आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
20 Jan 2015 - 10:43 pm

आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885

' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर'

भाग -०२

'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.

संध्याकाळ असावी असं वाटलं, उठुन बसलो, ' आलिया भोगासी असावे सादर' अजुन काय बोलु मी तरी ? मेव्हणा बोलला आणि निघुन गेला..

बायको दोन्ही मुलींना घेउन दुस-या बेडरुममध्ये गेली, मी समोरच्या टॅबकडं पाहात होतो. कधी तरी ऐकलं होतं की या विश्वात निर्माण झालेला प्रत्येक ध्वनी हा या इथंच कुठंतरी तरंगत राहतो, तो पुन्हा कधीतरी तुम्हालाच ऐकु येउ शकतो. या आंतरजालाचंही तसंच आहे, प्रत्येक डिस्कवरचे काही मॅग्नेटिक संकेत बदलले जातात प्रत्येक वेळी, पण ते मॅग्नेट मागचे संकेत लक्षात ठेवत नसेलच असं नाही, आणि अगदी लाखो करोडोत एकदा असा विचार केला तरी, प्रत्येक संकेत पुन्हा एकदा त्याच रुपात त्याच ठिकाणी येउ शकतोच की.

पुन्हा एकदा मागच्या मार्गानंच हेम्याला फसवावं का असा विचार केला, पण ते शक्य नव्हतं. टॅब उचलुन हातात घेतला, प्लिपकार्ट ओपन होती, आणि माझ्या नावानं एक नविन टॅब कार्ट मध्ये टाकलेला होता, ड्युअल सिम आणि ३जि असलेला. वर्ड फाईल उघड्ली, म्हणजे हेम्या आला, आणि आदेश दिला.. ' तुझ्या कार्डाचे डिटेल टाक, आणि टॅब आल्यावर मला कळेलच तेंव्हा काय करायचं ते सांगतो तुला.'

नकार शक्य नव्हताच, कारण हेम्या काय करु शकतो याची कल्पनाच काय परिणाम देखिल माहित होते. माझं डिटेल टाकुन झालं, आणि बाहेर हॉल मध्ये माझ्या सकाळपासुन बंद असलेल्या फोनच्या अंगात जीव आला आणि एसेमेसचा टोन वाजला, मोठी कन्या पळत फोन घेउन आली, तिच्यामागं बायको आणि तिच्या हातुन फोन घेउन मेसेज वाचत म्हणाली ' झाली सुरुवात आर्थिक शिक्षेची'. तो फोन पण बेडवर आदळुन निघुन गेली. डोकं जड झालं होतं, कितीतरी वेळ तसाच पडुन होतो, जाग आली तेंव्हा रुममधला छोटा दिवा चालु होता, बाजुला कुणीच नव्हतं, टॅब पण बंद होता. बेडवरुन उठत बाहेर आलो, हॉलमधल्या घडाळ्यात साडेतीन वाजले होते. दुस्-या बेडरुममध्ये तिघी झोपल्या होत्या, किचन मध्ये पाहिलं, बेसिन मध्ये तिन ताटं होती, कट्यावर कुणीतरी आणुन दिलेला डबा होता. फ्रिज उघडुन एक सफरचंद घेउन हॉल मध्ये येउन बसलो, टिव्ही लावला, बराच वेळ चॅनल बदलण्यात गेला,शेवटी एक बातम्याचा चॅनल लावला अन सफरचंद खात बसलो, सकाळी साडेपाचच्या सुमारास अलार्म झाला, बायको उठुन आली. माझ्या हातुन रिमोट घेतला अन शेजारी बसुन माझ्या डोक्यावरुन हात फिरवत बसली, लहान लेकरासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेवुन मी रडायला लागलो.

' का रडतोयस, कशाचं वाईट वाटतंय, का भीती वाटतेय भविष्याची ?, टाळता येणार असेल रडुन उपयोग आहे का, टाळ मग ते आणि नसेल तर जे होईल त्याला सामोरं जा.' उठुन तिचे दोन्ही हात हातात घेत मी म्हणलं ' माझं जे होईल त्याला मी सामोरं जाईन, पण तुमची काळजी वाटते गं, मला काही झालं तर तुमचं कसं होणार याची कल्पनाच करवत नाही., या दोघींना कशी सांभाळशील, काय सांगशील बाबा कुठं गेला म्हणुन, समजायच्या वयात येईपर्यंत किती अवघड होईल ना तुला त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत राहणं याची भीती वाटते. '

म्हणजे बदनामीची भीती नाही तुला, डायरेक्ट मरणाचीच गोष्ट सुचतेय तर, असला कसला भित्रा रे तु ? अनुजानं डोळ्यात पाणी आणुन विचारलं, घशातुन शब्द बाहेर पडत नव्हते तिला उत्तर द्यायला, तिला सांगायचं होतं ' बाई, बाबा देवबाप्पाकडं गेला हे सांगणं सोपं आहे, शेजार पाजारचे, नातेवाईक थोडी सहानुभुती तरी दाखवतील, पण मला तुरुंगवास झाला आहे हे कसं समजावशील, आणि तु लाख समजावशील, पण बाकीची लोकं माझ्या लेकींकडं एका चोराच्या मुली म्हणुनच पाहतील ना, त्याची भीती वाट्ते. ' पण सांगायची डेअरिंग झाली नाही.

आज ऑफिसला येत नाही असा नितिनला एसेमेस केला आणि सकाळची आन्हिकं आवरुन घेतली, तोपर्यंत दोन्ही पोरी उठल्या होत्या, त्यांचं आवरुन अनुजा त्यांना शाळेच्या बसमध्ये सोडुन आली. तिचं किचनमधलं आवरुन झाल्यावर दोघांसाठी चहा घेउन आली, दोघंजण गॅलरीत बसुन चहा पित होतो. ' आपण धनुभावजींना विचारायचं का याबद्दल ? त्यांच्याकडं काही उपाय असेल या सगळ्यावर. ' आयटित असुन सुद्धा अध्यात्माबद्द्ल बरंच कळत त्यांना'. खरंच धन्याला विचारावं एकदा, पण पुन्हा अध्यात्म वेगळं आणि तांत्रिक वेगळं. मग दिवसातला बराच वेळ असाच भलते सलते विचार करण्यात घालवला. दुपारी पोरी घरी आल्यावर कालचं काहीच टेन्शन त्यांना जाणवणार नाही याची काळजी आम्ही दोघंही घेत होतो. संध्याकाळी सगळेजण कोथरुडच्या बागेत गेलो, खरंच जवळपास ८-९ महिन्यांनी इथं येत होतो, बाग बरीच बदलली होती, नविन जॉगिंग पाथ आणि बरंच काही बदललेलं होतं. दोन्ही पोरी तासभर खेळल्या, मग बाहेर येउन घोड्यावर बसणं, पाणीपुरी वगैरे शिस्तीत झालं. साडेआठच्या सुमारास घरी आलो. नितीन खालीच भेटला पार्किंगमध्ये. अनुजा अन दोन्ही मुली वर गेल्या आणि आम्ही दोघं खालीच बागेतल्या बाकावर बसुन बोलत राहिलो, जे दिवसभर अनुजाबरोबर बोललो तेच पुन्हा एकदा नितिन बरोबर बोलुन झालं. साडेअकराला वर घरी आलो.

बेडरुममधल्या कपाटातुन टॅब बाहेर काढला, हेम्या ऑनलाईन होताच, ' काय आज सुट्टी काढली होती काय हापिसातुन ?'- पहिला प्रश्न. ' मी विचारलं - ' हो, पण तुला कसं कळालं, खरंतर तुला कळु नये म्हणुन दिवसभर तुला हात नव्हता लावला मी ' दोन चार हसण्याच्या स्माईली टाकुन हेम्या टायपला - ' तुला आठवतंय मी यात अडकलो कसा ते, फ्रिक्वेन्सी जुळल्या होत्या, तसंच तुझी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे, तुझ्या हार्टची धडधड एका विशिष्ट पद्धतीनंच होते, आणि हे कळतं मला सगळं. त्या धडधडीचा संबंध तुमच्या रुपाशी पण असतो माहितीय का ? म्हणजे बघ तुझ्या हार्टची लय जेवढी मद्द आणि मंद आहे ना त्यापेक्षा तुझ्या बायकोची जास्त सुंदर आहे, ती ऐकत राहिलं ना तर काही वेळानं त्या लयीशी जुळवुन घ्यावंसं वाटतं मलापण, म्हणजे ती दिसायला तुझ्यापेक्षा उजवी आहेच बरोबर ना ? ' मी गप्प, हेम्या भुत असला तरी पुरुष होता किंवा भुतात स्त्री पुरुष असं काही असतं का माहित नाही, पण शेवटी एका पुरुषाचंच भुत होता. ' अबे, गप का झाला, आता काही करणार नाही तिला घाबरु नको, शिक्षा तुला देणार आहे तिला नाही, जा झोप आता उद्या ऑफिसला जायचंय, आणि हो उद्या तो नविन टॅब घेउन ठेवायला सांग अन्नुला.... ' हेम्या गायब होता होता टायपुन गेला, टॅब ठेवताना मी पुन्हा एकदा नीट पाहिलं ते अन्नु बोल्ड केलेलं होतं.....
क्रमशः

कथातंत्रराहणी

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Jan 2015 - 10:57 pm | पैसा

काय करणार आहे हे भूत?

प्रचेतस's picture

20 Jan 2015 - 11:12 pm | प्रचेतस

झक्कास. नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेखन
पण हे भाग जरा भरभर येऊ द्यात ना.

सविता००१'s picture

21 Jan 2015 - 11:24 am | सविता००१

पटापट टाक आता पुढचे भाग

मुक्त विहारि's picture

22 Jan 2015 - 4:41 am | मुक्त विहारि

आयला.... स्पार्टाकस्,बोका, अ.आ. आणि ५० फक्त ही एक नंबरची डामरट चौकडी आहे.

काय एक एक वाचायला आणतील, ह्याचा नेम नाही....

कथानक मस्त रंगत आहे.

किसन शिंदे's picture

22 Jan 2015 - 7:25 am | किसन शिंदे

हेम्याने परत यायला फार दिवस घेतले.

आवं मागल्या टायमाला वैनी गोद बातमी द्यायच्या होत्या.
आता मेंबरं वाढल्याचे पण सांगुन झाले. मग लागणारच ना टाईम.

खमक्या's picture

23 Jan 2015 - 7:41 am | खमक्या

त्ये 'धन्या'भाउजी कोण ते समजले. पर म्या ईच्चार करुन राह्यलोय की ते भूत कोण असेल? ईथं कुठल्या नावानं असंल. 'आत्मा' असं हाय इथं एकाचं नाव. पर त्यो माणूस चांगला हाय. देवाधर्माचं, पुजेचं बघतो त्यो. त्यो नसंल भूत.

संदीप डांगे's picture

11 Jun 2015 - 4:02 pm | संदीप डांगे

मस्त आहे हे.

पुढचा भाग कधी येणार...?

अमित भोकरकर's picture

10 Jun 2016 - 4:26 am | अमित भोकरकर

या पुढील भाग कुठे मिळेल ?