चौघांची गोष्ट !

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
19 Jan 2015 - 9:37 pm

एक कथा काही दिवसांपासून डोक्यात घोळते आहे.
नेमकी हव्या त्या फॉर्म्याट मध्ये लिहिता येत नाहिये.
जशी आहे तशी ... आहे त्या रुपात इथे सादर करत आहे.
**********************कथा सुरु*****************************
जुनी आहे एक गोष्ट. झाली असतील काही शे वर्ष.
एक होतं गाव. खरं तर ते नव्हतं नुसतं गाव. ते होतं मोठं राजधानीचं गाव. मोठ्ठं गाव.
प्रसिद्ध गाव. प्रसिद्ध ठिकाणी वर्दळ.भरपूर प्रवाशी. देषोदेशीचे प्रवाशी. गावंही मोठ्ठं.
गावात होते भटजी.मोठ्ठ्या गावातले मोठ्ठे भटजी. पण हे आटपाट नगरातले नव्हते.
आटपाट नगरातले म्हंजे "एक होतं आटपाट नगर. त्यात एक गरिब ब्राह्मण राहत होता." असं म्हटल्यावर दिसणारे.
तसे हे अजिबात नव्हते.हे चांगले सधन. मस्तपैकी पैसा बाळगून. स्वकतृत्वाचा नसला; तरी पैसा आहे म्हटल्यावर मान असायलाच हवा!
तसा ह्यांना गावात बराच विकतचा मान.भटजींचं जरा वय वाढू लागलेलं.त्यांच्या माता पित्यांना चिंता लागली.
(तर तर...आदर आहे ना त्यांच्याबद्दल. "थोराड झालेत" कसं म्हण्णार ?)
तर सांगायचं म्हणजे , भटजी काही लग्नात रसच दाखवेनात.
पण इतक्या विद्वान नि हुश्शार पोराला इतक्या जायदादीसकट एकटं कसं ठेवणार ?
माता पित्यांनी बराच आग्रह करुन दिला बार उडवून.
लग्न झालं, बायको आली. मोठ्या घरात पडल्यानं आधी आनंदून गेली.
पण का कुणास ठाउक काहिशी नंतर नाराज राहू लागली. नुसते आवंढे गिळू लागली.
चालायचच. तुच्छ जनावरं आणि बायका ह्यांना नाराज रहायला, तोंड फिरवायला काही कारण लागतं?
नाहिच. दाखवतात आपला असाच माज. चालायचच.
काही वर्ष गेली, तरी भटजींना मूलबाळ नै.त्या काळात चूक अर्थातच भटणीचीच असे.तिला सर्वांनी दोष दिला.
ही असली ओसाड जमीन सोडून चांगली सुपीक जमीन भरघोस पीक घेण्यासाठी पहायचं ठरलं.
भटजींचा दुसरा बार दिला उडवून घरच्यांनी. लग्नाच्यावेळी ही आधीची भटजीपत्नी जरा चिंतितच होती.चेहरा पाडून होती.
ती काही सांगू पहात होती.पण बरच झालं.सवत आलेली तिला बघवली नसणार.मोडता घालायचा शिंचा प्रयत्न असणार.
असो.
तर दुसरी पत्नी आली. मजेत राहू लागली. पण घराला जणू दृष्ट की हो लागली. काही दिवसातच हीसुद्धा उदास उदास दिसू लागली.
काही वर्ष गेली. पाळण्यानं हलायचं नाव घेतलं नाही.
.
.
नशीब की हो वाईट. इतका चांगला मुलगा. दरवेळी अशीच कशी बायको मिळाली म्हणून जो तो सहानुभूती दाखवी.
लोकांना चिंता. माता पित्यांच्या काळजाला घोर. समई तेवत का नाही. वंशाला अजून दिवा का नाही.
.
.
हरकत नाही. अजून एक डाव खेळू. चांगली जमीन शोधून पाहू. भटजींनी आळस झटकला.
अजून एक जमीन्...आपलं मुलगी पाहिली. ही तिसरी बायको तरी चांगली निघावी. जो-तो बोलू लागला.
तिसरं लग्न ठरलं. तो तरुण सुकुमार बालक बाशिंग बांधुनि उभा राहिला.
दरम्यान त्या आधीच्या बायकांना काही बघवलं नाहिच. त्या तिसरीपाशी कशाबशा पोचल्या नि कानात काही सांगू लागल्या.
तिसरीनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.आणि समारंभात ती पुन्हा व्यग्र झाली.
.
.
तर...
ठरल्याप्रमाणे लग झालं. ती आली.तिच्यावर सासरचे सारेच खुश.तिचं रुप, गुण सगळच कसं खानदानी.
तिच्यावर सगळ्यांचा भारी जीव. काही महिनेच गेले असतील; तोवर गोड बातमीसुद्धा आली!
"उसके घर देर है अंधेर नही " चा खरोखरीच प्रत्यय त्या कुटुंबाला आला.
पाळणा हलला.
.
.
पण चांगल्या गोष्टीलाही गालबोट लागायचच.
भट - भटणी दोघं चांगले गोरे गोमटे. पण बाळ मात्र जsssरा वेगळच दिसे.
अगदि रंगानंही बरचस वेगळं.रुपानंही!ह्यांचे केस सरळ, बाळाचे केस कुरळे.
ह्यांचे चेहरे गोलट. बाळाचे उभट. ह्यांचे नाक सरळ. बाळाचे बसके.
.
.
चालायचच. देवाचा चमत्कार असाच असायचा.
काही कुजकट चर्चा क्वचित होत. दबक्या आवाजात कानावर येत.
"बाळ बापावर गेलय" अशीही खवचट टिप्पणी होइ.
मारणार्‍याचा हात धरता येतो. बोलणार्‍याचं तोंड नाही.
.
.
इतक्या पुण्यवंत, प्रयत्नशील मंडळींवरही शंका घेणं ? संशय घेणं?
शिव शिव. खरच. जुना काळ असला तरी कलियुगातलीच वेळ होती म्हणायचं.
.
.
तिसरी बायको आता सगळ्या कुटुंबाच्या गळ्यातला ताईत होती.
भटजींच्या सत्शील वर्तनाबद्दल देवानेच आता पावती दिली होती.
त्यांच्या सत्शीलतेचा लौकिक वाढतच होता. दुसरी पत्नी होती ना,
तिनंही ह्या नवरा-बायकोच्या -- पुण्यवंतांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलं होतं.
.
.
पण पहिली आणि दुसरी आपसात बोलत.
दुसरी म्हणे की "कमाल आहे. आपल्याला नाही, पण तिला मूल झालं. पण्.. हे असं कसं?
दैव आपल्यावर का गं असं प्रसन्न नै झालं ? नेमकं आपल्याच वेळी आपल्या ह्यांना ....."
.
पहिली म्हणे "आपल्यावेळी तेच नि खरं तर हिच्याही वेळी तेच."
दुसरी म्हणे "अगो बाई! खरं की काय ? पण्...पण मग तसं असतं...
तर श्रद्धेचं हे फळ असं कडेवर घेउन मिरवायला त्यांना मिळालं कसं असतं?"
.
.
दुसरी म्हणे "नवरोबांना खरं काय ते ठाउक आहे. पण शांत राहण्यातच त्यांचंही हीत आहे."
.
.
पहिली बायको होती ना, ती काही बडबड करी. तिच्यामुळेच भलभलते समज पसरले होते.
तिनं पुण्यवंतांबद्दल बेताल बडबड केली होती. देवानच तिला शिक्षा दिली.
ती अवचित पाय घसरून आडात पडली. शेजारी भटजी असतानाही पडली.
अर्थात, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध भटजींसारखा धर्मश्रद्ध जाणे शक्यच नाही.
त्यांनी दैवाच्या गतीला विरोध केला नाही.
.
.
बंडखोर, भांडकुदळांना अश्शीच शिक्षा मिळायला हवी.
.
.
तर...
अशी ही कहाणी संपत आली.
कहाणीत पात्रे एकूण चार.
ती पहिली पत्नी म्हणजे भांडकुदळ, माणूसद्वेष्टी हिंसक राक्षसीणच जणू!
दुसरी पत्नी म्हणजे आता साक्षात निष्ठा , श्रद्धा ह्यांची मूर्तीच. अगदिच आज्ञाधारक आणि कायदेपाळू.
काही हल्कट तेवढ्यातही तिला लाचार, दुबळी म्हणत.
पण कुजबुजीकडे का लक्ष द्यायचे असते ?
आणि ते ते... ते भटजी म्हणजे साक्षात जगन्नियंत्याशी संपर्क असणारेच. सत्शील!
त्यांच्याकडे कितीही आणि कोणतेही अधिकार दिले, तरी चूक काही नाही.
ते सर्वांवर नियंत्रण ठेवत. सर्वांची काळजी घेत. ह्या सर्वांचा प्रतिपाळ करत.
कोणाला काय हवं - नको; ते बघत. कोणी काय करावं ; हे सुद्धा ठरवायची तसदी इतर कुटुबियांना घेउ देत नसत.
स्वतःच सगळ्यांसाठी सर्व काही ठरवून मोकळे होत. सर्वांना न्यायानं वागवायची हमी देत.
आणि तिसरी पत्नी म्हणजे साक्षात यश. योग्य प्रयत्नांची साथ असेल तर ईश्वर यश देतोच, ह्याची साक्ष असणारे उदाहरण!
ह्या प्रतिपाळ करणार्‍याच्या न्यायाची जिवंत-- जितीजागती साक्ष.
आणि तिच्या कडेवर त्या सुखाचा , आनंदाचा पुरावा!
***********************कथा समाप्त***************************

--मनोबा

कथाविचार

प्रतिक्रिया

चेतन677's picture

19 Jan 2015 - 9:49 pm | चेतन677

छान..

मृत्युन्जय's picture

19 Jan 2015 - 10:06 pm | मृत्युन्जय

वा वा. चान चान.

चांगलीय कथा. पण टकाने टाकलेला फोटो दिसत नाहीये.

आनन्दा's picture

20 Jan 2015 - 12:03 pm | आनन्दा

अरे वा.. या गोष्टीची आठवण झाली.
देशची भावी पिढी जेव्हा आपल्या प्रश्नांशी झगडत असते, तेव्हा उद्योगपती कामगारांचे शोषण करत असतात, सरकार झोपेत असते आणि सामान्य जनता नुसते बघत राहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही..

सूड's picture

20 Jan 2015 - 6:30 pm | सूड

अगदी!!

पदम's picture

20 Jan 2015 - 1:13 pm | पदम

मस्तच झाली कथा.

hitesh's picture

20 Jan 2015 - 6:57 pm | hitesh

छान . सुंदर.

मन१'s picture

1 Feb 2015 - 7:44 pm | मन१

सर्व वाचक व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.