असा मी अबब मी - १

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in तंत्रजगत
3 Feb 2015 - 8:11 am

"हाय पप्पू, हाय रीटा, नमस्ते काका, मावशी कशी आहेस? आम्ही स्क्रीनवर बरोबर दिसतो का? बरोबर ऐकू येतं का? तुम्ही सगळे दिसतात बरं का." सारा.

"नमस्ते! काय रिची, ग्रेसी, सारा, आदित्य, कसे आहात सगळे? पडद्यावर दिसतात पण ठीक आणि ऐकू पण नीट येतंय." देसाई.

" ऐकू पण ठीक येतंय. आम्ही सगळे मस्त, मजेत. बरं वाटलं सर्वांना बघून. संग्यावर का होईना! संग्या म्हणजे संगणक ऊर्फ कॉम्प्यूटर बरं का मंडळी. अरे वा, रेणू आणि मंडळी पण हजर होताहेत, काय जै श्रीकृष्ण केतनभाई, केम छो? जै श्रीकृष्ण हन्साबेन! कशी आहेस? रेणूबेबी केवढी मोठ्ठी झालीस? केव्हा येऊ उंधियूं खावामाटे हन्साबेन? तुम्हाला आम्ही दिसतो का? ऐकू येतं का नीट?" रीचर्ड.

"आम्ही सगळी मस्त मजेत! मेनी मेनी थॅन्क्स टू यंग जनरेशन. त्यांच्यामुळेच तर आपण स्क्रीनवर दिसते बोलते. गॉड ब्लेस यू यंग पीपल!" केतनभाई.

"ग्रेसीमावशी रिचीकाका, आदित्य तिघही दिसताहेत. साराचा आवाज येतोय पण दिसत का नाही ती?" पप्पू देसाई.

"भुतं दिसत नाहीत नेटवरून! फक्त बोलतात." आदित्य परेरा.

"तू भेट तर खरा मग आम्ही तिघीही बघतो. एकटी रेणूच तुझी वाट लावेल. लहान असतांना कशी मारायची लक्षात आहे ना?" रीटा देसाई.

"खरंच कवा पण या सगळे सुरतला उंधीयू खायला! एक गेट टुगेदरच करून टाकूया!" हन्साबेन.

"पहिलं आमच्याकडे पुरणपोळी खायला या. मुंबई सेन्टर प्लेस आहे." सीमा देसाई.

"पण वसई मस्त हिरवीगार आहे. संध्याकाळी फिरायला भरपूर ठिकाणं, ताजा म्हावरा आणि विहिरीच्या पाण्यातलं चुलीवरचं जेवण. मुंबईत काय आहे तुमच्या?" रिचर्ड.

"तुझा म्हावरा तुला लखलाभ! आम्हाला चुलीवरची साकरोटीच पाहीजे. यंग जनरेशऽऽन, टॉस करा आनि डीसाईड करा पयले कोण कुठे जाणार ते. खालीपिली मारामारी नाय पायजे." केतनभाई.

"दर वर्षी संक्रांतीला आमच्याकडे. पतंग पण उडवता येतील. रक्षाबंधन पण आमच्याकडेच जोरदार असते." हन्साबेन.

"चालेल. लहानपणी नाही का सगळे रेणूकडेच रक्षाबंधन करायचे. पण क्रिसमसला वसईला आलात तर आनंदच होईल." रिचर्ड.

"पण गणपतीला आमच्याकडे आलात तरच. दिवाळीत देखील आलात तर आनंदच होईल." देसाई.

"आमच्याकडून पक्का! केम बच्चा लोग?" केतनभाई.

"तुमच्याकडे दोनदोन फेस्ट. आमच्याकडे एकच? बहोऽऽत बेइन्साफी है! आणखी एक दिवस ठरवा, तरच ऍप्रूव्हल!" सारा.

"संक्रांत जानेवारीत. तेव्हा सुरतला रेणूकडे. नंतर परीक्षेचा मोसम. मग पाऊस, थेट रक्षाबंधनाला ऑगस्टमध्ये सुरत. गणपतीत रीटापप्पूकडे मुंबई. परत दिवाळीत मुंबई. मग ख्रिसमसला साराआदित्यकडे वसई. संक्रांत ते रक्षाबंधन म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट. मोठी दरी आहे. मध्ये केव्हातरी भेटूयात. ठीक आहे सारा तुझ्याच बर्थडेला मे मध्ये. हापूस आंबे पण खायला मिळतील." रीटा.

"ओके! ओके!! ओके!!!" जवळजवळ सगळेच.

"ग्रेसीमावशी पहिलं ते नॅनो वगैरे बोलूयात का?" पप्पू.

"हो, हो! नॅनो फर्स्ट!" देसाई.

"हो मावशी, हो! नॅनोच फर्स्ट!" रीटा.

"सरकलेला मेंदू नीट जागेवर बसव रीटा." आदित्य.

"नॅनो मेंदू!" पप्पू.

"मावशी बघ ना कसे चिडवतात ते!" रीटा.

"अलेलेलेलेले ..... ! आमच्या लाडोबाला चिडवू नका लेऽऽऽ!" आदित्य.

"मावशी दोन चकण्या, लाल डोळ्यांच्या, पिंजारलेल्या केसांच्या, काळ्याकुट्ट, जाड्याढोल अशा हिडींबा आण आणि या आदिमानवाच्या आणि पप्पुड्याच्या गळ्यात बांध ग एकेकीला! चांऽऽगल्या उरावर बसूंद्यात त्यांच्या!" रेणू.

"रेणू तिरकिट रीटातून्ना, रीटा तिरकिट सारा धिन्ना." पप्पू.

"ए देहलीबाज, चूप!" रीटा.

"सर्वत अगोदर जिला नॅनोतंत्र शिकायचे आहे म्हणून त्याबद्दल आणि क्वान्टम मेकॅनिक्सची प्राथमिक माहिती हवी आहे तिची ओळख करून देते. ही माही. आमची नवी शेजारीण आणि मैत्रीण. हिच्यामुळे आपण सगळे नॅनोमय होऊन जाणार आहोत. माही ये अशी वेबकॅमसमोर उभी राहा. एकेकाचे नाव घेतल्यावर हात वर करा हं!" रीटा.

"नाहीतर सारा मिस बेंचवर उभं करेल." पप्पू.

"पाय वर केला तर चालेल?" आदित्य.

"O ! O. स्टुप्पिड्ड! चूप!! दोन्ही पाय वर कर!!! आणि माही ही स्क्रीनवरची सर्वात उत्साही, पुढे भी असलेली सारा, तिची आई ग्रेसीमावशी आणि तिचे बाबा रिचीकाका आणि त्यांच्या बाजूला तिचा भाऊ आदित्य. ग्रेसीमावशी, रिचीकाका केतनकाका आणि माझे आईबाबा एकाच शाळेत होते. हिंदू घरातलं माझं नाव रीटा हे ग्रेसीमावशीनेच ठेवलं बरं का." रीटा.

"हाय रीटा, हाय आदित्य, नमस्ते देसाईकाका, नमस्ते सीमामावशी." माही.

"हाय माही! मी सारा. ती दुसर्‍या कॅमसमोर दिसते आहे ती चिंटी रेणुका आणि ते तिच्यामागचे तिचे आईबाबा केतनकाका आणि हन्सामावशी. पूर्वी आमच्याच इमारतीत राहायचे. तीन वर्षापूर्वी सुरतला गेले. आणि हो, आदित्यचं नाव सीमामावशीने म्हणजे पप्पूरीटाच्या आईने ठेवलं बर का." सारा.

"हाय रेणू, नमस्ते केतनकाका, नमस्ते हन्सामावशी!" माही.

"आज भरपूर गप्पा. तीन वर्षांची कसर भरून काढूयात. गप्पात व्यत्यय न आणता जमेल तेवढं नॅनो. बाकीचं दोन आठवड्यांनी. तोपर्यंत सगळ्यांनी माहिती जमवायची आणि नेटवर भेटल्यावर प्रत्येकाने आळीपाळीने सांगायची. अशी मेऽऽडमॉईशेऽऽल ग्रेसी ऊर्फ आई यांची ऑर्डर आहे होऽऽऽऽ" सारा.

क्रमशः