विषाणू (भाग २)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
14 Dec 2014 - 2:26 pm

............. आदिवासी मानवापासून आपण सगळ्याच अर्थाने खूप दूर आलेलो आहोत. तरिही आपल्याला आपले मूळ ठिकाण बघण्याची आतुरता आहे. तिथे पोहचल्यावर पुरातन सृष्टी आपल्याला दिसेल. तिचा फ़क्त तेथेच आनंद लुटा. तेथून कोठलीही वस्तू आणणे हे धोक्याचे आहे. काहीही आणायला परवानगी नाही. हे लक्षात ठेवा.”

विषाणू (भाग १)

पुढे वाचा....

पृथ्वीवर पोहोचल्यानंतरचे सगळे सोपस्कार होऊन मंडळी आपापल्या कक्षांमधे विसावली. थोडा आराम झाल्यावर सगळ्यांचे आलिशान हवाई वाहनामधून आजुबाजुंच्या पर्वतराजीभोवती ऊड्डाण झाले. सरोवराच्या बाजुने भटकंती झाली. मंगळाच्या आकाशासारखी तेथे धुसर संरक्षक चादर नव्हती, तर स्वच्छ निळा नितळ रंग वर सर्वत्र पसरला होता. संरक्षक कवच नसल्यामुळे तिथून सूर्य देखील फ़ार प्रखर आणि भाजणारा वाटला. तसल्या प्रकाशाची मंगळवासींना सवय नसल्याने प्रत्येकाने युव्हीसारक कपडे आणि डोळ्यांवर आवरणे लावली होती. इराने प्रवासी पत्रक वाचलेलेच होते. त्यामुळे काही उत्साही प्रवाशांना घेऊन अगदी पहाटे ती सरोवराच्या काठावर गेली होती. तिथून सुर्योदय खूप वेगळा दिसतो. आणि तसा तो त्यांना बघायलाही मिळाला. मंगळावर संरक्षक चादरीमधून दिसणारा सूर्य एक छोटासा फ़िक्कट गोल असतो. पृथ्वीवर मोठा केशरी गोलाकार उगवता सूर्य सगळ्यांनी बघितला. सरोवरात पृथ्वीवरचे काही जीव तरंगत होते. उंच शुभ्र माना वाकवून वाकवून ते ह्या पाहुण्यांकडे बघत होते. त्यांचा क्वॆक क्वॆक आवाज कोणालाच समजला नाही. पण काही अनाकलनीय अल्फ़ा मात्र मेंदूत उलगडल्या. नक्कीच त्यांना काहीतरी सांगायचे असेल. पण फ़्रिक्वेंसी जमत नसल्याने इलाज नव्हता. पुढच्या वेळीस ह्यांचा अल्फ़ा कन्वर्टर आणायला हवा! पिवळ्या ओठांचे तरंगते विचित्र जीव बघून सर्वांनी वेगळे पाहिल्याची नोंद केली. “ह्यांना बदक असे म्हणतात.” इराने माहिती पुरविली.

थकूनभागून रिसॊर्टवर परत आल्यावर अन्न शिजवून चावण्याचा आदिवासी सोहळा पार पडला. बहुतेकांनी ते नाममात्रच चाखले. त्यानंतर सगळी मंडळी घाईघाईने आपापल्या कक्षात उर्जा कारंजी फ़वारायला पळाली. इराने मात्र पर्समधून छोटे उर्जाकारंजे काढून थोडासाच वाफ़ारा घेतला. थोडाच, कारण तिने ताटलीमधले शिजविलेले सगळे अन्न चवीने खाल्ले होते. कितीतरी विचित्र प्रकार होते त्यांत! अगदी आदिमानव करीत असावेत तसेच! पोट एकदम जडजड भासू लागले. म्हणून थोडा उर्जा फ़वारा घेतला आणि एकटीच भटकायला ती बाहेर पडली.

रिसॊर्टच्या बागेत जमिनीत उगविली जाणारी कित्येक विचित्र फ़ुले, वेली आणि झाडे होती. त्यासाठी केवढी तरी जमिन व्यापली गेली होती. ही अकारण उधळपट्टी पाहून इरा अचंबित झाली. मंगळावर जमिनीचे मोल सगळ्यांनाच माहित होते. अणुछापकासारखा स्वस्त आणि तडक उपाय असतांना अशी वनराई उगविण्यासाठी प्रचंड जमिन आणि वेळ वाया घाल्विणे म्हणजे खरोखर मुर्खपणाचे होते. पण हे केवळ प्रवासी केंद्र असल्यामुळे इथे हे मुद्दाम खर्च करून उभारले आहे. प्रवासी उत्पन्नाचे ते मोठे साधन आहे हे इराला माहित होतेच.

पुष्पवाटिकांमधे खूप वेगवेगळ्या रचना होत्या. मागे सरोवराच्या निळाईचा पडदा. त्यासमोर ही कुठेही न पाहिलेली चमत्कारीक पुष्पवाटिका! इरा क्षणभर मोहवून गेली. पुन्हा एकदा डोक्यात प्रचंड गच्चपणा आणि त्यात कोंदलेल्या वादळाचा दबाव तिला छ्ळू लागला. मेंदुचक्रवाताचा झटका होता पुन्हा! इराने घाईने पर्स धुंडाळली. पण न्युरल फ़वारा कक्षातच राहिला असावा. गच्चपणा अतिशय वाढला. डोके फ़ुटते की काय असे वाटले. ह्या विचित्र पुष्पवाटिकेचा हा परिणाम असावा! विचारांच्या त्या भरात इराने झपाटल्यासारखी पुष्पवाटिकेतली चार फ़ुललेली रोपे मुळापासून उपटून पर्समधे कोंबली, आणि ती कक्षाकडे वळली. टेबलवर पडलेला न्युरल फ़वारा नाकात मारताच ती पुन्हा भानावर आली. वेडाचा जोर ओसरताच तिने पर्समधील रोपे बाहेर काढून पाहिली. आपण हे काय केले! तिला माहित होते की मातीबाहेर ही रोपे मरतात. परंतू बाहेर जाऊन पुन्हा ती मातीत रोपण्याची तिला फ़ार भिती वाटली. कोणी पाहिले तर त्याला काय उत्तर द्यायचे? रोपे मरू नयेत म्हणून तिने एका बाट्लीत पाणी घेऊन त्यात मुळे बुडवून ठेवली. पण दोन तासांमधे ती मलूल झालेली वाटली. रात्री बाहेर जाऊन इराने पुष्पवाटिकेतली माती एका पिशवित भरून घेतली आणि रोपे त्या पिशवित खोवून ठेवली.

सहल संपली, दुस-या दिवशी परत निघायचे होते. पिशविमधली रोपे आता ताजीतवानी दिसत होती. कालच्या कळ्यांनी फ़ुलून मखमली पाकळ्या उघडल्या होत्या. तो गहिरा निळा रंग पाहून इरा पुन्हा भोवरली. तोच गच्चपणा जाणवू लागला. नाकात स्प्रे मारता मारताच इराने पुष्परोपे मंगळावर परत नेण्याचा वेडा निर्णय घेतला. सहलीसाठी नेलेले कंपनीचे बरेच सामान होते. एका डब्य्यामधे तिने सफ़ाईने रोपांची पिशवी दडविली. त्यात पाणी शिंपडायला ती विसरली नाही. परतीच्या सफ़रीत कंपनीचा शिक्का असलेला तो डब्बा तिने स्वत:जवळच ठेवला.

अप्रतिम सहल झाल्याबद्द्ल सर्व प्रवाशांनी इराला तोंडभरून धन्यवाद दिले. यानस्थानकावर सगळ्यांच्या सामानाची तपासणी झाली तेव्हा इरा टेन्स होती. पण कंपनीचा शिक्का असलेला तो डब्बा कोणी उघडायला लावलाच नाही. इराची पुष्परोपे सुखरुप घरी पोहोचली. घरी आल्यावर इराने घाइघाईने एका प्लास्टोफ़ॆबच्या कुंडात ती रोपे लावली. फ़ुले, कळ्या सगळी गळून गेलेली ती रोपे जगणार नाहीत असे तिला वाटून गेले. पण प्रयत्न करायला हवा होता. तिने अल्फ़ावेबवर नायट्रोजन खुराकांची ओर्डर दिली. त्या गोळ्या लगेच तिच्या घरी पोहचत्या झाल्या. चार पाच दिवस खुराक देताच सगळी रोपे एकदम तरारली. पंधरा दिवसात फ़ांद्यावर कळ्याही डोकावू लागल्या. इरा खूपच थरारून गेली. छापलेली फ़ुले घरात सजविण्या ऐवजी स्वत: जोपासलेली ही मखमली फ़ुले तिला मिळणार होती! तिने तर वाचले होते की अशा रोपांना स्वत:ची पिल्ले देखील होतात. इरा त्या दिवसाची वाट पाहू लागली. आणि खरोखरच एक दिवस कोवळ्या अंकुरांनी मातीमधून डोके वर काढले! वॊह्व्वा! म्हणजे माझी स्वनिर्मित बाग मी फ़ुलवू शकते! पुन्हा डोक्यात गच्चपणाचा विस्फ़ोट. पुन्हा नाकात न्युरल फ़वारा! आता इराला मेंदूचक्रवाताचा झटका देखील हवाहवासा वाटू लागला होता. आपल्याला वेड तर लागले नाही ना? डॊक्टरकडे जाउया का? पण नकोच. ते वेड मजला हवेहवे........

विषाणू निवारक केंद्रामधे सिंतूर आणि गॆबी ह्या दोन विषेश अधिका-यांमधे अल्फ़ा-शून्य पातळीवर गुप्त चर्चा सुरू होती. अल्फ़ा-शून्य म्हणजे, नेहमीप्रमाणे हवेमधून अल्फ़ा लहरी ग्रहण न करता, ते दोघे वायरमधून अल्फ़ा लहरी एकमेकांकडे पाठवित होते. ही चर्चा येवढी गुप्त ठेवण्याचे कारण म्हणजे, मंगळाचे भवितव्य यावर अवलंबून होते.
बसून थोडे अवघडल्यासारखे झाले तेव्हा सिंतूरनी डोक्यावरचा अल्फ़ा टोप काढून ठेवला आणि तो खिडकीपाशी गेला. संरक्षक आकाशात बाहेर पृथ्वीचा निळसर छोटा गोल उगवतांना दिसत होता. उंच इमारती असलेला भाग सोडला तर बाहेर सर्वत्र लाल माती पसरली होती. चांचणी ग्रुप जेव्हा पृथ्वीवर गेला, तेव्हा असे काय झाले असेल की सगळ्या पेशंटसला कमी अधीक प्रमाणात मेंदूचक्रवाताचे झटके आले होते? इथली लाल माती त्या झटक्यांना काबूत ठेवीत असेल कां? की आणखी काही? असेही कानावर आले होते की आदिम मानवी जीन्स मधून काढून टाकलेले विषाणू पृथ्वीवरील मातीच्या सान्निध्यात जोर धरून उफ़ाळतात. पण मग, कंट्रोल ग्रुपच्या तिघांनावर काहीच परिणाम कां नव्हता? निळ्या पृथ्वीगोलकाला एकटक बघतांना सिंतूर थोडावेळ स्वत:ला विसरला. पण लगेच स्वत:ला सावरून तो टेबलाकडे गेला आणि त्याने अल्फ़ा टोप डोक्यावर चढविला.

“मला तर फ़ार धक्का बसला आहे. म्हणजे आपण पर्यटनाच्या नावाखाली चांचणी ग्रूप पृथीवर पाठविला, तेव्हा मला कल्पना नव्हती की मेंदूचक्रवाताने पिडीत लोकांपैकी एखाद्याला येवढा तीव्र झटका येईल! नाही, आपण सौम्य झटक्यांची कल्पना केली होती.” सिंतूर म्हणाला.

“होना! गॆबीने मान डोलाविली. “मेंदूचक्रवात नेहमीच फ़वारा घेतला की काबूत येतो. पण अर्थात आतापर्यंत आपण हे सगळे मंगळाच्या सुरक्षीत दुनियेत राहून पाहिले. आता अधिपतिंना उत्पन्नासाठी पृथ्वी पर्यटन सुरू करायचे आहे, तर ही चांचणी आवश्यकच होती. मात्र मानवाच्या डीएनए मधूनच हद्दपार केलेला “मन” हा भयानक विषाणू पृथ्वीवरील वातावरणाच्या सांनिध्यात येवढा उफ़ाळून येईल असे वाटले नव्हते.”
सिंतूरने हातातली कुलुपबंद पेटी उघडली. त्याने की-कोडेड आल्फ़ा अहवाल बाहेर काढला. फ़क्त निवडक लोकच तो उलगडू शकतील अशी तरतूद त्यात होती. गॆबीची इलेक्ट्रॊनीक संमती जोडली की अधिपतींकडे तो अहवाल पोहचवायचा.

सिंतूरचा अहवाल-

“पुरातन पृथ्वी कलहांनी पछाडली होती. तिथली ९० प्रतिशत युद्धे, कलह, योग्य संवादाअभावी व्हायची. संवादाचे वाहन म्हणून तिथे विविध प्रकारच्या भाषा वापरायचे. लिखितभाषा, बोलीभाषा, चित्रभाषा, वा देहबोली असे अनेक प्रकार होते. यापैकी कुठल्याना कुठल्या तरी भाषेमधे विचार मांडल्याखेरीज ते दुस-यापर्यंत पोहचविता न येणे ही त्या मानवजातीची दुर्देवी अक्षमता होती. ह्या कमतरतेमुळेच अगदी आरंभापासून मानवजात आपापसातील कलहांनी पिडीत होती.

याच कमतरतेचा दुसरा भाग देखील होता. संवाद ऐकणा-याच्या बुद्धीचा भाग. आणि हा भाग तर संवाद देणा-या पहिल्या भागापेक्षाही जास्त कमकुवत होता! कुठल्याही प्रकारची भाषा असो, ती कितीही कौशल्याने वापरून देणा-याने संदेश दिला, तरी संदेश घेणारे आपापल्या मनाप्रमाणे त्या संदेशाचा अर्थ लावण्यास मोकळे होते. त्यावेळी मानवाला “मन” हा त्यांच्या डीएनए मधे शिरून बसलेला एक मोठा विषाणू आहे हे माहित नव्हते. मानवी डीएनए मधेच मन नावाचा विषाणू, म्हणजेच आपापसातील कलहाचे मूळ रोपले गेले होते. संवाद वाहणारी भाषा आणि त्याचा अर्थ लावणारे मन हे दोन प्रचंड मोठे मूलदोष मानवजातीच्या वाट्याला आलेले होते. ह्याचाच परिपाक म्हणजे पाचवे वैश्विक महायुद्ध. त्यात पृथ्वीवरील बहुतांश मानवजात नष्ट झाली. उरलेले मानव आदिवासी अवस्थेत पोहोचले. आपल्या काही दूरदर्शी पुर्वजांनी आधीच तरतूद करून ठेवली होती म्हणून आज मंगळावर अतिशय प्रगत अशी मानवजात जिवंत ठेवण्यात आपण यशस्वी झालोय.

पुढचा भाग सगळ्यांना माहित असलेला मंगळाचा इतिहासच आहे. अहवालाच्या पूर्णतेसाठी येथे देणे आवश्यक आहे. पुरातन मानवाला ग्रासलेले विषाणु- म्हणजे संवादासाठी भाषेची आवश्यकता. ह्या विषाणूचा नायनाट आपण अल्फ़ा उलगडणी साधून केला. आता आपल्या डीएनए मधेच मेंदूत अल्फ़ा उलगडले जाण्याची सुत्रे आहेत. त्यामुळे शब्दातीत विचार एकमेकांना कळून अर्धी समस्या दूर झाली आहे.

परंतु पुरातन मानवात सगळ्यात भयानक विषाणू म्हणजे व्यक्तीगत मन हा होता. अनेक प्रकारच्या भावना नावाच्या विघातक प्रवृत्तींना जन्म देऊन हे मन विषाणू कोठ्लेही संघटक कार्य असफ़ल करायचे. यामुळेच मानवजात प्रगती न करता एकमेकांत भांडत राहिली. मंगळावर आपण पद्धतशीर वैज्ञानिक उपाय करून डीएनए मधून मन विषाणू नष्ट केला .. म्हणजे अगदी समूळ नष्ट करता आला नाही, पण मेंदूतले मन केंद्र निष्प्रभ करण्यात आपण यशस्वी झालो. मात्र पुढे काही थोड्या लोकांमधे मेंदूचक्रवात रोगाची लागण दिसू लागली. हा मेंदूचक्रवात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मन विषाणूंचाच प्रादुर्भाव होता. ही गोष्ट आपण गुपित ठेवली. ताबडतोब उपाय करणारा नाकात घ्यायचा फ़वारा तयार करून आपण ह्या उचल खाल्लेल्या मनावर पुन्हा मात देखील केली.

मात्र आता इराच्या उदाहरणावरून असे सिद्ध झाले आहे की पृथ्वीवरील वातावरणाच्या सानिध्यात मेंदूचक्रवाताच्या रोगींना पुन्हा मनाची लागण होऊ शकते. मंगळ मानवाचे भवितव्य सुरक्षीत रहावे म्हणून काही गंभीर पाऊले उचलण्याची अत्यंत आवश्यक्यता आहे.

१) इरा सारख्या विषाणू वाहकांना शोधून त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
२) पृथ्वीवरील प्रवासी यात्रा तहकूब कराव्यात. मिळणा-या उत्पनापेक्षा कितीतरी पटींनी जास्त धोका त्यात आहे.

अहवाल वाचून गॆबीने संमती नोंदविली. ठिकाय. हे झाले. आता इराला इस्पितळात धाडण्याचे महत्वाचे कार्य मी स्वत:च्या देखरेखीत पार पाडले की माझ्यासाठी हे प्रकरण संपले.

सकाळीच इराच्या दारावरची बेल वाजली. बेल वाजविणारे असे आगांतूक कोणीच येत नाहीत. इराला खूपच आश्चर्य वाटले. दार उघडताच काळे गणवेश घातलेल्या दोन व्यक्ती अधिकाराने आत शिरल्या. दटावणीच्या आल्फ़ात इराला संदेश उलगडल्या गेला. “इरा इब्लोन, तू मेंदूचक्रवाताच्या अंतीम स्थितीत गेली आहेस. मंगळवासियांच्या सुरक्षेसाठी तुझ्या मेंदूवर सुधारक शस्त्रकियेची अतिशय आवश्यकता आहे. तेव्हा ताबडतोब तू आमच्या बरोबर येत आहेस.” गॆबीने चपळाईने इराच्या दंडात सुई खुपसली.

ऎंब्युलंन्स मधे बसण्या अगोदर, पृथीवरच्या रोपांचे कुंड चपळाईने स्वत:च्या बॆगेत भरायला गॆबी विसरला नव्हता!

शुद्ध हरपलेल्या इराला स्ट्रेचरवर झोपवून ऎंब्युलन्स वि वॊ वि वॊ करीत वेगाने इस्पितळाच्या दिशेने निघाली. आपला सहकारी बघत नाही असे पाहून गॆबीने हळूच नाकात फ़वारा मारला, तेव्हाच त्याच्या डोक्यातला गच्चपणा थो्डा कमी झाला!

%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

(समाप्त)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

14 Dec 2014 - 7:59 pm | अत्रन्गि पाउस

मी पैला ...आता वाचतो

मुक्त विहारि's picture

14 Dec 2014 - 10:34 pm | मुक्त विहारि

वाचत आहे.

क्रमशः लिहायला विसरलात की काय?

अरुण मनोहर's picture

15 Dec 2014 - 2:29 am | अरुण मनोहर

धन्यवाद ! कथा येथेच संपते. निदान आत्ता तरी !

मंदार कात्रे's picture

15 Dec 2014 - 1:33 am | मंदार कात्रे

उत्सुकता ताणली जात आहे

अरुण मनोहर's picture

15 Dec 2014 - 2:30 am | अरुण मनोहर

धन्यवाद ! कथा येथेच संपते. निदान आत्ता तरी !

पैसा's picture

15 Dec 2014 - 8:49 am | पैसा

किती प्रयत्न केले तरी मन नावाच्या 'विषाणू'चा संपूर्ण बंदोबस्त करणे कठीण आहे!

hitesh's picture

15 Dec 2014 - 10:45 am | hitesh

छान

जेपी's picture

15 Dec 2014 - 10:46 am | जेपी

आवडल...

निलीमा's picture

15 Dec 2014 - 11:26 am | निलीमा

पुढचा भाग लवकर येऊद्या... उस्तुकता वाढली ..इथपर्यंत अप्रतिम !

अर्धवटराव's picture

16 Dec 2014 - 12:17 am | अर्धवटराव

कितीही फवारे मारा... मनापासुन सुटका नाहि :)

सस्नेह's picture

16 Dec 2014 - 12:37 pm | सस्नेह

मनवाली थीम आवडली

भारीच कल्पना आहे!!! अभिनंदन आणि धन्यवाद!