गुंतागुंत - (पार्ट -२)

Maheshswami's picture
Maheshswami in जनातलं, मनातलं
23 Feb 2015 - 5:33 pm

पार्ट -१ इथे वाचा.Part-1

"सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो .

अकरा वाजता जाग आली. उठल्या उठल्या खालच्या एसटीडी बूथ वर गेला आणि नेत्राला फोन केला. काही विषय नव्हताच बोलायला , आत्ता चार तासांपूर्वीच भेटलेले, तरीही अगदी अर्धा तास गप्पा मारल्या. राहिलेल्या कॉईनसचं काय करावे हा विचार करतानाच अभयला वाटले कि चला अबोलीला फोन करूया. तिलाही हि गोड बातमी सांगितली पाहिजे. त्याची प्रत्येक गोष्ट आधी अबोलीला माहित असायची. तिचा नम्बर फिरवला, तिकडून मंजुळ आवाज आला
"अबोली हिअर"
"अगं , अभय बोलतोय"
काही क्षण पिन ड्रौप सायलेन्स.
"बोल रे , कशी झाली काश्मीर ट्रीप ?"
"तुला कसं माहिती ट्रीप बद्दल?"
"अरे, मंदार ने जायच्या दिवशी फोन केला होत. त्यानेच सांगितलं तू पण येतोयस सोबत"
एकदम सूर पालटला तिचा.
"आणि आपलं फोन नाही करायचं ठरलं होतं अभय? का अवघड करून ठेवतोयस सगळं ?"
"अगं , ऐकून घे. तुला खूप खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक काम कर, आज ऑफिस नंतर शिवसागरला भेटूया. पुढे काहीच विचारू नकोस. बाय".
एवढे बोलून अभयने फोन ठेवला. आज जवळपास दीड -दोन महिन्यांनी बोलले होते ते.

आज ऑफिस ला उशिराच जाणार होता तो. असं करू , अबोलीला "शिवसागर" मध्ये भेटू साडे सहाच्या सुमारास. एखाद्या तासांनी , आठ वाजता नेत्रा सोबत जवळपासच डिनर घेऊ. कामात मन लागत नव्हतं आज. अबोलीला कधी एकदा नेत्राची आणि त्याची बातमी सांगतोय असा झालं होतं. कुठलीही गोष्ट तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय चैन नाही पडायची अभयला. ठरलेल्या वेळेआधीच, जाऊन पोचला शिवसागर वर, सहा पस्तीसला अबोली आली. दिवसभराच्या कामाच्या थकव्यानी असेल बहुतेक पण एकदम थकल्यासारखी दिसत होती. अभयला पाहून जाम खुश झाली.
"काय गं , विरहात वेडी झाली का माझ्या?" मिश्किल स्वरात अभय म्हणाला.
"नाही रे , तू गेल्यापासून एवढे चौइस मिळालेत कि , कुणाला निवडावे या विवंचनेत आहे." हसत हसत ती मिळाली.
एका क्षणात रुसवे, फुगवे पळून गेले. असेच होते दोघंही . कितीही दिवसांनी भेटले तरी अवघडलेपणा आजीबात नसायचा. नातंच तसं होतं त्यांचं. काश्मीर ट्रीप च्या गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत , गरमागरम वडा सांबारच्या डिश आल्या टेबलवर.
"बोला , काय गोष्ट सांगायची आहे? अतिरेकी वगैरे झालास का तिकडे जाऊन?"
"अतिरेकी तर तू आहेस , कामाचा अतिरेक करतेस"
"गप्प रे, सांग आता जास्त उत्सुकता ताणू नकोस. ए पण ऑन अ सिरिअस नोट, तू खूप वेगळाच दिसायला लागला आहेस. असं काहीतरी समाधान, आत्मविश्वास, आनंद झळकतोय तुझ्या चेहऱ्यावर"
"Thanks, अगं गोष्ट अशी आहे , कि मी प्रेमात पडलोय"
"काय, खरंच ? कोणाच्या ? आय होप एखाद्या मुलीच्या !" डोळे मिचकावत म्हणाली ती.
"हो , नेत्रा !"
"काय?" काही क्षण काहीच बोलली नाही ती.
"हिरा आहे रे हिरा ती पोरगी. कसली छान चोइस आहे तुझी. मी खूप खुश आहे , फायनली यु मेड अ राईट डिसिजन एंड चोइस. "
तो भरभरून बोलायला लागला त्याच्या आणि नेत्राबद्दल. काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. ते कसे भेटले, त्याचं आजारपण , तिने पकडलेला त्याचा हात सगळं काही नॉन स्टोप सांगत सुटला. अबोली नुसतं कौतुकाने ऐकत होती. घड्याळात पहिले अभयने तर पावणे आठ झालेले.
"अगं , किती बोलतोय मी एकटाच. बहुतेक आता निघावे लागेल, नेत्रा येईल आठ वाजता सुभद्रा वर."
"ओके , लगेच संपवते कॉफी " ती म्हणाली
"काय गं अबोली , पण तू काय ठरवले आहेस पुढचे?"
कडक उन्हं पडलेली असावीत , ढगांचा मागमूसही नसताना अचानक धो धो पाऊस पडावा तशी अचानकच ती रडायला लागली. गांगरून गेला तो.
"अगं काय झालं?"
ती काहीच बोलायला तयार नव्हती. नुसती रडत होती. काही सुचेनासं झालं अभयला.
"सॉरी रे , मी खूप वाईट आहे बहुतेक. पण तू सांगितलंस हे सगळं , आणि खुश होण्याच्या ऐवजी खूप वाईट वाटतंय मला. खूप राग येतोय नेत्राचा अन तुझा. खूप एकटे एकटे वाटायला लागलंय. विसरणार तर नाहीस ना रे मला? तुझ्याशिवाय गेले दोन महिने कसे गेले माझे मलाच माहिती. सॉरी रे ! मी काय बोलतेय आणि काय करतेय हे? बहुतेक ही माझी जेलसी आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात एक असा क्षण येतो , कि एखाद्याला ती सर्वस्व बहाल करते. भरभरून प्रेम देते, मी ते तुझ्यावर केलं होतं. पण बहुतेक आपल्या नशिबी सोबत राहणं नाहीये. आणि मीच कारणीभूत आहे त्याला . चल, बेस्ट लक नेत्राला आणि तुला !"
असं म्हणत मागच्या वेळेसारखीच कॉफी अर्धी टाकून निघून गेली. सुन्नं होवून बसून राहिला अभय बराच वेळ तिथे. काहीच सुचेनासं झालं त्याला. काय गुंतागुंत होऊन बसली हि सगळी. च्यायला आपल्या जीवनात कुठली गोष्ट सरळ म्हणून होत नाही. शापित आहे जीवन सगळं. त्याच विचारात घाईघाईत सुभद्रा वर जाऊन पोचला. नेत्रा आधीच हजर होती. एकदम छान सजून आली होती. सोबत गुलाबाचं एक सुंदर फुल पण आणलं होतं त्याच्यासाठी.
"का रे , किती उशीर हा? लग्नानंतर हे चालू नाही देणार!"
कशाने काय माहिती पण त्याचा मूड मगाच्या गोष्टीमुळे अगदी ऑफ झाला होत. उगीच लटके हसू चेहऱ्यावर आणून हसला तो नेत्राकडे पाहून. "सॉरी " एवढंच म्हणाला.
"अरे , कशी दिसतेय मी? बघ तुझ्या आवडीच्या रंगाचा पिंक ड्रेस घातलाय"
अभयच लक्षच नव्हतं.
"अगं , हो ना कसली छान दिसतेयस. वॉवं !"
"हे बघ अभय, मला सरळ दिसतेय कि काहीतरी बिनसलंय तुझं आज. तसं असेल तर डिनरचा प्लान क्यान्सल करू आपण "
"नाही गं , पुण्यात गाडी चालवणं म्हणजे डोकं भंजाळून जातं. सॉरी. चल, जाम भूकेजलोय . "
अभयने पूर्ण प्रयत्न घेतले मूड परत आणायचे . बऱ्याच अंशी त्याला त्यात यशही मिळाले. नेत्रा एकदम खुशीत होती. "पुढच्या महिन्यात मी चाललेय सुरतला, काकांशी बोलीन तेव्हा. तू पण बोलून घे घरी तुझ्या. "
"हो चालेल" म्हणून अभयनी तिला तिच्या घरी सोडलं.
घरी पोचल्यावर त्याला झोपच यायला तयार नाही. अबोली सोबतची ती भेट राहून राहून आठवायला लागली. अबोली आपल्यावर अजूनपण खूप प्रेम करते. वेड्यासारखं अगदी. तिला फक्त समजत नाहीये कि काय महत्वाचे आहे तिच्यासाठी जीवनात. आपल्याला कोण आवडते खरंच? अबोली कि नेत्रा? आपण चूक करतोय का नेत्राला वचन देऊन. कदाचित अबोली ला वाईट वाटावे म्हणून तर आपण नाही न नेत्राला प्रपोज केले? कि खरंच प्रेम आहे आपले नेत्रावर? कि फक्त एक कोम्प्रमाइज केलंय आपण तिला लग्नाच वचन देऊन? आपल्याला नेत्राच्या प्रेमाबद्दल एवढ्या शंका का येत आहेत ? अबोलीच आहे का आपलं खरं प्रेम ? तिला एवढे वाईट वाटतंय त्याचं आपल्याला का एवढं वाईट वाटतंय? काहीच समजेना झालं त्याला. जाम टेन्शन आले. रात्रभर जागाच होता अभय.

त्या दिवशीपासून , अबोलीने फोन घेणंच बंद केले त्याचे. पण त्या दिवशी तिनं ,तसं बोलून इक्वेशन बदलून टाकले होते सगळे. नेत्राला हळू हळू इग्नोर करायला लागला अभय. भेटीगाठी टाळू लागला. नेत्राने बरेच खोदून खोदून विचारले पण अभयने काही सांगितले नाही. एक दिवशी अचानकच त्याचा घरी येउन थडकली नेत्रा.
"काय रे अभय , काय झालेय? फोन वर नीट बोलत नाहीस, दिवस रात्र ऑफिस मध्ये बिझी असतोस. आधीसारखं हसून बोलत नाहीस?"
"नाही गं तसं काही नाहीये. जरा काम जास्त आहे एवढेच"
"बरं , ऐक उद्या मी सुरत ला चाललेय. काकांशी बोलून झाल्यावर, ते तुला फोन करतीलच"
गप्प बसला अभय. शेवटी धीर एकवटून म्हणाला
"नेत्रा , तुला काहीतरी सांगायचं आहे. नीट ऐक. आणि प्लीज रडू नकोस"
घाबराघुबरा चेहरा झाला नेत्राचा. कशीबशी आवंढा गिळून म्हणाली
"बोल"
"हे बघ नेत्रा, मी आपल्या दोघांबद्दल बराच विचार केला. आणि काही कारणास्तव मला असं वाटतेय कि खूप घाई होतेय लग्नाची वगैरे. बहुतेक मला अजून विचार करायला वेळ पाहिजे. भावनेच्या भरात मी लग्नाला हो म्हणून गेलो , पण मला वाटतेय कि आय एम नॉट रेडी यट"
चक्रावून गेली नेत्रा . धीर सुटला तिचा.
"अरे काय बोलतोयस तू हे अभय? तुला कळतंय का काही ? भातुकलीचा खेळ आहे का हा? क्षणात हो आणि क्षणात नाही ? तुला दुसरं कुणी आवडायला लागलंय काय?"
"ते महत्वाचं नाहीये नेत्रा. पण मला वाटते कि तू तुझ्या घरच्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करून टाकावे. तू जास्त खुश राहशील. मी नाही लग्न करू शकणार एवढ्या लवकर. आणि मला विचार करायला पण वेळ पाहिजे. माझं खरंच चुकलं . जमलं तर माफ कर मला . "
पोटात तीळ तीळ तुटत होतं अभयच्या तसं बोलताना. पण पर्याय नव्हता. उगीच भावनेच्या भरात काही निर्णय घेऊन फायदा नव्हता. ओक्साबोक्शी रडायला लागली नेत्रा. खूप वाईट वाटले होते तिला.
"नेत्रा , ऐक अग… "
"बास अभय , आता एक शब्दही नकोस बोलु. काहीच अर्थ नाही त्याचा." अभयला अर्धवट तोडत नेत्रा म्हणाली. आणि निघून गेली जड पावलांनी.
खूप वाईट वाटत होतं अभयला. काय तो बाहुला बाहुलीचा खेळ . खूप चुकलं आपलं. अबोली सोबतच्या ब्रेक-अप ने एकटेपण आलं होतं . त्याच नाजूक क्षणी नेत्रा जीवनात आली , तिने थोडी काळजी घेतली आणि आपण त्याला प्रेम समजून बसलो. बिचारीच्या नाजूक मनाचं वाट्टोळ करून टाकलं आपण . ह्याला क्षमा नाही.
तेव्हापासून नेत्राने त्याचे फोन घेणंही बंद केलं. अजिबात तोडून टाकलं अगदी.
पंधरा दिवसांनी मंदारचा फोन आला.
"अभ्या , माफ कर यार , नेत्रा वरून उगीच चिडवले तुला मी. पण खरच मला वाटलं कि तुमचं काहीतरी चाललंय "
"ओके , बोल कशी काय आठवण आली ?"
"अरे, नेत्राला सोडायला नाही आलास काल? गेली न सगळं सामान बांधून सुरतला ?"
"काय सांगतोयस, अचानक एकदम ?"
"तुला नाही बोलली ती?"
"नाही रे "
"म्हणे , तिकडे जाउनच जॉब हुडकणार आहे ती. आणि सुरत म्हणजे फैमिली सोबत पण राहायला मिळेल."
फोन ठेवल्यावर खूप ओझे आले त्याच्या मनावर. अपराधी वाटायला लागले. उदास झाला एकदम तो. काहीच समजेना काय करावे. आपल्या हातून असं काही घडेल असा विचार पण नव्हता केला त्याने कधी.
अबोलीही फोन उचलत नव्हती. सरळ तिच्या ऑफिस मध्ये गेला अभय त्यादिवशी .
"काय चाललंय अबोली , का उलटं पालटा करून टाकलायस मला? फोन नाही उचलत. बोलत नाहीस. परत फोन करीत नाहीस. इमेल्स इग्नोर करतेस?"
"अभय , वेडा आहेस का ? नेत्राशी लग्न करतोयस न तू ? माझ्यापासून आता दूर झालं पाहिजे तुला. मी योग्य तेच करतेय"
"प्रेम करतेस कि नाही माझ्यावर? एवढंच सांग"
दोन सेकंदांचा पौज घेऊन अबोली म्हणाली
"नाही करत ! तू स्पेशल आहेस. एकदम चांगला मित्र आहेस, आणि कदाचित कधी मी तुझ्यावर प्रेम केलं असेल पण. बट नॉट एनी मोअर. त्या दिवशी शिवसागर मध्ये भावनेच्या भरात बहकले मी. नाजूक क्षणी पाय घसरला माझा. असो… नेत्रा काय म्हणतेय? नीट काळजी घे तिची. "
तो नुसता तिच्याकडे पाहत उभा राहिला. काय बोलतेय ही ?
"आणि प्लीज आता या पुढून मला बोलायचा , भेटायचा प्रयत्न करू नकोस. एका चांगल्या नोटवर संपू दे हे सगळं"
डोक्यात मुंग्या आल्या होत्या त्याच्या. जाम रडायला येत होतं. हातपाय गार पडले होते. काही न बोलता तसाच निघून आला अभय तिथनं. सगळं गमावलं होतं त्याने. सगळं ……

रात्री झोपेशी झगडावे लागू नये म्हणून भरपूर दारू ढोसून आला घरी. झोप लागली लवकर , पण चित्रविचित्र स्वप्नांनी थैमान घातले होते झोपेत. पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये नेत्रा त्याच्याकडे पळत यायची , तिचा हात तो हातात घेणार तोवर धाड धाड आवाज करत मुंबई सुरत एक्सप्रेस त्या दोघांमधून निघून जायची , ट्रेन गेली तर नेत्राच्या जागी अबोली उभी असायची. मागे पहिले तर अबोली आणि नेत्रा काळे गॉगल्स लावून हुंदके देत दूर जात असायच्या. हात जाम थंड पडलेले असायचे अभयचे. अशा स्वप्नांनी तळमळत होता नुसतं.
लहानपणी खेळून आला कि जाम भूक लागलेली असायची अभयला. "आई खायला दे काहीतरी" म्हणला कि आई नेहमीप्रमाणे म्हणायची "टेबलावर ठेवलाय बघ खाऊ . एक ताई साठी आणि दुसरी तुझ्यासाठी आहे वाटी!" खरं तर त्या दोन्ही वाट्या त्याच्यासाठीच असायच्या. तो जाऊन लगेच दोन्ही वाट्या मधला खाऊ फस्त करायचा. खूप मजा यायची, नेहमी काहीतरी सरप्राईज असायचे वाटीमध्ये. पेढे, गुलकंद , बोरं , द्राक्षे आणि बरच काही.

तेवढ्यात आई आली स्वप्नात. म्हणाली "तुझ्यासाठी काहीतरी ठेवलाय बघ काहितरि टेबलावर". फार उत्सुकतेने अभय गेला टेबलाकडे. पहिल्या वाटीवरचं झाकण काढलं तर रिकामी होती. घाईघाईत दुसरीवरचं पण झाकण काढलं आणि पाहतो तर काय तीही रिकामी. आणि मग मात्र अगदी जवळचं कुणीतरी गेल्यासारखं जीवाच्या आकांतानं ढसाढसा रडू लागला तो ……

कथालेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

23 Feb 2015 - 6:16 pm | रेवती

हम्म.....खरीच गुंतागुंत.

अभयचा मूर्खपणा, दुसरं काय?

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 7:16 pm | टवाळ कार्टा

या पोरी अश्याच नको तो घोळात घोळ घालून ठेवणार्या अस्तात ... आणि शेवटी काडी टाकून जातात

बहुगुणी's picture

24 Feb 2015 - 2:54 am | बहुगुणी

कथा आवडली, पण कथानायकाने ओढवून घेतलेली गुंतागुंत वाटली. भावनिक मूर्खपणा, की दोन्ही डगरींवर हात ठेवण्याचा प्रयत्न अंगाशी आला? तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं!