इराकची खातून

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in जनातलं, मनातलं
29 Jan 2015 - 12:25 pm

अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री. आज तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पण तरीही तिचं नाव इराकच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये टिकून आहे.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान अरब जगात ब्रिटीश सरकरने अनेक चाली खेळल्या. तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याविरूद्ध त्यांनी अरबांशी मैत्री केली होती. 'लौरेन्स ऑफ अरबिया' या चित्रपटामुळे प्रसिध्द झालेला टी. इ. लौरेन्स हा यातला मुख्य कारभारी होता. गरट्रुड बेल ही दुसरी. दोन्हीही इतिहासाचे, पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक. त्यासाठी ते अरबस्तानात आले. पण ब्रिटीश सरकारने त्यांचा उपयोग इतिहास घडवण्यासाठी करून घेतला!

गरट्रुड ही व्हिक्टोरिअन समाजात जन्मलेली आधुनिक विचारांची स्त्री. प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड उर्जा आणि साहसी असलेली. ऑक्सफड विद्यापीठात इतिहास या विषयात तिने पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवली. परंतु त्याकाळी स्त्रियांना पदवी दिली जात नव्हती. शिक्षणानंतर काय करायचं, हा प्रश्न तिला सतावू लागला. वडील श्रीमंत होते, पण व्हिक्टोरिअन समाजात राहणं तिला आवडत नव्हतं. तिने मार्ग शोधला तो वाळवंटात. तो ही मध्ययुगात जगणाऱ्या समाजात. जेरुसलेम, दमास्कस, जॉर्दन या पट्ट्यात ती इतिहासाच्या अभ्यासासाठी फिरू लागली. हे देश अस्तित्वात येण्याच्या आधीचा हा काळ. टोळ्यांमध्ये राहणारी लोकं, स्त्रियां काळ्या अवगुंठनात राहणाऱ्या.

पुढे गरट्रुड बेल मेसोपोटेमियात आली. मैलोनमैल वाळूने भरलेल्या या परिसरात पुरातन वस्तूंचा शोध घेत ही शिडशिडीत बांध्याची स्त्री भटकत होती. अनेक टोळ्यांच्या शेखांशी अरबीत आत्मविश्वासाने संवाद साधत होती. तेही तिला आदराने वागवत होते.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याला तुर्कस्तानच्या सैन्याने सळो की पळो करून सोडले होते. गालीपोलीची लढाई ही मित्र पक्षांसाठी फार मानहानीकारक ठरली. याच युद्धात गरट्रुडचा प्रियकर मारला गेला. या पराभवानंतर ब्रिटीश सरकारने वेगळी चाल खेळली. भारतातून सैन्य मेसोपोटेमियात (इराक) उतरवायचं आणि तिथून तुर्कांना हाकलायचं. जवळच्या पर्शियात तेव्हा नुकतंच ब्रिटीश पेट्रोलियम कंपनीला तेल गवसलं होतं, ते ही जपायचं होतं. भारतातून आलेल्या सैन्याला रस्ता दाखवण्याचं काम गरट्रुड बेलकडे सोपवण्यात आलं.

पुढे महायुद्ध संपलं, तुर्क हरले आणि संपूर्ण अरब जग ब्रिटीश आणि फ्रेंचांच्या ताब्यात आलं. आज या देशांमध्ये आणि पर्यायाने जगामध्ये असलेल्या अशांतीला त्यांनी त्यावेळी खेळेलेलं राजकारण जबाबदार आहे. महायुद्धानंतर झालेल्या शांतता परिषदेत गरट्रुड ही एकमेव महिला अधिकारी होती. तिच्यावर जबाबदारी होती ती इराकचा नकाशा घडवण्याची. तिच्याशिवाय या भागाला जाणणारं कुणीही नव्हतं. ती घडवत असेलला देश तीन भागात विभागलेला होता- उत्तरेकडच्या भागात कर्दवंशीयांचं प्राबल्य, मध्यभागी सुन्नी पंथीय आणि दक्षिणेकडे शिया पंथीय. या तीन तुकड्यांना जोडून तिने इराकचा नकाशा घडवला. या देशाच्या ठसठशीची मूळ यात दडलेली आहेत.

पुढचा प्रश्न होता, हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा? इराक म्हणजे अनेक धर्म आणि पंथांचा गोतावळा. त्यासाठी पुन्हा बरंच राजकारण घडलं आणि ब्रिटीश सरकारने मक्केच्या शरीफांच्या मुलाला सिंहासनावर बसवलं. त्याची आणि इराकी जनतेची ओळखदेख नव्हती. पण चाणाक्ष ब्रिटीशांना तेलाची काळजी होती. शिवाय गरट्रुने आपल्या सरकारला इथली सामाजीक आणि धार्मिक वीण नीट उलगडून दाखवली होती. तिची या आयात केलेल्या राजे फैसल यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली. हळूहळू या राजांनी राज्यावर पकड बसवली, तसे ब्रिटीश अधिकारी मायदेशी परतले. पण तिने मात्र इराकलाच आपला देश मानला होता. राजकारणातून अंग काढून घेऊन ती पुन्हा पुरातन वस्तूंच्या शोधात फिरू लागली. हा ऐवज ती सहज मायदेशी पाठवू शकली असती. तिथल्या वस्तुसंग्रहालयात देशोदेशींच्या वस्तूंमध्ये या वस्तूंनाही जागा मिळाली असती. पण तिने पाठपुरावा करून बगदादला संग्रहालय उभं केलं.

या कामादरम्यान ती आजारपणाने त्रासली होती, निराशेने तिला घेरलं होतं. ब्रिटनला परत न जाण्याचा तिचा निर्धार मात्र ठाम होता. सात भाषा पारंगत असणारी ही विदुषी, लेखिका, आल्प्स पर्वतराजीतले शिखरं सर करणारी, तळपत्या सूर्याचा तडाखा सहन करत वाळवंट तुडवणारी, राजे, धर्मगुरू, शेख, सामान्य स्त्रिया सर्वांशी चर्चा करणारी. पण तिचा जीवनातला आनंद संपला होता. १९२६ साल. तिचा अठठावन्नावा वाढदिवस दोन दिवसांवर येऊन ठेपला होता. पण त्याआधीच तिने झोपेच्या गोळ्या घेऊन जीवन संपवलं.

पहिल्या महायुद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी जिथे चिरनिद्रा घेतली तिथेच तिनेही घेतली. अलीकडे इराकचा भडका उडाल्यावर तिची आठवण लोकांना पुन्हा येऊ लागली आहे, तिचे लेखन धुंडाळले जाते आहे. इराकी लोकांमध्ये आपापसात वैर असले, तरी तिच्याविषयीचा आदर मात्र आजही टिकून आहे. त्यांच्यासाठी ती 'खातून' होती - इराकची खातून.

(अन्यत्र पूर्वप्रकाशित - मूळ लेखात थोडे बदल केले आहेत.)

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 1:24 pm | मृत्युन्जय

नविन माहिती. चांगला लेख. धन्यवाद. पुलेशु.

राजाभाउ's picture

29 Jan 2015 - 1:29 pm | राजाभाउ

वा: छान. नविन माहिती मिळाली.

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 1:40 pm | अनुप ढेरे

छान लेख. आवडला...

आवडला लेख.त्या काळातल्या अरब विश्वात एका स्त्रीने इतके मानाचे स्थान मिळवले,देशाचा नकाशा घडवला.कशाकशातून गेली असेल ती.तिचे काही अात्मचरित्र आहे का? वाचायला आवडेल.

विशाखा पाटील's picture

29 Jan 2015 - 3:17 pm | विशाखा पाटील

तिची शेकडो पत्रे, दैनंदिनी, तिने काढलेले फोटो असं बरंच साहित्य न्यूकासल विद्यापीठाच्या siteवर उपलब्ध आहे. 'धागे अरब जगाचे' लिहितांना पत्र संदर्भासाठी वाचली होती. परंतु भाषा व्हिक्टोरिअन काळातली आणि बारीकसारीक details भरपूर आहेत. इंग्रजीत तिची दोनतीन चरित्रही आहेत.

सानिकास्वप्निल's picture

30 Jan 2015 - 8:32 pm | सानिकास्वप्निल

मस्तं लेख, खूप छान माहिती मिळाली.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन बघते आता :)

सविता००१'s picture

29 Jan 2015 - 2:01 pm | सविता००१

नवीन माहिती मिळाली एका विदुषीची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

इराक आणि गर्ट्रूडची रोचक माहिती !

सर्वसाक्षी's picture

29 Jan 2015 - 2:26 pm | सर्वसाक्षी

चांगला लेख

या मॅडमबद्दल काहीच माहिती नव्हते. अतिशय धन्यवाद माहितीकरिता.

सोबतच त्यांच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग, फोटो, एखादी लिंक, इ. दिल्यास अजून बरे झाले असते.

विशाखा पाटील's picture

29 Jan 2015 - 3:29 pm | विशाखा पाटील

धन्यवाद! मिपावर फोटो टाकायचे कसे, हे शिकावं लागेल. फोटो, नाव, लेखन हे सर्व इथे बघा - http://gertrudebell.ncl.ac.uk/

बॅटमॅन's picture

29 Jan 2015 - 6:08 pm | बॅटमॅन

धन्यवाद! पाहतो.

खटपट्या's picture

30 Jan 2015 - 6:13 am | खटपट्या

काय जबरद्स्त साईट आहे. आपणसुद्धा आपल्या ऐतिहासीक कागदपत्रांची अशी साईट बनवायला पाहीजे. मोडीतल्या कागदपत्रांचे भाषांतर करणे हे एक अव्हान आहेच.

भारी, परंतु आटोपशीर लेख. थोडी अजून माहिती टाकून दोन-तीन लेखांची एक मालिका लिहू शकाल काय ह्या विषयावर?

इशा१२३'s picture

29 Jan 2015 - 6:14 pm | इशा१२३

खातून आवडली...

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2015 - 7:53 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला, नवी माहिती..
थोडी अजून माहिती टाकून दोन-तीन लेखांची एक मालिका लिहू शकाल काय ह्या विषयावर?
स्वॅप्स शी सहमत,
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 9:32 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

पैसा's picture

29 Jan 2015 - 9:09 pm | पैसा

नवीन ओळख!

आरोही's picture

29 Jan 2015 - 9:31 pm | आरोही

खूपच छान लेख !!

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2015 - 11:08 pm | बोका-ए-आझम

इतकं नाट्यमय आयुष्य जगलेल्या स्त्रीच्या आयुष्यावर काही चित्रपट वगैरे आहेत का? नसतील तर आश्चर्यच आहे!

हाडक्या's picture

29 Jan 2015 - 11:36 pm | हाडक्या

येतोय येतोय.! एका आठवड्यात येतोय.. :)
इथे झलक पहा.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2015 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

चांगली माहिती दिलित. धन्यवाद.

बटाटा१'s picture

30 Jan 2015 - 12:18 am | बटाटा१

माहीती आवडली..

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 7:11 am | श्रीरंग_जोशी

या विदुषीबद्द्ल प्रथमच वाचले. या लेखनासाठी धन्यवाद.

मिपावर फोटो प्रकाशित करण्याबद्दल मदत येथे आहे.

मिपाच्या मदत पानाचा दुवा काही महिन्यांपासून मुखपृष्ठावरून गायबला आहे. कधीही तांत्रिक अडचण आल्यास खरडफळ्यावर लिहा. नेहमी कुणी ना कुणी ऑनलाइन असतेच. विनाविलंब शंकानिरसन होईल.

बबन ताम्बे's picture

30 Jan 2015 - 8:08 pm | बबन ताम्बे

सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला

हे वाचून वाईट वाटले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच इजिप्तच्या अरब स्प्रिंगमध्ये काही प्रमाणात झालं. या दोन्हीतल्या बर्‍याचश्या वस्तू कवडीमोलाने पाश्चिमात्य संग्रहालयांत किंवा तथाकथित खाजगी संग्राहकांच्या (कलेक्टर) साठ्यात जमा झाल्या असणार. :(

जुइ's picture

30 Jan 2015 - 9:34 pm | जुइ

थोडी अजुन विस्तृत माहिती येउद्या!

सस्नेह's picture

30 Jan 2015 - 9:51 pm | सस्नेह

सुरेख ओळख आणि सुंदर लेख !
या काळात अशा 'झपाटलेल्या' व्यक्ती दुर्मिळ झाल्या आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 10:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतिहासाची पुनरावृत्ती सतत होतच राहते...

ही आजची बातमी...

Iraqi libraries ransacked by Islamic State in Mosul

...He reported particularly heavy damage to the archives of a Sunni Muslim library, the library of the 265-year-old Latin Church and Monastery of the Dominican Fathers and the Mosul Museum Library with works dating back to 5000 BC.

विशाखा पाटील's picture

1 Feb 2015 - 9:34 am | विशाखा पाटील

खरंय. असंच मध्ययुगात घडलं होतं. अब्बसीद खालीफांच्या काळात बगदादला समृद्ध ग्रंथालय होतं. त्याकाळी या राज्यात पूर्व आणि पश्चिमेकडच्या ज्ञानाचा मिलाफ होत होता. पण पुढे मध्य आशियातल्या मंगोलांनी बगदादवर हल्ला केला, चेंगीझ खानाच्या मंगोल फौजांनी पुस्तकं नदीत फेकली.
तेव्हा परक्या फौजांनी ते विध्वंसक काम केलं, आता ते कृत्य तिथलेच लोक करतायत, हाच काय तो फरक...

मराठी कथालेखक's picture

13 Apr 2016 - 4:13 pm | मराठी कथालेखक

चांगला लेख