शिंच्याचं पत्र.

Targat Porga's picture
Targat Porga in जनातलं, मनातलं
21 Nov 2014 - 10:35 pm

होय रे बेण्या!

कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच…

परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात! पोरगी लग्न होऊन पुण्याला गेलेली ती आत्ता भेटत होती.तिच्या मेक-ओव्हर मुळे मी अर्थातच तिला ओळखू शकणार नव्हतोच.तिनेच माझा पत्ता काढत थेट माझी भेट घेतली. तुझ्याविषयीच बोलायला आलेली ती तुझा विषय मात्र टाळत होती. अश्रूंचा बांध मोठ्या हिमतीने जपत ती विषयांतर करतेय हे मला कळत होतं. नेहमीची खेळकर, अवसानी सुंद्री मला अगदीच गंभीर,शांत आणि कुठल्यातरी दडपणाखाली असल्याची जाणवत होती.मला नेहमीच गबाळ्या म्हणवणाऱ्या सुन्द्रीच्या तोंडून परवा माझं नाव मला एखाद्या शिविसारखं भासत होतं.ती पूर्वीसारखी वाटावी आणि तिचं मन खेळकर व्हावं म्हणून मी तीच्याशी इकडच्या-तिकडच्या भरपूर गप्पा केल्या. शिवाय शाळेतल्या गोष्टींचाही बहाणा केला. तिचा नवरा पोलिसात आहे असं कळलं .तिला दोन मुलही आहेत ऐकल्यावर तर मला हसूच आवरत नव्हतं.

“ओ बाई! बघा ना हा साकेत.,मुद्दाम माझ्या मागे बसतो अन त्याच्या वहीवर येतात म्हणून कार्यानुभवाच्या तासाला आणलेल्या कैचीने माझे केस कापतो.” असं रडत रडत सांगणारी सुंद्री अजूनही तशीच आठवते. त्या दिवशी जोशी बाईंनी कसला चोपला होता साक्याला! बेदम! तीन दिवस शाळेत आलाच नव्हता साला. अन त्या सम्याने, आपल्या मित्राला बसलेल्या चोपाचा प्रतिशोध म्हणून बाईंच्या खुर्चीवर चुईंग-गम लावलं होतं. त्यानंतर घडलेलं महाभारत अख्खी शाळा जाणतेच. ह्याच सुन्द्रीची आठवी-ब मधली मैत्रीण ‘अनुजा’ तुला आवडायची…कसला वेडा होतास तू तिच्यामागे! नुसत्या कविता करायचास पण तिला त्या ऐकवायची तू कधी हिम्मतच केली नाहीस. पण तुझ्यावर निरपेक्ष जीव जडवणाऱ्या आणि मोठ्या मनाच्या सुंद्रीनं ‘तुझ्या आनंदात आनंद’ ह्या उदार विचारापायी त्या साऱ्याच कविता वेळोवेळी अनुजा पर्यंत पोहोचवल्या होत्या. अनुजाने मात्र तुला कधीच दाद दिली नाही. उलट ती त्या कविता न वाचताच चुरगाळून फेकत.ह्याच कविता सुन्द्रीने नंतर एखादं मोरपीस किंवा एखादं जाळीदार पिंपळपान किंवा फुलाच्या पाकळ्या वहीत जपाव्या तश्या जपल्या. मलाही त्यातल्या काही ओळी आठवतात. तू एकदा ‘हेलकावत्या पावसावर रुसलेली माझी अनुजा’ अश्या आशयाची एक कविता केली होतीस.

"तुझ्यासाठी पावसालाही दम भरेण.,तेव्हातरी येउन जा.
अन कौलांवरले थेंब गुलाबी माझ्यासंगे झेलून जा.”

ह्यात कुठेतरी ‘माझी अनुजा’ हे शब्द यमक म्हणून वापरून तिला खुष करता येईल असा तुझा केविलवाणा प्रयत्न होता.मात्र अनुजाचा अर्थ पुढे ‘धाकली बहिण’ असा होतो कळाल्यावर तूच ही कविता फाडून फेकली होतीस. नंतर मी ती चोरून माझ्यानावाने ‘भागू’ला पाठवली होती.,भागू आठवली ना? माझी छावी! लाजरी-बुजरी, घाऱ्या-निळ्या डोळ्याची,केसांत जाईचा गजरा माळून येणारी,गोड-गोड गाणारी भागू!… वर्गात शिकवण्याकडे लक्ष न देता जेव्हा मी तिच्याकडे एकटक बघत बसायचो तेव्हा हाताच्या कोपराने मला हळूच भानावर आणत ‘तेरे चेहरेसे नजर नही हटती, नजारे हम क्या देखे’ हे गाणं तू गुणगुणायचास…,भागूला मी सिनेमाला घेऊन जाईन, चौपाटीवर बसून तिच्याशी भरपूर गप्पा मारेण,एखादी सुंदरशी भेट तिला देईन,स्वतःची कविता ऐकून दाखवेन, तिच्या हातात हात घेऊन पावसात भिजेन वगैरे असले मनसूबे मी जेव्हा तुला सांगायचो तेव्हा तू माझ्यावर ओरडायचास ”बस! ज्यादा खयाली पुलाव मत पका”.,कृती कर ह्या हेतूने असलेलं तुझं माझ्यावर ओरडणं मला समजायचं नाही आणि मी असा तुझ्यावर रुसून बसायचो.मग तूच माझ्या आवडीचं बोरकूट किंवा चिंचेच बोटूक तुझ्या खिशातून काढून देऊन मला बोलतं करायचास. काय काय नाही केलेलस तू तिला मला पटून देण्यासाठी!, मी तिला देण्यासाठी जेव्हा पत्र लिहायचो त्यात तुझ्याच कविता असायच्या,तिच्या मागे लपत जेव्हा मी तिच्या घरापर्यंत जायचो त्यासाठी तुझीच सायकल असायची,तिच्या दप्तरात जेव्हा मी चोरून चॉकलेट्स टाकायचो त्यात तुझाच पॉकेट-मनी असायचा. मोठ्या धिटाईने मी जेव्हा तिच्याशी बोलायचो तेव्हा त्यामागे तुझाच धीर असायचा, तिचा भाऊ जेव्हा अचानक समोर उभा ठाकायचा तेव्हा तुझीच साथ सोबत असायची.…एकदा खेळाच्या तासाला मी batting करत असतांना ती सहज आपला सामना बघत बसली होती. तेव्हा फक्त मी तिच्या डोळ्यात भरावं म्हणून तू खुपच साधी bowling केली होतीस. हे साधून मी तुला तीन सिक्सर लगावले होते. आणि तिच्या प्रत्येक टाळीपायी माझी मनातच सुखद विकेट जात होती.आठवतं? एकदा ह्या भागूवर आपल्याच वर्गातला संग्राम लाईन मारतो हे जेव्हा तुला आधी कळालं होतं तेव्हा तू त्याला मधल्या सुट्टीत सुमडीत नेउन ‘गोळी’ देऊन आला होतास. नंतर शाळा सुटल्यावर त्याने त्याच्या घराकडची मुलं आपल्याला मारायला बोलावली होती आणि आपण त्यांना दुरूनच हेरून घेऊन ग्रंथालयात तीन तास लपून बसलो होतो. तिकडे कधीही न फिरकणाऱ्या आपल्या दोघांना पाहून तिथल्या बाईंना मग संशय आला होता.…एकदा तर ‘पोरींना पटवण्याचे फंडे सापडावे’ ह्या मूळ हेतूने प्रयोगवहीसाठी म्हणून घरून घेतलेले पैसे आपण नाक्यावरच्या ‘कांचन’ मध्ये जाऊन ‘इश्क’ बघण्यात खर्च केले होते. पण तिथे तुझ्या मावस भावाला पाहून आपण चुपचाप तिथून पोबारा केला होता… त्यानंतर शालूच्या डब्यातला साखर-आंबा चोरून खाणं,वहीच्या शेवटच्या पानावर ज्युलीचं चित्र काढणं,संग्रामच्या घराची काच फोडून पाळणं ,मधल्या सुट्टीत ‘पोपट’ सरांच्या सायकलची हवा काढणं,भागूच्या गाण्यावर बाक वाजवणं,सुन्द्रीची वेणी ओढणं अश्या अनेक लहान-मोठ्या गोड गुन्ह्यांमध्ये तू माझा साथीदार होतास.

’लिखे जो खत तुझे वो तेरी याद मे’ म्हणत,जगत जी पत्रं मी तुझ्या साथीने भागूसाठी लिहली होती ती अजूनही तशीच आहेत. ती कधीतरी तिला एकदमचं पाठवून देऊ आणि मोकळं होउ ह्या मानिषेवर मी आजवर होतो.जी सुन्द्रीने मोडून काढली.… तिचं लग्न ठरलंय.! हे ऐकताच इतकी वर्ष मनात जपलेलं प्रेम एका गडद अंधारात गडप होतांना मला दिसलं.…तिचं जाणं मला कितीही जड होणार असलं तरी मी तिच्यावर रागावणार नाहीये. कारण तिने मला सोडून जाण्यात तिची चूक नव्हती. मात्र जेव्हा माझं प्रेम माझ्या हातून निसटतंय तेव्हा मला सावरायला तू नसणार ह्याची जास्त खंत वाटली. रागवायला तर तुझ्यावर हवं! जो माझ्या हर कारस्थानात शेवटपर्यंत माझ्या सोबत राहिला,ज्याने माझ्या प्रत्येक सूख-दुःखात मला साथ दिली तोच नेमक्या वेळेला,मला जास्त गरज वाटत असतांना अकस्मात एकटाच न जाण्याच्या ऐन तरुण्यवयात सोडून गेला.… दूर… खूप दूर!…एवढा! की जिथे कुठलंच टपाल हे पत्र पोहोचवू शकत नाही. तेव्हापासूनच रुसतो मी तुझ्यावर. अधून-मधून ह्याच आशेवर की कधीतरी माझ्या स्वप्नात तू बोरकूट,चिंचा घेऊन मला पुन्हा बोलतं करायला येशील आणि मग मी तुला ‘माझी साथ कायमची सोडून वैकुंठी जाण्याचा’ जाब विचारेन.

तुझाच जिग्गी,

शिंच्या.

कथालेखवाद

प्रतिक्रिया

रामपुरी's picture

21 Nov 2014 - 11:05 pm | रामपुरी

पण छान लिहिलंय.

किसन शिंदे's picture

21 Nov 2014 - 11:15 pm | किसन शिंदे

आवडलं.

खटपट्या's picture

21 Nov 2014 - 11:26 pm | खटपट्या

सुपर्ब लिहीलेय !!

आनन्दा's picture

22 Nov 2014 - 12:17 am | आनन्दा

सत्य घटना की कथा फक्त?

Targat Porga's picture

22 Nov 2014 - 5:01 pm | Targat Porga

रामपुरी, किसन शिंदे, खटपट्या… धन्यवाद!
आनन्दा, काही गमतीच फक्त खऱ्या आहेत बाकी नूस्तीच कथा.

स्वप्नज's picture

22 Nov 2014 - 7:45 pm | स्वप्नज

मस्त लिहलंय....

Targat Porga's picture

26 Nov 2014 - 4:27 pm | Targat Porga

धन्यवाद! :)

दिपक.कुवेत's picture

23 Nov 2014 - 1:34 pm | दिपक.कुवेत

वास्तव असेल तर सो सॅड....

Targat Porga's picture

26 Nov 2014 - 4:33 pm | Targat Porga

फॉरत्चुनेटली… सत्य घटना नाही. :)

पैसा's picture

23 Nov 2014 - 8:37 pm | पैसा

आवडलं.

Targat Porga's picture

26 Nov 2014 - 4:43 pm | Targat Porga

'पैसा बोलला'…मलाही आवडलं. (नो ऑफेन्स :db: )

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 11:56 am | मदनबाण

सुरेख... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

Targat Porga's picture

26 Nov 2014 - 4:47 pm | Targat Porga

थ्यांक्यू :)

प्रमोद देर्देकर's picture

24 Nov 2014 - 12:22 pm | प्रमोद देर्देकर

ट.पो. शाळेमध्ये एवढ्या गमती केल्यात तुम्ही. मस्तंय.

Targat Porga's picture

26 Nov 2014 - 4:36 pm | Targat Porga

मागे वळून बघताना माझा मलाच हेवा वाटतो. :D