अतिद्रुत लयकारी अतितार सप्तक

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
30 Jan 2015 - 4:01 pm
गाभा: 

तर हल्ली त्या इनसिंक वरचे वादक / गायक बघितले कि साधारण लयीत बरोबर चाललेले अचानक तिहायांवर तिहाया आणि काहीतरी तिरकीत धीराकीत करीत समेवर येऊन एकमेकांकडे 'जितं मया' थाटात बघतात हे बघून मला आमच्या गुरुजींनी सांगितलेले काही जुने किस्से आठवले

१. एका प्रख्यात सतारवादक आणि व्हायोलीन वादकाची जुगलबंदी चालू होती ..प्रत्येकाच्या साथीला १ १ मशहूर तबलजी ... जो वाजवत असेल त्याचा तबलजी त्याची साथ करत असे...दोघेही वाजवतांना दोन्ही तबलजी वाजवत होते ...हळू हळू एक जण वाजवतांना दुप्पट तिप्पट चौपट अशा चढत्या लयीत वाजवून मैफिल काबीज करू लागला ... अशक्य तिहाया घेऊन सम गाठतांना पाहून श्रोते भलतेच चेकाळू लागले...हे पाहून दुसर्या वादकाने आपले वादन संपवून पहिल्या कडे देतांना आपल्या तबलजीला सांगितले xxxxखां ठेका चालू रक्खो ...हे ऐकून पहिला वादक चमकला आणि त्याच्या लयक्रीडेला एक्दम खीळ बसली ... आणि मग सगळे छान चालू झाले ..

सवाई गंधर्वला एक नर्तक सादर करतांना लय वाढवत वाढवत तबलजीला xxxसादजी और जादा और जादा करत ८ पट लयीत सुद्धा वाढवायला सांगू लागले तबलजी शेवटी तीना तिन्तीना असे अति द्रुत लयीत काहीतरी वाजवू लागले आणि अचानक हे नर्तक मात्र नेहीमिच्या १ पटीत पदन्यास करू लागले ...तबलजी भडकले आणि समरप्रसंग उद्भवला

त्यावरून अजून आठवले कि हल्लीच्या काही प्रख्यात आणि पूर्वीच्या अतिप्रख्यात गायिकांच्या आवाजाची रेंज हि ३-३.५ सप्तके इतकी आहे ...परंतु हल्लीच एक कार्यक्रम ऐकल्या वर तर गाण्याच्या मध्ये आवाज सतत इतका वर ठेवायचा कि ह्यांचे मूळ सप्तक कुठले हेच मुळी लक्ष्यात राहत नाही.....ह्यापुढे त्यांचे गाणे ऐकायचे नाही असे ठरवले ..

असो...तर कुठल्याही चित्तकर्णचाक्षुम्कारिक गोष्टीला टाळ्या पिटायला मिळाल्याशी कारण असे श्रोतेसुद्धा मानतात...आणि हे सगळेच मग फोफावत जाते ...

कालाय तस्मै नम:

प्रतिक्रिया

तिमा's picture

30 Jan 2015 - 5:28 pm | तिमा

ह्याला आम्ही स्टंटबाजी असेच म्हणतो. तुम्ही कोणाचे नांव घेतले नाही. पण परवीन सुलताना, गाताना इतक्या वरच्या सप्तकात ताना मारतात की त्या किंचाळल्याचाच भास होऊ लागतो आणि गाण्यांतले माधुर्य नहीसे होऊन, ते नुसते लोकांना अवाक करणारे प्रदर्शन होते.
रोशन आरा बेगम इतक्या जलद लयींत ताना मारत की, गाणारी व्यक्ती जिवंत माणूस आहे का एखादे मशीन आहे, असा प्रश्न पडे.

परवीन सुलतानांबद्दल एकदम सहमत.

बॅटमॅन's picture

30 Jan 2015 - 6:18 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....

असेच काहीसे नुसरत फतेअलींच्या बाबतीत व्हायचे.
पण त्यांचे गाणे कधीच नीरस वाटले नाही.

रामपुरी's picture

30 Jan 2015 - 8:00 pm | रामपुरी

एक प्रसिद्ध गायक चूक केली म्हणून थपडा मारून घेतात. अर्थात चूक झालेली नसतेच किंवा असली तर अगदीच किरकोळ
आणखी एक प्रसिद्ध गायिका तबलजी/पेटिवाला/साउंड सिस्टीमवाले यापैकी एकाला तरी समज दिल्याशिवाय गाणे चालू करत नाहीत
स्टंटबाजी :) :)

कंजूस's picture

31 Jan 2015 - 11:26 pm | कंजूस

स्टंटबाजीचं गाणं ऐकून संगीतातलं न कळणाऱ्यांनाही गाणे समजू लागतं हा एक फायदा .

अत्रन्गि पाउस's picture

1 Feb 2015 - 12:31 am | अत्रन्गि पाउस

खरे गाणे नसते ..हीच तर खंत आहे

राही's picture

2 Feb 2015 - 7:40 pm | राही

ज़ाकीर साहिबांचे दोन कार्यक्रम गेल्या वर्षी ऐकले. एक तर अति द्रुत लय आणि शेवटी शेवटी तर तबल्यातून आगगाडीचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे असले काहीतरी चित्तकर्णचमत्कारिक प्रकार दाखवणे सुरू केले.पब्लिक टाळ्या वाजवून वाजवून दमले. प्लेइंग टु द गॅलरीज़ किती करावे! खरंतर मोठ्या कलावंतांना याची गरज का पडावी असा प्रश्न मनात येतो. त्यांची लोकप्रियता आणि मोठेपणा आधीच स्थापित झालेला असतो. की श्रोते सगळे बावळट असतात असेच हे लोक धरून चालतात?

अत्रन्गि पाउस's picture

2 Feb 2015 - 10:43 pm | अत्रन्गि पाउस

गुस्ताखी माफ असे म्हणून मग असे म्हणावेसे वाटते कि
इतक्या मोठ्या कलाकारांनी हे असे वागणे हा 'गुन्हा' आहे ..तुम्ही लोकांची अभिरुची घडवायची वाढवायची का क्षुल्लक ४ टाळ्यांसाठी ह्या अश्या सवंग गोष्टी करायच्या ?
...असो ...