व्हय ओ भैय्या

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 6:54 pm

“व्हय ओ भैय्या, त्या अक्षयच्या लेकराचे नाक कसलं सरळ आसंल ओ”
“गोर्या ते टेबल बघ रे आधी सात नंबरचं, आणि कोण बे अक्षय?”
“ओ भय्या आताच कट केलाव की सात नंबर. गेलं पण गिराइक.”
“बर बर, अक्श्या कोण रे, ते जाधवाचं का?”
“नाय ओ, आपला अक्षयकुमार पिच्चरमदला. तेच्या बायकोचबी नाक कसलं सरळ हाय. ह्यो बी लैच स्मार्ट आन नाकेला हाय तवा लेकरू कसलं आसंल आं?”
“तुला काय करायचंय बे, का तुझी पोरगी देणारेस का त्याला?”
“ह्याह्याह्या आपला अजून लग्नाचा पत्ता नाय, पण उगा माहिती असलेली बरी”
“मग इज्जतीत काम कर, नायतर अक्षयकुमारकडे तुझा पगार माग आता.”

गोरख बिचारा टीव्हीकडे बघत बघत एका रिकाम्या टेबलावर टेकतो. बाकी वेटर पोरांना टाईमपासला नवीन विषय मिळतो.

हा आमचा गोरख, वय वर्ष २२ शिक्षण काय नाय, काम वेटर,
जरा टेबल रिकामं असलं का हा आलाच. काऊंटरवरून वाकवाकून पाहात जगाच्या चौकशा करत.
कारण एकच “पण उगा माहिती असलेली बरी”

दिसायला सावळा असला तरी नाकी डोळी देखणा, तब्येतीत उंचापुरा, आडमाप, जरा फिनिश असता तर पार युवराजसिंग. मार खाल्ला फक्त मेंदूत. पॅकेजिंग करताना देवाने ह्याचच ढक्कन कसं ढिलं ठेवलं कुणास ठाऊक. बरं ढिलं ते ढिलं आतला गॅस अजून शाबूत. मग असा फसफसतो, नाही ती माहीती गोळा करत.

ह्याच्या वयाच्या ५ व्या वर्षी आईबापानी दुनिया सोडली. आख्ख्या गावात प्रेमाने बोलणारं एकच माणूस. ती म्हणजे तीन वर्षानी मोठी सख्खी बहीण. कधी मागून, कधी पडेल ती कामे करून लेकरं मोठी झाली. बहिण नाकी डोळी नीटस.
गावातल्या उनाडांना कंटाळून १४-१५ व्या वर्षीच गावातल्याच एका वस्तादाबरोबर लग्न लावून मोकळी झाली. वस्ताद संध्याकाळी धाब्यावर तंदूर लावायचा, हि बिचारी तिथंच चपात्या भाकर्या बडवून मध्यरात्री कधीतरी नवर्याबरोबर घरी यायची. बारका भाऊ उपासपोटी तरी राह्याचा नाही. जरा कळायला लागलं तसं त्याच हाटेलातल्या पोर्याचं फडकं गोरख्याच्या खांद्यावर आलं. वस्तादाचं रोज देशी मारून बहिणीला तुंबलणं ह्या भावाला काय बघवना. एक दिवस घेतला वस्तादाला रिबिटमधी आन हाणला कुत्र्यागत. हाटेलातलं उरलंसुरलं खाऊन पण मेव्हण्याच्या हातात आलेला जोर वस्तादानं ओळखला. दुसर्या दिवशी बहीणीनं डोळे पुसत भावाला पिशवी दिली अन दार लावून घेतलं.

एकेक धाबे अन हायवेचे बार करत करत गोरख आला एक दिवस आमच्या बारच्या दारात. एक नाय़लानची पिशवी न दोन शर्ट एवढीच इस्टेट. नाव गांव विचारलं तर हा पठ्ठ्या हाटेलातल्या टीव्हीकडे एकटक बघत बसलेला.
अबे असं टीव्ही बघत काम करणारेस का विचारलं तर पहिला प्रश्न त्याचाच आला.
खरंतर तीच नांदी होती.

“व्हय ओ भैय्या, तुमचा टीव्ही भिंतीत खड्डा करून लावलाय जणू. केवढ्याचा हाय?”
“अबे ते एलसीडी हाय. असाच असतो पातळ. लै म्हाग आहे. तुला कशाला चौकशा?”
“नाही, उगा माहिती असलेली बरी”

दिवसभर नुसते पाण्याचे जग भरून ठेवत ठेवत गोरख हाटेलाला सरावला. टेबलं साफ करुन करुन वेटर बनायला वेळ लागला नाही. रोजचे कस्टमर ओळखायला येऊ लागले. कस्टमरांना पण आपुलकीनं चौकशी करणारा गोरख मालकापेक्षा जास्ती आवडायला लागला.

बारचे वेटर ही जमात तशी चाबरी, मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे ब्रॅंड अगदी प्रेमाने हाताळणारी ही लोकं. हायवेवरचा लहान गावातला बार म्हणले की यात पीएचडीच. उधारी ठेवणारं गावातल गिराइक अन खटाखट पैसे टाकणारं सिटीतलं हायफाय पब्लिक दोन्हीत ताळमेळ साधावा यांनीच. चिल्लर राजकारण्यांची मग्रुरी, चमच्यांची त्यांच्या जीवावरची मस्ती उतू जायची बारमध्येच. त्यांना अन गावाची लफडी घेऊन हाटेलात येणार्या खाकीला शांत करुन घरी रवाना करावे गोरखसारख्या वेटरांनीच.

दिवसाचा पगार जसा वीसावरुन शंभरावर गेला तसा गोरख्याचा लगीन करायचा विचार पक्का झाला. मालकाची साक्ष, दिवसाचं खाणंपिणं, रोजची पगारापेक्षा जास्त टिप अन गावाबाहेरचं खोपटं एवढ्या भांडवलावर गोरख्याचे हात पिवळे झाले.

जसा संसार सुरु झाला तशा गोरख्याच्या चौकशा वाढल्या. किचनमधल्या वस्तादांपासून ते डिलरच्या सेल्समनपर्यंत एकपण माणूस त्याच्या प्रश्नातून सुटला नाही.

त्याच्या घरात पण हेच चालत असावं बहुतेक. कारण दर पंधरादिवसाआड त्याची बायको तक्रारी घेऊन यायला लागली. नवरा संशयच घेतो एवढे कारण त्या अडाणी जीवाला लै लागत असावं. लै मनस्ताप हुतो मालक असं म्हणत रडायची. मालकाच्या मध्यस्थीनं बिचारी परत जायची. गोरख्याला समजावयाला जावं तर त्याचं एकच पालुपद. “म्या हितं दिवसभर आसतो मग माझ्यामागं काय हुतय मला कळाया नगो ?”

शेवटी एका दुपारी बिचारीनं विषारी औषध पिलं अन संपवलं स्वत:ला. रितीप्रमाणे त्यावेळी गोरख जरी हाटेलात असला तरी बेड्या पडल्याच. इतके दिवस हाटेलात आलेले खाकी कस्टमर गोरख्याच्या सेवेला जागले. वेटरकडून पैसे तरी काय काढणार अन तक्रार करायला बायकोच्या माहेरीपण कुणी नाही तेंव्हा स्थितीजन्य पुरावा का काय तो ग्राहय धरुन गोरख सुटला.

परत टेबले अन कस्टमरांची सहानभूती मिळवत गोऱख्याची नोकरी चालूच राह्यली. गोरखचे प्रश्न बरेचसे कमी झालेत असं वाटलं त्याच दिवशी गोरख समोर उभा राहयला.
“व्हय ओ भैय्या, माणसाला मेल्यावर आपण कशानं मेलो हे समजतं का ओ ?”
“आता कशाला बे तुझ्या चौकश्या? जाणारं गेलं की संपतय बे सगळं”
“नाही, उगा माहिती असलेली बरी”
एक आयबी, शेंगा न थम्सप मांडा बारा नंबरला असं सांगून गोरख वळाला टेबलकडे.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

26 Nov 2014 - 7:06 pm | बॅटमॅन

आयला!!!!

कं लिवलंय कं लिवलंय!

अभ्या, पुनरागमन लय खणखणीत केलास बघ बे. एकच नंबर!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2014 - 1:15 am | अत्रुप्त आत्मा

++++++++++++++१११११११११११११११११११११११११ टू खाटुक!
काय शैलिदार लिवतोय्स बे गड्या!!! लव यु ..लव यु..! मागचा लेख आणि हा लेख..शंकर पाटिल अठवतातच वाचताना!
====================================================
समांतरः-
अभ्या आज पासुन आम्मी (मंजे मी! :D ) तुला अभ्याराव संकर(मेलो आता मी! =)) ..)पाटिल असच म्हण्णार!

प्यारे१'s picture

26 Nov 2014 - 7:07 pm | प्यारे१

एक नंबर भारी रे कडू...!

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 7:12 pm | टवाळ कार्टा

:)

अजया's picture

26 Nov 2014 - 7:12 pm | अजया

लैच भारी!

आतिवास's picture

26 Nov 2014 - 7:20 pm | आतिवास

मस्त! एकदम मजा आली.
जरी त्या जीवाबद्दल वाईट वाटलं तरी - चित्रण उत्तम झालंय.

ब्लॅक ह्यूमर आवडला.

अभ्या, पुनरागमन झालेलं पाहून आनंद झाला. वेल्कम ब्याक.

सावकाश वाचून प्रतिसाद देतो...

आदूबाळ's picture

26 Nov 2014 - 9:53 pm | आदूबाळ

जबरीच लिहिलंय.

सध्या "The llicit Happiness of Other People" हे मनू जोसेफचं पुस्तक वाचतोय. त्याची पदोपदी आठवण व्हावी असं लेखन आहे हे. माणदेशी माणसंमध्येही अशा अर्धवट माणसाचं व्यक्तिचित्र आहे (गणा ???).

लईच आवडलं

प्रचेतस's picture

26 Nov 2014 - 9:03 pm | प्रचेतस

क्या बात है अभ्या....!!!

छानच लिहिलंस.
येत रहा, लिहित रहा.

नाखु's picture

27 Nov 2014 - 9:24 am | नाखु

रतीबांच्या गर्दीत ही वेचक फुलं शोधावी लागतायत मिपावर!

सौंदाळा's picture

27 Nov 2014 - 10:17 am | सौंदाळा

+१ मस्तच लिहिलय

हाडक्या's picture

26 Nov 2014 - 9:05 pm | हाडक्या

अभ्या..(डॉट डॉट) बर्‍याच दिवसांनी दर्शन झालं.. वेल्कम हो.
मस्त लिहिलय .

पैसा's picture

26 Nov 2014 - 9:37 pm | पैसा

अभ्या लिहितो तेव्हा एक नंबर. फक्त मधे मधे गायब होतो तेवढं लै वाईट्ट!

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि

आवडली...

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 10:43 pm | खटपट्या

खूप छान !!!

संजय क्षीरसागर's picture

26 Nov 2014 - 11:55 pm | संजय क्षीरसागर

कुठे होतास इतके दिवस? “नाही, उगा माहिती असलेली बरी”!

पाषाणभेद's picture

27 Nov 2014 - 12:49 am | पाषाणभेद

हा हा हा जबरी
+१

बोका-ए-आझम's picture

27 Nov 2014 - 1:25 am | बोका-ए-आझम

मस्तच!

डोळ्यासमोर उभा राहिला गोरख!!

अनुप कोहळे's picture

27 Nov 2014 - 4:40 pm | अनुप कोहळे

+१ हेच म्ह्णतो

राघवेंद्र's picture

27 Nov 2014 - 6:20 am | राघवेंद्र

मस्त रे मित्रा!!!!

सस्नेह's picture

27 Nov 2014 - 6:54 am | सस्नेह

आणि आभार *smile*

प्रमोद देर्देकर's picture

27 Nov 2014 - 9:10 am | प्रमोद देर्देकर

आवडलं.

देशपांडे विनायक's picture

27 Nov 2014 - 10:08 am | देशपांडे विनायक

जशास तसे सिनेमातील राजाभाऊ डोळ्यापुढे आले

अप्रतिम लिहिले आहे

किसन शिंदे's picture

27 Nov 2014 - 11:57 am | किसन शिंदे

जबराट लिव्हलंय!!

टुकुल's picture

27 Nov 2014 - 12:10 pm | टुकुल

मस्त..

कवितानागेश's picture

27 Nov 2014 - 12:26 pm | कवितानागेश

भारी!
अभ्याला बघून लई आनंद जालाय...

बर्‍याच दिवसांनी, पण लई झ्याक लिवलंय.

सतिश गावडे's picture

27 Nov 2014 - 12:28 pm | सतिश गावडे

अभ्या, दोन डॉट लावून आला काय?

लेख मस्त झाला आहे. एकदम ओघवत्या भाषेत लिहिला आहेस. वाचताना तू समोर बसून सांगत आहेस असं वातत होतं. :)

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2014 - 1:48 pm | पिलीयन रायडर

भारीच जमलंय!!

जेपी's picture

27 Nov 2014 - 3:38 pm | जेपी

आवडल.......

यशोधरा's picture

27 Nov 2014 - 4:39 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय!

चिगो's picture

27 Nov 2014 - 4:49 pm | चिगो

आवडलं व्यक्तिचित्रण..

यसवायजी's picture

27 Nov 2014 - 5:05 pm | यसवायजी

भारी बे अभ्या.. येक लंबर

नावातकायआहे's picture

27 Nov 2014 - 5:45 pm | नावातकायआहे

"एक आयबी, शेंगा न थम्सप मांडा बारा नंबरला असं सांगून गोरख वळाला टेबलकडे."

हा पंच विशेष आवडला...
क्लास....

दंडवत स्विकारा...

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 1:12 am | Targat Porga

आवडलं...

नि३सोलपुरकर's picture

28 Nov 2014 - 2:29 pm | नि३सोलपुरकर

तुमी कवा धरनं हाटेल चालवाला लागले...सोलापुर-पुने हायवे का ?
“नाही, उगा माहिती असलेली बरी” म्हनुन इचारल.

हाटेलात येणारी खाकी,गोरख्याच्या सेवेला जागले आनी तेला रिबिटमधी नाय घेतला..व्हय ना ओ भैय्या.

वैभव जाधव's picture

28 Nov 2014 - 5:32 pm | वैभव जाधव

भारीच रे मित्रा. मस्त लिहिलेय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Dec 2014 - 11:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी

जरा फिनिश असता तर पार युवराजसिंग.

साला जरा नियमित लिहीलस तर पार ले-ख-क-चं!!

मेल्या नियमीत लिहीत जा की, आम्हाला काहीतरी चांगल वाचल्याच समाधान मिळत जाईल तर तुझ काय जाणार आहे कां?

श्रीरंग_जोशी's picture

3 Dec 2014 - 8:42 pm | श्रीरंग_जोशी

भारी जमलंय व्यक्तिचित्रण.

अभ्या परत लिहिता झाला हे पाहून समाधान वाटले.

आनन्दिता's picture

4 Dec 2014 - 7:44 pm | आनन्दिता

अभ्या इझ ब्याक!

भिंगरी's picture

4 Dec 2014 - 7:56 pm | भिंगरी

परत परत लिवाल ना?
उगा माहिती असलेली बरी”

अभ्या..'s picture

25 Dec 2014 - 3:01 pm | अभ्या..

ब्याट्या, बुवा, प्यारेकाका, ट्क्या, स्वॅप्सबुवा, वल्ली, ना़खु, सौन्दाळा, हाडक्या, मुविकाका, संजयजी, पाषाणभेद खटपट्या, बोक्याबुवा, राघव, प्रमोदराव, विनायकराव, किसना, सूडक्या, धन्या, जेप्या, नावातकायहै, चिन्मयराव, एसवायज्या, टारगटा, गाववाला नितिन, वैभ्या, श्रीरंगा, आणि कविवर्य मिका सगळ्या मित्रांनो आभार रे. तुमच्या प्रोत्साहनानेच असले वेडेबागडे लिहिले तरि मिपावर कौतुक होते.
आदूबाळासारखा साक्षेपी अन चोखंदळ वाचकाने केलेले कौतुकाबद्दल धन्यवाद.
बाकी सगळ्या ज्येष्ठ तायांचा स्नेह काय सांगावा. पैकातै, अप्पूतै, मौतै, यशोतै, स्नेहातै, अतिवासतै, अजयातै, पिरा, आनन्दिता, भिंगरी, टुकुल या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 5:09 pm | टवाळ कार्टा

धन्स रे...

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2014 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

@सगळ्या मित्रांनो आभार रे. तुमच्या प्रोत्साहनानेच असले वेडेबागडे लिहिले तरि मिपावर कौतुक होते.>>> पण आता गायब होऊ नकोस अभ्या.................! :-/ येत रहा :)