गप्पा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
23 Jan 2015 - 2:15 am

आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे!
काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले.
टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे.
मिकीला की तुला?
नाय, मिकीला!
चल गप्पिष्ट कुठला.
असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली.
आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले.
आज्जी हा मानूसला आत बसव नां
ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं?
अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं
वी वौ वी वौ .... आज्जी तू रस्त्यातून दूर हो ना, फ़ायर इंजीनला जाऊ दे
दीपच्या गोंधळात त्याची शाळेची वेळ झाली.
अरे आता खेळणं पुरे. बस येईल बघ. चला शर्ट पॆंट घाला..

मुलगा आणि सून दोघेही सकाळी कामावर गेले, तीन वर्षाच्या दीपला तयार करून डे स्कूल मधे पाठवले, की तो परत येईपर्यंत ती एकटीच असायची.
दीप शाळेत असतांनाचे तीन चार तासच काय ते तिचे हक्काचे.
आताही त्याच्या अविरत बडबडीला उत्तरे देत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.

आज्जी बस आलीयं!
हो चल लवकर. त्याचा ड्ब्बा, दफ़्तर सगळे नीट पाहून देत ती शाळेच्या पिवळ्या बेढब बसमधे दीपला बसवून अपार्टमेंटमधे आली.
आता तीन तास निवांत! सिमाबाई चला, तो मासिकातला कधीचा राहिलेला यशस्वी महिला उद्योजकांचा लेख वाचू या आज!
जरा चार ओळी वाचून होतात न होतात तर पींग पेंग ---- समिरचा व्होट्स अप किणकिणला.
नाही, म्हटलं तू सगळ आटोपून निवांत बसली असशील म्हणून झोपण्याआधी गप्पा मारू जरा!
छे निवांत कसलं जरा दोन मिनीटे बसली तर तुझा मेसेज. काय म्हणतोस?
काही नाही गं. कंटाळा आलायं तुझ्या शिवाय!
इतक्यात कंटाळला? अजून तर पाच महिने असे काढायचेयं.
तसं नाही गं, काल बोलणच झाल नाही नां.
हो ना, अरे मला इथल्या रगाड्यात वेळ मिळेल तर नां। काल पार्टी होती ना इथे!
ते जाऊ दे. ऐक नां! अग आमचा ब्रीज क्लब मस्त सुरू आहे!
समिरच्या ब्रीज क्लबचा विषय एकदा सुरू झाला की तो कोणाचे कशाला ऐकतोय!
तिला खरे तर खूप गप्पा मारायच्या होत्या. पार्टीमधे आलेल्या गेस्ट विषयी, इथल्या बायकांच्या गप्पा गोष्टीं विषयी,
आणि हो, अंगणात फ़ुललेल्या चमेलीच्या वेला विषयी देखील.
पण चमेलीचा वेल त्याच्या ब्रीजच्या खूप खालीच राहून गेला. ह्याच्या ब्रीजच्या गप्पा तिने अगदी उत्साहाने ऐकायला हव्यात. चमेली वगैरे बायकी गोष्टी. त्याला काय त्याचे!

तरी त्याला अडवून तिने विषय काढलाच, तर इतके काय सांगायचेय, फ़ोटो दे पाठवून म्हणून चक्क उडवूनच लावले की!
शेवटी आता झोपेची वेळ झाली, उद्या बोलू म्हणून बाय करून मोकळा!
ह्याने अमेरिकेतल्या फ़ाईव स्टार कैदेत मला काही रहायचे नाही म्हणून या वेळेस इथे येणे टाळले. पण नातवाच्या काळजीने तिला मात्र दर वर्षी ही सहा महिन्यांची ट्रीप टाळणे शक्य नव्हते!

दीप आल्या आल्या तिला चिकटलाच. शाळेत काय काय झाले, जेसन कसा भांडला, मार्गला त्याने चीज सॆंडवीच कशी दिली एक ना दोन.
मग पुन्हा टी वी वर कार्टून बघू दे म्हणून हट्ट. अरे बाबांनी सांगितलेय ना, कार्टून टाईम फ़क्त संध्याकाळी, डिनर नंतर!
तर मग मला गोष्ट सांग म्हणून फ़र्माईश. बरे गोष्ट तरी नीट ऐकून घेईल तर शपथ. मधे मधे ह्याचे तिच्या गोष्टीला शेपट्या जोडणे चालूच.
नाहीतर मग एकेक प्रश्न! उत्तरं देता देता तिची पुरेवाट. त्या सगळ्या गदारोळात महिला उद्योजकांचा लेख राहूनच गेला.

संध्याकाळी खूप उशिराने मुलगा व सून परत आली. आल्यानंतर त्यांचे वौश वगैरे घेऊन झाले, अन डीनर वाढता वाढता तिने भराभरा दिवसभराचा रिपोर्ट संगून टाकला. म्हणजे दीप केव्हा जेवला, काय जेवला वगैरे. खरंतर तिला दीप कायकाय मजेदार प्रश्न विचारत होता, त्याचे कौतूक असे काय अन किती बोलायचे होते.
पण दोघांनाही डीनर आटोपून आपल्या खोलीत पळायची घाई झालेली! दिवसभराच्या कामाने थकले असतील बहुदा!

आई, तू दीपला कार्टून दाखवून त्याला झोपव. मला जरा काही इमेल पाठवायचे आहेत, असे म्हणून मुलगा त्याच्या खोलीत गेलाही. सूनही थोडा वेळ दीप भोवती घुटमळून हळूच गुड नाईट करून गेली.

कार्टून झाल्यावर झोपतांना पुन्हा दीपच्या कार्टून विषयीच्या गप्पा तिला अगदी पूर्ण रस घेऊन ऐकणे भागच होते। मग कार्टून नंतर गोष्ट सांग म्हणून मागे लागला. दीप तू आंगणात फ़ुललेली चमेलीची वेल पाहीली का आज? सिमाच्या मनात पुन्हा भरगच्च मोहरलेली चमेली घमघमली.
हो! रोजच तर पहातो. त्यात काय?
अरे त्या चमेलीचीच गोष्ट सांगते तुला. मनोमन ती बळेच एखादी नाजूक, सुगंधी गोष्ट जुळवू लागली. कविता वाटावी अशा एकदोन ओळी देखील मनात तरळू लागल्या. त्या सुगंधाने मोहून तिला खरे तर समिरशी, मुलाशी, सुनेशी, दीपशी, अगदी बेडरूमच्या भिंतीशी देखील खूप गप्पा माराव्याश्या वाटत होत्या.

अरे काय झाले माहीत आहे? आपल्या चमेलीच्या वेलीवर नां एक निळा पक्षी आला... कुठून आला होता माहीत आहे कां....?
कुठून?
दूर दूरच्या देशातून.
मग?
मग काही नाही, तो फ़ांदीवर बसून एक गाणे म्हणत होता. सुचलेली ओळ गाता गाता तिने पाहिले.... दीप तिची बोटे चिमुकल्या हातात धरून शांत झोपी गेला होता.

डोळे मिटून ती चमेलीशीच गप्पा करू लागली.----------------

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

23 Jan 2015 - 2:54 am | बहुगुणी

आवडलं मुक्तक.

अमित खोजे's picture

23 Jan 2015 - 3:06 am | अमित खोजे

आजचे अमेरिकेतील मुलांचे आणि कुटुंबाचे आंखो देखा हाल आहे. सहा महिने सासु-सासरे अन सहा महिने आई-वडील. ते देखील बिचारे नातवाचे करायला मिळणार म्हणून येतात. परंतू त्यांचीही थोडीबहुत घुसमट होतंच असते की!

सौन्दर्य's picture

23 Jan 2015 - 3:25 am | सौन्दर्य

अमेरिकेतील सद्य स्थिती फार परिणामकारक मांडली आहे. जे आजी-आजोबा इथे येऊन कार चालवत नाहीत त्यांना घरी बसणे म्हणजे एक फाइवस्टार जेलच वाटेल. सर्व काही आहे पण स्वातंत्र्य नाही.

काकाकाकू's picture

23 Jan 2015 - 5:14 am | काकाकाकू

अमेरिकेतील सद्य स्थिती फार परिणामकारक मांडली आहे.

हे असले मुलगा - सून - नवरा असले तर अमेरिकेत असले काय, दुबईत असले काय नी मुंबईत असले काय, हे अशीच 'सद्य स्थिती' असणारे.

आजी-आजोबाना कार चालवता येत नाही त्यामुळे निर्बंध अर्थातच येतात. पण त्यामुळे घरी = फाईव्ह स्टार जेल नाही होणार. हे असले आईकडे दुर्लक्ष करणारे मुलगा-सून असले तर त्यामुळे होईल.

स्पंदना's picture

23 Jan 2015 - 5:34 am | स्पंदना

अतिशय परिणामकारक लेख!
वाईट अवस्था करुन ठेवली आहे आजी आजोबांची!! अगदी बिनपगारी मेड!! लालूच नुसती नातवंडांची!! पण त्या बरोबर घरकाम, स्वैपाक, अन बाळ सगळ गळ्यात मारुन मोकळे होतात.

उदय के'सागर's picture

23 Jan 2015 - 3:38 pm | उदय के'सागर

असले नालायक आणि स्वार्थी मुलगा-सून किंवा मुलगी-जवाई पाहिले/ऐकले/वाचले/ की चांगलं मारावं वाटतं त्यांना.

नगरीनिरंजन's picture

23 Jan 2015 - 5:36 am | नगरीनिरंजन

छान! गोष्ट आवडली.

किसन शिंदे's picture

23 Jan 2015 - 5:36 am | किसन शिंदे

आवडलं मुक्तक.

रेवती's picture

23 Jan 2015 - 7:16 am | रेवती

कथा आवडली.

मदनबाण's picture

23 Jan 2015 - 3:45 pm | मदनबाण

मुक्तक आवडल...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

सौन्दर्य's picture

24 Jan 2015 - 9:11 am | सौन्दर्य

नातवंडाची लालूच दाखवून आजी-आजोबांची अशी पिळवणूक करणे वाईटच. तरी देखील कार कार चालवता आली तर घटका दोन घटका स्वताच्या इच्छेने मोकळे फिरता तरी येते, त्या दृष्टीने जेल असे म्हंटले मी.

नाखु's picture

24 Jan 2015 - 9:58 am | नाखु

पण हा नाण्याचा "छापा" झाला "काटा" कुणीतरी लिहा !!

पैसा's picture

24 Jan 2015 - 8:47 pm | पैसा

खूप छान लिहिलंय. लिहिलेल्यातून न लिहिलेलंही खूप काही जाणवतंय. फक्त मुलगा सूनच नव्हे, तर सीमाचा नवरा आणि नातूही आपल्या आपल्या जगात वावरत आहेत. तिला काय दिसतंय, काय वाटतंय, काय सांगायचंय, ऐकून घ्यायला कोणालाच वेळ नाही. एक लेखसुद्धा वाचायला वेळ नाहीये! तो लेखसुद्धा कोणता, तर यशस्वी महिला उद्योजक! जे सीमासाठी निव्वळ दूरस्थ स्वप्नच असावं. नुसती घुसमट. पण हे असलं सगळं बायकाच स्वतःला चिकटवून घेतात बहुतेकवेळा.

अरुण मनोहर's picture

25 Jan 2015 - 4:15 am | अरुण मनोहर

तुमचा प्रतिसाद खूप आवडला. समोरच्यासाठी वेळ नसणे हीच सर्वात मोठी अडचण आहे. अशा वाढत्या रेट्यांत वाढलेली पिढी माणूस ह्या तत्वापासून दूरदूर जात राहील कां?

पैसा's picture

25 Jan 2015 - 8:29 am | पैसा

आपल्या आयुष्यात यंत्रांना, गॅजेट्संना इतकं महत्त्व आलंय त्यामुळे आयुष्यातला मानवी स्पर्ष हरवत चालला आहे का? यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण यांचे हे अपरिहार्य परिणाम आहेत का? अनेक प्रश्न. उत्तरं शोधायलादेखील कोणाला वेळ नसावा!

मधे फेसबुकवर एक विनोद पाहिला होता. एक मुलगी म्हणते आहे की "आज नेटवर्क बंद होतं त्यामुळे बदल म्हणून घरातल्यांशी गप्पा मारल्या. तेही चांगले लोक वाटले!" खरं तर वाचून वाईटच वाटलं. प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला. फक्त शारीरिक गरजांपुरते त्यातून बाहेर यायचे. हे सगळं कुठे जाऊन थांबणार काही कळत नाही.