हॉस्टेल लाईफ आणि नवरस

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
27 Jan 2015 - 11:25 am

हॉस्टेल ला राहाण हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो . हॉस्टेल लाईफ बद्दल एकदम वाईट अनुभव असणारे लोक आणि एकदम भन्नाट अनुभव असणारे लोक असे दोन गट . अधल मधल काहीच नाही . सुदैवाने मी दुसर्या गटात मोडतो . खालचे अनुभव माझे असले तरी थोड्या फार फरकाने हॉस्टेल मध्ये राहिलेल्या प्रत्येकाचेच .

हास्य रस - माझ इंग्रजी तेंव्हा यथातथाच होत . छोट्या शहरामधून आल्यामुळे mannerism चा पत्ता नव्हता . सकाळी शिक्षकांना आल्या आल्या good morning म्हणायचे असते हे नुकतेच कळले होते . एकदा रात्री रस्त्यावर फिरताना रेक्टर सर भेटले . त्याना बघितल्या बघितल्या मी 'Good Night Sir ' म्हणून मोकळा झालो . सरांनी दुसऱ्या दिवशी केबिन मध्ये बोलावून दंड ठोठावला . 'प्रश्न पैशांचा नाही . पण Good Night हे निरोप देताना म्हणायचे असते हे तुझ्या मठ्ठ डोक्यात शिरले पाहिजे . " सरांनी दंड का या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . गरवारे कॉलेज हॉस्टेल नदी काठी आहे . अकोल्याच्या सुमित केडिया ने हि नदी गंगा नदी आहे असे सांगत आमच्याशी तासभर वाद घातला होता . नवीन पोरांचा 'इंट्रो ' घ्यायला रुबाबात आम्ही निघालो आणि त्या मोकार ज्युनियर पोरांनी आमचाच इंट्रो घेतला होता . आज ती पोर मित्र बनली आहेत पण अजूनही तो इंट्रो चा प्रसंग आठवला की हसू येत .

बीभत्स रस - हॉस्टेल लाइफ़ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा रस . आमच्या हॉस्टेल ची मेस लावणे सगळ्यांना सक्तीचे होते . त्यामुळे झक मारून तिथच जाव लागायचं . मेस चा मालक भाऊ च एक लाडक मांजर होत . त्याला हाड हुड कुणी केलेलं पण भाऊ ला खपायच नाही . त्यामुळ ते मांजर कुठेही फिरायचं आणि पडायचं . एकदा त्याला मी आणि माझ्या मित्राने कोबी च्या गड्ड्यावर प्रतीर्विधी उरकताना बघितलं होत . त्याच दिवशी पानात कोबी ची भाजी आली . मी आणि मित्र सटकलो काहीतरी कारण सांगून . आणि बाकीच्यांचं जेवण झाल्यावर आम्ही हे गुपित फोडलं . त्यांची प्रतिक्रिया काय होती हे इथे सांगू शकत नाही . आमच्या रूम च्या अस्वच्छतेच्या तर दंतकथा पसरल्या होत्या . रूम ला महिनो ना महिने झाडू लागत नसे . रूम मध्ये एवढा कचरा होता की त्यात एक छोटी बादली हरवली होती . ती होस्टेल सोडताना सापडली . त्या कचरा आणि दुर्गंधी युक्त रूम मध्ये आम्ही तिघ जण लोळत पडलेलं असू . एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते . आमच्या संवेदना मेल्या होत्या पण त्याच वेळेस मला भेटायला चुलत भाऊ आला होता . तो अजूनही सांगतो की त्यावेळेस जो वास सर्वत्र पसरला होता तो जगताला सगळ्यात किळसवाणा वास होता . आणि तो केमिकल अभियंता आहे .

अदभुत रस - अदभुत म्हणजे आश्चर्य आणि उत्सुकता . घरात अनेक वर्ष एक सुरक्षित आयुष्य काढून हॉस्टेल ला आल्यावर पोहोता न येणाऱ्या माणसाला एखाद्या खोल विहिरीत ढकलून जस वाटत तस वाटत . हॉस्टेल हे जंगला सारख असत . survival spirit उच्च ठेवून राहावं लागत . एकदा आपल्या समानधर्मी मित्रांचा कळप जमला कि हे होतकरू नवोदित विद्यार्थी हे सुंदर जंगल explore करायला लागतो . तोंडात लोणच्याची फोड ठेवायला लागल्यावर तोंडात वेगवेगळ्या चवींचे हवेहवेसे स्फोट होतात तस हॉस्टेल मधला प्रत्येक नवा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो . हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र . पाकिस्तान कसा नष्ट करता येईल , रूम मधल्या ढेकणा चा बंदोबस्त कसा करावा , भारत नेहमी विदेशी भूमी वर सामने का हरतो , पोरी कशा फिर्वाव्यात अशा अनेक विषयावर रात्र रात्र झालेल्या चर्चा , महाराष्ट्र आणि देशातल्या विविध भागातून आलेले मित्र , त्यातून झालेली वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख , आणि जगाचे झालेलं नवीन आकलन . हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो .

क्रौर्य रस - होस्टेल हि एक खूप क्रूर गोष्ट पण आहे . अर्धेंदू नावाचा एक अर्धवट डोक्याचा पोरगा होता . त्याला वागण्या बोलण्याचा फारसा पोच नव्हता . इतर पोर त्याला छळ छळ छळायची . एकदा एका मुली ने तुला कार्ड दिल आहे आणि तुला भेटायला बोलावलं आहे अस सांगून आपणच एक कार्ड त्याच्या हातात कोंबल . त्या येड्याला पण ते खर वाटलं . आणि त्या पोरी समोर जाऊन काही तरी बोलल . पोरीन त्याला थोबडावला . बिचारा अर्धेंदू होस्टेल सोडून गेला . हॉस्टेल ला काही पूर्वोत्तर राज्यातून आलेली काही मुल होती . दिसायला एकदम वेगळी आणि भाषेचा प्रश्न . ग्रामीण भागातून आलेली इरसाल पोर त्याची जाम मजा घ्यायची . पण ते कधी कधी खूप अति करत . आपण किती रेशियल लोक आहोत हे तेंव्हा मला कळल . नंतर ती पुर्वोतर राज्यातली पोर एकजात सगळी लष्करात गेली . पण देशाचा उर्वरित भाग आपल्याला 'आपल ' समजत नाही हे फिलिंग त्यांच्या डोक्यातून गेल असेल का कधी ?

भय रस आणि रौद्र रस - आमच्या हॉस्टेल ला रोज सकाळी ६ ते ६. ३० पीटी सक्तीची होती . आम्ही एखादा बकरा पकडून त्याला रूम ला बाहेरून कडी लावून घे आणि जा असे सांगून स्वतः मध्ये लोळत पडत असू . नंतर नंतर आजूबाजूच्या रूम मधले पोर पण सकाळी तिथे येउन पडायला लागले . रेक्टर सरांना याची कुणकुण लागली . एका दिवशी आम्ही असच बाहेरून कडी एकाला लावायला सांगितली आणि लोळत पडलो होतो आणि सर धाडकन दरवाजा उघडून मध्ये आले . आणि जमेल तसे हात पाय चालवायला सुरु केले . तो प्रसाद ग्रहण करत आम्ही धडपडत बाहेर आलो . नंतर २ आठवडे आम्हाला कॉलेज च्या मोठ्या मैदाना ला १५ चकरा मारण्याची शिक्षा मिळाली .

शृंगार रस - बीभत्स रस हा सर्वाधिक आढळणारा रस असेल तर शृंगार रस हा सर्वाधिक अभाव असणारा रस . अर्थात काही मोजक्या वीरांचा अपवाद वगळून . जो काही शृंगार रस असतो तो एकाच format मध्ये . ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल .

वीर रस - हॉस्टेल तुम्हाला शूर बनवत . घरून आलेला खाऊ इतरांपासून लपवून एकट्याने खाणे , एखाद्या खोडकर अंग्काठीने मोठ्या पोराला अंगावर घेणे , बंदी असताना रात्र भर पत्त्याचा डाव रंगवणे , खिशात शेवटचे ५० रुपये असताना महिन्याचे १५ दिवस काढणे , हॉस्टेल चे गेट ९. ३० ला बंद होत असते तरी पण रात्री पिक्चर बघायला जायचं आणि एका अवघड खांबाचा आधार घेऊन चढून जाण एक ना दोन प्रकार . खूप भितींवर मात करायला हॉस्टेल शिकवत .

शांत रस - हॉस्टेल सोडण्याचा दिवस . सगळीकडे एक विचित्र ओक्वर्ड शांतता . सगळीकडे सामानाची बांधाबांध चालू . बाहेर निरव शांतता पण डोक्यात कल्लोळ . हे हरामखोर मित्र पुन्हा कधी भेटतील ? बाहेरच जग हॉस्टेल सारखच मजेशीर आणि भन्नाट असेल का ? आता कुठ राहायचं ?दुसऱ्या मेस चा मालक आपल्या मेस मालक भाऊ सारख बाहेर जेवायला जाताना पैसे उधार देईल का ? बिपीन आणि प्रभाकर सारख फास्ट फुड दुकान दुसरीकडे असतील का ? हॉस्टेल च्या खिडकीत बसून पडणारा पाऊस आणि नदीच वाढत जाणार पाणी तासंतास बघायला कसली मजा येते आता ती गेलीच का ? आपले ऋणानुबंध फ़क़्त या हरामी मित्रांसोबत च नव्हते तर या भव्य इमारती शी पण होते हे शेवटच्या दिवशी कळत .

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 11:31 am | मुक्त विहारि

आवडला...

होस्टेलचे मित्र मात्र शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत, हे एकदम पटले...

बस यादें.. यादें.. यादें.. रेह जाती है.
कुछ छोटी छोटी बातें रेह जाती है..

:)

लेख उत्तम.. खोल्यांचा कुबटपणा, तरीही त्यात साठलेला स्वतःचा सवयीचा सुखद कम्फर्ट, मुलींचे मन आणि स्वभाव (!!) यांच्या चर्चा, महाभारतापासून पेशव्यांच्या विषयांवर ऐतिहासिक वाद (बा-चा-बा-ची), कधीकधी भोळा आदर्शवाद किंवा क्रांतिकारक शक्तिवर्धक विचार, रूममेट्सच्या सवयी आणि मंत्रचळ, आणि बरंच काही दरवळून आलं.

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 8:15 pm | पिंपातला उंदीर

मुलींचे मन आणि स्वभाव (!!)

कळला हो टोमणा ! *lol* *LOL* :-))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2015 - 1:53 am | निनाद मुक्काम प...

चला ,आता वाड्याचा पुढचा भाग येणार तर

सस्नेह's picture

27 Jan 2015 - 11:44 am | सस्नेह

जुन्या आठवणी जाग्या करणारा.
...अर्थात मुलींच्या होस्टेलात बीभत्स आणि क्रूर-रसाचा अनुभव इल्ले.. *smile*

सुबोध खरे's picture

27 Jan 2015 - 11:47 am | सुबोध खरे

काही गोष्टी पटल्या काही नाही.
एकदम वाईट आणि एकदम चांगले या मध्ये काही नाही हे पटले नाही.
सुरुवातीचा अनुभव सगळ्यांनाच थोडा फार वाईट येतो. घर पासून आणि कुटुंबापासून दूर राहिल्याने होम सिकनेस हा सर्वांनाच होतो. नंतरचा काळ अधिक आनंदाचा असतो. किंबहुना आयुष्यातील अत्याधिक आनंदाच्या कालापैकी हा एक कालावधी असतो असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरू नये.
होस्टेलच्या खोल्या घाणेरड्या असल्याच पाहिजेत असे नाही. आमच्या मजल्यावर १२ खोल्या होत्या कोणाचीही खोली इतकी घाणेरडी असली तर त्याला ब्लान्केट ट्रीटमेंट (किंवा तत्सम) मिळे. ( म्हणजे दाराला बाहेरून कडी घालू खिडकीतून सडकी अंडी फेकली जात. किंवा दाराला भरलेली बदली दोरीला लावून ठेवली जात असे आणि जोरात दर एक मिनिटाने दार ठोठावले जात असे. संतापाने त्याने जोरात दर उघडले कि भरलेल्या बादलीतील पाणी पूर्ण खोलीत पसरत असे. झक मारत खोली साफ करावी लागे. परत बालदी त्याचीच असे म्हणजे तिची वाट लावणे शक्य नसे.
हे स्वच्छतेचे लोण इतर सर्व मजल्यांवर पसरले. त्यामुळे होस्टेल बर्यापैकी स्वच्छ राहत असे आणि एकदा तुम्हाला स्वच्छतेत राहण्याची सवय झाली कि आपोआप अस्वच्छता खपत नाही.
बाकी लिहिण्यासारखे बरेच आहे पण तुमच्या ताजमहालाला वीट लावण्याची इच्छा नाही.

अरेरे पार खपल्या काढल्यात राव...नोस्टाल्जीक केलंत
गेले ते दीन गेले. काही होस्टेलच्या मित्रांना गेली कीत्येक वर्ष शोधतोय. फेसबूक,गुगल कुठेच सापडंत नाहीयेत साले.

बाबा पाटील's picture

27 Jan 2015 - 12:04 pm | बाबा पाटील

साला शब्दातच जिंदादिली आहे,शाळामास्तरच्या लाजाळु प्रशांतला बाबा पाटील या होस्टेलनेच केला,जिवा भावाचे हरामी मित्रही या होस्टेलनेच दिले,आणी जन्मोजन्मी साथ देणारी पाट्लीणही या होस्टेलनेच दिली. एव्हडच कशाला कॉलेज लाइफ मध्येच सगळी दुनिया विरोधात असताना आमच्या लग्नाला साथ या होस्टेलवर राहणार्‍या भुतांनीच दिली. शेवटी होस्टेलच जिंदाबाद.

सवंगडी's picture

27 Jan 2015 - 12:33 pm | सवंगडी

मस्त लेख शेवट मस्तच जमलाय…. बाकी होस्टेलचे आयुष्य जगलो नसलो तरी मित्रांच्या होस्टेलला पडीक असायचो त्यामुळे सगळे अनुभव घेतलेत. आणि बऱ्याच सवयी पण ! (अर्थात, कसे राहू नये या संदर्भात )

सवंगडी's picture

27 Jan 2015 - 12:35 pm | सवंगडी

आय डी पण त्याच अनुभवातून घेतलेला दिसतोय !

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 7:06 pm | पिंपातला उंदीर

असच काही नाही . दुसऱ्या एका संस्थळावर मी विषारी वडापाव या नावाने वावरतो *lol* *LOL* :-)) :)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2015 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

विषारी वडापाव =)))))

दिपक.कुवेत's picture

27 Jan 2015 - 12:52 pm | दिपक.कुवेत

बाकि फक्त हाच अनुभव घ्यायची ईच्छा अपुर्ण राहिली....

राजाभाउ's picture

27 Jan 2015 - 1:17 pm | राजाभाउ

मस्त लेख.
शेवटी एकदम कोसलाची आठवण आली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2015 - 6:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत.

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 7:08 pm | पिंपातला उंदीर

मला पण कधी कधी मी पांडुरंग सांगवीकर आहे अस वाटत . माझा मिपा वरचा पहिला लेख कोसालावरच होता : )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 9:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्यांमधेचं पांडुरंग सांगवीकर थोड्याफार फरकानी असतो....त्याची तीव्रता कमी जास्त असु शकते.

हाॅस्टेलच्या दिवसांवर लेख टाकलात आणि न संपाविशी वाटलेली ती पाच वर्ष डोळ्यासमोर आली बघा!
राज्यशासनाच्या असून अत्यंत स्वच्छ हाॅस्टेलला आयुष्यातला अतिशय सुंदर काळ घालवलाय.गेल्या महिन्यातच ओरिगामी कट्ट्याच्या निमित्ताने मुंबईत जाऊन रुमचे दर्शन घेऊन आलेली
अजया!

लेडीज़ होस्टेल तुलनेने नेहमीच स्वच्छ असते हो....

मधुरा देशपांडे's picture

27 Jan 2015 - 10:53 pm | मधुरा देशपांडे

फक्त तुलनेनेच. अन्यथा अजयाताई म्हणतेय तसे अपवाद वगळता मुलींचीही अतिशय अस्वच्छ होस्टेल्स पाहिली आहेत. काही मुलींच्या रुम्स तर भयंकर असायच्या. मेसमधल्या बेचव खाण्याचा जेवढा तिटकारा नव्हता त्यापेक्षा जास्त अशा मुलींच्या रुम्सचा होता मला. तेवढ्याच काय त्या होस्टेलच्या थोड्या कटु आठवणी. :(

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 7:10 pm | पिंपातला उंदीर

खर तर या लेखाच एक दुसर version होऊ शकत . मुलींच्या नजरीयामधून

के.पी.'s picture

27 Jan 2015 - 1:46 pm | के.पी.

मी शाळेत असल्यापासून जेवढी हॉस्टेल्स पालथी घातली आहेत त्या सर्वांची आठवण झाली.
खरच ,एकेक भारी अनुभव मिळतात ,चांगले-वाईट दोन्ही आणि हेच अनुभव आयुष्यात खूप काही शिकवून जातात. (स्वानुभवावरुन)

मस्त लेख! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2015 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

हॉस्टल!!!! converting boys to men since times immemorial!!!, आमच्या कॉलेज चे संस्थापक एक "शंकर" नावाचे धनाढ्य होते! हॉस्टल च्या पोरांस त्यांच्या दर जयंती ला कंपल्सरी ब्लड डोनेट करावे लागत असे! ह्यावर पोरे "चालायचेच ! आम्ही 'शैंकी'ला बर्थडे गिफ्ट म्हणून रगात देतो म्हणत असत!! एका दोस्ताने तर त्याच्या फ्लेम ला "अगं मी शैंकी ला रक्त देतो तर तुझ्यासाठी जीव देणार नाही का?" असले दळभद्री प्रपोजल दिलेले! (आज एक मुलगी आहे त्यांस!) , एकदा मुतारी चोकप झाली ३ कंप्लेंट ठोकून ही काही नाही! शेवटी आम्ही एक जहाल शक्कल केली! मुतारीत एक जण मुतला, त्याचे जिथे आटोपले त्या रेषे पाशी दुसरा! असे एका मागे एक रांग लावत शेवटचे कार्टे (अस्मादिक) रेक्टर च्या ऑफिस च्या दारावर तीन बियर लावल्यावर मुतलो !! दुसर्या दिवशी मशीन लावुन मुतारी साफ़ केली! , सामूहिक आंघोळी काय कोण किती लांब थुकतो गोवा अन विमल खाऊंन ह्याच्या शर्यती काय! मायला गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी!!

उगा काहितरीच's picture

27 Jan 2015 - 2:54 pm | उगा काहितरीच

होस्टेल... ज्यांना लाभले ते नशिबवान!

पिशी अबोली's picture

27 Jan 2015 - 3:32 pm | पिशी अबोली

पहिल्या हॉस्टेलला खूप शिव्या घालूनसुद्धा त्याचा जाम माज करायचो आम्ही. अगदी भयंकर द्वेष करणाऱ्या मुलिसुद्धा वेळ पडल्यास सगळी मदत करायच्या. सोनेरी दिवस होते ते आयुष्यातले...
दुसऱ्या हॉस्टेलला मात्र पहिल्यापासून शेवटपर्यंत वैतागले होते फ़क्त. ते सोडताना भयंकर आनंद झाला...

मित्रहो's picture

27 Jan 2015 - 4:17 pm | मित्रहो

कुठल्याही गोष्टींचा रसिकतेने आस्वाद घ्यायला होस्टेलला शिकलो. आर डी च्या गीतांवर आणि त्याने बांधलेल्या चालींवर चर्चा करता करता रात्र निघून जायची. तीच गोष्ट जेंव्हा सचिनने शेवटल्या षटकात फक्त चार धावा देउन दक्षिण आफ्रिकेला खिळवून ठेवले ते. जोष जल्लोष झाल्यानंतर पहाटे साडेतीन चार पर्यंत त्यावर चर्चा करीत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर होता तरीही.
मस्त लेख, बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 5:27 pm | पिंपातला उंदीर

सर्वाना धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2015 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००
हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो.

मधुरा देशपांडे's picture

27 Jan 2015 - 5:46 pm | मधुरा देशपांडे

मस्त लेख. अनेक आठवणींना उजाळा मिळाला. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2015 - 6:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रौर्य रस - होस्टेल हि एक खूप क्रूर गोष्ट पण आहे . अर्धेंदू नावाचा एक अर्धवट डोक्याचा पोरगा होता . त्याला वागण्या बोलण्याचा फारसा पोच नव्हता . इतर पोर त्याला छळ छळ छळायची . एकदा एका मुली ने तुला कार्ड दिल आहे आणि तुला भेटायला बोलावलं आहे अस सांगून आपणच एक कार्ड त्याच्या हातात कोंबल . त्या येड्याला पण ते खर वाटलं . आणि त्या पोरी समोर जाऊन काही तरी बोलल . पोरीन त्याला थोबडावला . बिचारा अर्धेंदू होस्टेल सोडून गेला

कोसला आठवली एकदम.

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 7:14 pm | पिंपातला उंदीर

अनुभव थोडे फार सार्वत्रिक असतातच . मुलींच्या नावाने एखाद्याला पगला बनवणे हि वर्षानुवर्ष चालत आलेली trick आहे . पोर वर्षानुवर्ष त्याला फसतात हा आपला evolution ला सामोर जाण्यात करण्यात आलेलं अपयश *sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:

पैसा's picture

27 Jan 2015 - 6:44 pm | पैसा

खूपच सुंदर लिहिताय!! होस्टेलला रहायची वेळ कधी आली नाही, त्यामुळे काहीच अनुभव नाहीत. आमच्या कॉलेजच्या होस्टेलमधे रहाणार्‍या मैत्रिणी तिथल्या मेसच्या जेवणाला भयानक नावे ठेवायच्या तेवढं लक्षात आहे.

लेख अप्रतिम झालाय. हल्ली तुमचं लिखाण दिवसेंदिवस बहरत आहे! खूप छान!

पिंपातला उंदीर's picture

27 Jan 2015 - 7:15 pm | पिंपातला उंदीर

आभार पैसा ताई

सूड's picture

27 Jan 2015 - 7:16 pm | सूड

हा एक अनुभव मिसलाच!!

पिंगू's picture

27 Jan 2015 - 7:35 pm | पिंगू

आयुष्यात फक्त एकच वर्ष होस्टेलवर काढले आहे आणि त्या वर्षात काय काय गमतीजमती केल्या त्या मलाच माहित..

जेम्स बॉन्ड ००७'s picture

27 Jan 2015 - 8:06 pm | जेम्स बॉन्ड ००७

मी सुद्धा. रत्नागिरीचं कर्‍हाडे ब्राह्मण संघाचं होस्टेल. युनिव्हर्सिटीच होती ती एक. :)
दरवर्षी नवीन येणार्‍या अंड्यातल्या मेंबर्सना फिस्ट च्या निमित्ताने मुद्दाम काहीतरी विचित्र कामं सांगितली जायची. माझ्या एका मित्राला २ किलो केशर आणायला पाठवलं होतं, आणि ते येडं गेलं पण. एकाला रंगित साबुदाणे आणि एका जिम बद्दल खुपच एक्साईटेड असलेल्या मेंबरला चक्क अनवॉण्टेड ७२ (खोटं वाटेल, पण गोष्ट ६-७ वर्षांपुर्वीची आहे, तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता) आणायला सांगितलेलं.

मेंबर्सचं बारसं हा एक वेगळाच विषय.. :)

सौन्दर्य's picture

27 Jan 2015 - 8:18 pm | सौन्दर्य

सुदैवाने अथवा दुर्दैवाने होस्टेलमध्ये कधीच राहावे लागले नाही, त्यामुळे तेथले नवरस 'ह्याची देही ह्याची डोळा' कधीच उपभोगू शकलो नाही. पण अनेक मित्रांचे अनुभव, वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टी ह्यावरून 'होस्टेलची' थोडीफार कल्पना येते. लहान असताना अभ्यास केला नाही की आई, "चल, तुला बोर्डिंगमध्येच टाकते" अशी धमकावायाची. त्यामुळे मोठे झाल्यावर देखील (म्हणजे कॉलेजमध्ये जायला लागल्यावर) बोर्डिंग, होस्टेल, ह्याचा मनात एक प्रकारचा धसकाच होता. नुसते चार तास कॉलेजमध्ये गेल्यावर तिथे आम्ही जी धमाल केली त्यावरून, दिवसाचे चोवीस तास एकत्र राहणारे मित्र किती धमाल करत असावेत हे सहज कळून येते. लेख अतिशय उत्कृष्ट लिहिला आहे, जे होस्टेलमध्ये राहिले आणि जे कधीच राहिले नाहीत, त्यांना होस्टेल जीवनाचा नवरसरुपी प्रवास घडवल्याबद्दल खूप खूप आभार. शेवट हळवा होता, मी स्वत: तुमच्या होस्टेलच्या इमारतीत न राहून देखील थोडे इमोशनल व्हायला झाले.

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jan 2015 - 8:42 pm | स्वच्छंदी_मनोज

आयुष्यातली चार सोनेरी वर्षे हॉस्टेलमध्ये काढली आहेत...व्वा काय दिवस होते ते.. माझे सर्व अनुभव कमी अधीक फरकाने डीट्टो तुमच्या सारखेच..

अनेक नवीन अनुभव देणारे, नवीन जाणीवा निर्माण करणारे आणी स्वतः मध्ये फुलपाखरासारखे स्थित्यंतर घडवणारे हॉस्टेल लाईफ ज्यांनी अनुभवले आसेल त्यांना हॉस्टेल जिवनाने किती समृद्ध केले त्याची कल्पना असेल. होमसीक (शाळा संपल्यानंतर ज्यांनी हॉस्टेल चा विशेषः घरापासून फार दुरच्या कॉलेजच्या हॉस्टेलचा अनुभव घेतला आहे :) ) ह्या अवस्थेपासून रात्रभर चालण्यार्‍या मित्रांच्या अड्ड्यांपर्यंतचा प्रवास हा तुम्हाला न कळता आपोआप घडत असतो आणी काही वर्षांनी एकदा हॉस्टेल अंगात भिनले की आपल्याला स्वतःलाच प्रश्ण पडतो की आपण पहील्या वर्षी एवढे होमसीक कसे होतो?

आठवणींच्या पानांवरचा रुमाल (खपली म्हणत नाही कारण खपलीचा संदर्भ दुखणार्‍या जखमेशी आहे) बाजूला काढल्या बद्दल धन्यवाद..

- (बेफाट रॅगींग सोसलेला आणी ज्यांनी रॅगींग घेतले त्यांचा आताही जिगरी दोस्त असलेला ) स्वच्छंदी मनोज

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 8:56 am | पिंपातला उंदीर

आठवणींच्या पानांवरचा रुमाल (खपली म्हणत नाही कारण खपलीचा संदर्भ दुखणार्‍या जखमेशी आहे) बाजूला काढल्या बद्दल धन्यवाद.

सुन्दर : )

आमच्या रूम च्या अस्वच्छतेच्या तर दंतकथा पसरल्या होत्या . रूम ला महिनो ना महिने झाडू लागत नसे . रूम मध्ये एवढा कचरा होता की त्यात एक छोटी बादली हरवली होती . ती होस्टेल सोडताना सापडली . त्या कचरा आणि दुर्गंधी युक्त रूम मध्ये आम्ही तिघ जण लोळत पडलेलं असू .

आम्ही ४ मित्र अहमदनगरला एका रुममधे रहात होतो. २-२ जणांचा गृप पडला. शेवटी असाच साचलेला कचरा कोणी उचलायचा यावर शितयुद्ध पेटलं. कचरा वाढतच गेला. उग्र सुगंधही वाढला. मग एक दिवस विरुद्ध पार्टीतल्या एकाने सिगारेट ओढली आनी तो कचरा पेटवुन दित्यात्यात कागद आनी प्लॅस्टीक भरपुर असल्याने त्याने एकदम पेट घेतला. जाळ मोठा झाल्यावर चौघेही घाबरलो. माझ्या पार्टनरने घाबरुन त्यावर पाणी ओतले तर त्यातुन एकदम काळा धुर यायला लागला . तो खिडकीतून बाहेर आल्यावर बाहेरून लोक आमच्या रुमकडे धावत आले आग लागली म्हनुन. नंतर काय झाले ते सांगायलाच हवे काय?
एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते . आमच्या संवेदना मेल्या होत्या पण त्याच वेळेस मला भेटायला चुलत भाऊ आला होता . तो अजूनही सांगतो की त्यावेळेस जो वास सर्वत्र पसरला होता तो जगताला सगळ्यात किळसवाणा वास होता

हेच माझ्या मॅनेजरने २००४ ला कोळीवाड्यात केले होते. खतरनाक सुगंध असतो तो.

बाकी २ वर्शे १९८५-१९८६ अहमदनगर कॉलेजला होस्टेलवर राहीलो. आज मी जो काही आहे त्याची पायाभरणी याच २ वर्षातली. हा काळ एक समृद्ध अनुभव देउन गेला.

माझ्याही होस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या पण मजेदार वगैरे नाहीत कारण बरीच बंधने व जाचक नियम होते. मेसचे जेवण हा विषय चघळायलाही नको वाटेल. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2015 - 9:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

पोरींचा प्रॉब्लम हा असतो की त्या बापड्या हास्टेलाचे नियम फारच कसोशीने पाळतात!! पोरांत हे नियम पाळले तर "ढीला" "ऑड मैन आउट" "दिड शाणा" वगैरे विशेषणे मिळतात! बरं पोरांची समाजसेवा किती म्हणावी!! स्वतःच्या हॉस्टल चे नियम मोडून प्रस्थापित व्यवस्था विरोधी चे गेवेरा होतात ते होतात! "शिरोडकरणी" ला भेटायच्या निमित्ताने गर्ल्स हॉस्टल (अन त्याच्या नियमांचा ही) उद्धार करत असतात!!!

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 8:58 am | पिंपातला उंदीर

पोरींचा प्रॉब्लम हा असतो की त्या बापड्या हास्टेलाचे नियम फारच कसोशीने पाळतात!! पोरांत हे नियम पाळले तर "ढीला" "ऑड मैन आउट" "दिड शाणा" वगैरे विशेषणे मिळतात!

जबरी निरिक्षण

आनन्दिता's picture

28 Jan 2015 - 11:07 pm | आनन्दिता

पोरींचा प्रॉब्लम हा असतो की त्या बापड्या हास्टेलाचे नियम फारच कसोशीने पाळतात!!

असं का ही ही नाहिये हो..

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 12:58 am | मधुरा देशपांडे

सहमत. असं काहीही नसतं.

"एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते"
तुम्ही आमच्याच होस्टेल मधले कि काय?
त्या बादलीतली जीन्स उचलायला गेल्यावर हातात फक्त एक तुकडा आला होता आणि आमची हसून हसून वाट लागली होती... नॉस्टॅल्जिक केलंत राव.

चिगो's picture

27 Jan 2015 - 10:43 pm | चिगो

लेख जमलाय.. आतापर्यंतच्या आयुष्यात हॉस्टेलचा जरा जास्तच अनुभव घेतला असल्याने त्याचं फार कोडकौतुक नाहीय. १९९३ ते २०१० ह्या काळात (वय वर्षे १० ते २७) ह्या काळात फक्त दोन-अडीच वर्षेच घरी राहीलोय. बाकी सगळं बालपण, षोडशावस्था आणि तारुण्यपण हॉस्टेलमध्येच गेलंय..डॉर्मिटरी, शेअर्ड रुम, FC ( सभ्य शब्दांत 'फ्री ऑफ कॉस्ट', असभ्य शब्दांत 'फुकट ^दू') दुसर्‍यांच्या रुममधे विनापरवानगी राहण्यापासून ते दुसर्‍यांना आपल्या रुममधे आसरा देण्यापर्यंतच्या, डबल रुम ते सिंगल एसी रुम पर्यंत हॉस्टेल लाईफचे सगळेच टप्पे अनुभवलेत.

बर्‍याच जणांनी हॉस्टेलमधल्या 'बॉईज टू मेन' प्रवासाबद्दल भाष्य केलंय, पण शामळू, ग्रामिण मुलांना "मॅनर्ड" बनवण्याच्या नावाखाली 'रॅगिंग'पण केलं जातं, हेपण सत्य आहे.. काही चांगले सिनीअर्स असतात. सुरुवातीला सगळ्यात जास्त त्रास देणारेच नंतर जीवाभावाचे दोस्त बनतात हे खरं असलं, तरी काही अत्यंत बेकार सिनीअर्स असतात हेपण खरंय.. काहीजणांच्या, खास करुन कॉलेजमध्ये पहील्यांदाच हॉस्टेलवर आलेल्यांच्या, आयुष्यावर ओरखडा उठवणार्‍या घटनाही घडतात..

असो. कंटाळा येईपर्यंत खायला मिळालं तर सुग्रास जेवणही बोर होतं.. माझ्याबाबतीत हॉस्टेललाईफबद्दल हेच झालंय..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍यांना आपल्या रुममधे आसरा देण्यापर्यंतच्या... अश्या रूममधल्या पार्टनर्सच्या परवानगीने पण व्यवस्थापनाच्या डोळ्याआड राहणार्‍या फुकट्या विद्यार्थांना आमच्या हॉस्टेलमध्ये "पॅरासाईट" म्हणायचे आणि त्या शब्दाला कोणताही तिरकस अथवा कमीपणाचा दर्प नव्हता !

चिगो's picture

27 Jan 2015 - 11:37 pm | चिगो

हे असलं काही करण्यात कमीपणा नसतोच, एक्कासाहेब.. आमच्या कॉलेजमध्ये एक नियम होता. 'ऑल क्लिअर' असलेल्या मुलांना अ‍ॅड्मिशनसोबतच हॉस्टेल मिळायचं, आणि 'एटीकेटी' असलेल्यांना नाही. मी आणि माझा पार्टनर (आम्ही दोघंच 'एसी' होतो आमच्या वर्गातल्या हॉस्टेलाईट्समधे) मग आमची रुम आंदण द्यायचो सगळ्यांना, आणि त्या रुममध्ये आठ-आठ जणं पडीक असायची. शेवटी महीनाभर नखरे करुन मग मॅनेजमेंट केटीवाल्यांनापण अधिकृत प्रवेश द्यायची.. (न देऊन सांगणार कुणाला? अख्खं हॉस्टेल ओसं पडलं असतं. ;-) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या प्रतिसादातला मुद्दा रुममध्ये जागा देण्याबद्दलचा नव्हता... कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जागा सिनियारिटी+मेरीट अश्या निकषांवर होती आणि खोली मिळण्यात खूप चढाओढ असायची. त्यामुळे पॅरासाईट हा प्रकार नाईलाजानेच होत होता. शिवाय ते विनामुल्य केलेले सत्कार्य असल्याने व्यवस्थापन तिकडे डोळेझाक करीत असे !

"पॅरासाईट म्हणजे एका जीवापासून काहीही परतफेड न करता केवळ फायदा लुटत असलेला दुसरा जीव." असे असूनही तो शब्द इतर विद्यार्थीच नव्हे तर पॅरासाईट असलेलेही "मी अमुक अमुकचा पॅरासाईट आहे" असे सहजतेने वापरायचे. पहिले काही दिवस ते फार विचित्र वाटले पण नंतर त्यामागे (इंग्लिश भाषा आणि जीवशास्त्रात असलेली) तुच्छतेची भावना नाही हे ध्यानात आल्यावर आम्हीही त्या शब्दाचा मुक्त वापर सुरू केला :)

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 8:59 am | पिंपातला उंदीर

बहुतेक विद्यापिठा मध्ये अधिक्रुत विद्यार्थि कमि आणी "पॅरासाईट" जास्त अस्तात.

अर्धवटराव's picture

28 Jan 2015 - 2:26 am | अर्धवटराव

:)
स्वच्छतेचा तिटकारा, साफ-सफाईचा आळस, चकटफूपणा आणि निर्लज्जपणाचा कळस इत्यादींचा मनोरंजनात्मक आस्वाद घ्यायचा असेल तर हॉस्टेलसारखं ठिकाण नाहि.
तिन चाप्टर रूम शेअर करताहेत. त्यापैकी एकाला अंघोळीचा जात्याच कंटाळा, एकाला देशाचा संपूर्ण कारभार शिरावर असल्यामुळे आंघोळीला वेळ नसणे, आणि तिसरा सुरुवातीला अगदी स्वच्छताभोक्ता असुनही य दोघांच्या संगतीत सुधरलेला असणे. मग एखाद्या दिवशी आंघोळ करावीशी वाटली किंवा तशी गरज पडली तर दोरीवर धुवुन वाळत घाततेली दुसर्‍या कोणाची चड्डी अगदी बिनधास्त वापरणे व त्यावरुन एकमेकांच्या तीर्थरूपांच्या व्यवसायाचा यथार्थ उद्धार करणे. वा वा. काय त्या आठवणी.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2015 - 9:05 am | श्रीरंग_जोशी

होस्टेलवर व्यतित केलेला आयुष्याचा काळ खूप खास वाटतो. विचारांची क्षितीजं विस्तारली, अत्यंत दडपणाखाली आव्हानांचा सामना करण्याची सवय लागली. होस्टेल जीवनाबद्दल लिहिन तेवढे कमीच.

एकच लिहितो, आमच्या होस्टेलवर न फुंकणारे फारच कमी. फुंकणार्‍यांचा भावलेला एक विशेष गुण. इतर वेळी कितीही खुन्नस असो, ऐन मध्यरात्री अडल्या नडल्याला सिगरेटची (मध्यस्थाच्या हातून) मदत करताना मागेपुढे पाहायचे नाही.

स्वच्छंदी_मनोज's picture

28 Jan 2015 - 7:08 pm | स्वच्छंदी_मनोज

एकच लिहितो, आमच्या होस्टेलवर न फुंकणारे फारच कमी. फुंकणार्‍यांचा भावलेला एक विशेष गुण. इतर वेळी कितीही खुन्नस असो, ऐन मध्यरात्री अडल्या नडल्याला सिगरेटची (मध्यस्थाच्या हातून) मदत करताना मागेपुढे पाहायचे नाही.

>>> +१००

नुसते तेच नाही तर PL च्या वेळी जेव्ह्या ह्याची सगळ्यात जास्त गरज असायची तेव्हा प्रत्येकाच्या सिगरेट लपवण्याच्या जागा कुठल्या हे पण सर्वांना माहीत असायचे.... त्यामुळे आपला स्टॉक संपला की सरळ मित्राच्या रुम मध्ये घुसून डल्ला मारायचो.. पण ह्याच न्यायाने आमच्याही सिक्रेट जागेवरती आम्हालाच कधी सिगरेट सापडल्या नाहीत :)

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2015 - 8:10 pm | श्रीरंग_जोशी

सिगरेटचा साठा पकडण्यासाठी कधी कधी प्राध्यापकांची अचानक धाड पडायची. सर्व विद्यार्थ्यांना अचानक खाली मोकळ्या जागेत बोलवून मग प्राध्यापकांचे गट विविध खोल्यांमधील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या खोल्या तपासत.

यावेळी काही तरूण विद्यार्थीप्रिय प्राध्यापक पुढे होऊन सिगरेटचा साठा स्वतःच्या खिशात लपवित असत.

काही जणांनी अशा धाडींपासून वाचण्यासाठी सीपीयुमध्ये सिगरेट्सची पाकिटे लपविण्याची शक्कल शोधून काढली होती =)) .

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 8:41 pm | पिंपातला उंदीर

फुकाडे *lol*

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 10:09 am | कैलासवासी सोन्याबापु

मी तळेगाव मेडिकल कॉलेज पासून ते वाडिया फ़र्गसन च्या हॉस्टल पर्यंत पुण्यातल्या जवळपास सर्व हॉस्टल मधे पैरासाइट म्हणून राहिलो आहे!, कॉलेज संपल्यावर हॉस्टल मिळणे शक्यच नव्हते, त्यात पुण्यात राहून UPSC करायचेच,ते ही रिटायर बापास तोशीस न देता!! हे ध्येय!, मी जगामित्र नाम्या! सो लोकं मला मदत करत गेली! पैरासाइट राहण्यामुळे एक सवय उत्तम लागली "ट्रेवल लाइट" कमीत कमी जागेत उपयोगी सामान बसवून प्रवास करणे, कारण कधी कुठल्या हॉस्टल मधून उचलून बाहर काढतील देव जाणे! ती सवय आजतागायत आहे! बायको ला पण अप्रुप! दादला ८ दिवसाञ्चं सामान एका बैगपैक मधे घेऊन चालतो ह्याच्चे! :D

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 3:09 pm | पिंपातला उंदीर

सर्वाना धन्यवाद

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 3:13 pm | मृत्युन्जय

कधी हास्टेलात राह्यलो नाही. त्यमुळे या आयुष्याची कल्पना नाही. पण लेख फक्काड जमला आहे,

पदम's picture

28 Jan 2015 - 5:52 pm | पदम

तुमचे अनुभव वाचुन आम्हि काय काय मिस केलय हे कळल. जर आम्ही कोलेजचे दीवस मस्तीत घालवले तर होस्टेल चे कसे घालवले असते असा विचार मनात येउन गेला. नशीबवान आहात तुम्हि.

मला होस्टेल कधीच आवडलं नाही ….
काही ठराविक मुली सगळ्यांवर रुबाब करतात ,दादागिरी करून बाकीच्या मुलींना छळतात
कधीही रांगेत उभं न राहण , जेवण करायला सगळ्यात उशीरा येउन सुद्धा सगळ्यांच्या पुढे जाणं
आंघोळीच्या वेळी दुसऱ्या मुलींना ढकलून स्वतः बाथरूम मध्ये घुसणे
गरीब स्वभावाच्या मुलींचा अक्षरशः छळ करतात
मला तर अस झाल होत की कधी एकदा होस्टेल सोडून घरी जातीये

आमच्या ओळखीतला एक मुलगा तालुक्याच्या गावातून शहरात होस्टेलला आला होता .
त्याला होस्टेल मध्ये झालेल्या रॅगिंग मुळे वेड लागल .
ह्या घटनेला जवळ जवळ दहा वर्ष झाली ,त्याच्या आई वडीलांनी उपचारांची पराकाष्ठा केली ,पण उपयोग शुन्य ………
काही मुलांची मजा ,मस्ती ही कधी कधी बाकीच्यांसाठी जीवघेणी ठरते

रेवती's picture

28 Jan 2015 - 7:20 pm | रेवती

सहमत.
माझ्यावर झालेल्या रॅगिंगमध्ये आठ दिवस तापाने फणफणले होते. लगेच मगतीसाठी कोणी उपलब्ध नसते. सुदैवाने सावरायला शिकले पण दरवेळी असे असेलच असे नाही. आमच्या रेक्टर बै खूप कडक होत्या म्हणून निभावले तरी काही मुली रात्री अपरात्री कपड्याच्या ब्यागा घेऊन व अभ्यासाचे सामान टाकून पळून गेल्या. एक मुलगी हवापाणी न मानवल्याने घरी निघून गेली पण तिला इलाजच नव्हता.

_मनश्री_'s picture

28 Jan 2015 - 8:09 pm | _मनश्री_

आमच्या रेक्टर उलट ह्या दादागिरी करणाऱ्या मुलींना घाबरायच्या .
कारण त्या सगळ्या श्रीमंत घरातल्या असायच्या
त्यामुळे ह्या पोरी फार शेफारल्या होत्या
आमच्या होस्टेलमधे बरेच प्रकार होते छळाचे
एखादी मुलगी झोपली की बाकीच्या तिचा चेहरा रंगवायच्या आणि ती उठली की तिला आरशात पाहू
न देता तिला मुद्दाम सगळीकडे फिरवून आणायच्या
कधी कधी एखाद्या मुलीच्या स्कर्टला मागच्या बाजूला हळूच फाटका रुमाल अडकवणे आणि मुद्दाम तिला सगळ्या होस्टेलमधून फिरवणे , किंवा एखाद्या मुलीला रात्री बारा वाजता उठवून तिला सांगायच्या की लवकर उठ पहाट झालिये आणि मग तिला दात घासायला पाठवणे
रात्री बारावीच्या मूली बाहेर व्हरांडयात अभ्यासाला बसल्या की तिथली लाइट बंद करून त्यांना डिस्टर्ब करणे असे बरेच प्रकार व्हायचे
अस वागुन काय आनंद मिळतो देव जाणे.........

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 1:19 am | मधुरा देशपांडे

सहमत आहेच. पण तरीही, खूपच भावनिक, भिडस्त स्वभावाचे काय तोटे आहेत, त्याने आपले किती नुकसान होते आणि ते आपले आपणच निस्तरायचे आहेत, हा मोठ्ठा धडा पण या होस्टेलच्या अशा अनुभवातुन मिळतो. तेव्हा सुरुवातीला हा त्रास झालाच. अगदी नको वाटायचे कधीकधी होस्टेल. पण आता मात्र कधीकधी त्याचे फायदेही जाणवतात.
त्रास देण्याच्या अतीव टोकाला जाऊ नये हे अर्थात मान्य आहेच.

पिंपातला उंदीर's picture

28 Jan 2015 - 8:39 pm | पिंपातला उंदीर

हॉस्टेल हि खूप क्रूर जागा पण असू शकते हे लेखातच लिहिले आहे . क्रौर्य रस या भागात उल्लेख आहे . तुम्ही थोडे जरी वेगळे / एकटे / कंपू नसणारे / कमजोर असाल तर लोक तिथ जीण मुश्किल करतात . मी लिहिल्याप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातल्या मुलांना त्राही भगवान करून सोडलं होत आमच्या हॉस्टेल मध्ये . काही ठिकाणी जाती /धर्म / विभाग यांची पण गणित असतातच . त्यामुळे तुमचा मुद्दा समजू शकतो .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2015 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगल्या आठवणी.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे फक्त होस्टेलाईट्सच करू शकतात...


(ढकलपत्रावरून साभार)

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 8:42 am | पिंपातला उंदीर

*lol* *LOL*

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 9:41 am | जेम्स बॉन्ड ००७

ख्या ख्या ख्या *ROFL* *ROFL* *ROFL* *ROFL*

अजया's picture

29 Jan 2015 - 10:15 am | अजया

=))

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 9:03 am | पिंपातला उंदीर

सर्वाना धन्यवाद

पिलीयन रायडर's picture

30 Jan 2015 - 10:04 am | पिलीयन रायडर

हॉस्टेल म्हणजे कशी भारी गोष्ट असते हे खुप लोकांकडुन ऐकलय.. लेखही मस्त जमलाय..
मला स्वतःला मात्र हॉस्टेलचा काही अनुभव नाही आणि कधी घ्यावसाही वाटला नाही.. आमच्या "प्रकॄतीचा" ओढा हा आईच्या हातचं गरम गरम खाण्याकडेच असल्याने घर सोडून जगण्याची इच्छा झालीच नाही!

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 10:08 am | पिंपातला उंदीर

आईच्या हातचं गरम गरम खाण्याकडेच

इथे काही वाद होऊच शकत नाही . हॉस्टेल ला सगळेच हि चव मिस करतात

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2015 - 10:18 am | कैलासवासी सोन्याबापु

अर्थातच!!! म्हणून तर घरून आलेली चटण्या लोणची गोडधोड़ आधी वॉर फुटिंग वर छाती चा कोट करून सांभाळण्यात अन नंतर त्याच हरामखोर रूममेट्स सोबत वाटुन खाण्यातच तर सर्वाइवल इंस्टिंक्ट अन कोऑपरेशन विकसित होते!! अर्थात घरी राहणार लोकांत ही ते डेवेलोप होतेच ! मी फ़क्त हॉस्टलाईट एनालॉजी सांगतोय त्याची

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 10:22 am | पिंपातला उंदीर

सहि है

विटेकर's picture

30 Jan 2015 - 10:39 am | विटेकर

मी पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या होस्टेल्मध्ये रहात होतो ..पुण्यातील सर्वात गरीब होस्टेल. ६०० रुपयात वर्षभर राहा अणि ९० रुपयात मासिक दोन्ही वेळचे जेवण ( १९८७) गरिब मुलांसाठीच होते ते होस्तेल. आज ही आहे.
तिथे आठवड्याला चार तास काम करावे लागे आणि सकाळची योगासने करावी लागत.
सगळेच नाडलेले आणि अडाणी .. गावाकडचे होते .. पण काय एकी असायची ! ज्ञानेश्वर पादुका चौकातील तुलसीचा चहा ही चैन आणि उम्मेदची कचोरी ही पार्टी !
फार सुंदर जग होते... पायात स्लीपर शिवाय वहाण नसयची ( परवडायचेही नाही ) आणि जिन्यावरून जाताना त्याचा आवाज करायचा नाही असा संकेत होता ... रेक्टर फार कडक होते ...
आजही जीन्यावरून जाताना माझ्या पावलांचा आवाज होत नाही !

आजही जीन्यावरून जाताना माझ्या पावलांचा आवाज होत नाही !

उगीचच जे के मालवणकर आठवला. :(

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 10:41 am | पिंपातला उंदीर

छान आठवण

योगी९००'s picture

30 Jan 2015 - 12:54 pm | योगी९००

हॉस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या...छान लेख..!!

१९९१ ते १९९५ अशी चार वर्ष सांगलीला कॉलेजच्या हॉस्टेलवर राहीलो. आयुष्यातली खुपच चांगली वर्षे होती ती...!! त्यामुळेच बरीचशी स्वतःची कामे स्वतः करायला लागलो. (म्हणजे कपडे धुणे, अंथरूण घालणे, पसारा आवरणे वगैरे).

आमच्या हॉस्टेलपासून साधारणपणे १ किमी च्या अंतरावर एक "नीळ-चित्रपट" दाखवण्याचे ठिकाण होते. गंमत म्हणजे आमच्या रेक्टरची कधी कधी तेथे ही धाड पडायची आणि फक्त आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलवर राहणार्‍यांवर कारवाई व्हायची. (म्हणजे चित्रपट दाखवणारा आणि इतर प्रेक्षक हॉस्टेलच्या पोरांना हाकलून झाले की परत राहीलेला भाग सुरू करायचे). बर्‍याचवेळेला आमच्या कॉलेजमधल्या एक-दोन थोराड पोरांनी "बाहेरचा आहे हो मी" असे सांगून स्वतःला वाचवले होते. एक-दोन वेळेला त्यांनीच रेक्टरला बाकीच्या मुलांना हाकलण्यास मदत केली होती असे ऐकीवात होते.

आमच्यात एकजण अशा "नीळ-चित्रपट" पहाण्यात इतका डेस्परेट असायचा की कधीही सांगितले की नवीन चित्रपट आलाय तर तो हातातले जे चालले असेल ते काम टाकून पहायला जायचा. त्याच्याविषयी आम्ही असे गंमतीत म्हणायचो की प्रत्यक्ष लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या वेळी सुद्धा कोणी त्याला नवीन नीळ-चित्रपटाविषयी माहिती दिली तर तो हातातले काम सोडून तिकडे पहिल्यांदा जाईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jan 2015 - 1:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

नवनीळ चित्रपट!!! :D :D :D

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 4:06 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

गवि's picture

30 Jan 2015 - 4:13 pm | गवि

माळी ?!

बॅटमॅन's picture

30 Jan 2015 - 5:48 pm | बॅटमॅन

नवनीळ चित्रपट =)) =)) =)) =))

..क्वचितच एखादा घननीळ असायचा.

हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र.

हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो.

+१०००
हॉस्टेलबद्दल किती आणि काय बोलणार? असंख्य किस्से आहेत एकेक कारण प्रत्येक दिवस नविन काहीनाकाही घेवून यायचा.

माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते ते. गेले ते दिवस आता राहील्या फक्त आठवणी. :(

आनन्दिता's picture

1 Feb 2015 - 12:15 pm | आनन्दिता

आई ग्ग्ग्ग्ग!! होस्टेल म्ह्टलं आत्ता ही अंगावर रोमांच येतात. काय दिवस होते ते.

माझ्या आयुष्याची बरीचशी वर्षे होस्टेल मध्ये गेली. पण सगळ्यात जास्त आठवतात ते इंजिनिअरिंगच्या होस्टेलचे दिवस.

आमच्या होस्टेलला त्यावेळी मध्ययुगातले नियम होते. आमच्या होस्टेलवर लक्ष ठेवण्यासाठी ' आप्पा' नावचा एक ७५-७६ वर्षाचा अति कजाग म्हातारा ठेवला होता. इतका खडुस माणुस माझ्या पाहण्यात तरी अजुनही आला नाहीये. ( मिपावर काही नग आहेत पण मी त्यांना प्रत्यक्षात पाहीलं नाहीय =)) ) वय इतकं असलं तरी आप्पांची स्मरणशक्ती, दृष्टी, श्रवणशक्ती अतितीव्र होती. नुकत्याच जॉइन झालेल्या एक मॅडम रेक्टर म्हणुन काम करत, पण आम्ही त्यांना अज्जिबात दाद देत नसु. त्या सुद्धा आम्हाला घाबरुन असत.

टेपरेकॉर्डर वापरायला बंदी असायची. होस्टेलचा गिझर खुप कमीवेळा चालु असायचा. पहिली दोन वर्षे तर आमच्या रुम्स मध्ये इलेक्ट्रिक पावर आउट्लेट्स च नव्हते. बल्ब च्या पोर्टला अ‍ॅडाप्टर जोडुन त्याला एक्सटेंशन बोर्ड कनेक्ट करुन त्यावर आम्ही जवळपास सगळी यंत्र चालवत असु. :) अप्पा कधीही धाड टाकुन ते जप्त करत असे, आम्ही तर आमच्या रुममध्ये बर्यापैकी मोठी साउंडसिस्टीम च आणुन ठेवली होती. अन हे यंत्र दिवसातले ५-६ तास अविरत चालु असे.
साधारण ३० सेकंदात सगळ्यात वायरींसकट हि सिस्टीम खोक्यात टाकायची आणि हातात येईल ते पुस्तक शांतपणे वाचत बसायची आम्ही इतकी तालिम केली होती की चार वर्षात आमच्या मनोरंजनाच हे साधन कधीही आप्पांच्या तावडीत सापडलं नाही.

कोणाचा वाढदिवस असला की रात्री सेलिब्रेशन झाल्यावर आम्ही एका रुमध्ये २५-३० पोरी पाय तुटेपर्यंत नाचत असु. बर्याचदा आप्पांची धाड पडायची. तेव्हा शुन्य मिनिटात मागच्या दाराने पळून जाऊन वाट्टेल त्या रुम मध्ये घुसुन आम्ही झोपायचं नाटक करायचो. एकदा मात्र खुपच मोठा आवाज असल्याने आप्पा भयंकर चिडले होते. त्यांनी सगळ्या रुम्सची दारं वाजवुन सगळ्यांना बाहेर जमा व्हायला सांगितलं. नाचुन नाचुन घामानं थबथबलेल्या आम्ही, "आम्ही तर बुवा झोपलो होतो" अशा साळसुद थापा मारत होतो. अप्पा बर्याच धमक्या देउन गेल्यावर जो हास्यकल्लोळ माजला होता त्याला तोड नाही.

होस्टेचं गेट ७:३० वाजता बंद व्हायचं. कधी मुव्ही वगैरे बघायला गेलो, बाहेर फिरायला गेलो तर उशीर व्हायचा. तेव्हा आम्ही कंपाउंडवरुन उड्या मारुन आत यायचो. एकदा रात्री आठ वाजता वगैरे निवांत बाहेर हिंडत असताना एका सरांना पाहुन गल्लीबोळातुन धावत होस्टेल गाठलेलं आठवतं.

आमची मेस होस्टेलपासुन थोड्या अंतरावर होती. संध्याकाळी मेसच्या अंगणात चहाची टाकी ठेवली जायची. फॅकल्टीज च्या क्वार्टस मधले टिचर्स पण तिथे चहाला यायचे.
त्या शिक्षकांमध्ये नुकतेच एम टेक पासआउट करुन फॅकल्टी म्हणुन जॉईन झालेले, खुप खुप स्मार्ट, देखणे असे ' बबलु' सर पण असायचे. ते चहाला येईपर्यंत आम्हीही चहासाठी थांबुन रहायचो. ते आले रे आले की की वारुळातुन मुंग्या बाहेर याव्यात तशा आम्ही कप घेऊन मेसकडे धाव घेत असु. ते दिसतील अशा जागा पकडुन आम्ही ते नर्व्हस होतील इथपर्यंत खुसफुस करुन हसायचो. त्यांच्या सोबत असणार्या इतरांच्या पण ते नंतर नंतर लक्षात आलं. आम्ही आलो की ते "बबलु" सरांना कोपरखळ्या मारत.
बबलु सर आम्हाला शिकवायला नव्हते त्यामुळे तसं काही घाबरायचं कारण नव्हतं आणी ते बिचारे इतके लाजाळु होते की आम्ही चहाला आलो की ते कावरेबावरे व्हायचे. जाम धम्माल यायची.

होळी वगैरे खेळायला कोण परमिशन देतय, पण आम्ही न चुकता दणक्यात रंग खेळायचो. थर्ड ईयरला असताना होळीनंतर दोन दिवसांनी व्हाईवा होती. आणि आम्ही आधी भयंकर रंग खेळलो होतो. त्यात कोणितरी एक विचित्र रंग आणला होता. अन तो रंग निघायचं नावच घेत नव्हता. तेव्हा आम्ही अक्षरशः तसली तोंडं घेउन कॉलेजला गेलो होतो. कडकडीत इस्त्रीत आलेली मुलं आणि चेहर्यावर रंगाचे डाग घेउन आलेल्या मुली पाहुन सरांचे डोळे रागाने गरगर फिरले होते. पण झकास व्हाईवा देण्यात आम्ही पाचहीजणी ( मॅकॅनिकल ;) मुळे इतक्याच खुप झाल्या ) पटाईत होतो म्हणुन वाचलो.
दसर्याला आम्ही कुठुन कुठुन धान्यांच्या लोंब्या जमवुन पानाफुलांच्या आणी लोंब्यांच्या तोरणांनी होस्टेलचा व्हरांडा देखणा सजवत असु. एकदा नुकतंच गॅदरिंग पार पड्ल्यामुळे सोबत साड्या होत्या... बरेच प्रयत्न करुन कुठुनसा बांबु मिळवुन गुढीपाडव्याची गुढी देखील उभारलेली. कुणाच्याही डोक्यात कुठलीही टुम येणार न बाकीच्या जणी ती पार पाडायला सदैव तयार :)

सबमिशन साठी जागवलेल्या रात्री, एक्झामधे मारलेल्या नाईट्स. बापरे !! केवळ अविस्मरणीय!!

माझ्या एका साउथइंडीयन रुममेट्ला श्वासनलिकेच सिरियस इन्फेक्शन झालं होतं. त्या रात्री तिला आयसीयु मधे टाकावं लागलं होतं. तिच्या घरुन कोणी यायचं म्हटलं तरी ३-४ दिवस लागणार होते. त्या चार दिवसात आम्ही परिक्षा सुरु असताना सुद्धा हॉस्पिटल मधे रात्री जागुन काढल्या होत्या. तिच्या औषधांसाठी अवघ्या अर्ध्या तासात विस हजार रुपये जमवले होते. या सगळ्यात कॉलेजने सौजन्य म्हणूण सुद्धा काही तसदी न घेतल्याबद्दल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन बरोबर प्रचंड वाद घातला होता. ४ दिवसांनी तिची आईवडील आले. तेव्हा आमचे आभार मानताना त्या काकु ढसाढसा रडल्या होत्या.

आता मागे वळुन पाहिलं तर होस्टेल म्हटलं की मेस चं भिकार जेवण, अंघोळीला मिळणारं थंडगार पाणी, कट्टर शत्रुत्व, भांडण, हेवेदावे असलं काही आठवत नाही. अभ्यास तर मुळीच नाही !! आठ्वतात ते फक्त तोंड सुके पर्यंत मारलेल्या गप्पा, पोटाच्या स्नायुंना पीळ पडे पर्यंत आलेलं हसु, सेलिब्रेट केलेले साधे साधे क्षण, जोडलेली घट्ट मैत्री, वाटलेली सुखं, उडवुन लावलेली दुखः, एक स्ट्राँग पर्सनॅलिटी बनायचा प्रवास. !!!

टाकेल तिथं उगवायचा जो गुण या दिवसांनी दिला त्यातुन कधीच उतराई होता येणार नाही :)

खटपट्या's picture

1 Feb 2015 - 10:43 pm | खटपट्या

भन्नाट अनुभव आहेत तुमचे. तुमचा एक वेगळा लेख झाला असता....

भाग्यश्री's picture

2 Feb 2015 - 12:55 am | भाग्यश्री

मस्त लेख व प्रतिसाद!

आनन्दिता, तुझा प्रतिसाद तर फारच आवडला. मी होस्टेलला कधी राहीले नाही परंतू माझी इंजिनिअरींगची बेस्ट फ्रेंड होस्टेलला राहायची. तिच्यामुळे कळायच्या गमती जमती. :)

आदूबाळ's picture

2 Feb 2015 - 2:26 am | आदूबाळ

जबरदस्त प्रतिसाद!

सखी's picture

2 Feb 2015 - 10:12 am | सखी

भारी प्रतिसाद आनन्दिता - फार आवडला, विशेषत: शेवटचे दोन परिच्छेद आणि समारोपाचं वाक्यं - जियो!