मराठी भाषा दिनानिमित्त

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
27 Feb 2015 - 1:00 pm
गाभा: 

आज कविवर्य कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. साजरा म्हणजे कसा? व्हॉट्सॅप फेसबुक ट्विटर वर हे शेकडोच्या शेकडो संदेश. मोठाले मोठाले संदेश. कविता काय, चित्रं काय, सुमार नाही. आजही तसंच चालू आहे. नाही नाही; माझा त्याला आक्षेप नाही. मुळीच नाही. पण शंभर संदेश पाठवल्यावर एकदा तरी आपण विचार करावा असं वाटतं. विचार हा, की संदेश पाठवण्यापलिकडे आपण खरोखर आपल्या भाषेवर प्रेम करतो का? 'अभिमान नव्हे; माज आहे' म्हणणा-या आपल्या वागण्यात तो माज दिसतो का? दिसलाच तर तो आपल्या गाडीच्या समोर आलेल्या गाडीला भोंगा वाजवून त्याच्याकडे रागाने बघण्यापेक्षा काही वेगळा असतो का?

बरं. मराठी भाषा दिवस झाला. आंतरजालावर अस्मिताप्रदर्शन झालं. पुढे काय करायचं हे त्याहून अधिक महत्वाचं आहे. 'भाषा काय आहे रे, एक माध्यम फक्त' असं म्हणणारे महाभाग मला भेटलेत. त्यांच्याशी तीव्र असहमती आहे. भाषा हे फक्त माध्यम नव्हे. भाषा हा संस्कृतीचा पाया आहे. भाषा असेल तर संस्कृती असेल. त्यामुळे भाषा जपायला हवीच. दुर्दैव हे की आपण आज आपली मातृभाषा न जपता इंग्रजी, हिंदी जपत आहोत कारण आपल्या खात्यात जमा होणारे पैसे आपल्याला या दोन भाषा देणार आहेत. 'मराठी येत नाही' असं म्हणणारी मराठी माणसं 'आईचं नाव माहीत नाही' असंच म्हणत असतात. इंग्रजी, हिंदी किंवा जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज हवं ते शिकावं माणसाने. पण मराठी येत नाही असं मात्र असू नये. आपला विचार नेहमी मातृभाषेतून होतो, तेंव्हा शिक्षण मातृभाषेतून होणं खूप महत्वाचं ठरतं. नाहीतर मग 'मी स्कूल मधे जाते', 'मला फीवर आलाय' असली धेडगुजरी भाषा माणूस पुढे आयुष्यभर बोलतो. 'मराठी बोललो तर डाउन मार्केट वाटतं' म्हणणारे नतद्रष्टही आहेत.

आपण मराठीचा या एका दिवशी जरी आग्रह धरला तरी त्याला चूक ठरवणारे अनेक असतील. ते चूक ठरवू शकतात कारण आपल्या आग्रहात एकी नसते. आपण मराठी माणसं काहीच करत नाही खरं तर. तामिळ, तेलगू प्रदेशात बघा कुणी सहजासहजी हिंदी बोलतं का. जपान मधे जा, इंग्रजीत बोलून आपलं काम सहज होतं का बघा. फ्रेंच लोकांची फ्रेंचबद्दलची अस्मिता, किंवा तथाकथित माज बघा. मग कळतं, की आपण खूपच सौम्य आग्रह धरतो.

हा विषय खूप मोठा आहे. परंतु त्यात अजून न शिरता, आपण काही साध्यात साध्या गोष्टी बघू, ज्या आपण करू शकतो, केल्या पाहिजेत.
१. मराठी लिहीण्याची सवय
२. मराठी वाचण्याची सवय
३. मराठी माणसाशी मराठीतच बोलणे (असं म्हणावं लागतंय कारण मुंबईत सर्व भाषा बोलणारी माणसं राहतात आणि 'मुंबईत जायचंय म्हणजे मराठी यायलाच हवं' हे ठसवण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. आपला चांगुलपणा म्हणू त्याला, की 'चल रे बाबा, तुला हिंदी येतं का, मी हिंदीत सांगतो' हे लाड आपण पुरवले.)
४. शिक्षणात मराठीला प्राधान्य देणे. (आज नुसत्या अस्मितेने काहीही होत नाही. मुळात शिक्षण हवं आणि ते मराठीतून असेल तर ती अस्मिता आपोआप रुजेल. त्यामुळे शिक्षणाची अस्मिता हवी, अस्मितेचं शिक्षण नको.)
५. सरकारी कामात मराठीचा आग्रह धरणे
६. मराठी सण, संस्कृती विचारपूर्वक (उगाच 'माज आहे. माज आहे' म्हणत नाही) जोमात साजरे करणे
७. एक मराठी भाषा दिवसच नाही तर प्रत्येक क्षण मराठीचा अभिमान बाळगणे.
८. मराठी भाषेचे शिलेदार कुणी ठराविक राजकीय पक्ष किंवा संघटनाच असल्या पाहिजेत असं गरजेचं नाही. आपण प्रत्येक जण तो वसा घ्यायला हवा. (अर्थात, डाऊन मार्केट वाटत असेल तर राहिलं मग)
९. कलाक्षेत्रात असल्यास मराठी कलाकृतींची निर्मिती करणे
१०. अगदी कट्टरतेच्या परिसीमा गाठायला नकोत पण उदारवादाच्या कक्षा नक्कीच ठरवल्या पाहिजेत.

माझ्यामते, हे इतकं जरी झालं, तरी मराठीला कमालीची उभारी देण्यात आपण सगळे मिळून सफल होऊ. सगळे मिळून हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्यात एकीचा अभाव जिथे तिथे आहे. कुठेच पड न खाण्याचा आपला ताठा एकत्रितपणे आपलाच घात करतो हे आपण अद्याप जाणलेलं नाही.

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि कुसुमाग्रजांना सादर नमन.

प्रतिक्रिया

बूट पॉलीश करणार्‍या माणसाशी मराठीत बोललो.

तो म्हणाला.."मराठी नहीं आती."

सुदैवाने दुसरा मराठी येणारा बूट पॉलीशवाला भेटला.

त्याच्या कडून बूट पॉलीश करून घेतले.

मी माझे प्रत्येक आर्थिक व्यवहार मराठी माणसांशीच किंवा मराठीत बोलणार्‍या माणसांशीच करतो.

एस's picture

27 Feb 2015 - 1:40 pm | एस

मीही. त्यामुळे उद्धट आणि स्वतःला अतिशहाणा समजणार्‍यांशी व्यवहार करावा लागला तरी त्यांच्यात दुकानात जातो. शेवटी एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाचे हित नाही पाहणार तर कोण पाहणार!

काही शहरांत अशी स्थिती असेलही...

पण आमच्या शहरांत अशी माणसे फार कमी.

तो म्हणाला.."मराठी नहीं आती."

मी या स्थितीला वेगळ्या पद्धतीने हाताळतो. 'मराठी नाही आती तर नाही आती, मी हिंदी मे बोलतो' :) असे मराठी शब्द व्याकरण घुसवत घुसवत त्यांना मराठी शब्दांची सवय करवतो. कमीत कमि स्वतःची हिंदी बिघडू नये म्हणून हळू हळू मराठी शब्द अवगत करण्याकडे कल वाढतो.

पैसा's picture

27 Feb 2015 - 2:04 pm | पैसा

अगदी कळकळीने आणि छान लिहिलंय. मात्र "मराठीचा माज" वगैरे गप्पा मारणारे बरेचजण आपल्या "किड्स"ना "इंग्लिश मिडियम स्कूल"मधे घालतात. आपण मराठी माध्यमात शिकलो. गरज पडेल तशा इतर भाषा शिकत गेलो. कुठे काही बिघडलं नाही. उलट आपण इतर धेडगुजरी बोलणार्‍यांपेक्षा इतर भाषाही व्याकरणशुद्ध बोलतो. हे बरेचजणांना मान्य होत नाही हे दुर्दैव.

भावना कल्लोळ's picture

27 Feb 2015 - 2:29 pm | भावना कल्लोळ

सहमत

>> मात्र "मराठीचा माज" वगैरे गप्पा मारणारे बरेचजण आपल्या "किड्स"ना "इंग्लिश मिडियम स्कूल"मधे घालतात.

ह्या वाक्याला टाळ्या!!

मधुरा देशपांडे's picture

27 Feb 2015 - 3:54 pm | मधुरा देशपांडे

सहमत.

सूड's picture

27 Feb 2015 - 3:26 pm | सूड

मी चेपुवर टाकलेल्या प्रतिक्रियेबद्दल पण एकजण असा उगाच वाद घालत होता. त्याचं म्हणणं होतं "अ‍ॅक्ट्रेस" म्हणजे नटी आणि "लीड रोल प्ले करणारी" ती अभिनेत्री!! म्हटलं तुमच्या सारख्याच लोकांमुळे हल्ली जाहिरातींची कायच्या काय भाषांतरं व्हायला लागलीत!

समोरचा मराठी आहे हे समजल्यावर अमराठी माणसाने आवर्जून मराठीत बोलणं यासारखा दुसरा आनंद नाही. मला असे अनुभव वारंवार येतात - इंदौरमध्ये मोठा झालेला पंजाबी मुलगा, बेळगावला मैत्रीण असणारी आणि त्यामुळे दरवर्षी दिवाळीत बेळगावला जाणारी ब्रिटिश मुलगी, "मुंबईत राहिलो म्हणून मराठी येतं" असं अभिमानाने सांगणारा बोहरी मित्र, असे अनेक.

मग "प्रत्येक व्यवहार मराठीतून बोलणार्‍या माणसाशीच करीन" किंवा "अपमान सोसूनही मराठी माणसाच्याच दुकानात जाईन" वगैरे टोकाचं वाटायला लागतं.

>>मग "प्रत्येक व्यवहार मराठीतून बोलणार्‍या माणसाशीच करीन" किंवा "अपमान सोसूनही मराठी माणसाच्याच दुकानात जाईन" वगैरे टोकाचं वाटायला लागतं.

तुम्हाला तसे अनुभव आलेत म्हणून तसं मत झालंय हो!! 'मेरा ना एज्युकेशन मराठी मिडियम मे हुवा है, बट आय कान्ट स्पीक इन टिपिकल अ‍ॅक्सेन्ट' असं बोलणारेही पाह्यलेत आणि कॉन्वेन्ट मध्ये शिकून पुणेकरांच्याही तोंडात मारेल इतकं शुद्ध मराठी बोलणारेही ओळखीत आहेत. त्यामुळे 'उडदामाजि काळेगोरे' चालायचेच!!

आदूबाळ's picture

27 Feb 2015 - 7:16 pm | आदूबाळ

उडदामाजि काळेगोरे +१

अगदी खरंय.

प्रभाकर पेठकर's picture

1 Mar 2015 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

मॅनहॅटनच्या गर्दीत शाकाहारी उपहारगृह शोधताना आमची आपापसात चर्चा चालली होती तेंव्हा 'तुम्ही मराठी का?' असा शुद्ध मराठीत प्रश्न विचारणारा चक्क एक अमेरिकन होता. तो पुण्यात २-४ वर्षे राहिला होता आणि तिथेच मराठी शिकला होता.

रेवती's picture

27 Feb 2015 - 6:57 pm | रेवती

छान लिहिलयत वल्लीबुवा!

असंका's picture

27 Feb 2015 - 7:02 pm | असंका

?

रेवती's picture

27 Feb 2015 - 7:04 pm | रेवती

माफ करा (मराठीत - सॉरी!). वेल्लाभट असे लिहायला हवे.

असंका's picture

27 Feb 2015 - 7:28 pm | असंका

'सोरी' म्हणजे 'माफ करा' अस्तंय होय हो? ते दुरदर्शन वाले तर 'दिल्गीर आहोत' असं कायतरी मनायचे सोरी साठी.

'माफ करा' हे तरी नक्की मराठी आहे का? क्षमा असावी हे मराठी असंल. (आंग्ल बाशेत एक्स्क्युझ मी!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 7:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

अवो, ह्ये वेल्लाभट हायती... आनी ते वल्लीबुवांचे डुआयडी न्हायती ! :)

माफी मागितलीये मी! काय झालय, डोळ्यांची (सहन)शक्ती कमी झालीये बाकीच्या कविता, त्यावरील प्रतिसाद, वाचून! मग असे महत्वाचे लेख वाचताना गडबड होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

अहो माफी-बिफी कसली मागताय ??? जरा गम्मत केली, इतकेच :)

बाकी, काही कवितांनी अनेकांंच्या डोक्याचे भजे केलेय याबाबतीत सहमती. +D

सुधांशुनूलकर's picture

27 Feb 2015 - 7:08 pm | सुधांशुनूलकर

आपण काही साध्यात साध्या गोष्टी बघू, ज्या आपण करू शकतो, केल्या पाहिजेत. :

आपल्या भमणध्वनीची भाषा (default language) मराठी ठेवावी. सर्व संपर्कनावं-क्रमांक मराठीत; इतकंच काय, लघुसंदेशही न चुकता मराठीत लिहावे. मी हे केलं आहे, म्हणून सांगतोय..

मिपावर आभार मानताना 'धन्स'ऐवजी 'अनेक धन्यवाद / आभार'...

जाता जाता गंमत - आपण एखादं मराठी पुस्तक / वर्तमानपत्र वाचत असलो आणि समोरचा माणूस आपल्याशी हिंदीत बोलला, तर त्याच्याशी मराठीतच बोलायचं, कारण तो १००% मराठीच असतो.

तसंही धन्स आजकाल फारच कमी जालंय. ते सगळयात बेकार इंग्रजीकरण वाटतं.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2015 - 7:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय.

मी माझे प्रत्येक आर्थिक व्यवहार मराठी माणसांशीच किंवा मराठीत बोलणार्‍या माणसांशीच करतो.

हम्म.एवढ्या कट्टरवादाची गरज नाही असे आमचे मत.वीज पुरवणार्या रिलायन्सच्या मुकेश,अनिलभाईंना मराठी बोलायचा आग्रह करणार का? टाटा सन्सच्या सायरस मिस्त्रींना?एच.डी.एफ.सी.च्या दीपक पारेखना?
भाषाप्रेमाचा अतिरेक नसावा.समोरची व्यक्ती मराठी असेल तर मराठीत बोला.अन्यथा हिंदी,इंग्रजी.

असो तुजो घोव् म्हणतां मगे?

सुचिकांत's picture

4 Mar 2015 - 1:50 pm | सुचिकांत

माई साहेब, भाषा प्रेमाचा अतिरेक नाही हा, स्वतःची भाषा जोपासणे एवढाच उद्देश आहे. भाषा आपण तेव्हाच जोपासू शकतो जेव्हा तिचा व्यवहारात शिक्षणात जास्तीत जास्त वापर वाढेल. तामिळनाडू मध्ये जाउन मराठीचा प्रचार करणे हा मुद्दा नाही त्यांचा! महाराष्ट्रात राहून मराठीचा प्रचार व प्रसार हा मुद्दा आहे आणि त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. वेळीच योग्य पावले उचलायला हवीत नाहीतर जशा अनेक भाषा नामशेष झाल्या आहेत आणि होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामध्ये मराठीचासुद्धा क्रमांक लागेल.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Feb 2015 - 5:58 pm | भाग्यश्री कुलकर्णी

माझी मुलगी इंग्रजी माध्यमात आहे.पण ती स्वताहून शामची आई वाचते.कोणीही सक्ती न करता...हे फार महत्वाचे वाटते मला...पुढची पिढी करते अनुकरण याचा फायदा घेउन मराठी रुजवू शकतो आपण त्यांच्या मनात....

भाग्यश्री ताई हा झाला भावनिक आणि अस्मितेचा मुद्दा पण युनेस्कोच्या अभ्यासानुसार मुलांना त्यांच्या मातृभाषेतून विषय जास्त चांगले समजतात.
तुम्ही युनेस्कोचे मत वाचा. आता असतील मुले इंग्रजी माध्यमात तरीही तेच विषय घरी समजवून देण्यासाठी त्यांची मराठी पुस्तके वापरा. जेणेकरून विषय जास्त चांगला समजेल. गुण मिळवणे सोपे आहे, परंतु विषय समजून त्यामध्ये स्वतःची भर घालणे, यासाठी मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे ठरते, आणि आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून संपूर्ण शालेय शिक्षण मराठीतून! कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी!

नूतन's picture

28 Feb 2015 - 6:44 pm | नूतन

भाषाप्रेमाचा अतिरेक नसावा.भाषा हे संवादाचे माध्यम आहेच ,हे ही ध्यानात ठेवले पाहिजे.जिथे जिथे मराठी वापरु शकतो तिथे ती वापरलीच पाहिजे.

वामन देशमुख's picture

28 Feb 2015 - 7:21 pm | वामन देशमुख

मराठीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी लँग्वेज सेव्ह करा!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा

खरा (एक) उपायः- आपल्या हुश्शार मुलांना इंजिनियर्,डॉक्टर वगैरे तत्सम मार्गांना - न टाकता, त्यांना मराठी (शिकवणारे) प्राध्यापक करणे.महाविद्यालयीन सुरवात त्या-विषयात शाखेनी करवणे. पण होते काय? ज्यांना (फक्त) कमी मार्क पडतात,त्यांच्याच साठी सदर शाखा आहे..अशी आपली धारणा आणि अंमलबजावणीपण आहे..मग काय होणार मरा'ठी चे? :)

यसवायजी's picture

28 Feb 2015 - 9:20 pm | यसवायजी

इंजिनियर्,डॉक्टर?
मार्क पडतात??
>>>
काय हे गुर्जी? असे इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे पाप हो पाप.

hitesh's picture

28 Feb 2015 - 11:30 pm | hitesh

एस वाय जी ? हेही इंग्रजीच ना ?

यसवायजी's picture

1 Mar 2015 - 12:13 am | यसवायजी

बर मग?

खटपट्या's picture

1 Mar 2015 - 12:33 am | खटपट्या

आवो हीतेस भाव ! तुमचा आयडी मराठीत लीवा आधी....

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

@इंग्रजी>>> ?????? :-\

आंग्ल म्हणा आंग्ल! :P

प्रभाकर पेठकर's picture

1 Mar 2015 - 1:19 am | प्रभाकर पेठकर

ज्यांना चेष्टा करायची आहे त्यांना करू द्यावी. आपल्याला मराठीत बोलणे, व्यवहार करणे आनंद देत असेल तर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा. आपल्या मुलांनाही ह्याची गोडी लावावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

अमित खोजे's picture

1 Mar 2015 - 11:06 pm | अमित खोजे

पटले. चेष्टा करणारे तसेही बरेच मिळतात. त्यामुळे आपल्याला स्वत:ला आनंद मिळत असेल तर मराठी वापरणे कधीही चांगलेच!

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2015 - 2:52 pm | नगरीनिरंजन

लेखाशी सहमत आहे. मराठी बोलायचं म्हणजे इतर भाषिक शब्द अजिबात वापरायचे नाहीत असे काहींना वाटते. इंग्रजीने जसे इतर भाषिक शब्द आत्मसात केले तसे बिनधास्त इतर भाषिक शब्द वापरायला हरकत नाही. जिथे मराठीतला शब्द बोजड आहे तिथे परभाषेतला सुटसुटीत शब्द वापरायला हरकत नाही; पण जिथे मराठीत आधीच चांगला शब्द आहे तिथे उगीच परभाषेतला शब्द कशाला? शिवाय व्याकरण मात्र शुद्ध मराठीच हवे. काही लोक हिंदी किंवा इंग्रजीसारखी वाक्यरचना करतात; तो प्रकार फार डोक्यात जातो.

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 3:37 pm | टवाळ कार्टा

आजच लोकसत्तामध्ये "गर्व महाराष्ट्राचा" या पुरस्काराची बातमी वाचली :(

छान लिहिले आहे वेल्लाभटजी. १० मुद्दे जे तुम्ही मांडले त्यापैकी खालील मुद्दा अतिशय प्रभावी ठरू शकतो, अर्थात प्रत्येकाने तो अंमलात आणला तर!
४. शिक्षणात मराठीला प्राधान्य देणे. (आज नुसत्या अस्मितेने काहीही होत नाही. मुळात शिक्षण हवं आणि ते मराठीतून असेल तर ती अस्मिता आपोआप रुजेल. त्यामुळे शिक्षणाची अस्मिता हवी, अस्मितेचं शिक्षण नको.)