जबाबदार/जबाबदारी

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
24 Nov 2014 - 9:50 am

जबाबदार/जबाबदारी
जबाबदार आणि जबाबदारी हे शब्द राजरोसपणे वापरले जातात. मुलांची जबाबदारी, कामाची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी अशा अनेक जबाबदार्या आम्ही पार पाडत आहोत किंवा उचलत आहोत किंवा निभावत आहोत असं बहुतेकदा ऐकायला मिळतं. पण नक्की जबाबदारी म्हणजे काय? कर्तव्य, काळजी आणि प्रेम यांचं जबाबदार किंवा जबाबदारी या संज्ञेशी नातं काय? जबाबदार आणि जबाबदारी यामध्ये नक्की अंतर किती? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उकल म्हणजेच पुन्हा एकदा चिकित्सा. यासाठी आपण एका छोट्याशा गोष्टीचा आधार घेऊया.

तसं हॉस्टेलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हे त्यातल्यात्यात अधिक महत्त्वाचं. आज तो नेहमीप्रमाणे वेळेवर झोपला होता. परंतु मध्यरात्रीच त्याला उठवलं गेलं. त्याच्या वडिलांचे मित्र त्याला घ्यायला आले होते. तसं त्याचं वय फारसं नसलं तरी काहीतरी गंभीर घडलं आहे याची त्याला कल्पना आली होती. गाडीत बसल्यावर त्याने वडिलांच्या मित्रांना विचारलं तेव्हा त्याला कळलं की त्याच्या आजीच्याबाबतीत काही अघटित घडलं आहे. त्याला खूप भीती वाटली होती पण काय करावं आणि कसं रिअॅक्ट व्हावं ते कळत नव्हतं.

तो घरी पोहोचला तर घरी बरीच गर्दी होती. अनोळखी, ओळखीचे असे बरेच चेहरे होते. त्याला काही कळत नव्हतं. तो स्वयंपाक घरात गेला तेव्हा तिथे त्याला जळलेले कपड्याचे तुकडे पडलेले दिसले. नंतर त्याच्या चुलत भावंडांनी त्याला सांगितलं की, आजी गेली. तिने आत्महत्या केली. स्वतःला पेटवून घेतलं. ९० टक्के जळली होती ती आणि तेवढी जळेपर्यंत ती दोन्ही पाय छातीशी कवटाळून बसली होती. अजिबात हलली नाही. त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला तिचा पार्थिव देह बघू दिला नाही. पोलीस केस झालेली. ती केस रफा-दफा करण्याचं काम अनेक पातळींवर सुरू होतं. अनेक ओळखी कामाला लागल्या होत्या आणि कसंही करून ते प्रकरण दाबलं गेलं. पण त्याच्या मनात ती घटना कायमची बसली. हे असं झालंच कसं? का झालं? याला जबाबदार कोण? या घटनेची कुणी जबाबदारी घ्यायची? का सगळं नशिबावर सोडून द्यायचं? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमू लागले.

खरं तर त्याला वयाच्या पहिल्या वर्षापासूनच पाळणाघरात ठेवलं होतं. परंतु आजीच्या सक्त विरोधामुळे त्याचं पाळणाघर सुटलं. आजी म्हणायची परक्या बाईचा हात आणि आपल्या माणसांचा हात म्हणजेच आईचा किंवा आजीचा हात यात फरक असतो. अगदी शाळेत जाईपर्यंत आजीने आपल्या नातवाचं सगळं केलं. आजीच त्याला शाळेत सोडायला जायची. शाळा सुटण्याआधी आजी नेहमीच शाळेबाहेर हजर रहायची. तशी शाळेत जायला शाळेची बस होती पण आजीने स्वतः त्याला शाळेत सोडण्या-आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. बसचे पैसे वाचत होते आणि शाळाही तशी फार दूर नव्हती त्यामुळे आई-बाबांनीदेखील याबाबतीत आजीला विरोध केला नव्हता. आजी जोपर्यंत घरातलं सगळं करून आपल्या नातवाला सांभाळत होती, तोपर्यंत सगळं बरं चाललं होतं. पण काही काळाने आजीच्या डोळ्यांचं दुखणं बळावलं. इतकं झालं की, तिला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासं झालं आणि त्यात भर पडली ती गुडघेदुखीची. तिला धड चालताही येईनासं झालं. थोडक्यात, आजी हळूहळू परावलंबी होऊ लागली आणि मग आजी आणि आईवडिलांमध्ये खटके उडू लागले. नंतर नंतर आईवडील आणि इतर काका-काकूंमध्ये आजीला सांभाळण्यावरून भांडणं होऊ लागली. घरातली भांडणं तर दररोज वाढतच गेली. पण आता त्याने म्हणजेच नातवाने आपल्यापरिने आजीची काळजी घ्यायला सुरुवात केली होती. आजीला वर्तमानपत्र वाचून दाखवणं, गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवणं, मराठीच्या अभ्यासक्रमातील/पुस्तकातील धडे वाचून दाखवणं, पाय चेपून देणं, नखं कापून देणं अशी तो आपल्या कुवतीनुसार आजीची काळजी घेत होता. अशा अनेक बाबी करताना त्याला खूप समाधान मिळायचं. आजीला दिसत नव्हतं. पण त्याला नेहमी वाटायचं की तिला जे बंद डोळ्यांनी दिसायचं ना, ते त्याच्यासारख्या माणसांना उघड्या डोळ्यांनीदेखील दिसत नसेल. तिचा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन विलक्षण वाटायचा त्याला.

काही काळाने त्याला हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा विषय जोर धरू लागला. त्याने साफ नकार दिला. खूप रडला, हट्ट धरला, आईवडिलांशी बोलणं सोडलं. पण शेवटी आजीनेच त्याला समजावलं की जा तू. त्यातच तुझं भलं आहे. खरं तर सततच्या भांडणांचा, ताण-तणावयुक्त वातावरणाचा आपल्या नातवावर परिणाम होऊ नये म्हणून आजीने हॉस्टेलबद्दलच्या निर्णयाला होकार दिला होता आणि तसंही आजी स्वतःच पूर्णपणे परावलंबी झाली होती. शेवटी त्याची रवानगी हॉस्टेलमध्ये झाली आणि काही वर्षांनी आजीच्याबाबतीत अघटित घडलं. तिच्या आत्महत्येची घटना घडली.

त्या घटनेनंतर सगळंच खूप बदललं. त्या घटनेआधी सगळे नातेवाईक आजीमुळे का होईना, पण एकमेकांच्या संपर्कात होते. आजी एकप्रकारे सगळ्यांमधली एक दुवा होती. ते सगळं एकाएकी बंद झालं. त्या घटनेला प्रत्येकजण एकमेकांना जबाबदार धरू लागले, दोष देऊ लागले. सगळ्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ लागला. त्याच्या आईवडिलांनी त्याच्या सगळ्या काका-काकूंना दोष दिला हे सांगून की, तुमच्या आईमुळे आम्हाला चार लोकांमध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही. पोलीस केस झाल्यामुळे आमची बदनामी झाली. एवढी वर्षं तुम्हा सगळ्यांच्या आईला सांभाळलं ते सगळं फुकट गेलं. सगळे लोग आम्हालाच आता दोष देऊ लागलेत, इत्यादी. त्याच्या सगळ्या काका-काकूंनी त्याच्या आईवडिलांना दोष दिला हे सांगून की, तुमच्यामुळे आमची आई गेली. तिचा असा दुर्दैवी अंत झाला. तिचा इतका तुम्ही मानसिक छळ केलात की, ती हा ताण सहन करू शकली नाही आणि तिला आत्महत्या करावी लागली. तुम्हीच जबाबदार आहात या सगळ्यासाठी, इत्यादी. सगळेच एकमेकांना दोष देत होते (कुणी बोलून तर कुणी वागणुकीतून). सगळ्यांमध्ये अंतर पडू लागलं आणि ते वाढूही लागलं. काहीजणांनी एकमेकांशी संपर्कच तोडून टाकला. काहीजणांनी एकमेकांशी कर्तव्य म्हणून संपर्क ठेवला. नंतर नंतर तोही हळूहळू कमी झाला. सगळंच विस्कटलं होतं. हा असा अबोला, दुरावा अनेक वर्षं होता. इतरांचं जाऊ दे पण त्याचादेखील आपल्या आईवडिलांवर प्रचंड राग होता. त्यानेदेखील आईवडिलांशी आणि एकंदरीत सगळ्यांशीच अबोला धरला होता. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तिच्या अशा दुर्दैवी मृत्युमुळे, दुखावला गेल्याने तो सगळ्यांपासूनच दुरावला होता.

त्याचे काका हे सगळ्यांमध्ये वयाने सर्वात मोठे होते. ते एकटेच होते, समाजसेवक होते. समाजसेवेकरता ते गावोगावी फिरायचे. त्यांना समाजात मान होता. तसाच भीतियुक्त आदर-मान हा सगळ्या नातेवाईकांमध्येदेखील होता. वयाने मोठे असल्यामुळे एखाद्वेळ असेल तसं कदाचित. पण त्यांच्याकडे वय ही एक जमेची बाजू होती हे मात्र खरं. वयाचा आदर, मान राखण्यासाठी का होईना पण त्यांचं सगळे ऐकायचे. केवळ ऐकण्यापुरतं का होईना पण ऐकायचे. त्वरित अंमलात आणत नव्हते ही गोष्ट निराळी, पण ऐकायचे. प्रतिक्रिया द्यायचे नाहीत, कुणी वाद घालायचं नाही, कुणी स्पष्टीकरण किंवा कारणं द्यायचं नाही, (मग ते भले पटो अथवा ना पटो). त्यांनी हळूहळू का होईना पण सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कित्येक वर्षं प्रयत्न सुरू होते. थोडा काळ लागला पण सगळ्यांना एकत्र आणण्यात ते यशस्वी झाले. त्याचादेखील आपल्या आईवडिलांवरचा राग हळूहळू कमी झाला. आपल्या आजीच्या दुर्दैवी अंतानंतर रागाच्या भरात सगळ्यांशीच धरलेला अबोलाही त्याने सोडला आणि पुन्हा बर्यापैकी सगळं सुरळीत झालं.

वरील गोष्टीमध्ये नक्की काय केलं काकांनी? नक्की काय सांगितलं काकांनी सगळ्यांना? ते आता आपण बघुया. काकांनी जे काही केलं किंवा जे काही सांगितलं ती महत्त्वाची बाब आहे. त्यांनी जबाबदार आणि जबाबदारी यातला मूलभूत फरक सगळ्यांना सांगितला. तसंच आपण सगळे जबाबदारी घेणं, काळजी घेणं आणि कर्तव्य पार पाडणं यामध्ये कशी गल्लत करतो हेही समजावलं. तसं पाहिलं गेलं तर जबाबदार आणि जबाबदारी या दोन्ही बाबींमध्ये केवळ एक-दोन अक्षरांचा किंवा काना-मात्राचाच फरक आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात तो फार मोठा परिणामकारक फरक आहे. वरील गोष्टीमध्ये आजीच्या मृत्युनंतर सगळ्यांनीच एकमेकांना जबाबदार धरलं. एकमेकांना दोष दिला. कारण आपण सगळेच कुठेतरी जबाबदारी घ्यायला कमी पडलो हे मान्य करणं कठीण असल्यामुळे सर्वात सोपा मार्ग सगळ्यांनीच अवलंबला. तो सोपा मार्ग म्हणजे एकमेकांना जबाबदार धरणं आणि मोकळं होणं. स्वतःचीच स्वतः समजूत काढणं (मग ती फसवी का असेना).

कुणाच्याही आयुष्यात दोनच घटना घडतात, त्यापैकी एक म्हणजे चांगली घटना आणि दुसरी म्हणजे वाईट घटना (प्रत्यक्षात ती वाईट नसून ती कमी चांगली घटना असते कारण तो एक अनुभवच असतो). या दोन्ही घटना मग त्या चांगल्या असो वा वाईट त्या ज्याच्या आयुष्यात घडतात त्याला पूर्णपणे ती व्यक्तिच जबाबदार असते. म्हणजे पुन्हा वरील गोष्टीच्याबाबतीत म्हणायचं तर आजीच्याबाबतीत जे काही घडलं त्याला पूर्णपणे आजीच जबाबदार आहे. ती त्या एका क्षणाला कमकुवत झाली आणि तिने स्वतःच्याबाबतीत चुकीचं पाऊल उचललं. त्यामुळे सर्वस्वी त्या घटनेला तीच जबाबदार होती. मग इतरांची काय भूमिका असायला हवी होती? बाकी सगळ्या जवळच्यांनी त्या घटनेची जबाबदारी घ्यायला किंवा उचलायला पाहिजे होती (म्हणजे स्वतःला दोष देऊन किंवा दुःख करून किंवा सहानुभूती मिळवून किंवा स्वतःचाच चांगुलपणा स्वतःमध्येच शोधणं नव्हे). जबाबदारी उचलणं किंवा जबाबदारी घेणं म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं, ते किंवा तशा प्रकारचं आपल्या किंवा आपल्या भोवतालच्या, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तिंच्या आयुष्यात असं वारंवार घडावं म्हणून प्रयत्न करणं. तेच उलट वाईट घटनांबद्दल. एखाद्याच्या आयुष्यात काही वाईट घडलं तर, ते किंवा तशा प्रकारचं आपल्या किंवा आपल्या भोवतालच्या, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तिंच्या आयुष्यात असं कधीही पुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करणं. म्हणजे जे काही घडतं त्याचा अनुभव म्हणून आधार घेणं.

वरील गोष्टीमध्ये आजीच्याबाबतीत खूप वाईट घडलं. जे काही घडलं त्या घटनेच्याबाबतीत एकमेकांना जबाबदार धरण्याऐवजी अशी घटना किंवा अशी ताणतणावाची परिस्थिती, सर्वप्रथम स्वतःच्या बाबतीत, आपल्या घरातल्यांच्या बाबतीत, आपल्या नातेवाईकांच्याबाबतीत, आपल्या मित्रमंडळी किंवा त्यांच्या परिवाराच्याबाबतीत, आपण ज्या समाजात राहतो त्यांच्याबाबतीत (मग त्यात अनोळखी व्यक्ती का असेना) घडू नये म्हणून सदैव प्रयत्न करणं. (आपापल्या कुवतीचं भान राखून किंवा आपापल्या कुवतीनुसार जेवढं जमेल आणि झेपेल तितकंच करणं हेदेखील महत्त्वाचं). यालाच जबाबदारी घेणं असं म्हणतात. ते न करता सगळेजण एकमेकांना दोष देत बसले, स्वतःची जबाबदारी टाळत बसले आणि यातच अनेक वर्षं वाया घालवली. सुरुवातीला प्रत्येकाला आपापली ही चूक मान्य करणं अवघड गेलं. कारण चूक मान्य करणं तसं कठीणच असतं. भीती वाटते माणसाला स्वतःचीच चिकित्सा करायला. कारण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आपल्याच लोकांकडून होऊ शकतो, हीदेखील भीती असतेच.

वरील गोष्टीमध्ये काकांनी सगळ्यांना हे म्हटलं की, जरी तुम्हा लोकांची चूक असली तरी तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण जो चुकतो तोच शिकतो (केवळ शिकण्याची प्रवृत्ती अंगी बाळगली पाहिजे). तुम्हाला या घटनेतून काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे तेव्हा ही एक संधी आहे. एकमेकांच्या चुकांचे Issue, Problem बनवून किंवा तुझी चूक लहान की माझी चूक लहान अशी तुलना करून किंवा एकमेकांना घालून पाडून बोलून, एकमेकांचा त्रागा करून, इत्यादी. स्वतःच्या चुका Accept करायला घाबरू नका. चुकलं की टीका काय चारही बाजूने होतच राहणार म्हणून आपल्या मनातल्या आपल्याच प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका. उलट जबाबदारी घ्या आणि येणार्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण करा आणि हे करायचंच असेल तर येणार्या पिढीसाठी करा ते देखील निःस्वार्थीपणे. जबाबदारी घेणं, काळजी घेणं आणि कर्तव्य पार पाडणं यात गल्लत करू नका. आजीला वेळच्यावेळी औषधं देणं, तिच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देणं किंवा यासारख्या अनेक बाबी जर तुम्ही केल्या असतील तर त्यांना काळजी घेणं असं म्हणतात. त्यामागे प्रेम, आनंद, समाधान अशा अनेक भावना असू शकतात. तिच्या औषधांसाठी लागणार्या पैशांची व्यवस्था करणं, तिच्यावर लक्ष ठेवणं, वेळ पडली तर तिच्या तब्येतीसाठी तिच्याशी थोडं कठोर वागणं, वेळ पडली तर तिचे हट्ट पुरवणं किंवा अशा अनेक बाबी जर तुम्ही केल्या असतील तर त्यांना आपापल्या भूमिकेला (मुलगी/सून/मुलगा/नातू/नात/जावई इत्यादी.) प्रामाणिक राहून कर्तव्य पार पाडणं असं म्हणतात. तेव्हा प्रत्येकाची म्हणजेच जबाबदारी, काळजी, कर्तव्य यांची स्वतःची अशी एक ठरावीक व्याख्या आहे. आपल्या सोयीनुसार किंवा स्वतःच्या भीतीपोटी यांची सरमिसळ करू नका.

वरील गोष्टीमध्ये काकांनी जे काही केलं किंवा जे काही सांगितलं ते थोडक्यात सांगायचंच झालं तर असं सांगता येईल की, जबाबदार आणि जबाबदारी यातील मूलभूत फरक जर आपण जाणून घेतला तर जबाबदार आणि जबाबदारी या शब्दांशी/संज्ञेशी आणि त्यांच्या व्याख्येशी आपल्याला प्रामाणिक राहता येईल जेणेकरून आपलं जीवन सुसह्य होईल.

शिरीष फडकेकलमनामा – २३/११/२०१४ – लेख ९ – जबाबदार/जबाबदारी

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

25 Nov 2014 - 9:49 am | आनन्दा

ह्म्म..

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2014 - 12:52 pm | प्रसाद१९७१

हम्मा.....

आनन्दा's picture

3 Dec 2014 - 2:58 pm | आनन्दा

हम्मा, हम्मा, हम्मा हम्मा हम्मा :)

शब्दानुज's picture

3 Dec 2014 - 5:01 pm | शब्दानुज

जबाबदारिने जनलोकातिल 'जबाबदारी'तेच्या जाणीवांना जागवले

शब्दानुज's picture

3 Dec 2014 - 5:05 pm | शब्दानुज

'जाणीवपुर्वक 'लिहायचे राहिले