निळाई...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in भटकंती
7 Jan 2015 - 11:21 am

पूर्वप्रकाशित...

माझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे, पण आहे एवढं खरं...
मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, समांतर सिनेमाचा 'ब्ल्यु आईड बॉय फारुख शेख असो, निळ्या डोळ्यांची ऐश असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं !

ग्रेसची एक कविता आहे 'निळाई' !

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो? या 'निळाई'च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम 'ब्ल्यु पिरियड' या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी 'कास'च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले 'प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये? .... निळावंती ! आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची 'निळाई' मला कायमच वेड लावत आलेली आहे. गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात पुन्हा एकदा या निळाईच्या मोहजालाचा विलक्षण अनुभव आला.

पर्थमधला आमचा दिनक्रम साधारणपणे सकाळी ९ ते ५ ऑफीस आणि त्यानंतर साडे सहा - सातच्या दरम्यान कुठेतरी एकत्रीत रात्रीचे जेवण असा असतो. यावेळी एक दिवस गुरुपोर्णिमेचा असल्याने मी संध्याकाळी गृपबरोबर जेवण घ्यायचे टाळले. राहत्या हॉटेलवरच काहीतरी शाकाहारी जेवण घ्यायचे असे ठरवल्याने ती संध्याकाळ मला स्वतःसाठी देता आली. तिथेच जेवण करायचे असल्याने थोडा उशीर झाला तरी चालेल असे ठरवून कॅमेरा घेवून भटकंतीसाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी माझ्या रुमच्या बाल्कनीतून सहज एक नजर बाहेर टाकली. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते. इथे दिवस तसा लवकरच मावळतो. त्यामुळे आकाशात संध्येची चाहूल लागायला सुरूवात झालेली होती.

विरघले नभांगण...
बघ निघाला माघारा रवी
पसरले श्यामरंग
फुटे निळाईस पान्हा

1

हॉटेलच्या समोरच अगदी मधला एक रस्ता सोडला की समोरच पसरलेला अथांग सागर आहे... निळाशार ! त्यामुळे माझी ती संध्याकाळ तिथेच जाणार हे निश्चीत होते. किनार्‍यावर आलो तेव्हा समोर पसरलेला सागर आणि आकाशाच्या पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर आली.

२

अजुन बर्‍यापैकी उजेड होता. त्यामुळे नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु आसमंत व्यापत चाललेल्या निळाईशी स्वतःचे अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु होती.

नकोच मजला सर्व नभांगण
क्षितीजाशी एक रेघ हवी
तुझीच सत्ता, तुझी निळाई
सोबत मजला तुझी हवी

7

3

एकमेकाशी मस्ती करत दोघांचा मस्त दंगा चाललेला होता.

4

अचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमक पवित्रा घ्यायचे स्विकारले असावे. त्या निळाईवर विजय स्थापीत करण्यासाठी त्याने बहुदा आपले, आपल्यात सामावलेल्या रंगांचे सामर्थ्य आजमावण्याचा निर्णय घेतला. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे सप्तरंगाची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात झाली.

8

असली विलक्षण जुगलबंदी पाहताना मला मात्र संमोहनाचा भास होत होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या सप्तरंगी रेघेचे रुपांतर आपल्या मनमोहक शस्त्रात करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्‍या टोकाकडूनही हालचाल सुरू केली होती.

8

9

10

थोड्या वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की हा श्वेत रंग आपल्या रंगांच्या जोरावर त्या निळाईवर विजय मिळवतो की काय असे वाटायला लागले.

11

काही काळापुरता का होइना पण त्याने विजय मिळवला देखील. क्षणभर माझ्या लाडक्या निळाईला विसरून मी रंगांच्या त्या मनमोहक आविष्काराकडे भान हरपून बघत राहीलो.

स्तब्ध जाहला,अवखळ वारा
वाजता तुझे नि:शब्द पाऊल

संपले अवचित सारे भास
मनाला पडली कसली भूल

पांघरलेली गात्रांवर ओली
खुळावल्या दंवबिंदुंची झूल

आकंठ जणु प्रत्यंचाच ती,
कशाची होती ती चाहूल ?

13

भान हरपून त्या वेड लावणार्‍या इंद्रधनुकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले आहे याची नकळत जाणिव झाली आणि मी सगळी अवधाने सोडून त्या नवलाईत हरवत राहीलो....

पण किती वेळ चालणार ही मस्ती? शेवटी हळु हळू त्या निळाईने आपले निर्विवाद साम्राज्य पसरायला सुरूवात केली.

निळ्या अंबराची मिठी ही निळी
खुळ्या जिवाची दिठी ही निळी
निळाई...निळाई... स़खी ही निळी
निळ्या सागराची गाजही निळी

5

6

15

गंमत म्हणजे ही सगळी स्थित्यंतरे अवघ्या एका तासात झाली होती. मावळतीकडे निघालेला सहस्त्ररश्मी अजुनही आपले अस्तित्व दाखवून होता. पण गंमत म्हणजे तेजोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भास्करालाही या निळाईने अगदी निष्प्रभ करून टाकले होते. त्या निळ्या रंगाच्या शितल किमयेपुढे तो सुद्धा आपला स्वभावच जणू विसरून बसला होता.

16

त्या श्यामल निळाईत हरवताना नकळत मला जाणवले की माझ्या ही नकळत मी देखील त्या निळाईचा एक पदर पांघरून घेतला होता.

'ग्रेस' म्हणतात...

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा?

विशाल

प्रतिक्रिया

धाग्यातील कंटेंट दोनदा आले आहे. बाकी लेख व फोटो छानच. फक्त तेवढा क्षितिजसमांतरपणा सांभाळा.

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 12:06 pm | टवाळ कार्टा

जळवा अज्जून :(

सविता००१'s picture

7 Jan 2015 - 12:13 pm | सविता००१

खूप सुरेख लेख.

जिन्क्स's picture

7 Jan 2015 - 12:15 pm | जिन्क्स

माफ करा पण प्रत्येक छायाचित्रातले रंग खोटे वाटत आहेत. छायाचित्र एखाद्या सॉफ्टवेअर मधे संपादित करुन overprocessed (मराठी शब्द???) केल्या सारखे वाटत आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

7 Jan 2015 - 1:27 pm | विशाल कुलकर्णी

<<माफ करा पण प्रत्येक छायाचित्रातले रंग खोटे वाटत आहेत. >>

यावर एकच उपाय आहे तो म्हणजे प्रत्यक्ष पर्थला जावून तिथली संध्याकाळ अनुभवणे. यात प्रोसेसिंग म्हटले तर फक्त ब्राइटनेस कमी-अधिक प्रमाणात अ‍ॅडजस्ट केलेला आहे.

स्पंदना's picture

8 Jan 2015 - 6:57 am | स्पंदना

येस्स जिंक्स!!
मी तर येथे चार इंद्रधनुचा गोफ पाह्यला आहे. निळ्याभोर आकाशात शाळेत चालणार्‍या विद्यार्थ्यांसारखा ढगाचा एकच पट्टा वेगात अंतर कापताना पह्यला आहे. हिवाळ्याच्या एका संध्येला, पश्चिमेला दाटलेल्या काळ्या ढगांच्या आच्छादनाला फक्त तीन खिंडारे अशी पडली होती, की वाटावे जणु एखादा राक्षस त्याच्या दोन डोळ्यातुन अन तोंडातुन आग ओकतोय!!
ऑस्ट्रेलिया इज डिफरन्ट!! डोन्ट नो हाऊ!! बट इट इज!

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2015 - 11:42 am | विशाल कुलकर्णी

अनुमोदनसाठी आभार अपर्णा.
पण एवढे मात्र अगदी खरे की ऑस्ट्रेलिया खरोखर हटके आहे. प्रत्येक वेळी काही तरी नवे दाखवतो. माझ्याकडे याच समुद्राचे भर दुपारी काढलेले फोटो सुद्धा आहेत. लवकरच तेही टाकेन.

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 7:22 am | स्पंदना

समुद्र? जमले तर परवाचे व्हिस्की बे चे फोटोज टाकते. निळ्याशार रंगाचे तीन नमुने एकत्र दिसताहेत.

स्पंदना's picture

12 Jan 2015 - 8:04 am | स्पंदना



किल्लेदार's picture

12 Jan 2015 - 1:31 pm | किल्लेदार

जबरदस्त !!!!!!!!!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2015 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा

वेचक
वेधक

मुक्त विहारि's picture

7 Jan 2015 - 2:16 pm | मुक्त विहारि

आवडले...

पुन्हा पुन्हा वाचल्या काही ओळी!! एकच नंबर. *i-m_so_happy*

अमोल केळकर's picture

7 Jan 2015 - 4:39 pm | अमोल केळकर

सुंदर

अमोल केळकर

प्रचेतस's picture

7 Jan 2015 - 4:56 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर.

विंदांच्या या कवितेची आठवण झाली

काही केल्या, काही केल्या
निळा पक्षी जात नाही
प्रकाशाचे पंख सान
निळी चोच, निळी मान
निळे डोळे, निळे गान
निळी चाल, निळा ढंग
त्याने चढे आकाशाला
निळा रंग.

निळा रंग आवडणार्‍यांचं लय कौतुक वाटतं.

निळाई आवडली शब्दातली आणि फोटोतलीसुद्धा.

पदम's picture

7 Jan 2015 - 7:25 pm | पदम

खूप सुन्दर फोटो आनि वर्‍णन सुद्धा

रामपुरी's picture

8 Jan 2015 - 2:39 am | रामपुरी

फार पोस्ट प्रोसेसिंग केले कि छायाचित्रे कॄत्रिम होतात

चित्रे अतिरंजित/ अतिसंस्कारित/ अतिगडदoverprocessed जाणूनबुजून केलेली आहेत चुकून नाही त्यामुळे मला आवडली. मग मीही हा लेख keep images off ठेवून पुन्हा उघडून पाहिला निळाईचे १६ चौकोन वेगळ्या छटांत दिसले आणि कविता ठळक झाल्या. निळाई आणि शाकाहारी गुरूपौर्णिमा फारच आवडली.
चित्रकार निळा आणि काळयात चित्रे रंगवू लागला की व्यक्तिगत आयुष्यात दु:खातून जात आहे म्हणतात .(van gaug काpiccaso ?)बद्दल लिहिले आहे ते नक्की आठवत नाही. परंतू तुमची निळाई आनंदाचा आरसा वाटते आहे भारतीय चित्रकारांचा दु:खाचा रंग कोणता आहे ? फोटोग्राफीत सेपिआटोन कृष्णधवल कसले द्योतक असावे ?

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2015 - 11:46 am | विशाल कुलकर्णी

परंतू तुमची निळाई आनंदाचा आरसा वाटते आहे भारतीय चित्रकारांचा दु:खाचा रंग कोणता आहे ? >>>>

मनःपूर्वक आभार कंजूस. भारतीय चित्रकारांचा दु:खाचा रंग कोणता आहे हे माहिती नाही. पण मी बहुतांश वेळी अशी चित्रे गेरु रंगात, अथवा मातकट रंगात रंगवलेली पाहीली आहेत. मला वाटतं मिपावरचे 'चित्रगुप्त' यावर समर्थपणे भाष्य करु शकतील.

निळाई नाही चित्रमय निळाई असेच फोटो आहेत एकदम चित्रा/पेंटीग प्रमाणे

पैसा's picture

11 Jan 2015 - 9:40 pm | पैसा

खूपच छान!

नाखु's picture

12 Jan 2015 - 9:12 am | नाखु

परस्परपूरक चित्रे आणि समर्पक काव्य *GOOD* *THUMBS *YES*
योग्य ग्रेव्ही आणी त्याच प्रमाणात भाजी असेल तर दोन्हींचा मिलाफ "चवदार आणि अनवट" असणारच !!!