

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:19 pm | सस्नेह

प्रत्येकाच्या बालपणीची आठवण देणारा...

जुइ's picture

10 Mar 2015 - 7:55 pm | जुइ

खुप छान लिहिले आहेस!! उन्हाळ्याच्या सुटीची मजा आठवत आहे ;)

कविता१९७८'s picture

11 Mar 2015 - 6:16 am | कविता१९७८

मस्त लेखन

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 4:02 pm | सानिकास्वप्निल

किती सुरेख लिहिले आहेस, अगदी बालपणात रमले हे वाचत असताना सगळे कसे लख्खक्न आठवले :)

मस्तं लेखन.

स्वतःचे, भावंडांचे केस कापणे हा आपल्या लहानपणचा सर्वसंमत बालोद्योग होता का काय?
फार फार छान लिहिलंयस! असेच अरभाट प्रकार करत घालवलेल्या उन्हाळी सुट्ट्या आठवल्या!

काय सुंदर लिहिलं आहे! थोड्या-अधिक प्रमाणात यातल्या आठवणी सगळ्यांशीच मिळत्याजुळत्या असतात. पण प्रत्येकजण त्याला इतकं छान शब्दबद्ध नाही करु शकत..

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2015 - 2:03 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम लिहीलं आहेस गं!!!
मला शीर्षक फार आवडलं..!

हा आणि अजून २-३ लेखांवरून नजर फिरवली होती ,कारण अगदी निवांत वाचायचे होते ...आता वाचला खरेच बालपणात घेऊन गेल्याबद्दल खूप आभार !!

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2015 - 10:04 pm | प्रीत-मोहर

आमच्याकडे ना वस्त्रहरण हा प्रकार पण व्हायचा. आम्ही दुसरी तिसरीत असताना , माझी ३ वर्ष मोठी मावसबहिण आज्जीच कापड नेसायची, आणि आज्जीला तेच नेसूला हव असे. आणि ही बया तर देतच नाही. मग माउची म्हणजे आमच्या धाकट्या मावशीची तिच कापड फेडुन आणायच्या कामगिरीवर नियुक्ती होत असे. कृष्णाची भुमिका माझ्या वाट्याला. आणि मग बर्‍याच पळापळी वगैरे नंतर दु:शासन कृष्ण आणि द्रौपदीला छडी चा प्रसाद देउन कापड नेत असे.

बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 4:05 am | उमा @ मिपा

किती छान लिहिलंयस!
बालपण म्हटलं की माझं तोंड कडू होतं. पण आता तुझ्या या आठवणी वाचून मन गोड झालं.

खुप सुंदर लिहले आहेस. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या गावाला जायचो. सगळे आत्ते भाउ, बहिण एकत्र. खुप मजा यायची. काका बैलगाडीत बसवुन शेतात घेउन जायचे,. तिथे मग कैर्‍या आणि आंबे झाडावरुन पाडुन खायचे. बाजुला वाहणार्‍या ओढ्यात मस्त डुंबायचो. मग दुपारी काकी जेवण घेउन यायची. त्या भाकरी आणि वांग्याच्या भाजीची चव परत कधीच आली नाही. खुप मस्त दिवस होते ते. पण जसे जसे मोथे झालो, तसे हळुहळु सगळे आपापल्या कामात बिझी झाले आणि आमची उन्हाळी सुट्टी सुद्द्धा बंद झाली. :(
पण मजा आली ते दिवस आठवुन. :)

पैसा's picture

24 Mar 2015 - 10:43 am | पैसा

कं लिवलंय! जबरदस्त!

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2015 - 2:23 am | श्रीरंग_जोशी

सुंदर मांडलय बालपणीचं भावविश्व. चित्राची निवडही खासंच.

हिवाळ्यात बोरं अन उन्हाळ्यांत कैर्‍या पाडायचे दिवस आठवले.

आमच्या बालपणीच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी अशाच घालवलेल्या आहेत. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . खूप
छान वर्णन . चांदण्या रात्रीचे घराबाहेर झोपणे आता नाही .

अगदी गं अगदी! मस्त लिहिलयस. कित्तीतरी आठवणी आल्या. हे सगळे उद्योग आम्हीही केले. पडणे, धडपडणे मार देणे, खाणे............कितीतरी गोष्टी! एकदा घरात आणून ठेवलेली मोठी गुळाची ढेप फोडून डब्यात भरायला झाले नाही तर आम्ही आते, मावस, चुलत भावंडांनी रोज थोडी कुरतडून संपवली त्या सुट्टीत! काय अचरटपणा होता तो!

एस's picture

12 Apr 2015 - 9:13 pm | एस

तुझ्या लेखाचं बोट धरून त्या स्वप्निल दिवसांत फिरून आलो बघ. व्यक्तिशः मला माझं बालपण आता पुन्हा आठवायला नकोसं वाटतं. लहानपणी मला फक्त एकच ध्यास होता - लवकरात लवकर मोठे होण्याचा. व्यवहारातील कुचंबणेच्या गोष्टी वयाच्या मानानं फार लवकर समजायला लागल्याचा एक मोठा तोटा असतो, आपली निरागसता संपून जाते. आपण जे करतो त्यातलं काय चूक, काय बरोबर ह्याचा निर्णय घेण्याचं आणि त्यावर ठाम राहता येण्याचं सामर्थ्य त्या काळात जवळपास गमावून बसल्याने नंतर मोठेपणी तो आत्मविश्वास मिळवायला बराच संघर्ष करावा लागला. बालपण देगा देवा असं जरी तुकोबांनी म्हटलं असलं तरी मी ते म्हणणार नाही. पुनश्च त्या अंधारलेल्या पायवाटेवर ठेचकाळणं अजिबात नको.

गुलशन के हर फूल एक जैसे होते नहीं
मगर हर गुल का अपना वजूद जरूर होता है!

सतिश गावडे's picture

25 Apr 2015 - 8:31 pm | सतिश गावडे

सुंदर !!!