आनंदाचे डोही

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
18 Feb 2015 - 3:09 am

बाबु मोशाय सांगून गेलायं
आनंद मरा नही.... आनंद मरते नही....
आनंद जिवंत असेल, अगदी भले आपल्या आसपासही असेल,
पण आपल्याशी सतत लपाछपीचा खेळ कां खेळत असतो?
आत्ता आपण त्याच्याबरोबर हसत खेळत होतो,
आणि क्षणातच कुठे नाहीसा झाला?
खरचं बरोबर असलेला तो आनंदच होता,
की कोणी तोतया?

आनंद कसा दिसतो, कुठे रहातो, काय खातो,
आपण वेगळेवेगळे तर्क करीत असतो.
तो ना समोरच्या आलिशान बंगल्यात रहातो...
छे! त्या आलिशान बंगल्यात फ़क्त त्याची सावत्र भावंडे रहातात.
ईर्षा आणि घमेंड. ती आनंदचे कपडे घालून
खोटे खोटे हसत आनंदचा भास निर्माण करतात....
त्या अमक्याने म्हणे तीन कोटीचा आणखी एक फ़्लॆट घेतलाय!
अंबांनींच्या बाजूच्या ईमारतीत!
त्यात काय! माझा लंडनचा विला विकून मी असे चार फ़्लॆट घेऊ शकीन!
ईर्षा आणि घमेंड ह्या सावत्र भावंडांच्या संगतीलाच आलिशान बंगल्यातले ’ते’ आनंद समजतात.
खरं तर आनंद त्या बंगल्याच्या पायथ्याशी असलेल्या एकखणी झोपडीत रहातो.
दिवसभर थकूनभागून आलेल्या कष्टक-याच्या तोंडात पडणारा भाताचा घास बनून.
सतरंजीवर विसावलेल्या त्याच्या अंगावर गाढ झोपेचे पांघरूण घालून, आनंद देखील तिथेच पहुडतो.
छे छे! ते काही खरे नाही. आनंद असा दमलेल्या कामगाराच्या नीजेला क्षणासाठी रहात जरी असला, तरी दुस-याच दिवशी उपाशी पोटी ओझी वहातांना आलेल्या घामाच्या धारांमधे भिजायला तो मुळीच थांबत नाही..

आनंद खरचं कुठे रहातो हे कोणालाच माहित नसते. किंबहुना तो फ़ार काळ एका जागी टिकत देखील नाही. लक्ष्मीप्रमाणेच अगदी चंचल स्वभावाचा आनंद फ़ुलपाखरासारखा इथून तिथे बागडत रहातो. कोणालाही ओंजळीत धरून ठेवता येत नाही.

चंचल आनंदाचा स्त्रोत सतत फ़ुललेला असावा म्हणून कुणीसे आनंदाचे झाडच लावले असते आपल्या घरात. येणा-या जाणा-यांमधे या झाडाचा बहर वाटून मालक स्वत:साठी अखंड आनंद मिळवित असतो! कधी तुमच्या भाग्याने तुम्ही अशा घरी पाहुणे म्हणून गेलात, तर आनंदाच्या दोन चार झुळुका तुम्हीही अनुभवू शकता. पण कुपीत बंद करून तो घेऊन कसा जायचा?

आनंदाच्या शोधात असतांना जरी हुलकावण्या देत असला, तरीही तो वेगवेगळ्या रुपांनी तो आपल्याला अधुनमधुन सुखद दर्शन देत असतोच. पण ह्या निसटत्या दर्शनाने आपले समाधान होत नाही, आपल्याला त्याला नेहमीसाठी डांबून ठेवायचे असते, म्हणून अगदी पोटभर आनंद मिळाला तरी आपण उद्यासाठी शिदोरी बांधून ठेवायला बघतो. पण आनंदाला कोणीच आजवर बांधून ठेवू शकलेला नाही. आपण कधी चित्ररुपाने, कधी गप्पागोष्टी, आठवणींमधून, कधी वाचनामधून आनंदाला पुन्हा खेचून आणण्याचा प्रयत्न करतो जरूर. पण, ’त्या’ क्षणांची सर कधीच येत नाही. आनंद हा नवनविन रुपांमधे, ताजातवाना होऊनच आलेला असेल तेव्हाच मोलाचा ठरतो.

आनंदाची जी विविध रुपे आपल्या आजुबाजुला दिसतात, त्याचीही एक गम्मत असते.
कुठे तो उमलत्या पाकळ्यांवरचे दव बिंदू बनून अवतरतो. कधी कळ्यांचे निश्वास होऊन सुगंधी मोहरतो. एखाद्या तळ्यांत दिसणरे हलते चंद्रबिंब होतो, कुठे निळ्या आकाशात लहरणारी पांढरी शुभ्र बकमाळ होऊन उडतो. एखाद्या लहानग्याला घट्ट छातीशी धरतांना तो आपल्यामधे सामावतो, तर कधी पिडीतांचे अश्रु पुसतांना आपल्या रुमालावर ठिबकतो. छनछनणा-या सुवर्णमुद्रिकांमधे, नोटांच्या को-या करकरीत वासामधे, पावसात विनाकारण धावतांना लागलेल्या धापेमधे किंवा उन्हात राबतांना गाळलेल्या घामामधे देखील आनंद आपली चाहूल देऊन जात असतो. ही आणि अशी कित्येक रुपे आपल्या भोवती आणि आपल्यासाठी देखील घेऊन आनंद आपल्याला भेटून जात येत असतो.

मघा म्हटले ना, समोरच्या आलिशान बंगल्यात, आनंद नव्हे, त्याची सावत्र भावंडे – ईर्षा आणि घमेंड रहातात म्हणून? तुम्हाला असे वाटत असते की तिथे काही खरा आनंद रहात नाही. तुमच्या गैरसमजुतीने कदाचित तुम्ही त्याला अशी नावे दिली नाहीत कशावरून? तिथला मालकासाठी आनंदाने घेतलेले ते आणखी एखादे रुप कशावरून नसेल? कामगार उन्हात राबतांना निथळणारा घाम पाहून कदाचित तुम्हाला त्याचे कष्टच जाणवत असतील. पण त्याच्यासाठी रोजची रोटीभाकरी मानाने मिळवून देणारा आनंद असतो तो!

अशी आनंदाची बहुरुपी गाथा. आनंदाचे असे एका जागी स्थित रुप किंवा झाड वगैरे नसते. तर सृष्टीच्या कणाकणात, प्राण्यांच्या अंतरंगात, सर्वत्र पसरलेला असा इश्वर म्हणजे आनंद असतो. आजुबाजुला घडणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक तरंग हा आनंदाचा असतो. मग भलेही तो सातमजली हास्य घेऊन येवो, मृदू स्मित घेऊन किंवा अगदी अश्रुंची धार घेऊन येवो. आनंदेश्वराचा तो प्रसाद असतो.

तुकाराम सांगून गेलेतच नां? “आनंदाचे डोही आनंद तरंग.....”

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

तुलना करू लागलो की आनंदाच्या कपच्या उडतात.