पण आपल्या दृष्टीचं काय ?

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 5:13 pm

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या परीने, पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यांची ती बैठक होती. स्त्री प्रश्नांबाबत, कामांबाबत, त्यामध्ये येणा-या अडचणींबाबत आणि विकासाच्या वाटचालीबाबत या सर्व कार्यकर्त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी असा संयोजकांचा हेतू होता. सुखद आश्चर्याची बाब अशी की, स्त्री प्रश्नांबाबत संवेदनशील असणारे मोजके का होईना, पण पुरुष कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते.

विविध राज्यांमधली स्त्रियांची परिस्थिती ऐकली, की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यातही विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांत जगण्याची संधी आपल्याला मिळाली, हे स्वतःचं परमभाग्यच वाटायला लागतं! कारण अशाच कोणत्यातरी निरूपद्रवी चर्चेत ’एखाद्या दिवशी घरातल्या पुरुषाने चहा केला तर काही बिघडत नाही’ या माझ्या साध्या वाक्यावर त्या बैठकीतील अनेक स्त्रियांनी माझ्याकडे दचकून पाहिलं होतं!

एकंदर त्या ठिकाणी नवीन काहीच नव्हतं! स्त्रियाच प्रेमळ असतात, स्त्रीची सहनशीलता आणि त्यागच कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला तारू शकतात........ वगैरे गोष्टींचा प्रतिवाद करायचाही मला कंटाळा आला होता. तेवढयात आंध्र प्रदेशातील एका बाईंनी उठून गर्भजलचिकित्सा आणि तिचे दुष्परिणाम यावर बोलायला सुरुवात केली.

विषय गंभीर होता. त्या बाई स्वतः ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत होत्या आणि मुख्य म्हणजे त्या अतिशय पोटतिडिकेने बोलत होत्या. त्यांच्याकडे आकडेवारी होती, जिवंत अनुभवही होते. त्या झुंज देत होत्या. अशा प्रकारच्या संघर्षात वाटयाला येणारा एकाकीपणा, अस्वस्थता अशा सा-या छटा त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होत्या. श्रोत्यांसमोर अनेक प्रश्नचिन्हे उभी करून त्या बाईंनी आपले बोलणे संपवले.

त्यानंतर बोलायला पंचाहत्तरीच्या डॉ. जानकी उठल्या. त्याही अनेक वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय केलेल्या, जुन्या-जाणत्या प्रख्यात कार्यकर्त्या! गर्भजलचिकित्सेची समस्या अतिशय गंभीर असल्याचे मान्य करून त्या म्हणाल्या, “पण त्यामुळे एवढे हतबल होण्याचे कारण नाही. यावर आपल्या प्राचीन शास्त्रांत एक हमखास उपाय आहे.....”

सर्वचजणी जरा नीट सावरून बसल्या. कारण गर्भजलचिकित्सेची भीषणता, दाहकता, स्त्रीला जन्मच नाकारण्याचे क्रौर्य, याबाबतची अस्वस्थता आमच्या सर्वांच्या मनात खदखदत होती. डॉ. जानकी पुढे म्हणाल्या, “ जन्माआधीच मुलीची हत्या करणे ही क्रूरता आहे. पण काय करणार? आपल्या समाजाला तर मुलं -’मुलगे’ - च हवे असतात. मुलीची गर्भावस्थेतील हत्या टाळायची असेल तर ज्यांना मुलगा हवा आहे, त्यांना मुलगाच कसा होईल हे आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये ’पुंसवन’ नामक एक विधि सांगितला आहे.......”

आम्ही काहीजणी अक्षरशः हैराण, अवाक! तर काहीजणी ते शास्त्र ऐकायला उत्सुक! त्याचाही मनाला प्रचंड धक्का! जानकीबाई त्या विषयावर विस्ताराने बोलू लागल्या, तशी आमची चलबिचल आणखी वाढली. पण त्यांना थोपवायचे कसे? आरडाओरडा करून त्यांना गप्प बसवणे आमच्या मनातील सभ्यतेच्या कल्पनेला पटत नव्हते. शिवाय झुंडशाहीने एखाद्याला गप्प बसवणे हे दुधारी शस्त्र आहे, ते आपल्यावरही उलटू शकते याची आम्हाला जाणीव होती.

हळूहळू आपापसातल्या निषेधाची कुजबूज तीव्र झाली. आमच्यातली एकजण जोरात ओरडली, “ आम्हाला मुली हव्या आहेत या जगात!” तिला पाठिंबा देत कोणीतरी कोप-यातून सौम्यपणे म्हणाली, “ वेळ खूप जातो आहे. आता पुढच्या कार्यकर्तीला बोलू द्या...” त्यावर वेगवेगळ्या समूहातून निषेधाचे सूर जोर पकडू लागले. श्रोत्यांमधून येणा-या प्रतिक्रिया क्षणोक्षणी वाढू लागल्या. मग अध्यक्ष – त्याही पंचाहत्तरीच्या - जानकीबाईंना काहीतरी म्हणाल्या आणि जानकीबाई काही न बोलता स्मितहास्य करत त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या.

वातावरण निवळावे, मोकळे व्हावे म्हणून संयोजकांनी लगेच चहापानाची सुट्टी जाहीर केली. सर्वजणी तावातावाने त्या विषयावर बोलू लागल्या. एक बाई रागावून मला म्हणाल्या, “ ऐकून घ्यायला तुमचं काय जात होतं? आजकालच्या पिढीला नाहीतरी आपल्या प्राचीन शास्त्रांचा अभिमानच नाही!” त्यांना टाळून मी पुढे गेले. एक जराशी प्रसिद्ध लेखिका दुसरीला म्हणत होती, “ पण जगात सगळे मुलगेच झाले तर त्यांना लग्नाला मुली कोठून मिळणार? ” (जणू मुलग्यांच्या - म्हणजे पुरुषांच्या - लग्नाची सोय म्हणूनच मुली जन्माला येतात!)

अर्थशास्त्र शिकवणा-या एक बाई म्हणत होत्या, “कधी कधी मला असं वाटतं की, असचं होत राहावं! (म्हणजे जन्माआधीच मुली मरून जाव्यात??) बायकांची संख्या तुलनेने कमी झाली की त्यांची ’किंमत’ वाढेल! ” (यांना फक्त मागणी-पुरवठा-किंमत हेच माहीत! स्त्रीसन्मान वाढवण्याचा काय पण अघोरी उपाय! आणि तो ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? )

“स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं म्हणतात, हे आता पटलं मला! या बायका इतक्या निर्दयीपणे या विषयावर बोलू तरी कशा शकतात? यासुद्धा पुरुषप्रधान मानसिकतेच्या बळी.. खरी जागृती यांच्यातच घडवायला हवी...” एक तडफदार प्रतिक्रिया! “जागृती कसली करता? गोळ्या घालायला हव्यात असल्या लोकांना....” एक दाहक स्वर!

गर्दीतून हिंडताना प्रतिक्रियांचे तुकडे- तुकडे समोर येत होते. प्रश्न एक पण त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन अनेक! काही विकृत, काही विवेकी! काही पारंपरिक, काही चिकित्सक! काही संवेदनशील, काही निर्दयी! काही तटस्थ, काही आव्हानात्मक, काही हताश तर काही स्फोटक! माणसांच्या मनाचा जणू एक असीम कॅलिडोस्कोपच माझ्यासमोर.....

तेवढयात जानकीबाईंना गप्प बसवणा-या अध्यक्ष मला दिसल्या. मी त्यांना म्हटलं, “तुम्ही जानकीबाईंना थांबवलतं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुशिक्षितांनी असं बोलावं हे खूप धक्कादायक.......”

“हो ना!” माझं बोलणं अर्धवट तोडत त्या म्हणाल्या, “ जानकीबाईंना मी तेच म्हटलं! समोर अजून लग्न न झालेल्या काही मुली आहेत.. काही पुरुषसुद्धा आहेत! त्यांच्यासमोर बायकांच्या विषयाची चर्चा करू नये हे कसं लक्षात आलं नाही त्यांच्या? बायकांचे असले विषय फक्त बायकांसाठीच असतात....!”

मी अध्यक्षांच्या चेह-याकडे पाहतच राहिले. या समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून मला त्या क्षणी फार निराश, हताश, अगतिक वाटलं!

कदाचित हा जुना कॅलिडोस्कोप तोडून फोडून हवा तसा नवीन बनवताही येईल प्रयत्नांती ….

पण आपल्या दृष्टीचं काय?
**
अन्यत्र पूर्वप्रकाशित
(१९९९ मधल्या एका अनुभवावर आधारित हा लेख. नुकताच पुन्हा असाच एक अनुभव आला आणि हा लेख आठवला!)

समाजअनुभव

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 5:40 pm | कपिलमुनी

तुमचे लेख नेहमी अंर्तमुख व्ह्यायला लावतात .

तुमच अनुभवविश्व खूप समृद्ध आहे हे तुमच्या लेखांमधून जाणवता

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

+ १

मधुरा देशपांडे's picture

26 Nov 2014 - 6:19 pm | मधुरा देशपांडे

नेहमीप्रमाणेच परत परत विचार करायला लावणारा आणि भिडणारा लेख.

सखी's picture

26 Nov 2014 - 6:36 pm | सखी

अंर्तमुख केलं. कठीण आहे हे सर्व, मुलगा हवा हा अट्टहास करणा-या लोकांनी पुढच्या पिढीसाठी काय वाढुन ठेवलं आहे याचा विचारही करवत नाही.

समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून मला त्या क्षणी फार निराश, हताश, अगतिक वाटलं!

नरहर कुरुंदकरांचा एक चिंतनात्मक लेख नेहमी आठवतो मला. स्वातंत्र्य जन्मसिद्ध असण्या बद्दल साशंकता व्यक्त करत स्वातंत्र्यहे संस्कृतीसिद्ध असतं अस काहीस मत त्यांनी नोंदवल होतं. स्वातंत्र्य हे निसर्गत मिळत नाही ते मिळवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा जपणारे वाढवणारे प्रयास सातत्याने करावे लागणार हे एकदा माहित असेल तर तशी मनाची आणी कृतीची तयारी राहते.

आतिवास's picture

26 Nov 2014 - 11:52 pm | आतिवास

स्वातंत्र्य जन्मसिद्ध आहे - अशा अर्थाचं कोणतं विधान तुम्हाला या लेखात आढळलं; याबद्दल कुतूहल आहे.
मनाच्या आणि कृतीच्या तयारीबद्दल - त्याची आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे ;-)

तुझ्या लेखात नाही आहे अतिवास, पण एकूण त्यांच्या प्रतिसादाचा गोषवारा काढलास तर कळेल ते काय म्हणताहेत.
स्त्री मुक्ती ही स्त्रीयांची स्त्रीयांकडुनच पहिला व्हायला हवी आहे अस निदान माझ तरी मत आहे. कारण संस्कृती रक्षणाच काम हे स्त्रीयांच्याच अंगावर पडलं असल्यासारखं बर्‍याच स्त्रीया वागत असतात. खाली मान घालुन निमुट चालणे, संसार टिकवण्यासाठी सहन करणे, बालसंगोपन ही फक्त आईचीच जबाबदारी. त्यामुळे माहितगारांचा प्रतिसाद संयुक्तीक ठरतो.

एकूण एव्हढ्या मोठ्या सभेतसुद्धा जन्माला येण्याचा नैसर्गीक हक्क, ही बाजू चर्चीली गेली नाहीच तर.

माहितगार's picture

27 Nov 2014 - 9:26 am | माहितगार

बरोबर आहे.

मुक्ती ही स्त्रीयांची स्त्रीयांकडुनच

ज्यांच्यासाठी मुक्ती समानता स्वत्व इत्यादी देताय तेच स्वतःच नको म्हणतात तेव्हा काही करू इच्छित असलेल्याची स्थिती दयनीय होते.

कुरुंदकरांनी लेखन करताना स्त्री पुरुष असा भेद करावयाचा नसावा तसा भेद करण्याचा उद्देश माझाही नाही. संस्कृती रक्षण हा शब्दापेक्षा प्रश्न कदाचित सांस्कृतीक प्रभावांचा असावा. विशीष्ट सांस्कृतीक प्रभावात असलेल्या व्यक्तींना मी समता स्वांतंत्र्य उच्चतरमुल्ये देऊ करूनही त्या व्यक्ती ते समुह नाकारत असतात, दिलेल्या पिंजर्‍यातलच/ दार-खिडक्या-भिंतींनी बंदीस्त जीवन जपण्याची सवय अथवा दिलेली विषमता स्वीकारत विषमतेचच समर्थन हा सांस्कृतीक प्रभाव आहे. "या समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून..
" (स्त्रीच्या) स्वत्वास जडलेली ठिगळ तुमच्या पुरोगामी मनाला दिसताहेत, हि तुमच्या पुरोगामी मनाला होणारी जखम आहे. पुरोगामी मनाला जखम होण्याच कारण तुम्ही स्वातंत्र्य समता आदी मुल्ये जन्मसिद्ध असतात हे गृहीत धरून चालता आहात कदाचित म्हणून होते आहे का, मला जे जन्मसिद्ध वाटते आहे ते इतरांना का नको आहे हे न समजल्याने जखमेचा घाव जास्त गहीरा होत जातो असे आहे का. हे कोड उलगडण्याचा कुरुंदकरांचा प्रयत्न असावा.

जे ठिगळांना घेऊन जगतात त्यांना त्या ठिगळाच काही वाटत असण्याची शक्यता कमीच कारण ती ठिगळ स्वतःची संस्कृती म्हणून स्विकारली आहेत त्याच त्यांना काही असणार नाही. प्रश्न तुमच्या पुरोगामी मनाचा आणि त्याला (मनाला) होणार्‍या जखमेचा आहे. आणि तुमच्या पुरोगामी मना समोरचा प्रश्न कदाचित स्वातंत्र्य हे संस्कृतीसिद्ध असतं हे लक्षात घेऊन स्वतंत्रता देणारी संस्कृती जोपासण्याचे प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहेत हे समजून घेतल्याने हलके होण्यास मदत होईल का.

अतीअवांतर ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकात लाकूडतोड्याची गोष्ट नावाचा काव्य लेख आला आहे. स्वातंत्र्य जन्मसिद्ध की संस्कृतीसिद्ध या अंगानेही त्या कवितेकडे बघता येईल. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य समता आणि संस्कृतीचा संबंध केवळ स्त्रीयांचाच प्रश्न नाही ह्या कडे लक्ष वेधण्यासाठी या कवितेचा उल्लेख करतो आहे.

बहुगुणी's picture

26 Nov 2014 - 7:25 pm | बहुगुणी

जन्माला येणं वा न येणं हे कुणाच्या हाती नाही तसं ते मुलीच्याही हाती नाही. पण पुरुषांच्या लग्नाची/ वंशवृद्धीची/ भोगाची सोय म्हणून मुलींना जन्माला घालणं आणि त्यांना विनिमययोग्य वस्तू (प्रॉडक्ट) म्हणून वाढवणं हेच आई-बापांचं कार्य आहे, हा दीर्घ-घातकी समज समाजातून नष्ट व्हायलाच हवा. आणि तो याच पीढीत व्हायला हवा कारण आताच खूप उशीर झाला आहे. त्यासाठी हे असे लेख जळजळीत अंजन म्हणून सतत वाचनात आले पाहिजे.

तुमचे लेख नेहेमीच सुस्ती उडवून खडबडून जागे करणारे असतात. आधिक प्रतिक्रिया देत नाही, पण हा लेख फॉरवर्ड नक्की करतो आहे.

कवितानागेश's picture

26 Nov 2014 - 7:30 pm | कवितानागेश

नक्की कशानी हे सगळे थांबेल समजतच नाही.

स्वीत स्वाति's picture

28 Nov 2014 - 9:22 am | स्वीत स्वाति

माणसांना हे चुकीचे आहे कळत नाही तोपर्यंत... माझ्या मते या परिस्थितीला स्त्रिया जास्त जबाबदार आहेत कारण ग्रामीण भागात स्त्रियांचा मुलगी झाली म्हणून जास्त छळ होतो आणि छळ करण्यात सासू ,नणंद, मोठी जाऊ यांचा सहभाग मोठा असतो.
शहरी भागातही हे प्रकार होत नाही असे नाही .. पण मला खात्री आहे कि भविष्यात हि परिस्थिती नक्कीच बद्लेन. प्रत्येकाने बदल हा आपल्यापासून सुरु करावा . या मनस्थितीतून बाहेर पडू तर परिस्थितीही बद्लेल. शिक्षण हि आपण सर्वांना या परिस्थितीतून बाहेर काढायला हातभार लावणार आहे .

कॅलिडोस्कोप हवा तसा बनवायला हवा - कोणाला हवा तसा? आणि माहितगारांनी दिलेल्या कुरूंदकरांच्या विचारांशी सहमत. स्वातंत्र्य संघर्षाने सिद्ध होते. आयते नाही.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 11:16 pm | मुक्त विहारि

करणारा लेख...

नाखु's picture

27 Nov 2014 - 9:18 am | नाखु

फक्त एकच साधा प्रश्न:कुठल्याही कुटुंबामध्ये मुलगाच हवा किंवा आता तरी मुलगाच हवा असा दुराग्रह कुणाचा असतो स्त्री सदस्य(भावी पित्याची आई,भावी पित्याची बहीण,भावी पित्याची,मावशी/काकू= भावी मातेची आई,भावी मातेची बहीण,भावी मातेची मावशी/काकू.) कि भावी पित्याची/ मातेची पुरुष नातेवाईक मंडळी ?
हा प्रतिसाद सर्वांनी समजून घ्यावा ही नम्र विनंती या मध्ये कुठेही स्त्री वर्गास दुखावण्याचा हेतू नाही पण मुलाचा हट्ट नक्की कोणाला आणि का असतो हे ही पाहिले पाहिजे!
जर परिवारातील सर्व स्त्री सदस्य, असल्या दुराग्रहाविरूद्ध एकजूट ठेवतील तर एक नवीन पायंडा पडेल.
माझ्या अगदी जवळच्या जेष्ठ स्त्री नातेवाइकांस माझ्या बहिणीला "का गं तुला दोन्ही मुलीच" असे हिणवल्याबद्दल मी झाडले होते, त्यावरून आईचा/आत्याचा रोष पत्करला.

काळा पहाड's picture

18 Dec 2014 - 1:19 am | काळा पहाड

माझ्या अगदी जवळच्या जेष्ठ स्त्री नातेवाइकांस माझ्या बहिणीला "का गं तुला दोन्ही मुलीच" असे हिणवल्याबद्दल मी झाडले होते

यावर खरा उतारा हा "इतकी वर्ष झाली तरी अजून 'गेला' नाहीत?" असा आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Dec 2014 - 10:36 am | टवाळ कार्टा

कहर _/|\_ =))

कपिलमुनी's picture

30 Dec 2014 - 5:07 pm | कपिलमुनी

दंडवत

भृशुंडी's picture

26 Nov 2014 - 11:47 pm | भृशुंडी

तुमचा अनुभव अस्सल आहेच, पण लिखाणाची शैलीसुद्धा खूप सुंदर वाटली. विशेषतः

या समाजात ’स्त्री प्रश्न’ नावाच्या कॅलिडोस्कोपमध्ये जखम करणा-या धारदार काचांचाच भरणा जास्त आहे हे सत्य जाणवून...
अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2014 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

पुंसवन :- षोडश संस्कारांपैकी दुसरा संस्कार. हा संस्कार आजकाल अत्यंत तुरळकपणे होत असतो.. मी जेंव्हा हा संस्कार होताना प्रथम पाहिला. तेंव्हा मला मजा वाटली. नवरा पत्नीच्या हतावर १ दाणा उडीद/२दाणे पांढरि मोहोरी/दही असे टाकतो..(हे पुल्लिंगाचं प्रतिक समजायचं..आणि लबाडांच्या मतानुसार आयुर्वेदाचा महान शोध!) आणि आंम्ही पुरोहितांनी त्याला,त्याच्या पत्नीस असे विचारायला लावायचे असते...

नवरा:- किं पिबसी?
पत्नी:- पुंसवनम्..(असे म्हणून तिने ते उडिद/मोहोरि मिश्रण खाऊन गिळून टाकायचे.)

ही कृती तिनदा करवून घ्यायची. सदर कृतीच्या आधी/नंतर इतरही धार्मिक विधी असतात..पण हे त्यातलं बीज! आणि असे केल्यानी (म्हणे!) त्या स्त्रीला मुलगा होतो..(म्हणजे मुलिचं बीज आधी धरलं गेलं असेल,तर ते बदलवूनही!) मी ज्यांच्या हताखाली कामाला गेलो होतो,त्यांच्याकडून मला हे कळले...नंतर गेल्या १५ वर्षात मी हा संस्कार एकंदर ४/५ वेळा* पाहिला आहे. हा संस्कार चवथ्या का सातव्या महिन्यात असतो..(मलाही नीटसे अठवत नाही.) तेंव्हा हे ऐकलं आणि हसू आलं होतं..पुढे प्रजनन(शरिर)शास्त्राची माहिती कळल्यानंतर तर, हसुही येइ ना! कारण हे असले संस्कार अज्ञानातून तयार झाले,असं म्हणून सोडून देता येत नाहित. आमच्या पौरुषप्रधान संस्कृतीचे किती पदर कुठे..कुठे,आणि कसकसे दडलेले आहेत.. हे पाहून लाज वाटते!
==============================================
* यात एकदा माझ्याही एका यजमानाकडे मला हा संस्कार करण्याचा प्र'संग ओढवला होता.मी त्यांना,यातून फक्त-"होणारी संतती कणखर होइल"(दुसरे काहि होणार नाही)..असे सांगून व्यक्तिगतपणे माझी बाजू सावरून घेतली..काय करणार मी तरी दुसरं??? :( आधी त्यांना मी "हे असं काहि संभवत नसतं" असं खूप सांगितलं होतं..पण कुणाकुणाची इच्छा म्हणून ते माझ्या पाठिसच पडले...त्यानंतर पुढे इतरत्र मात्र मी सदर संस्कार करायला नकार दिलेला आहे. हे सर्व मी इथे माझं कौतुक करवून घ्यायला सांगत नाही,तर..आंम्ही पुरोहित हे बहुसंख्यवेळा यजमान-हातिचे बाहुले कसे असतो..हे व्यक्त व्हावं..म्हणून बोलतोय.. एका बाजुनी धर्मगुरुच्या पोस्ट्चा आंम्हाला मान आहे..पण तो (धर्मगुरु)लोकसंस्कृतीमानसाच्या परिघाबाहेर (चांगल्या ऐहिक कारणानी) जायला लागला..की त्याचा तो मान,केरा इतकाही शिल्लक रहात नाही.

स्पंदना's picture

27 Nov 2014 - 3:31 am | स्पंदना

__/\__!!!

आमच्या बिल्डींगमध्ये उजव्या बाजूला वळणे नावाचा प्रकार आला होता.
दोन स्त्रीयांनी फार भक्तीभावाने हा प्रकार केला होता. त्यात आणि सम आणि विषम दिवस वगैरे वगैरे. मग १००% खात्री.
दोघींनाही मुलीच झाल्या!! :))))

काळा पहाड's picture

18 Dec 2014 - 1:21 am | काळा पहाड

उजव्या बाजूला वळणे

जरा इस्कटून सांगा की.

स्पंदना's picture

27 Nov 2014 - 3:33 am | स्पंदना

खरच! आपल्या दृष्टीच काय?
काय करावं म्हणजे हे थांबेल? घरातले आईवडिल सुद्धा मुलगा मुलगी हा भेद करतात, इथुनच सुरवात होते. मुलीबद्दलच प्रेम वगैरे लग्न झाल्यावर उफाळुन येतं, तोवर सगळा ठणठणाट!!

माहितगार's picture

27 Nov 2014 - 9:52 am | माहितगार

आधुनिक विचाराच्या वडीलांना आणि त्याच्या कुटूंबात मुलगी झालीतर चालते असेही वडील असतात, पण त्यांच्या पत्नीला आणि तिच्या आईला मुलगी नको असते मुलगी होण्यास वडील जबाबदार असतात हे आधुनिक ज्ञान ठेऊन पुरुषास जबादार ठरवून मुलगी झाली म्हणून वडलांना (आणि मुलीलाही) त्रास देता येतो (:)) असे ही उदाहरण माहितीत आहे. म्हणून वर मी सांस्कृतीक प्रभावांचा वर दीर्घ उल्लेख केला आहे.

काही बोलावसंच वाटत नाही.

या एका विधीला शहरी ग्रामिण कोणतेही पैलु नाहीत.माझ्या ओळखीच्या एका स्त्रीरोग तज्ञ बाईंना देखिल हा विधी गुरुजींसह रेकमेंड करताना पाहिलंय.त्यांच्याकडुनही कट घेतात का माहित नाही.कितीही कायदे येऊ देत किंवा शिक्षा,स्त्रीभ्रूण हत्या अजूनही लहान गावांमध्ये सर्रास होणारी गोष्ट आहे.अडाणी लोक डायरेक्ट सांगतात.सुशिक्षित लपवुन करुन घेतात एवढाच फरक.
माहित असलेल्यांनी याबद्दल बोलायचं नसतं.परिसरातल्या जागृत डाॅक्टरांनी तर गांधीजींची तीन माकडं बनायचं असतं.न बघणारी,न बोलणारी,न एेकु येणारी.असो.

सौंदाळा's picture

27 Nov 2014 - 10:05 am | सौंदाळा

अजुन एक थोतांड म्हणजे - चायनीज कॅलेंडर

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2014 - 11:03 am | टवाळ कार्टा

याचा उल्लेख आलाच आहे तर "ज्योतिष"* असे लिहिले तर ते अवांतर ठरेल?

*यामुळे धागा "नक्की" १०० पार करतो(?)

प्रचेतस's picture

27 Nov 2014 - 10:14 am | प्रचेतस

लेख आवडला.

तिमा's picture

27 Nov 2014 - 10:24 am | तिमा

लेख आवडला असे म्हणण्यापेक्षा अस्वस्थ करुन गेला. पुरुषांचे विचार तर बदलायला हवेतच, पण अशा बायकांचे विचार प्रथम बदलणं आवश्यक आहे.

स्नेहल महेश's picture

27 Nov 2014 - 12:15 pm | स्नेहल महेश

खरच सर्वप्रथम स्त्रीयांचे विचार बदलले पाहिजे जर एका स्त्रीने स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तरच हे शक्य आहे

बॅटमॅन's picture

27 Nov 2014 - 12:18 pm | बॅटमॅन

पहिल्यांदा कुणाचे विचार बदलायचे हा वेगळा विषय, पण समाजात असे विचार किती खोलवर पसरले आहेत याची एक झलक या निमित्ताने मिळते. वैयक्तिक पातळीवर शक्य तितका प्रतिकार केला पाहिजे अशा गोष्टींचा.

वैयक्तिक पातळीवर शक्य तितका प्रतिकार केला पाहिजे अशा गोष्टींचा.
+ १. इतकेच नक्की म्हणू शकते.

वाचते आहे. अस्वस्थ तर झालेच आहे वाचताना, पण अजूनही बरंच काही वाटतं आहे, नक्की शब्दांत मांडता येत नाहीये..

लेखात उल्लेखित सर्व स्त्रिया या स्त्रियांसाठी सामाजिक कार्य करणा-या आहेत?

आर यू सीरियस ?

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 10:38 am | Targat Porga

ग्रेट !
विषय अलग आहेत पण वाचून, कविता महाजनांच्या 'ब्र' ची आठवण झाली.

कवितानागेश's picture

29 Nov 2014 - 4:43 pm | कवितानागेश

मूळात, जी गोष्ट जुगारासारखीच घडत असते, त्यात 'हेच हवे आणि तेच नको' असा आग्रह धरणं हाच मूर्खपणा/ स्वार्थीपणा/ एकंदरीत निसर्गाबद्दलचा अनादर/ माज अस्ं नक्कीच म्हणता येइल.
मुलगी नको, कारण तीला दुसरीकडे पाठवावं लागणार, तेदेखिल हुंडा देउन, म्हणजे तिच्यावरचा खर्च वाया गेला!
मुलगाच हवा, याचा आग्रह का, तर तो जवळ रहाणार असतो, त्याच्याकडून त्याच्यावर झालेला खर्च वसूल करता येइल!
असा अत्यन्त स्वार्थी विचार यामागे आईवडलांचा असतो. आपले मूल हे सर्वथा आपल्या 'मालकीची वस्तू' आहे, आणि आपल्याला तिचा कायम उअपयोग होत रहावा, म्हणून मूल जन्माला घालून वाढवून पुढे... म्हातारपणी 'वापरावं', असा भौतिक आणि उपभोगतावादी दृष्टीकोन यामागे असतो.
त्या बिचार्‍या जगणं नाकारलेल्या मुली आणि जगलेली मुलं, हे सारखेच कमनशीबी असतात. कारण ते फक्त 'टूल्स' असतात, 'स्वतंत्र माणसं' नसतातच.
उद्या मुलींनी आइवडलांजवळ रहायची पद्धत तयार झाली, तर असे लोक 'मुलगा नको' म्हणत, मुलांना मारत सुटतील.
अशा आईवडलांपेक्षा हल्लीचे DINK (double income, no kids) वाले नवराबायको परवडले. ते निदान आम्हाला ही जबाबदारी नकोय, हे स्वच्छ कबूल तरी करतात, आणि आपली काय ती सोय आपणच बघतात.
...मात्र यावरचा उपाय अजिबातच माहित नाही.
मूल आपल्यापासून निर्माण झालं तरी ते एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हे माणूस का मान्य करत नाही?
ही आपल्याच स्वतःच्याच निर्मितीच्या गुलामगिरीची/उपयोगितेची पद्धत नक्की कुठल्या मूर्ख भितीतून निर्माण झाली?
स्त्रियांच्या सृजनशीलतेचा असा परत परत जुगार खेळून डाव मोडण्यासाठी, हिंस्त्रपणे 'वापर' कसा काय केला जाउ शकतो?
चिमण्या देखिल पिल्लू मोठे करुन खुशाल स्वतंत्र सोडून देतात, माणसांना ही साधी सरळ गोष्ट कुणी शिकवायची?

एस's picture

29 Nov 2014 - 8:56 pm | एस

पाचही मुली झाल्यामुळे पतीने गर्भवती पत्नीची झोपेतच विळ्याने केली हत्या!

मंगळवेढ्याच्या भयानक घटनेनंतर ह्या लेखाची पुन्हा आठवण आली!

आतिवास's picture

1 Dec 2014 - 12:55 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
प्रतिसादात अनेकांनी मुद्दे मांडले आहेत, त्यांचे विशेष आभार. त्यावर चर्चा करायची तर 'काथ्याकूट' मध्ये धागा काढायला हवा. कधीतरी सवडीने या मुद्द्यांबद्दल माझी मतं सांगेन.

स्मिता.'s picture

18 Dec 2014 - 12:46 am | स्मिता.

हे असं वाचून मनाला क्लेश होतो.

मी १०वी-१२वी शिकत असतांनाचा अनुभव आठवला. शेजारच्या एका बाईंना एक मुलगी होती. त्यानंतर दिवस राहिले तेव्हा गर्भलिंग चिकित्सेत पुन्हा मुलगी असल्याचं समजलं. बाईंच्या सासुबाईंना कोठूनतरी कळलं की कोण्या एका वैद्याच्या औषधीने गर्भाचं लिंग बदलतं. (इथे मला डोकं फोडून घ्यावसं वाटलं होतं) :( त्या बाईंनी प्रसूतीपर्यंत त्या वैद्याकडून काहीतरी औषधी घेतली. पण शेवटी मुलगी होणारच होती, ती झालीच.
शहरात राहणार्‍या, सुशिक्षित म्हणवणार्‍या कुटुंबात असं धडू शकतं तर अडाणी समाजघटकांत काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

वर माऊने लिहिलंय ते अगदी पटतं. लोकांना मुलगी का नको हे तर जगजाहीर आहेच पण 'हव्याश्या' मुलांना तरी कोणी निस्वार्थी प्रेम देऊन वाढवतं का? नक्कीच नाही! मुलग्यांना नेहमीच 'म्हातारपणाची काठी' मानून त्यांना एक साधन म्हणूनच पाहिलं गेलंय. त्यामुळे 'मुलगी नको' वाटणार्‍या पालकांची सगळीच मुलं कमनशीबीच!

@आतिवासः तुझ्या मतांच्या प्रतिक्षेत आहे.

आतिवास's picture

18 Dec 2014 - 10:04 pm | आतिवास

कधीतरी सवडीने ..

पैसा's picture

18 Dec 2014 - 11:42 pm | पैसा

अस्वस्थ करणारे लिखाण. खरे तर अस्वस्थ व्हायला नको. कित्येक वर्षे आजूबाजूला चाललेले प्रकार, मुलींची कमी होणारी संख्या, वाढते बलात्कार आणि तत्सम गुन्हे यातून काय बोलावे हेच कळत नाही.

एकीकडे गर्भपात करायला आलेली महिला अवैध काम करायला सांगते आहे अशी शंका येताच "मी असली कामे करत नाही" म्हणून ठणठणीत सांगणारे गायनॅक पाहिले आहेत, तर दुसरीकडे मुलगा होईपर्यंत तीन मुली होऊ देणार्‍या एक महिला गायनॅकही पाहिल्या आहेत. नशीब की त्यांनी आधी तिन्ही मुलींना जन्म दिला. गर्भपात करून घेतले असते तर कोणाला कळणार होते? चांगल्या ओळखीतल्या, उच्चशिक्षित, बँकेत उच्च अधिकारी म्हणून काम करणार्‍या महिलेने गर्भजल चिकित्सा करवून गर्भपात करवून घेतल्याचे माहित आहे, अशाच एका बाईंचे फेसबुकावर मुलीचे कौतुक करणारे फोटो आणि पोस्ट बघते तेव्हा या बाईंनी या मुलीच्या धाकट्या बहिणीला जन्माला येण्यापूर्वी मारले होते असे विचार मनात आल्याशिवाय रहात नाहीत. एकेकदा वाटतं की त्या मुलीला सांगावं की तुझ्या आईने असं केलं होतं. मग तिची काय प्रतिक्रिया असेल याची कल्पनाही करवत नाही.