गुपित

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 9:12 pm

गुपित

माझं नाव चिंटू, खरं नाव चिंतामणी, म्हणजे गणपतीबाप्पाचे नाव. हे मला आईनेच सांगितले. चिंतामणी नाव मला आवडायचे पण मला सगळे ‘चिंटू’च म्हणायचे. आई मात्र मला प्रेमाने ‘मणी’ म्हणायची, आणि तेच नाव मला सर्वात जास्त आवडायचे. मणी हे नाव, फक्त आई-बाबांनाच माहित होते, बाहेर कुठेही, माझ्या फ्रेंड्स समोरदेखील आई मला ‘मणी’ म्हणायची नाही, ते आमचे खास असे गुपित होते. पण तुम्ही हे कुणाला सांगू नका हं. एकदा मात्र ह्या नव्या शाळेत गम्मतच झाली. वर्गात टीचर हजेरी घेत होत्या, अचानक त्यांनी ‘मणी’ म्हणून नाव घेतले आणि मी लगेच उभा राहून ‘यस मॅम’ म्हंटले. तेव्हढ्यात श्रीनिवास मणी देखील ‘यस मॅम’ म्हणत उभा राहिला आणि सर्व वर्ग हसू लागला. मी एकदम लाजलो, पण टीचर चांगल्या होत्या त्यांनी मला ‘जोशी' म्हंटल्यावर ‘यस मॅम’ म्हणायला सांगितले. बरं झालं कोणी आणखी काही विचारले नाही ते, नाहीतर “आई मला प्रेमाने मणी म्हणते" असे सांगावे लागले असते आणि मुलांनी माझी मजा केली असती.

दुसरीपर्यंतची माझी शाळा एकदम मस्त होती. बाबांची बदली झाली आणि आम्ही ह्या शहरात रहायला आलो. ह्या नवीन शाळेतील मुलं मला फारशी आवडत नाहीत, म्हणजे अजून नीट ओळख व्हायची बाकी आहे, तरी देखील नाहीच. माझ्याशी कोणी खेळत नाही, की बोलायला येत. त्यांचा आपापला ग्रुप आहे. माझ्या जुन्या शाळेत कितीतरी मित्र होते आणि मैत्रिणी देखील. मजा यायची त्या जुन्या शाळेत. दुपारच्या सुट्टीत फास्ट फास्ट डबा खाऊन आपण ग्राउंडवर किती खेळायचो, पकडापकडी, साखळी, चोर-पोलीस, दगड का पाणी ? कित्ती कित्ती मजा यायची. शाळेतल्या सगळ्या बाईंना-गुरुजींना आपण किती किती आवडायचो. एकूणएक बाई-गुरुजींना आपले नाव माहित होते. कित्येक वेळा ते आपल्या घरी देखील यायचे. आईकडे माझे कौतुक करायचे. फार मजा वाटत असे आपल्याला. सगळेच आपले लाड करीत, कारण आपण अभ्यासात नेहेमी पुढेच होतो आणि खेळातही. पण ह्या शाळेत मात्र सगळे दूर दूरच असतात. मुलांचे खेळ वेगळे, मुलींचे वेगळे. वर्गातले बेंच देखील वेगवेगळे अगदी मधल्या सुट्टीतला डबा देखील वेग-वेगळाच खातात. आपल्या जुन्या शाळेत आपण सर्वजण आपापले डबे, गोल करून त्याच्यामध्ये ठेवून खात असू. कोणीही कोणत्याही डब्यातले खावे, मध्येच उठून पकडा-पकडी खेळून परत यावे, परत डबा खावा, मजाच असायची. ह्या शाळेत सगळंच विचित्र. मात्र ह्या नव्या शाळेतील एक मजा मी शोधून काढली आहे. शाळेचे ग्राउंड संपल्यासंपल्या तारेच्या कंपाउंड बाहेर एका टोकाला एक छोटासा तलाव आहे. मी मधल्या सुट्टीत लगेच डबा खाऊन ह्या तलावाजवळ येऊन बसतो. तळ्यात खूप मासे, बेडूक, कासव आहेत. आजूबाजूच्या गवतावर फुलपाखरे, चतुर उडत असतात. इतकेच काय मी एक दोन सरडे देखील बघितले तिथे. किती स्थिर बसतो तो, अगदी नीट बघितल्याशिवाय दिसतच नाही. कधीकधी एखादा बगळा देखील उतरतो ह्या पाण्यात आणि मान अचानक पुढे करून मासे खातो. अगदी अस्साच बगळा माझ्या इसापनीतीच्या पुस्तकात दाखवला आहे. हे सर्व बघता बघता सुट्टी कधी संपते ते कळतच नाही. मग बेल ऐकू आली की मी शाळेकडे धूम ठोकतो. बरं झालं अजून कोणी मित्र झाले नाहीत ते, नाहीतर असे तळ्याकाठी येऊन बसायला कोणाला आवडणार ? मला मात्र असं एकटं बसायला फार फार आवडते.

आमचे हे नवीन घर ना खूप मोठ्ठे आहे, जुने पण छान आहे. पुढे अंगण, मागे खूपशी फुलबाग, दोन तीन उंचच उंच झाडे आणि धमाल म्हणजे त्या बागेत एक छोटेसे कारंजे देखील आहे. आम्ही राहायला आलो त्यावेळी ते कारंजे बंद होते, पण बाबांनी ते निट करून घेतले. आता बटन दाबले की त्यातून छानसे कारंजे उडायला लागते, तेच पाणी त्याच्या भांड्यात पडते आणि परत कारंज्यातून उडते. मी शाळेतून आलो की आधी बागेत धावायचो आणि कारंजे चालू करायचो. त्या उडणार्या पाण्यात सूर्याच्या प्रकाशात मग वेगवेगळे रंग दिसायला लागायचे. ते इतके मस्त दिसायचे म्हणून सांगू ! आई खिडकीतून हाक मारेपर्यंत मी घरात जायचोच नाही. आणि आणखी एक गुपित सांगू तुम्हाला ? ह्या कारंज्याखालीच माझा एक नवा फ्रेंड मला भेटला. पहिल्यांदा पाहिला तेव्हा इतका पिटुकला होता ना की अगदी दिसलाच नाही. आणि रंग देखील हिरवा, शेवाळा सारखा. अगदी जवळ गेलो तेव्हा टुणकन उडी मारून गवतात लपला तेव्हा पहिल्यांदा दिसला. गवताआडून माझ्याकडे गोल गोल मोठ्ठ्या डोळ्यांनी बघत होता. मी त्याच्याकडे बघून हसलो, त्याला म्हणालो ये इथे बाहेर, मी तुला काहीही करणार नाही, मी कोणालाच काही करत नाही. आजपासून आपण दोघे मित्र. त्याला आधी माझे बोलणे कळलेच नसावे, म्हणून तो बाहेर यायला तयार नव्हता. मग मी त्याला ‘डराव-डराव’ असे त्याच्या भाषेत बोलून दाखवले त्यावर त्याने उड्या मारून दाखवल्या. तेव्हढ्यात आईने हाक मारली म्हणून मी जायला निघालो आणि तो गवतातून बाहेर आला. उद्या परत येतो सांगून मी घरात आलो, पण रात्री स्वप्नात देखील तो माझ्याशी खेळायला आला, आम्ही खूप खूप खेळलो.

त्यानंतर तर शाळेतून आल्याआल्या दप्तर फेकून मी बागेतच धावत असे. त्या कारंज्याजवळ जाऊन एक दोन वेळा डराव-डराव’ म्हंटले की तो गवतातून बाहेर येई. माझ्याकडे त्याच्या गोल डोळ्यांनी बघत राही, मग मी त्याला दिवसभरातल्या सगळ्या गमती-जमती सांगे. शाळेत काय घडले, टीचर काय म्हणाल्या, आम्हाला कोणता धडा शिकवतात, मी कोणते गोष्टीचे पुस्तक वाचतो आहे वगैरे. मी त्याला एक-दोन इसापनीतीतल्या गोष्टी देखील सांगितल्या. तो माझे सगळे बोलणे मन लावून ऐके आणि मधून मधून काहीतरी बोले. बहुतेक तो त्याच्या गमती-जमती सांगत असावा. त्याच्या घरी कोण कोण आहेत ? त्याला आई-बाबा आहेत की नाही, बहिण-भाऊ आहेत की नाही हे त्याला विचारल्यावर तो काहीच बोलला नाही. कदाचित नसावेत त्याला ते कोणी. नाहीतर इतक्या दिवसात कधीतरी ते दिसले असतेच ना. माझ्या सारखा तो देखील एकटाच होता. मला आई-बाबा तरी होते त्याला ते ही नसावेत. बिचारा. एकटाच राहून तो काय खात असेल, काय पीत असेल, रात्री कोठे झोपत असेल ह्या विचाराने मला वाईट वाटले. शेवटी एक दिवस मी आईला विचारले. त्यावर आई म्हणाली -
“मणी बेटा, निसर्गातले सगळेच प्राणी आपापल्या हिमतीवर जगतात. पिल्ले थोडी मोठी झाली की आईपासून वेगळी होतात, त्यांचे अन्न, पाणी, निवारा तेच शोधतात आणि तशीच मोठी होतात. आपण मानव प्राणी मात्र आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतों. पिल्ले मोठी झाली तरी त्यांना हवे -नको ते बघतो, ते सुखात आहेत ना, हे बघतो. पिल्ले कितीही मोठी झाली, अगदी त्या पिल्लांना पिल्ले झाली ना तरी आपण सगळ्यांची काळजी घेतो, काळजी करत राहतो"

मला हसूच आले, “पिल्लांना पिल्ले झाली तरी” ह्या आईच्या वाक्यावर, मग ती देखील हसली आणि मला जवळ ओढून घेतले. आईच्या उबदार मिठीत शिरताना किती बरे वाटायचे, अगदी कसली म्हणून कसली भीती वाटायची नाही, अगदी भुताची देखील नाही.

“आई, बेडूक काय खातात गं ?” - आईला माझ्या मित्राची माहिती होती त्यामुळे तिला ह्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही.
“बेडूक ना, छोटे कीटक, किडे, मुंग्या, माशा अश्या गोष्टी खातात”
“मी कुठून आणणार ह्या गोष्टी ? त्याला भाताची शिते दिली तर तो खाईल का गं आई ?”
“मला नाही वाटत तो असले काही खाईल म्हणून, तरी एकदा देऊन बघ"

त्यानंतर त्याच्याशी खेळायला जाताना मी एका वाटीत अगदी मऊ अशी थोडी भाताची शिते घेऊन जात असे. त्याच्या पुढे ती शिते टाकल्यावर एकदोनदा त्याने खाऊन बघितली पण त्यापेक्षा शितांवर येणार्या माश्या तो चपळाईने पकडून गट्टम करीत असे. त्याचे ते जेवण बघायला मला फार आवडे. आता त्याला माझी चांगलीच सवय झाली होती, मी गेल्या गेल्या तो स्व:ताहूनच गवतातून बाहेर येई, जणूकाही माझी तो वाटच बघत असावा असे वाटे. एकदा त्याने गुपचूप येऊन माझ्या पोटरीवर मागून उडी मारली, त्याचे ते छोटे छोटे पाय, पातळ कातडी आणि अंगाचा थंड स्पर्श मला गुदगुल्या करून गेला. मी खूपच हसलो आणि त्याला पण मजा वाटली, कारण त्याचा तो नेहेमीचा खेळच झाला. एकदा तर गम्मतच झाली, मी माझा पंजा जमिनीवर त्याच्या समोर ठेवला आणि त्याने चक्क माझ्या तळहातावर उडीच मारली. इतका हलका आणि सुंदर दिसत होता सांगू. तो काहीतरी सांगत होता कारण त्याच्या तोंडाची कातडी हलत होती. त्या ‘जादूच्या छडी'तल्या गोष्टी सारखी आपल्याला देखील पक्षा-प्राण्यांची भाषा आली तर किती मजा येईल ना, असे वाटून गेले. त्यांची भाषा आली नाही तरी फारसा फरक पडत नव्हता, आम्ही रोजच मजा-मजा करीत होतो.

“मणी बेटा, तुझ्या फ्रेंडशी खेळताना जरा जपून हो, चावेल नाहीतर कधीतरी" एकदा आई म्हणाली, त्यावर आपण कित्ती हसलो होतो.
“अगं आई, त्याला दातच नाहीत मुळी. बेडकांना दातच नसतात असे टीचरपण म्हणाल्या. फक्त एक छोटीशी जीभ असते, आणि तिने तो गुदगुल्या करतो माझ्या पायाला” मग कितीतरी वेळ आई आणि आपण हसत होतो.

एक दिवशी मी शाळेतून आलो तर आई झोपली होती. असं कधी होत नसे. माझ्या शाळेतून घरी यायच्या वेळी ती अंगणात येऊन माझी वाट बघत उभी असायची. मी दप्तर टाकून लगेच बागेत जातो म्हणून ती मला हात-पाय धुवायला लावून बळेबळे जेवायला घालायची. मी फारच कंटाळा केला कि अगदी भरवायची सुद्धा. मग मी गोष्टीचा हट्ट करीत असे, मग ती रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगी. मला तिची, ‘वाटाणा, फुटाणा, शेंगदाण्याची’ गोष्ट फार आवडे. मग मी तीच गोष्ट सांगायचा हट्ट करायचो, मग ती प्रेमाने म्हणायची, “मणी बेटा, तू अगदी इतकुस्सा पिल्लू होतास ना तेव्हापासून मी ही गोष्ट तुला सांगते आहे, आता तू तिसरीत जातोस, अजून किती वर्ष ही गोष्ट ऐकणार ?”
“मला हीच गोष्ट आवडते, अगदी मला पिल्लू होईपर्यंत मी हीच गोष्ट ऐकणार आणि नंतर माझ्या पिल्लाला पण तू हीच गोष्ट सांगायची" ह्यावर आई इतकी हसली की तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धाराच लागल्या. तिने मला भरवायचे टाकून अगदी घट्ट ओढून घेतले होते.

त्या दिवशी आई अंगणात उभी नव्हती म्हणून दारावरची कडी वाजवली. थोड्या वेळाने आईने दार उघडले. ती थकल्यासारखी दिसत होती.
“आई, तू झोपली होतीस ? काय झालं ?”
“काही नाही रे बाळा, अशीच झोप लागली, चल आत ये, तुला जेवण वाढते, भूक लागली असेल ना ?” माझ्या डोक्यावरनं हात फिरवीत ती म्हणाली. मी फास्ट फास्ट हातपाय धुतले, आईने वाढलेले सगळे जेवण संपवले, एका वाटीत थोडा भात घेऊन लगेच फ्रेंडकडे निघालो. मला जाताना पाहून आई काही म्हणाली नाही पण परत झोपायला निघून गेली. आई मला कधी फ्रेंडबरोबर खेळायला नाही म्हणायची नाही तरी त्या दिवशीचे तिचे परत झोपायला निघून जाणे, नेहेमीसारखे नव्हते.

रात्री बाबांबरोबर डॉक्टरकाका आले. त्यांनी आईला तपासले, काही औषधे लिहून दिली. “रक्ताची तपासणी करावी लागेल, उद्या लॅबमध्ये घेऊन या” वगैरे बोलले. बाबा त्यांच्याबरोबर बाहेर गेले. आत आले तेव्हाही माझ्याशी हसले नाहीत, मी होमवर्क करत होतो तरी बाबा माझ्याशी हसले नाहीत हे मला कळले. त्या दिवसानंतर घरात रोज, औषधे, लॅब रिपोर्ट, रेडीयेशन, किमो असले शब्द ऐकू येऊ लागले. आईला कोणतातरी आजार झाला आहे समजले, पण नक्की काय झाले ते मला कोणीही सांगितले नाही. एकदोनदा बाबांना विचारले पण “काही नाही बेटा, बरी होईल लवकर” एव्हढेच म्हणाले. आईला विचारले पण तिने देखील मला जवळ घेण्यापलीकडे काहीही केले नाही. आईच्या जवळ गेलो की कित्ती बरे वाटायचे पण हल्ली तिच्या अंगाला औषधांचा वास येऊ लागला होता, तरी देखील तिच्या मिठीत मला आवडायचेच. पूर्वी मी आणि आई एकत्र झोपायचो, झोपताना आम्ही खूप गप्पा मारायचो. ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला गोष्टी सांगायची, कधी कधी हळुवार आवाजात गाणी देखील म्हणायची. मग कधी झोप यायची ते कळायचीच नाही. सकाळी चांगलीच थंडी पडायची. उठल्यावर, अंगावर आईनी माझ्यासाठी बनवलेली तिच्या जुन्या साड्यांची मऊमऊ आणि उबदार दुलई असायची. जागं झाल्यावर देखील उठू नये असेच वाटायचे मग मी ती दुलई डोक्यावरून ओढून, पाय पोटाशी घेऊन अजून झोपून जात असे. फार मजा वाटायची. पण आई आजारी पडल्यापासून मी आणि बाबा एकत्र झोपायला लागलो. आई तिच्या वेगळ्या रूममध्ये झोपू लागली, पण मला लवकर झोप येतच नसे. बाबांच्या गोष्टी आवडायच्या पण त्याने झोप येत नसे. मी खूप वेळ जागाच असे, मग बाबांना झोप लागली की हळूच उठून आईच्या बाजूला जाऊन झोपत असे. मग आई तिच्या हलक्या आवाजात माझ्यासाठी गाणी म्हणे, पण खूप वेळा तिच्या डोळ्यातून पाणी येई आणि माझ्या नकळत ती ते पुसायचा प्रयत्न करी. विचारले तर “मी आजारी आहे ना, म्हणून थोडे पोटात दुखते” असे सांगी.

एके दिवशी आमच्या घरी बाबांची एक लांबची मथुरा नावाची आत्या, राहायला आली. का कुणास ठाऊक तिला पाहिल्या पाहिल्या मला ती फारशी आवडली नाही. आईपेक्षा वेगळ्या स्टाईलने ती साडी नेसायची. त्याला नऊवारी म्हणतात हे आईने नंतर सांगितले मला. रंगाने अगदी गोरी गोरी पान पण डोळे मात्र हिरवेगार गोटीसारखे, त्यांच्याकडे थोडावेळ बघितले तरी भीती वाटावी असे. अंगावर साड्या राखाडी रंगाच्या असायच्या, आणि त्यावर राखाडी किंवा काळा ब्लाउज. आवाज अगदी मोठ्ठा होता आणि तो देखील नेहेमी हुकुम केल्यासारखा. मला ती आवडतच नसे. बाबा म्हणाले की आई आजारी पडल्यामुळे घरी जेवण-खाण करायला, आईची देखभाल करायला, आणि तुझी काळजी घ्यायला, आजी आता इथेच राहणार आहे. ती कायमची इथेच राहणार हे ऐकून मला पोटात काहीतरी हलल्यासारखे झाले, म्हणजे समजा आपण होमवर्क केला नाही, आणि टीचर वह्या तपासणार आहे हे कळल्यावर जसे होते ना तसेच झाले. आल्या आल्या आजीने घराचा ताबा घेतला. आई आजारी झाल्यापासून घरात थोडा पसाराच झाला होता, तो तिने आवरला. किचनमध्ये फ्रीझ, सामानाचे कपाट, डबे-बाटल्या, भांडी वगैरे आवरली. माझी अभ्यासाची पुस्तके, कपडे, शाळेचे दप्तर एका कपाटात ठेवले. माझी खेळणी, गोष्टींची पुस्तके काढून घेतली, म्हणाली “परीक्षा आलीय, अभ्यास कर, सुट्टीत खेळ आणि वाच गोष्टींची पुस्तके”. अस्सा राग आला न की आईलाच जाऊन सांगितले त्यावर आई हळूच म्हणाली, “मणी बाळ, आजीचे ऐकायचे आता, मी बरी झाले ना की देईन हो तुझे खेळ तुला खेळायला.” पण माझे खेळ, गोष्टींची पुस्तके आजीच्या ताब्यात गेली ती गेलीच. आईच्या रुममध्ये जायला देखील मला बंदी केली गेली. आता मला फक्त एक माझा फ्रेंडच उरला होता खेळायला आणि बोलायला.

मी त्याला ह्या नवीन आजी विषयी सांगितले, त्यावर त्याला देखील राग आलेला दिसला. त्याने मोठ्यांदा डराव-डराव केले. मी म्हंटले “हळू रे बाबा, आजीने तुला बघितले तर तुला देखील ताब्यात घेईल ती”, मग आम्ही दोघे हळूच हसलो. पण एकदा आजीने मला त्याच्याबरोबर खेळताना पाहिलेच. घरी आल्या-आल्या मला तिने साबणाने हात पाय धुवायला लावले.
“चिंटू, कारंज्याजवळ तू कोणाबरोबर बोलत होतास रे ?”
“माझ्या फ्रेंडबरोबर" आजीने खिडकीतून बघितले होतेच त्यामुळे मी खरं खरं सांगितलं.
“हा फ्रेंड कोण ? बेडूक ? बेडूक तुझा फ्रेंड कसा काय रे ? इतर मुलं नाहीत का खेळायला ? आसपासच्या घरात एव्हढी मुले आहेत ते नाहीत का तुझे फ्रेंड्स ? आणि उद्यापासून त्या बेड्काबरोबर अजिबात खेळायचे नाही, नसते रोग नकोत घरात. आधीच एकीचे करता करता नाकी नऊ येतात, आता अजून दुसरे नको. काय ऐकलेस ना ? बघतोस काय असा तोंड वर करून ?”
“हो" मी उत्तर दिले, रागाने आणि दु:खाने, आणि आणि मला रडूच फुटले. मी पाय आपटत तसाच आईच्या खोलीकडे धावलो. आई झोपली होती, तरी माझे रडणे ऐकून तिने डोळे उघडले.
“मणी बेटा, काय झाले रडायला” तिने अतिशय अशक्त स्वरात विचारले. मी तिला आजीची कम्प्लेंट केली.
“आजी म्हणते, मी माझ्या फ्रेंडशी खेळायचे नाही उद्यापासून. मग कोणाशी खेळायचे मी ? माझी गोष्टीची पुस्तेक काढून घेतली, माझे सगळे खेळ काढून घेतले, आता फ्रेंडशी देखील खेळायचे नाही, मग काय करायचे मी ? कोणाशी बोलायचे ? कोणाशी खेळायचे ? तुझ्याशी देखील बोलायला देत नाहीत, मग काय करायचे मी ?” मी रडत रडत आईला म्हणालो. तोपर्यंत आजी तिथे आली होती. आधी तिने मला आईपासून ओढून दूर केले, म्हणाली --
“चिंटू, आईला बरं नाही माहित आहे ना तुला ? तिला अजून त्रास देऊ नको, तिला दुखतंय.”
“दुखू दे, ती माझी आई आहे, मी जवळ गेल्याने नाही तिला दुखंत, विचार पाहिजे तर तिला. हो ना आई ?” आजीचा हात झटकून मी पुन्हा आईजवळ गेलो.
“हो रे माझ्या शहाण्या बाळा, नाही हो दुखत. पण आजीचे देखील ऐकत जा रे माझ्या सोन्या, ती आपल्यासाठीच इथे येऊन राहिले नं ? मग तिला त्रास नाही हो द्यायचा" आई समजावण्याच्या सुरात म्हणाली.
“हो नाही देत त्रास, पण तिला सांग की मला माझ्या फ्रेंडशी खेळायला मला नाही अडवायचे.”
“हो, हो, सांगते, मथुरा आत्या, खेळू द्या हो चिंटूला त्याच्या फ्रेंड बरोबर” - एव्हढे सांगेपर्यंत आईला धाप लागली. मग ती डोळे मिटून पडून राहिली.

त्यादिवशी तिने मला नेहमीसारखे जवळही नाही घेतले.

एकदा रात्री बाबा झोपल्यावर मी हळूच चोरपावलांनी, आईच्या बाजूला जाऊन झोपण्यासाठी उठलो. आमच्या रूममधून मधल्या पॅसेजमध्ये आलो आणि एकदम दचकलोच. पॅसेजमध्ये आजी उभी होती. तिने माझा हात पकडला, हळू पण रागीट आवाजात म्हणाली, “तू तुझ्याच खोलीत झोपायचे, पुन्हा तिच्या खोलीत जातात दिसलास तर तंगडं मोडून ठेवीन. समजलास ? जा जाऊन झोप तुझ्या खोलीत.” मी तरी तेथेच उभा राहिलेलो बघून, रागाने तरातरा ओढत ती मला माझ्या रुममध्ये घेऊन आली, आणि डोळ्यांनीच, “आवाज नको, झोप मुकाट्याने” म्हणाली. त्या रात्री मला झोपच लागली नाही, रात्रभर मी रडत होतो, पण कोणालाच, अगदी बाबांनासुद्धा ते कळलं नाही.

आईचा आजार वाढतच चालला होता. आजी, बाबा आपापसात गंभीर आवाजात काहीतरी बोलायचे, फोनवर आमच्या नातेवाईकांशी बोलायचे, पण हे सगळे मी आसपास नसताना. तरी देखील काहीतरी वाईट चालले आहे हे कळत होते, कारण बाबा मध्येच डोळे पुसताना देखील दिसायचे. आईच्या हॉस्पिटलच्या ट्रिप्स वाढल्या होत्या, आता तिचे केस गळायला लागले होते. मी शाळेतून आलो तरी खूप वेळा ती घरी नसायची आणि जेव्हा कधी असायची त्यावेळी मला तिच्या रुममध्ये जायला बंदी असायची. मग मी मुकाट्याने आजीने वाढलेलं जेवून बागेत निघून जात असे. माझ्या फ्रेंडला सगळ्या गोष्टी सांगत असे, आजी मला कशी आवडत नाही ते, बाबांचे रडणे, आईचे केस गळतात, आता मला तिच्याकडे फारसे जाऊन देत नाही, वगैरे. तो मात्र ह्यावर काहीच बोलत नसे, फक्त माझ्याकडे त्याच्या गोल, काळ्याभोर डोळ्यांनी बघत राही. माझ्याकडे घरी कोणाचेच लक्ष नसल्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ फ्रेंडबरोबर घालवायला लागलो.

आणि एक दिवस आजी आणि बाबा बोलत असताना मी ऐकले, बोलत कसले जवळ जवळ भांडतच होते की.

“अगं आत्या, माझ्या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, मी नाही करणार ही गोष्ट"
“अरे पण करून बघायला काय हरकत आहे ? माझ्या लहानपणी मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे, आणि आपल्याला थोडेच ते करायचे आहे, ते हकीम करतील"
“अगं पण ही अंधश्रद्धा आहे, उगाचच मुक्या प्राण्याचा जीव का घ्यायचा ? छे, छे मला नाही पटत, माझ्याच्याने नाही हे होणार ?”
“ह्याला अंधश्रद्धा म्हणतोस आणि मग देवाचे अंगारे का लावतोस तिच्या कपाळी रोज ? ती नाही का अंधश्रद्धा?”
“हो, पण त्यात मुक्या प्राण्याचा जीव तर नाही ना आपण घेत ?
“कसला मुका प्राणी, मुका प्राणी घेऊन बसलाहेस ? मेला एक बेडूक तर आहे, अशी कित्त्येक बेडकं रोज मरत असतील, आणि तुला नसता पुळका त्यांचा, म्हणे मुका प्राणी. आणि त्या मुक्या प्राण्यासाठी बायकोच्या जीवाशी खेळतो आहेस हे नाही का तुला कळत ?”
“....…… पण आत्या !”
“हे बघ माझं ऐक, उद्या चिंटू शाळेत गेला नं की बागेतून त्याच्या बेडकाला पकडून आणून दे हकीमाला, ते काय ते बघून घेतील.”
“....पण आत्या चिंटूला कळल्यावर त्याला किती वाईट वाटेल ह्याची कल्पना आहे का तुला ? इथे आल्यापासून त्याला एकही मित्र नाही, सदोदित त्या बेडकाबरोबर खेळून मन रमवतोय तो. त्याचा बेडूक आपण मारला हे त्याला कळले तर काय होईल हे माहित आहे का तुला ?”
“काही होत नाही, दोन दिवस रडेल आणि जाईल विसरून हळूहळू. आणि तुला त्या बेडकाच्या जीवाची काळजी आणि आपल्या बायकोची काहीच काळजी नाही ?”
“अगं आत्या तसं नाही गं. पण हे सुद्धा पटत नाही……….”
“ते काही नाही उद्याच चिंटू शाळेत गेला की आण तो बेडूक, मी बोलावणे पाठवते त्या हकीमाला, तो येऊन मारेल त्या बेडकाला आणि बांधेल तिच्या पायाला. इतकी औषधे केली आता हे पण करून बघू, झालाच उपयोग तर उत्तमच नाहीतर इतर औषधे आहेतच ना चालू ?”
“.........................”

बापरे, म्हणजे मी शाळेत गेल्यावर बाबा ह्या दुष्ट आजीच्या सांगण्यावरून माझ्या फ्रेंडला मारणार आणि आईच्या पायाला बांधणार ? पण का ? कशासाठी ? आजीच्या बोलण्यावरून तरी ते आईला बरे करण्यासाठीचे औषध आहे असे वाटत होते, पण आजीची तरी कुठे खात्री होती की त्याचा उपयोग होईल म्हणून ? मग उगाचच त्याला मारायचे ? मी नाही त्याला मारू देणार, माझा तो फ्रेंड आहे. माझ्याशी खेळतो, बोलतो आणि मस्ती देखील करतो. तोच गेल्यावर मी कोणाशी खेळायचे ? बोलायचे ? मनातली गुपितं सांगायची ? हल्ली तर आईशी देखील बोलायला देत नाहीत, आणि तिला तरी ते आवडणार आहे का ? ती तरी तयार होईल का माझ्या फ्रेंडला मारायला ? नक्कीच नाही. ह्या आजीलाच माझा फ्रेंड आवडत नाही म्हणून तिने ही काहीतरी वाईट गोष्ट बाबांच्या डोक्यात भरून दिली आहे. फार फार दुष्ट आहे आजी, मला अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही ती.

दुसर्या दिवशी शाळेतून घरी आलो तर आजी चिडली होती माझ्यावर.

“आईच्या जीवावर उठलंय कार्ट ! आईपेक्षा बेडूक जवळचा वाटतो, चांगला ठोकून काढला पाहिजे म्हणजे कळेल, फ्रेंड म्हणे, हूं, लाडावून ठेवलंय नुसतं. कुठे आहे रे तुझा बेडूक फ्रेंड ? जा पकडून घेऊन ये त्याला, म्हणजे आईचा जीव तरी वाचेल तुझ्या, जा, जा आधी त्याला घेऊन ये, मगच जेवण मिळेल.” माझे दप्तर काढून घेऊन आजीने मला जवळ जवळ खेचतच बागेत नेले.
“मला नाही माहीत आजी"
“नाही कसं ? रोज येऊन तर खेळत असतोस ना, मग आज का नाही ? बोलाव त्याला, बोलाव म्हणते ना” आजीने फार घट्ट पकडला होता माझा हात, आजपर्यंत आई-बाबा रागावले की ओरडायचे पण कोणीही कधीही मारले नव्हते मला. रागाने, दु:खाने आणि झालेल्या अपमानामुळे मी रडायलाच लागलो.
“सांगितलं ना, मला नाही माहित म्हणून" असं म्हणून आजीचा हात झिडकारून मी घराकडे धावत सुटलो, आईला हे सगळे सांगून आजीला घरातून जायला सांगायचे असे मनाशी ठरवत आईच्या रुमकडे धावलो.

बघतो तो काय आईची रूम रीकामी होती. त्याच दिवशी सकाळी आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. आई नंतर परत कधीच घरी आली नाही. सगळे म्हणाले ती देवाघरी गेली.

एक गुपित सांगू ? मी कोणालाच सांगितले नाही. त्या दिवशी माझ्या फ्रेंडला मीच रात्री एक डब्यात घालून शाळेत जाताना दूर नेऊन सोडले.

आता मी एकटाच असतो. आई नाही, फ्रेंड नाही कि कुणीही नाही. झोपताना आईची दुलई घेऊन झोपतो, आईच डोक्यावरून हात फिरवत गोष्ट सांगते आहे असे मनाशी ठरवतो आणि फ्रेंडशी बोलत बोलत झोपी जातो.

सगळे म्हणतात आईच्या जाण्याने पोराच्या डोक्यावर परिणाम झालाय.

प्रतिक्रिया

जेपी's picture

3 Mar 2015 - 9:41 pm | जेपी

...

सस्नेह's picture

3 Mar 2015 - 10:10 pm | सस्नेह

कथा छान लिहिली आहे. लहान मुलाच्या मनातले भाव तंतोतंत उतरले आहेत.

कविता१९७८'s picture

3 Mar 2015 - 10:19 pm | कविता१९७८

खुप छान

एस's picture

3 Mar 2015 - 10:55 pm | एस

भावली कथा! आज मिपावर पडलेल्या जिल्ब्यांच्या भाऊगर्दीत अशी एखादी चांगली कथा खाली ढकलली गेली की जीव हळहळतो.

योगी९००'s picture

3 Mar 2015 - 11:32 pm | योगी९००

एकदम सुंदर कथा...लहान मुलाचे भाव खुप सुंदरपणे मांडले आहेत.

विशाखा पाटील's picture

4 Mar 2015 - 12:08 am | विशाखा पाटील

आवडली! लहान मुलाचं भावविश्व छान रंगवलंय.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2015 - 2:24 am | श्रीरंग_जोशी

भावस्पर्शी आहे कथा.

रुपी's picture

4 Mar 2015 - 3:41 am | रुपी

सुंदर!

फार छान लिहिलिये , अशाच कथा , लेख अजून येऊ द्या.

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 6:35 am | हाडक्या

खरं सांगतो, सुरवातीस इतर जिल्ब्यांसारखं अजून एक म्हणून थेट शेवटाकडे धाव घेतली आणि दोन ओळीतच परत सुरुवातीस गेलो. पुरी गोष्ट वाचून काढली. खूप छान लिहिलय हो.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2015 - 7:23 am | मुक्त विहारि

सेम टू सेम....

जयंत कुलकर्णी's picture

4 Mar 2015 - 6:48 am | जयंत कुलकर्णी

मस्त.....

केवळ उत्कृष्ट!!

धन्यवाद!!

उगा काहितरीच's picture

4 Mar 2015 - 2:05 pm | उगा काहितरीच

खरं सांगू ? डोक्यातून पाणी काढलं !

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 3:43 pm | सस्नेह

असं कधीपासून होतंय ? +D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 6:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळ्यावर पडल्यापासुन =))

नाखु's picture

4 Mar 2015 - 2:28 pm | नाखु

कथा एका वेगळ्या नजरेतून
पुलेशु

स्नेहल महेश's picture

4 Mar 2015 - 2:49 pm | स्नेहल महेश

मस्त ................................

यशोधरा's picture

4 Mar 2015 - 2:49 pm | यशोधरा

आवडली कथा.

के.पी.'s picture

4 Mar 2015 - 2:58 pm | के.पी.

हृदयस्पर्शी कथा
खूप आवडली.

शलभ's picture

4 Mar 2015 - 6:36 pm | शलभ

खूपच छान..आवडली.. :)

सौन्दर्य's picture

4 Mar 2015 - 8:04 pm | सौन्दर्य

मैत्रहो, कथा आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल खूप खूप आभार. मिपावर हा माझा दुसरा लेख, ह्या आधी जवळजवळ पाचएक वर्षांपूर्वी 'गटारी गाथा' नावाचा, गटारी अमावास्येवर एक हलका फुलका लेख लिहिला होता. ही कथा पोस्ट करताना मनात थोडी धाकधूक होती, मिपावर अशी गंभीर, हळवी शेवट असणारी कथा कशी काय स्वीकारली जाईल ह्याविषयी मनात शंका होती. पण आपणा सर्वांच्या प्रोत्साहनाने खूप बरे वाटले आणि अजून लिहिण्यासाठी (मिपाच्या भाषेत जिलब्या पाडण्यासाठी) हुरूप आला. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2015 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा

सौन्दर्यपूर्ण! :)
:HAPPY:

बबन ताम्बे's picture

5 Mar 2015 - 12:43 pm | बबन ताम्बे

खुपच सुंदर आणि ह्रूदयस्पर्शी कथा.
आवडली.
अजून कथा येऊ द्यात.

सविता००१'s picture

5 Mar 2015 - 12:59 pm | सविता००१

फार फार सुरेख कथा.
अतिशयच आवडली

मंजूताई's picture

5 Mar 2015 - 1:55 pm | मंजूताई

खूप!

शेवटच्या वाक्याने पाणीच आलं डोळ्यातून... खूपच सुंदर आहे कथा..

साती's picture

5 Mar 2015 - 2:59 pm | साती

सुरेख लिहीलीय गोष्टं!

सुरेख वाचनीय कथा.जरा उशीरा आली.स्पर्धेसाठी यायला हवी होती खरंतर.

भम्पक's picture

7 Mar 2015 - 4:08 pm | भम्पक

जी ए नच्या कैरीची आठवण....!!!!

सौन्दर्य's picture

10 Mar 2015 - 12:25 am | सौन्दर्य

सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल खूप खूप आभार.

प्रभाकर पेठकर's picture

10 Mar 2015 - 2:13 am | प्रभाकर पेठकर

सुंदर कथा. लहान मुलांचा जीव असाच कुठे कुठे, विशेषतः मुक्या प्राण्यांमध्ये, गुंतून पडतो. मैत्री घट्ट होते. एक्मेकांच्या भावना एकमेकांना कळतात. ते एक, मोठ्यांपेक्षा वेगळेच, विश्व असते. निष्पाप आणि निरागस.

कथेत ह्या भावना अत्यंत कुशलतेने उलगडल्या आहेत. शेवट पर्यंत कथानक वाचकाला आपल्यात गुंगवून ठेवते.

अभिनंदन.

इनिगोय's picture

14 Mar 2015 - 10:33 am | इनिगोय

+१
छान उतरलंय वर्णन.

एक एकटा एकटाच's picture

12 Mar 2015 - 11:30 pm | एक एकटा एकटाच

शेवटच्या ओळी अत्यंत टोचतात काळजाला

कंजूस's picture

14 Mar 2015 - 11:10 am | कंजूस

पोहोचली.

प्रियाजी's picture

14 Mar 2015 - 3:35 pm | प्रियाजी

डोळ्यतून पाणी काढ्णारी कथा.ही प्रत्यक्षात कधीच न येवो.

ज्योति अळवणी's picture

15 Mar 2015 - 10:28 pm | ज्योति अळवणी

खूप सुंदर कथा

पैसा's picture

1 Apr 2015 - 11:05 am | पैसा

अतिशय सुंदर, काळजाचा ठाव घेणारी कथा.

चिगो's picture

1 Apr 2015 - 12:43 pm | चिगो

अत्यंत भावस्पर्शी कथा.. लहानग्याच्या तरल भावना, अगदी त्याच्या विश्वात उतरुन लिहील्या आहेत. मनापासून आवडली.

तो माझे सगळे बोलणे मन लावून ऐके आणि मधून मधून काहीतरी बोले. बहुतेक तो त्याच्या गमती-जमती सांगत असावा.

.

तो काहीतरी सांगत होता कारण त्याच्या तोंडाची कातडी हलत होती.

मी फास्ट फास्ट हातपाय धुतले,

ही आणि अशी अनेक वाक्ये लहान मुलांच्या भावविश्वाची आणि त्यांच्या भाषेची तुमची जाण प्रकट करतात.. लिहीते रहा..

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 12:56 pm | बॅटमॅन

.........

सौन्दर्य's picture

6 Apr 2015 - 7:28 pm | सौन्दर्य

मंडळी नमस्कार. आपल्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल खूप खूप आभार. प्रियाजी, "डोळ्यतून पाणी काढ्णारी कथा.ही प्रत्यक्षात कधीच न येवो" हे अगदी खरं आहे. कोणत्याही मुलाच्या वाट्याला असले दु:खद प्रसंग कधीच न येवोत हीच देवाकडे प्रार्थना.