हनुमान सुळका (नंदीची धार) - अंजनेरी डोंगररांग, त्र्यंबकेश्वर, नाशिक

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
3 Mar 2015 - 3:50 pm

हनुमान सुळका (नंदीची धार) - अंजनेरी डोंगररांग, त्र्यंबकेश्वर, नाशिक

व्हीडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=rzYdHKPjrCo

----------------------------------------------------------------------------------------
''अरे सत्या, XXXX किती वर्षानंतर भेटतोयस''!

डोंबिवलीतील 'सखाराम हैबती जोंधळे' हे कॉलेज (या नावाची सुद्धा कॉलेजेस असतात) सोडल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी भेटल्यावर प्रदीपने अशी प्रेमळ 'भकाराने' माझी विचारपूस केली. भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यातूनच त्याने एके दिवशी मला मुंब्रा नर्सरीमध्ये प्रस्ताराहोणाच्या सरावासाठी आमंत्रित केल. कॉलेजला असताना छोटा-मोठा ट्रेक करायचो पण शेवटचा कधी केला तोही आठवत नव्हता. इथे मात्र प्रदीपने मला दहावीतून थेट पदवी परीक्षेला बसवलं होत. व्यायामाची सवय होती पण तेंव्हा शरीर पिळदार बनवायची ओढ होती आणि व्यायामही त्यास साजेसा निवडला होता. धर आणि उचल! मुंब्रा नर्सरीमध्ये आल्यावर कळल आपला नेहमीचा व्यायाम उपयोगाचा नाही. सर्वात प्रथम वजन कमी कराव लागणार होत आणि मनगट, दंड आणि विंग्स यांच्यावर भरपूर मेहनत घ्यावी लागणार होती. बाहुंमधली ताकद काही कामाची नव्हती. सावकाशीने गिरीविराजचा सभासदही झालो. आता सराव तर सुरु झाला होता पण कधी एकदा मोहिमेवर (हमाली) जातो अस झाल होत.

गिरीविराजची १३० वी मोहीम २०११ च्या डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात अंजनेरी डोंगररांगेतील 'नंदीची धार उर्फ हनुमान' या सुळक्यावर आयोजित करण्यात आली होती. ४ दिवसांचा कार्यक्रम असल्यामुळे सामानही खूप होत. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सगळ्या हौशी कलाकारांनी ऐनवेळेला दांडी मारल्यामुळे फक्त सहा जण जाण्यास तयार झालो. सगळेजण किरणकाकांच्या घरी गोळा झालो होतो. माझी पहिलीच मोहीम असल्याने माझ्या चेहऱ्यावर तर राहुल गांधी सारख हसू होत. सगळ कस नव-नवीन असल्याकारणाने काय करू आणि काय नको अस झाल होत. पण बेंग उचलली आणि प्रदीपला एक सडसडीत शिवी हाणली. ३० किलोची तो बेंग पाठीवर घेतल्यानंतर कुठे या पद्याच्या नादाला लागलो असा विचारसुद्धा मनात येऊन गेला. मंडळी कमी असल्यामुळे प्रत्येकाच्या पाठीवरच वजन वाढल होत. काकांच्या घरापासून डोंबिवली स्टेशनपर्यंतच ५ मिनिटाच अंतर मला ५ तासांच वाटायला लागल.

सकाळी पहिल्या गाडीने कसारा गाठल आणि तिथून जीपने घोटीला उतरलो आणि घोटी-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर जीप पकडली. घोटी- नाशिक रस्त्यावर घोटीपासून १ किमी अंतरावर वाकी फाट्यावरून रस्ता पुढे त्र्यंबकेश्वरला जातो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला दिसतो त्रिंगलगड आणि उजव्या बाजूला कावनई.

१.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

दिडएक तासाच्या प्रवासानंतर जीपमधून उतरल्यावर समोरच ब्रम्हगिरी आणि त्याच्या लगतचा गणबारीचा डोंगर दिसत होता ज्याच्या मागे आहे त्र्यंबकेश्वर, डाव्या हाताला दूरवर हरिहर किल्ला, उजव्या हाताला रस्त्याच्या पलीकडे आमचा मुक्काम असलेल पहिने गाव.

२.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

आमचा मुक्काम होता पहिने गाव. पहिने गाव त्र्यंबकेश्वर पासून ७-८ किलोमीटर अलीकडे, अंजनेरी डोंगररांगांच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. पहिने गावात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला सर्व प्रथम चांगलाच रुंद असलेला आणि अंजनेरी डोंगराच उपांग असलेला रुद्र सुळका दिसतो, मध्ये डोंगराला चिकटून हनुमान सुळका आणि उजव्या बाजूला पहिने नवरा-नवरी सुळके आणि त्याला लागून असलेला सासरा डोंगर (खरतर या डोंगराला नाव अस काही नाही, पण बाजूच्या सुळक्याना नवरा-नवरी नाव दिलंय तर याला सासरा नाव द्यायला हरकत नाही).

३. अगदी धो-धो पावसात, सोसाट्याच्या वाऱ्याला अंगावर घेऊन हा रुद्र सुळका आम्ही सर केला होता.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

४. या नवरा-नवरी ने खूप गोंधळ उडतो. कोठेही २ सुळके आजूबाजूला असतील तर लगेच त्याच नामकरण नवरा-नवरी होत. तर, अंजनेरीचा डोंगर पार त्र्यंबकेश्वरपासून पहिने गावापर्यंत पसरलेला आहे. अंजनेरीच्या त्र्यंबकेश्वर बाजूस (जिथून अंजनेरीचा ट्रेक केला जातो) २ सुळके आहेत आणि त्यांना ''अंजनेरी नवरा-नवरी'' म्हणून संबोधतात. आम्ही अंजनेरीच्या विरुद्ध टोकाला पहिने गावात होतो आणि इथेही नवरा-नवरी आहेत. त्यांची ''पहिने नवरा-नवरी'' अशी ओळख आहे.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

५.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

६.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

हां तर पुढे:-
आता परत ती जड बेंग पाठीवर घेउन गावाच्या वाटेला लागलो. हनुमान सुळका जवळ गेल्याशिवाय दिसतही नाही. अंजनेरी डोंगराला अगदी बिलगून असल्यामुळे तो डोंगराच्या सावलीमध्ये हरवून जातो. लांबवर तो सुळका पाहिला आणि मनात म्हणालो 'मेलो आता', एव्हढ्या लांबवर मी हि बेंग कशी काय नेणार? ५ मिनिटातच गावात प्रवेश केला आणि गावचे सरपंच हरिभाऊ अंबापुरे यांच्या घरी पाहुणचारासाठी पहिला थांबा घेतला. बोलता बोलता त्यांनी सांगितलं कि या मोसमात रानात पाणी नाही तेंव्हा तुम्ही तुमचा तळ गावातील सार्वजनिक सभागृहात ठोका. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर ते राहुल गांधींच प्रसिद्ध हास्य परत आल.

मस्तपैकी ऐसपैस सभागृह आता पुढील ३ दिवसांकरिता आमच्या हवाली करण्यात आल होत. आमच्या या तळापासून हनुमान सुळका दीड-दोन तास चालण्याच्या अंतरावर होता. म्हणजे पुढील तीन दिवस रोज चढ-उतार करावा लागणार होता. आम्ही दुपारच्या वेळेस गावात पोहोचल्यामुळे मला वाटलं प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी आज निवांत आराम करायचा असणार. पण कसलं काय, आवश्यक तेव्हढ चढाईच सामान घेऊन आम्ही हनुमानच्या वाटेला लागलो. बऱ्याच वर्षात सुळक्यावर चढाई न झाल्यामुळे वाट शोधताना खूपच प्रयास पडले. मग काय, हनुमान सुळक्याचा पायथा नजरेसमोर ठेऊन सरळ चालायला सुरुवात केली. वाटेत आडव्यातिडव्या पडलेल्या झाडांना आणि खडकांना परत परत नमस्कार करीत एका उंचवट्यावर पोहोचलो. कड्याच्या अगदी टोकावरून तिरकस रेषेत वाटचाल चालू होती. मी रांगेत उभा असताना माझ्या पायातली चप्पल त्या तिरकस उंचवट्यावर असलेल्या मातीमुळे घसरण्याची चिन्ह दिसायला लागली. खाली पडलो तर कपाळमोक्ष ठरलेला. एकतर त्या जागी हातामध्ये पकडण्यासाठी काहीच नव्हत. पाठीवरची सॅक आणि स्वतःचा तोल सांभाळत वाटचाल करायची होती. तिघेजण पुढे गेले. त्यांच्या मागोमाग मी निघालो आणि अचानक माझा पाय घसरला, अक्षरशः पडता पडता शेवटच्या क्षणी माझ्या पुढे चढत असलेल्या प्रदीपचा पाय माझ्या हातात आला, नशिबाने प्रदीपने त्याचवेळेस वर चढण्यासाठी एका झाडाची मुळी पकडली होती त्यामुळे आम्ही दोघेही बचावलो. थोडेसे सावरल्यावर काट्याकुट्यामध्ये अंगावर ओरखडे झेलत, ओढ्यांमध्ये पडलेल्या दगडांमध्ये ठेचकाळत अंदाजाने हनुमान सुळक्याचा पायथा गाठला.

७.हनुमान सुळका - चढाई मार्ग
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

अवांतर:-
हनुमान सुळक्यावर सर्व प्रथम २००५ साली शैलभ्रमर या संस्थेने यशस्वी चढाई केली होती. आपण शहरी लोक एखाद्या स्थानाची नाव का बदलतो तेच कळत नाही. या सुळक्याला स्थानिक गावकरी ‘’नंदीची धार’’ म्हणतात आणि तेच नाव समर्पक आहे, हे पाहिल्यावरच कळेल. खरोखर नंदीच बसल्यासारखा वाटतो.

हां तर पुढे:-
दुपारी बरोबर १ वाजता सर्वप्रथम किशोर मोरेने चढाईला प्रारंभ केला. हितेश सेकंड मॅन बनून त्याचा बिले घेऊन पायथ्याला उभा राहिला आणि सन्नी त्यांच्या मदतीसाठी होता.

८. Belay - लीड क्लाईम्बर स्वतःबरोबर दोन दोर घेऊन जातो. एक Supply दोर असतो ज्याच्या साहाय्याने आवश्यक साधनसामुग्री त्याच्यापर्यंत पोहोचवली जाते. दुसरा मुख्य दोर त्याच्या कंबरेला बांधलेला असतो, हा दोर त्याचा जीवनरक्षक असतो ज्याच नियंत्रण सेकंड मॅनकडे असते. (प्रचि- आंतरजालावरून साभार)
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

मी, किरण काका आणि प्रदीप फोटोग्राफी आणि व्हीडीओ शुटींग मध्ये व्यस्त झालो. मार्गातील भक्कम निवडुंगास टेपस्लिंग बांधून किशोरने चढाई सुरु केली. पहिल्याच प्रयत्नात ३०-४० फुट चढाई करून किशोर एका बऱ्यापैकी मोठ्या खडकावर पोहोचला. इथेही दगडाला टेपस्लिंग बांधून स्वतःला सुरक्षित केल. वरच्या खडकात अडकलेल्या एका छोट्या दगडी नैसर्गिक चोकस्टोनचा आधार घेत वरची चढाई सुरेखपणे करत तो पहिल्याच बोल्टपाशी पोहोचला. त्यात रनर पास करून डाव्या बाजूस ओपन बुक सारखी रचना असणाऱ्या रॉकपेंचमधील कपारीमध्ये योग्य आकाराची मेख ठोकून तिच्या भरवशावर वर वर सरकत त्याने मार्गातला दुसरा बोल्ट गाठला. त्याने नंतर हितेशला पहिल्या बोल्टपाशी येऊन बिले घेण्यास सांगितले. हितेशने आपली जागा घेताच किशोरने आणखी बऱ्यापैकी उंची गाठली. आता संध्याकाळ होत आल्यामुळे आजच्या दिवसाची चढाई इथेच थांबवण्यात आली. कारण अंधार पडण्याच्या आत न चुकता- रानात न हरवता बेस कॅम्प गाठण महत्वाच होत. लागलीच किशोरने मार्गात असलेल्या भक्कम निवडुंगास दोर बांधला आणि खाली आला.

९.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

१०.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

११.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

१२.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

१३.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

१४.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

१५.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

परत गावात पोहोचायला अंधार झालाच, गरम जेवण पोटात गेल्यावर झोप कधी आली कळलंच नाही.

सकाळी उठल्यावर काकांनी मला आपल्या सोबत घेतलं. आज मी आणि किरणकाका हनुमान सुळक्याच्या पायथ्याशी न जाता अंजनेरी डोंगरावर जाऊन फोटोग्राफी करणार होतो. गावातून निघाल्यानंतर बऱ्यापैकी उंची गाठल्यावर रानात एक वाट हनुमान सुळक्याच्या पायथ्याशी जाते आणि एक मोठा ओढा अंजनेरी डोंगराच्या माथ्यावरून खाली कोसळतो. मी आणि काकांनी या ओढ्याची वाट धरली व क्लायम्बिंग टीमने सुळक्याची वाट पकडली. मी सेंनडल्स घातलेले असल्याने वाटेतले मोठमोठे खडक पार करताना माझी तारांबळ उडत होती. काका तर १६ वर्षाच्या तरुणाप्रमाणे मस्तपैकी उड्या मारत चालत होते. आणि जे न व्हायचं तेच झाल, माझ्या सेंनडल्सनी मला दगा दिला. आता सेंनडल्स तुटल्यामुळे मला दगड-धोंड्यामधून अनवाणीच जावे लागणार होते. त्यातच मी अर्ध्याच चड्डीवर असल्याने माझ्या मांड्यांवर लाल नक्षी उमटली होती. इथे एक, फक्त फुटभर वाढणारी रान वनस्पती होती जिची पाने एकदम टोकदार होती आणि आम्ही पकडलेला मार्ग हा काही येण्या-जाण्याची रहदारीची वाट नसल्याने या काट्यातूनच चालावे लागणार होते.

१६.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

सांधण दरीच्या अखेरीला जसे दगडांच्या भुयारातून बाहेर पडावे लागते अगदी तसेच एक भुयार इथेही आहे. या भुयारातून बाहेर पडल्यावर आपण अंजनेरीच्या माथ्यावर पोहोचतो. अंजनेरीच्या पाठीमागे दूरवर मधमाशांनी बळी घेतल्याने बदनाम झालेला ''डांग्या'' सुळका, गडगडा किल्ला दिसतो आणि त्याच्या पलीकडे नाशिक शहर आणि परिसर, अंजनेरीच्या दक्षिणेस दूरवर अलंग, मदन, कुरंग आणि कळसूबाईची डोंगररांग दिसते.

अंजनेरीच्या माथ्यावरून हनुमान सुळक्याला वळसा घालून आम्ही आता अंजनेरीच्या (पहिने नवरा-नवरी सुळक्यांच्या दिशेस) अगदी टोकाला आलो होतो. पण इथून सुळका काही दिसत नव्हता. त्यामुळे काकांनी आता जवळपास ४५-५० अंशाच्या कोनात असलेल्या दगड मातीच्या घसाऱ्यावरून कड्याच्या टोकाला जाण्याचा निर्णय घेतला. इथून जर सरकलो तर सरळ ४००-५०० फुट खाली. पकडण्यासाठी एखाद झुडूपसुद्धा नव्हत. मग काकांनी कड्याच्या अगदी टोकाला असलेल्या निवडुंगाच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली, दुर्दैवाने घसरून पडलो तरी निवडुंगात अडकले जाऊ हा विचार होता त्यामागे. त्यांना पाहुन मी सुद्धा घाबरत घाबरत उतरायला सुरुवात केली आणि एकदाचे त्या निवडुंगापाशी पोहोचलो. इथून मात्र सुळका अगदी व्यवस्थित दिसत होता. तो पाहिल्यावर काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगावा. मी विचारात पडलो काय म्हणावं या माणसाला, एक शॉट घेण्यासाठी किती परिश्रम. मला आज काहीच काम नव्हत, काका म्हणाले तू बस इथे आणि स्वतः लागले व्हीडीओ शुटींग करायला.

१७.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

दरम्यान चढाई टीम सुद्धा सुळक्याच्या पायथ्याला पोहोचली होती. आज प्रदीप म्हात्रेने चढाईची सूत्र आपल्या हाती घेतली आणि किशोर त्याला बिले देण्यासाठी सज्ज झाला. प्रथम प्रदीप झुमारिंग करत किशोरने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचला.

१८. प्रदीप झुमारिंग करताना
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

ठीक दहा वाजता प्रदीपने चढाई सुरु केली. मार्गातील तिसऱ्या आणि चौथा बोल्ट क्रॉस करत सावधपणे मुक्त चढाई करत तो वरवर सरकू लागला. हनुमान सुळक्यावर आणखी बोल्ट ठोकून चढाईचा दर्जा बिघडवायची आमची इच्छा नव्हती. हे आव्हान लक्षात घेऊन प्रदीपने मोहीम फत्ते करण्याचा चंग बांधला होता.

सुरुवातीलाच तीसेक फुटांची मुक्त चढाई केल्यानंतर पुढे डावीकडे जावे कि उजवीकडे जावे या संभ्रमात पडून डावीकडे सरकला आणि भिंतीत असलेल्या कपाटसदृश जागेत येऊन अडकला. त्याला काही सुचेनासे झाले. त्याने इथून चढाई करण्याचा प्रयत्न करून पाह्ण्याच ठरवलं, पण शरीर कड्यापासून विलग होऊन हवेत झोका घेऊ लागल आणि आमची हृदय धडधडू लागली. शेवटी परत क्लाइम्ब डाऊन करून खाली येण्यास अर्धा तास वाया गेला. या वेळेस योग्य निर्णय घेऊन आता उजवीकडे सरकला आणि मार्गातील पेंच लीलया पार करत एका छानपैकी ३ फुट रुंद आणि ५-६ फुट लांबी असलेल्या लेजवर पोहोचला. शैलभ्रमरने इथे २ बोल्ट ठोकून एक स्टेशन बनवले होते. या स्टेशनवर पोहोचताच प्रदीपने किशोरलासुद्धा इथे बोलावून घेतले आणि किशोरची जागा थर्ड मेंन सन्नीने घेतली. आता किशोर इथूनच प्रदीपचा बिले घेणार होता.

उंची जस जशी वाढत जाते तसे मोक्याच्या ठिकाणी सहकारी ठेवून मोर्चेबांधणी करणे जरुरीचे होते. मुख्य चढाईपटू आपल्या सोबत कमीत कमी साधन घेऊन चढाई करतो, जेणे करून त्याच्याकडील वजन वाढणार नाही. त्याच्या कंबरेला २ दोर अडकवलेले असतात. त्यातील एक त्याचा सुरक्षा दोर असतो आणि दुसरा पुरवणी दोर असतो. याच पुरवणी दोराचा वापर करून मुख्य चढाईपटूला लागणारी आवश्यक साधन पुरविण्याच काम सहकारी करत असतात.

आता उंची वाढल्यामुळे काकांनी मला वेगळ्या कोनातून फोटो काढण्यासाठी वेगळ्या दिशेस जाण्यास सांगितले. मी सुद्धा जागा पाहण्यासाठी कड्याच्या कडेकडेने लांबवर येऊन पोहोचलो. आता इथे एकटाच असल्याने माशा मारण्याशिवाय काही काम नव्हते. प्रदीप अद्याप माझ्या नजरेच्या टप्प्यात नव्हता त्यामुळे एक डुलकीही काढून झाली.

सर्व स्थिरस्थावर झाल्यावर प्रदीपने परत चढाईस हात घातला. आता टप्प्याटप्प्याने चढाई करत तो महत्वाच्या तिसऱ्या लेजवर पोहोचला. हि लेज आधीच्या लेजपेक्षा खूपच अरुंद होती. फुटभरच रुंदी होती आणि लांबीला साधारण १५-२० फुट होती. पण प्रदीपला त्या लेजवर कोणत्याही आधारशिवाय वावरताना पाहून त्याच्या बेडर वृत्तीला मनोमन सलाम ठोकला. आता शेवटच्या overhang टप्प्यातील साधारण १०० फुट चढाई उरली होती. प्रदीपने सुरेख हालचाली करत उरलेली चढाई संपवली आणि दुपारी बरोबर ३ वाजता सुळक्याच्या माथ्यावर पाय ठेवला आणि हर हर महादेवच्या घोषात उपस्थित गिधाडही सामील झाली.

१९.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२०.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२१.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२२.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२३.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२४.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

२५.
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range

वाइंड-अप करण्यात वेळ गेल्यामुळे खाली उतरते वेळीस अंधाराने मध्ये आम्हाला गाठलच. काळोख पडल्यामुळे वाट काही सापडत नव्हती आणि फिरून-फिरून सारख एकाच ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली परत येत होतो. शेवटी हताश होऊन सगळे तिथेच बसलो आणि तेव्हढ्यात मी झाडांना 'पाणी' घालण्यासाठी म्हणून उठलो तर माझ्या मागेच ती वाट होती. हायस वाटल, एक तर सकाळपासून पोटात फक्त चार बिस्कीट आणि १ बॉटल पाणी तेव्हढ ढकललं होत. धावत पळत बेसकॅम्प गाठला.

आज जेवणाची जबाबदारी मागहून आलेल्या राज बाकरेने घेतली होती. मसूरची उसळ, भात, पापड, लोणच, चपात्या आणि राजने आणलेले मेथीचे पराठे अस साग्रसंगीत जेवण होत.

तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी टीम क्लाइम्बची योजना आखण्यात आली होती. माथ्यावर प्रदीपने कालच दोर बांधून ठेवला होता त्याच्या साहाय्याने उर्वरित मंडळी झुमारिंग करत माथ्यावर जाणार होती. गेले २ दिवस चढ-उतार करून माझ्या अंगात त्राण उरले नव्हते म्हणून मी आज सुळक्यावर जाण्यास काकू करू लागलो. लागलीच प्रदीपने आपली शिव्यांची पोठडी उघडली, तेंव्हा म्हटलं हा खापर पणजोबांपर्यंत पोहोचण्याच्या आधी इथून सटकल पाहिजे. आज फक्त राज, केतन, हितेश आणि मी जाणार होतो. दोन तासांच्या ट्रेक नंतर आज परत सुळक्याचा पायथा गाठला. सर्व साधन बाहेर काढली पण ज्याच्या साहाय्याने चढाई करणार होतो तो झुमार मात्र हलगर्जीपणामुळे खाली बेसकॅम्पलाच विसरून आलो होतो त्यातच वौकीटाकी सुद्धा विसरून आलो होतो. आता परत कोणालातरी खाली जाऊन आणावं लागणार होत. मी नवीन असल्याने माझा पत्ता कट झाला आणि त्या जाणीवेने माझा परत राहुल गांधी *lol*

सकाळी सामान भरण्याच काम हितेशला देण्यात आल होत, त्यामुळे काकांचे बोल ऐकावे लागणार म्हणून बिचारा मनातून खूप खजील झाला. बिचाऱ्याने स्वतःची चूक कबुल केली आणि अक्षरशः धावत पळत बेसकॅम्पच्या दिशेने निघाला, त्याला धावताना पाहून आम्हीही तोंडात बोट घातली. उतारावरच तासाभराच अंतर त्याने फक्त १५ मिनिटात कापलं होत आणि त्याच आवेशात २ तासांचा ट्रेक एका तासात करून पुन्हा आम्हाला येऊन सामील झाला. आम्ही घातलेल्या गोंधळामुळे काकांनी मग प्रदीप आणि किशोरलासुद्धा देखरेखीसाठी पाठवून दिल.

सहभागी मंडळी:
किरण अडफडकर, प्रदीप म्हात्रे, किशोर मोरे, केतन कुलकर्णी, राज बाकरे, सतीश कुडतरकर, सन्नी वैती, हितेश साठवणे

गिरीविराज हाईकर्स
डोंबिवली

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2015 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा

तुंम्ही अ श क्य माणसे आहात. __/\__

तुषार काळभोर's picture

3 Mar 2015 - 4:10 pm | तुषार काळभोर

आमच्या एशी हापिसातल्या गोलगोल फिरणार्‍या खुर्चीत बसून हे वाचायला लई मज्जा आली!!
फोटूवरून कळतंय 'ते' कसं असंल असंल!!

आमचा हितनंच नमस्कार... तुमाला आन् हनुमान सुळक्याला!

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Mar 2015 - 7:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

आमचा ईथुनच नमस्कार. लई भारी फोटो...अशीच मेजवानी देत राहा आम्हाला वाचायला.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2015 - 4:26 pm | मुक्त विहारि

तुमच्या धाडसाला सलाम.

एक निरीक्षण, लेखागणिक तुमची लेखनशैली विकसित होत आहे.

सतीश कुडतरकर's picture

4 Mar 2015 - 5:00 pm | सतीश कुडतरकर

धन्यवाद! आपण सर्व आहातच कौतुक करायला!

वेल्लाभट's picture

3 Mar 2015 - 4:57 pm | वेल्लाभट

कमाल आहात साहेब तुम्ही लोकं ! च्यायला !
खल्ल्लास झालो वाचून आणि फोटो बघून.... ज ब रा ट !

वेल्लाभट's picture

3 Mar 2015 - 4:58 pm | वेल्लाभट

एकदा जमेल तेंव्हा तुमच्याबरोबर येण्याची मनिषा बाळगून आहे.

वेल्लाभट's picture

3 Mar 2015 - 5:00 pm | वेल्लाभट

म्हणजे; 'मला' जमेल तेंव्हा. :) आम्हाला खिले माहिती फक्त. बिले बिले शी ओळख नाही झाली अजून.

सतीश कुडतरकर's picture

4 Mar 2015 - 4:59 pm | सतीश कुडतरकर

जमत हो. काढा कधीतरी वेळ!

प्रचेतस's picture

3 Mar 2015 - 5:14 pm | प्रचेतस

अफाट लिहिलंय. लै भारी.

जगप्रवासी's picture

3 Mar 2015 - 5:55 pm | जगप्रवासी

एकदम मस्तच . खरच तुम्ही अशक्य मानस आहात. साष्टांग दंडवत स्वीकार करा

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !!!

पदम's picture

3 Mar 2015 - 6:56 pm | पदम

मस्तच. ग्रेट आहात तुम्ही.

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 12:11 am | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

खटपट्या's picture

9 Mar 2015 - 10:17 pm | खटपट्या

साहेब हे काय नवीन काढ्लंय... प्रतिसादाबरोबर लेख वर येणार.. कल्जी क्रु न्ये...

यशोधरा's picture

4 Mar 2015 - 5:15 pm | यशोधरा

कसलं भन्नाट!!

एक एकटा एकटाच's picture

9 Mar 2015 - 8:47 pm | एक एकटा एकटाच

पुन्हा एक जबरदस्त अनुभव

पॉइंट ब्लँक's picture

9 Mar 2015 - 9:51 pm | पॉइंट ब्लँक

--^--
कौतुक कराव तितक कमी आहे.

आनन्दिता's picture

9 Mar 2015 - 9:56 pm | आनन्दिता

___/\___

फोटो बघताना हार्ट अ‍ॅटॅक यायचा बाकी होता.

एकदा कीरण काकांचे आणी तुमच्या सर्वांचे पायांचे फोटो काढून पाठवा..

_/\_

आदूबाळ's picture

9 Mar 2015 - 10:37 pm | आदूबाळ

जबरी! सॉल्लिड आवडलं!