निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Nov 2014 - 1:10 pm

सुमार पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट, छोटस घर, घरा समोर लहानस आंगण. पेरूचे झाड, मधुमालतीची वेल आणिक गमल्यांमध्ये असलेले गुलाब. सकाळ- संध्याकाळ चिमण्यांची चिवचिव, त्यांना दाणा घालण कधी कधी येणाऱ्या फुल पाखरां मागे धावण मुलांचा छंद.

पण माणूस मुळातच स्वार्थी, अतृप्त, असमाधानी. माझ्या सारखा शुद्रजीव ही त्याला अपवाद नाही. पोर मोठी होऊ लागली होती, जागेची उणीव भासत होती. तसे ही, शेजारी-पाजार्यांनी पूर्ण वरांडे कवर केल्यामुळे घरात ऊन ही कमी येत होते. आपण ही समोर मोठी खोली बांधली तर घराला शोभा येईल - बैठकी साठी त्या खोलीचा वापर करता येईल, असा विचार सतत मनात येत होता. शेवटी बायोकोच्या टोमणान्या कंटाळून म्हणाव किंवा स्वत:च्या मनात दडलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी समोर मोठी खोली बांधण्याचा निश्चय केला. अर्थातच अंगणातल्या पेरूच्या झाडाची आणि माधुमालातीच्या वेलीची कत्तल ही झालीच. काही महिन्यातच सुंदर बैठकीची खोली तैयार झाली. तुळशी वृंदावन सहित काही फुलांचे गमले गच्चीवर हलवले. चिमण्यासाठी पाण्याचे भांडे ही ठेवले. पण त्या होत्या कुठे. मधुमालतीची वेल कापल्या मुळे चिमण्यांना घर सोडून जाणे भाग होते. नाही म्हंटले तरीही दाणे आणि पिण्यासाठी काही चिमण्या सकाळ संध्याकाळी गच्चीवर यायच्या.

त्या नंतर जवळपास वर्ष उलटल असेल. एक दिवस ऑफिस मधून घरी परतल्यावर. माझी दोन्ही मूले एकदमच ओरडत म्हणाली बाबा! बाबा ! भिंतीवर काही तरी किड्या सारख दिसत आहे. जवळ जाऊन बघितलं, भिंतीवर एका किड्याच कोष दिसले. आतला निळा रंग ही हलका-हलका दिसत होता. फुलपाखराच कोष वाटते. पण हे इथे कसं? हा प्रश्न मनात आला. कदाचित्‌ नेहमीच्या सवयीने फुल पाखरू अंडी घालायला इथे आले असेल. मधुमालती वेल आणि पेरूचे झाड न दिसल्या मुळे गमल्यातल्या फुलांच्या रोपट्यात अंडी घातली असेल. त्यातील निघणारी अळी रांगत-रांगत कोषासाठी सुरक्षित जागा शोधीत खोलीत आली असेल. हे फुल पाखराचे कोष आहे, काही दिवसातच यातून फुलपाखरू निघेल असं मुलांना सांगितले. ते ही आनंदाने कोषातून फुलपाखरू निघण्याची वाट पाहू लागले. दोन-तीन दिवसा नंतरची गोष्ट - संध्याकाळी घरी आल्यावर बघितले दोन्ही पोर आनंदानी नाचत होती. बाबा बाबा! ते पहा फुलपाखरू, किती सुंदर दिसतंय. एक निळ्या रंगाचे फुलपाखरू खोलीत इकडे-तिकडे उडत होते. पोर ही त्या बरोबर आनंदाने नाचत होती. घरातील सर्व पंखे बंद होते. फुलपाखराला इजा होऊ नये म्हणून मुलांनी पंखे बंदच ठेवले होते.

रात्र झाली, मुलं बैठकीच्या खोलीत कुलर सुरु करून झोपायची म्हणून फुलपाखराला खोलीतून बाहेर पळवल, दरवाजे बंद केले. पंखा व कुलर सुरु केला आणि आम्ही झोपी गेलो.

सकाळी झोप उघडली. मागच्या वरांड्यात येऊन वाश बेसिन वर तोंड धुतले. बैठकीतल्या खोलीत आलो. बघितले एका कोनाड्यात ते फुलपाखरू मरून पडलेले होते. कदाचित रात्री मागच्या वरांड्यातून घरात शिरले असेल आणि पंख्यात येऊन त्याचा जीव गेला असेल. काही क्षण मी प्राणहीन फुलपाखरा कडे बघत राहिलो. अपराधी सारखे वाटले. विचार करू लागलो. यात फुलपाखराची काय चुकी. त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली -झाड व वेली दिसली नाहीत- पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला. एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून, फुलपाखरू पुढच्या प्रवासासाठी पुढे निघून गेला असता. ते फुलपाखरू जिवंत राहीला असते तर अंडी घालण्यास परत इथ आले असते. पण आता ते होणे शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलून बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन चोळून-चोळून हात धुऊ लागलो. हात धुवताना लेडी मेकबेथची आठवण आली. कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का? असा विचार मनात आला.

एक फुल पाखरू नव्हे तर फुलपाखराच्या भविष्यातल्या समूर्ण पिढ्या स्वार्थापोटी मी नष्ट केल्या होत्या. आता ते इथे कधीही दिसणार नाही. खरोखरच! त्या नंतर कधीही गच्चीवर किंवा आमच्या राहत्या घरात निळ्या रंगाचे फुलपाखरू दिसले नाही. आज ही कधी फुलपाखरू दिसले कि त्या फुलपाखराची आठवण होते. एक प्रश्न मला नेहमीच सतावतो, बैठकीची खोली बांधताना एकदाही माझ्या मनात झाडावर व वेलीवर राहणाऱ्या जीवांचा विचार का नाही आला? आला असता तर कदाचित निळे फुल पाखरू आजही जिवंत असते. ???

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

23 Nov 2014 - 1:27 pm | दिपक.कुवेत

पण म्हणजे नंतर तुम्हाला पेरुहि दुरावले ना? घरचे पेरू किती गोड असतात. शीवाय घरचे असल्यामुळे त्यांची (म्हणजे पेरुंची) चव हि निराळीच असते. शीवाय शेजारी-पाजारी देताना आपला उर कसा अभिमानाने भरुन येतो नै? बघा एका बैठकिच्या खोलीपाई तुम्हि भविष्यात येणार्‍या कितीतरी आनंदित क्षणांना मुकलात....

पैसा's picture

23 Nov 2014 - 1:32 pm | पैसा

खरं आहे. माणूस आपलं घर बांधताना मुक्या प्राण्यांना बेघर करतो. अशीच सगळी झाडी, जंगलं संपत राहिली तर कुठे जातील ते शेवट?

स्वाती दिनेश's picture

23 Nov 2014 - 5:16 pm | स्वाती दिनेश

आठवणींच्या आधी जाते, तिथे मनाचे निळे पाखरु.. हे गदिमांचे गाणे आठवले.
शेवटचा परिच्छेद वाचताना अनेक तोडलेली झाडे,त्यांच्यावर चाललेली कुर्‍हाड आठवून जीवाची घालमेल झाली.
स्वाती

कंजूस's picture

23 Nov 2014 - 7:50 pm | कंजूस

वा !

स्पंदना's picture

24 Nov 2014 - 6:41 am | स्पंदना

अनेक दु:खद आठवणी मनात आल्या.

कलंत्री's picture

24 Nov 2014 - 5:28 pm | कलंत्री

शहरात हजारो सदनिका विक्री नाही म्हणून पडून आहेत, शेतजमीनीच्या भूखंड करुन विक्री करणे आणि पैसे वाढतात म्हणून सदनिका / भूखंड विकत घेण्याचा सपाटा लावणे यामूळे लवकरच ही वसंधुरा उघडी / बोडकी होइलच असे वाटते.

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2014 - 5:39 pm | प्रसाद१९७१

१२० कोटी लोकांनी रहायचे कुठे मग?

कलंत्री's picture

25 Nov 2014 - 11:13 am | कलंत्री

पृथ्वी राहिली तर सर्व सजीव सृष्टी राहिल हे मान्य करायला हवे. त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण, शहरीकरणाच्या आसूरी सवयी इत्यादीवर पायबंद घातलाच पाहिजे. लहान असतांना २०० / ३०० फुटाच्या खोलीत ७ / ८ जण आरामात राहत होते. आई / बाबा / ३/४ भावंडे / असलेच तर आजी-आजोबा आणि आता १००० च्या सदनिकेत फारतर फार २/३ जण राहत असतात. लोकसंख्येंच्या प्रमाणात आपण किती शहरीकरण करत आहोत याचाही विचार करावयाला हवा.