ती गच्चीवरची झाडं.

झंम्प्या's picture
झंम्प्या in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 2:47 pm

आता हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल ह्यात काय नवीन आहे, काय विशेष आहे ? तर विशेष अस काही नाही, साधी झाडंच आहेत ती. पण मला जरा वेगळी वाटली, कशी ? ते सांगावास वाटलं, म्हणून हा तोकडा का होईना प्रयत्न.

आता इथे, फिलीप्पिंस मध्ये येयून मला जवळ जवळ दीड वर्ष होत आली. वयाच्या ३० व्या वर्षी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो, ते सुद्धा थेट घरापासून हजारो मैल दूर. आत्तापर्यंत मी घरच्यांबरोबरच राहत होतो, सगळ जागच्या जागी मिळायच, व्यवस्थित, अगदी ऑफिसमधून घरी गेल्या गेल्या, गरम गरम जेवण पुढ्यात आणून आई ठेवायची, सकाळी ऑफिसच्या बस ला सोडायला न चुकता भाऊ हजेरी लावायचा. अगदी सुखाच आयुष्य. पण काहीतरी वेगळ करण्याची इच्छा, किवा न बदलणाऱ्या आणि घुसमटनार्या परिस्थितीपासून दूर पाळण्याच कारण म्हणून ही रीलोकेषण ची ऑफर मी स्वीकारली. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय होता. निर्णय घेतल्यापासून ते इथे कामावर रुजू होण्यापर्यंत खूप झटकन गोष्टी घडल्या. काही कळायच्या आतच मी इथे आलो होतो. आल्यानंतर सगळ्या घोष्टी स्वतःहून करण, घर शोधणं, खाण्या पिण्याची व्यवस्था करण, सगळं अंगावर पडलं. पण बरोबरच्या लोकांमुळे ते तितकंसं कठीण नाही गेल.

इथे एक छानसा छोटा FLAT घेतलाय. एक बेडरूम-किचैन फुल्ली फर्निश्ड असा. तसा लहानच आहे, पण एकट्यासाठी पुरेसा. ऑफिस सुद्धा अगदी पायी १० मिनिटांच्या अंतरावर. अगदी हवं तस आहे इथे. आजूबाजूचा भागही खूप छान आणि सुरक्षित आहे. हा FLAT सातव्या मजल्यावर आहे. तशा इथे इमारती खूप मोठ-मोठाल्या असतात अगदी ५० ते ६० मजल्यापर्यंत. वाढत्या लोकसंखेला सामाऊन घेण्यासाठी हाच एक पर्याय इथे शिल्लक आहे. पुण्या-मुंबयीसार्ख इथेही, आजू बाजूंच्या गावातील, खेड्यातील लोकं कामधंद्यासाठी येऊन राहतात. त्यामुळे इथे जागेची टंचाईच जास्त आहे. घराची भाडी सुद्धा खूप जास्त आहेत. असो... तर काय सांगत होतो मी ? हां की मी सातव्या मजल्यावर राहतो. आमची इमारत ही तशी २२ मजल्यांची. तर ह्या FLAT मध्ये जो रस्त्याच्या बाजूचा भाग आहे तो पूर्ण काचेचा आहे, म्हणजे भिंती ऐवजी एक मोठ्ठी खिडकी आहे, जी पूर्ण काचेची. त्यामुळे घरात भरपूर प्रकाश, ऊन असत. ही खिडकी लिविंग रूम मधेच आहे. भले तिला मोठमोठाले पडदे असले तरी मी ते क्वचितच लावतो. ह्या खिडकी समोर दोन भल्या मोठ्या अगदी ४०, ४५ माजली इमारती आहेत, पण त्यांच्यात थोडं अंतर आहे. त्या दोन इमारतींच्या मध्ये एक ८ मजली पार्किंगची इमारत आहे. आणि त्या इमार्तीपलीकडे एक मोठ्ठ गोल्फ च मैदान आहे. त्यामुळे येणारा सूर्यप्रकाश, हवा कुठेच अडली जात नाही. मस्त हवेशीर खोली आहे. अगदी एवढी की हवा नको नकोशी होते आणि मला खिडक्या लाऊन घ्याव्या लागतात.

आठवड्यातले पाच दिवस ऑफिसमध्ये निघून जातात. फक्त झोपायला तेवढा घरात असतो. भाहेर खानावळीचा दोन वेळचा डबा लावल्याने घरात करून खाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि वीकेंड ला घरातच आराम करणं मी जास्त प्रेफर करतो. एकटाच असल्याने करमणुकीच एकमेव साधन म्हणजे टीवी. जो त्याच खोलीत आहे. टीवी समोर ऐसपैस सोफा, ज्यावर तुम्ही अगदी तंगड्या पसरून आरामात टीवी पाहत बसू शकता,आणि कंटाळा आला तर त्या खिडकीतून खाली पाहत उभं राहू शकता. खाली रस्त्यावर चाललेली रहदारी, समोर छोट्या मॉल मध्ये चाललेली लोकांची खरेदी, वगैरे पाहताना वेळ अलगद निघून जातो. हा एक करमणुकीचा भागच झालाय.

अगदी खिडकीच्या समोरच त्या पार्किंग च्या इमारतीवर काही शोभेची झाडं लावलेली आहेत. जरी ती शोभेची असली तरी चांगलीच उंची पुरी आहे, अगदी ८ ते १० फुट उंचीची दोन मोठी झाडं आणि मग लहान सहान पाच सहा झाडं. गेले दीड वर्ष ही झाडं मी पाहतोय. इथे जून ते नोव्हेंबर च्या दरम्यान खूप चक्री वादळ येतात. जर जोरात हवा असेल तर ती झाडं अगदी संचार्ल्यासारखी हलत असतात. आणि वार नसेल तेव्हा एखादा भयाण बकालपणा घेऊन शांत उभी असतात.

आज अचानाक त्यांच्याकडे पाहून काहीतरी वाटलं. ह्या झाडांच्यात आणि माझ्यात एक साम्य जाणवलं आणि थोडसं हसूही आलं. गम्मत आहे न ह्या झाडांची, प्रत्तेक झाड हे आपल्या जमिनीत, जिथे ते रुजलं, वाढलं तिथे ते अगदी आपली पायंमूळ रोवून उभं असत, ऊन पावसात, थंडी गारठ्यात, ज्या भुईने त्याला जगवल, वाढवलं तिच्याशी, आपुलकीनं बिलगून रहात. घट्ट धरून उभी असतात. काहीही झालं तरी ते आपली जागा सोडत नाहीत. अगदी बिन पाण्याची सुकून गेली तरी ती तिथेच असतात. का कोणास ठाऊक... माहीत नाही.

पण ही समोरची झाडं जमिनीपासून शे दीडशे फुटांवर, आपल्या अस्तित्वाची पायमुळ रोवु पहातायत, जिथे आपुलकीची साधी ओलही नाही, तिथे आयुष्य शोधू पहातायत. जमिनीपासून खूप दूर ते “जमीन” शोधू पहातायत. काय अर्थ आहे त्या जगण्याला ? जगायचं फक्त जगण्यासाठी ? न आपुलकीचा ओलावा, ना आपलेपणाची साथ, फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या खुराकासाठी, पाय रोवून दिवस मोजत उभं रहाण्याची धडपड. मग तिथे स्पर्धा ही आलीच, अस्तित्वाची, पाय रोवून उभं राहण्याची, उद्या काय होयील याच्या विचारात रात्र रात्र जागून , स्वतःची समजूत काढण्याची, का ? ... माहीत नाही.

या न त्या कारणाने आपण सुद्धा आपली पायमूळ सोडून कुठेतरी दूर, आपलेपानाच्या उबेपासून लांब आपली मूळ रुजवू पाहतो, काय साध्य करायचं असत आपल्याला ? निरर्थक स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी, आपण वाट्टेल ते करतो, जबाबदारीच लोढण गळ्यात बांधून धावत असतो. सगळं सगळं विसरून. ह्या धावण्यात आपल्याला एक गोष्ट खरच माहीत असते का ? की आपण हे काय करतोय ? ह्याचा शेवट कुठे आहे ? भले, आपण आपली मूळ रुजवू इमारतीच्या आठव्या मजल्यावर जशी त्या झाडांनी रुजवली तशी, पण हेच आयुष्य हवं असत का आपल्याला ? मुळात ह्याला आयुष्य म्हणायचं का ? COMPUTAR च्या स्क्रीन वरून समोर दिसणाऱ्या माणसांशी बोललो की आपली स्वतःचीच बोळवण करून घ्यायला मोकळे, की आपण अजूनही आपल्यांच्या बरोबर तारा जुळवून आहोत. पण खरच त्यातून ते आपुलकीचे स्वर उमलतात का ?

खूप गोंधळ असतो मनात, काय हवंय आपल्याला (मुळात मला म्हणायला हवा इथे) हेच माहीत नसल्याने, वाहत्या पाण्यात झाडावरून पडलेल्या त्या सुकलेल्या पाण्यासारखं आयुष्य जातंय याची जाणीव सारखी होत राहते. तो प्रवाहच आता आपली दिशा ठरवणार, आपल्या हातात फक्त एकच गोष्ट, प्रवाहाबरोबर वाहत राहण... जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत.

ह्या झाडांच्यासार्ख जमिनीपासून दूर कुठेतरी, पाय रोऊन, उद्याची चिंता करत उभं राहायचं...
कशासाठी ? का ? माहीत नाही 

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

8 Dec 2014 - 2:54 pm | टवाळ कार्टा

\m/

मांडणी आणि लेखन छान. परंतू याला छान म्हटलं तरी तुम्हाला आवडणार नाही. ती झाडं आणि तुमचं एकटंपण याची समानता दाखवता आहात. मुळात (!)झाडं सुखी असतात. ती जिथे असतात तिथे सुखी असतात. त्यांच्या पिलांनी दूर जावं वाढावं अशी त्यांची इच्छा असते त्यासाठी फुलं, फळं, सावली असं काहीनाकाही देत असतात. बघा तुमच्याकडेही असेल काही देण्यासारखे.

एस's picture

8 Dec 2014 - 6:23 pm | एस

लेख आवडला.

वेल्लाभट's picture

8 Dec 2014 - 6:04 pm | वेल्लाभट

एकटेपणा खातो हे खरं आहे. कंजूस यांच्याच प्रतिसादाला +१ म्हणतो.

वेल्लाभट's picture

8 Dec 2014 - 6:11 pm | वेल्लाभट

असं करता का.... त्या काचेतून काढलेले ४-५ सुपक्क फोटो टाका इथे ! आणि फिलीपिनो लोकं काय खातात ते जरा वर्णन करून सांगितलंत तर !....

hitesh's picture

8 Dec 2014 - 8:07 pm | hitesh

डॉलरमध्ये पैसे मिळवायचे आणि त्यावेळी अरेरे मातीपासुन तुटलो असे नाटके उसासेही सोडायचे .

जुनं झालं !

इतकीच मातीची ओढ अहे तर ठाणा डोंबिवलिला धा वीस हजाराच्या नोकर्‍या करायला या परत !

बोका-ए-आझम's picture

9 Dec 2014 - 1:18 am | बोका-ए-आझम

काहीतरी जळल्याचा वास आला का इथे? आणि मिपावर ठाणे -डोंबिवलीत १०-२० हजारांच्या नोक-या देणारा एम्पलाॅयमेंट एक्सचेंज पण चालतो हे नवीनच कळले. तिथूनच नोकरी मिळालेली दिसते! मज्जा आहे बुवा! :) अगदी लायकीप्रमाणे नोकरी मिळायला भाग्य लागतं! चालू द्या!

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 5:52 am | मुक्त विहारि

अरे बाबा, त्यांना धाग्याकर्त्याचे एकटेपण न दिसता, डॉलर दिसले, ह्यातच काय ते समज...

आपल्याला तरी धाग्याकर्त्याचे दू:ख समजले.

असो,

पसंद अपनी-अपनी, सोच अपनी-अपनी...

सहमत. सर्वांना हीरव्या नोटा दिसतात. एकटेपणा, घेतलेले परीश्रम दीसत नाहीत.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 6:02 am | मुक्त विहारि

आक्षेप....तीव्र आक्षेप....

बर्‍याच जणांना हिरव्या नोटा दिसतात.

तुम्हा-आम्हांना धागाकर्त्याचे धन न दिसता मन दिसते.

खटपट्या's picture

9 Dec 2014 - 10:20 am | खटपट्या

:)

रेवती's picture

9 Dec 2014 - 1:12 am | रेवती

लेखन आवडलं.

बोका-ए-आझम's picture

9 Dec 2014 - 1:24 am | बोका-ए-आझम

पु.लं.चं एक सुंदर वाक्य उधार घेऊन म्हणतो - पैशाचे झाड मातीत मुळं रुजवू शकत नाही. मनी प्लँट हवेतच मुळं ठेवतं. (चूभूद्याघ्या). अंतर्मुख करणारा लेख.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 3:02 am | मुक्त विहारि

मनापासून आवडला...कारण आपण दोघेही एकाच बोटीतून प्रवास करत आहोत.

तुम्ही फिलीपिन्सला आणि मी सौदीला.पुर्वी मला पण असेच वाटायचे...एकटेपणाच्या दू:खापेक्षा, मनांतल्या भावना व्यक्त करायला कुणी नाही, हेच जास्त वाटायचे.

पुढे दू:खावर मात करायला स्वतःच प्रयत्न केले.काही अपयशी ठरले तर काही प्रमाणाबहेर यशस्वी झाले.त्यात "मिपाकरांनी" मनापासून मदत केली.

कधीही एकटेपण वाटले तर मिपा वाचत बसतो.

अर्थात तुमच्या एकटेपणाचा उपाय तुम्हालाच शोधायला लागेल.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 8:28 am | टवाळ कार्टा

सौदी आणि फिलिपाईन्स २ वेगवेगळी जग आहेत ;)

नो डाउट...

पण....

जावू दे..

कट्ट्याला आलास की बोलूच...

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 10:12 am | टवाळ कार्टा

डिट्टेलमंदी बोलू ;)

खटपट्या's picture

9 Dec 2014 - 4:15 am | खटपट्या

चांगलं लीहीलय !!!

आयुर्हित's picture

9 Dec 2014 - 8:12 am | आयुर्हित

खूप छान लिखाण. थेट मनाला जावून भिडलं!

एक सुंदर गाणे आठवले.
"कौन अपना हैं, क्या बेगाना हैं,
क्या हक़ीकत हैं, क्या फसाना हैं
ये जमाने में किसने जाना हैं?"
गीतकार,गायक, संगीतकार: नदीम-श्रवण, चित्रपट: दिल है के मानता नही

अहो, जेथे आहात तेथे काय आणि कशाला परके मानतात?
फक्त मराठी किंवा भारतीय माणसे नाही आहेत म्हणून, छे!
मग तसे म्हटले तर या जगात/पृथ्वीवर मुळात आपण सारेच परकेच आहोत.

तेथील सर्व आपलीच लोकं आहेत असे समजून त्यांना प्रेम द्या तेही आपल्याला तितकेच प्रेम देतील.
आणि आत्ता त्यांनी प्रेम नाही दिले तरी संकटाला नक्कीच धावून येतील.

-(राजस्थानात ७ वर्षे राहून तिथलाच एक झालेला) आयुर्हित.